Sunday, December 28, 2014

धर्म … तुम्ही, आम्ही.......................



एक लहानपणी वाचलेली गोष्ट होती, आठवतंय त्याप्रमाणे संत एकनाथांची. ते नदीवर स्नान करून येत असता एक निंदक त्यांच्या अंगावर थुंकतो, ते परत नदीवर जाऊन स्नान करून येतात, परत परत तेच घडते, कोणतीही वाईट प्रतिक्रिया न देत ते पुन्हा पुन्हा स्नान करून येत राहतात, शेवटी तो माणूस खजील होतो, क्षमा मागतो …. वगैरे वगैरे 
ते "संत" एकनाथ होते या विचाराने हि गोष्ट अशीच घडली असेल यावर सहज विश्वास बसतो. आज समाजात अनेक तथाकथित संत, महाराज, बाबा, बुवा, बापू आहेत, त्यांच्यापैकी एखाद्याच्या बाबतीत असे घडले तर ते असेच वागतील असे वाटते? 

आजही ज्ञानेश्वरी, गाथा,दासबोध या ग्रंथांचे महत्त्व शेकडो वर्षानंतरही असाधारण असे आहे,असे कोणते संत साहित्य आज निर्माण होते आहे, ज्याने आजच्या समाजाचे प्रबोधन तर होतेच आहे  पण अजून सात आठशे वर्षानंतरही त्यांचे महत्त्व टिकून राहील? समाज प्रबोधनाची गरज काय फक्त त्याच काळात होती? आज नाहीये ? वाढलेल्या तणावांच्या, जागतिकीकरणाच्या. नाते संबंधांच्या ताणातून, वाढीव महत्त्वाकांक्षा यासाऱ्यामुळे ती कितीतरी पटीने जास्त आहे. मग त्यातून बाहेर पडण्यास तुम्हाला कोण मदत करते? कोणते संत, महात्त्मे, बापू बुवा? कि तुम्ही तुमचेच मार्ग शोधता, स्ट्रेस किलर्स  शोधता? कि या जीवनालाच शरण जाता? आसपास अनेक समाजोपयोगी चांगली कामे करणारी माणसे आसपास आढळतील. सर्वचजण धर्माचे लेबल लावून आपल्या समोर येतात. त्यांच्या कामापेक्षा त्यांचा धर्म श्रेष्ठ ठरतो? किंवा एखाद्या विशिष्ठ धर्माचे असण्याने अशी महान कार्ये त्यांच्या हातून घडतात? 

शिवाजी महाराजांनी पाठवलेला ऐवज गरज असतानाही नाकारणाऱ्या संत तुकारामांची गोष्ट अभिमानाने सांगताना, कोट्यावधींची माया गोळा करणाऱ्या बापू, महाराज यांना तोच नियम आपण का लावत नाही? साधे जगण्याची मूलतत्त्वेही अपवादानेच पाळणारी मंडळी आजच्या समाजाचे संत म्हणून कसे प्रतिनिधित्त्व करतात? अनेक बेकायदेशीर कृत्ये करणारी, व्यभिचार करणारी  हि तथाकथित संत मंडळी जर आपल्या समाजात आहेत, राजरोसपणे आपले धंदे चालू ठेऊन आहेत, अनेक बाबा अतिशय चीड आणणारी बाष्कळ बडबड आणि कृत्ये करताना आपण पाहतो तर मग तरीही आपल्या समाजाचे चित्रीकरण कसे कोणी करावे आणि आपल्या समोर ठेवावे अशी आपली कल्पना आहे? की सत्याला आपण कधी खुल्या मनाने सामोरे जाणारच नाही? अशी तमाम मंडळी कोणा  एका धर्माचे प्रतिनिधित्व करणारे नसतातच, तसे सर्वच धर्मात या प्रवृत्ती बोकाळलेल्या आहेतच. 

