Showing posts with label चूकतमाकत शिकताना. Show all posts
Showing posts with label चूकतमाकत शिकताना. Show all posts

Saturday, December 7, 2013

श… श शेअर बाजाराचा!

अर्थकारण कळत नसण्याच्या वयापासून ते पुढील अनेक वर्षे "शेअर बाजार" हा नोकरी व्यवसाय यापेक्षाही भरपूर प्रमाणात पैसे कमावण्याचा मार्ग आहे हि एक माझी ठाम समजूत होती. आणि त्यातून जर तुम्ही कधी स्वत:बद्दल एखाद्या कुडमुड्या कडून तुमच्या पालकांना किंवा तुम्हालाच  जर हे सांगताना ऐकलं असेल की "नशिबाचा खूप पैसा आहे, अचानक धनलाभ आहे नशिबात"  तर मग काय विचारायलाच नको!

अशी मीच एकमेव नाही तर अनेकजण असतील…. खात्रीने सांगते की या मंडळीनी आयुष्यात किमान एकदा शेअर बाजारातून पैसे थोड थोडके नाही तर बक्कळ पैसा कमवायचा विचार केला असेल. इतकेच नव्हे तर आपले हात ही येथे पोळून घेतले असतीलच. 

आयुष्याच्या एका टप्प्यावर जेंव्हा घरासाठी वेळ द्यावा असे वाटत होते, त्यामुळे पूर्ण वेळेची नोकरी करूच नये अशी इच्छा होती, पण अर्थार्जन ही सर्वार्थाने सोडून द्यायचे नव्हते, तेंव्हा दुसरा कोणता पर्याय निवडावा असा जेंव्हा प्रश्न समोर होता तेंव्हा खरे तर अनेक पर्याय डोक्यात रुंजी घालत होते, ज्यांना उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहायला आवडतात त्यांचे काय विचारता? एक भले मोठे, अद्ययावत आणि मागाल ते पुस्तक चुटकीसरशी मिळेल अशी लायब्ररी सुरु करायची होती. कदाचित बालपणीचा मोठा काळ पुणे मराठी ग्रंथालयाच्या सानिध्यात गेल्याचा परिणाम असेल म्हणा, जेंव्हा पुण्यात डेक्कन वर मक्डोनाल्ड्स  आणि पिझ्झा हट  यांचे आगमन होत होते, तेंव्हा मी पिंपरी चिंचवड मधे असा फूड जोइण्ट सुरु करायची स्वप्ने बघत होते, ही गोष्ट आहे साधारण १९९८/९९ ची आणि चिंचवड मध्ये मक्डोनाल्ड्स पहिले अवतरले ते २००५/६ मध्ये. किंवा इच्छा होती असा एखादा फूड जोइण्ट सुरु करण्याची जिथे काही खास इंडियन डेलिकसीज बनवल्या जातील, जिथे बनणारे पदार्थ हे पोषण मूल्यांच्या तक्त्यात खूप वर असतील आणि टेस्ट मध्येही सर्वोत्तम ठरतील…………एक न दोन!

या गोष्टी मुळातच खूप मोठी गुंतवणूक असणारी होत्या पण त्याचकाळात मनात कुठेतरी शेअर बाजारातून आपण पैसा कमवू शकू असे वाटू लागले होते. तत्पूर्वी काही जणांना एखादा शेअर सुचवून पहिला होता आणि त्याला त्यात थोड्या कालावधीत फायदा होतानाही दिसला होता. डिजिटल व्यवहारांना नुकतीच सुरुवात झाली होती, CNBC सारख्या chaanel वर अखंड बडबड करणारी काही हुशार माणसे  अवतीर्ण झाली होती, त्यांच्या जोडीला अनेक ब्रोकरेज फर्म्स  मधील काही मंडळी  दिवसभर या चर्चा करत असत. अनेक ब्लू चीप कंपन्याचे शेअर कवडी मोलाने विकले जात होते तर  Infosys, सत्यम, विप्रो यांचे भाव रोज नवे उच्चांक दाखवत होते, आज बाजारात नामोनिशाण नसलेल्या अनेक डॉट- कॉम कंपन्या भूतो न भविष्यती असे रोजचे भाव दाखवत होत्या आणि अनेक ब्रोकर्स ह्या कंपन्या बाजाराला उद्या परवा अजून कुठल्या कुठे नेवून ठेवतील याची भली स्वप्ने दाखवत होते. बाजाराने पहिल्यांदा ६००० ची पातळी  एकच दिवस गाठली होती. इतक्या साऱ्या पूरक गोष्टी असताना या शेअर बाजाराने भुरळ पाडली नसती तरच नवल!

