Showing posts with label प्रीतरंग. Show all posts
Showing posts with label प्रीतरंग. Show all posts

Friday, May 26, 2017

निरोप......

निरोपाचा क्षण
भरले डोळे
तरी प्रश्न उरे
तुझे नि माझे नाते काय ?
एकाचे दु:ख
वेदना दुसऱ्यास
तरी न कळे
तुझे नि माझे नाते काय ?
झाकोळल्या माझ्या मनास
तुझ्या अस्तित्त्वाचा आभास
तरी कसे सांगावे
तुझे नि माझे नाते काय?

ती......

कविता काही दशकांपूर्वीची......
कविता काही वर्षांपूर्वीची.....
कविता आजची......
कदाचित उद्याची ही.........
तेच राहिल वाट पहाणे
तेच राहिल लाटा मोजणे
तेच राहिल पायांचे वाळूत रूतणे
तेच राहिल भरती ओहटीचा अर्थ शोधणे
असाच चालू राहिल शोध
तिच्या नुरल्या अस्तित्त्वाचा
तिच्या पाऊलखुणांच्या
गाजेतून ऐकू येणार्या तिच्या सादे चा
व्यर्थ शोधतोयस वेड्या तिला लाटांमधे
नाही सापडायची कोणत्याच किनार्यावर
आत डोकाव जरा मनात
तिच्या आठवणींची प्रत्येक लाट
येऊन आदळते मनात तुझ्या
परतली कुठे आहे ती
हरवली कुठे आहे ती
मन व्यापूनही तुझे ती
ऊरते चराचरात ती

Friday, February 3, 2017

तुझे माझे सहजीवन ......

तुझे माझे सहजीवन म्हणजे

दोघांनी मांडलेली भातूकली

थोडा खेळ, थोडे भांडण

तरीही तुझ्या माझ्याशिवाय न रंगणारी

तुझे माझे सहजीवन म्हणजे

विणायला घेतलेली पैठणी जरतारी

वीण जमून आलेली सुबक नक्षी

तुझे माझे अंतरीचे धागे घेऊन विणलेली

तुझे माझे सहजीवन म्हणजे

दारातली सुबक रांगोळी

संगती जुळून आलेली

तुझे माझे रंग घेऊन रेखाटलेली

तुझे माझे सहजीवन म्हणजे

अखंड सुरेल मैफल

सदैव बहारदार रंगलेली

तुझ्या माझ्या सुरांनी सजलेली

Tuesday, May 26, 2015

मितवा - भाग २

प्रिय मितवा,

तसा तुझ्यासोबतचा संवाद माझ्या मनास नवा नाही, इतका तू मनात वसतोस, प्रत्येक क्षण असतो तुझ्यासह जगण्याचा, आनंदाचा! तुझ्यासोबत घालवलेले क्षण ही फक्त त्या क्षणांची गोष्ट नसते रे.... पुन्हा पुन्हा माझ्या मनात दरवळणारी कुपी असते, आनंद, सुख प्रेमरूपी अत्तराची. आज त्यात थोडा बदल करत थोडा प्रवास अव्यक्ताकडून व्यक्त होण्याचा. थोडे हे अत्तर कुपीतून बाहेर दरवळू देण्याचा. मनात शिरता शिरता कसा तू अवघे मन व्यापून उरलास ते कळलेच नाही. मनाचा काही क्षणांचा विरंगुळा म्हणत सुरु झालेले मनातले हे गूज कसे आयुष्यभरासाठीचा आनंद ठेवा बनून गेले ते माझे मलाही समजले नाही. चराचरात देव असतो म्हणतात त्याप्रमाणे माझ्या मनाच्या कानाकोपऱ्यात तू असतोस. मनाच्या सर्व दिशा व्यापूनही दशांगुळे उरतोस असा तू माझा मितवा. 

तुला लिहिलेल्या कवितांचा हा पुढील भाग. कारण हा कवितांरुपी संवाद हे माझे तुझ्यासाठीचे मनोगत असले तरी ते मनातल्या मनातच आता न राहू द्यायचे ठरवल्याने सर्वांपर्यंत पोचवलेले. हे लिखाण म्हणजे माझे स्वत:शीच व्यक्त होणे, माझीच क्षितिजे विस्तारणे, माझे फुलणे, उमलणे. तुझ्या सोबतच्या या संवादाने काय दिले तर एक स्वप्नसखा, एक स्वप्नवत आयुष्य, आयुष्याकडे पाहण्याची, ते शक्य तितक्या आनंदाने जगण्यासाठीची नवी दृष्टी जी मलाच नव्याने गवसू पाहत आहे. मनातली तुझ्यासोबतची मी म्हणजे जणू "फिरुनी नवी जन्मेन मी" असं म्हणत जिचा पुनर्जन्म झालाय अशी मी.



नाते तुझं नी माझे.....

