Monday, June 18, 2012

मनातलं आकाश

आकाशाचं आणि आपलं नातं तसं जुनंच. अगदी लहान असतो तेंव्हा एक एक छंद असतात. वाड्याच्या मोठ्या अंगणात या टोकापासून त्या टोकापर्यंत पळत जायचे आणि चंद्र पण आपल्याबरोबर पळतो का ते पहायचे. अर्थात प्रत्येक वेळी तो तसा पळतो असेच वाटते . मग खूप राग येतो आणि मी ओरडायची त्याच्यावर, "तू पळू नको माझ्याबरोबर, एका जागी बसून राहा." पण ऐकायचा नाही तो माझे काही. जवळपास ५/६ वर्षाची होईपर्यंत हा खेळ चालू असे.

त्याच सुमारास माझी पणजी गेली. मला तिची खूप आठवण येत असे. देवाकडे गेलेली माणसे आपल्याला देवळात का दिसत नाही असा कायम मला प्रश्न पडे. मग कोणीतरी मला सांगितले की देवाकडे म्हणजे आकाशात जातात माणसे. मग मी माझी समजूत करून घेतली की चांदण्या म्हणजे ती माणसे असतात. मग या कल्पनेचा अजून विस्तार होऊ लागला जसे की ती माणसे आपल्याकडे पाहतात. काळे ढग म्हणजे राक्षस असतात, पांढरे ढग म्हणजे देवाचे सैन्य असते. या दोन ढगांमध्ये युद्ध होते. मग मी खूप वेळ अशी ढगांची हालचाल बघत बसे. सुट्टीत आजी कडे जात असू, तेंव्हा अंगणात पडल्या पडल्या रात्री आजोबा नाहीतर मामा आम्हा सर्व भावंडाना " तो बघ सप्तर्षी" " ते मृग" असे दाखवत असे.

नंतर कधीतरी कोणीतरी मला सांगितले, की आकाशातून पडणारा तारा पहिला की आपलं जवळचं माणूस आपल्याला दुरावतं. अगदी लहान नव्हते तेंव्हा, तरी विश्वास ठेवला होता त्यावर मी. (जसा पापणीचा एखादा केस गालावर पडला, तर मुठीवर ठेवून काहीतरी मागण्याचा प्रकार मी अजून ही कधी कधी करते). असंच एकदा कधीतरी माझं माझ्या आईशी भांडण झालं होतं. कोणाशी भांडण झालं की मग मी त्या व्यक्तीबरोबर बोलणं बंद करते पुढचे काही दिवसतरी, किमान माझा राग शांत होईपर्यंत. तर असा आमच्या दोघींमधील अबोला चालू होता. रात्री जेवणानंतर, मी, माझी बहिण आणि शेजारच्या काकू फिरायला गेलो होतो. चालता चालता लक्ष आकाशाकडे गेलं, आणि एक तारा निखळताना दिसला. मी मनातून हादरले. त्या दोघीना म्हटलं चला बास फिरणं, आपण परत जावूया. आपण आईशी बोलत नाही आहोत, आणि तारा पडताना पहिला या दोन्ही गोष्टी एकत्र करून मी इतकी अस्वस्थ झाले, घरी पोहचले, तोपर्यंत रडूच फुटले. आई झोपली होती. तिला उठवून, म्हटलं "आई सॉरी, मी तुझ्याशी पुन्हा कधी भांडणार नाही". तिला काही कळले नाही मनात काय आधी घालमेल झाली होती ती. मग कॉलेजचे दिवस आले आणि हिंदी सिनेमांचेपण! मग त्यांनी ज्ञानात भर घातली " किसी टूटते हुए तारे को देखो, और कोई मन्नत मांगो, तो वो पुरी हो जाती है" शाहरुख खानच्या तोंडचा डायलॉग. हाहाहा...... आता नक्की काय खरं होतं यातलं? त्याचवेळी कधीतरी आकाशात काळे ढग जमा झालेले आवडायला लागतात, आणि मन "काली घटा छाए मोरा, जिया घबराए" असं म्हणत येणाऱ्या कोणाची वाट पाहू लागते.
दिवस सरतात, आपण बदलतो, कधीकधी मग ढग मनात दाटू लागतात, आणि डोळ्यांमधून बरसात सुरु होते. आकाश तेवढंच जवळचं वाटत राहते पण मग एक आकाश मनालाच व्यापून उरते. खऱ्या आकाशाकडे लक्ष जाणे कमी होतं. मनातल्या आकाशातच कधी पौर्णिमा असते, कधी आवसेची रात्र उतरते. कधी निरभ्र स्वच्छ आभाळ तर कधी गच्च दाटून आलेले ढग. अशातच कधी पौर्णिमेचा चंद्र खिडकीमागच्या आंब्याच्या झाडातून खोलीत उतरू पाहतो. हलकेच मला जागं करून जातो, गवसलेले काही पुन्हा मिळवल्याचा आनंद देवून जाण्यासाठी.


