Friday, December 30, 2011

वारसा

आजकाल कोणी असं भेटलं की वडिलांचा मोठा बिझनेस आहे, पण मुलांपैकी कोणालाच त्यात इँटेरेस्ट नसतो. हळहळ वाटते अशा वेळी. आवड वगैरे सर्व गोष्टी मान्य करूनही असं म्हणावं वाटतं की असं असू नये. वारसा चालवणारं कोणीतरी पुढच्या पिढीत देखील तयार व्हायला हवं. इतकच नव्हे तर तो जोपासून समृद्ध करणारं ही कोणीतरी हवं. नुसतं "सांगे वडिलांची किर्ती" असे नको तर ती वाढवणारं आणि त्यांची किर्ती ताजी-तावानि राखणारं ही कोणीतरी हवं. कदाचित मागील पिढीनेच प्रयत्नपूर्वक ते घडवून आणायला हवं.


इतिहास हा शाळेत काही-जणांचा नावडता विषय असतो, तरी गोष्टिरुपात ऐकताना तितका कंटाळवाणा नक्कीच वाटत नाही. असं आपल्या मागच्या काही पिढ्यांबद्दल आपण ऐकलेले असते आणि काही गोष्टी ऐकताना खूप छान वाटलेलेही असते. मी लहान असताना आमच्या घरी माझे पणजोबा राहत असत. माझी पणजी  अतिशय देखणी होती. नावही किती छान श्रीधर आणि सौ.पद्मावती. उंचेपूरे पणजोबा आणि सुंदर अशी पणजी काय दिसत असेल तो जोडा. त्याकाळच्या फोटो मधे सुद्धा जाणवतं हे. ते त्यांच्या काळी मेकॅनिकल इंजिनीयर झालेले. आजीच्या लहानपणी त्यांची एक फॅक्टरी होती. काही जण नोकरी करत असत तिथे. दिवाळीत प्रत्येक कामगाराला सोन्याचे लक्ष्मीचे नाणे भेट म्हणून मिळत असे. मला तर हे ऐकून पेशवाईचीच आठवण आली.

पण मी त्याना पहिलं तेंव्हा यातलं काहीचं नव्हतं. तोपर्यंत त्यांचं वय खूप झालं होतं पण बुद्धिमत्ता तशीच होती तसेच स्मरण शक्तीही. वयाच्या ९५ व्या वर्षी हा गृहस्थ निसर्गोपचार केन्द्र चालवत असे, पुण्यात मध्य वस्तीमधे. रोज सकाळी १० नंतर काही पेशंट येत असत त्यांच्या कडे. फक्त उपाय सांगण्यासाठी ते त्या काळी म्हणजे जवळपास २५/३० वर्षांपूर्वी ४० रुपये घेत असत. त्याकाळी ही रक्कम नक्कीच मोठी होती. पण ज्या अर्थी लोक ते देत असत त्या अर्थी त्यात काही दम असला पाहिजे. मोडी लिपीत सतत काही लेखन चालू असे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांसारख्या लोकांशी त्यांचा संवाद असे. सकाळी सकाळी उठून वेगवेगळी स्तोत्रे, अभंग म्हणत असत. सगळी वर्तमानपत्रे वाचत असत. अतिशय कमी आहार असे तसेच हालचालही. त्यानी बनवलेली काही उपकरणे इतकी मस्त होती की तशी त्या नंतर कुठेच पहिली नाहीत. लाकडी टी-पोआय, नारळ खवण्याचे यंत्र, दाण्याचं कूट करण्याचं अशा अनेक गोष्टी त्यानी घरी बनवलेल्या होत्या आणि त्या तशा दुसरीकडे कुठेच नव्हत्या.

