एक लहानपणी वाचलेली गोष्ट होती, आठवतंय त्याप्रमाणे संत एकनाथांची. ते नदीवर स्नान करून येत असता एक निंदक त्यांच्या अंगावर थुंकतो, ते परत नदीवर जाऊन स्नान करून येतात, परत परत तेच घडते, कोणतीही वाईट प्रतिक्रिया न देत ते पुन्हा पुन्हा स्नान करून येत राहतात, शेवटी तो माणूस खजील होतो, क्षमा मागतो …. वगैरे वगैरे
ते "संत" एकनाथ होते या विचाराने हि गोष्ट अशीच घडली असेल यावर सहज विश्वास बसतो. आज समाजात अनेक तथाकथित संत, महाराज, बाबा, बुवा, बापू आहेत, त्यांच्यापैकी एखाद्याच्या बाबतीत असे घडले तर ते असेच वागतील असे वाटते?
आजही ज्ञानेश्वरी, गाथा,दासबोध या ग्रंथांचे महत्त्व शेकडो वर्षानंतरही असाधारण असे आहे,असे कोणते संत साहित्य आज निर्माण होते आहे, ज्याने आजच्या समाजाचे प्रबोधन तर होतेच आहे पण अजून सात आठशे वर्षानंतरही त्यांचे महत्त्व टिकून राहील? समाज प्रबोधनाची गरज काय फक्त त्याच काळात होती? आज नाहीये ? वाढलेल्या तणावांच्या, जागतिकीकरणाच्या. नाते संबंधांच्या ताणातून, वाढीव महत्त्वाकांक्षा यासाऱ्यामुळे ती कितीतरी पटीने जास्त आहे. मग त्यातून बाहेर पडण्यास तुम्हाला कोण मदत करते? कोणते संत, महात्त्मे, बापू बुवा? कि तुम्ही तुमचेच मार्ग शोधता, स्ट्रेस किलर्स शोधता? कि या जीवनालाच शरण जाता? आसपास अनेक समाजोपयोगी चांगली कामे करणारी माणसे आसपास आढळतील. सर्वचजण धर्माचे लेबल लावून आपल्या समोर येतात. त्यांच्या कामापेक्षा त्यांचा धर्म श्रेष्ठ ठरतो? किंवा एखाद्या विशिष्ठ धर्माचे असण्याने अशी महान कार्ये त्यांच्या हातून घडतात?
शिवाजी महाराजांनी पाठवलेला ऐवज गरज असतानाही नाकारणाऱ्या संत तुकारामांची गोष्ट अभिमानाने सांगताना, कोट्यावधींची माया गोळा करणाऱ्या बापू, महाराज यांना तोच नियम आपण का लावत नाही? साधे जगण्याची मूलतत्त्वेही अपवादानेच पाळणारी मंडळी आजच्या समाजाचे संत म्हणून कसे प्रतिनिधित्त्व करतात? अनेक बेकायदेशीर कृत्ये करणारी, व्यभिचार करणारी हि तथाकथित संत मंडळी जर आपल्या समाजात आहेत, राजरोसपणे आपले धंदे चालू ठेऊन आहेत, अनेक बाबा अतिशय चीड आणणारी बाष्कळ बडबड आणि कृत्ये करताना आपण पाहतो तर मग तरीही आपल्या समाजाचे चित्रीकरण कसे कोणी करावे आणि आपल्या समोर ठेवावे अशी आपली कल्पना आहे? की सत्याला आपण कधी खुल्या मनाने सामोरे जाणारच नाही? अशी तमाम मंडळी कोणा एका धर्माचे प्रतिनिधित्व करणारे नसतातच, तसे सर्वच धर्मात या प्रवृत्ती बोकाळलेल्या आहेतच.
रेहमान एक से एक उत्तम रचना घडवतो तेंव्हा त्याच्या धर्माचे आहे म्हणून "कून फाया, किंवा ख्वाजा मेरे ख्वाजा" अतिशय उत्तम बनवतो आणि त्याच्या धर्माचे, देवाचे नसलेले "मनमोहना" हे मात्र त्याच्या हातून उत्तम रचना घडत नाही असे घडते का? मग जर नक्की धर्म कुठे आड येतो? एखाद्या धर्मावर चित्रपटातून टीका केली म्हणून एखादा दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीवर आपण टीका करत असू तर त्याच्या धर्माचे नसतानाही मनमोहना सारखे उत्तम गाणे बनवणाऱ्या संगीतकाराचे विशेष कौतुक जाहीरपणे आपण करतो का?
