शब्दांच्या प्रेमात असाल, काव्यात आयुष्य जगत असाल तर अनेक कविता मनात घर करून राहिलेल्या असतात. कधी कोणती मन:पटलावर उमटेल आणि तुमचा ताबा घेईल सांगता येत नाही. अशा माझ्या मनात घर केलेल्या कवितांमध्ये शांताबाईंच्या बऱ्याच कविता असतात. शांताबाईंचे नाव घेताच उभे राहते समोर एक सात्विक व्यक्तीमत्व! ठसठशीत गोल कपाळावरचे कुंकू, डोक्यावरून घेतलेला तो साडीचा पदर आणि एक हास्य चेहऱ्यावर.
शांताबाईंच्या कविता, गाणी व लेखन आवडतं याचा अर्थ मी ते सारे वाचले, ऐकले आहे असे मुळीच नाही. पण त्यामुळे होते काय की अनेक कविता प्रथमच वाचल्या, ऐकल्या जातात. प्रथम वाचल्या पासून तिने मनाचा ताबाच घेणे इथपर्यंत चा प्रवास सुद्धा कायम सारखाच नसतो. मनाशी संबंध आला की कशाचाच भरवसा नाही हे एकमेव सत्य. कधी पहिल्याच वाचनात ती कविता इतकी भावेल, कधी एकदा वाचली चांगली वाटली या पुढे जाणार नाही, एखादी एकदा वाचली आवडलीच नाही असेही घडेल. पण प्रत्येक कवितेचे एक ऋण मात्र नक्की असते माझ्यावर. माझ्याही नकळत ती मला घडवते, बदलवते, समृद्ध करते.
बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा तन्वी थत्ते हिने मला त्यांच्या गाण्यांची "शुभ्र कळ्या मुठभर" दिली होती, जिला कौशल इनामदार यांचे संगीत होते. अनेक सुंदर गाणी त्यात होती. अनेकदा मी ती ऐकली, आवडली देखील. ते कॅसेटचे दिवस होते. यातच "घर परतीच्या वाटेवरती" हे पण गाणे होते. त्या गाण्याचे असे झाले होते, ऐकले, आवडले पण मनात खोलवर पोहोचले का, आणि तसे असेल तर ते मनाला जाणवले का तर उत्तर नाही असे असले असते.
पण त्यातला आशय, ते भाव मनात कुठेतरी इतके पक्के झाले होते, कि योग्य वेळी मन:पटलावर ते उमटून येण्यास अजिबात वेळ लागला नाही. सगळे दिवस सारखे नसतात. एखादी गोष्ट मनास कधी कशी गुंतवेल सांगता येत नाही . एके दिवशी रात्री उशिरा मी गाडी चालवत घरी येत होते. खरंच, असतो एखादा मनाला थकवून टाकणारा दिवस, कुठल्याही छोट्याशा गोष्टींनी हळवे होऊ पाहणारे मन आणि या साऱ्यांशी जुळवून घेत असणारी मी. अशावेळी अचानक हेच गाणे आठवावे, त्याने मनाचा पूर्ण ताबा घ्यावा आणि जीव अजूनच व्याकूळ व्हावा असा तो अनुभव.