रेहमान एक से एक उत्तम रचना घडवतो तेंव्हा त्याच्या धर्माचे आहे म्हणून "कून फाया, किंवा ख्वाजा मेरे ख्वाजा" अतिशय उत्तम बनवतो आणि त्याच्या धर्माचे, देवाचे नसलेले "मनमोहना" हे मात्र  त्याच्या हातून उत्तम रचना घडत नाही असे घडते का? मग जर नक्की धर्म कुठे आड येतो? एखाद्या धर्मावर चित्रपटातून टीका केली म्हणून एखादा दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीवर आपण टीका करत असू तर त्याच्या धर्माचे नसतानाही मनमोहना सारखे उत्तम गाणे बनवणाऱ्या संगीतकाराचे विशेष कौतुक जाहीरपणे आपण करतो का? 

लगेच कोणीतरी बाह्या सरसावून असे म्हणायची गरज नाही की "फक्त एकाच धर्माला का टार्गेट केलं गेलंय?" सोपं उत्तर म्हणजे आपण बहुसंख्यांक असणाऱ्या आपल्या देशात, आपलेच देव, संत, महात्त्मे जास्त संख्येने असणे आणि मग त्यावर टीका होणे हे स्वाभाविकच. दुसऱ्या एखाद्या दुसऱ्या धर्मबहुल देशात, प्रांतात त्यावर कोणी टीका केली असती, असे बोचरे चिमटे चित्रपटाच्या माध्यमातून काढले असते. आता तसं केल्यानंतर काय परिणाम झाले असते हे कोणत्या देशात, कोणत्या धर्मावर टीका होतीये, तो धर्म, तो समाज किती सहिष्णू आहे यावर ठरेल.म्हणजे कदाचित सोशल मिडीयावर चर्चे इतके त्या विरोधाचे स्वरूप मर्यादित राहिले हि नसते, अगदी तडीपार होण्याची वेळ तो तसा चित्रपट बनवणाऱ्यावर येऊ शकते, चित्रपटावर बंदी येऊ शकते, अगदी त्या कलाकार, निर्मात्याच्या हत्येचा फतवाही निघू शकतो. म्हणूनच मला हे हि मान्य आहे कि हे सारे इथे घडू शकणार नाही, हा धर्म इतका सहिष्णू आहे कि त्या धर्मात राहूनच मी त्यावर सरेआम टीका करू शकते. पण मग माझ्यावर अशी टीका करण्याची वेळ येतेच का? 

धर्म, देव, जात, पोटजात या साऱ्या गोष्टी ना माणसाची मुलभूत गरज आहेत. त्याच्या अस्तित्त्वाशी निगडीत अशा. या कि त्या धर्माची आहे मी? धर्माच्या कोणत्या जातीचा, पोटजातीचा  भाग आहे … या अनेक गोष्टी व्यक्तीचे आजचे अस्तित्त्व, समाज, विचारप्रक्रिया ह्या गोष्टींच्या मुळाशी काही प्रमाणात असतात. देव, धर्म, धार्मिक आचार विचार या साऱ्या गोष्टी खरंतर किती वैयक्तिक असाव्यात…. कोणता धर्माचे आहात, त्याच्या मुल्यांवर किती विश्वास ठेवता, आस्तिक आहात कि नास्तिक? नास्तिक कसे खरे खुरे कि सोयीने? आस्तिक असाल तर कशा प्रकारे, मुर्तीस्वरूप देवावर श्रद्धा असणारे,  कर्मकांड मानणारे कि एका अनादी अनंत अशा विश्व चालवणाऱ्या शक्तीवर विश्वास ठेवणारे, हर इच्छेसाठी देवाला माणसासारखे समजून देवाण घेवाणीचे व्यवहार करू पाहणारे, की प्रत्येक चांगली, योग्य गोष्ट माझ्या हातून घडण्यासाठी बळ दे, चांगल्या दिवसात माझे पाय जमिनीवर ठेव, वाईट दिवसांना सामोरे जाण्यास मनाला शक्ती मागणारे. अशा असंख्य छटा या संकल्पना सोबत घेऊन येतात. म्हणूनच या संकल्पना प्रत्येक व्यक्ती नुसार वेगळ्या असताना त्या सर्वात जास्त वैयक्तिक होऊन जात नाहीत का? 

