Monday, July 11, 2011


मागच्या महिन्यात माझा भाचा शाळेत जाऊ लागला. सुरुवातीचे दिवस माझी बहीण त्याच्या बरोबर शाळेत जात होती. एक दिवस फोनवर बोलताना ती म्हणाली "मल्हारच्या वर्गात वीस मुले आणि पाच मुली आहेत" मी विचारलं " मग तर काय? त्यात काय विशेष?"तिचं उत्तर होतं "अगं, जेंव्हा त्याच्या लग्नाची वेळ येईल त्यावेळी लाखो रुपये हुंडा देऊन मुलगी आणावी लागेल घरी , जर असाच मुला-मुलींचा रेशियो राहिला तर.....मी मनात विचार केला, ज्याना मुली आहेत त्याची दु:खं अजून वेगळी.


तेंव्हा मी हसले नंतर वाटलं खरच तर आहे तिचं म्हणणं. मग कोणीतरी एक सिग्नेचर लाइन टाकलेली पाहिली. "Save Girl Child, we can save Tigers later". मग सोनोग्राफी सेंटरवर टाकलेल्या धाडी. सर्वत्र स्त्री-भ्रूण हत्येविरुद्ध मोहिमा. परवाच सुबोध भावेचा एक लेख वाचला, २०२२ मधे जाऊन लिहिलेला.छान होता असं सुद्धा लिहिवत नाही. 


एकीकडे या सार्‍या गोष्टी ठळक छापल्या, बोलल्या जात असताना, पेपर मधील बलात्काराच्या बातम्यांकडे आपण दुर्लक्ष करतोय का? कोणत्या आईला आपली मुलगी या देशात सुरक्षित वाटते? प्रत्येक आई मनातून  धास्तावलेली असते. बोलूनही दाखवता येत नाही आणि सहनही होत नाही अशी ही भीती. समाजातील कोणत्याही स्तरातील,कितीही शिकलेली आई असो, प्रत्येक आईच्या बाबत ही भीती खरी आहे. स्त्रीमुक्ती, स्त्री-पुरूष समानता वगैरे नाही हो.....साधं माणूस म्हणून सुखाने जगता यावं  इतकीही अपेक्षा नाही का बाळगू शकत या देशात? अनेक देव्यांच्या नावाने मंदिरे बांधणार्‍या आपल्या समाजात स्त्रीचीच का इतकी वाईट परिस्थिती? परवाच्या बातमीने तर कहरच केला. प्रत्यक्ष आईही आपल्या दोन्ही विवाहित पोरीना वाचवू शकली नाही.


प्रश्न इतकाच आहे की एक समाज म्हणून आपण मृतवत होत चाललो आहोत का? विश्वचषक जिंकणे, सेन्सेक्सची कोटीच्या कोटी उड्डाण, लाखो रुपयांची मिळणारी पॅकेज, बाजारात नवीन येणारं सेदन मॉडेल, आय-पॉड ४,ऐश्वर्या राय आई होणार, शाहरूखचा नवीन सिनेमा यापेक्षाही काहीतरी महत्वाचे आहे, जे आपण गमावत चाललोय आणि ती म्हणजे मूल्ये. जी कोणत्या बाजारात विकत मिळत नाहीत, कोणत्या शाळेत  शिकवत नाहीत, बर्‍याचशा प्रमाणात आपण ती जन्माला येताना बरोबरच घेऊन आलेले असतो, थोडीफार जडणघडण समाज करतो.


कायदा सुव्यवस्था नावाची कोणतीच गोष्ट या देशात नाही यावर हळूहळू शिक्कामोर्तब होत चाललय अनेक अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये, यात आता कुठेतरी बदल व्हायला हवाय. यासारख्या गुन्ह्यांसाठी इतकी कडक शिक्षा आणि ती ही इतकी तत्काळ असायला हवी की गुन्हा करताना ही माणूस हजारदा विचार करेल. स्त्रीचा आत्मसन्मान कधी जपायला शिकणार आहोत आपण? दहा निरपराध लोकाना शिक्षा झाली तरी चालेल पण एक गुन्हेगार सुटता कामा नये अशी भूमिका का घेत नाही आपण? 

No comments:

Post a Comment

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!