कसं गुंफलं गेलंय 
पौर्णिमा अमावस्येच्या
खेळासारखं नातं तुझं नी माझं
तुझी भेट जणू रात पुनवेची
मातलेल्या चांदव्याची 
प्रेमास उधाणाची

सकाळ होताच तू मावळलेला
दिवस कलेकलेने मला विझवणारा

दाही दिशांतून काळोखणाऱ्या  
अवसेकडे पुन्हापुन्हा नेणारा

मनाच्या अवकाशात गच्च
अंधारून आले की मग
कुठुनसा तू मनात हसणारा
मी येतोय असे सांगणारा

कलेकलेने आस लावणारा
पौर्णिमा अमावस्येचा खेळ
तुझं नी माझे नाते
नित्य फुलवत ठेवणारा


तुझ्या आठवणी......
अशा कातर वेळी 
खिडकीशी उभी मी 
पहात राहते क्षितिजापर्यंत 
पोहोचलेले हे गाव

नजरेच्या टप्प्यात अनेक 
ओळखीच्या जागा 
तिथपर्यंत नेतात मला 
आठवणींच्या पायवाटा

आठवणी तरी कशा?
नुसत्याच सैरभैर 
कोणाला आवतण देते कोण 
कोणाचा हात धरून येतं कोण

असाच असतो 
एक एक दिवस त्यांचा 
त्यांच्या साथीने तुझ्यासह 
काही क्षण जगण्याचा

भरभरून जगते मी हे क्षण 
ते माझे आपले असतात 
तुझ्यापेक्षा तुझ्या आठवणीच 
माझी जास्त सोबत करतात

३) अंतर .....
दु:खाची परिभाषा 
अश्रुंचे पूर 
ते पुसणारे हात 
का कितीतरी दूर 

आठवणींचा उमाळा 
वेदनेचे काहूर 
ते ऐकू जाणारे कान 
असती मैलोनमैल दूर 

नजरेची साद 
नयनच आतूर 
प्रतिसाद देणारे डोळे 
आता कितीतरी दूर 

पौर्णिमेची रात्र 
चांदणे टिपूर 
चांदण्यांनी ओंजळ भरणारा 
मात्र चंद्रासारखाच दूर

सहवासाची ओढ 
शब्दांचे काहूर 
समजणारया मनानेही 
का राहावे मनापासून दूर 


४) तुझ्यामुळेच सखया ………
तुझ्यामुळे पसरू लागले मनाचे इंद्रधनू पुन्हा
तुझ्यामुळे ऊमलू लागली गालांवरती कुसुमे पुन्हा

तुझ्यामुळे परतू आले ओठांवरी हास्य पुन्हा
तुझ्यामुळेच गवसू लागले माझ्यातील मी पुन्हा

तुझ्यामुळे लाभला जगण्यास अर्थ पुन्हा
तुझ्यामुळेच जाणला त्यातला मोद पुन्हा

तुझ्यामुळे जागला अंतरीचा भाव पुन्हा
तुझ्यामुळेच दरवळला माझ्यातला गंध पुन्हा

तुझ्यामुळे पसरला मनी चांदणसडा पुन्हा
तुझ्यामुळेच उगवला प्रितीचा चांद पुन्हा

५) तू माझा होता …
तू माझा होता
शब्द मला दुरावले
ओठातून परतले
डोळ्यांतून ओसंडू लागले 

तू माझा होता
मन माझ्याशी भांडले
मला सोडून वेडे
तुझे होऊन राहिले 

तू माझा होता
चंद्राला चांदणे गवसले
प्रीतीच्या सागरावर
ते उधाणू लागले

तू माझा होता
साऱ्या जगाला विसरले
उघड्या मिटल्या डोळ्यांनी
फक्त तुलाच पहिले

तू माझा होता
सारे सारे मिळाले
प्रेमवेड्या मीरेला
जणू कृष्णसखा गवसले

६) इतुकेच मागणे सखया ......
माझं जग माझं जग
म्हणजे तरी काय असावे
तुझ्यापासून सुरू होऊन
तुझ्यापाशीच येऊन थांबावे

स्वप्ने तुझी बघोनी
पहाटेस जाग यावी
स्वप्नातल्या सख्याची
प्रत्यक्ष भेट व्हावी

नको वाटती सुर सनईचे पहाटेे
सुरेल कोकिळाही आता मला न भावे
साद तुझी ऐकण्यास सखया
अखंड मन हे धावे

सहस्र जलधारांसम  प्रेम तुझे लाभावे
भरल्या ओंजळीने माझ्या रिते न कधी व्हावे
आषाढ मेघ बनूनी तू आवेगे बरसावे
शांत क्लांत धरेसम मी तृप्त तृप्त व्हावे

नको तुळशीचे पान, नको गंगेचे जल
हाती हात तुझा असता व्हावा संधीकाल
सारे काही तू देऊनही मागणे तरी ऊरेलच
हा जीव शांत व्हावा सखया तुज पहातच

७) सहजीवन…
तुझे माझे सहजीवन म्हणजे
दोघांनी मांडलेली भातूकली
थोडा खेळ, थोडे भांडण
तरीही तुझ्या माझ्याशिवाय न रंगणारी 