पण जर धर्म हि माणसाची इतकी मुलभूत आणि वैयक्तिक गरज असेल तर मग मला त्यास घराबाहेर का न्यावे लागावे आणि प्रदर्शन करावे असे वाटावे? का मला कोणी घराबाहेर, शाळेत, महाविद्यालयात, नोकरीच्या ठिकाणी माझा धर्म , माझी जात विचारावी? एक माणूस असणे आणि जी गोष्ट करायची आहे ती करण्यासाठी सक्षम असणे इतकेच बास नाही का? म्हणजे शाळेत जायचय तर योग्य वय, शिक्षण घेण्यासाठी सक्षमता पुरे झाल्या कि या गोष्टी, नोकरी करायची आहे तर गरज आहे ते शिक्षण आणि तो अनुभव माझ्या गाठीला असणं पुरेसे नसावे का? 

या अमुक एक धर्माचे आहोत आणि त्यातीलही अमुक एका देवाला पुजतो ते रस्त्यावर येऊन कोणाला का सांगावे वाटते? म्हणजे का रस्त्यावर कोणत्या देव धर्माशी संबधित कृत्ये रस्त्यावर उतरून प्रदर्शन करत करावीत? ना ताबूत निघावेत, ना गणपतींना रस्त्यावरून वाजत गाजत न्यावे, ना कान्हा ने रस्ते अडवून दही हंडी फोडावी. घराच्या, समाज केंद्रांच्या आत जे काय धर्मिकपण जपायचे असेल ते जपावे ना? 

याच युगाचा एक महान क्रिकेट पटू माझ्या मनातून तेंव्हा उतरला जेंव्हा त्याने एका आपण एका बाबांचे भक्त आहोत हे समाजापुढे येऊ दिले. मला नाही वाटत प्रसार माध्यमांपुढे हि मंडळी इतकी हतबल असतात कि त्यांना या गोष्टी रोखता येत नाहीत. सारी कारकीर्द तोलून मापून वागण्या बोलण्या बद्दल प्रसिद्ध हा माणूस. त्याची श्रद्धा त्याने कोठे कशी ठेवावी हे वैयक्तिक आहे, होते. ते त्याने तसेच ठेवले असते तर जास्त चांगले झाले असते. 

माझ्या या पूर्वीच्या नोकरी मध्ये माझा एक सहकारी होता, जो दुसऱ्या धर्माचा, दुसऱ्या शहरात काम करणारा होता. सर्वात जास्त काळ मी त्याच्यासोबत काम केलं  होते  आणि त्या कालावधीत कधीही आमचे भिन्न धर्म आमच्या कामाच्या आड आले नाहीत, ते कधीही आमच्या चर्चेचा विषय नव्हते.  काम करतानाची आमच्यातील chemistry हि सर्वात चांगली आणि महत्त्वाची गोष्ट होती. माझ्या तिथल्या शेवटच्या दिवशी मला निघायला एक अर्धा तास असताना, त्याचा फोन येणे जे मी स्वाभाविकपणे अपेक्षिले होते आणि त्याप्रमाणे तसा त्याने केल्यावर, अपेक्षित होते ते सारे काही (कामात एकेमकांना किती पूरक होतो, कशी उणीव भासेल, पुढील वाटचालीसाठी एकमेकांना शुभेच्छा इ.)आम्ही दोघे बोलल्यानंतर अचानक त्याने, " अनघा, आयुष्यात एकदा तरी XXX (त्याच्या धर्माचा पवित्र ग्रंथ) हे वाच, तुला नवीन दृष्टी मिळेल जगण्याकडे पाहण्याची" वगैरे सांगितले. माझ्या सहिष्णू स्वभावाने मी फार शार्प प्रतिक्रिया न देता ते संभाषण  थांबवू शकले, आजही आम्ही अधून मधून बोलतो, दोन चांगल्या व्यक्ती म्हणून, पण धर्माचे असे प्रदर्शन पुन्हा एकदा रुचले नाही ते नाहीच.