काळाच्या थोडी  पुढची स्वप्ने हे तेंव्हाही होतेच त्यामुळे पुणे शेअर बाजाराचा अध्यक्ष असणाऱ्या माझ्या एका ओळखीच्या गृहस्थाना विचारलं की ऑन लाईन ट्रेडिंग करता येईल का? त्याने उत्तर दिले की सर्व सामान्य लोकांना हे करता यायला बरीच वर्षे लागतील. मग एक मित्र जो एक ब्रोकरचे टर्मिनल घेवून हेच काम करायचा त्याच्याशी सौदा ठरवला, मी त्याला फोन वर ओर्डर द्यायची, त्याने माझ्यासाठी ते शेअर घ्यायचे /विकायचे. छोट्या छोट्या ऑर्डर्स मी ठेवू लागले थोडासा फायदा दिसू लागला मग मोठ्या मोठ्या सुरु झाल्या, डे  ट्रेडिंग नसल्याने आठवडा मिळत असे …. मग एक दिवस असा आला  अर्थ संकल्पाच्या दिवशी मार्केट वर जाणार या अपेक्षेने काही मोठ्या पोझिशन्स घेवून ठेवल्या. साधारण ११/१२ च्या सुमारास तो सुरु झाला आणि मार्केट ने जी उतरण दाखवायला सुरु केली, एकाच दिवसात एक भला मोठा फटका माझ्या वाट्याला आला की पुनः मी या गोष्टी कडे आपला व्यवसाय म्हणून पाहू नाही शकले. ६००० चा टप्पा २००० साली गाठलेल्या बाजाराने जवळपास २००३ मध्ये २९००ची पातळी दाखवली. 

याच सुमारास माझी ओळख डोंबिवलीमधील एका ज्योतिषांशी झाली. माझा या गोष्टी वर विश्वास आहे, आणि ते शेअर बाजार आणि ज्योतिष शास्त्र यातील चांगले जाणकार म्हणून ओळखले जातात. त्यांना जेंव्हा मी असे का झाले असावे असे विचारले तेंव्हा ते म्हणाले " असे एक एक धडे आयुष्य शिकवत असते, आपण त्यातून बोध घ्यायचा असतो, तुमच्या नशिबी असा बिन कष्टाचा ,फुकटचा पैसा नाही, पैसा तुम्ही कमवाल पण  तो फक्त स्वतच्या कष्टाचाच असेल, एक दिवस असा येईल की तुम्ही अशा मार्गाने पैसे कामावता येतात या गोष्टीला  हसाल. पुढे त्यांच्याशी संपर्क राहिला नाही, पण या त्यांच्या वाक्याने आयुष्याला दिशा दिली. थोडे दिवस विचार करण्यात गेले, हळू हळू नवीन मार्गावर वाटचाल सुरु झाली. 

