Saturday, May 17, 2014

तुझी सखी ……

वाढदिवशी त्याने  "तुला काय देऊ सांग" असे म्हणावे ....
आपण "एक स्वतः लिहून कविता दे" मला असे आपल्याच नकळत मागावे
त्यानेही ते मनावर घेत आपल्याला कविता भेट द्यावी.
त्यातून नात्याचे आपल्या नात्याचे अनवट रूप जाणवावे ...
आणि ते रूप पुन्हा कवितेचाच आधार घेत आपण त्याच्यापर्यंत पोचवावे
सारेच खूप मोहक .... हवेहवेसे .... आपल्या नात्याइतकेच!प्रत्येक स्त्री थोड्याफार प्रमाणात अशीच असते, किंबहुना असावी. तिच्या या साऱ्या छटा आयुष्याच्या रांगोळीत रंग भरत असाव्यात. प्रत्येक वेळी ते तिच्या जोडीदाराला दिसतात किंवा नाहीतही पण म्हणून तिच्या असं असण्याचं महत्त्व कमी होत नाही. मला अनेक स्त्रियांमध्ये अशी अनेक रूपे दिसतात, आणि ती मला भावतातदेखील. अनेक नाती गुंफताना स्त्रिया यातील अनेक मनमोहक छटा घेवून येतात. कधी त्या वेल बनूनही आधार देतात, कधी त्या त्याच वेलीच्या हक्काने जोडीदाराचा आधार घेण्यात आनंद मानतात. कधी बोलता संवाद साधतात, कधी अबोली होऊन सारे गुज पोहचवतात.कधी निरपेक्ष प्रेमाची पाखरण करतात, 

आज कोणत्याही कारणाशिवाय ही कविता अशा साऱ्याजणींसाठी ज्या सूर, ताल, लय सांभाळत आयुष्याची मैफल सुरेल करतात

कधी झुळुक हलकेच सुखावणारी
कधी मारव्याप्रमाणे कानात रूंजी घालणारी
कधी सोनचाफ्याप्रमाणे दरवळणारी
कधी नदीसारखी खळाळणारी
कधी सागराच्या गाजेसारखी साद देणारी
कधी मंद ज्योतिसारखी तेवणारी अन् तरीही 
तुझ्या मनाचा हरेक कोना ऊजळवून टाकणारी....

कधी प्रसन्न सकाळ तुला भेटणारी 
कधी कातर वेळ उदास करणारी
कधी हुरहूर उगाच जाणवणारी  
कधी पौर्णिमा तुझ्या मनातली 
कधी चांदणफुले अवसेच्या आकाशात  फुलवणारी   
कधी आषाढी बरसात अखंड धारांनी होणारी अन 
तुझ्या तप्त मनास भिजवून शांत करणारी ………. 

इतकी सारी रूपे तिची जाणवतात का रे तुला कधी…… 
इतक्या सारया छटा तिच्या दिसतात का रे तुला कधी………
इतके तुझ्याशी एकरूप होणे उमजते का रे तुला कधी…………

Tuesday, May 6, 2014

तुझ्या आठवणी

अशा कातर वेळी 
खिडकीशी उभी मी 
पहात राहते क्षितिजापर्यंत 
पोहोचलेले हे गाव 

नजरेच्या टप्प्यात अनेक 
ओळखीच्या जागा 
तिथपर्यंत नेतात मला 
आठवणींच्या पायवाटा 

आठवणी तरी कशा ?
नुसत्याच सैरभैर 
कोणाला आवतण देते कोण 
कोणाचा हात धरून येतं कोण 

असाच असतो 
एक एक दिवस त्यांचा 
त्यांच्या साथीने तुझ्यासह 
काही क्षण जगण्याचा 

भरभरून जगते मी हे क्षण 
ते माझे आपले असतात 
तुझ्यापेक्षा तुझ्या आठवणीच 
माझी जास्त सोबत करतात