Monday, October 24, 2011

वाढदिवस

खरं तर प्रत्येकासाठी हा एक आनंद दिन असतो अशी माझी कल्पना आहे. मी अनेकदा अनेकांचे वाढदिवस विसरले आहे. अगदी काल रात्री पर्यंत लक्षात होता पण आज मात्र साफ विसरून गेले असं अनेकदा घडलं आहे. आणि अनेकांच्या रोषाची मी धनी झाले आहे. पण कोणी आपलाच वाढदिवस विसरतो, यावर मात्र माझा अजिबात विश्वास नाही.


मी देखील खूप आतूर असे या दिवसासाठी. पण आजकाल काहीतरी बिनसलय...मला तो दिवस जसा जवळ येऊ लागतो तसं एक अनामिक भीती वाटू लागते. काही लोकांच्या शुभेच्छा, फोनची मी एकीकडे वाट बघत असते, आणि दूसरीकडे अशावेळी काय बोलावे अशी भीती वाटत असते. त्यामुळे त्यानी तो विसरावा अशी मनोमन प्रार्थना करत असते. फोन आणि प्रत्यक्ष भेटणार्‍या व्यक्तींशी त्या दिवशी बोलताना मी खूप अवघडलेली असते. घरी दुसर्‍या कोणी स्पेशल जेवण मॅझयासाठी त्यादिवशी बनवायच्या भानगडीत पडलं तर माझा ठाम विरोध असतो, आणि मी स्वत:पण त्या दिवशी काही स्पेशल बनवायच्या विचारात नसते. बाकी घरातील सगळयांचे वाढदिवस मी प्लान करते, काहीतरी सरप्राइज़ असतं, काहीतरी त्यांच्या आवडीचे जेवण बनवते. इतर कोणाचा वाढदिवस असेल तर(लक्षात असेल तर) फोन करते गप्पा होतात. पण माझा वाढदिवस असेल तर मात्र यातलं काहीच मला नकोसं होतं. गप्प बसून असावे, फारसं काही बोलू नये, एखादं आवडीचं पुस्तक हाती असावं, आवडीचं संगीत हळूवार गुंजत असावं, साधसं काही जेवण असावं बस...अजून काही नको.

काही वर्षांपूर्वी मी माझी सोशल नेटवर्किंग प्रोफाइल डेलीट केले होते. त्यामुळे या दिवशी येणार्‍या फोन मधे निम्म्याने घट झाली, आणि मला हुश्श झाले. बाकी इतर वेळी मी इतकी गप्पिष्ट आहे पण या दिवसाच्या अवघडलेपणा मी काही कमी करू शकले नाहीये. तो एक दिवस कॅलेंडर वरून डिलीट व्हावा.


2 comments:

  1. का कोण जाणे पण माझ्याही बाबतीत असच होतं. फरक फक्त एवढाच कि मला कोणीच शुभेच्छा देऊ नयेत असं वाटत. म्हणूनच सोशल नेट्वर्किंग साईट्स वर मी माझी जन्मतारीख लपवून ठेवली आहे.

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!