तुझे माझे सहजीवन म्हणजे
विणायला घेतलेली पैठणी जरतारी
वीण जमून आलेली सुबक नक्षी
तुझे माझे अंतरीचे धागे घेऊन विणलेली

तुझे माझे सहजीवन म्हणजे
दारातली सुबक रांगोळी
संगती जुळून आलेली
तुझे माझे रंग घेऊन रेखाटलेली

तुझे माझे सहजीवन म्हणजे
अखंड सुरेल मैफल
सदैव बहारदार रंगलेली
तुझ्या माझ्या सुरांनी सजलेली

या सात कविता म्हणजे माझ्या मनातील त्याच्या सोबतची सप्तपदीच जणू. त्याच्यासोबतचे हे प्रत्येक पाऊल म्हणजे मैत्र, प्रेम, विश्वास, स्वप्ने, सहजीवन,आठवणी आणि एकरूपतेचे एक एक पाऊल त्याच्यासह मी मनात अगदी "ते प्राणनाथ माझे, मी दैवदत्त कांता" असे म्हणत टाकलेले. फक्त आज हा मनमोराचा पिसारा त्याच्या पुरताच न ठेवता या ब्लॉगरुपी मन:पटलावरून सर्वांपर्यंत पोचवलेला. 

सखया जे होते तुझे ते तुलाच अर्पण......



Monday, March 30, 2015

मितवाची कविता .......माझ्यासाठी!

काल मी मनाचा चाले मनाशी संवाद म्हणत सर्वांशी मन:चित्रे शेअर केली होती. हा संवाद कसा तर दोन्ही बाजूने आपणच सारीपाट खेळावा, आपणच प्रश्न विचारावेत आपणच उत्तरही द्यावे, आपणच मनात भातुकली रचावी, आपणच खेळ रंगू द्यावा, आपणच त्याचा आनंद लुटावा तसा हा संवाद! हा परीकथेतील राजकुमार माझ्या मनात वसणारा. माझ्या आनंदाचा ठेवा पुन्हा पुन्हा गवसणारा. मला सुखावणारा. 
मी मनोगतासाठी कवितेचे माध्यम वापरून त्याच्यापर्यंत ते पोहचवले तर त्यास ही ते जमायला हवे ना! म्हणून मनातल्या त्याला मी म्हंटले तू कधी व्यक्त होशील माझ्यासाठी असा? असं मी म्हंटल्यावर तो थोडीच मागे राहील? झरझर लिहिती झाली लेखणी माझी, कारण काव्य त्यास स्फुरले अन मी लिहू लागले असा हा अनुभव. 

वेड लागेल नाहीतर काय!!!

अशी भेट असे तुझे बोलणे
वेड लागेल नाहीतर काय!

असा पाऊस, तुझे चिंब होणे
वेड लागेल नाहीतर काय!

असा सुगंध, असे तुझे फुलणे
वेड लागेल नाहीतर काय!

अशी सांजवेळ, असे तुझे आठवणे
वेड लागेल नाहीतर काय!

असा स्पर्श, असे तुझे शहारणे
वेड लागेल नाहीतर काय!

असे भांडण, मग  तुझे रूसणे
वेड लागेल नाहीतर काय!

अशा तुझ्या रूपांत असे माझे हरवणे
आता वेड लागायचं राहिलंय काय!

Saturday, March 28, 2015

मितवा......

कवितेच्या गावा जावे पण तितके सोपे नसते ते. मनातल्या भावनांना नेमक्या शब्दात गुंफत, मात्रेच्या गणितात बसवत कविता करणे खरेच खूप अवघड असते. त्यामानाने भारंभार लिहिणे सोपे. शब्दांची मर्यादा नाही, मात्रेची गणिते नाहीत, यमकांची जुळणी नाही. मनातले सारे नीटसे उतरले वाटेपर्यंत लिहित रहावे बरे हेच खरे… 

पण तरीही घालतातच कविता भुरळ मनाला. अनेकदा एखाद्या प्रसंगाचे चपखल वर्णन करण्यासाठी, एखादी प्रतिक्रिया म्हणून, एखादी उपमा देण्यासाठी मला अनेकदा कवितेच्या ओळीच आठवतात.पण स्वत: लिहायचे झाले तर मात्र सगळा आनंद आहे. विचार करून थकते मी लोकांना कशा असंख्य विषयांवर कविता लिहिता येतात ज्या मला जमणे शक्य नाही. पण तरीही कविता या लेखन प्रकारावर प्रेम आहे माझे आणि प्रेम ही जगातली एकमेव सुंदर भावना आहे यावरदेखील. प्रेमा काय देऊ तुला, भाग्य दिले तू मला असे म्हणणाऱ्या नायिका बघत मोठ्या झाल्याचा परिणाम असेल कदाचित. 