पण म्हणतात ना दिव्या खाली अंधार. असा वारसा काही कारणानी मागे पडतो, यातलं काहीच तुमच्या पर्यंत झिरपत नाही. तुम्ही पाहिलेले वास्तव काही वेगळेच असते. प्रश्न असा की वारसा जपला का जात नाही? का त्यांच्या वाटेवर पुढची पिढी नाही चालत? आमच्या त्या घरात ना दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर लोक जगत होते. एक ते असे आणि दुसरे माझे आई-बाबा आणि आम्ही भावंडे. आमची जगण्याची लढाईच वेगळी होती. पणजोबांची बुद्धिमत्ता, कर्तुत्त्व त्याकाळी आमच्या पर्यंत पोहचतच नव्हती. आज मागे वळून पाहाताना जाणवतं की किती मोठा वारसा होता तो. पण त्या काळी त्याचं महत्व जाणवलं नव्हतं कदाचित. आज उरली आहे ती एक खंत.....हळहळ वाटून घेण्याशिवाय, त्यांच्या बद्दल अभिमान बाळगण्याशिवाय दुसरे काही त्या समृद्ध वारशासाठी करू नाही शकत याची.

Wednesday, December 21, 2011

आरसाही खोटे बोलतो



आरसाही खोटे बोलतो

पाहू जाता मला रूप तुझेच दावतो
मोगराही खोटे बोलतो
माळता केसात त्यास गंध तुझाच दरवळतो
कशी ही तुझी भूल पडली मला
की शिशिरातही आठवे मज मोगरा 


Monday, December 19, 2011

समजून घे रे समजून घे


तूच तो निळासावळा
तीच ती मी तुझी राधा
तीच आपूल्या प्रीतीची गाथा
समजून घे रे समजून घे 


फुलतो दारात मोगरा
पाहते त्यातही तुजला
माळीते केसात त्याचाच गजरा
समजून घे रे समजून घे


पडला मागे तो आपुला गाव
आणते खोट्या सुखाचा आव
अन् झूरते क्षणोक्षणी तुजसाठी
समजून घे रे समजून घे

देवाचिये द्वारी

तशी मी धार्मिक कधी नव्हते. लग्न होईपर्यंत घरी कोणते धार्मिक कृत्य असेल तर नमस्कार करुन गोड-धोड जेवणावर ताव मारणे इतकाच माझा त्याच्याशी संबंध असे. अभ्यास आहे हे कारण ही खूप उपयोगी होते त्याकाळी, पण परीक्षेसाठी मात्र आवर्जून देवाला नमस्कार असे. पण त्याकाळी ही मला माहीत होते की माझयासारखे असे अनेकजण असतात म्हणून. नंतर सारे बदलत गेले. घरची नवी सून म्हणून काही गोष्टी करणे क्रमप्राप्त होते. त्याकाळी माझा माझयाशीच वाद असे. अनेक गोष्टी माझयावर लादल्या जात आहेत असे वाटत असे.


नंतर मीच बदलत गेले. गरजे साठी धार्मिक राहणे मनाला पटेना. पूर्णत: नास्तिक होणे ही जमले नसते मला. वाईट दिवसांत कोणाचा तरी आपण वापर करतोय हे न पटणारी गोष्ट होती मग तो देव असो, कोणी माणूस असो वा कोणी शक्ती म्हणू. मग मी विचारपूर्वक सश्रद्ध बनले. जे काही ते मनापासून करू लागले.

माझी साधी सोपी प्रार्थना असते. "माझी तुझयावर श्रद्धा आहे. माझा तुझयावर विश्वास आहे. माझयासाठी तू एक शक्ती आहेस, या विश्वाचा पालक आहेस. खूप काही मी तुझयाकडे मागून तू ते देण्यापेक्षा जे मला मिळवायचं आहे ते मिळवता येण्याची शक्ती तू मला दे. जर एखद्या क्षणी माझी परीक्षा पाहायची असेल तर समर्थपणे ती परिस्थिती पेलण्याची ताकद दे. यशासोबत पाय जमिनीवर राहतील अशी विचारधारा दे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझयापेक्षा दीन दुबळ्यांसाठीची कणव माझया मनात तेवती ठेव."