"तुका आकाशाएवढा" तर पाहिलेला नसतो, पण आकाशा एवढी मोठी माणसे आसपास आहेत हे जाणवू लागते. अनेक गोष्टींमधील अथांगता जाणवू लागते. जाणीवा बदलतात, त्या व्यापक होतात. परवा माझ्या ऑफिसमधील एका सिनियर व्यक्तीशी बोलत होते. ते म्हणाले " आपल्यासारख्या जाणीवा असलेली व्यक्ती भेटली, की बरे वाटते, आणि आयुष्यात काहीतरी उणीव असल्याशिवाय जाणीवा तितक्या खोल असत नाहीत." सोप्या सरळ शब्दात किती अर्थ व्यापलाय ना?






5 comments:

  1. मला पण आकाश बघायला खूप आवडते. खूप छान लिहिल्या आहेत तुमच्या आकाशाबद्दलच्या आठवणी आणि मनातले आकाशही. मस्तच. हा लेख वाचून मनाला हुरूप आला!

    ReplyDelete
  2. धन्यवाद रोहिणी!

    ReplyDelete
  3. जस जसा तुझ्या ब्लोग वरच्या विविध रंगी विविध ढंगी पोस्ट्स वाचत जातो आहे तसतसे तुझ्या लेखनाचे एक वैशिष्ट्य (अनेक वैशिष्ट्यापैकी ) प्रकर्षाने जाणवले आहे आणि जे ह्या सारख्या सर्व पोस्ट्सशी related आहे (प्रत्येक ठिकाणी हा अभिप्राय लिहिणार नाहीये) ते म्हणजे तू तुझ्या भूतकाळातल्या हृद्य आठवणीचा ठेवा अलवारपणे उघडते पण त्या आठवणी पुनः जगताना 'गेले ते दिन गेले' हा भाव नसतो उलट change is the only constant / truth of the life हे सत्य आणि त्यातली सुंदरता स्वीकारून जुन्या आठवणीना / अनुभवांना वर्तमानातल्या घटनांशी / अनुभवांशी इतक्या सहजपणे आणि सकारात्मकपणे जोडतेस कि त्याला तोड नाही. तुझ्या अश्या लिखाणामुळे आमच्याही भूतकाळातल्या आठवणी जाग्या होतात पण मनाला उदास न करता पुनः प्रत्ययाचा आनंद देऊन जातात आणि त्यांना वर्तमानातल्या इतर सुंदर घटनांशी relate करण्याचा मार्ग दाखवितात !!! असेच लिहित रहा - असाच आनंद देत रहा ----

    ReplyDelete
    Replies
    1. आठवणी म्हणजे भूतकाळाचा वर्तमान असतो आणि तरीही आज बरोबर त्याचे घट्ट नाते असते, तसे ते दिवस कुठे गेलेले नसतातच आणि म्हणूनच "गेले ते दिन" अशी दीनवाणी माझ्याकडून उमटत नाही कदाचित. मनाच्या कोपरयात अलगद जपलेले असे ते क्षण. म्हणूनच अधूनमधून असा आठवणींच्या जगाचा फेरफटका मारून यायला आवडतही मला. तेंव्हा माझी अशी ही मुशाफिरी माझ्याइतकाच आनंद इतरांनाही देत असेल तर त्या इतके आनंददायी दुसरे काही माझ्यासाठी ही नाही. Thank you so much Ravida!

      Delete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!