प्रत्येक स्त्रीच्या मनात तिचा एक सखा असतो. नकळत्या वयापासून त्याची अनेक रूपे मनात उमलत असतात. काहीना तो गवसतो काहींचे आयुष्य सरते मनातल्या त्याला शोधण्यात. कॅलिडोस्कोपच्या नवनव्या रचनांनी भुरळ घालावी तशी साकार होत राहणारी त्याची रूपे, त्याचे भास. कधी तो माझा मित्र, कधी सहचर, कधी वेगवेगळी नाती  उभी करणारा, तर कधी चक्क देव बनून साकारणारा. असा मितवा जो माझ्या मनात वसतो, सदैव माझ्या सोबत असतो, अखंडपणे माझा त्याच्याशी संवाद चालतो. कधी प्रेमाचा संवाद तर कधी नुसताच वाद, रुसणे, फुगणे, समजूत घालणे म्हणजे जणू  मनाचा चाले मनाशी संवाद! असे हे सुंदर मनातले जग त्याचे आणि माझे माझ्या मनातले!!!

माझ्या मनातला माझा रावा 
त्याचा मनातच घेते ठावा 
मनातच त्याचा वाजे पावा 
मनातल्या मनातच त्याला  
राधेने निरोप कसा धाडावा

अशी अवस्था करणारा तो मितवा. मनीचे गूज त्याला तरी कवितांमधून सांगावे, तसा प्रयत्न तरी करावा. मनालाच मन वाचून दाखवावे तसे जणू. त्यामुळे चुकलेमाकले आपले आपल्याशी असेही. तर अशा या काही ओळी माझ्या मनातल्या राव्याला, माझ्या मितवासाठी, माझ्या सखयासाठी.........चांगले वाईट याची पर्वा न करता त्याला कल्पून लिहिलेले. माहीत नाही किती काळ त्याच्यासाठी लिहिणे जमेल, माहीत नाही कधी शब्द दुरावतील… त्यामुळे जसे मनात साकारले ते हे असे……. अशाच काही कविता एक दोन भागात मिळून.

गोधडी प्रेमाची ........

जगणे जणू आपुले असे
गोधडीचे टाके जसे

एक टाका प्रेमाचा
वर्षाव आपुलकीचा

एक टाका मैत्रीचा
झरा अखंड हास्याचा

एक टाका हितगूजाचा
अव्यक्तातून व्यक्ताचा

एक टाका स्पर्शाचा
मोहरत हरखण्याचा

एक टाका नजरेचा
शब्देविण संवादाचा

एक टाका आठवणींचा
क्षण पुन्हा जगण्याचा

एक टाका विरहाचा
भरून आलेल्या आभाळाचा

एक टाका अश्रुंचा
सयींसह बरसण्याचा

एक टाका तुझा, एक टाका माझा
समांतर राहूनही, एकरूप होण्याचा


२) नाते.........
नात्यांचे बंध
बांधलेली मने
उमलणारी नाती
प्रेमाची झुळूक लाभताच
कोमेजणारीही नातीच
अंतराची झळ लागताच
जाणिवेतील बंध
नेणिवेत जाताना
क्षितिजच बदलून
टाकणारे तुझे माझे
नाते..........
नात्यांचे बंध
बांधलेली मने
मन तुझे मन माझे.....


३) सहजच.............
सहज कधी काही बोललो
सहज एका वाटेवर चाललो
चालता पावलांसवे एके दिवशी
सहजच प्रेमाच्या गावाशी पोचलो
सहजपणे जुळले बंध,
सहजच जुळले धागे
आपुले एकाकीपण मग
सहजच कसे मग पडले मागे
सहज मग लागे आस
सहजच नकळे जडला ध्यास
जगावेगळ्या अद्वैताचे
सहजच मग होती भास
सहज असा सूर सदा जुळावा
सहजच प्रवास मिळूनी घडावा
आनंदाच्या या वाटेवरती
सहजच अंतरातला गळो दुरावा


Saturday, December 6, 2014

अंतर .....


एखादी कल्पना मनात यावी आणि शब्दांनी तिचा पाठलाग करत एका पाठोपाठ हात धरून यावे आणि कवितेचा जन्म व्हावा, हे भाग्य कधीतरीच लाभणारे. त्यामुळे जशी सुचत गेली तशी च्या तशी कोणत्याही संस्कारांशिवाय ही कविता! 

दु:खाची परिभाषा 
अश्रुंचे पूर 
ते पुसणारे हात 
का कितीतरी दूर 

आठवणींचा उमाळा 
वेदनेचे कातर सूर
ते ऐकू जाणारे कान 
असती मैलोनमैल दूर 

नजरेची साद 
नयनच आतूर 
प्रतिसाद देणारे डोळे 
आता कितीतरी दूर 

पौर्णिमेची रात्र 
चांदणे टिपूर 
चांदण्यांनी ओंजळ भरणारा 
मात्र चंद्रासारखाच दूर

सहवासाची ओढ 
शब्दांचे काहूर 
समजणारया मनानेही 
का राहावे मनापासून दूर 

Tuesday, May 6, 2014

तुझ्या आठवणी

अशा कातर वेळी 
खिडकीशी उभी मी 
पहात राहते क्षितिजापर्यंत 
पोहोचलेले हे गाव 

नजरेच्या टप्प्यात अनेक 
ओळखीच्या जागा 
तिथपर्यंत नेतात मला 
आठवणींच्या पायवाटा 

आठवणी तरी कशा ?
नुसत्याच सैरभैर 
कोणाला आवतण देते कोण 
कोणाचा हात धरून येतं कोण 

असाच असतो 
एक एक दिवस त्यांचा 
त्यांच्या साथीने तुझ्यासह 
काही क्षण जगण्याचा 

भरभरून जगते मी हे क्षण 
ते माझे आपले असतात 
तुझ्यापेक्षा तुझ्या आठवणीच 
माझी जास्त सोबत करतात 

Monday, April 14, 2014

पुन्हा एकदा नव्याने....................

