Friday, August 31, 2012

रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी.......

एक भली मोठी गुहा आहे. आत शिरायला मात्र एक लहानशी वाट आहे. गुहा म्हंटलं की अंधार आलाच. इथे मात्र भरपूर मशाली पेटवून ठेवल्या असल्यामुळे भरपूर प्रकाश आहे. मी आत शिरते. भीती वाटत कशी नाही मला हा प्रश्न माझ्या डोक्यात आहे. पण मी आत जात आहे. गुहेच्या मध्यभागी खूप माणसे आहेत. उलटी टांगून ठेवलेली. ती जिवंत आहेत का हा अजून एक प्रश्न मला पडलाय. जिवंत किंवा मृत असल्याचे कोणतेच लक्षण दिसत नाहीये. पण त्याचेही मला विशेष काही वाटत नाही. मी थोडा वेळ तिथे थांबते मग बाहेर पडते. मग एक तीन काठ्यांच्या मध्यभागी पेटवलेली शेकोटी दिसते. सर्वत्र लाल रंगाचा प्रकाश आहे.

हे स्वप्न अगदी आता आतापर्यंत पडणारे. म्हणजे ते या पुढे पडणारच नाही असे काही मी सांगू शकत नाही कारण दर वेळी तापाने फणफणले की आख्खी रात्र हेच स्वप्न मला पडत राहते. अगदी आठवतंय तेंव्हापासून आतापर्यंत प्रत्येक वेळी. लहानपणी तर एक वेडी कल्पना माझ्या मनात होती. कदाचित हे स्वप्न अजून विस्ताराने कधी तरी पडेल मला. त्याचा अर्थ कळेल. हे अर्धवट स्वप्न वाटे त्यावेळी, आणि जर पूर्ण एपिसोड स्वप्नात दिसला तर बरे होईल असेही वाटे. त्यामुळे अनेकदा, "मला ताप यावा" अशी माझी इच्छा असे. तापाने फणफणलेली मी आणि त्या स्वप्नात असणारी शेकोटी, तो लाल रंगाचा भगभगीत प्रकाश, त्या मशाली, काय संबंध आहे साऱ्याचा एकमेकांशी माहित नाही. इतक्या लहानपणीपासून हे स्वप्न पहातीये मी, त्यामुळे कधी याच्या अर्थाचा विचारच मनात आला नाही. ताप आला की हे स्वप्न पडणारच हे इतके पक्के आहे. पण दरवेळी सकाळी जाग आल्यावर मनात उरतो तो फक्त लालभडक प्रकाश.


पाऊस पडत नाहीये, पण पडून गेल्यासारखं वातावरण आहे. मी एक्स्प्रेस वे वर गाडी चालवतीये. बरोबर अजून कोणी गाडीत नाहीये. नेहमी चालवते तोच (जरा जास्तच ) स्पीडही आहे गाडीचा. आजूबाजूला हिरवेगार डोंगर, मन प्रसन्न. गुंगून गेलीये हे दृश्य डोळ्यात साठवून घेण्यात. स्पीड वाढतोच आहे, आणि रस्त्यावरचं माझं लक्ष कमी होत गेलंय. शॉट१ कट.......तोच रोड, तीच मी, तीच गाडी, तसाच स्पीड. माझे लक्ष रोडवरच आहे. हळूहळू डोळ्यावर झापड येतीये माझ्या, या मला बघणारी अजून एक मी आहे. ती घाबरते. अक्सिडेंट होणार आता माझा या कल्पनेने. पण असं काही होत नाही. एका सरळ रेषेत मिटलेल्या डोळ्यांनी मी गाडी चालवते आहे. ( बाकी लोकांचे नशीब अगदीच जोरावर आहे म्हणायचे). एक मी गाडी चालवतीये आणि एक मी त्या मला बघते आहे. शॉट २ कट. वर्षानुवर्षे म्हणजे जवळपास १० वर्षे अधून मधून मी हे एक स्वप्न पाहतेच. या स्वप्नाचा अर्थ लावू जावे तर वाटते, कुठे तरी मला जागे, सजग, सतर्क ठेवणारे हे स्वप्न आहे. किमान तशी गरज आहे हे जाणवून देणारे. पण स्वप्नातून जागे झाल्यावर मनात उरतो तो आजूबाजूचा हिरवेगार परिसर, रस्त्याचा एक राखाडी, काळा रंग.


एक सुंदरशी बाग आहे. खरतर वाडी आहे. कारण दुतर्फा पोफळीची झाडे आहेत. अशा वाड्या कोकणात कुठेही दिसतातच. रस्ता, मध्ये वाडी आणि पलीकडे थेट समुद्र किनाराच. परिसर खूप सुखावणारा आहे. इथे मला मी कुठेच दिसत नाहीये. पण मी हे सारे पहात आहे. एक मस्त पैकी सैर होते या परिसराची. दरवेळी या स्वप्नातल्या बागेत कोणत्या तरी फळांचे ढीग रचलेले असतात. कधी केळ्यांचे घड, कधी नारळाने लगडलेले झाड, कधी आंब्याने भरून ठेवलेली मोठी टोपली. या स्वप्नातून जागे झाल्यानंतर ही मन प्रसन्न असते. त्या त्या फळाच्या रंगाचे एक अवकाश सोबत घेवून. अगदी पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा................

