Saturday, December 7, 2013

श… श शेअर बाजाराचा!

अर्थकारण कळत नसण्याच्या वयापासून ते पुढील अनेक वर्षे "शेअर बाजार" हा नोकरी व्यवसाय यापेक्षाही भरपूर प्रमाणात पैसे कमावण्याचा मार्ग आहे हि एक माझी ठाम समजूत होती. आणि त्यातून जर तुम्ही कधी स्वत:बद्दल एखाद्या कुडमुड्या कडून तुमच्या पालकांना किंवा तुम्हालाच  जर हे सांगताना ऐकलं असेल की "नशिबाचा खूप पैसा आहे, अचानक धनलाभ आहे नशिबात"  तर मग काय विचारायलाच नको!

अशी मीच एकमेव नाही तर अनेकजण असतील…. खात्रीने सांगते की या मंडळीनी आयुष्यात किमान एकदा शेअर बाजारातून पैसे थोड थोडके नाही तर बक्कळ पैसा कमवायचा विचार केला असेल. इतकेच नव्हे तर आपले हात ही येथे पोळून घेतले असतीलच. 

आयुष्याच्या एका टप्प्यावर जेंव्हा घरासाठी वेळ द्यावा असे वाटत होते, त्यामुळे पूर्ण वेळेची नोकरी करूच नये अशी इच्छा होती, पण अर्थार्जन ही सर्वार्थाने सोडून द्यायचे नव्हते, तेंव्हा दुसरा कोणता पर्याय निवडावा असा जेंव्हा प्रश्न समोर होता तेंव्हा खरे तर अनेक पर्याय डोक्यात रुंजी घालत होते, ज्यांना उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहायला आवडतात त्यांचे काय विचारता? एक भले मोठे, अद्ययावत आणि मागाल ते पुस्तक चुटकीसरशी मिळेल अशी लायब्ररी सुरु करायची होती. कदाचित बालपणीचा मोठा काळ पुणे मराठी ग्रंथालयाच्या सानिध्यात गेल्याचा परिणाम असेल म्हणा, जेंव्हा पुण्यात डेक्कन वर मक्डोनाल्ड्स  आणि पिझ्झा हट  यांचे आगमन होत होते, तेंव्हा मी पिंपरी चिंचवड मधे असा फूड जोइण्ट सुरु करायची स्वप्ने बघत होते, ही गोष्ट आहे साधारण १९९८/९९ ची आणि चिंचवड मध्ये मक्डोनाल्ड्स पहिले अवतरले ते २००५/६ मध्ये. किंवा इच्छा होती असा एखादा फूड जोइण्ट सुरु करण्याची जिथे काही खास इंडियन डेलिकसीज बनवल्या जातील, जिथे बनणारे पदार्थ हे पोषण मूल्यांच्या तक्त्यात खूप वर असतील आणि टेस्ट मध्येही सर्वोत्तम ठरतील…………एक न दोन!

या गोष्टी मुळातच खूप मोठी गुंतवणूक असणारी होत्या पण त्याचकाळात मनात कुठेतरी शेअर बाजारातून आपण पैसा कमवू शकू असे वाटू लागले होते. तत्पूर्वी काही जणांना एखादा शेअर सुचवून पहिला होता आणि त्याला त्यात थोड्या कालावधीत फायदा होतानाही दिसला होता. डिजिटल व्यवहारांना नुकतीच सुरुवात झाली होती, CNBC सारख्या chaanel वर अखंड बडबड करणारी काही हुशार माणसे  अवतीर्ण झाली होती, त्यांच्या जोडीला अनेक ब्रोकरेज फर्म्स  मधील काही मंडळी  दिवसभर या चर्चा करत असत. अनेक ब्लू चीप कंपन्याचे शेअर कवडी मोलाने विकले जात होते तर  Infosys, सत्यम, विप्रो यांचे भाव रोज नवे उच्चांक दाखवत होते, आज बाजारात नामोनिशाण नसलेल्या अनेक डॉट- कॉम कंपन्या भूतो न भविष्यती असे रोजचे भाव दाखवत होत्या आणि अनेक ब्रोकर्स ह्या कंपन्या बाजाराला उद्या परवा अजून कुठल्या कुठे नेवून ठेवतील याची भली स्वप्ने दाखवत होते. बाजाराने पहिल्यांदा ६००० ची पातळी  एकच दिवस गाठली होती. इतक्या साऱ्या पूरक गोष्टी असताना या शेअर बाजाराने भुरळ पाडली नसती तरच नवल!

काळाच्या थोडी  पुढची स्वप्ने हे तेंव्हाही होतेच त्यामुळे पुणे शेअर बाजाराचा अध्यक्ष असणाऱ्या माझ्या एका ओळखीच्या गृहस्थाना विचारलं की ऑन लाईन ट्रेडिंग करता येईल का? त्याने उत्तर दिले की सर्व सामान्य लोकांना हे करता यायला बरीच वर्षे लागतील. मग एक मित्र जो एक ब्रोकरचे टर्मिनल घेवून हेच काम करायचा त्याच्याशी सौदा ठरवला, मी त्याला फोन वर ओर्डर द्यायची, त्याने माझ्यासाठी ते शेअर घ्यायचे /विकायचे. छोट्या छोट्या ऑर्डर्स मी ठेवू लागले थोडासा फायदा दिसू लागला मग मोठ्या मोठ्या सुरु झाल्या, डे  ट्रेडिंग नसल्याने आठवडा मिळत असे …. मग एक दिवस असा आला  अर्थ संकल्पाच्या दिवशी मार्केट वर जाणार या अपेक्षेने काही मोठ्या पोझिशन्स घेवून ठेवल्या. साधारण ११/१२ च्या सुमारास तो सुरु झाला आणि मार्केट ने जी उतरण दाखवायला सुरु केली, एकाच दिवसात एक भला मोठा फटका माझ्या वाट्याला आला की पुनः मी या गोष्टी कडे आपला व्यवसाय म्हणून पाहू नाही शकले. ६००० चा टप्पा २००० साली गाठलेल्या बाजाराने जवळपास २००३ मध्ये २९००ची पातळी दाखवली. 

याच सुमारास माझी ओळख डोंबिवलीमधील एका ज्योतिषांशी झाली. माझा या गोष्टी वर विश्वास आहे, आणि ते शेअर बाजार आणि ज्योतिष शास्त्र यातील चांगले जाणकार म्हणून ओळखले जातात. त्यांना जेंव्हा मी असे का झाले असावे असे विचारले तेंव्हा ते म्हणाले " असे एक एक धडे आयुष्य शिकवत असते, आपण त्यातून बोध घ्यायचा असतो, तुमच्या नशिबी असा बिन कष्टाचा ,फुकटचा पैसा नाही, पैसा तुम्ही कमवाल पण  तो फक्त स्वतच्या कष्टाचाच असेल, एक दिवस असा येईल की तुम्ही अशा मार्गाने पैसे कामावता येतात या गोष्टीला  हसाल. पुढे त्यांच्याशी संपर्क राहिला नाही, पण या त्यांच्या वाक्याने आयुष्याला दिशा दिली. थोडे दिवस विचार करण्यात गेले, हळू हळू नवीन मार्गावर वाटचाल सुरु झाली. 