तरीही खूप या गोष्टींचे अवडंबर माजवणे मला पटत नाही. मी हे केले की देव मला ते देतो आणि नाही केले तर शिक्षा होते मला अशी विचारधारा मी जपत नाही. माणसासारखा विचार करणार्‍याला "देव" कसं म्हणावं? धार्मिक महत्त्व असणार्‍या दिवशी देवळात जाणं मी टाळतेच. किंवा सतत देव-दर्शन करणार्‍या लोकांना "आता कधी तरी त्या देवाला मोकळं सोडा, सारखा कोणकोणा कडे तो बघेल बिचारा " किंवा " तुमचं आणि देवाचं काय 3 -जी कनेक्शन आहे का की नुसतं मनात यायचा आवकाश की तुम्ही त्याच्या दर्शनासाठी पोहचताच" असं ही विचारते.


तरीही अधून मधून काही ठराविक देवळात जाण्याची मला इच्छा होतेच. मग अनेक दिवस जायचं असं घोकत मी कधीतरी पोहचते. देवाचं दर्शन हा निव्वळ हेतू मनात ठेवून. त्यामुळे देवासमोर ठेवण्यासाठी खूप काही घेऊन जावं असं माझया मनात फारसं कधी येत नाही. पण तिथे देणगी स्वरूपात किंवा अभिषेक म्हणून काही तरी देणे मी पसंत करते. (असा संगितलेला अभिषेक ते लोकं खरच करतात या बद्दल मला शंका आहे.) पण देवस्थानला इतर काही चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता निधीची गरज असते या विचाराने.


पण तरीही काही तरी देवाच्या दारी जाउनही मला खटकते. ते म्हणजे तिथले पूजारी आणि त्यांची वागणूक. तुम्ही काय देवासमोर ठेवता त्याप्रमाणे ते तुमच्या हाती प्रसाद म्हणून काय ठेवायचे ते ठरवतात. म्हणजे तुम्ही काहीतरी मोठं देवाच्या समोर ठेवा, ते तुम्हाला नारळ, पेढे, देवाला वाहिलेली फुले, हार किंवा देवाचं वस्त्र असं काही तरी प्रसादाच्या रूपात देतात. नुसते जा हात जोडुन डोळे मिटून प्रार्थना करा तेंव्हा ते तुमच्या हातावर साधे साखर फुटाणे देखील ठेवत नाहीत. मी कधी या गटात नाही तर कधी दुसर्या गटात असते. पण दोन्ही वेळा मनात विचार येतो की किमान देवाच्या दारी अशी विषमता असू नये.

Friday, December 16, 2011

किती दिवस झालेत..........


खरतर गंमत असते, छानशा हवेत घराबाहेर पडावे कोणत्याच कारणाशिवाय. वाट फुटेल तसं चालत राहावं, कंटाळा आला की परतीची वाट धरावी. वाटेत एखादं देऊळ असावं, डोळे भरून मूर्तीकडे पाहावं, शांतपणे तिथे २ क्षण विसावा घ्यावा, किती दिवस झालेत पर्वतीवर नाही गेले, अनेकदा सारसबागेसमोरून जाते पण थांबून गणपतीचं दर्शन घ्यावं हे राहूनच जाताय.
किती दिवस झालेत, लक्ष्मी रोड किंवा एम जी रोड वरुन विंडो शॉपिंग करत भटकले नाही. कितीतरी दिवस झालेत घरी टेरेस मधे निवांत बसून चहा चा आस्वाद नाही घेतलाय, अनेकविध पदार्थांची चव या ना त्या कारणानी चाखत असते पण कितीतरी दिवस झालेत, तव्यावरची गरम पोळी आणि शिकरण मात्र विसरले आहे
किती तरी दिवस झाले काही कारण नसताना, मामा, आत्या, काका-काकू यांच्याकडे गेले नाही. की उगाचच कोणा मित्र-मैत्रीणीला फोन नाही केला. अनेकदा जी-टॉक किंवा एफ-बी वर अनेक जण ऑनलाइन दिसतात, पण गप्पा तिथेही होत नाहीत. माणसं आपल्या माणसांपासून तुटत जातात की स्वत:पासूनच?