अजून एक टीम होती माझी ज्यात दोन जण इतर पण एकाच धर्माचे  होते. आणि बाकी सारी टीम माझ्यासारखी. त्यामुळे वेगवेगळे, सण, पूजा त्याचा प्रसाद ऑफिसला नेणे हे ओघानेच. त्यातला एक जण असा प्रसाद म्हणून नेलेला कोणताही पदार्थ खात नसे, आणि दुसरा मात्र आठवणीने तो ऑफिसला आण असे सांगत असे. एक दिवस बोलताना मी याला विचारले, त्याला माझ्या देवाचा प्रसाद चालत नाही, तुला कसा चालतो रे? त्याचा उत्तर होते, "तुझ्यासाठी तो प्रसाद आहे, माझ्यासाठी तो फक्त शिरा किंवा पेढे बर्फी आहे, ते मला मनापासून आवडते आणि मी ते खातो. मी आणतो तो केक तूही असंच आवडतो म्हणून खातेस ना, यात कुठे आला आपला देव आणि धर्म?"  या उत्तरावर मी एक सेकंद चमकले, पण मान्य केलं हे म्हणणं मी अगदी खुल्या दिलाने. 

आज इतकं सारं मन:पटलावर येण्याचं कारण म्हणजे तो चित्रपट ज्याच्यावर एकाच धर्माला टार्गेट केलंय अशी टीका करत असंख्य लोक अधिकाधिक प्रसिद्धी देत आहेत. एखादी चुकीची गोष्ट खरतर अनेक वेळा दुर्लक्षून किंवा अनुल्लेखाने जास्त चांगली मारता येते. जो पर्यंत खरंच गरज पडत नाही तोवर कलाकृतीकडे कलाकृती म्हणून आणि रचना घडवणाऱ्याची अभिव्यक्ती म्हणून पाहावे आणि सोडून द्यावे. बघा पटलं तर …………  साऱ्या श्रद्धा, विश्वास माझ्या चार भिंतींच्या आत ठेऊन एक माणूस म्हणून समाजात राहणे मला मनापासून आवडेल, आणि तुम्हाला?

Sunday, December 14, 2014

फिर आपके नसीबमें ये बात हो ना हो …

रात्रीची वेळ. घरपरतीची वेळ अनेकांची कधीच होऊन गेलेली. आपापल्या घरट्यांत पक्षीच नव्हे, तर माणसेही जाऊन विसावलेली. आपल्या माणसांत रमलेली, हास्यविनोदात, जेवण, मनोरंजन यात रंगून गेलेली. अशावेळी आँफीसमधून बाहेर पडणारी मी. अनेकदा गाडीत एकटी. मुळात ही वेळच हळवी, कातर! मुसमुसायला, डोळ्यांच्या कडांना ओलसर व्हायला काहीही कारण यावेळी पुरतं. म्हणजे असंच घडतं असंही नाही आनंदाचे क्षणही असतात, आनंद मनात मावेना अशी अवस्थाही अशीच, किती सांगू मी सांगू माझे मलाच अशी. कधी काय घडेल काही सांगता येऊ नये अशी. दिवसभरातली एखादी कडवट घटना आठवावी, कोणाच्या आठवणीने उदास वाटावे, कधी कोणा दुसरयाच्या दु:खाने,   दुःखद प्रसंगाने आपल्यालाच घेरून टाकावे, कधी विनाकारण उदासीने मनावर राज्य करावे तर कधी अगदी काही नाही तर एखाद्या गाण्यानेच अस्वस्थ करावे.  

