Tuesday, December 2, 2014

मोजपट्ट्या

दरक्षणी उभे असते समोर कोणी
मापत तुम्हांला तुमच्याही नकळत
हातात निरनिराळ्या मोजपट्ट्या घेऊन


अनेकांच्या हाती पट्टी तशी साधी...
पण तुम्हाला खुजे ठरवत,
स्वत:ची काडी मोठी करू पहाणारी


सतत कोणीतरी तुम्हांला त्यांच्या मोजपट्टीवर मापायचे
पट्ट्या कधी कर्तृत्त्वाच्या, कधी दातृत्त्वाच्या
कधी कष्टाच्या तर कधी मायेच्या


खोडून काढत राहायची तुम्ही ती मोजमापे, किंवा परिमाणे
नाहीतर त्या मापांना अनुसरत सतत
मोठे होत राहायचे, स्वत:ची उंची वाढवत


अन तसे करूनही खुजेच तुम्ही कारण
मोजपट्ट्या सतत बदलतच राहतात, मोठ्या होत जातात
भावना कायम ठेवत अधुरेपणाची, अपूर्णतेची


अनेकदा राग आलाय या मोजपट्ट्यांचा
अनेकदा वाटलय काढून घ्याव्यात या साऱ्या
मोडून काढाव्यात सपासप यांना


कोण देतं कोणाला असे मोजमापाचे हक्क
लहान मोठेपणाची परिमाणे
बनून जावे त्यांनी जगण्याचा भाग अविभाज्य

 
अन् तरीही आता या साऱ्यातून शोधतीये
एक आरसा माझ्या मनाचं प्रतिबिंब दाखवणारा
एक खरी मोजपट्टी मला खरे खुरे मापणारी......


माझ्या अस्तित्त्वाच्या, माझ्या व्यक्तित्त्वाच्या
लांबी रुंदी खोलीची परिमाणे
खरी खुरी मला दावणारी

2 comments:

  1. या मोजपट्ट्या नकळत आपल्यावर किती परिणाम करत असतात, नाही? छान व्यक्त केलं आहेस. आवडलं.

    ReplyDelete
  2. हो ना आपण आपल्या इच्छेने जगणे विसरूनच जातो मग आणि आपणच इतरांच्या पट्ट्या घेऊन स्वत:ला मोजू मापू लागतो मग....

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!