या शनिवारी सर्वात महत्वाचं काम करायचं आहे. खालच्या बागेत जाऊन झाडांना पाणी घालायचं आहे म्हणजे तरी पुण्यात पाऊस पडेल. आता तुम्ही म्हणाल या दोन गोष्टींचा एकमेकींशी काय संबंध? कारण अनेक वर्षांच्या अनुभवातून माझ्या असं लक्षात आलंय की "देव हा आळशी लोकांनाच मदत करतो" जर आळशी लोकांवर एखादे काम येऊन पडले तर तो तत्काळ त्यांची त्यातून सुटका करतो. तत्पूर्वी असे संवाद आमच्या घरी घडतात. " अनघा, नुसता बागेत झाडे लावण्याचा उत्साह दाखवतेस, पाणी कोण घालणार जाऊन त्यांना? नुसता आरंभशूरपणा!" इति........माझा नवरा (त्याच्याशिवाय माझी इतकी स्तुती कोण करू शकतं?) मग मी एक दिवस वेळात वेळ काढून बिल्डींग मध्ये तळमजल्यावर असलेल्या आमच्या बागेत जाते, झाडांना भरपूर पाणी घालते, थोडी छाटणी करते, नवीन काय लावता येईल याचा विचार करते, आणि बागकाम केल्याचं समाधान बाळगत घरी येते, मोजून १०/१२ तासात असा धोधो पाऊस पडतो की पुढचे काही दिवस तरी जाऊन पाणी घालण्याची गरज पडत नाही मग. आता यावर्षी पाऊस कुठेतरी गडप झालाय, आता बघते या उपायाने तरी तो परत येतोय का ते!
वाशीत राहात असताना झाडे वगैरे लावावीत असं कधी वाटलं नाही अर्थात जागाही नव्हतीच, जेंव्हा चिंचवड मधल्या या घरी राहायला यायचं नक्की केलं तेंव्हाच ठरवलं की खूप मस्त बाग फुलवायची. बिल्डींगच्या तळमजल्यावरची बाजूची एक ४० बाय ८ ची एक पट्टी मला बागेसाठी मिळाली होती शिवाय घराची टेरेस होतीच. त्यावेळी संस्कृती लहान होती आणि मी पण नोकरी करत नव्हते. मग या गोष्टींसाठी भरपूर वेळ हाताशी होता. पहिल्या वर्षी अनेक शोभेची झाडे, तुळस, पुदिना, गवती चहा येऊन टेरेस मध्ये विराजमान झाली. पुदिना आणि गवती चहा तर इतके उदंड वाढले की त्याचं काय करायचं हा प्रश्न पडला. प्रश्नांना उत्तरे मिळतातच. गवती चहा कापून सावलीत सुकवून त्याची पावडर चहात मिसळून टाकू लागले. पुदिना पण सुकवून पहिला, पण लक्षात आलं यात काही मजा नाही, तो रंग, स्वाद काही मी टिकवून ठेवू शकत नाही. मग बिल्डींगमधील शेजाऱ्यांना सांगितले कोणाला कधी पुदिना हवा असेल तर माझ्या घरचा न्या. हळू हळू लक्षात आलं की या टेरेस मध्ये ऊन येतच नाहीये फारसं, वर्षाचे जवळपास ८ महिने. आणि उन्हाळ्यात इतकं ऊन की सकाळी १० वाजता पाय टाकवत नाही. २/४ दिवस बाहेरगावी गेलो तर झाडांची पार वाट लागणार आणि झालं ही तसंच. मग कुंड्या सुन्या सुन्या वाटू लागल्या, शेवटी त्या ही तिथून खाली हलवल्या. मग एकाच मोठी कुंडी उरली, जिच्यात ब्रह्मकमळ होते, फक्त पावसाळ्यात, फुले येणारे हे झाड, फुलाचं आयुष्य तरी किती एका रात्रीचं फक्त. कळी दिसू लागल्यापासून फूल उमलेपर्यंत वाट पाहणे. एका वर्षी २०/२२ फुले दोनवेळा आली आणि हे झाड सगळ्यांच्या कौतुकाचा विषय ठरले.