Wednesday, August 29, 2012

खरंच, आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही.....


आऊचा काऊ तो ह्याचा मावसभाऊ असतो
पण त्याच्याबद्दल याला काहीच माहित नसतं
सांगायला जावे तर ह्याचे लक्ष नाहीच
आणि तरी म्हणे आम्हा बायकांनाच काही कळत नाही

सकाळी तास न तास वाची पेपर
एवढे काय वाचतो तेच मला कळत नाही
गहू तेलाचे भाव मात्र याला कधी माहित नाहीत 
आणि म्हणे आम्हा बायकांना काहीच कळत नाही

पाठवावे याला कधी भाजीबाजारात
घेऊन यावा ह्याने ढीगभर शेपू अन कांद्याची पात
घरातल्यांच्या आवडी निवडी याला ठाऊक नाहीत
आणि म्हणे आम्हा बायकांना काहीच कळत नाही

रात्र रात्र जागून पाहतो टी.व्ही.
axn स्टार स्पोर्ट्स आणि स्टार मुव्ही
सारखी तीच हाणामारी बघून कंटाळा कसा येत नाही
आणि म्हणे आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही

मित्रांशी तास न तास गप्पा मारी
वर बालवाडीतल्या मैत्रिणींची खुशाली विचारी
बायकोचा वाढदिवस मात्र याच्या लक्षात नाही
खरंच, आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही

Friday, August 24, 2012

घडलंय....बिघडलंय.....


"ह्याला निव्वळ माज म्हणतात" माझी एक कलीग खूप चिडून म्हणाली. 
"माज काय त्यात? तू खाऊन तर बघ." मी
"नाही खाणार, इथे लोकांना यावर्षी आंबे मिळत नाहीत, आणि तू आंब्याची कढी बनवून आणलीस, अजिबात खाणार नाही"
"अगं,  आता मला ही रेसिपी संजीव कपूरच्या पुस्तकात मिळाली, आणि घरात आंबे ही होते, मग म्हटलं पाहू बनवून, माज वगैरे म्हणत नाहीत हं याला"- मी

हा संवाद या उन्हाळ्यातल्या दुपारी जेवणाच्या टेबलवर घडला. पहिल्या घासाबरोबर लक्षात आले, या रेसिपीत काही मजा नाही म्हणून. पण बनवली होती मोठ्या उत्साहाने, खाणे भाग होते. मनातल्या मनात मी त्या पुस्तकातला "आंब्याच्या कढीचा" सुंदरसा फोटो आठवत कशीबशी संपवली ती. कलीगचा राग ही नवीन गोष्ट होती पण असे पदार्थ बिघडण्याची काही ही पहिली वेळ नव्हती.

लग्नानंतरचे  अगदी सुरुवातीचे दिवस, साबा आणि नवरा ऑफिसला जाऊ लागले होते, पण माझे सासरे मात्र घरी होते, त्यांची सुट्टी अजून शिल्लक होती. सकाळी नाश्त्यानंतर दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागले. फ्रीज मधून सिमला मिरची ओट्यावर काढून ठेवली होती. ते सहज आत डोकावले. मिरच्यांकडे पाहून म्हणाले " नारळ किंवा पीठ पेरून सुकी भाजी करू नकोस, रसदार भाजी कर". अरे बापरे, झाली का पंचाईत, सिमला मिरचीची रसदार भाजी कशी करायची ते मला माहित नव्हतं. विचारून कोणी सांगेल असं कोणी शेजारी पण नव्हते, आणि माझी ओळखही नव्हती. त्यांच्या समोर आई, काकू, आत्या यांना फोन करून विचारायचे धाडसही नव्हते. मुंबई-पुणे STD करावा लागायचे दिवस होते ते. नारळाचे वाटण करून रसभाजी बनवावी असा विचार केला. पण चांगली होईल अशी खात्री वाटत नव्हती. चेहऱ्यावर माझ्या अनेक प्रश्न होते. पुन्हा काही कारणांनी ते आत डोकावले. वाशीत अगदीच छोटंसं घर होतं आमचं. त्यांना माझा चेहरा वाचता आला असावा. सहज बोलल्यासारखे म्हणाले " काही नाही चिंच-गुळ, गोडा मसाला आणि दाण्याचे कूट, मस्त होईल भाजी, कर तू आपण खाऊ" भीतभीत बनवली आणि मस्त झाली भाजी. जीव भांड्यात पडला.

मग काही दिवसातच मी ही नोकरी करू लागले. साबा अनेकदा सकाळी ६ लाच घर सोडत, आणि आम्ही बाकी तिचे ८ ते ९ च्या दरम्यान एका पाठोपाठ. आपोआपच सकाळी आम्हा तिघांचे डबे मला बनवावे लागत. चुकत माकत बनवलेले पदार्थ असायचे डब्यात. छान झालेल्या पदार्थाची ते घरी येऊन लगेच तारीफ करत, पण बिघडलेल्या एखाद्या भाजी बद्दल एक शब्द ही कधी त्यांनी त्या सुरुवातीच्या दिवसात काढला नाही. ते सरकारी ऑफिसर होते, अनेक वर्षांची ऑफिसमधील मित्र मंडळी त्यांच्या सोबत लंचला असत, कसे त्यांनी ते असे पदार्थ त्यांच्याबरोबर शेअर केले असतील ह्या विचाराने मला खूप अपराधी वाटत असे. 

