Tuesday, December 8, 2015

तो...... मी....... आणि समाज


मुळात माझे आणि त्याचे नाते हे कोणत्याही रूढी, परंपरा, नियम यात बांधलेले नाही. त्याचे आणि माझे नाते इतके वैयक्तिक आणि घट्ट आहे कि सहजासहजी कोणी त्यास धक्का लावू शकणार नाही. कारण मुळात हे नाते एका श्रद्धेचे आहे. तो देव म्हणून माझी त्यावर श्रद्धा आहे एवढेच खरेतर पुरेसे. पण कदाचित मग अशीच श्रद्धा त्याचीही माझ्याबाबत एक व्यक्ती  म्हणून असेल आणि म्हणून कदाचित आमचं इतकं घट्ट नातं टिकून असेल.

कोणतेही देवस्थान, कोणतेही गाव, कोणतेही देऊळ, कोणतीही मूर्ती, कोणत्याही पादुका, कोणत्याही देवळाचा कळस, कोणतीही पायरी या साऱ्यात मी त्याला पहात नाही. कोणतेही संत, कोणतेही साधू हे म्हणजे तो नव्हे. माझी तयाप्रती असणारी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी मला या साऱ्यांची गरज असतेच असे नाही. म्हणजे अशी ठिकाणे मला वर्ज्य आहेत का तर तसे नाही  पण तिथे गेल्यानेच माझ्या श्रद्धेचा अविष्कार घडतो का? तर तसे मुळीच नाही. उद्या जगातल्या सर्व अशा ठिकाणांमध्ये एक स्त्री आहे म्हणून प्रवेश मिळणार नाही अशी स्थिती निर्माण जरी झाली तरी मला  काडीचाही फरक पडणार नाही.  खरेतर मुळात अशी श्रद्धा आहे हे हे व्यक्त करण्याचीच मला गरज नाही.

तो म्हणजे घरात असलेल्या किंवा नसलेल्या मूर्ती नाहीत, कोण्या एका स्थानात, कोण्या एकाच दगडात तो वसतो असेही नाही. तो  तुमच्या  माझ्या सारखा माणूस नाही त्यामुळे माणसाची जात करते ते देवाण घेवाणीचे नियम तिथे लागत नाहीत. माणसांसारखी  लाच घेत  जसे की पेढे, नारळ, फुले, दक्षिणा, देणगी  अजून काय काय  घेत इच्छा पुऱ्या करणारा तो "देव" नव्हे. किंवा यातले मी काहीच केले नाही म्हणून माझ्यावर डूख धरून माझे वाईट करतो, असाही तो ही "देव" नव्हे. माझ्या अथक प्रयत्नांना जिथे मर्यादा येतात आणि तरीही गोष्टी घडतात ते घडवणारी शक्ती म्हणजे देव. तरीही माझे जे काही चांगले वाईट घडण्यास तो जबाबदार नाही  माणसाच्या आकलनापल्याड असंख्य गोष्टी घडतात चांगल्या/वाईट, माणूस किंवा कोणताही प्राणी सोडून, ते घडविणारा  तो जो कोणी कर्ता, जी शक्ती तो देव. त्याला देव म्हणूनच संबोधले पाहिजे असे नाही.  त्याला पुजलेच पाहिजे असेही  नाही.

हो… आणि मी एक स्त्री आहे. स्त्री म्हणून जन्म किंवा त्यासोबत मिळालेल्या कोणत्याही गोष्टी ह्या माझ्या अस्तित्त्वाचाच भाग आहेत. त्यामुळे त्या गोष्टींमुळे मी स्वतःला कमी लेखत नाही. वयात येणे, स्त्री म्हणून फुलण्याची सुरुवात होणे , शरीराने प्रजजनासाठी तयार होणे यास अतिशय नैसर्गिक प्रक्रिया मी मानते. मग या गोष्टी माझ्या दैनंदिन आचरणातील अडथळा बनत नाहीत. या कोणत्याही गोष्टीचे अवडंबर मी माजवत नाही, त्यासाठी कधी कोणत्या सवलतीची अपेक्षाही मला नाही.  या बाबत समाज, इतर लोकं काय विचार करतात, म्हणतात हे सारे माझ्यासाठी गौण आहे. मी जशी आहे तशी मला स्विकारणारा तो माझा "देव" आहे. माझ्या कोणत्याही शारीरिक स्थितीचा त्यास विटाळ होत नाही. कारण मुळात आमचे नाते त्यावर अवलंबून नाही. त्याचे आणि माझे नाते हा एक धागा आहे माझे मन आणि त्याची शक्ती यास जोडणारा.

अशी श्रद्धा जिथे असेल तिथे काय फरक पडतो कोणते  मंदिर, कोणती पायरी, कोणता चौथरा मला मी स्त्री आहे म्हणून वर्ज्य असेल तर? फरक पडतो… नक्कीच जोवर एक स्त्री  या साऱ्याला  महत्त्व देते तोवरच …… साऱ्या स्त्रिया एकदाच हा का विचार करत नाहीत की अशा भेदाभेद करणाऱ्या कोण्या देवाची मलाच गरज नाही? त्यासाठी कोणा व्यक्तीशी , संस्थेशी, कोणत्या समाजाशी माझे कोणते भांडण नको कोणताही विद्रोह नको …. कारण गरजच नाहीये त्याची. असे नियम कोणीतरी बनवले, आपण ते मानले म्हणून त्याविरुद्ध लढा देणे आले आणि मग पुढचे सारे सुरु झाले ना?

एक स्त्री म्हणून मी स्वत:ला कमी लेखत नाही, त्याचबरोबर एक स्त्री म्हणून मी कोणापेक्षा वरचढ ठरत नाही. मग मी स्त्री म्हणून कोणाकडून कोणत्याही फेवर ची अपेक्षा ठेवत नाही. मी स्वत:ला नाजूक समजत नाही कोणत्याही प्रकारे. माझे खंबीर असणेही जगावेगळे नाही. जसे हळवेपणा हे माझे शस्त्र नाही, तसेच शरीर, मनाचा कणखरपणा हे देखील नाही. माझी समाजाच्या कोणत्याही स्तराशी स्पर्धा नाही, असेल तर फक्त स्वत:शीच. एक माणूस म्हणून जगणे जास्त प्रिय आहे मला. समाजाचा दुसरा भाग म्हणजे पुरुष …. कोणीतरी सुपर पॉवर म्हणून त्यांच्याकडे पाहत नाही मी. मला न मिळणाऱ्या गोष्टींसाठी पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाने शिमगाही मी करत नाही. त्यांनीही माणूस म्हणून जगावे आणि जगू द्यावे इतकी साधी सोपी अपेक्षा आहे माझी. कोणत्याही बाबतीत त्यांच्याशी बरोबरी करावी असे मला कधी वाटत नाही. कारण मी स्वत:ला कमी लेखत नाही . स्त्री म्हणून कोणता फायदा करून घेणे आणि दुसरीकडे स्त्री म्हणून अन्य्याय होतो अशी ओरड करणे ह्या दोन्ही गोष्टी मला वर्ज्य आहेत. या जगाकडे मी पुरुषांनी, त्यांच्या नियमांनी बनलेले जंगल म्हणून पहात नाही. जे नियम मी मानतच नाही ते कोणी बनवले, किंवा ते कसे दांभिकतेकडे झुकणारे आहेत किंवा माझ्यावर कसे अन्य्याय करतात हा प्रश्नच उद्भवत नाही, पर्यायाने मी त्यास सहन करणे, त्या विरुद्ध विद्रोह करणे हे देखील नाही. देव धर्म त्याचे आचरण हे माझे, खरेतर प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे त्याचे  कोणी अवडंबर माजवत असेल तर ते मी मानत नाही. म्हणजेच पर्यायाने मी सहन काही करत नाही. किंवा तसे करण्याची वेळ स्वत:वर येऊ देत नाही.

