Monday, June 6, 2011

शांताबाई शेळके

आजही मला ती संध्याकाळ स्पष्ट नजरेसमोर दिसते.... कार्यक्रम एका बक्षीस वितरण सोहळ्याचा! एक नाव पुकारलं जातं ते दहावीच्या परीक्षेत मराठीत प्रथम आल्याबद्दल..... एक अल्लड मुलगी स्टेजवर येते...आणि समोर उभ्या असतात साक्षात "शांताबाई शेळके" आजही तो सात्विक चेहेरा माझया नजरेसमोर आहे. कपाळावरचं ते मोठं कुंकू, डोईवरचा तो पदर, चेहेर्यावरील ते स्मित, आणि नमस्कार केल्यानंतर दिलेले आशीर्वाद!  त्यावेळी तो क्षण कॅमेरयात बंद करून ठेवायला हवा हे देखील सुचलं नाही. पण मनाच्या कप्प्यात तो ठेवा आजही तसाच आहे.

काळ सरकत होता. माझा आणि मराठीचा संबंध फक्त बोलीभाषा इतकाच उरला. तिच्यावरही अन्य भाषांनी आक्रमणे केली. मी कधी साहित्याचा करियर म्हणून विचार नाही केला पण साहित्याने आपले काम चोख बजावले....प्रत्येक टप्प्यावर मला समृद्ध करण्याचे...

आज ६ जून शांताबाईंचा स्मृतिदिन. त्यांच्या प्रत्येक कवितेने काहीतरी योगदान माझया आयुष्यात दिले. त्यांच्या प्रत्येक गाण्याने मला मोहवून टाकले, कसं काय सुचत असेल इतकं प्रवाही लेखन, प्रतिभेची ज्योत सतत तेवती ठेवण्यामागे किती यत्न असतील या प्रश्नांनी मी नेहमीच अनूत्तरीत राहते.

आजही रात्री उशिरा घरी परतत असता...."घर परतीच्या वाटेवरती" हेच ओठांवर असतं...चांदण्या राती तोच चंद्रमा नभात साथ करत असतो, जुने दिवस आठवताना "कळ्यांचे दिवस फुलांच्या राती" अशीच भावना असते, लावणी म्हणजे रेशमाच्या रेघांनीच,  हे शामसुन्दर राजसा ऐकताना साक्षात समोर मूर्ती उभी राहते,  रूतलेला काटा थेट हृदयात कळ उठवतो. माझया प्रत्येक भावनेला त्यांनी शब्द दिलेत....

नशीबवान आपण सारे की अशा साहित्यिकांच्या कलकृतींची ठेव आपल्या बरोबर आहे.

No comments:

Post a Comment

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!