मग मी हळू हळू या कलेची पुस्तके जमवत गेले. निरीक्षण वाढवत गेले. कोणाच्या घरी गेल्यावर, निरीक्षण करू लागले तिथल्या स्वयंपाक  घराचे  आणि त्या अन्नपूर्णेचे. चाखत असलेला पदार्थ कसा बनवला असेल याचा विचार करू लागले. थोडा स्वत;च्या मेंदूला ताण देत प्रयोग करू लागले. अशाच  प्रयोगातून पहिल्या दिवाळीत "पुलाव" इतका सुंदर झाला. आधी साधीच रूपरेखा त्या पदार्थाची तयार होती डोक्यात. जस जशी तयारी करत गेले, तसतश्या एक एक वाढीव गोष्टी सुचत गेल्या, जसा की पाण्या ऐवजी दूध त्यात थोडे केशर, कांदा, बटाटा, काजू तळून, फरसबी, गाजर, मटार उकळत्या पाण्यातून काढून, फ्लॉवर थोड्या हळदीच्या पाण्यातून शिजवून. इतर मसाल्याबरोबर कोथिंबीर आणि पुदिनाही घातला. त्यात घालायला पनीर आणून ठेवले होते. खावा ही होता घरात. दोन्ही किसून घेतले. त्यात थोडी हिरवी मिरची, आले, लसूण वाटून घातले, मीठ आणि थोडे कॉर्न-फ्लोर. लहान गोळे बनवून ते तळले. असे हे सोनेरी गोळे शेवटी तयार पुलाववर पसरले. अहाहा काय स्वाद होता त्यात!

पुस्तकेही या बाबतीत कधी कधी चकवतात. अनेकदा लिहिल्याबर हुकुम पदार्थ बनवला तर बिघडू शकतो, जसे की हलके सोनेरी गुलाबजाम तळून घ्या किंवा कांदा गुलाबी होई पर्यंत तळून घ्या - जर शब्दश: तसे केले तर कच्चेच राहतील. तर काही जसे लिहिले तसेच बनवावे लागतात, आपली अक्कल चालवून त्यात काही बदल केले तर हमखास बिघडतात. जसे  मी एकदा "आंब्याचे मूस" बनवताना चालवले होते. लग्नाच्या वाढदिवसासाठी आदल्या दिवशी सेट करायला ठेवलेले "मूस" त्या नंतर चार पाच दिवसांनी सुद्धा सेट झाले नव्हते. 

बिघडणार्या पदार्थांना कसे वाचवायचे याचे कोडे हळू हळू सुटत गेले. गोड पदार्थांसाठी घरात पिठीसाखर, दुध पावडर, किंवा काजू बदामची पावडर असे हाताशी असले, आणि त्यावर थोडी मेहनत करायची तयारी असली की मग झालं. बिघडू पाहणाऱ्या तिखट पदार्थांसाठी उकडलेला बटाटा, ब्रेंड, मैदा असे पदार्थ उपयोगी पडू लागले. कधी कधी बिघडत जाणाऱ्यावर केलेला प्रयोग, ओरिजिनलपेक्षा सरस ठरला, आणि नंतर दर वेळी तसाच बनू लागला. जसे की एक वर्षी गणपतीच्या नैवेद्यासाठी मोदक बनवत होते. काही केल्या ते घट्ट व्हायलाच तयार नाहीत. अर्धी वाटी काजू आणि पिस्त्याची पूड त्यात घातली. चांगले न लागायला काय झालंय? दुसऱ्या दिवशी, गणपतीच्या सकाळच्या  आरती नंतर प्रसाद वाटून झाल्यावर बहिण आणि जावेला "कसे झालेत" असे विचारले. "Don't tell me! ये आपने घरपे खुद बनाये है?" - इति माझी अमराठी जाऊ. "तू केलेत ना, मग उत्तमच असणार, काही लोकांनी काहीही बनवलं तरी ते by default चांगलेच बनते"- इति बहिण.

काळासोबत मी  वेगळा आणि उत्तम पदार्थ सहजगत्या बनवू लागले. या बाबतीत मी माझीच स्पर्धक झाले. हळू हळू कोणी मला एखाद्या पदार्थाची रेसिपी कशी विचारू लागले मलाच कळले नाही. मुळातच या विषयावर बोलायला आवडत असल्यामुळे मी ही शक्य तितक्या डीटेलमध्ये ती रेसिपी शेअर करते. हातचं काहीही राखून न ठेवता! माझ्या हाताची जी चव आहे ती दुसऱ्या कोणाच्या हाताला कशी येईल ? कदाचित माझ्यापेक्षा ही उत्तम बनवेल. तरी हरकत नाही. 