लगेच कोणीतरी बाह्या सरसावून असे म्हणायची गरज नाही की "फक्त एकाच धर्माला का टार्गेट केलं गेलंय?" सोपं उत्तर म्हणजे आपण बहुसंख्यांक असणाऱ्या आपल्या देशात, आपलेच देव, संत, महात्त्मे जास्त संख्येने असणे आणि मग त्यावर टीका होणे हे स्वाभाविकच. दुसऱ्या एखाद्या दुसऱ्या धर्मबहुल देशात, प्रांतात त्यावर कोणी टीका केली असती, असे बोचरे चिमटे चित्रपटाच्या माध्यमातून काढले असते. आता तसं केल्यानंतर काय परिणाम झाले असते हे कोणत्या देशात, कोणत्या धर्मावर टीका होतीये, तो धर्म, तो समाज किती सहिष्णू आहे यावर ठरेल.म्हणजे कदाचित सोशल मिडीयावर चर्चे इतके त्या विरोधाचे स्वरूप मर्यादित राहिले हि नसते, अगदी तडीपार होण्याची वेळ तो तसा चित्रपट बनवणाऱ्यावर येऊ शकते, चित्रपटावर बंदी येऊ शकते, अगदी त्या कलाकार, निर्मात्याच्या हत्येचा फतवाही निघू शकतो. म्हणूनच मला हे हि मान्य आहे कि हे सारे इथे घडू शकणार नाही, हा धर्म इतका सहिष्णू आहे कि त्या धर्मात राहूनच मी त्यावर सरेआम टीका करू शकते. पण मग माझ्यावर अशी टीका करण्याची वेळ येतेच का?
धर्म, देव, जात, पोटजात या साऱ्या गोष्टी ना माणसाची मुलभूत गरज आहेत. त्याच्या अस्तित्त्वाशी निगडीत अशा. या कि त्या धर्माची आहे मी? धर्माच्या कोणत्या जातीचा, पोटजातीचा भाग आहे … या अनेक गोष्टी व्यक्तीचे आजचे अस्तित्त्व, समाज, विचारप्रक्रिया ह्या गोष्टींच्या मुळाशी काही प्रमाणात असतात. देव, धर्म, धार्मिक आचार विचार या साऱ्या गोष्टी खरंतर किती वैयक्तिक असाव्यात…. कोणता धर्माचे आहात, त्याच्या मुल्यांवर किती विश्वास ठेवता, आस्तिक आहात कि नास्तिक? नास्तिक कसे खरे खुरे कि सोयीने? आस्तिक असाल तर कशा प्रकारे, मुर्तीस्वरूप देवावर श्रद्धा असणारे, कर्मकांड मानणारे कि एका अनादी अनंत अशा विश्व चालवणाऱ्या शक्तीवर विश्वास ठेवणारे, हर इच्छेसाठी देवाला माणसासारखे समजून देवाण घेवाणीचे व्यवहार करू पाहणारे, की प्रत्येक चांगली, योग्य गोष्ट माझ्या हातून घडण्यासाठी बळ दे, चांगल्या दिवसात माझे पाय जमिनीवर ठेव, वाईट दिवसांना सामोरे जाण्यास मनाला शक्ती मागणारे. अशा असंख्य छटा या संकल्पना सोबत घेऊन येतात. म्हणूनच या संकल्पना प्रत्येक व्यक्ती नुसार वेगळ्या असताना त्या सर्वात जास्त वैयक्तिक होऊन जात नाहीत का?
पण जर धर्म हि माणसाची इतकी मुलभूत आणि वैयक्तिक गरज असेल तर मग मला त्यास घराबाहेर का न्यावे लागावे आणि प्रदर्शन करावे असे वाटावे? का मला कोणी घराबाहेर, शाळेत, महाविद्यालयात, नोकरीच्या ठिकाणी माझा धर्म , माझी जात विचारावी? एक माणूस असणे आणि जी गोष्ट करायची आहे ती करण्यासाठी सक्षम असणे इतकेच बास नाही का? म्हणजे शाळेत जायचय तर योग्य वय, शिक्षण घेण्यासाठी सक्षमता पुरे झाल्या कि या गोष्टी, नोकरी करायची आहे तर गरज आहे ते शिक्षण आणि तो अनुभव माझ्या गाठीला असणं पुरेसे नसावे का?
या अमुक एक धर्माचे आहोत आणि त्यातीलही अमुक एका देवाला पुजतो ते रस्त्यावर येऊन कोणाला का सांगावे वाटते? म्हणजे का रस्त्यावर कोणत्या देव धर्माशी संबधित कृत्ये रस्त्यावर उतरून प्रदर्शन करत करावीत? ना ताबूत निघावेत, ना गणपतींना रस्त्यावरून वाजत गाजत न्यावे, ना कान्हा ने रस्ते अडवून दही हंडी फोडावी. घराच्या, समाज केंद्रांच्या आत जे काय धर्मिकपण जपायचे असेल ते जपावे ना?
याच युगाचा एक महान क्रिकेट पटू माझ्या मनातून तेंव्हा उतरला जेंव्हा त्याने एका आपण एका बाबांचे भक्त आहोत हे समाजापुढे येऊ दिले. मला नाही वाटत प्रसार माध्यमांपुढे हि मंडळी इतकी हतबल असतात कि त्यांना या गोष्टी रोखता येत नाहीत. सारी कारकीर्द तोलून मापून वागण्या बोलण्या बद्दल प्रसिद्ध हा माणूस. त्याची श्रद्धा त्याने कोठे कशी ठेवावी हे वैयक्तिक आहे, होते. ते त्याने तसेच ठेवले असते तर जास्त चांगले झाले असते.
