Showing posts with label नॉस्टॅल्जिक. Show all posts
Showing posts with label नॉस्टॅल्जिक. Show all posts

Wednesday, December 3, 2014

कविता जगताना....... जगण्याची कविता होताना.......

शब्दांच्या प्रेमात असाल, काव्यात आयुष्य जगत असाल तर अनेक कविता मनात घर करून राहिलेल्या असतात. कधी कोणती मन:पटलावर उमटेल आणि तुमचा ताबा घेईल सांगता येत नाही. अशा माझ्या मनात घर केलेल्या कवितांमध्ये शांताबाईंच्या बऱ्याच कविता असतात. शांताबाईंचे नाव घेताच उभे राहते समोर एक सात्विक व्यक्तीमत्व! ठसठशीत गोल कपाळावरचे कुंकू, डोक्यावरून घेतलेला तो साडीचा पदर आणि एक हास्य चेहऱ्यावर.

शांताबाईंच्या कविता, गाणी व लेखन आवडतं याचा अर्थ मी ते सारे वाचले, ऐकले आहे असे मुळीच नाही. पण त्यामुळे होते काय की अनेक कविता प्रथमच वाचल्या, ऐकल्या जातात. प्रथम वाचल्या पासून तिने मनाचा ताबाच घेणे इथपर्यंत चा प्रवास सुद्धा कायम सारखाच नसतो. मनाशी संबंध आला की कशाचाच भरवसा नाही हे एकमेव सत्य. कधी पहिल्याच वाचनात ती कविता इतकी भावेल, कधी एकदा वाचली चांगली वाटली या पुढे जाणार नाही, एखादी एकदा वाचली आवडलीच नाही असेही घडेल. पण प्रत्येक कवितेचे एक ऋण मात्र नक्की असते माझ्यावर. माझ्याही नकळत ती मला घडवते, बदलवते, समृद्ध करते. 

बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा तन्वी थत्ते हिने मला त्यांच्या गाण्यांची "शुभ्र कळ्या मुठभर" दिली होती, जिला कौशल इनामदार यांचे संगीत होते. अनेक सुंदर गाणी त्यात होती. अनेकदा मी ती ऐकली, आवडली देखील. ते कॅसेटचे दिवस होते. यातच  "घर परतीच्या वाटेवरती" हे पण गाणे होते. त्या गाण्याचे असे झाले होते, ऐकले, आवडले पण मनात खोलवर पोहोचले का, आणि तसे असेल तर ते मनाला जाणवले का तर उत्तर नाही असे असले असते. 

पण त्यातला आशय, ते भाव मनात कुठेतरी इतके पक्के झाले होते, कि योग्य वेळी मन:पटलावर ते उमटून येण्यास अजिबात वेळ लागला नाही. सगळे दिवस सारखे नसतात. एखादी गोष्ट मनास कधी कशी गुंतवेल सांगता येत नाही . एके दिवशी रात्री उशिरा मी गाडी चालवत घरी येत होते. खरंच, असतो एखादा मनाला थकवून टाकणारा दिवस, कुठल्याही छोट्याशा गोष्टींनी हळवे होऊ पाहणारे मन आणि या साऱ्यांशी जुळवून घेत असणारी मी. अशावेळी अचानक हेच गाणे आठवावे, त्याने मनाचा पूर्ण ताबा घ्यावा  आणि जीव अजूनच व्याकूळ व्हावा असा तो अनुभव. 