माझ्या किचनरुपी प्रयोगशाळेत असे प्रयोग गेली अनेक वर्षे कधी घडले, कधी बिघडले. पदार्थ घडले किंवा बिघडले असं म्हणण्यापेक्षा त्यांनी मला घडवलं. चांगला स्वयंपाक बनवता येण्यासाठी एक नजर दिली. बिघडलेल्या पदार्थांनी त्यातूनच काहीतरी नवीन घडवायची दिशा दाखवली, बिघडलेल्या पदार्थाने अश्रू गिळायला शिकवलं, जमून आलेल्याने कौतुकात सुखावून जायला शिकवलं.....

माझ्या घरी, नात्यात, मित्र मंडळीत असे काही जण आहेत की ज्यांना माझ्या हाताचे जेवण विशेष आवडत नाही, तर दुसऱ्या बाजूस खूप मनापासून दाद  देवून खाणारे ही काही कमी नाहीत. पुन्हा एकदा सणासुदीचे दिवस येऊ घातलेत, वेळ नाही म्हणत म्हणत मी काही प्रयोगांसाठी वेळ काढेनच. नवरा एक दोन सूचना करत पदार्थ छान झालाय म्हणेल, कन्यकेच्या चेहऱ्यावरूनच कळेल, दादा म्हणजे माझे सासरे "उत्तम झालाय " अशी दिलखुलास दाद देतील  तर साबा त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने "चांगला झालाय" असे दुसर्यांना कौतुकाने सांगतील. माझी एक लहानशी मैत्रीण जी मला "मॉम" म्हणते ती तिरकसपणे "वॉव, क्या खाना बनाती ही तेरे घर की रोटी बननेवाली ऑन्टी. मी लग्न झाले की तिला तुझ्या घरून घेवून जाणार" असे म्हणेल.  आजचे हे लिखाण त्या सर्वांसाठी!

Saturday, August 18, 2012

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे .......पण लक्षात कोण घेतो?

Technology चा प्रसार थोड्या धीम्या गतीने झाला असता तर किती बरं झालं असतं,  असे अनेकदा माझ्या मनात येते. या विचार रुजला एक दोन वर्षापूर्वी. तेंव्हा मी सकाळी लवकर ऑफिसला जात असे. इन्फिची बस घराजवळच काही अंतरावरून मी पकडत असे. रोज रस्त्यात एका दुकानाबाहेर एक स्त्री बसलेली दिसे. तशी टापटीप असे, जरा बरी साडी, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या, पायात पैजण, चेहराही बरा नटवलेला आणि हातात कानाशी धरलेला मोबाईल. एक दिवस असा गेला नाही की मी तिला तिथे बसून फोनवर बोलताना पहिले नाही. अनेकदा मनात प्रश्न पडे ही बाई अशी का इथे बसून फोनवर बोलते? तिला जावून विचारावं असंही मनात अनेकदा आला. पण मीच इतकी घाईत असे. एक दिवस चुकून लवकर घराबाहेर पडले, आणि सावकाश चालत राहिले. दुरूनच ती दिसली. लांबवरून तिचे निरीक्षण मी सुरु केले. तिचा फोन कानाला लावून बोलणे चालूच होते. मग माझे लक्ष तिच्या बाजूला असलेल्या खराट्या कडे गेले. आणि लक्षात आले, ही कॉलनीत झाडू मारते. पहिला विचार आला " सारा वेळ  रोज इथे बसून बोलते, तर काम कधी करते? दुसरा की या कामात कमावते किती आणि गमावते किती फोनवर बोलण्यात?" त्याच वेळी माझी कंपनी  दरमहिन्याला ७५० रु. पर्यंतचे  माझे मोबाईल बिल भरत असे. ऑफिसचे आणि पर्सनल असे दोन्ही फोनचे माझे बिल 3०० पेक्षा जास्त कधी होत नसे. म्हणजे बघा एकीला परवडू शकते, पण ती या गोष्टींवर पैसा खर्च करत नाहीये, किंवा त्यासाठी तिच्याकडे वेळच नाहीय,  दुसरीची कदाचित खायची प्यायची चिंता मिटत नसेल, पण असे खर्च चालूच.  मला तिला खूप मनापासून असं सांगण्याची इच्छा होती " बाई, आजचा वेळ आणि पैसा असा वाया घालवू नको, पोटापुरत  कमवत जरी असलीस, तरी, गाठीशी थोडा वेळ असेल तर  थोडं  अजून  शिक काही, ज्याचा काही उपयोग होईल. कशाला इथे बसून अशा गप्पा मारत, मोबाईल कंपन्याची धन करतेस?"  पण धीर नाही झाला. न जाणो त्या न वापरत्या खराट्याचा वापर केलान असता!