Sunday, November 29, 2015

पासवर्ड

रोजच्या वापरातल्या अनेक गोष्टींना पासवर्ड असतो तसा तो आपल्या जगण्याला, आपल्या आयुष्यालाही असतो. प्रत्येक टप्प्यावर तो वापरल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर " जाऊ दे, सोडून दे" किंवा "शांत रहा", "काळजी नको", किंवा "खूष रहा", "झालं ते झालं" असे अनेक.... जशी व्यक्ती तसा हा परवलीचा शब्द.
बाकी पासवर्ड विसरले जातात, तेंव्हा ते नव्याने मिळवण्याची सोय असते. पण आयुष्याचे पासवर्डस ना विसरण्याची सोय, ना परत दुसरा मिळवण्याची सोय.
ते विसरले तर पदोपदी अडेल, पदोपदी ठेच लागेल, आयुष्याचे परिमाणच बदलून जाईल.
अनेकदा सिंगल साईन ऑन असावे तसे एखाद्या नात्यात हा परवलीचा शब्द बाकी अनेक गोष्टी करतो. म्हणजे एखादवेळी "जाऊदे, सोडून दे" म्हणत सहज मनाने नात्यात एखादी गोष्ट विसरली, माफ करून टाकली तर अनेकदा पुढचा प्रवास सोपा सुकर होतो.

अनेकदा दुसऱ्यांनी वापरलेला असा एखादा परवलीचा शब्द जादू घडवतो. "मी आहे, काळजी करू नकोस". अनेकदा योग्य व्यक्तीकडून आलेला हा दिलासा जादू घडवतो. मनातून सारा भार हलका होतो आणि पंखात बळ येतं.

पासवर्ड ला जशी स्ट्रेन्थ असते तशी ती आयुष्याच्या पासवर्डला देखील असते. नुसती असतेच असे नाही तरी सकारात्त्मक किंवा नकारात्त्मक अशा परिणामासह ती असते. वर उल्लेखलेले परवलीचे शब्द जसे आयुष्य सोपे, सुकर, आनंदी करू पाहतात, तर "नाही म्हणजे नाही" , " मीच का?", "माझ्या नशिबातच नाही". सारे नकारात्मक प्रवाह असे परवलीचे शब्द निर्माण करत राहतात. दरवाजे बंद करायचे काम ते करतात. प्रत्येक वेळी त्यांच्या वापरासोबत आयुष्य त्याची लवचिकता हरवून बसते, सुखाचे क्षण पाहणे विसरते.

शब्दात परिणाम करण्याची खूप मोठी ताकद असते हे खरेच, स्वत:साठी किंवा अनेकदा दुसऱ्या व्यक्तींसाठी कोणते असे परवलीची शब्द वापरायचे हे शेवटी आपल्या हाती.

Monday, August 3, 2015

करार"मनाली, तू जाऊ नकोस. थोडा वेळ इथेच थांब. आता माझे काही खरे नाही"…फार प्रयासाने वंदना ताईंच्या तोंडून उमटलेले शब्द.
"आई, असं म्हणू नका, इथेच आहे मी, नाही जात कुठे, चैतन्य येतीलच आता, आम्ही दोघे तुमच्या जवळच आहोत"
"बस, इथे माझ्या जवळ. तुझ्याशी बोलायचे आहे."
"आई, फार दम लागतोय, नका ना बोलू काही, बऱ्या व्हाल. मग बोलू, चैतन्य डॉक्टरांशी बोलायलाच गेले आहेत. सारे ठीक होईल. शांत पडून रहा तुम्ही प्लीज"
"नाही ग फार वेळ नाही आता. चैतन्याच्या बाबांच्या माघारी सारे सांभाळले, कामाचा व्याप सांभाळला, त्याला शिकवून मोठा केला, त्याने होता तो कामाचा पसारा अजून मोठा केला, तुमचे लग्न पहिले, तुझ्यासारखी गुणी सून मिळाली, नातवंडाचे तोंड नाही बघायला मिळणार आता. चैतन्य थोडा तापट आहे, चिडतो सतत पण सरळ आहे मनाने, त्याला थोडं सांभाळ, सुखाचा संसार करा." हे बोलणेच त्यांच्यासाठी इतके जड जात होते, इतके अस्पष्ट होते पण सवयीने मनालीस आता ते समजले.

असे म्हणत वंदनाताईनी मनालीचा हात हाती घेतला, डोळे शांत मिटून घेतले  … तिला काहीतरी विचित्र जाणवले . तिने आई आई अशा हाका मारल्या. प्रतिसाद शून्य. तिने हॉस्पिटलच्या नर्सला हाक मारल्या, ती आली.  मनालीने तिला डॉक्टरांना बोलवायला सांगितले. डॉक्टर आणि चैतन्य धावतच आले पण सारे काही संपलेले होते. पटापट सारा गोतावळा जमा झाला. नातेवाईक, धंद्यातील माणसे, कामगार वर्ग सारी जमा झाली. वंदनाताईंचे अंत्यसंस्कार पार पडले. घरात मनाली, चैतन्य, त्याचे मामा मामी आणि एक मावशी इतकेच लोक उरले. 

वंदनाताई गेले वर्षभर घरात अर्धांग वायूच्या झटक्याने अंथरुणाला खिळून होत्या. वडील गेले तेंव्हा चैतन्य फक्त दोन वर्षाचा होता. त्यांच्या माघारी त्यांचा व्यवसाय वंदना ताईंनी मोठ्या हिमतीने सांभाळला होता. एक तीन मजली लग्नाचे कार्यालय आणि त्याचा सारा पसारा. एकंदरीतच असा व्याप एकट्या बाई माणसाने सांभाळणे सोपे नसतेच. चैतन्यला वाढवत त्यांनी मात्र ते केले. एक नावाजलेले आणि उत्तम असे शहरातील कार्यालय हा लौकिक नुसताच टिकवला नाही तर तो वाढवला देखील. चैतन्य हेच पहात मोठा झाला, त्याने शाळा संपता संपता तिथे जाऊन आईच्या हाताखाली व्यवसायाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने पूर्णवेळ याच कामात शिरायचे ठरवले. त्यानेही तोच नावलौकिक कायम ठेवला. शिवाय जवळच एक नविन थोडे लहान पण आधुनिक असे कार्यालय ही सुरु केले. वंदनाताई आपल्या या कर्तृत्त्ववान लेकावर खुश होत्या. आता त्यांनी व्यवसायात लक्ष घालणे कमी केले होते. त्याचे दोनाचे चार हात झाले आणि एखाद्या नातवंडाचे तोंड पहिले ती त्या राम म्हणायला मोकळ्या असे त्या म्हणू लागल्या होत्या.

त्यानुसार त्यांनी चैतन्यला सुचवून पहिले होते. "बाबा रे, तू पसंत केली असलीस तर तसे सांग" असेही सांगून झाले होते. तो मात्र लग्नाचे नाव घेत नव्हता. म्हणजे तसे विचार त्याच्या डोक्यातच आले नव्हते कधी. कॉलेजमध्ये सुद्धा कोणती मुलगी फार आवडली वगैरे असे वाटले नव्हते. फक्त आई म्हणते म्हणून लग्न करावे हे त्याला फारसे पसंत नव्हते. म्हणजे तो तसा स्त्री द्वेष्टा होता असे नाही पण नाही वाटले कधी हे खरे.
त्यातच वंदनाताईंना हृदयविकाराचा एक झटका येऊन गेला. आता मात्र त्यांनी चैतन्यच्या मागे लग्न कर असा धोशा लावला. त्यालाही आई कडे कोणीतरी पहाणारे हवे अशी गरज वाटू लागली होती पण इच्छा नसताना लग्न करावे हे त्याला मान्य नव्हते. तशी त्याने इच्छा दाखवली असती तर अनुरूप आणि सधन, चांगल्या घरातील मुलींची काही कमी नव्हती.

