Saturday, May 19, 2012

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा.......

कुमार गंधर्वांचा गाणं ऐकणं ही एक आनंददायी गोष्ट. अनेकदा त्यांनी लावलेला "सा" अंगावर काटा आणतो, रोमांचित करतो. एखादी पावसाळी संध्याकाळ. त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम, अगदी कमी उपस्थिती, पण तुमच्या सुदैवाने ते मात्र कार्यक्रम स्थळी वेळेवर पोहचले आहेत. त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे कितीही कमी लोक असले तरी  ते गाणं सुरु करणारच. बाहेर कोसळणारा वरुण आणि आत ही बरसात. अगदी स्वरात चिंब भिजवून टाकणारी. आपोआप डोळे मिटून घेता यावेत, आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचा भान निघून जावं. कानापर्यंत पोहोचणारा प्रत्येक सूर, कानात, मनात साठवता यावा. आता कुमार गंधर्व नाहीत, त्यांना प्रत्यक्ष समोर बसून गाताना ऐकण्या इतकी मी नशीबवान नव्हते. तरीही......


छानशी सुट्टी असावी. सर्व सुट्टी स्पेशल कामे बाजूला सारून हाती असलेला वेळ मनासारखा घालवता येण्याची मुभा असावी. घरात नि:शब्द शांतता  असावी. बाहेर ही कुंद अशी हवा असावी. कधी कधी अशी हवा मला खूप आल्हाददायक वाटते. दुपारी मनाजोगे जेवण, नंतर एक छानशी डुलकी व्हावी. उठल्यानंतर, फ्रेश होवून टि.व्ही. समोर जावून बसावे. सगळे पडदे सारून सुंदरसा सिनेमा पाहण्याकरिता मनाजोगी वातावरण निर्मिती व्हावी.   आणि एखादा आवडता, सिनेमा शांतपणे बघता यावा. कोणत्याही जाहिरातीशिवाय, कोणतही व्यत्यय न येता. कोणताही फोन, मोबाईल, घराची बेल  काही काही वाजू नये या वेळी. एखादी  हिंदी किंवा इंग्लिश सांगीतिक प्रेमकहाणी. रोमन हॉलिडे किंवा चोरी चोरी सारखे, राजकपूर किंवा देव आनंद चा एखादा हळूवार. हाणामारी, गुन्हेगारी, किंवा आर्ट फिल्म्सच्या नावाखाली दाखवले  जाणारे नको इतके वास्तव यातली कोणतीच गोष्ट मला आवडत नाही. हळू हळू मी सोफ्यावरून खाली जमिनीवर उतरते, आणि माझ्या सोबत सोफ्यावरचे लोड, तक्के ही. मधेच काही क्षण थांबून एखादा कप कॉफी बनवून घेवून तिचा आस्वाद घेत पुन्हा सुरुवात. हळू हळू मग संध्याकाळ होवू लागते, घरात साठवलेला हलकासा अंधार थोडा गडद होवू लागतो. त्या नायिकेच्या जागी मी आता स्वत:ला पाहू लागते. एक हलकीशी धुंदी मनावर पसरलेली असते. खरतर खूप खास नाही यात तरीही....माझ्यासाठी असं सर्व घडणं हाच एक कपिला-षष्ठी चा योग येण्याजोगी गोष्ट आहे.

Saturday, May 12, 2012

असेच काही उदासवाणे

ऑफिसला जाताना रस्त्यात एक सिग्नल लागतो, तिथे हमखास दोनतीन गरीब मुले-मुली तुमच्या गाडीपाशी येतात. हातात एक फडकं असतं, काही न बोलता गाडीची समोरची काच पुसू लागतात, जो पर्यंत तुम्ही पर्समधून पैसे काढत नाही तोपर्यंतच मात्र ...अर्थात सिग्नल ही काही सेकंदाचाच असतो. मी दर वेळी २ रु. हाती ठेवते, विचार करते किमान काम करून पैसे मिळवावेत एवढं समजलं आहे हे ही नसे थोडके. या वर माझी चेष्टा करणारी माणसे माझ्या आसपास असतातच. 

ज्या समाज व्यवस्थेचा आपण भाग आहोत तेथे इतक्या मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आहे की ते कोणी एका दोघांच्याने दूर होणे शक्य नाही. पण मी पण या समाजाचाच जर एक भाग असेल तर मी कोणत्यातरी स्वरूपात माझा सहभाग त्याच्या निर्मूलनासाठी द्यायलाच हवा. अनेकदा मी चितळ्यांच्या दुकानात जाते, घरी विशेष अशा गोष्टी खाणारं कोणी नसतं तरी काही ना काही मिठाई, फरसाण घेवून येते, असू दे कोणी घरी अचानक आलं तर असावं म्हणून. त्या दुकानाच्या बाहेर अनेक लहान मुले भीक मागत असतात. त्या दुकानातून बाहेर पडताना मला इतका अपराधी वाटतं की नुसते एक दोन रु. हातात ठेवून काही फारसं साध्य होणार नाही. मग मी बाजूला एक दोन खाऊ ची दुकाने आहेत तिथून काहीतरी सामोसा, इडली वगैरे विकत घेवून त्यांना देते. तिथेच बाजूला इतर फुटकळ विक्रेते असतात जसे की लिंबे, गजरे, डाळिंबे विकणारे. परवा असंच काही एका मुलीला घेवून दिल्यावर बाजूला उभा असलेल्या गजरेवाल्याने ते तिच्या हातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. ते पाहून मी त्याला ओरडले, की तिला खावू दे. पण आपण तरी असे किती पुरे पडणार. अनेकदा नको असतानाही मी सिग्नलला गजरेवाल्यांकडून गजरे घेते. काही उपयोग नसतो  मला त्यांचा. थोडा वेळ गाडीत छान सुवास दरवळतो इतकेच. 