आज अनेक टेक्निकल बाबी मला काळात नाहीत  किंवा त्या शिकून घेण्याइतका माझ्या कडे वेळ नाही. पुट/ कॉल ऑप्शन, मुव्हिंग अव्हेरज  आणि  काय काय ते. पण याचा अर्थ मी इथे नसतेच का तर तसं मुळीच नाही, पण आता पद्धत थोडी बदलून गेली. थोड्याच प्रमाणात पण फक्त delivery based करण्यासाठीच मी शेअर बाजाराकडे पहाते. काही माझे लाडके शेअर्स आहेत तेवढ्यानवरच नजर ठेवून मी असते, त्यांनी मला आजतागायत कधी निराश नाही केले. 

पण या शेअर बाजाराबद्दलचे प्रेम आजही कमी झालेले नाही काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलून गेल्या, अनेक नवीन सोफ्टवेअर्स आली, मोबाईल वरून ट्रेडिंग चुटकीसारखे होवू लागले, ब्रोकर नावाच्या माणसाची गरज भासेनाशी झाली, शेअर्स नव्हे तर कमोडीटी, forex यात ट्रेडिंग करता येवू लागले, पण मुंबई शेअर बाजारचे महत्व काही उतरले नाही, फरक पडला "निफ्टी" च्या आगमनाने पण तरीही…  क्षणात जादूची कानडी फिरवल्यागत कोणाची चांदी होईल, तर क्षणात रावाचे रंक ही इथेच होताना दिसतील. माठ मोठ्या Management/business schools मधून पदव्या घेवून बाहेर पडून कोणत्या तरी टी व्ही chanels च्या बड्या बड्यांचे  अंदाज चुकवत राहील. पिढ्यान पिढ्या येत जात राहतील पण बाजार आपल्याच मस्तीत आपली दिशा बदलत राहील.

Friday, July 5, 2013

अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे !

काही गाणी आपण अनेकदा ऐकत असतो, पहात असतो किंवा कधीतरी आधी ते कवितेच्या रूपात वाचलेले असते. प्रत्येक वेळी ते मनाला जाऊन भिडतेच असे नाही. प्रत्येक गोष्ट मनात जाऊन घट्ट रुजण्याचे सुद्धा काही खास क्षण असतात. शब्द प्रधान गाणी ऐकतच मोठी झालेली मी. पण त्या त्या वयात, ती गाणी भावप्रधान होत गेली, आपलीशी झाली. "त्या तिथे पलीकडे तिकडे, माझिया प्रियेचे झोपडे", "हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता" किंवा "ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा" म्हणत हरवून जाण्याच्या वयातच ती गाणी खऱ्या अर्थाने माझ्यापर्यंत पोहचली होती.


पूर्वी एकदा आजारी असताना अचनाक "एक वार पंखावरूनी" हेच गाणे अचानक ओठी आले, मनात त्या क्षणी आलेले विचार आईला सांगू नाही शकले, तिला "आई, मला झोपायचं आहे, थोपटतेस का थोडा वेळ? असे म्हणून त्या गाण्याची, त्या भावाची घेतलेली अनुभूती शब्दात नाही सांगता येणार.


एक कविता होती पाचवीच्या बालभारतीच्या पुस्तकात,

घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात

मग तेंव्हा ती अनेकदा वाचली असेल, पाठ केली असेल, त्याच्या वरची प्रश्नोत्तरे लिहिली असतील, त्यात पैकी च्या पैकी मार्क्स मिळवले असतील, पण खरच ती कविता तेंव्हा कळली होती का? खरं तर नाहीच …… ते वय नव्हतंही खरं यातल्या गाभ्यापर्यंत पोहचण्याचे. मग कधी पोहचली ती माझ्यापर्यंत? खरं तर लग्न होऊन बरेच दिवस झाले होते, बऱ्यापैकी मी माझ्या खरी रुळले होते. तशी हळवी मी फार एका घरातून दुसऱ्या घरात रुजताना झालेही नव्हते. पण एक दिवस घरी मी एकटीच, एकीकडे गाणी ऐकत, स्वैपाक करत, संध्याकाळची कातर वेळ. ही वेळ पण ना… …. अशी असते की कोणत्याही लहानसहान गोष्टींनी डोळे नकळत भरून यावेत. आणि हे गाणे सुरु झाले. अन असे मनाला जाऊन भिडले. आपली मायेची माणसे, घर दार, सोडून आलेल्या तिला, तिथल्या प्रत्येक गोष्टीत तिचा जीव गुंतलाय, घरातील माणसांचीच नव्हे तर दारचा प्राजक्त, गोठ्यातील कपिला तिची नंदा… साऱ्या साऱ्यांची आठवण मन व्याकूळ करतीये. म्हणजे इथे या सासर घरी ती काही दु:खात नाहीये पण अजून हे सारे तितकेसे आपलेसे झालेले नाहीये. मायेचा, हक्काचा वावर असण्याचे अजून तरी ते घर हेच एक ठिकाण आहे. त्यामुळे वाऱ्याला जा म्हणताना ती स्वत:च अनेकदा तिथे जाऊन पोहचते आहे. परकरी पोर होऊन प्राजक्त वेचते, गुरावासरात रमते आहे, इथे बसून पुन्हा पुन्हा आईची माया आठवते आहे. त्यामुळे ह्या साऱ्या आठवणी आणि फिरून फिरून भरून येणारे डोळे हे चालूच आहे.

आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला !


लहानपणी सहकुटुंब एखादा चित्रपट ( बहुदा मराठीच ) पाहण्याचा एखादा कार्यक्रम असे, तसाच जाऊन पाहिलेला एक होता तो म्हणजे "अष्टविनायक" . ज्या कोणाला पंडित वसंतराव देशपांडे यांना त्यातील गाण्यांसाठीच नव्हे तर यातील वडील म्हणून चित्रपटात घेण्याचे सुचले असेल…. त्यांच्या स्वरस्पर्षाने गाण्यांचे सोने झले. त्यातील गणपतीची गाणी तर दर वर्षी ऐकतच होते. "दाटून कंठ येतो……. " हे मात्र खऱ्या अर्थाने उमजायला आईपण अनुभवावं लागलं. आईपणाची चाहूल लागली असताना ऐकलेल्या या गाण्याने आयुष्यात कधी नव्हे ते इतके हळवे बनवले की इतके लग्न करून सासरी जातानाही नव्हते. हे गाणे ऐकता ऐकताच एकीकडे आपल्या बाबांची आठवण तर दुसरीकडे आपल्या घरी ही एक  परी यावी हा विचार पक्का झाला. मी तिला फक्त जन्म देऊन, मी आई होणार असले तरी आई म्हणून मला ती घडवणार आहे. तिच्या बोटाला धरून अक्षरे गिरवताना ती शिकेलच पण शिकवण्याची कला मीही शिकेन, नाही तर त्यात रमेनही.


हातात बाळपोथी ओठांत बाळ भाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा
वळवून अक्षरांना केले तुला शहाणे
जातो सुखावुनी मी त्या गोड आठवाने 

बोलात बोबडीच्या संगीत जगवायचे, लय, ताल सूर यांची जाणीव करून द्यायची, लय ताल सूर हे फक्त गाण्याचेच नाहीत तर आयुष्यातही जमवून आणावे लागतात, याची ती जाणीव. आणि हे सारे करून कृथार्थ मनाने तिला परक्याच्या हाती सोपवायची.