अशातच एक दिवस त्याच्या डोक्यात एक विचार चमकला.  त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणारी मनाली, दिसायला चांगली, बी. कॉम. झालेली. याच्या दोन्ही कार्यालयांचे अकौण्ट्स पाहणारी. कामात चोख. घरी फक्त आई आणि ती. काम करत शिक्षण पूर्ण केलेली. आईचा भार घेणाऱ्या मुलाशीच लग्न करेन म्हणत तिनेही आतापर्यंत लग्न टाळले होते. म्हणजे तिला ते नको होते असे नव्हे, पण नाही झाले हे खरे, जवळपास वयाची सत्तावीस वर्षे ओलांडली तरीही.

एक दिवस तिच्याशी कामाबद्दल बोलत असताना त्याच्या डोक्यात विचार चमकला हिच्याशी लग्नाचा. तशी थोडी माहिती त्याला होतीच. गेले दोन वर्ष तो तिला काम करताना पहात होताच. शांत सुशील अशी साधी मुलगी होती ती. त्याने बाकी माहिती ऑफिसमधील सर्वात जुन्या अशा साठेकाकांकडून मिळवली आणि एके दिवशी तिला बोलावले एक जगावेगळा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवण्यासाठी.
"सर, साठे काकांनी सांगितले तुम्हाला माझ्याशी बोलायचे आहे म्हणून"
"हो… बसा, मला थोडे महत्त्वाचे आणि खाजगी बोलायचे आहे तुमच्याशी. साठे काकांनी मला तुमच्याबद्दल सांगितले, आईची जबाबदारी आहे म्हणून तुम्ही आजपर्यंत लग्न केलेले नाहीत हे खरे आहे ना? जर कोणी तुमच्या आईची नीट जबाबदारी घेतली तर तुम्ही लग्नाला तयार व्हाल का?
"म्हणजे … नाही तसं … म्हणजे असे लगेच काय सांगणार, बाकी काहीच माहित नसताना?"
"सांगतो, मला लग्नाचे नाटक करेल अशी मुलगी हवी आहे, आईच्या इच्छेखातर. तुम्हाला माहित आहे आई आता खूप थकली आहे आणि तिला माझे लग्न झालेले पहायचे आहे. पण मला लग्न करायची इच्छा नाही."
"मग तुम्ही हे मला का सांगताय? "
"तुम्ही यात मला मदत कराल असे वाटले म्हणून"
"शांतपणे ऐकून घ्या. एक करार करून आपले चार चौघांसारखे लग्न लागेल. जगाच्या दृष्टीने ते लग्न असेल पण प्रत्यक्षात आपले नाते नवरा बायकोचे असणार नाही. मी एक वन बेडरूम किचनचे घर तुमच्या नावे करेन. तिथे तुमची आई राहू शकेल. तुमच्या आईची जबाबदारी घेण्यासाठी एक पूर्णवेळ बाई ठेवली जाईल. लग्नानंतर तुम्ही ऑफिसमध्ये तुमची इच्छा असल्यास येऊन काम करू शकाल पण घर आणि आईला सून म्हणून नीट सांभाळणे हे तुमचे मुख्य काम राहील. तुमचा पगार तसाच चालू राहील. त्याचप्रमाणे तुमच्या आईच्या देखभालीचा, औषधपाण्याचा सर्व खर्च मी करेन. हे सर्व नाटक  माझी आई असे पर्यंत चालू राहील, नंतर आपण रितसर घटस्फोट घेऊ जेणेकरून या लग्न बंधनातून तुम्ही मुक्त होऊ शकाल. नंतर तुम्ही इच्छा असल्यास आजच्या सारख्या पुन्हा ऑफिस मध्ये काम करणे सुरु करू शकाल. तुमच्या नावे केलेले घर तुमचेच राहील, आपला करार मात्र संपेल"
" काय बोलताय तुम्ही हे सर, तुम्ही तुमच्या आईला फसवणार इतक्या मोठ्या गोष्टीत आणि त्यात मी ही सहभागी व्हावे असे तुमचे म्हणणे आहे? मला नाही जमणार ते, माफ करा मला"
"हे पहा मनाली, नीट विचार करून तुम्ही मला निर्णय कळवला तरी चालेल, घाई नाही"
"नाही जमणार मला, हवे तर मी आत्ताच ही नोकरी सोडते"
"नाही त्याची गरज नाही, जे बोलणे झाले ते आपल्या दोघातच राहील, तुमच्या नाही म्हणण्याचा परिणाम तुमच्या या नोकरीवर होणार नाही याची खात्री बाळगा."

ती त्याच्या केबिन मधून बाहेर पडली. पुन्हा जाऊन आपल्या कामाला लागली. इतका विचित्र प्रस्ताव ऐकून, कामात लक्ष लागणे कठीणच होते. थोड्या वेळाने डोके भणभणायला लागते. ऑफिस मधल्या साठेकाकांची परवानगी घेऊन ती घरी निघून गेली.

इकडे साठेकाका चैतन्यने मनालीची चौकशी का केली असेल किंवा त्यांनंतर त्या दोघांच्यात नक्की काय बोलणे झाले असेल या विचारात पडले. पण इतकी वर्षे याच ठिकाणी काम करून ते जणू घरच्यासारखेच झाले होते. त्यामुळे वंदनाताईंना हे जाऊन सांगणे त्यांना योग्य वाटले. आपल्या मुलाने कोणामुलीची अशी चौकशी केली या विचारानेच त्या सुखावल्या. त्यांनी साठे काकांना तिची लग्नाच्या दृष्टीने चौकशी करावयास सांगितली. दोनचार दिवसात त्यांच्याकडून सारी माहिती मिळाल्यावर आणि एकंदरीत मनाली चांगली मुलगी आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी चैतन्यकडे हा विषय काढला, चैतन्य आधी चमकला, आईकडून हे ऐकून, पण सावरला देखील पटकन आणि आई मला चालेल जर तिचा होकार असेल तर असे म्हणून मोकळा झाला. वंदनाताई इतक्या खुश झाल्या. कोणी मुलीने असेच नाही म्हणावे असे काय कारण असू शकले असते चैतन्यमध्ये. कोणीही डोळे झाकून लग्न करून द्यावे आपल्या मुलीचे असे सारे.