मधे घरी येणाऱ्या केर-फरशी करणाऱ्या बाई सकाळी लवकर माझ्या वेळात घरी आल्या. काम माझ्याकडे असे होते की त्यांना ३००० रु हवे होते. त्या गेली जवळपास १० वर्षे माझ्याकडे काम करतात, त्यामुळे मी देणार नाही असा प्रश्न नव्हता. पण मी कारण विचारलेच. उत्तर आले " लेकाला नवा मोबाईल हवा आहे, रोज तो डोकं खातो माझं, आज तोच येणार होतात, पण मीच म्हटलं " तू नको येवू, मी विचारते ताईना" माझा पुढचा प्रश्न " काय करतो तो आता, आजकाल पेपर टाकायला येत नाही तो?" उत्तर " ते काम आवडत नाही त्यास, सकाळी फार लवकर उठावं लागतं ना, मग आता जातो एका दुकानात कामाला" 
"३००० चा मोबाईल हवाय त्याला ? एखादा साधा घेवून नाही का काम भागणार? तुम्ही सकाळी १० ते रात्री आठ घरोघरी जावून कामे करता ते काय अशा गोष्टींवर उडवण्यासाठी?"
"ताई, तो ५००० मागत होता, पण मी म्हटलं ३००० पेक्षा जास्त देणार नाही" 
त्यांना माझा फोन दाखवला आणि म्हटलं " हा ४५०० रु चा आहे, आणि गेली ४ वर्षे मी तो वापरतीये. "माहित होतं मला पुत्र प्रेमापोटी बाकी काही त्यांच्या डोक्यात शिरणार नव्हते ते. दिले पैसे. 

गेली दोनवर्षे  मी माझा असा फोन वापरतीये जो एकदा गाडी चालवताना मांडीवर ठेवला होता, मधेच तो खाली पडला, थांबल्यावर उचलू म्हणून मी लक्ष दिले नाही, तो जरा जास्तच पुढे पडला, आणि ब्रेक खाली आला. पण फोनला काही झाले नाही, एक चीर जाऊनही तो चालतो आहे, मी पण तो अजून तसाच वापरते आहे. कसं ना या गोष्टी इतक्या स्वस्त झाल्या नसत्या, आणि नको त्या वर्गाने त्यावर अनाठायी पैसे उडवले नसते. घरी धड खायला नसे ना का, की राहायला धड घर, पण घरात, टी. व्ही. केबल, हातात मोबाईल, चालवायला बाईक.....पण डोक्यात प्रकाश पडेल तर ? 

मी कॉलेज मधे असताना एक सौ. संध्या वर्तक नावाच्या प्रोफेसर उत्तम  इकॉनॉमिक्स, बँकिंग आणि फायनान्स शिकवायच्या, त्या " How rich become richer and poor poorer" हे स्पष्ट करून सांगताना नेहमी  एक उदाहरण द्यायच्या, तेंव्हा त्या म्हणायच्या " मध्यम वर्गात नेहमी एक प्रकारची इर्षा जागृत असते, दुसरयाचे अनुकरण, किंबहुना आपल्यापेक्षा वरच्या वर्गाचे अनुकरण करण्यात त्यास धन्यता वाटते. आपला शेजारी कोणती दुचाकी वापरतो, शेजारीण कशा साड्या, कसे दागिने वापरते या गोष्टींकडे त्याचे लक्ष असते.  त्यामुळे त्यांचे जास्तीत जास्त रेसोर्सेस अशा रीतीने खर्ची पडतात.  तोच एखादा उद्योजक असेल तर त्याला अशा गोष्टीनी काही फरक पडत नाही. त्याला सर्वात महत्वाचे असते ते योग्य प्रकारे पैसा आपल्या धंद्यात गुंतणे. पुढे त्या असे म्हणत,"उगीच नाही कंपन्या आपल्या उत्पादनांच्या जाहिराती "neighbor's envy, owner's pride " या शब्दात करत. हीच गोष्ट हेरलीये, बँकांनी, तुम्ही कार घ्यायला कर्ज मागा, तुमच्या घरी येवून देतील, पण एखाद्या उद्योगासाठी कर्ज मागायला जा, १०० खेटे मारायला लावतील." बघा हे १७ वर्षान पूर्वीचे उदाहरण आज ही लागू पडते, फक्त त्यातले वर्ग बदलले आहेत कदाचित. 

Saturday, August 11, 2012

जिन्दगीका सफ़र है ये कैसा सफ़र.......