आज पुन्हा एकदा नव्याने 
अलवार जाग आली 
रातीची बरसात तुझी चाहूल देऊन गेली 

आज पुन्हा एकदा नव्याने 
मी न्याहाळले मलाच 
एकटक तुझी नजर माझे काळीज छेदून गेली 

आज पुन्हा एकदा नव्याने 
माळला मी गजरा 
फुले मोगऱ्याची गंध तुझाच पसरवून गेली 

आज पुन्हा एकदा नव्याने 
तुझ्या सयीत  रमले
ती चांदणभूलच माझी ओंजळ रिती करून गेली 
आज पुन्हा एकदा नव्याने 
मी काही क्षण जगले 
लागलेली तुझी आस सखया मग मलाच मिटवून गेली

Saturday, January 18, 2014

रंजिश ही सही.................

रविवारची सकाळ …प्रसन्न सकाळ म्हणू हवे तर. अदल्या दिवशी संध्याकाळीच बऱ्याच  दिवसांनी जुना ग्रुप भेटल्यामुळे मूडही तसा आपसूकच छान  बनलेला होता. पेंडिंग कामे संपवावीत म्हणून सिटीत जायचा प्लान ठरलेला, लेकीचा जर्मनचा क्लास ही होताच तिला तिथे सोडून कामे संपवावी आणि परत येताना तिला घेऊन परत यावे हा उद्देश. 

सगळी कामे मनाजोगी झटपट होत गेली, वेळेच्या थोडी आधीच तिच्या क्लास मध्ये पोहचले. गाडी  पे and पार्क मध्ये लावलेली असल्याने ती थोडी लांब, मग दोन्ही हाती सामानाचे ओझे. लेकीशी आधी ठरल्याप्रमाणे ती ज्यांच्या कडे जर्मन शिकायला जाते, त्यांना क्लास सुटण्याच्या वेळी भेटायला जायचे होते. तिने आधीच सांगितले होते की त्यांचे घर तिसऱ्या मजल्यावर आहे आणि लिफ्ट नाहीये. अरे देवा !

ठरल्या वेळी तिथे पोहचले, हाश हुश करत … एका व्यक्तीने दार उघडले, त्यांना सांगितले मला "मिसेस …  " यांना भेटायचे आहे, त्याने आत जाऊन सांगितले असावे, त्या बाहेर आल्या. त्यांना ओळख सांगितली. त्यांनी आत येउन बसा, माझा क्लास संपायला थोडा वेळ लागेल असे सांगितले. तो पर्यंत त्यांनी पाणी दिले आणि आरामात पेपर वाचत इथे बसा असे म्हणून त्या ही  आत निघून गेल्या. पाण्याचा ग्लास रिकामा करून मी थोडी स्थिरावले, सकाळीच निवांत पेपर वाचून झाल्याने त्यात मला फारसा रस नव्हता तरीही तो हाती घेऊन  मी त्या दिवाणखान्याचे निरीक्षण करू लागले. अगदी राहते वाटावे असे घर. मला अशी जिती जागती घरे आवडतात. नीट नेटकी पण इतकीही नव्हेत की इथे कोणाचा वावर आहे की नाही हा प्रश्न पडावा. घर म्हणजे कसे की  थोडे अस्ताव्यस्त पण त्यातल्या माणसांचे प्रतिबिंब वाटावे असे. पहिल्याच नजरेत माणसांची न पाहताही चित्रे नजरेसमोर उभी रहावीत असे घर! हे नक्कीच तसे होते.   

भाषा विषयक पुस्तके टी पॉय वर, खाली होती, तिथेच ज्योतिषा वरील पुस्तके, समोर wall युनीट वर दोन तीन गाड्यांची मिनिएचर्स. तिथे एक म्युझिक सिस्टीम, अनेक सी डी त्याच्या आस पास. खाली एक जणू आताच वाजवताना कोणी उठले आहे असे वाटायला लावणारी एक तबला -डग्ग्याची जोडी. सारे घरदारच घरातल्याच्या संगीताच्या आवडीची साक्ष देणारे. अगदी पहिल्याच नजरेत मला हे घर आवडून गेले. 