त्यांनी साठे काकांना सांगून तिच्या आईस बोलावून घेतले, आणि चैतन्यसाठी तिला मागणी घातली. भांबावून गेलेल्या आईने घरी जाऊन मनालीस हे सारे सांगितले पण मनातून त्याही खूप खुश झाल्या होत्याच. "नशीब काढलेस पोरी" असे म्हणत राहिल्या. मनालीने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. दुसरे दिवशी ऑफिसमध्ये पोचल्यावर तडक चैतन्यच्या केबिनमध्ये शिरली.
“मी समजत होते की त्यादिवशी मी नाही सांगितल्यावर आपले लग्न हा विषय संपला असेल, पण तुम्ही तो अशा रितीने पुढे नेणार हे माहित असते तर मी त्या दिवसानंतर पुन्हा इथे कामाला आलेच नसते. का केलंत असे तुम्ही? तुम्हाला माणसे म्हणजे काय खेळणी वाटतात का? खेळलो आणि टाकून दिली?"
"हे पहा, माझ्याही दृष्टीने त्या दिवशीच तो विषय संपला होता. पण कसे कोण जाणे हे सारे घरी आईला कळले आणि तिने हे सारे केले. पण आजही माझा प्रस्ताव कायम आहे. तिच्या आनंदासाठी मी लग्न करायला तयार आहे. एक नाटक करायला तयार आहे. कोणतीही भावनिक, शारीरक गुंतवणूक तुमच्या किंवा माझ्याकडून असणार नाही, करार असेल फक्त एक आणि ज्यासाठी एक उत्तम मोबदला मी देऊ करत आहे तुम्हाला. आईच्या मनासारखे लग्न होईल, तुम्ही घरी याल, एका सुनेसारखे तिच्याशी वागाल, घरी काम करायला पुरेसे नोकर आहेत, तुमच्यावर तसा काही भार पडणार नाही. मोबदल्यात ठरल्यासारख्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आईच्या नंतर आपला हा करार संपुष्टात येईल आणि तुम्ही मोकळ्या व्हाल, तुमच्या मनासारखे आयुष्य जगू शकाल."
"हे चुकीचे आहे कोणाच्या भावनांशी असे खेळणे, जर हे तुमच्या आईंना चुकून कळले तर काय वाटेल त्यांना, काय उत्तर द्याल तेंव्हा, मी साऱ्याला कसे तेंव्हा तोंड देऊ. नाही करू शकणार हे मी."
"ठीक आहे"


चैतन्यच्या केबिन मधून बाहेर येताच साठेकाकांनी तिला वंदनाताईंचा निरोप दिला. त्यांनी तिला संध्याकाळी भेटावयास बोलावले होते. आता मात्र ती चक्रावून गेली. हे काय चालू आहे? सगळे मिळून काय आपल्याला या लग्नास भरीस घालणार का? लग्न तरी काय ते निव्वळ एक करार, एक फसवणूक. मी का करू हे सारे? फक्त वंदनाताई म्हणत आहेत म्हणून चैतन्य सरांना लग्न करायचे आहे, मला का गोवलं जातंय या साऱ्यात? घरी आई पण काल त्यांना भेटून आल्यापासून खुश आहे, जणू लग्न होणारच आमचे अशी. साराच गुंता…… आज घरी जाईन तेंव्हा त्यांनाच सांगून टाकावे का चैतन्यसरांच्या या कल्पनेबद्दल. पण नको, आपण लग्न तर नाही करणार आहोत, तर विनाकारण आई मुलामध्ये वाईटपणा का येऊ द्यावा? पण जावे तर लागेलच आज. बघूया नाही कसे म्हणायचे ते. 


संध्याकाळी मनाली वंदनाताईंना भेटायला त्यांच्या घरी गेली. एक करारी मुद्रा असलेली पण शरीराने थोडे थकलेले, साठी पार केलेले व्यक्तीमत्व. पहिल्याच भेटीत कोणावरही चांगला प्रभाव पडेल असे.
"ये ये मनाली, पहिल्यांदाच भेटतो आहोत आपण, चैतन्यने सारा भार उचलल्यापासून माझे ऑफिसमध्ये येणे बंदच होऊन गेले. परवा साठेकाका  म्हणाले मला चैतन्यने त्यांच्या करवी तुझी चौकशी केली, मग मी देखील त्याला विचारले तर त्याचे उत्तर आहे की तू तयार असलीस तर तो लग्नास तयार आहे, म्हणून काल तुझ्या आईस बोलावले होते याबद्दल बोलावयास, त्या बोलल्या का तुझ्याशी?"
"इतके वर्ष मी चैतन्यच्या मागे लागले आहे त्याने लग्न करावे म्हणून, पण तो दाद देत नव्हता, आता अचानक त्याने  म्हणावे, पुढाकार घ्यावा, अशी कोण मुलगी आहे हे पाहावे, तिला जाणून घ्यावे म्हणून तुला आज बोलावून घेतले. काय म्हणणे आहे तुझे? तुला पण पसंत आहे ना चैतन्य? तुम्ही एकमेकांबरोबर काम करताय बरेच दिवस म्हणजे तू त्याला ओळखतेसच, मी वेगळे त्याबद्दल तुला सांगायला नकोच ना?"
"अगं, हो मला मान्य आहे थोडे संकोचल्यासारखे होत असणार तुला, असे अचानक बोलावून मी हे विचारल्यामुळे, पण मी थकले आता, लवकर चैतन्यचे दोनाचे चार हात झालेले पहायचे आहेत. तुला विचार करून उत्तर द्यायचे असल्यास तसे चालेल.  तू तुझ्या आईशी बोल एकदा, त्यांचा विचार काय ते बघ. "

मधेच घरकामाच्या शांताबाई आल्या. त्यांनी समोर दोन प्लेट्स मध्ये अळूवडी, गुलाबजाम आणून दोघींसमोर ठेवले
"घे मनाली संकोचू नकोस"
समोर आलेले दोन्ही आवडीचे पदार्थ आणि सहजगत्या एकातून दुसरा विषय निघत रंगलेल्या गप्पा. वंदनाताईंच्या स्वभावाने एक प्रकारे गारुड केले मनालीच्या मनावर. वय झाले असले तरी स्मरणशक्ती तल्लख होती. जगातील अनेक घडामोडी त्यांना ज्ञात होत्या, उत्तम मराठी साहित्य वाचलेले होते आणि मुख्य म्हणजे विचार प्रगत होते. जवळपास दीड दोन तास अशाच गप्पा झाल्यावर मनाली घरी जायला निघाली. निघताना तिने त्यांना नमस्कार केला, "सुखी राहा मुली" म्हणत त्यांनी तिच्या हाती चांदीची सुरेख गणेशमूर्ती ठेवली. मनाली अजूनच थोडी भारावून गेली.
परंतू सारा वेळ तिच्या डोक्यात एकच विचार "काय करावे"?
"चैतन्यची ऑफर मान्य करावी का नाही. आर्थिकदृष्ट्या ती वाईट नाहीच आहे. दुसरीकडे वंदनाताईंचे म्हातारपण तसेच आपल्या आईचे ही म्हातारपण थोडे सुखाचे होईल. नंतर काय होईल ते होईल."
"नाही, चूक आहे अशी दोघींची आणि आजूबाजूच्या इतर लोकांची फसवणूक करणे."
दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आईकडे विषय काढला. तिला काल वंदना ताईंना त्यांच्या घरी भेटून आल्याचे सांगितले. तिची आई आधीच भारावलेली त्यांच्या घराच्या स्वागताने, वंदना ताईंच्या स्वभावाने. आधी नाही वर ठाम असलेली मनाली पण आता दोन्ही बाजूने विचार करू लागली. आपल्यामुळे कदाचित आई आणि चैतन्यच्या आई दोघींचे शेवटची काही वर्षे सुखासमाधानाची जाणार असली तर काय हरकत आहे असा विचार मूळ धरू लागला. 

शेवटी मनालीने होकार द्यायचे ठरवले. दोन दिवसांनी चैतन्यला त्याचा प्रस्ताव मान्य असल्याचे सांगितले. लग्न शक्य तितक्या साधेपणाने व्हावे अशी तिची इच्छा असल्याचे ही तिने त्यास सांगितले, त्याने ही या विचारास दुजोरा दिला. त्याच्या आईशी या संदर्भात तो स्वत: बोलेल असे ही तिला सांगितले. त्याच प्रमाणे ठरल्या करारानुसार तिला सर्व काही मिळेल आणि मुख्य म्हणजे या कराराबाबत या कानाचे त्या कानास कळणार नाही अशी तिला खात्री पटवून दिली.