घर परतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे
अंधूक होते नजर आणखी थकलेले पाऊल अडे
घर परतीच्या वाटेवरती पडल्या-झडल्या शीण खुणा
मावळतीच्या किरणांमधुनी क्षण झळझळुनि उठती पुन्हा
घर परतीच्या वाटेवरती पायांवाचून पाय-ठसे
अश्रूंत चाहूल येते कानी एक हुंदका, एक हसे
घर परतीच्या वाटेवरती आभासांचे दाट धुके
सावलीत सावली मिसळते अन्‌ पुटपुटती ओठ मुके
घर परतीच्या वाटेवरती मलूल, वत्सल, सांज उन्हे
कुरवाळीती मज स्‍नेहभराने विसरून माझे लाख गुन्हे

शांताबाईंची अजून एक कविता वाचली आणि नि:शब्द झाले "एकाकी". एक छोटीशी कविता. एकदा वाचून सोडून सुद्धा देईल कोणी अशी. पण नीट वाचली, समजून घेता आली तर दुःखाची खोली दाखवेल अशी. दु:खाचे कायम डोंगारेच पिटले जावेत असे नाही. पण तसे न केल्याने ते नसते असेही नाही. स्त्री- पुरुष या नात्यात सारं काही ठीक दिसत असताना, एकाकीपणातून जाणारी स्त्री. अनेकदा मला असा वाटलंय स्त्रीयांकडे एक वेगळीच दृष्टी असते, नात्यांकडे पाहण्याची, त्यातले असंख्य पदर समजून घेण्याची, त्यातल्या विविध छटांचे भावार्थ लावण्याची. त्यामुळेच अनेकदा तिच्या जोडीदाराच्या दृष्टीने "यात काय विशेष, उगीच काहीही अर्थ लावत बसतेस" अशी प्रतिक्रिया येऊ शकते तेंव्हा तीच स्त्री मोजक्या शब्दात हे दु:ख मांडून जाते. या स्त्रियांना नक्की हवे तरी काय असते हे देवाला सुद्धा कळणार नाही हा सूर अनेकदा लागतो, कानी पडतो. पण खरंच इतकं अवघड असतं का त्यांना समजून घेणे? 

सोबत कोणी नसण्यातून येणारे एकटेपण बरे, ते तुम्हाला संपवत नाही, मनाने उमदे असलात तर एकटेपण एकटे असूनही तुमच्या वाटेस जात नाही. पण सारे काही असूनही जर एकाकीपण वाट्यास आले असेल तर ते तुम्हाला खाऊन टाकते, मिटवून टाकते. स्त्री पुरुष संबंधात फक्त स्त्रीच्याच वाट्याला हे येत असेल असेही नाही, पण एक स्त्री म्हणून मला त्याच्याशी जोडले जाता आले इतकंच. जळणारा जीव कळला कदाचित इतकेच, स्त्रिया अनेकदा जास्त चांगल्या व्यक्त होतात इतकेच. 

ही कविता म्हणजे म्हंटल्या तर चार साध्या ओळी, उमजले तर जन्माचे दु:ख, तरीही त्याचे भांडवल न करता फक्त परिस्थिती समोर ठेवणारे. नात्यात असूनही वेधून टाकणारे एकाकीपण, बिलागणाऱ्या बोटांच्या पलीकडे जाऊन हवा असणारा नात्याचा एक कॅनव्हास, आणि तो मिळत नाहीये ही विफलता. म्हटलं तर हे दु:ख उगाळायला आयुष्य कमी पडेल असे … ते एका "त्वचेमागील एकाकीपण कधी सरते काय " या प्रश्नावर अनुत्तरीत ठेवणे हे फक्त त्यांनाच जमू शकते. 
एकाकी- 
तुझा आणि तुझ्यासाठी 
शब्द सारे खोटे 
खरी फक्त क्वचित कधी 
बिलगणारी बोटे 
तीही बिलगून सुद्धा दूर 
खोल खोल भुयारात 
कण्हणारे सूर. 
दूर देशीच्या ओसाडीत 
भटकणारे पाय 
त्वचेमागील एकाकीपण 
कधी सरते काय?