आज सिग्नलला उभी असता नेहमीप्रमाणे एका मुलगी गाडी जवळ आली, काच पुसू लागली, पैसे देवू केल्यावर, माझ्या बाजूच्या खिडकीतून  समोर ठेवलेले चुईंग गम सारख्या दिसणाऱ्या पाकिटाकडे बोट दाखवून ते मागू लागली, पण तिच्या दुर्दैवाने ते चुईंग गम नव्हतं, मी हातात पैसे ठेवून, ते देणार नाही सांगितला. सिग्नल संपून गाडी सुरु करेपर्यंत ती गाडी सोडेचना. आता जरी ते चुईंग गम असतं तर त्याने का तिचे पोट भरणार होते? इतकं उदास, इतकं हतबल वाटू लागलं नंतर मला की पुढे जावून मला गाडी  चालवयालाच  सुचेना, शेवटी मग गाडी बाजूला घेवून, थांबले, पाणी पिऊन, पाच मिनिटे तशीच शांत बसून राहिले मग पुढे गेले. पण प्रश्न हा की असा हे किती दिवस चालणार?

Thursday, May 3, 2012

जडतो तो जीव, लागते ती आस

माझी लेक लहान होती तेंव्हा पासून तिला घरात कुत्रा हवा आहे. आणि flat मध्ये तो पाळायला माझा सक्त विरोध. आपण दिवसांचे कित्येक तास घराबाहेर राहायचे आणि मुक्या प्राण्यांना कोंडून ठेवून त्यांचे हाल करायचे हेच मुळी मला मान्य नाही. शेवटी तडजोड होवून घरात छोटे पक्षी आले. ते घरात गेली ६ वर्षे आहेत. ते त्यांच्याच विश्वात खरंतर जगत असतात, त्यांना वेळच्या वेळी खायला प्यायला द्या बाकी त्यांचे तुमच्याकडे लक्ष ही नसते. तुम्ही घरी या, बाहेर जा त्यांच्या जवळ जा ते दखल पण घेत नाहीत. त्यातले काही एकमेकांशी रक्तबंबाळ होईपर्यंत भांडतात, आणि म्हणून जर त्यांना वेगवेगळ्या पिंजऱ्यात ठेवले तर एकमेकाशी तिथून सतत बोलत राहतात. एक पक्षी त्याच्या जोडीदाराचे खूप लाड करत असे, ती पक्षीण खूप आळशी होती, तरीही त्याचा तिच्यावर खूप जीव होता. दोघे भांडत ही खूप असत ते पाहणे हा एक छान विरंगुळा असे. 


छोटी पिल्ले संस्कृती बाहेर काढत असे, त्यांना हातात घेवून बसत असे. एका रात्री स्वप्न पडलं की एक पिल्लू उडालं म्हणून, सकाळी काही कोणाला त्याबद्दल बोलले नाही. ( अशी स्वप्ने तुलाच कशी पडतात असा कोणी उगाच म्हणू नये म्हणून) आणि खरंच दुसऱ्या दिवशी एक पिल्लू संस्कृतीच्या हातून सुटलं आणि उघड्या खिडकीतून उडून गेलं नंतरचा सारा वेळ संस्कृती रडत राहिली. नंतरचे दोन दिवस त्याच्या साठी टेरेसमध्ये खाणं ठेवून त्याच्या परत येण्याची वाट बघत राहिलो. 

मागच्या वर्षी एकदा पक्षीण मलूल दिसली. आम्ही दोघे ते पाहून अस्वस्थ झालो, कसे बसे तिला मीठ-साखरेचे पाणी पाजून, सतत लक्ष देवून वाचवले तेंव्हा कुठे बरे वाटले. परवा बडोद्याला गेले तेंव्हा पक्षांच्या आवाजाने दुपारी झोपेतून दचकून जागी झाले, वाटले की आमचेच पक्षी ओरडत आहेत, पण नंतर लक्षात आले की ते त्या घराच्या बागेतले होते. गेले २/४ दिवस घरात नव्हतो आणि काय झाले कळलेच नाही, आज सकाळी पाहतो तर तो पक्षी खूप ओरडत होता आणि पक्षीण निपचित पडून होती, तिला वाचवायची कोणतीही संधी न देता....... संस्कृती सकाळ पासून उदास आहे, आम्हा दोघींचेही डोळे सारखे भरून येत आहेत. काही न बोलता संस्कृतीने तो पक्षाला दुसर्या पिंजऱ्यात हलवले, तो पिंजरा साफ केला. कोणत्याही संवादाविनाही किती जीव लागतो याचं हे उदाहरण.