चैतन्य लग्नास तयार झाला यानेच वंदनाताई इतक्या सुखावल्या होत्या. त्यामुळे साधेपणाने घरीच लग्न या त्याच्या अटीस ही त्या तयार झाल्या. लग्न जवळच्या मोजक्याच माणसांच्या आशीर्वादाने घरीच पार पडणार असले तरी, मी माझ्या सुनेच्या दागदागिने व साड्या यांची हौस माझ्या इच्छ्ने पुरवणार हे त्यास ठासून सांगितले. तो ही हे काय ते तुम्ही दोघी ठरवा असे म्हणत त्यातून बाजूला झाला.

सर्वात जवळचा दोघांनाही लाभणारा मुहूर्त काढला गेला. लग्नाची तयारी स्वत: वंदनाताई जातीने लक्ष घालून बघत असतात. तुम्ही इतकी छानशी मुलगी देताय, चैतन्य अनेक वर्षे मागे लागून आता लग्नास तयार झाला आहे तेंव्हा आम्हाला सर्व मिळाले अजून काही नको, त्यामुळे लग्नासाठी तुम्ही बाकी काही नको फक्त तुमची मुलगी आणि नारळ आम्हास द्या असे मनालीच्या आईला त्यांनी सांगितले होतेच. अर्थात तिची आईही यथाशक्ती तयारी करतच होती.

सुरुवातीस मनाली थोडी अलिप्त होती. फार मोठे स्वप्न नव्हते तरी असे कोणतेच नाते नसलेले, लग्न व्हावे असाही विचार कधी मनात डोकावला नव्हता. आपण कोणालातरी फसवतो आहे हेच मोठे शल्य तिच्या मनात होते. हळूहळू वंदनाताई आणि आईच्या समाधानासाठी तिने थोडा उत्साह दाखवला आणि तयारीत सहभागी झाली. घराच्या वरच्या मजल्यावरील रचनेत थोडे बदल हवेत म्हणत चैतन्य ने वरच्या मजल्यावरच्या आपल्या बेडरूम मध्ये योग्य ते बदल करत लोकांच्या तर लक्षात येणार नाही पण दोघांच्या राहण्याच्या खोल्या वेगवेगळ्या राहतील अशी सोय करून घेतली. तसा ही हृदयविकाराचा त्रास सुरु झाल्या पासून वंदनाताई वरच्या मजल्यावर जाणे जवळपास बंद झाल्या होत्या.

शेवटी लग्नाचा दिवस उजाडला. लग्न छान पार पाडले. मनाली पिवळ्या साडीत वधुरुपात किती गोड दिसत होती. लग्नाचे तिला गिफ्ट म्हणून तिच्या नवे एक छोटे घर घेऊन तिला देणार असल्याचे त्याने आईला सांगितले होते आणि त्या घरी सध्या तिची आई राहील हे ही सांगितले होतेच. त्यावर त्यांनी, "तू दे तिला हवं तर एखादे घर भेट म्हणून …. पण तिच्या आई तर इथेच आपल्या घरात आपल्या सोबत राहू शकतात" हे ही सुचवून झाले. मुलीच्या सासरी त्यांना राहण्याचे ओझे वाटेल असे जाणवून त्या गप्प बसल्या होत्या. ठरल्याप्रमाणे सारे पार पाडले. 

बघता बघता दिवस पुढे सरकू लागले. मनाली या घरचीच झाली. ऑफिसला येणार नाही आता कधीच हे तिने चैतन्यला सुरुवातीस सांगितले होते. त्याने ही त्यास मान्यता दिली होती. आता तिने घराचा पूर्ण ताबा घेतला होता. वंदनाताई तर अतिशय खुश होत्या तिच्यावर. नवरा बायकोच्या खोट्या नात्याचे नीटसे प्रदर्शन त्यांच्यासमोर करण्यात दोघंही यशस्वी झाले होते. सारे काही आले यांत चैतन्य सकाळी निघताना तिने त्यास दारापर्यंत सोडायला जाणे, त्याच्यासाठी दुपारी जेवणाचा डबा पाठवणे, कधीतरी त्याने तिला एखादी भेटवस्तू आणणे, मधूनच एखादे दिवशी तिने आई कडे जायचे म्हंटल्यावर त्याने स्वत: तिला सोडायला, आणायला जाणे, अगदी रात्री जेवण झाल्यावर त्याने तिला लवकर वर येण्यास सुचवणे…
या साऱ्यात दोघांत कुठेही देखाव्याशिवाय कधीही संवाद नव्हता. हे नाटक आहे याचे सतत ठेवावे लागणारे भान मनालीला थोडे त्रासदायक ठरत होते. कधीतरी होणारे ओझरते स्पर्श, किंवा नाटकाचा भाग म्हणत कधी सर्वांसमक्ष घडवून आणलेले…. त्यांचा असर होत होताच. खऱ्या खुऱ्या बायकोप्रमाणे त्याची सर्व कामे करताना कुठेतरी मनात काहीतरी उमलू पहात होतेच. पण या साऱ्यात चैतन्य निर्विकार होता. त्याला आई खुश आहे एवढेच पुरेसे होते आणि हे नाटक आहे आणि तसेच राहील ही ठाम समजूत होती.
मनाली मात्र अस्वस्थ होऊ लागली. रात्री आपल्या खोलीत येऊन मधले दार लाऊन गादीवर आडवे पडल्यावर शरीर मन अनेक गोष्टींची जाणीव करून देत असत. खूप मोठी नव्हती स्वप्ने तरी लग्न, सहजीवन याविषयी काहीतरी होतेच पूर्वी मनात. आता त्या जगण्याचे नाटक आपणच करून घेतले आहे याबद्दल थोडे वाईट वाटणे हे देखील होतेच. नाटकाचा भाग सोडल्यास चैतन्य तिच्याशी जरासुद्धा बोलत नसे. ही आपली पूर्वीसारखीच नोकरी आहे, फक्त कामाचे स्वरूप थोडे वेगळे हे तिला वारंवार स्वत:ला समजवावे लागत असे. पण ऑफिस मध्ये कारकुनी करणे वेगळे आणि हे रोजचे नाटक करत, ते नाटक असल्याची कोणास पुसटशी शंका देखील न येऊ देणे हे मोठे दिव्य होते. रोज त्यातून जाणे मनालीला हळूहळू थोडे कठीण जात होते. फार अपेक्षा नव्हती तिची, व्यक्ती म्हणून त्याने तिच्याशी थोडा संवाद ठेवावा, ती जे काही या घरासाठी, त्याच्या आईसाठी करत होती त्याची कुठेतरी जाणीव त्याने ठेवावी बस इतकेच. पण चैतन्यच्या दुष्टीने हा फक्त एक करार होता ज्याप्रमाणे तिने हे सारे करणे अपेक्षित होते आणि त्याचा ठरला मोबदला तो तिच्या बँकेत दरमहा जमा करत होता.बाकी त्याने तिच्यासाठी काही करणे त्यात बसत नव्हते. 