बोलांत बोबडीच्या संगीत जागवीले
लयतालसूरलेणे सहजीच लेववीले
एकेक सूर यावा नाहून अमृताने
अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे 


घेऊ कसा निरोप .... तुटतात आत धागे
हा देह दूर जाता मन राहणार मागे 
धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे
परक्यापरी अता मी येथे फिरून येणे

हे गाणे ऐकतानाच आपला स्वत:चाच पुढचा काळ असा डोळ्यासमोरून तरळून गेला, एका गाण्याने आईपणाच्या संकल्पना इतक्या स्पष्ट नजरेसमोर साकारल्या की आजही मी त्यान्चाच आधार घेत आईपण पेलतीये. एका गाण्यातून लेकीला घडवून, मोठी, शहाणी करून, तिला चांगल्या घरी, सुयोग्य साथीदाराच्या हाती देताना, निरोपाचे हे कोमल क्षण वेचणाऱ्या शांताबाई, हे क्षण आपल्या गळ्यातून, आपल्या अभिनयातून इतक्या प्रभावीपणे पोहचविणारे वसंतराव यांना सलाम!
आता आयुष्याचा पूर्वार्ध संपत आलाय, एकीकडे उत्तरार्ध त्याच उत्साहाने, आनंदाने कसा जाईल याचे विचार मनात डोकावत असतानाच, मधूनच भैरवी का बरे आठवते? नुसतीच आठवत नाही तर व्याकूळ करते .

जन्म-मरण नको आता, नको येरझार
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार

का या ओळी किंवा "संधीप्रकाशात अजून जो सोने" या बा. भ. बोरकरांच्या ओळींतले निरोपाचे क्षण उदास करतात?

Wednesday, June 5, 2013

एक दिवस खाता खाता, बनवणाऱ्याचे हात घ्यावेत ….….

कोणी प्रेमाने एखादा पदार्थ तुमच्यासाठी बनवला तर त्यात आनंद काही औरच असतो ना? यापूर्वी आई, आजी, मामी, आत्या, साबा  यांनी त्यांच्या हातचे मला आवडणारे पदार्थ खूपदा बनवले आहेत. यांच्या प्रत्येकीच्या अशा काही हातखंडा रेसिपीज आहेत. आई च्या हातचे दडपे पोहे, मसालेभात, ओल्या साल पापड्या, रवा नारळाचे खवा घातलेले लाडू, आत्याच्या हातची पुरणपोळी, सुरळीवडी, उपमा, मक्याची नारळाच्या दुधातील करी, साबांच्या हातची भरली वांगी, काजूची उसळ, गुळाची पोळी, तिळाचे लाडू, लसूण कुरकुरीत तळून घातलेला पातळ पोह्याचा चिवडा, मामी च्या हातच्या पाकातल्या पुऱ्या आणि साखरभात अशी यादी बरीच मोठी आहे आणि या साऱ्याजणी वेळोवेळी आमचे हे हट्ट पुरवत असतात देखील.
नवऱ्याच्या हातचा वीकेंडला सकाळचा चहा. जेंव्हा तो "तू झोप थोडा वेळ, मी चहा तयार झाला की तुला हाक मारतो" असे म्हणतो तेंव्हा  अजून जास्तीची अर्धा तास झोप मिळाल्यावर  आणि वर आयता चहाचा कप हाती आल्यावर अजूनच छान लागतो. या चहाशिवाय तो नियमित पणे फक्त रात्रीचा वरणभाताचा कुकर लावतो. तसा त्याचा स्वयंपाक घरातील वावर बराच असतो. सर्वात मोठे काम म्हणजे "सूचना". मीच काय पण त्याची आई, बहिण, सासू, मेव्हणी, माझ्या चुलत जावा, नणंदासुद्धा यातून सुटत नाहीत. इतर काही पदार्थ तो आवडीने बनवतो पण मी नॉन-व्हेज खात नसल्याने ते माझ्या काही कामाचे नसतात. पण तरी देखील, जेंव्हा घरात डोसे, पावभाजी, थालीपीठे असा कोणता तरी बेत असतो तेंव्हा बाकीच्यांचे जेवण आटोपून जेंव्हा मी एकदाच स्वत:चे पान वाढून घ्यायचा विचार करत असते, तेंव्हा मला गरम गरम खायला आवडते हे लक्षात ठेवून तो जेंव्हा "पहिला डोसा घेवून तो सुरुवात कर जेवायला, नंतरचा मी करून वाढतो" असे जेंव्हा म्हणतो तेंव्हा दोन घास नक्कीच जास्त जातात. 

सध्या तिसऱ्या व्यक्तीची लुडबुड या प्रांतात वाढत चालली आहे. माझ्या लेकीची संस्कृतीची! सुरुवातीला चहा, कॉफी, maggi, पास्ता किंवा आमच्या दोघांपैकी कोणीच घरी नसू आणि जेवायला येणार असू तर मग कुकर. मग मागच्या सुट्टीत फुलके करता येऊ लागले, त्याखेरीज कांदे पोहे, दही पोहे कधी मधी घरी संध्याकाळी बनू लागले. पण ह्याचा प्रसार फक्त बाबापुर्ताच होता. बाबाच सर्वात मोठा परीक्षक आणि कौतुकाने खाणारा असल्याने अनेकदा यातल्या अनेक गोष्टी माझ्यापर्यंत पोहचतच नसत. तशीही मी रात्रीच्या जेवणाच्या वेळेपर्यंत कशीबशी घरी पोहचते. 

मागच्या वर्षी पहिल्यांदा माझ्या वाढदिवसाला खास माझ्यासाठी एक सुंदर पदार्थ बनला. जे माझ्यासाठी सरप्राईज होते. मारी ची बिस्किटे, साखर, पाणी आणि कॉफी च्या मिश्रणात एक सेकंद बुडवून नंतर कोकोच्या पेस्ट चे आवरण त्यावर देऊन पुन्हा होती तशी रोल बनवून ठेवली, अल्युमिनीयम च्या फोईल  मध्ये गुंडाळून ३/४ तास फ्रीज मध्ये ठेवून बनवलेला एक सुंदर पदार्थ होता तो. 

गेल्या शुक्रवारी असाच अजून एक पदार्थ बनला होता. आधी मला विचारून झालं "घरात कॉर्नफ्लोर" आहे न? म्हणून. संध्याकाळी आले तर चीझ बॉल्स तयार होते. चीझ किसून त्यात आलं, लसूण, मिरचीची पेस्ट मिसळली होती, ते हलक्या हाताने वळून कॉर्नफ्लोर च्या पेस्ट मध्ये बुडवून घेतले आणि नंतर  ब्रेडक्रम्स वर घोळवून तळले होते.  इतके मस्त लागत होते ते! पण पहिला खाऊनच लक्षात आले एकंदरीतच हा पदार्थ खूप हेवी आहे. मग मला कळले कि ४ अमूल च्या चीझ क्युब्स चे फक्त ८ बॉल्स बनले आणि तरी माझ्या साठी चक्क ३ कसे  उरले होते ते. पण खायची आणि करून खिलवायची आवड निर्माण होते आहे हीच माझ्या साठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

(हे पदार्थ तिने बनवल्याचा आनंदात मी नेहमीप्रमाणे कॅमेरा हाती घ्यायला विसरलेच)

Wednesday, May 29, 2013

स्वच्छतेचे धडे … कोण शिकणार कोण शिकवणार?