आज अनेक टेक्निकल बाबी मला काळात नाहीत  किंवा त्या शिकून घेण्याइतका माझ्या कडे वेळ नाही. पुट/ कॉल ऑप्शन, मुव्हिंग अव्हेरज  आणि  काय काय ते. पण याचा अर्थ मी इथे नसतेच का तर तसं मुळीच नाही, पण आता पद्धत थोडी बदलून गेली. थोड्याच प्रमाणात पण फक्त delivery based करण्यासाठीच मी शेअर बाजाराकडे पहाते. काही माझे लाडके शेअर्स आहेत तेवढ्यानवरच नजर ठेवून मी असते, त्यांनी मला आजतागायत कधी निराश नाही केले. 

पण या शेअर बाजाराबद्दलचे प्रेम आजही कमी झालेले नाही काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलून गेल्या, अनेक नवीन सोफ्टवेअर्स आली, मोबाईल वरून ट्रेडिंग चुटकीसारखे होवू लागले, ब्रोकर नावाच्या माणसाची गरज भासेनाशी झाली, शेअर्स नव्हे तर कमोडीटी, forex यात ट्रेडिंग करता येवू लागले, पण मुंबई शेअर बाजारचे महत्व काही उतरले नाही, फरक पडला "निफ्टी" च्या आगमनाने पण तरीही…  क्षणात जादूची कानडी फिरवल्यागत कोणाची चांदी होईल, तर क्षणात रावाचे रंक ही इथेच होताना दिसतील. माठ मोठ्या Management/business schools मधून पदव्या घेवून बाहेर पडून कोणत्या तरी टी व्ही chanels च्या बड्या बड्यांचे  अंदाज चुकवत राहील. पिढ्यान पिढ्या येत जात राहतील पण बाजार आपल्याच मस्तीत आपली दिशा बदलत राहील.

Saturday, February 9, 2013

एक धडा.............


दिवसाकाठी अनेक गोष्टी घडत असतात, त्या अनुभवतानाच या शब्दबद्ध कशा रीतीने करायच्या याचाही मनात विचार सुरू असतो. त्याप्रमाणे अनेकदा रात्री घरी आल्यावर मी लॅपटॉप उघडून बसते देखील, पण त्याच वेळी मनात लिहावे-नलिहावे याचे द्वंद्व सुरू असते. सद्ध्या तरी रोज "न लिहावे" याच बाजूने निकाल लागतोय. काय म्हणावे यास...आपल्याच कोषात जाणे? किती दिवस चालणार हे असे? डिसेंबर मधे मी एक गोष्ट लिहायचा प्रयत्न केला, त्याचे पुढचे २ भागही एका दमात तेंव्हा लिहिले गेले होते, पण  ते पोस्ट करण्याची इच्छाच जणू मरून गेली. अनेक दिवसांत मी माझ्या स्वत:च्या "मी....माझे....मला" कडे बघितलेदेखील नाहीये. माझ्या बाकी सार्‍या ब्लॉग मित्र मैत्रीणींच्या ब्लॉगवर मी अधून मधून डोकवते देखील ... पण लिहीत मात्र नाहीये.

तशा मी रोजच्या रुटीनच्या बाकी सगळ्या गोष्टी करते, घराकडे लक्ष देते, नवरा लेकीशी गप्पा होतात, ऑफीसला जाते, जिमला जाते, चांगली गाणी ऐकते, गप्पा मारते, सभोवताली घडणार्‍या गोष्टींवर बोलते ही, मान्य की चांगल्यापेक्षा वाईट गोष्टींचं प्रमाण जास्त असते. रात्री घरी येऊन ठराविक कार्यक्रम टी.व्ही. वर पाहते, स्वत:बरोबर अनेक कडवट घटना नेहमीप्रमाणेच "जाऊ दे ना" म्हणत मागे टाकते. पण लिहीत मात्र नाहीये.

आज मी एक धडा शिकले. तो मात्र मी लिहिलाच पाहिजे. आपण नेहमी म्हणतो "गोष्टी वेळच्या वेळी कराव्यात" ....याच बाबतीतला एक धडा मी आज शिकलीय... आणि सकाळपासून तो माझ्या मनात घर करून आहे. आज मी गेले होते सकाळी एका गाण्याच्या वर्गाच्या एका कार्यक्रमाला. माझी लेक या क्लासला जाते. गेले काही दिवस त्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती.