Wednesday, October 17, 2012

पुन्हा एकदा मला

पुन्हा एकदा मला दिवाळीत किल्ला बनवायचाय

माखल्या हातांनी स्वयंपाक घरात जावून डोकवायचंय

पेरलेले धान्य कधी उगवतं याची वाट पहायचीय

तिथे पहारा देत शिवाजीसह मावळ्यांचे रक्षण करायचय


पुन्हा एकदा भल्या पहाटे उठून पर्वती सर करायचीय

थकून भागून परत येताच फराळाचे ताट फस्त करायचेय

भरल्यापोटी चांदोबा किशोरच्या साथीने परीराज्यात जायचेय

गोष्टी सांगणाऱ्या वेताळाला एकदातरी पकडून ठेवायचंय


पुन्हा एकदा मला आजोळी जायचंय

बस मधून उतरतानाच मामा दिसतो का ते पहायचय

पहाटे चुलीपाशी बसून आजीशी गप्पा मारायच्यात

रात्री जागून अंधारात घाबरले तरी भुतांच्या गप्पा ऐकायच्यात


पुन्हा एकदा मला दफ्तर घेऊन शाळेत जायचय

न येणारी समीकरणे आता सोडवता येतात का पहायचय

चित्रकलेच्या तासाला सुबक चित्रे काढायची आहेत

डब्यातला खाऊ खाण्यासाठी मधल्या सुट्टीची वाट पहायची आहे


येईल का जाता आता बालपणात पुन्हा?

येईल का होता अल्लड आता मला पुन्हा?

येईल का दारी भोलानाथ आता पुन्हा?

मिळेल का सुट्टी तळे साचून आता पुन्हा?

Friday, July 13, 2012

सुखावणारा अनपेक्षित धक्का


शुक्रवारचा दिवस. ऑफिस मध्ये तसाही कामाचा मूड नसतोच. या दिवशी सगळी माणसे, या एका दिवसापुरती वेगळीच वाटू लागतात. सारं जग या दिवशीच कसं इतकं रंगीबेरंगी वाटू लागते हे इतक्या वर्षात कधी मला कळले नाही. फॉरमल्स आणि इनफॉरमल्स मुळे इतका फरक पडतो? पण असं होतं हे मात्र खरं आहे. या दिवशी ऑफिसला जावे असे वाटते, बाहेर हवा खूप छान आहे असे वाटते, एफ. एम. वर या दिवशीच सगळी चांगली गाणी लागतात, रोज नको वाटणारी त्या आर.जे. ची वटवट आज त्रासदायक वाटत नाही. पुढच्या दोन दिवसाच्या सुट्टीची तयारी प्रत्येकाच्या मनात चालू असते. अनेकदा असं घडतं की जर काही प्लान्स नसतील तर सुट्टी जास्त बोअर जाते, तरी तिची मनापासून वाट मात्र पहिली जातेच.