फ्रेशरूम मधील डस्टबीन जे नेहमी  पायाने उघडले जाते, त्याच्यात बिघाड आहे, आता ते पायाने उघडत नाही, तर तुम्ही त्यात वापरलेले  टिश्यू पेपर कसे टाकाल?  उत्तरे - 
-हाताने डस्ट बीन चे झाकण हाताने उघडून 
-डस्टबीन च्या बाहेर कुठेही 
-आता डस्टबीन उघडतच नाही पायाने, तर टाकून देऊ  वाशबेसिन मध्ये 
-फ्रेश रूम स्वछ ठेवणे ही आपली जबाबदारी नाही, त्यामुळे काहीही करा 

हा न एका अभ्यासक्रमातला प्रश्न असायला हवा, आणि हा एकच प्रश्न नाही तर यासारखे असे अनेक …. आणि बालभारती किंवा सामान्य विज्ञान हे विषय शिकावायच्याही आधी हा विषय सर्व लहान मुला मुलींकडून घोटून घ्यावयास हवा. वर वर्णन केलेले उदाहरण गेले काही दिवस मी रोज पाहते आहे. शेवटी परवा एका मुलीला जी असेच टिश्यू पेपर जमिनीवर टाकून चालली होती तिला मी टोकले, पण मला माहित आहे असे वागणारी ती एकटी नाही. आसपास नुसते साक्षर भरलेत, सुशिक्षित कमीच. 

पाण्याचा वाहता नळ व्यवस्थित बंद करण्याचे कष्ट न घेणे, वाटेल तसे आणि वाटेल तितके टिश्यू पेपर वापरणे, अनेकींच्या पर्स मध्ये रुमाल वगैरे काहीच नसावे? बेसिन जवळ उभे राहून, केस सारखे करतांना, गळलेले केस तसेच सोडून जावे …. अशा एक न दोन अनेक गोष्टी. एका वाक्यात सांगायचे झाले तर "Toilet Etiquettes" शिकवलेलेच नाहीत यांना कोणी. बर पूर्वी कोणी शिकवले नाहीत तर आता समाजात वावरताना काही बघून, समजून घेवून काही चार चांगल्या गोष्टी शिकाल की नाही? अनेकदा मला या लोकांना एक प्रश्न विचारावा वाटतो "तुम्ही तुमच्या घरी असेच वागता का?" या प्रश्नांचे उत्तर जर हो असे असेल तर मग मात्र कठीण आहे. मग मात्र वयाच्या ३/४ वर्षीच एका अशा सक्तीच्या अभ्यासक्रमाची गरज आहे, जो पूर्ण केल्याखेरीज कोणत्याही शाळेत प्रवेश मिळणार नाही. 

मध्ये एक दिवस रात्री उशिरापर्यंत ऑफिस मधे होते, फ्रेश रूम मध्ये शिरले आणि तशीच उलट्या पावली परत फिरले कारण कोणाच्या तरी उलटी ने भरलेले वाशबेसीन तसेच होते. एवढेच नव्हे तर त्याचा दर्प तेथे भरून राहिला होता, अजून २ सेकंदभर तेथे असते तर मलाच मळ्मळायला लागले असते. हे लिहिताना सुद्धा मला इतकी किळस वाटते आहे, तर जिला कोणाला हे साफ करावे लागले तिचे काय? ते बेसिन तसेच सोडून जाताना त्या मुलीला/स्त्रीला काहीच कसे वाटले नाही? पण हे कोणी लक्षातच घेत नाही. 

अशा ठिकाणी स्वच्छतेसाठी अनेक स्त्रिया काम करत असतात, पण त्याही माणूसच आहेत ना? का नाही आपण माणसांना माणसांप्रमाणे योग्य त्या मानाने वागवू शकत? का असे सर्वत्र पडलेले टिश्यू, केस त्या स्त्रियांनी गोळा करून डस्टबीन मध्ये टाकायचे? का अशा रितीने खराब केलेले बेसिन कोणी दुसरीने स्वछ करायचे? मला बाकी इंडस्ट्री जसे की मन्युफ़्रक्चरिङ्ग किंवा बँकिंग या बद्दल फार माहित नाही, पण माझ्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्या जणी किमान कॉम्प्युटर ग्राज्युएट किंवा  इंजिनीअर असतात ना? मग तरीही असे ? पुस्तकी शिक्षण आपल्याला योग्य तऱ्हेने जर जगायला शिकवणार नसेल तर मग काय उपयोग? अनेकदा आपण समाजाच्या निम्न स्तरातील अस्वच्छता या बद्दल तावातावाने बोलतो, अशा लोकांमुळे आपले शहर किती बकाल होत चालले आहे यावर बऱ्याचदा आपले एकमत असते, पण आपल्यातल्याच या लोकांचे काय करायचे?

एक स्त्री म्हणून मी या गोष्टी वारंवार पहाते, म्हणून त्याच सांगू शकते, पण याचा अर्थ बाकी सर्वत्र सर्व ठीक आहे असे नाही … कारण तसे असते तर अनेक वर्षांपूर्वी Infosys च्या एका induction मध्ये तेंव्हाचा FLM राहुल देव ला, नवीन joinees ना "don't spit out chewing gums in urinals, as it gets sticked there and a person cleaning it, needs to remove it with his hands, please try to respect those people who keep this World class campus beautiful"  असे सांगावे लागले होते यातच सर्व काही आले नाही?

Monday, May 20, 2013

छोटी छोटीसी बात …

खरंतर यापूर्वीच कधीतरी भाज्या आणि त्या आणायला मी किती आवडीने जाते हे लिहून झालंय …… पण तरीही काहीतरी उरतेच. अनेकांना मंडईत जाणे म्हणजे आपल्याच डोक्याची मंडई झाल्यासारखे वाटते.
माझी एक मैत्रीण तिथे शिरताच जी शिंकायला सुरुवात करते ती थेट बाहेर पडेपर्यंत…. त्यामुळे कधी एकदा भाजी घेते आणि इथून बाहेर पडते असे तिला होवून जाते. माझ्या नवरयाला भाजी मंडई म्हणजे तिथे पडलेली घाण, कचरा एवढेच नजरेसमोर येत असावे, त्यामुळे तो शक्य तेवढी टाळाटाळ करत असतो. परवा माझ्या एका नवीन लग्न झालेल्या मित्राला, बायकोने भाजी आणायला पाठवले, हा बाबा घेऊन आला "पालक, शेपू, मेथी, राजगिरा, अळू ,मुळा ……. अशा सगळ्या पालेभाज्या, त्या पण २/२ गड्ड्या प्रत्येकी" बिचारी पुन्हा कधी त्याला भाजी घेऊन ये म्हणणार नाही कदाचित!