खालच्या बागेत सुरुवातीला तगर, जास्वंदीचे काही प्रकार मोगरा, गुलाब लावले. म्हटलं चला देवपूजेची सोय झाली. रोज बागेत जावून संध्याकाळी तिला पाणी देण्यात तिला मजा वाटू लागली. सर्वात मजा तेंव्हा आली जेंव्हा अबोलीच्या सुकलेल्या बियांवर पाणी पडलं आणि टपटप काही तरी उडू लागलं, संस्कृती घाबरली आणि सुरुवातीस काही वेळ हे काय याचा आम्हा दोघींना पत्ताच लागला नाही. बागेला फूल-चोरांपासून वाचवणे हे किती कठीण असते याचा प्रत्यय याच काळात येऊ लागला. कुठून पत्ता लागतो इतरांना तुमच्या बागेत अशी झाडे आहेत याचा? माझी बाग तर बिल्डींगच्या मागील बाजूस आहे, तरी.......... मी सकाळी सहा वाजता जाऊन फुले काढणार तर त्यापूर्वीच झाडावरून फुले पसार होवू लागली. मग थोडे दिवस मी वेळा बदलून पहिल्या, आदल्या दिवशी संध्याकाळीच जाऊन कळ्या काढून घेवून येवू लागले. एक एक नस्ती काळजी लावून घ्यायला नको असं मी स्वत:लाच सांगत राहिले. हळूहळू मलाच कंटाळा येवू लागला या पोलीसगिरीचा. शेवटी विचार केला, जावू दे कोणाला न्यायची ते घेऊन जावोत ती फुले, आपण दर आठवड्यात, फुलबाजारातून देवासाठी फुले आणून ठेवूया. उगीच चीडचीडच नको. या बागेत एक गुलाबी आणि एक पांढरी जास्वंद होती. दोन्हीला भरभरून फुले येत, आणि एक दिवस तर पांढऱ्या जास्वंदीला फुले आली ज्यांच्या २ पाकळ्या गुलाबी आणि बाकी पांढऱ्या, काय ही निसर्गाची किमया! एक केशरी रंगाची, तर एक डबल जास्वंद लालभडक. दापोलीहून एक कुंदाच रोप आणलं, खाली लावलं आणि दोराच्या आधाराने त्याला घराच्या बाल्कनी पर्यंत चढवलं. रात्री चांदण्याच उतरू आल्यात असं वाटावं, इतकं सुंदर दृश्य दिसत असे. पण मग डासांना त्यात नवीन घर मिळाले. तो वेळ छाटून टाकण्याशिवाय मग पर्याय उरला नाही. तेंव्हा पासून तो माझ्यावर जो रुसलाय, तो आजतागायत. खाली बागेत कुंद आहे, पण तेंव्हा पासून त्यास एकही फूल आले नाहीये. पण म्हणून त्याला काढून टाकण्याचा विचारही कधी मनात आलेला नाही. कारण जेंव्हा येत होती तेंव्हा त्याच्या फुलांनी इतका आनंद दिलाय..........
एकदा सोन-केळी लावली. तिच्या फुटव्यांच काय करायचं हा प्रश्न पडला. मग पलीकडच्या बंगल्यात राहणाऱ्या एक काकू म्हणाल्या मी घेऊन जाते, आणि आमच्या शेतात लावते. असं करत करत त्यांच्या शेतात १०० सोन केळीची झाडे लागली. आता त्यांच्याकडे केळ्यांचे घड उतरवून आणले की त्या मला फोन करतात " अनघा, शेतातून सोनकेळी आली आहेत, ४० रु. डझन, तुला हवी आहेत का? आपल्या लोकांसाठी स्वस्तात देते आहे." हसूच येतं मला अशावेळी. एकदा पालक लावला, छान आला, फक्त किती लावायचा याचा अंदाज नाही आला नि मोजून त्याची ५/६ रोपे आली.....एक मैत्रीण म्हणाली, एक पालकाची गड्डी आण, त्यात हा पालक घाल आणि सगळ्यांना खाऊ घाल.....घरच्या पालकाची भाजी म्हणून.....असं काही करणं जमलं नाही, एकदा पराठ्यात तो पालक मी वापरून टाकला. ५ वर्षांपूर्वी लावलेला एक फणस अजून मोठा व्हायलाच नकार देतोय. दापोली कृषी विद्यापीठातून आणलेला "all spice " इतका मोठा झालाय की घराच्या खिडकीतून आत डोकावतोय. तसाच शेजारच्या बंगल्यातला आंबा कायम माझ्या खोलीच्या खिडकीतून "मला आत घ्या" असा हट्ट धरून असतो.