यात पाच दहा मिनिटे गेली. तेव्हद्यात बाहेरून किल्लीने दार उघडून कोणी आत येत असावे असे वाटून मी त्या दिशेस पाहू लागले. एक व्यक्ती हातात एक दोन सामानाच्या पिशव्या घेऊन आत शिरली. वय फार वाटणार नाही असे व्यक्तीमत्व, म्हणजे नसेलही तिशीच्या आसपास.हसरा चेहरा.  आपसूकच मी हे ते मि. ……. हे ओळखले. त्यांनी ही या कोण आपल्या घरात आहेत असे मनातले भाव चेहऱ्यावर येवू न देत, एक हलकेसे स्मित करत हातातील समान आत नेवून ठेवले. दुसऱ्या खोलीमध्ये जिथे क्लास चालू होता तिथे नजर टाकून ते पुन्हा बाहेर आले. मला म्हणाले, " ……. चा क्लास चालू आहे, थोडा वेळ लागेल तिला" मी बर ठीक आहे म्हणाले. मनात विचार, "ज्या अर्थी कोणीतरी मला घरात घेतलं आहे त्या अर्थी त्या व्यक्ती ने  मला हे सांगितले असेल न रे बाबा" 

पुन्हा ते आत गेले, पाण्याचा ग्लास घेवून बाहेर. मी त्यांना धन्यवाद देत माझे  पाणी आताच पिऊन झाले आहे, मी आले तेंव्हा मिसेस ……. यांच्याशी बोलले होते, infact मी त्यांच्याशीच  काही बोलायला आले आहे, आणि त्यांना थोडा वेळ लागेल याची कल्पना त्यांनी दिलेली आहे हे सांगितले. ते ही बर बर म्हणत म्युझिक सिस्टम कडे वळले. आता काय सुरु होणार या उत्सुकतेने मी हातातल्या बळेच घेतलेल्या पेपर मध्ये डोके आणि कान सारे तिकडे. त्यातली एक आधी कदाचित चालू असलेली सी डी चालू करून ते आत किचन मध्ये वळले. 

काही क्षणातच माझी सर्वात आवडती गझल ……मेहंदी हसन यांची …रंजिश ही सही …… आणि त्याची सुरावट कानी पडताच आता काय आपले कान तृप्त करणार आहेत या जाणीवेने माझ्या आधीच गोल असलेल्या चेहऱ्यावर अजून पसरलेले हसू. आता थोडा अजूनच वेळ लागू दे हा क्लास संपायला असा चमकून गेलेला विचार! एखाद्या सुंदर सकाळी यापेक्षा अजून काही मी नाही मागणार! खरच त्यासाठी त्या रसिकाचे मनापासून आभार! 

ही गझल संपूर्ण ऐकणे, समजून घेत ऐकणे हा इतका सुंदर अनुभव असतो न. प्रेमात पडणे म्हणजेच एका हव्याहव्याशा दु:खाला जवळ करणे. तर मग दुरावलेल्या सख्याला साद घालताना तर त्या दु;खाच्या अभिव्यक्तीची परिसीमाच व्हावी. पण असे असतानाही इथे असे होत नाही. हे एकमेकांना आता आपण संपूर्णपणे दुरवलोच आहोत, तुझ्या परत येण्याने सर्व काही परत पुन्हा पहिल्या सारखे होण्यासाठी  नाहीच तर पुन्हा मला सोडून जाण्यासाठीच तू ये अशी ही साद! माझ्या आयुष्यातून तुझे असे वजा होत जाणे, मला पुन्हा ते दु:ख देखील खूप हवे हवेसे वाटू लागले आहे कारण ते तूझ्यामुळे मिळालेले आहे. 

अशी काव्ये त्यांचा अर्थ लावत आणि सांगत बसूच नये, इतका जिवंतपणा, अर्थाने इतकं हृदयात खोलवर रुजण्याची भाषाशैली हे काव्य. अहमद फराज ह्या माणसाकडे प्रत्येक भावनेच्या अभिव्यक्तीसाठी इतके चपखल शब्द कसे होते हे कोडे मला कधीच उलगडत नाही. शब्दांची निवड, त्यांची जागा, त्यांचे वजन याची इतकी सुंदररित्या गुंफण केलेली असते की अनेकदा तुम्ही एखाद्या शब्दाला पर्यायी शब्द शोधू पाहाल तर शक्यच नाही. त्यातून काही शब्द जसे की "दिल-ए-ख़ुश’फ़हम, पिन्दार-ए-मुहब्बत किंवा "ऐ राहत-ए-जाँ" हाच अर्थ पोचवणारे, इतकेच शब्द सौंदर्य असणारे शब्द कुठून उसने आणाल?
एक खानदानी आब असणारी उर्दू भाषा! क्या कहने!