कॉलेजला असताना माझ्या एका मैत्रीणीची बहीण होती, जी तेंव्हा संगीत घेऊन बी.ए. करत होती. अधूनमधून आम्ही भेटत असू, तिचं गाणं ही कधीतरी ऐकत असू. नंतर ती गाण्याचे कार्यक्रम करू लागली. अशाच कार्यक्रमांचे निवेदन उत्तम रीतीने करणार्‍या एका उमद्या तरुणाशी ओळख आणि नंतर प्रेमविवाह ही झाला. मधली काही वर्षे मी इथे नव्हते, काही वर्षांनी जेंव्हा परत आले, तेंव्हा या जोडीचे या शहरात चांगलेच नाव झालेले होते, एक दोन वेळा आमची भेट झाली देखील. संस्कृती लहान असताना जेंव्हा तिला गाणे शिकवायचा विचार आला तेंव्हा हिचेच नाव समोर आले, आणि त्याप्रमाणे संस्कृती तिच्याकडे गाणे शिकू लागली. त्या निमित्ताने आम्ही अधून मधून भेटू लागलो. पण पुन्हा काही कारणानी संस्कृतीचे गाणे थांबले, आणि आमच्या भेटीही.

सात आठ वर्षे मधे अशीच गेली. अजून एका मैत्रीणीच्या बोलण्यातून हिची खुशाली कळे. गेल्यावर्षी एप्रिलमधे एकदा दुपारी मैत्रीणीचा फोन आला "अनघा, "XXX"च्या मिस्टारांचा अपघात झालाय, आय.सी.यू.मधे आहेत ते" हे ऐकून थोडे सुन्न व्हायला झाले. नंतर थोड्याच वेळात भावाचा फोन आला, हीच बातमी सांगणारा. नंतरचे ३/४ दिवस या बद्दल मैत्रीण आणि भावाकडून त्यांच्या खालावत जाणार्‍या तब्येती बाबत. एक दिवस त्यांच्या जाण्याची बातमी आलीच. मैत्रीण आणि माझा भाऊ तिथेच होते. माझा आणि तिचा भाऊ हे गेली अनेक वर्ष चांगले मित्र आहेत. एकदा मनात विचार आला होता, तिला भेटायला जाण्याचा. पण का कोण जाणे तो मी टाळला, बरेच वर्ष काही संपर्क नसताना अशा प्रसंगी जाऊन काय बोलायचे. कोणाच्या शब्दांनी हलके व्हावे इतके लहानसे दु:ख नव्हते तिचे. चाळिशीत जोडीदार अचानक सोडून जातो, मागे त्याचे आई वडील, आपण आणि आपला मुलगा ठेवून ....तेंव्हा ते दु:ख काय असते हे मी माझ्या लहानपणी अनुभवलय. त्या नंतर काही दिवसांनी तिने गाण्याचे वर्ग पुन्हा सुरू केलेले पण मैत्रीणी कडून कळले. वाटले "बरे झाले, आता सावरेल थोडी." नंतर एकदा संस्कृतीने पुन्हा गाण्याचा विषय काढला आणि मी तिला फोन केला. तिच्याशी बोलले. दर्शनी तरी आता गाडी सावरलीये असे वाटून गेले. मध्यंतरी एकदा संस्कृतीला  मी मला गाणे शिकायचेय असे सांगितले, तिने तिच्या या ताईला सांगितले, निरोप आला "आईला म्हणावे, ये शनिवारी" मी म्हणाले "एवढे एक सर्टीफिकेशन आणि त्याची परीक्षा झाली की मग जायला लागेन"