अशातच एके दिवशी दुपारी चहा घेत असताना वंदनाताई अस्वस्थ वाटते म्हणाल्या, तिने त्यांना खोलीत जाऊन पडता का असे म्हणेपर्यंत त्या खाली कोसळल्या. शांताबाई आणि तिने मिळून त्यांना उचलून खोलीत आणून ठेवले, डॉक्टरांना बोलावले, चैतन्यला फोन करून हे सांगितले. डॉक्टर आले, त्यांची अवस्था पाहून त्यांनी लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची सोय केली. पुढच्या पंधरा मिनिटात त्या हॉस्पिटलमध्ये पोचल्या, अनेक चाचण्या होऊन निदान झाले. त्यांची डावी बाजू जवळपास ठप्प झाली. बोलणे अस्पष्ट आणि जड झाले. दहा बारा दिवसांनी त्या घरी आल्या. पण परावलंबी होऊनच. दिवसा आणि रात्रीची एक एक नर्स आता घरी वाढली. मनालीवरची जबाबदारी ही. त्यांच्या आजारपणाचे निम्मित पुढे करत तिने आपला वरच्या खोलीतला मुक्काम खालच्या त्यांच्या शेजारच्या खोलीत हलवला. नर्स असतानाही त्यांची अनेक कामे ती आपणहून करत असे. या साऱ्यात तिच्या आणि चैतन्य मधला संवाद अजूनच कमी होत गेला. तो सकाळी निघताना आणि रात्री आल्याबरोबर आईच्या खोलीत जाऊन चौकशी करत असे, थोडावेळ तिथे बसून निघून जात असे. फिजिओशी बोलणे त्याकडून त्यांच्यात सुधारणेसाठी काय करता येईल ते समजावून घेणे, त्यांच्या औषधांविषयी डॉक्टरांशी बोलणे, दर आठवड्याची डॉक्टरांची घरी भेट हे सारे बघणे ती करत असे. यातच सतत त्यांना बघायला, भेटायला येणाऱ्यांची सतत वर्दळ असे. शांताबाई आणि ती मिळून सारे पार पाडत. सारे करण्यात खरे तर मनाली थकून जाई. ती सासुबाईंचे किती प्रेमाने आणि निगुतीने करते हे जवळपास सर्व जवळच्या नातेवाईकांनी बोलून दाखवले. जिथून अपेक्षा होती तिथे मात्र याचा अभाव होता. त्याला आईची काळजी होती, पण मनाली बद्दल, ती करत असलेल्या सारया कामाबद्दल मात्र त्याने कधी काही मत व्यक्त केले नाही. 

हळूहळू या गोष्टी ही स्थिरावल्या. म्हणावी तशी सुधारणा वंदना ताईंच्या प्रकृतीत पडेना. लोकांचा राबता थोडा कमी झाला. परंतू मनाली मात्र वंदनाताईंच्या शुश्रूषेत तशीच गुंतलेली राहिली. राहून राहून चैतन्यच्या कोरडेपणाचे तिला आश्चर्य वाटत असे. तिनेही आता कोणती अपेक्षा त्याकडून ठेवणे बंद केले. वंदना ताईंच्या बद्दल वाटणाऱ्या आत्मीयतेतून आपण हे करत आहोत, लग्नानंतरच्या पहिल्या वर्षात त्यांनी जी माया लावली, जे कोड कौतुक केले त्यापायी हे सारे आपण त्यांच्यासाठी करायला हवे. हा एक विचार मनात ठेवून ती राबत राहिली. त्यांचे सारे करत राहिली. 

बघता बघता वर्ष सरले. सुधारणा म्हणावी तशी नव्हती पण प्रकृती खालावत नाहीये हे ही काही कमी नव्हते. एके दिवशी पहाटे नर्स तिला उठवायला आली, वंदना ताईंना पुन्हा एकदा हृदयविकाराचा झटका आला होता, त्यांना तसेच गाडीत घालून चैतन्यने हॉस्पिटलमध्ये नेले. ताबडतोब योग्य ते उपचार सुरु झाले. पहिले तीन दिवस आय सी यू मध्ये ठेवून सुधारणा पाहून त्यांना हॉस्पिटलच्या एका सुसज्ज अशा रूम मध्ये हलवले. अजून दोन दिवस इथे ठेवुन मग घरी पाठवण्याबाबत निर्णय घेऊ असे डॉक्टर म्हणत होते.
त्यातच हे असे घडले आणि सारा खेळ संपला. वंदनाताईंचे दिवस पार पडले. घरात शेवटी त्यांचे भाऊ भावजय आणि एक धाकटी बहिण होते. आज सकाळी ते तिघेही निघणार होते सकाळच्या नाश्त्यानंतर. टेबलपाशी ते तिघे, चैतन्य आणि मनाली होते. शांताबाई गरम थालीपीठे करून वाढत होत्या.
"चैतन्य, झाले ते वाईट, शेवटी आपले माणूस आपल्याला कायमचे हवे असतेच, पण त्या अंथरुणास खिळून त्यांचे हाल होण्यापेक्षा सुटका झाली हे ठीक झाले." इति मामी
"मनाली, पोटची मुलगी करणार नाही, इतके तू ताईचे प्रेमाने आणि निगुतीने केलेस, आम्हाला तुझे खरंच खूप कौतुक वाटते" -सुधामावशी
"हो रे चैतन्य, खूप केले पोरीने. गेली दोन अडीच वर्षे सारे हसतमुखाने पार पाडते आहे. आता जरा तू तिच्यासाठी वेळ काढ. चार दिवस काम बंद ठेऊन तिला कुठेतरी फिरायला घेऊन जा. लोक काय म्हणतील असा विचार देखील मनात आणू नकोस. चार दिवस तिला तिच्या आईकडे शांतपणे जाऊन राहू दे" मामी
"हो” चैतन्य. मनाली निर्विकार. गेले पंधरा दिवस विचारांचे काहूर माजले होते. पुढे काय? करार संपला होता. चैतन्यचे काम झाले होते त्याला जसे हवे तसे. तिच्या इथे राहण्याचे तसेही आता काही प्रयोजन नव्हते.
"हो, आई पण मला चार दिवस राहायला बोलावते आहे, मी जाणार आहे तिच्याकडे राहायला" एवढे बोलून मनाली उठते, त्या तिघांच्या निघण्याची पुढील व्यवस्था पाहायला. थोड्याच वेळात ड्रायव्हर त्या तिघांना सोडायला रेल्वे स्टेशन कडे निघतो. शांताबाई घर कामात अडकतात. तेवढ्यात चैतन्य तिला तुझ्याशी काही बोलायचे आहे म्हणतो. ठीक आहे, माझ्या खोलीत बोलूया असे म्हणून ती तिच्या खोलीत जाते.तिच्या मागोमाग तो खोलीत येतो. 