आज शुक्रवार आहे. तो ही लास्ट वर्किंग डे ऑफ द मंथ, अधून मधून प्रत्येकाचं लक्ष आपल्या मोबाईलकडे, बँकेच्या मेसेज साठी. त्यातून आज salary revision ची मेल पण अपेक्षित आहे. सकाळचे  ९  वाजलेत प्रत्येक जण "friday fever" सह ऑफिसमध्ये पोहचतो. आणि ऑफिसमध्ये पोहचल्यावर लक्षात येतं की पूर्ण क्लायंत नेटवर्क  डाऊन आहे. त्यामुळे काही काम होणार नाही. थोडक्यात ऑफिसमध्ये येऊनही काम होणार नाही. एक मोठी टीम. काही जण वैतागतात. लवकर काम संपवून घरी जाण्याचा त्यांचा  बेत धोक्यात आलेला असतो. एखादा नुकताच जॉईन झालेला फ्रेशर्स ग्रुप असतो. त्यांना फरक  पडणार नाहीये. त्यांचे संध्याकाळचे  हार्ड रॉक कॅफे किंवा हाय स्पिरीटस चे प्लान तयार आहेत. वेगवेगळे ग्रुप्स, वेगवेगळ्या फूड-कोर्ट मध्ये जावून येतात. कोणी फक्त चहा, कोणी चहा आणि खाणे, कोणी चहा आणि सिगारेटसाठी बाहेर चक्कर टाकणारा, तर कोणी नुसताच टेरेस वर बसून गप्पा मारणारा. थोडा वेळ जातो. पावसाचे दिवस, त्यामुळे ODC मध्ये परत यावेच लागते. मग आपापल्या डेस्कपाशीच  फक्त खुर्च्या फिरवून गप्पा सुरु आहेत. यात पण अनेक छटा आहेत. दोन तीन जण आपापल्या मशीन्सवर अंग्री बर्डस खेळण्यात मग्न आहेत, काही गाणी ऐकत आहेत. गप्पांच्या ग्रुपमध्ये ही दोन तीन वेगवेगळे ग्रुप आहेत. एका ग्रुपला वाढत्या डॉलरची चिंता आहे, एकाला आज रिलीज होणाऱ्या सिनेमांची. मधूनच कोणालातरी बाहेर पडावं वाटू लागतं, मग तो किंवा ती " ए, चला ना दोन तीन गाड्या काढून लांब पर्यंत फिरून येऊ,  बाहेर किती मस्त हवा आहे. बोअर आहे असं इथे बसून राहणं" चा नारा लावतं. बाकीच्यांवर त्याचा काही परिणाम होत नाही. दोन तीन मुली, त्यांना वीकेंड ला करण्याचा शॉपिंगचे वेध लागलेत  आणि  मी नेहमीप्रमाणे कुमार गंधर्व  ऐकत आहे.

एका ग्रुप कडे लक्ष जातं, ते चर्चा करत आहेत इतिहासावर, मोगल इतिहासावर. वाटलं नव्हतं या मंडळीना या बद्दल फार काही माहित असेल. पण ऐकताना छान वाटत होते. बसतात ना असे अनपेक्षित धक्के. हळू हळू सारे जण या ग्रुपकडे आकर्षित होवू लागतात. इतिहासावरील चर्चा मनोरंजक वाटू लागते. गाडी पानिपतावर पोहचते. आता मी ही मागे वळून या गप्पांमध्ये सामील होते.  एकजण  इतर वेळी ज्याला इतका सिरिअस बोलताना कधी ऐकले नव्हते, खरं तर  तो फारसा कोणाशी बोलतच नाही,  तो बोलतोय ..... बोलण्यात आवेश पण असा  की त्याने जणू याची देही, याची डोळा हे सारे पहिले आहे,  इतिहास जणू तो जगला आहे. असं वाटत होतं की जणू बाबासाहेब पुरंदरेच समोर बसून इतिहास जिवंत करत आहेत.

"पानिपत हा एक निव्वळ पराभव नव्हता तर मराठ्यांसाठी ती एक भळभळती जखम होती. "लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही. विश्वासराव आणि सदाशिवराव या दोन मोत्यांसह २७ सरदार आणि सैन्यासह काफिला मारला" हे वर्णन अंगावर काटा आणणारं त्याने जसच्या तसं सामोर उभे  केले. दुपारपर्यंत लढाईवर मराठ्यांचा ताबा होता पण गणितं चुकली आणि लढाई फिरली . अब्दालीने डाव साधला, रसद रोखली आणि पानिपताची भूमी मराठी रक्ताने न्हाहून गेली. असं असतानाही ज्याच्याकडून पराभव पत्करला त्या अब्दालीने सुद्धा ज्यांच्याबद्दल कौतुकाचे चार शब्द लिहावेत यातच त्यांचे महान योध्येपण सामावले आहे."