आज सकाळी कार्यक्रमाच्या जागी पोहचले. आत शिरताच ती पुढे आली, आम्ही बोलू लागलो, आणि नकळत मला भरून येऊ लागले. स्वत:ला बर्‍यापैकी सावरत मी तिच्याशी बोलले. नंतर खुर्चीत जाऊन बसले आणि मग मात्र मी स्वत:ला थांबवू शकले नाही. तिच्या जोडीदाराच्या जाण्यानंतर तिने आयोजित केलेला हा पहिलाच मोठा कार्यक्रम होता. त्याना श्रद्धांजली वाहिली गेली. कार्यक्रमाला सुरूवात झाली, आणि निवेदन करणार होता तिचा ११/१२ वर्षांचा सुपुत्र. थोडाफार त्यांच्याच स्टाईलने त्याने काहीकाळ निवेदनाची धूरा छानपैकी सांभाळली. पण माझे मात्र डोळे सुरुवातीचा थोडावेळ भरून वहात राहीले.

एकीकडे ती ज्या पद्धतीने या प्रसंगातून धीराने बाहेर येते आहे, स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाला सावरते आहे, संभाळते आहे, लेकाला त्याच्या बाबांच्या मार्गावरून पुढे नेते आहे, कदाचित त्याच्या बाबांचेपण हेच स्वप्न असेल, हे बघून मला तिचे खूप कौतुक वाटत राहीले. त्या बरोबरच एकटीने हे सारे करण्याची वेळ नियतीने तिच्यावर आणली याचे वाईटही.
आणि धडा हा की "गोष्टी वेळच्या वेळी कराव्यात". त्या क्षणी तिला सावरण्यास अनेक हात तिच्यापाशी होते, माझ्या तिला भेटायला जाण्याने तिला काही फरक पडला असता, नसता, माहीत नाही. मला मात्र नक्कीच पडला असता. माझ्या भावनांचा योग्यवेळी निचरा झाला असता, आमच्या ओळखीतून जे बंध निर्माण झाले होते त्यासाठी तरी मी तिला भेटायला जायला हवे होते. ती तिची नाही तरी गरज माझी होती. ती जर मी वेळीच ओळखली असती असे अवेळीच डोळे भरून येण्याची वेळ माझ्यावर आली नसती.

Friday, August 24, 2012

घडलंय....बिघडलंय.....


"ह्याला निव्वळ माज म्हणतात" माझी एक कलीग खूप चिडून म्हणाली. 
"माज काय त्यात? तू खाऊन तर बघ." मी
"नाही खाणार, इथे लोकांना यावर्षी आंबे मिळत नाहीत, आणि तू आंब्याची कढी बनवून आणलीस, अजिबात खाणार नाही"
"अगं,  आता मला ही रेसिपी संजीव कपूरच्या पुस्तकात मिळाली, आणि घरात आंबे ही होते, मग म्हटलं पाहू बनवून, माज वगैरे म्हणत नाहीत हं याला"- मी

हा संवाद या उन्हाळ्यातल्या दुपारी जेवणाच्या टेबलवर घडला. पहिल्या घासाबरोबर लक्षात आले, या रेसिपीत काही मजा नाही म्हणून. पण बनवली होती मोठ्या उत्साहाने, खाणे भाग होते. मनातल्या मनात मी त्या पुस्तकातला "आंब्याच्या कढीचा" सुंदरसा फोटो आठवत कशीबशी संपवली ती. कलीगचा राग ही नवीन गोष्ट होती पण असे पदार्थ बिघडण्याची काही ही पहिली वेळ नव्हती.