Wednesday, December 14, 2011

जडणघडण

गेल्याच आठवड्यात एक सर्टिफिकेशनसाठी परीक्षा झाल्यानंतर, मी १०/१२ वी च्या परीक्षे नंतर सुट्टी जो आनंद असायचा तोच अनुभवत आहे. आणि त्याकाळात ही जो माझा आवडता छंद की मनसोक्त वाचन त्याकडेच वळले. नशीबवान मी की माझया लहानपणी आमच्या घरी माझे पणजोबा राहत असत आणि त्याच्याकरिता घरी सारी वर्तमानपत्रे येत आणि कोणी न सांगता ही रोज घरी येणारी सारी वर्तमानपत्रे मी वाचून काढत असे. ती सवय आजही कायम आहे. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे, मी पुण्यात राहत असताना घरातून दोन उड्या मारल्या की पुणे मराठी ग्रंथालयात पोहचत असे. रोज संध्याकाळी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथे एका हॉल मधे अनेक पुस्तके ठेवलेली असत आणि कोणीही तिथे जाऊन पुस्तके वाचू शकत असे. अशा रीतीने प्रत्येक सुट्टीत माझे पुस्तक-प्रेम वाढतच गेले. बर्‍याचदा एकदा हाती घेतले की ते पुस्तक वाचूनच संपवायचे. अगदी जेवताना, रात्री झोपताना, तरीही शिल्लक राहीले तर सकाळी लवकर उठुनही. अनेकदा आईची बोलणी खाऊनही.

बर्‍याचदा एक पुस्तक मला दोनदा वाचायला आवडते. पहिलं वाचन रंजक गोष्टींमधे गुंतवून ठेवते, दुसर्यांदा हाती घेतले की या गोष्टी मागे पडतात, आणि पुस्तकाच्या गाभ्यापर्यंत पोचता येते आणि ते वाचन पहिल्या इतकेच गुंतवून ठेवते.

पुर्वी अनेकदा मी लायब्ररीतून पुस्तके आणून वाचत असे पण आजकाल स्वत:चा एक संग्रह बनविण्यातला माझा रस वाढला आहे. त्यामुळे आजकाल अक्षरधारा, एबीसी इथल्या माझया चकरा खूप वाढल्या आहेत. यावर्षी दिवाळीची खरेदी मी भरपूर पुस्तकांच्या रूपाने केली आणि जेंव्हा घरी भिंतीवर एका काचेच्या रॅक वर मांडून ठेवली तेंव्हा हरखून मी पाहताच राहीले माझया या संग्राहाकडे.

खूप वर्षांपूर्वी मी मीना प्रभू यांची "माझे लंडन" आणि "दक्षिणरंग" वाचली होती. खूप आवडली होती मला ती दोन्ही. विशेषतः दक्षिणरंग. खरोखर एक उत्तम प्रवासवर्णन! कदाचित प्रवासाच्या आधी लेखन हा उद्देश मनात नसावा. एकूणच पुस्तकाची भट्टी इतकी मस्त जमली होती की आपण एकटे प्रवास करणार असू तर एक उत्तम गाइड म्हणून ते पुस्तक उपयोगी पडावे आणि तरीही वाचनाकरिता रंजक असावे. हाच धागा मनात ठेवून त्यांची बाकी सारी पुस्तके जशी की " रोमराज्य, ग्रीकायन, तुर्क-नामा, इजिप्तायन, गाथा इराणी" मी विकत घेऊन आले. पण पदरी निराशा आली कारण ही सारी पुस्तके लिखाण हा हेतू मनात ठेवून केल्यासारखी वाटली. बराचसा एकटीने केलेला प्रवास, उस्फूर्तता हरवून बसलेली पुस्तके वाटली मला ती.

मग मी मागे एकदा वाचलेली "पानिपत" हाती घेतली आणि पुन्हा त्याचप्रकारे वाचून काढली. रात्री उशिरा घरी पोहचल्यावर, सकाळी उठल्यावर, ऑफीस ला जाण्यापुर्वी. असं पुस्तक जे हाती घ्यावं आणि तहान-भूक विसरून वाचतच जावे. डोळे उघडणारा मराठ्यांचा इतिहास. लढवय्येपणाची परिसीमा, त्याचप्रमाणे त्याकाळचे शासन, लढाया, राज्यविस्तार सार्‍या गोष्टी इतक्या सुंदर रित्या मांडल्या गेल्या आहेत. अनेकदा डोळे पाणावतात, अनेकदा मराठी असल्याचा अभिमान वाटतो, तर अनेकदा आजच्या सारखेच गळेकापू राजकारण त्याही काळी होते, ज्याने अनेक मोहरे गमावले याचा तिरस्कार वाटतो. आज २५० वर्षानंतरही जसाच्या तसा इतिहास जिवंत करणार्‍या या पुस्तकाला शतश्: प्रणाम.