"मनाली, तू कुठे जाण्याची गरज नाहीये. तू इथे राहू शकतेस माझी बायको म्हणून पूर्वीसारखीच"
"पूर्वी सारखी म्हणजे कशी चैतन्य? आपला करार आई गेल्या त्यादिवशीच संपला आहे, आता माझे इथे राहण्याचे काही प्रयोजन नाही"
"हो पण आता चार लोकांना काय सांगू मी, आईशी खोटे वागलो ते, आजही मला लग्न, संसार याचे आकर्षण नाही, कदाचित ती माझी गरज नाही, पण कोणतेही नाते नसलेली दोन माणसे असे आपण एकत्र राहू शकतो"
"नाही ते शक्य नाही, करारामुळे मी या घरात आले, आता तो संपला, मी जायला हवे. तुम्हाला लोकांची इतकी पर्वा होती तर आधीच विचार करायला हवा होतात. इतके वर्षात तुम्ही माझ्याशी कामाशिवाय किंवा नाटकाशिवाय काही बोलला नाहीत. कारारापलीकडे एक मन होते मला. तुमच्या दृष्टीने मी काम करत होते, तुम्ही मोबदला देत होतात, बस्स इतकंच होते सारे, त्यापलीकडचे तुम्ही कधी पाहूच शकला नाहीत. आईंच्या मायने मला इथे खिळवून ठेवले होते. अनेकदा त्रास झाला त्यांच्याशी हे लग्न संसाराचे खोटे नाटक करण्याचा, अनेकदा सारे त्यांना खरे सांगून त्यांची माफी मागावी असे मनापासून वाटले. पण त्यांना आणि पर्यायाने आपल्याला होणाऱ्या त्रासाचा विचार करून मी गप्प बसले."
असे म्हणत ती कपाट उघडते, त्यातून पासबुक आणि चेकबुक बाहेर काढते, एका चेकवर सही करून दोन्ही त्याच्या हाती देते. तो प्रश्नार्थक चेहेऱ्याने पहात राहतो.
लग्नात तुम्ही दिलेले सर्व दागिने, इतर सर्व गोष्टी या कपाटात आहेत. तुम्ही मला पगार म्हणून देत असलेल्या रकमेतून माझ्या आईच्या खर्चाची रक्कम वजा जाता शिल्लक रक्कम तुम्हाला परत करत आहे. इथल्या कोणत्याच गोष्टीची मला गरज नाही. जी माया, प्रेम मला तुमच्या आईकडून मिळाले, जे समाधान त्यांना आपल्या नाटकातून मिळाले त्याची तुलना कोणत्याही मोबदल्याशी नाही होऊ शकणार. करारापोटी केलेल्याचा चार चांगल्या शब्दांचा मोबदला त्या त्या वेळी मिळाला असता तर बरे वाटले असते कदाचित. करार होता हे खरे, तुम्ही तो पाळण्यात कोणतीही कसूर केली नाहीत हेही खरे, पण त्यापलीकडे माणूस म्हणून, एक स्त्री म्हणून काही भावना आहेत मला. नकळत या नाटकातून तुमच्यात गुंतू लागले होते मी हे कधी तुमच्या लक्षात आले होते? आईंच्या मायने गुंतवून ठेवले होते मला हे कधी कळले होते तुम्हाला? तुम्हाला फक्त व्यवहार कळतो, आज त्याच व्यवहाराने मला इथे राहा म्हणत आहात कदाचित. पण मी नाही राहू शकणार. तुम्हाला लग्न, नाते, संसार याबद्दल काहीच वाटत नाही हे मी समजू शकते, आणि तसा काही वाटावे असा माझा आग्रहही नाही, पण मी इथे नाही राहू शकणार"
"ठरल्याप्रमाणे आपण घटस्फोट घेणे श्रेयस्कर. तुम्ही लग्नात माझ्या नावे केलेले माझी आई राहत असलेले घरही मला नको आहे, ते कागदोपत्री तुम्हाला मी कसे परत करायचे हे एकदा तुमच्या वकिलांना विचारून घ्या. आज मी दुपारी इथून जाणार आहे. शांताबाईंना सर्व सूचना दिलेल्या आहेत. ह्या घराच्या कपाटांच्या किल्ल्या. सांभाळा स्वत:ला."
असे बोलून मनाली खोलीतून बाहेर पडते, चकित होऊन चैतन्य तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात राहतो.

Monday, July 27, 2015

उमजते तुला......

माझ्या भावनांनी गढूळलेल्या
डोळ्यांतले प्रश्न कळतात तुला
उत्तर मात्र देत नाहीस ।।


माझ्या निरोपाच्या आवाजातील
कातरता उमजते तुला
मागे वळून मात्र पहात नाहीस ।।


माझ्या काहुरल्या मनाची
घालमेल समजते तुला
तुझ्या व्यथा मात्र सांगत नाहीस ।।


माझ्या बाहेर न पडलेल्या हाकेची
आर्तता जाणवते तुला
परत न जाण्यासाठी मात्र येत नाहीस ।।

-अनघा 

Saturday, June 13, 2015

चौथे पाऊल...

पुन्हा जून महिन्याचा दुसरा शनिवार. अनेक कारणांनी या दिवसाची चाहूल बऱ्याच आधी लागते. त्यातलंच एक महत्त्वाचे म्हणजे या ब्लॉग ला पूर्ण होत असणारी ४ वर्षे. या निमित्ताने  मी स्वत:लाच दिलेली एक संधी मागे वळून पाहण्याची. तशी लौकिक अर्थाने मागे वळून पाहणे मला फारसे मान्य नसले तरी. 


एखाद्या निस्रगरम्य ठिकाणी जावे, आणि सारे अवकाश फोटोत बंदिस्त करण्याच्या नादात त्यास डोळे भरून पाहणे, त्यास डोळ्यात साठवून घेणेच राहून जावे, तसेच काहीसे होऊ लागले होते माझे लिखाणाबाबत. प्रत्येक वेगळा अनुभव जगताना डोक्यात एकाच विचार "आता यास शब्दबद्ध कसे करू? लेख लिहू, गोष्ट म्हणून मांडू की कवितेच्या रुपात समोर ठेवली तर चांगली वाटेल…" 
हा सारा खेळ जगण्याचा आनंद हिरावुन घेऊ लागला. या वारीच्या प्रत्येकाच्या नशिबी कधी ना कधी हे आले असेल आणि त्या जाणीवेने लिखाणास खीळ बसली असेल. मला ती फारच आधी होत आहे तरिही. असं जगणं सतत कशात तरी बंदिस्त नाही करून घ्यायचं मला. अनुभवांना शब्दबद्ध करणे हि त्या अनुभवातून गेल्यानंतर आलेल्या समृद्धपणाचे त्याला जगापुढे मांडण्याचे एक साधन असावे. माझ्या जगण्याचे, अनुभवांचे ते माध्यम नक्कीच नसावे. जगण्याची एक आनंदमयी, समृद्ध वाट चालताना हा विचार  आला हे सोन्याहून पिवळे. 

याचा अर्थ या व्यक्त होण्याला, अनुभव जगासमोर ठेवण्याला मी कमी लेखते आहे का तर नक्कीच नाही. पण मला सध्याच्या स्थितीत हे जगणे, हे आयुष्यातील अनवट वाटेवरून चालणे इतके हवेहवेसे आहे, इतके त्याने आयुष्य व्यापून टाकले आहे की त्यापुढे इतर कोणतेच विचार मनात डोकावत नाहीत. कधी कधी जगणे सुद्धा मुरावे लागते नीट. नेमके तेच मी करू पाहते आहे. आणि त्या पायी अनुभव, जगणे, जाणिवा यांचे शब्दबद्ध होणे थोडे थांबले तरी मला चालणार आहे. 

जेमतेम १६ पोस्ट्स गेल्या वर्षभरात या ब्लॉगवर. ३ लोकसत्ता मध्ये १ कथा श्री व सौ. या मासिकात. एवढीच जमेची बाजू गात वर्षातील आणि पुढे काय हे माहित नसताना मी साजरा करत असलेला हा                                                                                   "मी…… माझे …… मला" 

चा हा चौथा वाढदिवस. आता लिखाण थांबलेले आहे याचा अर्थ ते कायम साठी तसेच गोठून जाईल असे नव्हे …. त्याने आजवर व्यक्त होण्यास केलेली मदत गौण ठरत नाही. जगणे समृध्द केले हे मी विसरत नाही  आणि म्हणूनच या ब्लॉगला लक्ष लक्ष शुभेच्छा !!!

Tuesday, May 26, 2015

मितवा - भाग २

प्रिय मितवा,

तसा तुझ्यासोबतचा संवाद माझ्या मनास नवा नाही, इतका तू मनात वसतोस, प्रत्येक क्षण असतो तुझ्यासह जगण्याचा, आनंदाचा! तुझ्यासोबत घालवलेले क्षण ही फक्त त्या क्षणांची गोष्ट नसते रे.... पुन्हा पुन्हा माझ्या मनात दरवळणारी कुपी असते, आनंद, सुख प्रेमरूपी अत्तराची. आज त्यात थोडा बदल करत थोडा प्रवास अव्यक्ताकडून व्यक्त होण्याचा. थोडे हे अत्तर कुपीतून बाहेर दरवळू देण्याचा. मनात शिरता शिरता कसा तू अवघे मन व्यापून उरलास ते कळलेच नाही. मनाचा काही क्षणांचा विरंगुळा म्हणत सुरु झालेले मनातले हे गूज कसे आयुष्यभरासाठीचा आनंद ठेवा बनून गेले ते माझे मलाही समजले नाही. चराचरात देव असतो म्हणतात त्याप्रमाणे माझ्या मनाच्या कानाकोपऱ्यात तू असतोस. मनाच्या सर्व दिशा व्यापूनही दशांगुळे उरतोस असा तू माझा मितवा. 