लग्नानंतरचे  अगदी सुरुवातीचे दिवस, साबा आणि नवरा ऑफिसला जाऊ लागले होते, पण माझे सासरे मात्र घरी होते, त्यांची सुट्टी अजून शिल्लक होती. सकाळी नाश्त्यानंतर दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागले. फ्रीज मधून सिमला मिरची ओट्यावर काढून ठेवली होती. ते सहज आत डोकावले. मिरच्यांकडे पाहून म्हणाले " नारळ किंवा पीठ पेरून सुकी भाजी करू नकोस, रसदार भाजी कर". अरे बापरे, झाली का पंचाईत, सिमला मिरचीची रसदार भाजी कशी करायची ते मला माहित नव्हतं. विचारून कोणी सांगेल असं कोणी शेजारी पण नव्हते, आणि माझी ओळखही नव्हती. त्यांच्या समोर आई, काकू, आत्या यांना फोन करून विचारायचे धाडसही नव्हते. मुंबई-पुणे STD करावा लागायचे दिवस होते ते. नारळाचे वाटण करून रसभाजी बनवावी असा विचार केला. पण चांगली होईल अशी खात्री वाटत नव्हती. चेहऱ्यावर माझ्या अनेक प्रश्न होते. पुन्हा काही कारणांनी ते आत डोकावले. वाशीत अगदीच छोटंसं घर होतं आमचं. त्यांना माझा चेहरा वाचता आला असावा. सहज बोलल्यासारखे म्हणाले " काही नाही चिंच-गुळ, गोडा मसाला आणि दाण्याचे कूट, मस्त होईल भाजी, कर तू आपण खाऊ" भीतभीत बनवली आणि मस्त झाली भाजी. जीव भांड्यात पडला.

मग काही दिवसातच मी ही नोकरी करू लागले. साबा अनेकदा सकाळी ६ लाच घर सोडत, आणि आम्ही बाकी तिचे ८ ते ९ च्या दरम्यान एका पाठोपाठ. आपोआपच सकाळी आम्हा तिघांचे डबे मला बनवावे लागत. चुकत माकत बनवलेले पदार्थ असायचे डब्यात. छान झालेल्या पदार्थाची ते घरी येऊन लगेच तारीफ करत, पण बिघडलेल्या एखाद्या भाजी बद्दल एक शब्द ही कधी त्यांनी त्या सुरुवातीच्या दिवसात काढला नाही. ते सरकारी ऑफिसर होते, अनेक वर्षांची ऑफिसमधील मित्र मंडळी त्यांच्या सोबत लंचला असत, कसे त्यांनी ते असे पदार्थ त्यांच्याबरोबर शेअर केले असतील ह्या विचाराने मला खूप अपराधी वाटत असे. 

मग मी हळू हळू या कलेची पुस्तके जमवत गेले. निरीक्षण वाढवत गेले. कोणाच्या घरी गेल्यावर, निरीक्षण करू लागले तिथल्या स्वयंपाक  घराचे  आणि त्या अन्नपूर्णेचे. चाखत असलेला पदार्थ कसा बनवला असेल याचा विचार करू लागले. थोडा स्वत;च्या मेंदूला ताण देत प्रयोग करू लागले. अशाच  प्रयोगातून पहिल्या दिवाळीत "पुलाव" इतका सुंदर झाला. आधी साधीच रूपरेखा त्या पदार्थाची तयार होती डोक्यात. जस जशी तयारी करत गेले, तसतश्या एक एक वाढीव गोष्टी सुचत गेल्या, जसा की पाण्या ऐवजी दूध त्यात थोडे केशर, कांदा, बटाटा, काजू तळून, फरसबी, गाजर, मटार उकळत्या पाण्यातून काढून, फ्लॉवर थोड्या हळदीच्या पाण्यातून शिजवून. इतर मसाल्याबरोबर कोथिंबीर आणि पुदिनाही घातला. त्यात घालायला पनीर आणून ठेवले होते. खावा ही होता घरात. दोन्ही किसून घेतले. त्यात थोडी हिरवी मिरची, आले, लसूण वाटून घातले, मीठ आणि थोडे कॉर्न-फ्लोर. लहान गोळे बनवून ते तळले. असे हे सोनेरी गोळे शेवटी तयार पुलाववर पसरले. अहाहा काय स्वाद होता त्यात!