Saturday, December 10, 2011

जागे व्हा..............


निवडणूका अजून जाहीर नाही झाल्यात,  कोणाला तिकीट मिळणार याचा पत्ता नाही, तरीदेखील अनेक इच्छुक काय काय क्‍लूप्त्या लढवताना दिसतात. महिला मंडळाच्या ट्रिप्स, सांस्कृतिक कार्यक्रम, हेल्थ चेक अप,स्पॉन्सर्ड अर्थातच कोणीतरी निवडूणकोत्सुक. या आठवड्यात मी राहते त्या भागात सर्व प्रकारचे  मनोरंजनाचे कार्यक्रम या वीकेंड्ला आहेत....शुक्र-तारा, आयुष्यावर बोलू काही, स्वप्निल बांडोद्कार रजनी, भक्तीगीत .....बाप रे बाप इतकी आमच्या मनोरंजनाची काळजी या लोकाना अचानक का वाटू लागली? स्वत:च्या आई-बापाना काशी यात्रा घडवली नसेल पण सारे आधुनिक श्रावण बाळ मतदार आजी आजोबाना देव-दर्शन घडवून आणत आहेत.
एका नगरसेविकेच्या घराची (राजवाडा म्हणू) वास्तू-शांत होती, (निवडणूक जवळ आल्याचाच एक मुहूर्त मिळाला हो) सार्‍या प्रभागाला आमंत्रण होतं, आलेल्या प्रत्येक बाईला साडीचा प्रती आहेर होता, कमीत ४/५ हजार माणसे जेऊ घातली तिने.बघा किती प्रेम आपल्या भागातल्या मतदारांवर. 
आजच घरी एक पत्रक येऊन पडलं एका नगरसेविके ने आयोजित पैठणी चा खेळ. पहिले बक्षीस "स्कूटी पेप" दुसरे ६ चांदीचे ग्लास, तिसरे सोन्याचे कानातले, मग अंगठी, ओव्हन, पैठणी आणि काय काय...
प्रश्न हा आहे का जातात अशा ठिकाणी आपल्या सारखे लोक? मी राहते तो सर्व सुशिक्षीत लोकांचा आहे तर मग यांच्या या गोष्टीना भुलतं कोण? या पूर्वी मी या गोष्टी काही ठराविक भागातच घडताना पहिली आहेत, पण आता हे सारं तुमच्या माझयापर्यंत येऊन पोहचलं आहे. कदाचित आपण तथाकथित सुशिक्षित, सुजाण लोकाना ही या मार्गाने विकत घेता येतं असं राजकारण्याना वाटू लागलं आहे ....जागे व्हा.

Change is the only Constant...........

असं म्हणतात " Change is the only Constant " खरच आयुष्याचा अगदी अविभाज्य घटक. कधी खूप हवाहवासा तरी कधी नकोसा, आपल्यावर लादलेला. बरेच दिवस मनात होतं सद्ध्या ज्या बदलातून मी जात आहे त्याबद्दल काही लिहावं. खरतर लग्न आणि आईपण ही दोन आयुष्यातील स्थित्यंतरे अनुभवल्या नंतर कोणताच बदल कठीण वाटू नये. पण तसं घडत नाही. तसे बदल हे रोजचेच....बरेच दिवस घराकडे धड लक्ष नाही दिले आहे, कुंडी मधलं रोपटं किती मस्त वाढलं आहे, बरेच दिवसात मैत्रीणी बरोबर मनसोक्त गप्पा झाल्या नाहीत, आमचं पिल्लू आता बरच मोठं आणि शहाणं झालय,....एका रात्रीत घडत नाहीत हे बदल, दर दिवशी हर क्षणी जग बदलत आहे, आपल्याला ते काहीसं उशिरा जाणवतं बस इतकच.