जे आता कधी घडणार नाही, जे प्रेम आता माझ्या कधी वाट्याला येणार नाही,  तू कधी मागे वळून पाहणार नाहीस पण मी तुला साद घालणे कशी सोडू? विरहाशिवाय आणि त्याच्या दु:खाशिवाय दुसरे काही पदरी पडणार याची खात्री असताना मागितलेले हे दान ! जे मनपासून घडावेसे वाटते ते घडणार नाही, पण त्या खेरीज इतर काही माझे मागणे नाही….काही  मिळणारच  असेल तर फक्त तू आणि तूच परत ये … 

तशा अनेक गझल्स ज्या फराज यांच्या  मनात अगदी खोलवर रुजलेल्या आहेत, पण हिची बरोबरी कोणी करू शकत नाही.कानाने ऐकत राहावी, हृदयात साठवत राहावी, पहिल्यांदाच ऐकताना ती वेदना तुम्हाला आतून  हलवून सोडते, हळू हळू तुम्ही त्या वेदनेच्या हुंकारांशी जोडले जाऊ  लागता अन कणाकणाने तुम्ही ते क्षण जगू लागता!
....................................................................................................................

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिये आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिये आ

पहले से मरासिम ना सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रह-ए-दुनिया ही निभाने के लिये आ

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से ख़फ़ा है तो ज़माने के लिए आ

अब तक दिल-ए-ख़ुश’फ़हम को तुझ से हैं उम्मीदें
ये आख़िरी शम्में भी बुझाने के लिए आ

इक उम्र से हूँ लज़्ज़त-ए-गिरिया से भी महरूम
ऐ राहत-ए-जाँ मुझको रुलाने के लिये आ

कुछ तो मेरे पिंदार-ए-मुहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझको मनाने के लिये आ

एक उम्र से हूँ लज़्ज़त-ए-गिरिया से भी महरूम
ऐ राहत-ए-जाँ मुझ को रुलाने के लिए आ 

-अहमद फ़राज़

Wednesday, October 10, 2012

सांग सखया.........

चालताना तू थोडा थबकलास

नुसताच थबकलास का

दूरवर सोबत करण्याचा

विचार तुझा बदललास?


हाक मारताना तू अडखळलास

नुसताच अडखळलास की

ओठात माझेच नाव असण्याचा

तुझा रिवाज तू बदललास?


बोलताना तू जरासा थांबलास

नुसताच थांबलास की

माझ्यापाशीच मन मोकळे करण्याचा

तुझा हक्कच तू विसरलास?


निरोपाच्या क्षणी तू आवंढा गिळलास

नुसताच आवंढा गिळलास की

आयुष्यातून मला वजा करताना

स्वत:लाच भागून मोकळा झालास?


खरं सांग, सारे काही विसरलास? सारे काही संपले?

खरच संपलय कि

आजही प्रीतीचे नाव घेता

तुझे जग सारे माझ्याशीच येऊन थांबलंय

Wednesday, January 11, 2012

छोट्या छोट्या गोष्टी वरून इतके वाद......

उगीच काय रे छोट्या छोट्या गोष्टी वरून इतके वाद

मला सोडून देण्याचा हा तूझा भलता नाद

जरा कल्पना करुन पहा त्या सुन्या दिवस रातींची

आणि भकास विरलेल्या आयुष्याची.....................

मी गेल्यावर तुझे मित्र टोळ घालतील धाड़ घरी

कोमेजुन जातील माझी सारी वृक्ष वल्लरी

वाहू लागतील वारुणीचे पाट

आपल्या नीट नेटक्या घराची लागेल वाट

मजा वाटेल चार दिस, वाटेल झाली सुटका

मित्र देतील साथ घटिका दोन घटिका

मग उरेल मागे सुने सुने आयुष्य

घरातील प्रत्येक गोष्ट देईल आठवण फक्त माझी

म्हणून म्हणते जरा कल्पना करुन पहा

त्या सुन्या दिवस रातींची आणि भकास विरलेल्या आयुष्याची...........

Wednesday, December 21, 2011

आरसाही खोटे बोलतो



आरसाही खोटे बोलतो

पाहू जाता मला रूप तुझेच दावतो
मोगराही खोटे बोलतो
माळता केसात त्यास गंध तुझाच दरवळतो
कशी ही तुझी भूल पडली मला
की शिशिरातही आठवे मज मोगरा 


Monday, December 19, 2011

समजून घे रे समजून घे


तूच तो निळासावळा
तीच ती मी तुझी राधा
तीच आपूल्या प्रीतीची गाथा
समजून घे रे समजून घे 


फुलतो दारात मोगरा
पाहते त्यातही तुजला
माळीते केसात त्याचाच गजरा
समजून घे रे समजून घे


पडला मागे तो आपुला गाव
आणते खोट्या सुखाचा आव
अन् झूरते क्षणोक्षणी तुजसाठी
समजून घे रे समजून घे

Wednesday, September 7, 2011

कोण्या देशीचे पाखरू


मी काही दिवसांपूर्वी ब्लॉगवर लिहिलेल्या कवितेला, माझया ऑफीस ब्लॉग वर मिळालेले हे उत्तर. मूळ कविते इतकच सुंदर!