पण माझे असे नाही, माझ्यासाठी तो एक आनंदाचा भाग आहे. भाजी आणायला जायचे म्हणजे, माझ्या डोळ्यासमोर येतात त्या ताज्या हिरव्यागार भाज्या फक्त, तळात कोबीची पाने किंवा केळीची पाने टोपलीत छानशा रचून ठेवलेल्या भाज्या, हिरव्या रांगोळीत रंग भरावेत तशी मधेच कोठे लिंबाचा, मधेच लाल भोपळा तर कुठे टोमाटो, तर कुठे लाल सिमला मिरची. भरताची कधी पंढरी वांगी तर कधी जांभळी वांगी, मुळा हि रंगांची उधळण अजूनच वाढवतात. हिरव्यात तरी किती छटा असाव्यात …… मटारचा हिरवा वेगळा, वाल पापडीचा अजून वेगळा, तर भेंडी काळ्या रंगाला जवळ करणारा, गवार, पडवळ यांचा वेगळाच! तेथे जाणवणारा प्रत्येक भाजीचा आपला एक दरवळ. लिम्बांपाशी वेगळा ताजा असा, आले, लसूण, मिरच्या यांजवळ एक तिखटसा, पालेभाज्यांजवळ एक वेगळाच असा मातीच्या जवळचा……

अनेक वर्षे अशा रितीने तिथे जाऊन अनेक भाजीवाल्या माझ्या चांगल्याच ओळखीच्या झालेल्या आहेत. "ताई, आज ही भाजी घेवून जाच किंवा आज ही नेऊ नका" असं त्यांनी सांगण्या इतक्या. अशीच एकजण होती. अगदी बोलघेवडी अशी. मंडईत शिरल्या शिरल्या पहिल्या २/३ गाळ्यातच ती भाजी घेऊन बसत असे. आपण समोर गेलो की आधी एक मोठ्ठं हसू. आणि मग आमच्यात संवादरुपी लटकी चकमक घडे.

मी: कोबी कसा दिला ताई?
ती: ४० रुपये किलो.
मी: आणि वांगी? गवार
ती: तीस रुपये किलो, गवार  ६०
मी: लोकांनी काय भाज्या खाऊच नयेत का? इतक्या महाग भाज्या असतील तर?
ती: महाग कुठे देते? चांगलं खावं, प्यावं, सारखा पैशाचा विचार करू नये.
मी: अर्धा किलो कोबी, दीड पाव वांगी द्या.
ती: आणि काकडी गाजर नको? बर ताई एक बोलायचं आहे तुमच्याशी.....
मी: काय?
ती: मोठ्या मुलाचं कॉलेज नुकतंच संपलय, तुमच्या ऑफिसमध्ये नोकरीला लाऊन घ्या न.....

एकीकडे हे बोलत तिने आपल्या मनानेच माझी भाजीची पिशवी तयार केलेली असते.

मी: काय शिकलाय? काय आवडतं त्याला? हा माझा फोन नंबर त्याला फोन करायला सांगा, मी बघते.
ती: साहेब येत नाहीत आजकाल?
मी: माझी मीच येते गाडी घेऊन.
ती: तुम्ही गाडी घेतली नवीन?
मी: नाही, जुनीच आहे, शनिवार, रविवार साहेब माझ्यासाठी ठेवतात गाडी.

नंतर काही दिवसांनी मंडईतल्या सगळ्या भाजी वाल्यांचे गाळे बदलले गेले. ही अगदी लांब गेली. पण गाडी पार्क करून आत शिरण्याचा माझा रस्ता तोच राहिला. तिच्या गाळ्यापाशी पोहचेपर्यंत माझी जवळपास सगळी भाजी घेऊन होत असे. तिच्याशी थोडे बोलून जावे म्हणून थांबले तर....

ती:  या! सगळी मंडई पिशव्या भरून भरून घेऊन यायचे, इथे काही घ्यायचे नाही! शोभतं का ताई तुम्हाला हे?
मी:  जागा तुम्ही बदलली आणि नावं मला ठेवा. एखादी भाजी इथून घ्यायची म्हणून आधी नाही घेतली, आणि तुझ्याकडे पण नसली तर, मला त्रास ना पुन्हा मागे जाऊन आणण्याचा?
ती:  तरी मटार न्याच आता, स्वस्त दिला ६० रुपये किलो. किती देऊ, २ किलो करू का?
मी:  नको, आता खूप भाजी घेऊन झालीये, एवढ्या भाजीचे निवडणे होणार नाही आज मला.. दोन         दिवसाच्या सुट्टीत किती कामे संपवायची मी?
ती:  मी निवडून ठेवू का? संध्याकाळी येऊन घेवून जाल का?
मी:  असं करा ना उसळच करून पाठवा घरी!
तोपर्यंत किलोभर मटार बाईने पिशवीत भरलेला असतो वर काकडी, टोमाटो.
मी: येवढे नको.
ती: खाता का नुसतंच त्याकडे बघून पोट भरता? मी पैसे मागितले का?
मी: अहो ताई, प्रश्न पैशांचा नाही, घरी इन मीन अडीच माणसे एवढी जास्त भाजी संपत नाही, इथे रुपया दोन रुपयांसाठी घासाघीस करायची आणि नंतर वाया घालवायची हे पटत नाही म्हणून.
ती: जिवाला खा जरा! एवढं काम करून पैसे मिळवता आणि खात का नाही? बघा आजकाल चेहरा कसा उतरून गेलाय तुमचा.
मी: हो गं बाई, तुझ्याकडची भाजी येत नाही न माझ्या घरी, त्यामुळे काही अंगीच लागत नाही बघ!

असाच अजून एक भाजीवाला आहे. दिवसा सरकारी नोकरी करतो. शेती करतो आणि संध्याकाळी भाजी मंडईत असतो. तो विकतो त्यापैकी बऱ्याच भाज्या त्याच्या घरच्या असतात. त्यामूळे कोथिंबीर घेतली की न्या घरचा आहे म्हणत पुदिना, कढीपत्ता पिशवीत जाऊन बसतोच. तिथेही, "साहेब नाही आले बरेच दिवसात, आजकाल धाकट्या ताईपण येत नाहीत तुमच्या संग" ही चौकशी होतेच. एकदा नवीन गाडी घेऊन भाजी आणायला गेले तर दोघांनीही विचारले "ताई पेढे नाही आणलेत?" आणायला पाहीजे होते असे प्रकर्षाने वाटून गेले…

चार शब्द प्रेमाने बोलायला कोणालाच पैसे पडत नाहीत. पण कधी कधी हेच लोकांना कळत नाही. आणि मग लोकं आयुष्यातले लहानसे आनंदाचे ठेवे हरवून बसतात.

Wednesday, March 20, 2013

“आपण करायचं का हे? काय वाटतं सगळ्यांना?” -लोकबिरादरी

“आपण करायचं का हे? काय वाटतं सगळ्यांना?” अशी या सगळ्याची सुरुवात झाली.

लहान लहान मुलं. स्कूलबसच्या हॉर्नच्या आवाजावर सोसायटीच्या पेव्हमेंटवर आपली नाजूक पावलं दुडदुडत टाकत आपल्या कार्टूनच्या सॅक्स सांभाळत त्या दिशेने धावणारी मुलं आणि पाठीमागे त्यांचे उरलेलं सामान घेऊन धावणार्‍या मम्मीज. किती सुरेख चित्र आहे नं. पण सगळ्याच गोंडस मुलांच्या नशिबी असं चित्र असतेच असं नाही. कित्येक मुलांना शाळा म्हणजे काय आणि तिथे का जायचं असतं हेच माहित नसतं. आम्ही नाही का न शिकता जगलो, तसंच आमची मुलं जगतील अशाच समजुतीत त्यांचे पालक. पण हेच चित्र बदलण्यासाठी काही मंडळी मनापासून झटतायेत, नव्हे आपलं सगळं आयुष्य त्यांनी तिथे समर्पित केलंय. असेच एक कुटुंब म्हणजे आमटे परिवार. आता याबद्दल आम्ही काही सांगायला नकोच. बाबा आमटे, साधनाताई आमटे यांच्यापासून सुरु केलेले व्रत प्रकाशकाका, मंदाताई यांच्यासह तुमच्या आमच्या पिढीचे अनिकेतदादा पुढे चालवत आहेत. हर्क्युलसला पृथ्वी तोलताना कमी कष्ट झाले असतील, एवढ्या अडचणी या मंडळी आदिवासी जनतेच्या पुनुरुत्थानासाठी सोसत आहेत. त्यांची ध्येयासक्ती अमर्यादित आहे. त्याच प्रेरणेतून साकार झालेला लोकबिरादरी प्रकल्प. आदिवासी जनतेसाठी दवाखाना, शाळा, वन्य प्राणी अनाथालय असे अनेक लोकोपयोगी उपक्रम या परिवाराच्या पुढाकाराने सुरु केले आहेत.