पाय टाकायला जागा नाही इतकी गर्दी. गोतावळाच इतका त्यांचा. नातेवाईक म्हणू नका, ओळखी पाळखीचे, शिवाय क्लासमध्ये येणाऱ्या साऱ्याजणी. आज अचानक सारा खेळ संपतो. अनेकांना रडू आवरत नाहीये. घरचे, दारचे सर्वच जण यात आहेत. शांतपणे ती एका कोपऱ्यात उभे राहून सारे पहातीये. अगदी निर्विकार असा तिचा चेहरा. प्रयत्न करतीये ती, ओळखण्याचा, आसपासच्या कोणत्या मंडळींचे चेहरे खरे. आश्चर्य वाटतंय, अचानक माणसे अशी कशी वागू लागतात. आज आता इथे वागता-बोलता आहेत ते खरे की पूर्वीचे? अचानक दुखाचे महापूर कोठून आले? मागे उरलेल्या बद्दलची काळजी अचानक कशी व्यक्त होवू लागली? माणसे गेल्यानंतरचे हे प्रेम, नाही यातले थोडे तरी ती जिवंत असताना का उफाळून येत नाही? ईगो इतके कसे मोठे बनतात? इतर वेळी इतर लोकांसारखीच असणाय्रा तिला, या बाबतीत मात्र त्यांच्या सारखे वागता येत नाही.
पहाटेपासूनच, अगदी ती बातमी कानी आल्यापासून तिने बरीच आवश्यक अशी कामे उरकली आहेत. सर्व तयारी, साडी चोळी हार फुले इतकेच काय तर नंतर दिवा तेवता ठेवायला पणती, वात, विटा, कणिक, तेल इतपर्यंत. सारे फोनही लोकांना तिनेच केले. प्रत्येक फोनवर तीच माहिती सांगायची, लोकांचे तेच प्रश्न, हिची तीच उत्तरे. मुळात अनेकदा खात्री करून तिलाच ही बातमी खरी वाटत नव्हती, प्रत्येक फोन वर बोलताना तिलाच प्रश्न पडे, "हे सारे खरे आहे ना?" पण वेळ तर तिने निभावून नेली. हळू हळू सगे सोयरे सारे जमले. प्रत्येकजणच फार दु:खी दिसत होता. आता ती एकटी झाली. कोण होत्या त्या तिच्या ? सारे उरकले, मंडळी पांगली. अनेकांनी आपले दु:ख चांगल्या रीतीने जगाला दाखवून दिले. कुठे तरी घरात कुजबुज ही झाली " जरा म्हणून हिच्या डोळ्यात पाणी नाही, काहीच कसं वाटत नाही? " " किती कमाल आहे बाई". ती ही कानी पडली. यांच्या पैकी कोणी तिला पुस्तक वाचताना, किंवा एखादी टी. व्ही. सीरिअल पाहतानाही झरझर डोळे ओले केलेलं पाहिलं नाहीये का? एकंदरीतच लोकांना इतरांना "लेबले" लावायला फार आवडते.

माणूस गेलाय पण जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत त्याच्या आठवणी माझ्यासोबत आहेत. आता नवीन आठवणी निर्माण होणार नाहीत , पण जुन्याही माझ्या कोणी हिरावून घेऊ शकणार नाही.तिला आठवत राहिल्या त्या, त्यांच्याशी घडलेले संवाद. त्यांचे खालून वर फोन करणे, काहीतरी खाऊ न चुकता तिच्या घरी पोहचवणे. एखादी गोष्ट त्यांना सांगितली म्हणजे झालीच म्हणून समजा. असा तिचा अनेक वर्षांचा अनुभव. घर संसारात फार रमायचा स्वभाव नव्हता, पण उत्तम जनसंपर्क होता. तसं थोडा जगावेगळच व्यक्तीमत्व होत्या त्या. तिच्या डोळ्यासमोर अनेक असे क्षण उभे ठाकत होते. या आठवणी महत्वाच्या. त्या इतक्या सहज पुसल्या जाणार नव्हत्या. त्यांचे दिवस होतात न होतात तोपर्यंत जवळची माणसे आपल्या मूळ पदावर आली. पुन्हा हिला प्रश्न पडला की कोणती रूपे खरी. मृत्युच्या संवेदना इतक्या बोथट? इतके सहज आयुष्य पुन्हा पाहिल्यासारखे कसे होते?

मृत्यूचं दर्शन तसं तिला नवीन नाही. पहिला मृत्यू घरातला पहिला तेंव्हा अगदीच लहान होती, त्यामुळे फारशी जाणीव नव्हती. गमावली होती तिने पणजी. नंतर कित्येक दिवस आठवत राहिला तिचा मऊ हात ज्यावर डोकं ठेवून ती झोपी जात असे. नंतर काही वर्षांनी पणजोबा आजारी पडले कुठे तरी जाणीव आधीच झाली होती कदाचित त्यांच्या जाण्याची. त्यांच्या जायच्या एक दिवस आधी संध्यकाळी, ती दुधाचा कप धूत होती. नळाखाली तो धरून त्याकडे पाहत राहिली. मनात विचार येत होते " जगात असंच घडत असेल, जुनं पाणी वाहून जात असेल, नवे त्यात पडत असेल, मग नव्याला जागा हवी तर जुन्याला जायलाच हवे". तेंव्हा नुकताच काही दिवस आधी तिला आतेभाऊ झाला होता. आज मागे वळून पाहताना विचार येतो तिच्या मनात १० वर्षाच्या मुलीच्या मनात असे विचार येऊ शकतात का? की ते अकाली प्रौढत्व होते? दुसऱ्या दिवशी ते गेले. आदल्यादिवशीच्या विचारांनी कदाचित, धक्का बसला नाही त्यांच्या जाण्याचा.