माझ्या या पूर्वीच्या नोकरी मध्ये माझा एक सहकारी होता, जो दुसऱ्या धर्माचा, दुसऱ्या शहरात काम करणारा होता. सर्वात जास्त काळ मी त्याच्यासोबत काम केलं होते आणि त्या कालावधीत कधीही आमचे भिन्न धर्म आमच्या कामाच्या आड आले नाहीत, ते कधीही आमच्या चर्चेचा विषय नव्हते. काम करतानाची आमच्यातील chemistry हि सर्वात चांगली आणि महत्त्वाची गोष्ट होती. माझ्या तिथल्या शेवटच्या दिवशी मला निघायला एक अर्धा तास असताना, त्याचा फोन येणे जे मी स्वाभाविकपणे अपेक्षिले होते आणि त्याप्रमाणे तसा त्याने केल्यावर, अपेक्षित होते ते सारे काही (कामात एकेमकांना किती पूरक होतो, कशी उणीव भासेल, पुढील वाटचालीसाठी एकमेकांना शुभेच्छा इ.)आम्ही दोघे बोलल्यानंतर अचानक त्याने, " अनघा, आयुष्यात एकदा तरी XXX (त्याच्या धर्माचा पवित्र ग्रंथ) हे वाच, तुला नवीन दृष्टी मिळेल जगण्याकडे पाहण्याची" वगैरे सांगितले. माझ्या सहिष्णू स्वभावाने मी फार शार्प प्रतिक्रिया न देता ते संभाषण थांबवू शकले, आजही आम्ही अधून मधून बोलतो, दोन चांगल्या व्यक्ती म्हणून, पण धर्माचे असे प्रदर्शन पुन्हा एकदा रुचले नाही ते नाहीच.
अजून एक टीम होती माझी ज्यात दोन जण इतर पण एकाच धर्माचे होते. आणि बाकी सारी टीम माझ्यासारखी. त्यामुळे वेगवेगळे, सण, पूजा त्याचा प्रसाद ऑफिसला नेणे हे ओघानेच. त्यातला एक जण असा प्रसाद म्हणून नेलेला कोणताही पदार्थ खात नसे, आणि दुसरा मात्र आठवणीने तो ऑफिसला आण असे सांगत असे. एक दिवस बोलताना मी याला विचारले, त्याला माझ्या देवाचा प्रसाद चालत नाही, तुला कसा चालतो रे? त्याचा उत्तर होते, "तुझ्यासाठी तो प्रसाद आहे, माझ्यासाठी तो फक्त शिरा किंवा पेढे बर्फी आहे, ते मला मनापासून आवडते आणि मी ते खातो. मी आणतो तो केक तूही असंच आवडतो म्हणून खातेस ना, यात कुठे आला आपला देव आणि धर्म?" या उत्तरावर मी एक सेकंद चमकले, पण मान्य केलं हे म्हणणं मी अगदी खुल्या दिलाने.
आज इतकं सारं मन:पटलावर येण्याचं कारण म्हणजे तो चित्रपट ज्याच्यावर एकाच धर्माला टार्गेट केलंय अशी टीका करत असंख्य लोक अधिकाधिक प्रसिद्धी देत आहेत. एखादी चुकीची गोष्ट खरतर अनेक वेळा दुर्लक्षून किंवा अनुल्लेखाने जास्त चांगली मारता येते. जो पर्यंत खरंच गरज पडत नाही तोवर कलाकृतीकडे कलाकृती म्हणून आणि रचना घडवणाऱ्याची अभिव्यक्ती म्हणून पाहावे आणि सोडून द्यावे. बघा पटलं तर ………… साऱ्या श्रद्धा, विश्वास माझ्या चार भिंतींच्या आत ठेऊन एक माणूस म्हणून समाजात राहणे मला मनापासून आवडेल, आणि तुम्हाला?
This comment has been removed by the author.
ReplyDeleteछान लिहिलं आहेस. मी काही ’तो’ चित्रपट पाहिला नाही आणि पहायचा विचारही नाही.
ReplyDeleteएक माणूस म्हणून समाजात रहायला हवं हे खरं असलं तरी नेमकं हेच माणसं विसरत चालली आहेत. विचारशक्ती, भावना, दृष्टीकोन हे प्रत्येकाने पुन्हा तपासायची वेळ आली आहे असं अंधानुकरण, धर्म, भावना, धार्मिकतेचा अतिरेक पाहून वाटत रहातं.
धन्यवाद मोहना. आणि आपण नेमके तेच टाळतोय …. आणि मग काही मंडळी या गोष्टींचा हवा तसा सोयीचा उपयोग करताना दिसतात आणि आपण काहीच करत नाही
ReplyDelete
ReplyDeleteमस्त जमलाय लेख. आपण बर्याच दिवसात माझ्या ब्लॉग भेट दिलेली दिसत नाही. तुमचा ब्लॉग ' रिमझिम पाऊस ' ला जोडा. http://maymrathi.blogspot.in/p/blog-page_7.html