त्यातलाच एक म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा. प्रकाशकाका आणि मंदाकाकींची मुलंही याच शाळेत आदिवासी मुलांसोबतच शिकली. या शाळेला दरवर्षी होणारा (रिकरिंग) खर्च म्हणजे शाळेचे युनिफॉर्म्स. प्रत्यक्ष अनिकेत आमटेंचा त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पाठवलेला आलेला हा इमेलच त्यांची गरज सांगून देतो.



नमस्कार

इमेल बद्दल आभारी आहे .

रंग महत्वाचे नाहीत. उत्तम दर्जाचे व टिकावू नवीन कपडे हवेत.

२ ते २० वयोगटातील प्रत्येकी २० ड्रेस हवेत.



आता आपण वेगवेगळे पाठवणे म्हणजे वेगवेगळे रंग आणि मापं, शिवाय थोडे महागही पडणार. म्हणूनच आमच्या ब्लॉगर्स मित्रांनी मिळून एकत्र काही तरी करायचे ठरवले आहे. प्रत्येक वयोगटासाठी २०-२५ जोड याप्रमाणे इयत्ता १ली ते १०वी पर्यंतच्या मुलांसाठी कपडे पाठवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी येणार्‍या खर्चाचा तक्ता खालीलप्रमाणे आहे.

FINAL Quotation for HEMALKASA UNIFORMS


AT LOKBIRADARI PRAKALP

Standard Boys(25)              Girls(25)

SHISHU 290                        370

I 320                                    370

II 320                                  380

III 340                                400

IV 360                               420

V 380                                440

VI 420                              460

VII 430                             480

VIII 450                            500

IX 550                              465

X 575                               475

XI 575                              485

XII 575                            495

     5585                           5740

5585+5740=11325



BOYS 25 X 5585/- = 1,39,625/-

GIRLS 25 X 5740/- = 1,43,500/-



GRAND TOTAL = 2,83,125/-

ADD = Transportation costs

Weight about 100 to 115 kgs.

आपल्याला काय करता येईल?
आमच्या प्रामाणिक हेतूबद्दल खात्री असेल तर आपला खारीचा वाटा उचलता येईलच. अर्थातच हिशोबात पूर्णपणे पारदर्शकता असणारच आहे. आपली एकत्रित मदत हेमलकसाला पोचली की सगळा हिशोब ईमेलवर मिळेल. आपली मदतीची इच्छा असेल तर कृपया या लिंकवर जाऊन आपले डिटेल्स भरा.



https://docs.google.com/forms/d/1uk0BrxZC2TqWIF9kJUrs2H3UcTNMoIQj2zPW4cQg_cc/viewform



आपणांस हवी असेल तर आपण डायरेक्टली त्यांनाही आपली मदत पाठवू शकता. परंतु थेंबाथेंबाने पोचणार्‍या मदतीपेक्षा तेच थेंब एकत्र करुन किमान घोटभर का होईना आपण मदत पोचवू शकू ना? म्हणूनच हा प्रपंच !



टीप: आपण वस्तुरुपाने मदत पाठवत असल्याने आयकरात सवलत मिळेल अशी पावती मिळणे शक्य आहे असे मला वाटत नाही. तसा टॅक्स बेनेफिट हवा असेल तर थेट लोकबिरादरीच्या साईटवर डिटेल्स आहेत तिथे मदत पाठवावी. त्याचाही लोकबिरादरीला फायदाच होईल.



http://lokbiradariprakalp.org/getting-involved/donate/
-

साभार - पंकज झरेकर, देवेंद्र चुरी



Saturday, February 16, 2013

समवेदना


"समवेदना"

ते २००३ साल होते. एका अस्वस्थ काळातून मी जात होते. पहिल्यांदाच आयुष्यात मला कोणत्या तरी अशा आधाराची गरज वाटत होती, कि जी नुसतीच मला त्यातून बाहेर काढेल नव्हे तर माझे मनोबल टिकवून देखील ठेवेल. सर्वकाही कोणावर तरी सोपवावे आणि त्याने आपल्याला सावरावे असे कोणीतरी.  त्या वेळी देवावर नेहमीपेक्षा जास्त (कारण मुळात मी सश्रद्ध आहे )विश्वास ठेवावा असे कुठेतरी वाटू लागले होते. आणि त्यानुसार मी, सोळा सोमवारचे उपास सुरु करून त्या भोळ्या सांबावर  सारा माझा भार सोपवून निर्धास्त झाले. जसजसे दिवस सरत होते तसतसे माझे मनोबलही वाढत होते. उपास तर केले आहेत, मग आता बाकी सर्वजण करतात तशीच आपणही याची सांगता करावी की आपल्या मनाचे ऐकावे हा विचार वारंवार मनात डोकावत होता. शेवटी कौल मनाचाच लागला. कारण माझ्यासारख्याच खावून पिऊन सुखी कुटुंबातील अनेकदा नात्यागोत्याच्याच १६/१७ जोडप्यांना बोलवायचे, गोडधोड जेवू घालायचे,दक्षिणा द्यायची......पण हे का करायचे? लोकांना मी नक्की कशाचे प्रदर्शन करायचे, मी किती उत्तम स्वयंपाक करू शकते, किती खर्च करू शकते, किती भारी वस्तू, साड्या मी दक्षिणा म्हणून देवू शकते, याचे????????  त्याने काय होते? माझ्या जवळच्या व्यक्तीना तर सारे माहीतच आहे आणि बाकीच्यांना हे नाही कळले तर काय बिघडते???

त्यापेक्षा व्रताची सांगता करायच्या दिवशी मी नेहमीसारखी मनापासून पूजा करेन, एखादे असे मेहूण ज्यांना माझ्याबद्दल आत्मीयता वाटते, मी ज्या अवघड काळातून गेले होते त्याची त्यांना कल्पना आहे अशा कोणालातरी बोलावेन आणि बाकी सारी रक्कम मी एखाद्या योग्य अशा संस्थेला देईन. याने देव पावला तर ठीक नाहीतर त्याची मर्जी. मुळात माझ्या दृष्टीने "देवाणघेवाणीचे" हिशोब ठेवतो तो "देव" कसा????