पुस्तकेही या बाबतीत कधी कधी चकवतात. अनेकदा लिहिल्याबर हुकुम पदार्थ बनवला तर बिघडू शकतो, जसे की हलके सोनेरी गुलाबजाम तळून घ्या किंवा कांदा गुलाबी होई पर्यंत तळून घ्या - जर शब्दश: तसे केले तर कच्चेच राहतील. तर काही जसे लिहिले तसेच बनवावे लागतात, आपली अक्कल चालवून त्यात काही बदल केले तर हमखास बिघडतात. जसे  मी एकदा "आंब्याचे मूस" बनवताना चालवले होते. लग्नाच्या वाढदिवसासाठी आदल्या दिवशी सेट करायला ठेवलेले "मूस" त्या नंतर चार पाच दिवसांनी सुद्धा सेट झाले नव्हते. 

बिघडणार्या पदार्थांना कसे वाचवायचे याचे कोडे हळू हळू सुटत गेले. गोड पदार्थांसाठी घरात पिठीसाखर, दुध पावडर, किंवा काजू बदामची पावडर असे हाताशी असले, आणि त्यावर थोडी मेहनत करायची तयारी असली की मग झालं. बिघडू पाहणाऱ्या तिखट पदार्थांसाठी उकडलेला बटाटा, ब्रेंड, मैदा असे पदार्थ उपयोगी पडू लागले. कधी कधी बिघडत जाणाऱ्यावर केलेला प्रयोग, ओरिजिनलपेक्षा सरस ठरला, आणि नंतर दर वेळी तसाच बनू लागला. जसे की एक वर्षी गणपतीच्या नैवेद्यासाठी मोदक बनवत होते. काही केल्या ते घट्ट व्हायलाच तयार नाहीत. अर्धी वाटी काजू आणि पिस्त्याची पूड त्यात घातली. चांगले न लागायला काय झालंय? दुसऱ्या दिवशी, गणपतीच्या सकाळच्या  आरती नंतर प्रसाद वाटून झाल्यावर बहिण आणि जावेला "कसे झालेत" असे विचारले. "Don't tell me! ये आपने घरपे खुद बनाये है?" - इति माझी अमराठी जाऊ. "तू केलेत ना, मग उत्तमच असणार, काही लोकांनी काहीही बनवलं तरी ते by default चांगलेच बनते"- इति बहिण.

काळासोबत मी  वेगळा आणि उत्तम पदार्थ सहजगत्या बनवू लागले. या बाबतीत मी माझीच स्पर्धक झाले. हळू हळू कोणी मला एखाद्या पदार्थाची रेसिपी कशी विचारू लागले मलाच कळले नाही. मुळातच या विषयावर बोलायला आवडत असल्यामुळे मी ही शक्य तितक्या डीटेलमध्ये ती रेसिपी शेअर करते. हातचं काहीही राखून न ठेवता! माझ्या हाताची जी चव आहे ती दुसऱ्या कोणाच्या हाताला कशी येईल ? कदाचित माझ्यापेक्षा ही उत्तम बनवेल. तरी हरकत नाही. 

माझ्या किचनरुपी प्रयोगशाळेत असे प्रयोग गेली अनेक वर्षे कधी घडले, कधी बिघडले. पदार्थ घडले किंवा बिघडले असं म्हणण्यापेक्षा त्यांनी मला घडवलं. चांगला स्वयंपाक बनवता येण्यासाठी एक नजर दिली. बिघडलेल्या पदार्थांनी त्यातूनच काहीतरी नवीन घडवायची दिशा दाखवली, बिघडलेल्या पदार्थाने अश्रू गिळायला शिकवलं, जमून आलेल्याने कौतुकात सुखावून जायला शिकवलं.....