मग अशी वेळ आली की मृत्यूचे दु:ख करायला वेळच नाही मिळाला. वयाच्या १५ व्या वर्षी अचानक तिचे बाबा गेले. थिजून गेली ती. काही दिवसांवर आलेली १० वीची परीक्षा. भान आले तेंव्हा मनात पाहिला प्रश्न आला "पुढे काय?" लोकांची सहानुभूती काही क्षण राहील, पण "पुढे काय?" आपली आपणच उत्तरे सापडत गेली मार्ग निघत गेले. दु:ख करायला फुरसतच नव्हती. तेंव्हा पासून अशीच दगड बनलीये ती. लहान सहन गोष्टींनी हळवी होणारी ती, मोठी संकटे मात्र झेलते. जगासारखे रडून तिला दु:ख व्यक्तच करता येत नाही आता. काही बोलणं या विषयीही नाही पसंत तिला. दु:ख मनात ठेवून "पुढे काय?" ची उत्तरे ती शोधू लागते. यावेळी ही तसंच काही घडलंय. आज जवळपास महिना होत आलाय, वरवर सारे ठीक दिसत असले तरी तिचे मन अजून थाऱ्यावर नाही. त्यांचे विचार अजून मनातून गेलेले नाहीत. रात्र रात्र झोपेशिवाय जातीये. वरकरणी सर्व, घर ऑफिस सुरळीत सुरु आहे, पण कुठेतरी काहीतरी अधुरं आहे. तिला माहीत आहे "काळ" हेच सर्व गोष्टींवर उत्तर आहे. तरीही.................

Wednesday, August 1, 2012

किसको ऐसी बात कहे..................


रात्रीचा एक वाजून गेलाय. मनाविरुद्धच मी ऑफिसच्या बाहेर पडलोय. गाडी सुरु करतो, त्याचबरोबर सूर कानी पडतात. " किसको ऐसी बात कहे" खरंच कोणाला सांगू ही अशी अवस्था! काचेवर वायपर सरसर फिरता आहेत आणि मनावर आठवणी. पावसाचे थेंब पुसले जातात पण या आठवणीचं काय करू? बाहेरचं फारसं धड दिसतही नाहीये. तसं मनातलं काही तरी कुठे उमगतंय? संध्याकाळ पासूनच मी थोडा अस्वस्थ आहे. तसा प्रत्येक पाऊस मला अस्वस्थच करतो, अजब अशी बैचैनी पसरत जाते. काही कळत नाही मग. आधी भूरभूर वाटणारा पाऊस आता नुसता कोसळतो आहे. ऑफिसमधून बाहेर पडण्याचीच इच्छा नव्हती. वाटतं की एखाद्या खोलीत कोंडून घ्यावं, काम करत राहावं, काही संपर्क नको जगाशी. अशा पावसात आजूबाजूला सगळेच लोक कसे इतके प्रफुल्लीत होतात हे आजकाल मला समजत नाही. 

"खरतर पाऊस मला पूर्वी कधी आवडलाच नाही. लहान होतो तेंव्हा बाकीची मित्र मंडळी मजेत भिजत, कागदी होड्या करून पाण्यात सोडत. पण मी, ....मी नाही हे काही केलं. पुढे कॉलेजमध्ये ही पहिली काही वर्षे मी कटाक्षाने या पावसापासून दूर राहिलो. शेवटच्या वर्षी, आपल्या ग्रुपची पावसात ट्रीपची टूम निघाली. मनापासून यायची इच्छा नव्हतीच, पण तू खूप उत्साही दिसलीस. तशी आपली नुकतीच थोडी ओळख होवू लागली होती. पण ना कळे का तुझ्या सोबत काही क्षण घालवण्याची एकही संधी मी सोडत नव्हतो. मंतरलेले दिवस ते. खरंच ती ट्रीप लक्षात राहावी अशीच होती. आपण सारे कुठल्याशा गडावर गेलो होतो, अगदीच भूरभूर असा तो पडत होता. तुझ्या बटांवर ते चिमुकले थेंब इतके गोड दिसत होते, की नजर हटत नव्हती. तेवढ्यात तुला कोणीतरी कविता म्हणायचा आग्रह केला. ती ऐकायला मी ही उत्सुक होतोच. तुझ्या तोंडून आली ती................


              "नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी अन दारात सायली"


तुझ्यामुळे कविता, गाणी काव्य आवडायला लागले, तशी तू ही. पण शब्दात व्यक्त करणं मला कधी जमलंच नसतं. तरीही हळू हळू आपण बाकी ग्रुपपासून वेगळे होत गेलो. तू एकदा बोलायला लागलीस की अखंड धारा बरसताहेत असे वाटायचे. मुळातच हुशार तू, त्यात अनेक कवितांची पाखरणी, तरीही ते सहज असे.....तुला पाऊस खूप आवडत असे. आकाशात जरा ढग दिसले की तू मोहरून यायचीस, अगदी त्या मोराप्रमाणे. तुला अशावेळी कितीतरी कविता आठवत. तू शब्दश: कविता जगायचीस. कवितेचे सारे भाव तुझ्या डोळ्यात दाटून यायचे, अन मी तुला पाहताच राहायचो. वाटायचं असं एखाद्या गोष्टीवर प्रेम करता यायला हवे.

