Monday, December 19, 2011

देवाचिये द्वारी

तशी मी धार्मिक कधी नव्हते. लग्न होईपर्यंत घरी कोणते धार्मिक कृत्य असेल तर नमस्कार करुन गोड-धोड जेवणावर ताव मारणे इतकाच माझा त्याच्याशी संबंध असे. अभ्यास आहे हे कारण ही खूप उपयोगी होते त्याकाळी, पण परीक्षेसाठी मात्र आवर्जून देवाला नमस्कार असे. पण त्याकाळी ही मला माहीत होते की माझयासारखे असे अनेकजण असतात म्हणून. नंतर सारे बदलत गेले. घरची नवी सून म्हणून काही गोष्टी करणे क्रमप्राप्त होते. त्याकाळी माझा माझयाशीच वाद असे. अनेक गोष्टी माझयावर लादल्या जात आहेत असे वाटत असे.


नंतर मीच बदलत गेले. गरजे साठी धार्मिक राहणे मनाला पटेना. पूर्णत: नास्तिक होणे ही जमले नसते मला. वाईट दिवसांत कोणाचा तरी आपण वापर करतोय हे न पटणारी गोष्ट होती मग तो देव असो, कोणी माणूस असो वा कोणी शक्ती म्हणू. मग मी विचारपूर्वक सश्रद्ध बनले. जे काही ते मनापासून करू लागले.

माझी साधी सोपी प्रार्थना असते. "माझी तुझयावर श्रद्धा आहे. माझा तुझयावर विश्वास आहे. माझयासाठी तू एक शक्ती आहेस, या विश्वाचा पालक आहेस. खूप काही मी तुझयाकडे मागून तू ते देण्यापेक्षा जे मला मिळवायचं आहे ते मिळवता येण्याची शक्ती तू मला दे. जर एखद्या क्षणी माझी परीक्षा पाहायची असेल तर समर्थपणे ती परिस्थिती पेलण्याची ताकद दे. यशासोबत पाय जमिनीवर राहतील अशी विचारधारा दे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझयापेक्षा दीन दुबळ्यांसाठीची कणव माझया मनात तेवती ठेव."

तरीही खूप या गोष्टींचे अवडंबर माजवणे मला पटत नाही. मी हे केले की देव मला ते देतो आणि नाही केले तर शिक्षा होते मला अशी विचारधारा मी जपत नाही. माणसासारखा विचार करणार्‍याला "देव" कसं म्हणावं? धार्मिक महत्त्व असणार्‍या दिवशी देवळात जाणं मी टाळतेच. किंवा सतत देव-दर्शन करणार्‍या लोकांना "आता कधी तरी त्या देवाला मोकळं सोडा, सारखा कोणकोणा कडे तो बघेल बिचारा " किंवा " तुमचं आणि देवाचं काय 3 -जी कनेक्शन आहे का की नुसतं मनात यायचा आवकाश की तुम्ही त्याच्या दर्शनासाठी पोहचताच" असं ही विचारते.


तरीही अधून मधून काही ठराविक देवळात जाण्याची मला इच्छा होतेच. मग अनेक दिवस जायचं असं घोकत मी कधीतरी पोहचते. देवाचं दर्शन हा निव्वळ हेतू मनात ठेवून. त्यामुळे देवासमोर ठेवण्यासाठी खूप काही घेऊन जावं असं माझया मनात फारसं कधी येत नाही. पण तिथे देणगी स्वरूपात किंवा अभिषेक म्हणून काही तरी देणे मी पसंत करते. (असा संगितलेला अभिषेक ते लोकं खरच करतात या बद्दल मला शंका आहे.) पण देवस्थानला इतर काही चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता निधीची गरज असते या विचाराने.


पण तरीही काही तरी देवाच्या दारी जाउनही मला खटकते. ते म्हणजे तिथले पूजारी आणि त्यांची वागणूक. तुम्ही काय देवासमोर ठेवता त्याप्रमाणे ते तुमच्या हाती प्रसाद म्हणून काय ठेवायचे ते ठरवतात. म्हणजे तुम्ही काहीतरी मोठं देवाच्या समोर ठेवा, ते तुम्हाला नारळ, पेढे, देवाला वाहिलेली फुले, हार किंवा देवाचं वस्त्र असं काही तरी प्रसादाच्या रूपात देतात. नुसते जा हात जोडुन डोळे मिटून प्रार्थना करा तेंव्हा ते तुमच्या हातावर साधे साखर फुटाणे देखील ठेवत नाहीत. मी कधी या गटात नाही तर कधी दुसर्या गटात असते. पण दोन्ही वेळा मनात विचार येतो की किमान देवाच्या दारी अशी विषमता असू नये.

No comments:

Post a Comment

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!