एखादे गाणे पुर्वी असंख्य वेळा ऐकले असावे, तेंव्हा न रूतलेला काटा नेमका आत्ता, अशावेळीच रूतावा आणि मन घायाळ होऊन जावे. यापूर्वी न जाणवलेले कंगोरे आता जाणवू लागावेत, न उमजलेले अर्थ समोर यावेत, असंख्य वेळा ऐकलेल्या त्याच त्या शब्दातून नवाच विचार गवसावा. किती वेळा ऐकलं असेल हे गाणं, अगदी नकळत्या वयापासून, शब्दांचे अर्थ कळू लागल्यापासून एकच अर्थ जो सर्व सामान्यपणे घेतला जाऊ शकतो … तोच मी ही घेतला होता आजवर याचा. बरं, हे घडतं तेंव्हा सांगणारी मीच, ऐकणारीही  मीच, आपुला संवाद हा आपणाशी. तशी ही अवस्था ही नेहमीच! कालही असंच थोडं झालं. आधी या गाण्याने दिवसभर घेरून टाकलं, उदास केलं. आपण आपल्या जीवलगांसह नसू या विचाराने डोळे भरून वाहू दिले. काही वेळा असे आपले मनाने घट्ट असणेही कमी येत नाही. थोडे स्वत:ला शांत होऊ दिल्यावर हा मनात डोकावलेला विचार…. "का, मीच कोणाला हे सांगावं"

फिर आपके नसीबमें ये बात हो ना हो …
शायद फिर इस जनममें मुलाकात हो न हो ……. 

का नाही मी हे स्वत:लाच सांगावे आणि का नाही ते मनात ठेऊन त्याप्रमाणे वागावे? कधी काही प्रसंगातून जात असताना आपण आपल्यालाच हा प्रश्न विचारतो का?  "के फिर अपने नसीबमें ये बात हो न हो …. ", तो विचार मनात ठेवुन त्या व्यक्तीचा, त्या क्षणांचा आदर करतो? काळाचे आभार मानतो? आनंददायी, आयुष्यातील महत्त्वाचे धडे देणारे, जगणे समृद्ध करणारे असे असंख्य क्षण....... का नाही त्यांच्या ऋणात राहू?

शेवटच्या काही दिवसात मी मोठी व्हायची स्वप्ने बघणारे माझे बाबा ती जेंव्हा बोलून दाखवत होते त्या क्षणी हे सत्य उमजायला हवे होते की हे सारे पुन्हा नशिबात असेल नसेल. स्वप्न बघणारे बाबा असण्याचे सुख देणाऱ्या काळाचे मी आभार मानू  शकते पण हे त्यांच्या पर्यंत ना तेंव्हा पोचवले आणि ना आता पोचवू शकते. 
यथा काष्ठम च काष्ठम …. या उक्ती नुसार अनेक व्यक्ती कारणांनी भेटतात, त्या छोट्याशा काळात तुम्हाला समृद्ध करतात आणि ते कारण संपल्यावर स्वाभाविकपणे दुरावतात देखील. तेंव्हा कधी हे मनात येतं? "बाळे, अजूनही ओठ पिळले तर दूध निघेल इतकी लहान आहेस, म्हणून तुझी काळजी वाटते" असं मला सांगत ज्यांनी माया लावली ते  मुकुंद कासट, शब्दातून व्यक्त न होत माया लावणारे मुकुंद रानडेआबा आणि सुधा आत्या, आरती काकू अशा अनेकांसोबत असताना मनात हे यायला हवे होते. जेंव्हा एकदा साक्षात समोर, मोजून काही पावलांवर जोत्स्नाबाईंच्या तोंडून "क्षण आला भाग्याचा" ऐकले होते तेंव्हा  हे मनात यायला हवे होते. तेंव्हा त्या त्या व्यक्तींपर्यंत त्यांनी काय दिले मला हे मी पोचवायला हवं होतं. असे एक न दोन अनेक क्षण, अनेक व्यक्ती, अनेक घटना. 