मला आठवतो सर्वात मला आठवणारा नकोसा बदल म्हणजे मी दहावीत असताना आम्ही घर बदलले ते. नवीन घरात शिफ्ट झालो, घर लावून झाले, या घराला मागे पुढे आंगण होते, जून महिना, ढग भरून आलेले, आणि कातर वेळी मी उदास अशी अंगणात बसून, विचार करत "का इथे? मला पुन्हा जुन्याच घरी जायचं आहे" पळून जावं पुन्हा त्या जुन्या घरी. पण ते घर तर पाडलं होतं, त्याजागी एक शॉपिंग कॉंप्लेक्स उभा राहण्यासाठी. त्या वेळी शेजारच्या बंगल्यातून आर्त सूर आले "जीवलगा.........राहीले रे दूर घर माझे......." डोळे भरून आले.(ते आत्ता या क्षणी पण आलेत). तेंव्हापासून आजतोपर्यंत मी माझया घराशी इतकी अटॅच आहे की एखादा दिवस सुद्धा मला माझया घरी न राहण्याची कल्पना रुचत नाही. रात्री कितीही उशीर होवो, मला माझयाच घरी परत जायचं असतं.


दूसरा मोठा बदल म्हणजे काही वर्ष निभावलेल्या होम-मेकर च्या रोल मधून स्वत:ला बाहेर काढण्याचा केलेला खटाटोप. जरी हा ही बदल स्व-इच्छेने होता, तरी सोपा नक्कीच नव्हता. ए कंप्लीट मेक-ओव्हर. अनेक महिने मी मलाच तयार करत होते, आणि पुढची अनेक वर्षे गेली ....माझे आज मी आहे त्यात स्थित्यंतर घडून यायला.


गेल्या काही वर्षात जेंव्हा जेंव्हा मी नोकरीत बदल केला तेंव्हा तेंव्हा पहिल्या दिवशी नवीन ऑफीस मधून पळून जावं, पुन्हा त्याच जुन्या ऑफीस मधे, आपल्या माणसात. माझे प्रत्येक ऑफीस हे माझे दूसरे घरच होते. तिथल्या प्रत्येक गोष्टीशी मी इतकी  जोडलेली असते की दूर जायची वेळ आली की एक इतकी अस्वस्थता मला घेरून टाकते. जसजसा तो दिवस जवळ येतो तसा नवीन काहीतरी मिळवल्याचा आनंद मावळू लागतो, आणि काहीतरी गमावतो आहोत ही भावना प्रबळ होऊ लागते.


बर पण हे बदल काही कोणी लादलेले नसतात माझयावर. माझे मीच प्रयत्नपूर्वक ते घडवलेले असतात, तरी नाळ अशी तुटता तुटत नाही. यावेळी पण असंच घडलं होतं, मी स्वत:ला खरतर खूप फ्लेक्सिबल समजते, कुठे ही कोणाशीही मी अड्जस्ट करू शकते, असा एक विश्वास जवळ बाळगते. पण तरीही अवघड असतो तो ट्रॅन्ज़िशन चा काळ. जेंव्हा तुमची अवस्था "घर का ना घाट का" अशी असते. आसपासचा कोणताच माणूस आपला वाटत नाही, आजूबाजूच्या कोणत्याच घटनांशी आपला काही संबंध आहे असे वाटत नाही, मन जून्याच गोष्टींमागे धाव घेत राहतं.

पण ते ही दिवस सरतात, एखादी घटना, एखादी व्यक्ती, एखादी अवघड टास्क, तुमची नाळ नव्याशी जोडते, हळू हळू सूर जुळत जातात, एखादा विसंवादी इथेही असतोच. पण तसा तो सर्वत्र च असतोच हे मनोमन आपल्याला माहीत असते. इतके रुळून जाता तुम्ही त्या ठिकाणी, की काही काळानंतर सार्‍या गोष्टी अतिपरिचित, रूक्ष, त्याच त्या वाटू लागतात .....आणि मग सुरू होतो प्रवास पुन्हा एका बदलाच्या दिशेने.....