टीम मध्ये मराठी न समजणारे पण काही जण आहेत, त्यांना शब्द न शब्द कळत नाहीये पण भावना पोहचत आहेत असं वाटतंय. एककंदरीत  त्याचं अवांतर वाचन खूपच चांगलं आहे याचा अंदाज आलाय. विश्वास पाटलांच्या पानिपतची तर त्याची पारायणे झाली असावीत. ऐकायला छान वाटतंय, अनपेक्षित धक्का आहेच पण तो सुखावणारा आहे. सलग तासभर तो एकटाच बोलतोय आणि एक न एक टीम मेम्बर्स  श्रोते आहेत.  काम होत नाहीये, आणि सोमवारी खूप लोड असणार हा विचार हळूहळू मागे पडत चालला आहे, मोबाईलकडे कोणाचं इतका वेळ लक्ष गेलं नाहीये. मेल्स कोणी चेक करत नाहीये. असं मुळातच सारं काही विसरून जाणं फार कमी वेळा घडतं. श्रवणीय अशा या तासानंतर मनोमन वाटले, वीकेंडची या पेक्षा चांगली सुरुवात नाही असू शकत.

ता. क. (आज जरी शुक्रवार असला तरी ही आजची गोष्ट नाही.)

Thursday, October 20, 2011

आली दिवाळी....


दीपावली ३ दिवसांवर येऊन पोहचली, अजून मी घरात एकही फराळाचा पदार्थ बनवला नाही. काल रात्री उशिरा घरी पोहचले, बिल्डिंग मधे शिरताना सहज वर लक्ष गेलं, एका घरी आकाशकंदील लागला होता, विचार आला अरे बापरे अजुन आपण याचा विचारच केला नाहीये. आता या सार्‍या गोष्टींसाठी वीकेंड ची वाट पाहावी लागणार, किती कामे ठेवली आहेत त्या दोन दिवसांसाठी!

घरात शिरले समोर लक्ष गेलं, आणि चकित झाले, घर उजळून गेलं होतं, टेरेसभर चांदण्या उजळल्या होत्या. छोट्या छोट्या गोष्टी किती आनंद देऊन जातात नाही? मग आठवत राहिली लहानपण ची दिवाळी. किती आधीपासून त्याचे वेध लागायचे. कारण घरात फराळाची तयारी सुरू होत असे, पणत्या शोधून ठेवल्या जात, आकाशकंदील नवा बनवला जात असे, मला किल्ला करायला खूप आवडत असे. आम्ही जिथे राहत होतो तिथे मी एकमेव मुलगी होते जिला किल्ला करण्यात इँटेरेस्ट होता. खूप मजा वाटायची त्यात मला. ती सवय आजही टिकून आहे .....आता मी किल्ले मनातल्या मनात बांधते.

आईने लाडूसाठी पाकात टाकलेला रवा, खवा वाटीत घेऊन खायला खूप आवडायचं मला....पण मिळायचं नाही कारण नैवेद्य दाखवायचा असायचा. कपडे खरेदी हा एक आवडता उद्द्योग....तसा तो आज ही आहे..... पण आता ती मजा वाटत नाही. माझे बाबा खूप सारे फटाके घेऊन यायचे, त्याची तिघात वाटणी होत असे. मग त्यात शेवटी भांडभांडी होत असे. सर्वात जास्त फटाके मी उडवत असे. दोन वेळा फटक्या मुळे भाजल्यावर देखील. नारकचतुर्दशीच्या दिवशी पहिली माळ कोण लावणार अशी चुरस असे. खरच इतक्या सकाळी उठत असू की सकाळी ७ पर्यंत तेल, आंघोळ, फटाके, फराळ सगळं होत असे.....मग पर्वती चढायला जाण्याचा कार्यक्रम. इतकी मजा यायची.

लगेच नंतर आजीकड़े जात असू. आजकाल बोलावल्याशिवाय सख्खे नातेवाईकही एकमेकांकड़े जात नाहीत.
आता सगळं बदललं. सार्‍या गोष्टी पैशाने उपलब्ध झाल्या, वेळ दुर्मिळ झाला.आता पर्यावरणाच्या नावाखाली फटाके बंद झाले. फराळाचे पदार्थ सतत घरात दिसू लागले, आणि सारी मजा हरवून गेली.