असेच एकदा पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस होते. एम.बी. ए च्या दुसऱ्या वर्षाला होतो आपण तेंव्हा. थोडी हलकी सर होती, म्हणून लायब्ररीच्या पायऱ्यांवर आपण दोघे बसून होतो. तू "चल, ना भिजू" असा हट्ट धरून होतीस, आणि मी नेहमी प्रमाणे " नको" चा राग आळवत होतो. त्या दिवशी कसे आठवत नाही पण तू माझे ऐकलेस, आणि थांबलीस. आजूबाजूला फारसं कोणी नव्हतंच आणि तू हलकेच गुणगुणायला सुरुवात केलीस " ओ, सजना बरखा बहार आयी, रस की फुहार लायी, आखियोंमे प्यार लांयी" तू गुणगुणत होतीस आणि माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. चटकन मी उठलो, म्हटलं, "चल जावू या" 

तुझ्या आग्रहाखातर, मी चक्क रागदारी, हिंदुस्थानी संगीत ऐकू लागलो. आठवतं? एकदा तुझ्या आग्रहाखातर आपण सवाई गंधर्वला गेलो होतो, तो तुझा सखा पाउस, तिथेही तुझ्या मागे आला, भर डिसेंबर महिन्यात, तू तर काय मग..........मध्यरात्री पावसात जितका भिजलो नाही तितका तुझ्या सुरात भिजून निघालो. तुला बाईकवरून तुझ्या घरी सोडायला जाताना. अवेळी पडून गेलेला पाऊस आणि तुझे गुणगुणणे.

शिक्षण संपले, अर्थार्जन सुरु झाले. आपण दोघे वेगवेगळ्या क्षेत्रात, मी आय. टी. वाला तर तू बँकेत. मी चिडवायचो तुला " या बँकेतून बाहेर पडणाऱ्या नोटा बघून घ्या, त्यावर कविता लिहिलेल्या आढळतील." तू चिडायचिस, ठणकावून सांगायचीस " investment बँकर आहे मी". एकदा मी घरी होतो, मार्च महिन्याचे शेवटचे दिवस, दुपारी चार वाजताच काळोख दाटू लागला, पावसाची चिन्हे दिसू लागली. मी, तुला फोन केला, म्हंटले " ए, बाहेर पाहिलयस का ? काय मस्त हवा आहे, बाहेर पडणार आहेस की investment ची गणिते मांडत राहणार आहेस? पिक अप करू का तुला थोड्या वेळात? चल लॉंग-drive ला जावू" तू हो म्हणालीस. खूप उत्साहाने मी तयार झालो. खाली पार्किंग मध्ये पोहचून गाडी काढणार, पाहतो तर काय, तू रिक्षातून उतरत होतीस. मी सुखावलो, वाटले जो विचार माझ्या मनात चालू आहे, तसेच काही हिच्याही. पण माहित नाही काही तरी बिनसले होते त्या दिवशी तुझे. गाडीत बसल्यावर मी तुझा हात हाती घेतला, पण तू काही न बोलता सोडवून घेतलास. मी म्हणालो " गाडीत सी. डी. नाहीयेत, आज आपण काहीतरी live ऐकूयात, पण काहीच प्रतिसाद नाही. आपण थांबलो एका ठिकाणी, मी पुन्हा पुन्हा तुला "काय झालंय" असं विचारले, पण तू "काही नाही" या पलीकडे काही बोलली नाहीस. 

ती आपली शेवटची भेट. वारंवार मी तुला काय झालंय असं विचारत राहिलो, फोन वर, मेल्स वर, पण सारे प्रयत्न व्यर्थ ठरत होते. नंतर नंतर तू माझे फोन घेणंही बंद केलंस. अनेक दिवसांच्या तुला बोलतं करायच्या माझ्या प्रयत्नांतून काहीच हाती लागले नाही. शेवटी सारे विसरून मी स्वत:ला माझ्या कामात गुंतून घेत गेलो. जगाच्या दृष्टीने एक मोठा माणूस. पैसा-अडका सारं काही बक्कळ कमावणारा. बाकी सारे दिवस तर ठीक जातात पण, तुझा तो मित्र "पाऊस" फार जीव नकोसा करतो. तुझ्या साऱ्या आठवणींचा चित्रपट माझ्या समोर उभा करतो. पहिले थेंब पडू लागतात आणि विचार येतो " कुठे असशील, काय करत असशील?" असा हा पाऊस तुला ही असं अस्वस्थ करत असेल का? जशा तुझ्या आठवणी मनात काहूर माजवतात माझ्या, तशा त्या तुझ्याही मनी दाटून येत असतील का? आज ही तू कविता, गाणी तशीच गुणगुणत असशील का? "काली घटा छाए" किंवा "पिया बिन नहीं आवत" हे आज ही तुझ्या ओठी येत असेल का?

घरी पोहोचलोय माझ्या मी. पाऊस पण थांबलाय आता बाहेरचा, आणि मनात सुरु झालाय. रात्र अशी आता भिजुनच संपेल. गाडीत मेहंदी हसन यांचे सूर आहेत.....

कर रहा था ग़म-ए-जहाँ का हिसाब
आज तुम याद बेहिसाब आये

इस तरह अपनी ख़ामुशी गूँजी
गोया हर सिम्त से जवाब आये..........................