दिवाळी आणि दिवाळखोरी यांचा खूपच जवळचा संबंध असावा....दिवाळी नंतर येते ती दिवाळखोरी असा तो असावा. नाही आर्थिक दिवाळखोरीबद्दल नाही बोलत मी. बौद्धिक दिवाळखोरीबद्दल बोलतीये मी. तथाकथित बुद्धिजीवी वर्गाच्या दिवाळखोरीबद्दल. तशी आपण ती वैयक्तीक आयुष्यात अनेकदा दाखवूनही देतो पण सरकार आपल्याला ती जाहीररित्या व्यक्त करण्याची संधी देतं दर पाच वर्षांनी आणि या वर्षी अगदी दिवाळीत आणि दिवाळीनंतर लगेचच ती चालून आली आहे.
आजच वर्तमानपत्रात जाहीर झाल्याप्रमाणे, पुणे महानगरपालिकेने नेहरू योजने अंतर्गत फक्त एक प्रकल्प पूर्ण केला आहे आणि तरी ३ पूर्ण केल्याचा दावा पालिका करत आहे....मी राहते त्या भागात एक उड्डाण पूल गेली चार वर्षे रखडलेला आहे आणि म्हणे तो १५ नोव्हेंबर पर्यंत पूरा होईल....कसा तो देव जाणे. त्याच योजनेअंतर्गत एक कचरा गोळा करणारी एक गाडी फिरते, जी फक्त मोठ्या रस्त्यांवरून फिरते आणि छोट्या गल्लीतील कचर्याला कोणी वाली नाहीये. गेल्या निवडणूकांच्या पुर्वी बनलेला रस्ता गेल्या पाच वर्षात इतका खराब झाला आहे, इतक्या वेळा तो काही ना काही कारणाने खोदला होता की त्यावरून चालणे महामुश्कील. तुमचा जीव मुठीत घेऊन चालण्याची संधी देणार्या त्या सर्वांचे आपण आभार मानायला हवेत.अशाच एका रस्त्यावर या वर्षी गणपतीत एक भलं मोठं कारंज भर रस्त्यात बनवून, उरलेल्या छोट्याशा रस्त्यावर गाडी चालवण्याची कसरत करण्याची संधी एक नगरसेविका या वर्षी घेऊन आली. कदरच नाही आपल्याला त्यांची.
तुम्हाला कदाचित माहीतही नसेल की कोण तुमचा नगरसेवक /सेविका आहेत ते. पण पहा त्याना तुम्ही माहीत आहात.......... तुमच्या घरी गेल्या पाच वर्षात प्रथमच एक मिठाईचा बॉक्स त्यांच्याकडून आलेला असू शकतो. घरातील प्रत्येक माणसाच्या नावे एक ग्रीटिंग कार्ड आलेलं असू शकेल, घराजवळ फ्लेक्स बोर्ड वर दिवाळी शुभेच्छा ची बरसात झालेली असेल,पाच वर्षात पहिल्यांदाच त्यांच्या पैकी कोणी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला असेल.
एकंदरच ही राजकारणी मंडळी खूप हुशार......कोणाचं महत्व कधी आणि किती, कोणाला कधी गोंजारायचं, कधी विसरायचं यात सार्यानी मास्टर्स केलेलं. फक्त झोपडपट्टी किंवा गरिबांना नव्हे तर, त्याना तथाकथित मध्यम, उच्च मध्यम वर्गीय नोकरदार, बुद्धिजीवी वर्गाला ही चांगल्या प्रकारे वापरता येऊ लागलं आहे, आपली बौद्धिक दिवाळखोरी त्याना चांगलीच ठाऊक आहे. आपण आपले करियर, छंद यात मग्न. एखादी ऑनसाइटची संधी, एखादी सेदान कार, एखादं सेकेंड होम, घराबाहेर पडून मजेत घालवलेले वीकेंड्स, मुलं सो कॉल्ड इंटरनॅशनल स्कूल मधे शिकायला पाठवणे, आणि नंतर त्यानी बाहेर देशात सेट्ल होणं यात झाली...... आपल्या आयुष्याची इति पूर्तता.
आपण आपल्या मुलाना राजकारण, समाजकारण या गोष्टींकडे प्रयत्न पूर्वक वाळवणे तर खूप दूरची बाब....आपल्या पैकी किती जण तो आलेला गिफ्ट बॉक्स नाकारू शकले, किती जण दिवाळी पहाट च्या कार्यक्रमवर बहिष्कार घालू शकले, किती जण दारी मत मागायला दारी आलेल्या नगरसेवकास " बाबारे, गेली पाच वर्षे तू कुठे होतास आणि गेल्या पाच वर्षात तू या भागासाठी, इथल्या विकासासाठी काय केलेस? तू खरच भ्रष्टाचारमुक्त राजकारण केल्याचे काही पुरावे आहेत काय? गेल्या पाच वर्षात तुझया आणि तुझया कुटुंबाच्या संपत्तीत किती पट वाढ झाली? आणि त्याचा उत्पन्न स्त्रोत कोणता?" असे प्रश्न विचारू शकतील.
जाऊ दे हो हे सारे....नुकतीच मस्त दिवाळी साजरी झाली आहे, मोठी खरेदी, कपडे, फराळ, पाठोपाठ एक मस्त ट्रिप....कुठे असा विचार करून डोक्याला ताण देताय....त्यापेक्षा एक ठप्पा उमटवून किंवा मतदान न करून कोण्या एका नाकर्त्या पक्षाला सत्ता देऊन आपण आपली बौद्धिक दिवाळखोरी प्रदर्शित करण्याची चालून आलेली संधी साधू.