तुला लिहिलेल्या कवितांचा हा पुढील भाग. कारण हा कवितांरुपी संवाद हे माझे तुझ्यासाठीचे मनोगत असले तरी ते मनातल्या मनातच आता न राहू द्यायचे ठरवल्याने सर्वांपर्यंत पोचवलेले. हे लिखाण म्हणजे माझे स्वत:शीच व्यक्त होणे, माझीच क्षितिजे विस्तारणे, माझे फुलणे, उमलणे. तुझ्या सोबतच्या या संवादाने काय दिले तर एक स्वप्नसखा, एक स्वप्नवत आयुष्य, आयुष्याकडे पाहण्याची, ते शक्य तितक्या आनंदाने जगण्यासाठीची नवी दृष्टी जी मलाच नव्याने गवसू पाहत आहे. मनातली तुझ्यासोबतची मी म्हणजे जणू "फिरुनी नवी जन्मेन मी" असं म्हणत जिचा पुनर्जन्म झालाय अशी मी.नाते तुझं नी माझे.....

कसं गुंफलं गेलंय 
पौर्णिमा अमावस्येच्या
खेळासारखं नातं तुझं नी माझं
तुझी भेट जणू रात पुनवेची
मातलेल्या चांदव्याची 
प्रेमास उधाणाची

सकाळ होताच तू मावळलेला
दिवस कलेकलेने मला विझवणारा

दाही दिशांतून काळोखणाऱ्या  
अवसेकडे पुन्हापुन्हा नेणारा

मनाच्या अवकाशात गच्च
अंधारून आले की मग
कुठुनसा तू मनात हसणारा
मी येतोय असे सांगणारा

कलेकलेने आस लावणारा
पौर्णिमा अमावस्येचा खेळ
तुझं नी माझे नाते
नित्य फुलवत ठेवणारा


तुझ्या आठवणी......
अशा कातर वेळी 
खिडकीशी उभी मी 
पहात राहते क्षितिजापर्यंत 
पोहोचलेले हे गाव

नजरेच्या टप्प्यात अनेक 
ओळखीच्या जागा 
तिथपर्यंत नेतात मला 
आठवणींच्या पायवाटा

आठवणी तरी कशा?
नुसत्याच सैरभैर 
कोणाला आवतण देते कोण 
कोणाचा हात धरून येतं कोण

असाच असतो 
एक एक दिवस त्यांचा 
त्यांच्या साथीने तुझ्यासह 
काही क्षण जगण्याचा

भरभरून जगते मी हे क्षण 
ते माझे आपले असतात 
तुझ्यापेक्षा तुझ्या आठवणीच 
माझी जास्त सोबत करतात

३) अंतर .....
दु:खाची परिभाषा 
अश्रुंचे पूर 
ते पुसणारे हात 
का कितीतरी दूर 

आठवणींचा उमाळा 
वेदनेचे काहूर 
ते ऐकू जाणारे कान 
असती मैलोनमैल दूर 

नजरेची साद 
नयनच आतूर 
प्रतिसाद देणारे डोळे 
आता कितीतरी दूर 

पौर्णिमेची रात्र 
चांदणे टिपूर 
चांदण्यांनी ओंजळ भरणारा 
मात्र चंद्रासारखाच दूर

सहवासाची ओढ 
शब्दांचे काहूर 
समजणारया मनानेही 
का राहावे मनापासून दूर 


४) तुझ्यामुळेच सखया ………
तुझ्यामुळे पसरू लागले मनाचे इंद्रधनू पुन्हा
तुझ्यामुळे ऊमलू लागली गालांवरती कुसुमे पुन्हा

तुझ्यामुळे परतू आले ओठांवरी हास्य पुन्हा
तुझ्यामुळेच गवसू लागले माझ्यातील मी पुन्हा

तुझ्यामुळे लाभला जगण्यास अर्थ पुन्हा
तुझ्यामुळेच जाणला त्यातला मोद पुन्हा

तुझ्यामुळे जागला अंतरीचा भाव पुन्हा
तुझ्यामुळेच दरवळला माझ्यातला गंध पुन्हा

तुझ्यामुळे पसरला मनी चांदणसडा पुन्हा
तुझ्यामुळेच उगवला प्रितीचा चांद पुन्हा

५) तू माझा होता …
तू माझा होता
शब्द मला दुरावले
ओठातून परतले
डोळ्यांतून ओसंडू लागले 

तू माझा होता
मन माझ्याशी भांडले
मला सोडून वेडे
तुझे होऊन राहिले 

तू माझा होता
चंद्राला चांदणे गवसले
प्रीतीच्या सागरावर
ते उधाणू लागले

तू माझा होता
साऱ्या जगाला विसरले
उघड्या मिटल्या डोळ्यांनी
फक्त तुलाच पहिले

तू माझा होता
सारे सारे मिळाले
प्रेमवेड्या मीरेला
जणू कृष्णसखा गवसले

६) इतुकेच मागणे सखया ......
माझं जग माझं जग
म्हणजे तरी काय असावे
तुझ्यापासून सुरू होऊन
तुझ्यापाशीच येऊन थांबावे

स्वप्ने तुझी बघोनी
पहाटेस जाग यावी
स्वप्नातल्या सख्याची
प्रत्यक्ष भेट व्हावी

नको वाटती सुर सनईचे पहाटेे
सुरेल कोकिळाही आता मला न भावे
साद तुझी ऐकण्यास सखया
अखंड मन हे धावे

सहस्र जलधारांसम  प्रेम तुझे लाभावे
भरल्या ओंजळीने माझ्या रिते न कधी व्हावे
आषाढ मेघ बनूनी तू आवेगे बरसावे
शांत क्लांत धरेसम मी तृप्त तृप्त व्हावे

नको तुळशीचे पान, नको गंगेचे जल
हाती हात तुझा असता व्हावा संधीकाल
सारे काही तू देऊनही मागणे तरी ऊरेलच
हा जीव शांत व्हावा सखया तुज पहातच

७) सहजीवन…
तुझे माझे सहजीवन म्हणजे
दोघांनी मांडलेली भातूकली
थोडा खेळ, थोडे भांडण
तरीही तुझ्या माझ्याशिवाय न रंगणारी 

तुझे माझे सहजीवन म्हणजे
विणायला घेतलेली पैठणी जरतारी
वीण जमून आलेली सुबक नक्षी
तुझे माझे अंतरीचे धागे घेऊन विणलेली

तुझे माझे सहजीवन म्हणजे
दारातली सुबक रांगोळी
संगती जुळून आलेली
तुझे माझे रंग घेऊन रेखाटलेली

तुझे माझे सहजीवन म्हणजे
अखंड सुरेल मैफल
सदैव बहारदार रंगलेली
तुझ्या माझ्या सुरांनी सजलेली

या सात कविता म्हणजे माझ्या मनातील त्याच्या सोबतची सप्तपदीच जणू. त्याच्यासोबतचे हे प्रत्येक पाऊल म्हणजे मैत्र, प्रेम, विश्वास, स्वप्ने, सहजीवन,आठवणी आणि एकरूपतेचे एक एक पाऊल त्याच्यासह मी मनात अगदी "ते प्राणनाथ माझे, मी दैवदत्त कांता" असे म्हणत टाकलेले. फक्त आज हा मनमोराचा पिसारा त्याच्या पुरताच न ठेवता या ब्लॉगरुपी मन:पटलावरून सर्वांपर्यंत पोचवलेला. 

सखया जे होते तुझे ते तुलाच अर्पण......