माझं सोनचाफ्यावरील प्रेम माहित असल्याने, एकदा नवरा एक सोनचाफ्याचं रोप घेऊन आला आणि म्हणाला " हे टेरेस मध्ये लावूयात, म्हणजे तुझ्या नजरेसमोर हा कायम फुललेला राहील" मी नेहमीप्रमाणे त्याला चिडवलं " श्रीकृष्णानंतर, तूच रे, त्याने बायकोसाठी पारिजात लावला, तू सोनचाफा लाव, बहरला सोनचाफा दारी, फूले का पडती शेजारी असं म्हण्याची वेळ माझ्यावर न येवो म्हणजे झालं." पण या फुलासाठी खरोखरच मी खूप वेडी आहे इतकी की कोणी माझ्यासमोर ओंजळभर सोनचाफा धरला तर एका फुलाने भागत नाही, शक्य असल्यास ती सारी ओंजळभर फुले माझीच व्हावीत अशीच माझी इच्छा असते. आसपासच्या घरी कोणाकडे सोनचाफा आहे ते मला माहित असते, जाता येता त्या झाडावर फुले आहेत का हे पाहण्यास एकदा तरी नजर जातेच. मध्यंतरी एक छंदच जडला मनाला, ऑफिसला जाताना रस्त्यातल्या एका सोनचाफयावर नजर टाकायची, एकतरी फूल दृष्टीस पडायलाच हवे, तरच दिवस छान जाणार, नाहीतर नाही.
थोडे दिवसांनी बागकाम करायला एक माळी ठेवला. थोडी बागेच्या तब्येतीत सुधारणा झाली, रोपांभोवती छानशी आळी तयार झाली, बाग साजिरी दिसू लागली......पण थोडेच दिवस. माळीबाबा दांड्याच जास्त मारू लागले, थोडे दिवसात काहीकाही बागकामाची हत्यारे पण गायब होऊ लागली, एकदा बायको खूप आजारी आहे या कारणांसाठी माळीबाबा जे १००० रुपये घेऊन गायब झालेत ते आजतागायत. थोडक्यात माझे बागकाम ही "charity " च जास्त होऊ लागली. तशी ती मी अनेकदा अनेक प्रकारे करत असतेच......जिम लावून, एकही वर्तमानपत्र वाचायला वेळ नसताना रोज सगळी वर्तमानपत्रे पेपरवाल्याला टाकायला सांगून, स्वत:साठी साड्या विकत घेऊन, बागकाम करून. या वेगवेगळ्या लोकांचे मी मागच्या जन्मीचे काही देणे लागत असावे, म्हणून अधून मधून मला हे उद्योग सुचतात.
परवा एका कलीगशी घरातली बाग यावर बोलणं चालू होतं. दोघं आपापले बागकामाचे अनुभव शेअर करत होतो, आणि वाटलं......चला पुन्हा एकदा बाग फुलावूया. स्वप्ने पाहायचे काम मन अगदी तत्परतेने करते ना! शनिवारी जाऊन आणावीत थोडी रोपे, थोड्या कुंड्या, थोडे सेंद्रिय खत. गवती चहा, कोथिंबीर, पुदिना, मिरच्या, ओव्याची पाने, कढीपत्ता आणि बनेल एक मस्त हिरवेगार किचन गार्डन............