अनेकदा अनेक भावना, परिस्थिती कायम राहील ही आपली समजूत इतकी ठाम असते की त्यापलीकडे आपण काही पाहायला तयारच नसतो. मग आपण आपल्या माणसांना, इतर साथ सोबत असणाऱ्यांना, परिस्थितीला, काळाला इतकं गृहीत धरतो की मग आपल्याला हे विचार शिवतच नाहीत. असे अनेक मैत्रीचे धागे, असे अनेक मायेचे हात, मदतीचे हात, पाठीवरची कौतुकाची थाप…. प्रत्येक क्षणी मनात कुठेतरी डोकावायला हवा माझ्या हा विचार …न जाणो हे सारे पुन्हा नशिबात असेल नसेल. 
आता मागे वळून पाहताना मला तेंव्हा हा विचार मनात येऊन तो मनात ठेऊन त्या त्या क्षणांना दिलेले प्रतिसाद अधिक समर्पक ठरले असते. आता अर्ध्याहून अधिक डाव संपला असताना का होईना हे मनास उमजलय हे काय कमी आहे. कारण "हमको मिली है आज ये घड़िया नसीबसे" हे ही तितकंच खरं!

Saturday, December 6, 2014

अंतर .....


एखादी कल्पना मनात यावी आणि शब्दांनी तिचा पाठलाग करत एका पाठोपाठ हात धरून यावे आणि कवितेचा जन्म व्हावा, हे भाग्य कधीतरीच लाभणारे. त्यामुळे जशी सुचत गेली तशी च्या तशी कोणत्याही संस्कारांशिवाय ही कविता! 

दु:खाची परिभाषा 
अश्रुंचे पूर 
ते पुसणारे हात 
का कितीतरी दूर 

आठवणींचा उमाळा 
वेदनेचे कातर सूर
ते ऐकू जाणारे कान 
असती मैलोनमैल दूर 

नजरेची साद 
नयनच आतूर 
प्रतिसाद देणारे डोळे 
आता कितीतरी दूर 

पौर्णिमेची रात्र 
चांदणे टिपूर 
चांदण्यांनी ओंजळ भरणारा 
मात्र चंद्रासारखाच दूर

सहवासाची ओढ 
शब्दांचे काहूर 
समजणारया मनानेही 
का राहावे मनापासून दूर 

Wednesday, December 3, 2014

कविता जगताना....... जगण्याची कविता होताना.......

शब्दांच्या प्रेमात असाल, काव्यात आयुष्य जगत असाल तर अनेक कविता मनात घर करून राहिलेल्या असतात. कधी कोणती मन:पटलावर उमटेल आणि तुमचा ताबा घेईल सांगता येत नाही. अशा माझ्या मनात घर केलेल्या कवितांमध्ये शांताबाईंच्या बऱ्याच कविता असतात. शांताबाईंचे नाव घेताच उभे राहते समोर एक सात्विक व्यक्तीमत्व! ठसठशीत गोल कपाळावरचे कुंकू, डोक्यावरून घेतलेला तो साडीचा पदर आणि एक हास्य चेहऱ्यावर.

शांताबाईंच्या कविता, गाणी व लेखन आवडतं याचा अर्थ मी ते सारे वाचले, ऐकले आहे असे मुळीच नाही. पण त्यामुळे होते काय की अनेक कविता प्रथमच वाचल्या, ऐकल्या जातात. प्रथम वाचल्या पासून तिने मनाचा ताबाच घेणे इथपर्यंत चा प्रवास सुद्धा कायम सारखाच नसतो. मनाशी संबंध आला की कशाचाच भरवसा नाही हे एकमेव सत्य. कधी पहिल्याच वाचनात ती कविता इतकी भावेल, कधी एकदा वाचली चांगली वाटली या पुढे जाणार नाही, एखादी एकदा वाचली आवडलीच नाही असेही घडेल. पण प्रत्येक कवितेचे एक ऋण मात्र नक्की असते माझ्यावर. माझ्याही नकळत ती मला घडवते, बदलवते, समृद्ध करते. 

बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा तन्वी थत्ते हिने मला त्यांच्या गाण्यांची "शुभ्र कळ्या मुठभर" दिली होती, जिला कौशल इनामदार यांचे संगीत होते. अनेक सुंदर गाणी त्यात होती. अनेकदा मी ती ऐकली, आवडली देखील. ते कॅसेटचे दिवस होते. यातच  "घर परतीच्या वाटेवरती" हे पण गाणे होते. त्या गाण्याचे असे झाले होते, ऐकले, आवडले पण मनात खोलवर पोहोचले का, आणि तसे असेल तर ते मनाला जाणवले का तर उत्तर नाही असे असले असते. 

पण त्यातला आशय, ते भाव मनात कुठेतरी इतके पक्के झाले होते, कि योग्य वेळी मन:पटलावर ते उमटून येण्यास अजिबात वेळ लागला नाही. सगळे दिवस सारखे नसतात. एखादी गोष्ट मनास कधी कशी गुंतवेल सांगता येत नाही . एके दिवशी रात्री उशिरा मी गाडी चालवत घरी येत होते. खरंच, असतो एखादा मनाला थकवून टाकणारा दिवस, कुठल्याही छोट्याशा गोष्टींनी हळवे होऊ पाहणारे मन आणि या साऱ्यांशी जुळवून घेत असणारी मी. अशावेळी अचानक हेच गाणे आठवावे, त्याने मनाचा पूर्ण ताबा घ्यावा  आणि जीव अजूनच व्याकूळ व्हावा असा तो अनुभव. 

घर परतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे
अंधूक होते नजर आणखी थकलेले पाऊल अडे
घर परतीच्या वाटेवरती पडल्या-झडल्या शीण खुणा
मावळतीच्या किरणांमधुनी क्षण झळझळुनि उठती पुन्हा
घर परतीच्या वाटेवरती पायांवाचून पाय-ठसे
अश्रूंत चाहूल येते कानी एक हुंदका, एक हसे
घर परतीच्या वाटेवरती आभासांचे दाट धुके
सावलीत सावली मिसळते अन्‌ पुटपुटती ओठ मुके
घर परतीच्या वाटेवरती मलूल, वत्सल, सांज उन्हे
कुरवाळीती मज स्‍नेहभराने विसरून माझे लाख गुन्हे

शांताबाईंची अजून एक कविता वाचली आणि नि:शब्द झाले "एकाकी". एक छोटीशी कविता. एकदा वाचून सोडून सुद्धा देईल कोणी अशी. पण नीट वाचली, समजून घेता आली तर दुःखाची खोली दाखवेल अशी. दु:खाचे कायम डोंगारेच पिटले जावेत असे नाही. पण तसे न केल्याने ते नसते असेही नाही. स्त्री- पुरुष या नात्यात सारं काही ठीक दिसत असताना, एकाकीपणातून जाणारी स्त्री. अनेकदा मला असा वाटलंय स्त्रीयांकडे एक वेगळीच दृष्टी असते, नात्यांकडे पाहण्याची, त्यातले असंख्य पदर समजून घेण्याची, त्यातल्या विविध छटांचे भावार्थ लावण्याची. त्यामुळेच अनेकदा तिच्या जोडीदाराच्या दृष्टीने "यात काय विशेष, उगीच काहीही अर्थ लावत बसतेस" अशी प्रतिक्रिया येऊ शकते तेंव्हा तीच स्त्री मोजक्या शब्दात हे दु:ख मांडून जाते. या स्त्रियांना नक्की हवे तरी काय असते हे देवाला सुद्धा कळणार नाही हा सूर अनेकदा लागतो, कानी पडतो. पण खरंच इतकं अवघड असतं का त्यांना समजून घेणे? 