असे विचार मनात घोळत असतानाच "साप्ताहिक सकाळ" मध्ये समवेदना च्या नुकत्याच सुरु झालेल्या कामाबद्दल माहिती आली होती. डॉ. चारुदत्त आपटे यांचे नाव मी पूर्वी ऐकून होते.पुण्यात लहानाची मोठी झालेली असल्यामुळे "त्यांच्या वडिलांच्या "विद्यार्थी सहाय्यक समिती" बद्दल ही माहिती होतीच. माझी काकू सौ.केतकर हि त्यांची पेशंट होती. त्यानंतर एकदा माझ्या भावाला त्यांच्याकडे न्यावे लागले होते. तेंव्हा मी नाही पण माझा नवरा त्याला त्यांच्याकडे घेऊन गेला होता. नंतर  परत आल्यावर जे वर्णन त्याने केले, ज्या पद्धतीने त्यांनी माझ्या भावाला अश्वस्त केले होते त्यावरून एक चांगली प्रतिमा त्यांची माझ्या डोक्यात होतीच. त्यामुळे हीच संस्था नक्की झाली. त्यावेळी "समवेदना" नुकतेच लावलेले लहानसे रोपटे होते. हर्डीकर हॉस्पिटलच्या एका मजल्यावर एका लहानशा खोलीत तिचा कारभार चाले. ठरवल्याप्रमाणे एकदा त्या रकमेचा चेक देऊन आल्यावर माझे काम संपले होते. 

काही महिन्यांनंतर माझ्या नावे  एक टपाल आले समवेदना कडून....काय असेल असा विचार करत ते उघडून पाहते तो आत एका पेशंटच्या डिस्चार्ज पेपरची प्रत आणि सोबत  त्याच पेशंटला का मदत केली गेली याची माहिती आणि त्याच्यावर केल्या गेलेल्या एकूण खर्चाचा भर कोणी आणि किती उचलला त्याचीही माहिती. त्या मोठ्या खर्चात माझी रक्कम खरतर फार लहानशी होती आणि तरीही त्यांनी मला हि सर्व माहिती पाठवणे उचित समजले होते. इतक्या पारदर्शक कारभाराची मी अपेक्षाच नव्हती केली. समवेदनच्या या कृतीने मीच भारावून गेले होते. "आपटे" या नावावर टाकलेला विश्वास नक्कीच खूप सार्थ होता याची खात्री पटली. याच ओघात मी अजून एक लहानशी रक्कम "समवेदना" च्या कार्यालयात पोचती करून आले. ही अशी लहानशी मदत दरवर्षी करावीच असे काही ठरले नव्हते. पण नंतरच्या प्रत्येक वर्षी श्री. सुनील हिंगणे दरवर्षी आठवणीने साधारण जानेवारी महिन्यात आधी फोन करून येऊ लागले, त्यांच्या येण्यापुर्वीच मागील वर्षातील दिलेल्या रकमेचा विनियोग कसा केला याची संपूर्ण माहिती पोस्टाने घरी आलेली असेच. श्री. हिंगणे सोबत वार्षिक अहवाल घेवून येत असत...नंतर नंतर प्रीती दामले यांच्याशी संपर्क वाढू  लागला. मधेच कधीतरी समवेदनाच्या कार्यालयातून शरयूचा दर महिन्याच्या एका गुरुवारी होणाऱ्या मीटिंगला येऊ शकाल का असा फोन येऊ लागला.त्यामुळे समवेदनच्या कामाची व्याप्ती कशी वाढते आहे याचा अंदाज येऊ लागला होता. नुसतीच गरजू रुग्णांना मदत नव्हे तर आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातील स्त्रीयांसाठी कर्करोग तसेच स्त्रीरोग तपासणी उपक्रम, आणि आता पुण्यातील पहिली "त्वचा पेढी".

आपल्या ऑफिस मधून होणाऱ्या "CSR" मध्ये तर आपण अनेकदा सामील होतच असतो. पण तेवढेच या देशात, आपल्या समाजासाठी पुरेसे आहे असे मला वाटत नाही. प्रत्येक सुजाण नागरिकाने, आपला चिमुकला हिस्सा वैयक्तिक स्तरावर उचलून कोणत्या न कोणत्या स्वरूपाचे योगदान दिले तर खूप मोठे बदल इथे दिसून येतील हे नक्की. आपल्यापैकी प्रत्येकाला खूप मनापासून विनंती की "समवेदना" ची खालील माहिती एकदातरी जरूर वाचा.

समवेदना- 
  • गरीब व गरजू रुग्णांना उपचारांसाठी आर्थिक मदत. 
  • सह्याद्री हॉस्पिटलच्या सर्व शाखांमधून सेवा उपलब्ध.
  • सह्याद्री हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांची सेवा याकरिता पूर्णपणे विनामुल्य.
  • सह्याद्री हॉस्पिटलकडून उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात सवलत.
  • देणगीदारांना त्याच्या निधीच्या विनियोगाची तपशीलवार माहिती पाठवली जाते.
  • सोबतच अशा रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देण्याचे कामही ही संस्था करत असते, त्याकरिता कोणतेही मानधन आकारले जात नाही. 
  • निम्न आर्थिक स्तरातील महिलांसाठी मोफत कर्करोग पूर्वनिदान तपासणी उपक्रम, व  गरज पडल्यास उपचारदेखील.
  • ग्रामीण भागातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीरे.
  • गेल्या वर्षी समवेदनेने १२५ गरजू रुग्णांसाठी जवळपास १ कोटीच्या मदतीचा टप्पा गाठला.
  • फेब्रुवारी २०१२ मध्ये पुण्यातील पहिल्या "त्वचा बँक" या उपक्रमास सुरुवात झाली. मृत्युपश्चात "त्वचादान" या सर्वसामान्यपणे माहित नसलेल्या संकल्पनेचा प्रसार आणि प्रचार करण्याची जबाबदारी या संस्थेने घेतली आहे.

आपल्यापैकी कोणासही या कार्यास आपला हातभार लावावा असे वाटल्यास, समवेदनामध्ये आपले स्वागत आहे. देणगी स्वरूपात मदतीची आपल्याला जर इच्छा असेल तर त्यासाठीचा तपशील खालीलप्रमाणे.
Union Bank of india, karve road branch,
S/b Account No. 37000201090 2648 for indian passport holders 
Account No. 37000201090 0967 for foreign passport holders.
IFSC Code UBIN0537004


दरवर्षीच्या एका लहानशा रकमेच्या धाग्याने माझ्यात आणि या संस्थेत एक घट्ट धागा विणला गेला. असा धागा की पुढे मागे जर नोकरी सोडून मी एखाद्या सामाजिक कार्यास वाहून घ्यायचे ठरवले तर हीच ती संस्था असेल.....असे मनोमन ठरवले जाण्याइतका. "एकही गरीब व गरजू रुग्ण निव्वळ आर्थिक पाठबळ नाही म्हणून परत जाऊ नये" हे ध्येय समोर ठेऊन अखंडपणे गेली १० वर्षे "समवेदना" ज्या रीतीने कार्यरत आहे, त्या कळकळ, त्या प्रेरणेला मनापासून सलाम!

Saturday, February 9, 2013

एक धडा.............


दिवसाकाठी अनेक गोष्टी घडत असतात, त्या अनुभवतानाच या शब्दबद्ध कशा रीतीने करायच्या याचाही मनात विचार सुरू असतो. त्याप्रमाणे अनेकदा रात्री घरी आल्यावर मी लॅपटॉप उघडून बसते देखील, पण त्याच वेळी मनात लिहावे-नलिहावे याचे द्वंद्व सुरू असते. सद्ध्या तरी रोज "न लिहावे" याच बाजूने निकाल लागतोय. काय म्हणावे यास...आपल्याच कोषात जाणे? किती दिवस चालणार हे असे? डिसेंबर मधे मी एक गोष्ट लिहायचा प्रयत्न केला, त्याचे पुढचे २ भागही एका दमात तेंव्हा लिहिले गेले होते, पण  ते पोस्ट करण्याची इच्छाच जणू मरून गेली. अनेक दिवसांत मी माझ्या स्वत:च्या "मी....माझे....मला" कडे बघितलेदेखील नाहीये. माझ्या बाकी सार्‍या ब्लॉग मित्र मैत्रीणींच्या ब्लॉगवर मी अधून मधून डोकवते देखील ... पण लिहीत मात्र नाहीये.