कोण्या देशीचे पाखरू उतरले मनाच्या अंगणात
बांधले घरटे जमवूनि काडी काडी
नाचले बागडले मनमुक्त विहरले
व्यापून टाकले सारे अवकाश त्याने

मी ही वेडी सुखावले
वाटले हे सारे आपुल्यासाठीच
हे घरटे त्याचे नि माझे,
फुलवलेला पिसारा ही माझ्याचसाठी

अंगणात वेचायचे दाणे संपले कदाचित
जन्माच्या शपथा बांधू नाही शकल्या
मोडून घरटे निघाले पाखरू
आता कशी मना सावरू


अधीश गोखले-


वेचावयाचे दाणे, अनेक होते,
बंध युगांचे, बांधेलच होते,
तरीही निसर्गाचे, नियम अनेक,
पालन कराया, पाखरू उडाले,

ऋतू बदलला, गारेगार झाला,
घरटे मोडुन पक्षी उडाला,
त्याच्या स्वत:च्या स्वप्नांच्या गावी,
जिथे उन्हाची ऊब असावी,

येईल उन्हाळा तेव्हा परतेल,
काड्या जमवूनी, घरटे करेल,
पुन्हा आनंदे, फुलवेल पिसारा,
वाहतील आनंद अश्रूंच्या धारा

Thursday, August 11, 2011

Poet Borkar Speaking

बोरकरांजवळ कवितेची एक मस्ती होती....अवधूती मस्ती...त्यांच्या चिरतारुण्याचा रहस्य त्यांच्या या मस्तीत होतंगोव्याच्या लॅटिन संस्कृतीचा मन्मुक्त संस्कार त्यांच्यावर होता हे तर खरच....पण त्यांच्या तरुणपणाला फुलवणारी पहिली घटनाच मोठी गोड आणि आठवणींनी हृदयात कळ उठवणारी होती.
शाळेत शिकत असताना एकदा जिन्यावरून खाली येणार्या बोरकरांचे डोळे एका मुलीने झाकले आणि त्यांचा गालावर ओठ टेकवून ती पळून गेली....:) बोरकर मात्र त्या क्षणी जे झिणझिणलेते आयुष्याचा अखेरपर्यंत झिणझिणतच राहीलेस्त्री ही त्यांच्यासाठी नेहमीच एक प्रेरक शक्ति बनून राहिली...एक विलक्षण गूढ आकर्षण बनून राहिली....

Tav nayananche dal halale ga
panavarachya davbindupari
tribhuvan he dalmalale ga || Dhru ||

Taare galale, vaare dhalale
diggaj pachananase valale
giri dhasalale sur kosalale
hrushi, muni, yogi chalale ga || 1 ||

Hrutuchakrache aas udale
abhalatun shabd nighale
aavar aavar apule bhaale
meen jali talamalale ga || 2 ||

Hrudayi majhya chakmak jhadali
najar tujhi dharanila bhidali
do hrudayachi kimaya ghadali
punarapi jag saavarale ga || 3 ||

Thursday, July 7, 2011

उमलत्या कळीचे सर्वस्व तूच होतास
थरथरत्या अधरांवर नावही तुझेच होते
मुक्याच होत्या भावना कळीच्या
तुला जरी ना कळल्या परि तूझ्याचसाठीच होत्या


दरवळताना शब्द तुझे मोगर्‍यापरी
गंधित अधरांवर नाव तुझेच होते
मुक्या भावनांच्या झाल्या मुक्या वेदना
तुला जरी ना कळल्या परि तूझ्याचसाठीच होत्या

Wednesday, July 6, 2011


नाते क्षणांचे न कळे झाले कसे युगांचे
ऋतूगंध त्या क्षणांचा अजूनही मोहवी
सारे तुझेच होते सारे तूझयाचसाठी
माझी न राहीले मी सर्वस्व तूजला वाहूनी

Thursday, June 23, 2011

तू

पौर्णिंमेचं टिपूर चांदणं तू
अन् चांदण्या राती सागराची गाज तू
आयुष्यातील सुंदर अशी पहाट तू
पहाटे गाऊन जागवणारा कोकीळ तू
अवचित येऊन सुखवणारा वळीव तू
धुव्वाधार कोसळणारा आषाढघनही तूच
मनात सदैव गुंजणारे गीत तू
कातरवेळी डोळ्यांत येणारं पाणी तू
मनात भरून उरलेले सुखाचे क्षण तू
आयुष्याच्या जमाखर्चात उरणारी बाकीही तूच
अश्रूंवाटे झिरपणारे दु:ख तू
अन् दाटून येणारा कंठही तूच
माझा ध्यास तू माझा श्वास तू
सर्वकाही मिळूनही उरणारी आस तूच
सारंकाही तूच तू उरते कुठे मी
तरीही माझीया स्वप्नातला भास तू


Monday, June 20, 2011

मैत्र जीवाचे

एक सुंदर असं नातं जन्माला यावं

कोणी मैत्र जीवाचं होऊन राहावं

नात्याला नको कोणतंच नाव

त्याने फक्त घ्यावा माझया मनाचा ठाव

नको कोणती अपेक्षा नको कोणती देवाण घेवाण

त्याने काही बोलू नये मी काही सांगू नये

अन् तरीही या ह्रुदयीच त्या ह्रुदयी पोहोचत राहावं