माझ्या घरी, नात्यात, मित्र मंडळीत असे काही जण आहेत की ज्यांना माझ्या हाताचे जेवण विशेष आवडत नाही, तर दुसऱ्या बाजूस खूप मनापासून दाद  देवून खाणारे ही काही कमी नाहीत. पुन्हा एकदा सणासुदीचे दिवस येऊ घातलेत, वेळ नाही म्हणत म्हणत मी काही प्रयोगांसाठी वेळ काढेनच. नवरा एक दोन सूचना करत पदार्थ छान झालाय म्हणेल, कन्यकेच्या चेहऱ्यावरूनच कळेल, दादा म्हणजे माझे सासरे "उत्तम झालाय " अशी दिलखुलास दाद देतील  तर साबा त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने "चांगला झालाय" असे दुसर्यांना कौतुकाने सांगतील. माझी एक लहानशी मैत्रीण जी मला "मॉम" म्हणते ती तिरकसपणे "वॉव, क्या खाना बनाती ही तेरे घर की रोटी बननेवाली ऑन्टी. मी लग्न झाले की तिला तुझ्या घरून घेवून जाणार" असे म्हणेल.  आजचे हे लिखाण त्या सर्वांसाठी!

Friday, June 15, 2012

फसलेला............नाही, नाही. जमलेला प्रयोग!

स्वयंपाक करू लागण्याचे नवीन दिवस होते ते. एका सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी घरचे बाकी ३ मेम्बर्स बाहेर आणि मी एकटी घरी. आपोआप रात्रीच्या जेवणाची जबाबदारी माझी. नेहमीचा स्वयंपाक विशेष येत नव्हता तरी, छोले-पुरी, पावभाजी, आलूपराठे, रगडापुरी, चाट, इडली, डोसे असे पदार्थ मला करता येत असत. पण तेच तेच किती वेळा करून खावू घालणार ना? म्हणून नेहमीचा स्वयंपाक करण्याचे ठरविले. भात, फुलके, भाजी आणि कोशिंबीर. यात फार काही प्रॉब्लेम नव्हता. प्रश्न होता तो आमटीचा. घरात बाकी तिघाना चिंच-गुळ घालून केलेली कांद्याची आमटी खूप आवडते. ("आमटी कशी अमृततुल्य चवीची हवी!"  :P). पण मला तशी आमटी अजिबात आवडत नाही. काहीतरी प्रयोग करणे भाग होते.

शेवटी डाळ भाताचा कुकर लावला आणि फ्रीज उघडला. मिरची, कोथिंबीर, ओला नारळ होताच. लक्ष गेला दरवाज्याच्या कप्प्यात असलेल्या मसाल्यांच्या डब्यांकडे. म्हटलं करू काहीतरी. डाळीची कांदा, चिंच गुळ, थोडी धनाजीरा पावडर घालून आमटी करून घेतली, उकळी आल्यावर त्यात थोडा थोडा मसाला घालत गेले. पावभाजीचा, छोल्यांचा, राजवाडी,बिर्याणीचा. नारळ कोथिंबीर घालून आमटी तयार!! इतका मस्त वास दरवळत होता घरात! तरीही डोक्यातले, यात अजून काय करता येईल याचे विचार थांबले नव्हते.

नवरा बाहेरून आल्या आल्या त्याने विचारले " काय बेत आहे? मस्त वास येत आहेत किचन मधून?" म्हटलं थांब आणि बघ. जेवायची पाने घेता घेता, छोट्या कढल्यात साजूक तूप गरम करत ठेवले, त्यात, पुन्हा जिरे, कढीपत्ता आणि २/३ लाल मिरच्या घालून फोडणी केली आणि आमटी वर ओतली. आहा...काही तरी मस्त रेसिपी जमून आली आहे याची खात्री पटली. जेवताना सगळ्यांनाच ती खूप आवडली. काय विशेष/ वेगळे केले आहे असं विचारल्यावर सांगून टाकलं कोणकोणते मसाले घातले ते. त्यावर माझे सासरे म्हणाले " नशीब! तो चहाचा मसाला तुझ्या तावडीतून सुटला!"............आणि यावर एकाच हास्यकल्लोळ झाला.