रात्रीची वेळ. घरपरतीची वेळ अनेकांची कधीच होऊन गेलेली. आपापल्या घरट्यांत पक्षीच नव्हे, तर माणसेही जाऊन विसावलेली. आपल्या माणसांत रमलेली, हास्यविनोदात, जेवण, मनोरंजन यात रंगून गेलेली. अशावेळी आँफीसमधून बाहेर पडणारी मी. अनेकदा गाडीत एकटी. मुळात ही वेळच हळवी, कातर! मुसमुसायला, डोळ्यांच्या कडांना ओलसर व्हायला काहीही कारण यावेळी पुरतं. म्हणजे असंच घडतं असंही नाही आनंदाचे क्षणही असतात, आनंद मनात मावेना अशी अवस्थाही अशीच, किती सांगू मी सांगू माझे मलाच अशी. कधी काय घडेल काही सांगता येऊ नये अशी. दिवसभरातली एखादी कडवट घटना आठवावी, कोणाच्या आठवणीने उदास वाटावे, कधी कोणा दुसरयाच्या दु:खाने, दुःखद प्रसंगाने आपल्यालाच घेरून टाकावे, कधी विनाकारण उदासीने मनावर राज्य करावे तर कधी अगदी काही नाही तर एखाद्या गाण्यानेच अस्वस्थ करावे.
एखादे गाणे पुर्वी असंख्य वेळा ऐकले असावे, तेंव्हा न रूतलेला काटा नेमका आत्ता, अशावेळीच रूतावा आणि मन घायाळ होऊन जावे. यापूर्वी न जाणवलेले कंगोरे आता जाणवू लागावेत, न उमजलेले अर्थ समोर यावेत, असंख्य वेळा ऐकलेल्या त्याच त्या शब्दातून नवाच विचार गवसावा. किती वेळा ऐकलं असेल हे गाणं, अगदी नकळत्या वयापासून, शब्दांचे अर्थ कळू लागल्यापासून एकच अर्थ जो सर्व सामान्यपणे घेतला जाऊ शकतो … तोच मी ही घेतला होता आजवर याचा. बरं, हे घडतं तेंव्हा सांगणारी मीच, ऐकणारीही मीच, आपुला संवाद हा आपणाशी. तशी ही अवस्था ही नेहमीच! कालही असंच थोडं झालं. आधी या गाण्याने दिवसभर घेरून टाकलं, उदास केलं. आपण आपल्या जीवलगांसह नसू या विचाराने डोळे भरून वाहू दिले. काही वेळा असे आपले मनाने घट्ट असणेही कमी येत नाही. थोडे स्वत:ला शांत होऊ दिल्यावर हा मनात डोकावलेला विचार…. "का, मीच कोणाला हे सांगावं"
फिर आपके नसीबमें ये बात हो ना हो …
शायद फिर इस जनममें मुलाकात हो न हो …….
का नाही मी हे स्वत:लाच सांगावे आणि का नाही ते मनात ठेऊन त्याप्रमाणे वागावे? कधी काही प्रसंगातून जात असताना आपण आपल्यालाच हा प्रश्न विचारतो का? "के फिर अपने नसीबमें ये बात हो न हो …. ", तो विचार मनात ठेवुन त्या व्यक्तीचा, त्या क्षणांचा आदर करतो? काळाचे आभार मानतो? आनंददायी, आयुष्यातील महत्त्वाचे धडे देणारे, जगणे समृद्ध करणारे असे असंख्य क्षण....... का नाही त्यांच्या ऋणात राहू?
शेवटच्या काही दिवसात मी मोठी व्हायची स्वप्ने बघणारे माझे बाबा ती जेंव्हा बोलून दाखवत होते त्या क्षणी हे सत्य उमजायला हवे होते की हे सारे पुन्हा नशिबात असेल नसेल. स्वप्न बघणारे बाबा असण्याचे सुख देणाऱ्या काळाचे मी आभार मानू शकते पण हे त्यांच्या पर्यंत ना तेंव्हा पोचवले आणि ना आता पोचवू शकते.
यथा काष्ठम च काष्ठम …. या उक्ती नुसार अनेक व्यक्ती कारणांनी भेटतात, त्या छोट्याशा काळात तुम्हाला समृद्ध करतात आणि ते कारण संपल्यावर स्वाभाविकपणे दुरावतात देखील. तेंव्हा कधी हे मनात येतं? "बाळे, अजूनही ओठ पिळले तर दूध निघेल इतकी लहान आहेस, म्हणून तुझी काळजी वाटते" असं मला सांगत ज्यांनी माया लावली ते मुकुंद कासट, शब्दातून व्यक्त न होत माया लावणारे मुकुंद रानडेआबा आणि सुधा आत्या, आरती काकू अशा अनेकांसोबत असताना मनात हे यायला हवे होते. जेंव्हा एकदा साक्षात समोर, मोजून काही पावलांवर जोत्स्नाबाईंच्या तोंडून "क्षण आला भाग्याचा" ऐकले होते तेंव्हा हे मनात यायला हवे होते. तेंव्हा त्या त्या व्यक्तींपर्यंत त्यांनी काय दिले मला हे मी पोचवायला हवं होतं. असे एक न दोन अनेक क्षण, अनेक व्यक्ती, अनेक घटना.
अनेकदा अनेक भावना, परिस्थिती कायम राहील ही आपली समजूत इतकी ठाम असते की त्यापलीकडे आपण काही पाहायला तयारच नसतो. मग आपण आपल्या माणसांना, इतर साथ सोबत असणाऱ्यांना, परिस्थितीला, काळाला इतकं गृहीत धरतो की मग आपल्याला हे विचार शिवतच नाहीत. असे अनेक मैत्रीचे धागे, असे अनेक मायेचे हात, मदतीचे हात, पाठीवरची कौतुकाची थाप…. प्रत्येक क्षणी मनात कुठेतरी डोकावायला हवा माझ्या हा विचार …न जाणो हे सारे पुन्हा नशिबात असेल नसेल.
आता मागे वळून पाहताना मला तेंव्हा हा विचार मनात येऊन तो मनात ठेऊन त्या त्या क्षणांना दिलेले प्रतिसाद अधिक समर्पक ठरले असते. आता अर्ध्याहून अधिक डाव संपला असताना का होईना हे मनास उमजलय हे काय कमी आहे. कारण "हमको मिली है आज ये घड़िया नसीबसे" हे ही तितकंच खरं!
सुन्दर आता जेंव्हा जेंव्हा ज्या ज्या व्यक्ती विषयी जे जे वाटेल ते त्या व्यक्ति पर्यन्त पोचव.
ReplyDeleteनक्की .... प्रयत्न्न करेन...........
Delete