सोबत कोणी नसण्यातून येणारे एकटेपण बरे, ते तुम्हाला संपवत नाही, मनाने उमदे असलात तर एकटेपण एकटे असूनही तुमच्या वाटेस जात नाही. पण सारे काही असूनही जर एकाकीपण वाट्यास आले असेल तर ते तुम्हाला खाऊन टाकते, मिटवून टाकते. स्त्री पुरुष संबंधात फक्त स्त्रीच्याच वाट्याला हे येत असेल असेही नाही, पण एक स्त्री म्हणून मला त्याच्याशी जोडले जाता आले इतकंच. जळणारा जीव कळला कदाचित इतकेच, स्त्रिया अनेकदा जास्त चांगल्या व्यक्त होतात इतकेच. 

ही कविता म्हणजे म्हंटल्या तर चार साध्या ओळी, उमजले तर जन्माचे दु:ख, तरीही त्याचे भांडवल न करता फक्त परिस्थिती समोर ठेवणारे. नात्यात असूनही वेधून टाकणारे एकाकीपण, बिलागणाऱ्या बोटांच्या पलीकडे जाऊन हवा असणारा नात्याचा एक कॅनव्हास, आणि तो मिळत नाहीये ही विफलता. म्हटलं तर हे दु:ख उगाळायला आयुष्य कमी पडेल असे … ते एका "त्वचेमागील एकाकीपण कधी सरते काय " या प्रश्नावर अनुत्तरीत ठेवणे हे फक्त त्यांनाच जमू शकते. 
एकाकी- 
तुझा आणि तुझ्यासाठी 
शब्द सारे खोटे 
खरी फक्त क्वचित कधी 
बिलगणारी बोटे 
तीही बिलगून सुद्धा दूर 
खोल खोल भुयारात 
कण्हणारे सूर. 
दूर देशीच्या ओसाडीत 
भटकणारे पाय 
त्वचेमागील एकाकीपण 
कधी सरते काय?

Tuesday, December 2, 2014

मोजपट्ट्या

दरक्षणी उभे असते समोर कोणी
मापत तुम्हांला तुमच्याही नकळत
हातात निरनिराळ्या मोजपट्ट्या घेऊन


अनेकांच्या हाती पट्टी तशी साधी...
पण तुम्हाला खुजे ठरवत,
स्वत:ची काडी मोठी करू पहाणारी


सतत कोणीतरी तुम्हांला त्यांच्या मोजपट्टीवर मापायचे
पट्ट्या कधी कर्तृत्त्वाच्या, कधी दातृत्त्वाच्या
कधी कष्टाच्या तर कधी मायेच्या


खोडून काढत राहायची तुम्ही ती मोजमापे, किंवा परिमाणे
नाहीतर त्या मापांना अनुसरत सतत
मोठे होत राहायचे, स्वत:ची उंची वाढवत


अन तसे करूनही खुजेच तुम्ही कारण
मोजपट्ट्या सतत बदलतच राहतात, मोठ्या होत जातात
भावना कायम ठेवत अधुरेपणाची, अपूर्णतेची


अनेकदा राग आलाय या मोजपट्ट्यांचा
अनेकदा वाटलय काढून घ्याव्यात या साऱ्या
मोडून काढाव्यात सपासप यांना


कोण देतं कोणाला असे मोजमापाचे हक्क
लहान मोठेपणाची परिमाणे
बनून जावे त्यांनी जगण्याचा भाग अविभाज्य

 
अन् तरीही आता या साऱ्यातून शोधतीये
एक आरसा माझ्या मनाचं प्रतिबिंब दाखवणारा
एक खरी मोजपट्टी मला खरे खुरे मापणारी......


माझ्या अस्तित्त्वाच्या, माझ्या व्यक्तित्त्वाच्या
लांबी रुंदी खोलीची परिमाणे
खरी खुरी मला दावणारी