तशा मी रोजच्या रुटीनच्या बाकी सगळ्या गोष्टी करते, घराकडे लक्ष देते, नवरा लेकीशी गप्पा होतात, ऑफीसला जाते, जिमला जाते, चांगली गाणी ऐकते, गप्पा मारते, सभोवताली घडणार्‍या गोष्टींवर बोलते ही, मान्य की चांगल्यापेक्षा वाईट गोष्टींचं प्रमाण जास्त असते. रात्री घरी येऊन ठराविक कार्यक्रम टी.व्ही. वर पाहते, स्वत:बरोबर अनेक कडवट घटना नेहमीप्रमाणेच "जाऊ दे ना" म्हणत मागे टाकते. पण लिहीत मात्र नाहीये.

आज मी एक धडा शिकले. तो मात्र मी लिहिलाच पाहिजे. आपण नेहमी म्हणतो "गोष्टी वेळच्या वेळी कराव्यात" ....याच बाबतीतला एक धडा मी आज शिकलीय... आणि सकाळपासून तो माझ्या मनात घर करून आहे. आज मी गेले होते सकाळी एका गाण्याच्या वर्गाच्या एका कार्यक्रमाला. माझी लेक या क्लासला जाते. गेले काही दिवस त्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती.

कॉलेजला असताना माझ्या एका मैत्रीणीची बहीण होती, जी तेंव्हा संगीत घेऊन बी.ए. करत होती. अधूनमधून आम्ही भेटत असू, तिचं गाणं ही कधीतरी ऐकत असू. नंतर ती गाण्याचे कार्यक्रम करू लागली. अशाच कार्यक्रमांचे निवेदन उत्तम रीतीने करणार्‍या एका उमद्या तरुणाशी ओळख आणि नंतर प्रेमविवाह ही झाला. मधली काही वर्षे मी इथे नव्हते, काही वर्षांनी जेंव्हा परत आले, तेंव्हा या जोडीचे या शहरात चांगलेच नाव झालेले होते, एक दोन वेळा आमची भेट झाली देखील. संस्कृती लहान असताना जेंव्हा तिला गाणे शिकवायचा विचार आला तेंव्हा हिचेच नाव समोर आले, आणि त्याप्रमाणे संस्कृती तिच्याकडे गाणे शिकू लागली. त्या निमित्ताने आम्ही अधून मधून भेटू लागलो. पण पुन्हा काही कारणानी संस्कृतीचे गाणे थांबले, आणि आमच्या भेटीही.

सात आठ वर्षे मधे अशीच गेली. अजून एका मैत्रीणीच्या बोलण्यातून हिची खुशाली कळे. गेल्यावर्षी एप्रिलमधे एकदा दुपारी मैत्रीणीचा फोन आला "अनघा, "XXX"च्या मिस्टारांचा अपघात झालाय, आय.सी.यू.मधे आहेत ते" हे ऐकून थोडे सुन्न व्हायला झाले. नंतर थोड्याच वेळात भावाचा फोन आला, हीच बातमी सांगणारा. नंतरचे ३/४ दिवस या बद्दल मैत्रीण आणि भावाकडून त्यांच्या खालावत जाणार्‍या तब्येती बाबत. एक दिवस त्यांच्या जाण्याची बातमी आलीच. मैत्रीण आणि माझा भाऊ तिथेच होते. माझा आणि तिचा भाऊ हे गेली अनेक वर्ष चांगले मित्र आहेत. एकदा मनात विचार आला होता, तिला भेटायला जाण्याचा. पण का कोण जाणे तो मी टाळला, बरेच वर्ष काही संपर्क नसताना अशा प्रसंगी जाऊन काय बोलायचे. कोणाच्या शब्दांनी हलके व्हावे इतके लहानसे दु:ख नव्हते तिचे. चाळिशीत जोडीदार अचानक सोडून जातो, मागे त्याचे आई वडील, आपण आणि आपला मुलगा ठेवून ....तेंव्हा ते दु:ख काय असते हे मी माझ्या लहानपणी अनुभवलय. त्या नंतर काही दिवसांनी तिने गाण्याचे वर्ग पुन्हा सुरू केलेले पण मैत्रीणी कडून कळले. वाटले "बरे झाले, आता सावरेल थोडी." नंतर एकदा संस्कृतीने पुन्हा गाण्याचा विषय काढला आणि मी तिला फोन केला. तिच्याशी बोलले. दर्शनी तरी आता गाडी सावरलीये असे वाटून गेले. मध्यंतरी एकदा संस्कृतीला  मी मला गाणे शिकायचेय असे सांगितले, तिने तिच्या या ताईला सांगितले, निरोप आला "आईला म्हणावे, ये शनिवारी" मी म्हणाले "एवढे एक सर्टीफिकेशन आणि त्याची परीक्षा झाली की मग जायला लागेन"

आज सकाळी कार्यक्रमाच्या जागी पोहचले. आत शिरताच ती पुढे आली, आम्ही बोलू लागलो, आणि नकळत मला भरून येऊ लागले. स्वत:ला बर्‍यापैकी सावरत मी तिच्याशी बोलले. नंतर खुर्चीत जाऊन बसले आणि मग मात्र मी स्वत:ला थांबवू शकले नाही. तिच्या जोडीदाराच्या जाण्यानंतर तिने आयोजित केलेला हा पहिलाच मोठा कार्यक्रम होता. त्याना श्रद्धांजली वाहिली गेली. कार्यक्रमाला सुरूवात झाली, आणि निवेदन करणार होता तिचा ११/१२ वर्षांचा सुपुत्र. थोडाफार त्यांच्याच स्टाईलने त्याने काहीकाळ निवेदनाची धूरा छानपैकी सांभाळली. पण माझे मात्र डोळे सुरुवातीचा थोडावेळ भरून वहात राहीले.

एकीकडे ती ज्या पद्धतीने या प्रसंगातून धीराने बाहेर येते आहे, स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाला सावरते आहे, संभाळते आहे, लेकाला त्याच्या बाबांच्या मार्गावरून पुढे नेते आहे, कदाचित त्याच्या बाबांचेपण हेच स्वप्न असेल, हे बघून मला तिचे खूप कौतुक वाटत राहीले. त्या बरोबरच एकटीने हे सारे करण्याची वेळ नियतीने तिच्यावर आणली याचे वाईटही.
आणि धडा हा की "गोष्टी वेळच्या वेळी कराव्यात". त्या क्षणी तिला सावरण्यास अनेक हात तिच्यापाशी होते, माझ्या तिला भेटायला जाण्याने तिला काही फरक पडला असता, नसता, माहीत नाही. मला मात्र नक्कीच पडला असता. माझ्या भावनांचा योग्यवेळी निचरा झाला असता, आमच्या ओळखीतून जे बंध निर्माण झाले होते त्यासाठी तरी मी तिला भेटायला जायला हवे होते. ती तिची नाही तरी गरज माझी होती. ती जर मी वेळीच ओळखली असती असे अवेळीच डोळे भरून येण्याची वेळ माझ्यावर आली नसती.