घर परतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे
अंधूक होते नजर आणखी थकलेले पाऊल अडे
घर परतीच्या वाटेवरती पडल्या-झडल्या शीण खुणा
मावळतीच्या किरणांमधुनी क्षण झळझळुनि उठती पुन्हा
घर परतीच्या वाटेवरती पायांवाचून पाय-ठसे
अश्रूंत चाहूल येते कानी एक हुंदका, एक हसे
घर परतीच्या वाटेवरती आभासांचे दाट धुके
सावलीत सावली मिसळते अन् पुटपुटती ओठ मुके
घर परतीच्या वाटेवरती मलूल, वत्सल, सांज उन्हे
कुरवाळीती मज स्नेहभराने विसरून माझे लाख गुन्हे
अंधूक होते नजर आणखी थकलेले पाऊल अडे
घर परतीच्या वाटेवरती पडल्या-झडल्या शीण खुणा
मावळतीच्या किरणांमधुनी क्षण झळझळुनि उठती पुन्हा
घर परतीच्या वाटेवरती पायांवाचून पाय-ठसे
अश्रूंत चाहूल येते कानी एक हुंदका, एक हसे
घर परतीच्या वाटेवरती आभासांचे दाट धुके
सावलीत सावली मिसळते अन् पुटपुटती ओठ मुके
घर परतीच्या वाटेवरती मलूल, वत्सल, सांज उन्हे
कुरवाळीती मज स्नेहभराने विसरून माझे लाख गुन्हे
शांताबाईंची अजून एक कविता वाचली आणि नि:शब्द झाले "एकाकी". एक छोटीशी कविता. एकदा वाचून सोडून सुद्धा देईल कोणी अशी. पण नीट वाचली, समजून घेता आली तर दुःखाची खोली दाखवेल अशी. दु:खाचे कायम डोंगारेच पिटले जावेत असे नाही. पण तसे न केल्याने ते नसते असेही नाही. स्त्री- पुरुष या नात्यात सारं काही ठीक दिसत असताना, एकाकीपणातून जाणारी स्त्री. अनेकदा मला असा वाटलंय स्त्रीयांकडे एक वेगळीच दृष्टी असते, नात्यांकडे पाहण्याची, त्यातले असंख्य पदर समजून घेण्याची, त्यातल्या विविध छटांचे भावार्थ लावण्याची. त्यामुळेच अनेकदा तिच्या जोडीदाराच्या दृष्टीने "यात काय विशेष, उगीच काहीही अर्थ लावत बसतेस" अशी प्रतिक्रिया येऊ शकते तेंव्हा तीच स्त्री मोजक्या शब्दात हे दु:ख मांडून जाते. या स्त्रियांना नक्की हवे तरी काय असते हे देवाला सुद्धा कळणार नाही हा सूर अनेकदा लागतो, कानी पडतो. पण खरंच इतकं अवघड असतं का त्यांना समजून घेणे?
सोबत कोणी नसण्यातून येणारे एकटेपण बरे, ते तुम्हाला संपवत नाही, मनाने उमदे असलात तर एकटेपण एकटे असूनही तुमच्या वाटेस जात नाही. पण सारे काही असूनही जर एकाकीपण वाट्यास आले असेल तर ते तुम्हाला खाऊन टाकते, मिटवून टाकते. स्त्री पुरुष संबंधात फक्त स्त्रीच्याच वाट्याला हे येत असेल असेही नाही, पण एक स्त्री म्हणून मला त्याच्याशी जोडले जाता आले इतकंच. जळणारा जीव कळला कदाचित इतकेच, स्त्रिया अनेकदा जास्त चांगल्या व्यक्त होतात इतकेच.
ही कविता म्हणजे म्हंटल्या तर चार साध्या ओळी, उमजले तर जन्माचे दु:ख, तरीही त्याचे भांडवल न करता फक्त परिस्थिती समोर ठेवणारे. नात्यात असूनही वेधून टाकणारे एकाकीपण, बिलागणाऱ्या बोटांच्या पलीकडे जाऊन हवा असणारा नात्याचा एक कॅनव्हास, आणि तो मिळत नाहीये ही विफलता. म्हटलं तर हे दु:ख उगाळायला आयुष्य कमी पडेल असे … ते एका "त्वचेमागील एकाकीपण कधी सरते काय " या प्रश्नावर अनुत्तरीत ठेवणे हे फक्त त्यांनाच जमू शकते.
एकाकी-
तुझा आणि तुझ्यासाठी
शब्द सारे खोटे
खरी फक्त क्वचित कधी
बिलगणारी बोटे
तीही बिलगून सुद्धा दूर
खोल खोल भुयारात
कण्हणारे सूर.
दूर देशीच्या ओसाडीत
भटकणारे पाय
त्वचेमागील एकाकीपण
कधी सरते काय?
No comments:
Post a Comment
हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!