Tuesday, April 29, 2014

भातुकलीच्या खेळामधली ............................

गेट उघडून काव्या आत शिरली. सभोती फुललेल्या बागेकडे तिने नजर टाकली ती थोड्या आश्चर्यानेच  अन घराच्या दरवाज्यासमोर उभी राहिली. बेल वाजताच आतून "आलो आलो " हा आवाज ऐकला  मग  क्षणातच काकांनी दरवाजा उघडला.

"ये काव्या, कधी आलीस दुबईहून? किती दिवस आहेस आता इथे? आणि आज इकडे कशी?"
"काका, आठवडा झाला इथे येऊन, मधेच दोन दिवस तुषार कामासाठी मुंबईला गेलाय तर माझ्याकडे थोडा वेळ आहे. म्हणून आईला म्हटलं की आज पलीकडच्या बँकेत थोडे काम आहेच, म्हणून थोडा जास्तीचा वेळ काढून तुम्हाला भेटून येते, कसे आहात तुम्ही?"
"मी कसा असणार आता? वेळ घालवतो काही कामात, काही तुझ्या मावशीच्या आठवणीत. बस तू, काय घेशील, पन्हं की लिंबू सरबत? उन्हाची आलीयेस."
"काका पन्हं ? तुमच्या घरात? म्हणजे तसं नव्हे पण आता मेघना मावशी नाहीये तर?
"अगं, मीच बनवून ठेवलंय"
"तुम्ही? विश्वासच नाही बसत काका. मला अजूनही तेच लहानपणी पाहिलेले काका आठवतात सारा वेळ ऑफिसच्या कामात बुडवून घेतलेले, अगदी चहा सुद्धा स्वत:चा स्वत: न करणारे"
"खरंय तुझं काव्या तुमच्या लहानपणी होतोच  मी तसा, लहानपणीच कशाला अगदी आता आत्तापर्यंत तसाच होतो मी, पण बदललो, मेघना, तिने बदल घडवून आणला हा अगदी गेल्या पाच सहा वर्षात"

काव्याच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य लपून राहत नाही. आज इतक्या वर्षानी काकांचे हे बदललेले रूप, ते ही मेघना मावशी गेल्यावर!

"आहे ना वेळ, बस निवांत इथे, हे समोर पेपर आहेत, नाहीतर टी व्ही लावू का, ऊन फार वाढलंय, मी आपल्या दोघांसाठी कैरीचे पन्हे घेऊन येतो"

काका आत जायला वळतात, काव्या थोडी निवांत होत सोफ्यात मागे सरकते. क्षणात अनेक वर्षाचे चित्र तिच्या डोळ्यासमोर तरळून जाते. मेघना मावशी तिच्या आईची मैत्रीण अगदी हानपणीपासूनची. एकाच शाळेत, एकाच महाविद्यालयात आणि लग्नानंतर एकाच गावात. जिथे तिथे दोघी सोबत अगदी वर्षांपूर्वी मेघना मावशी जाईपर्यंत.
काव्याने या घरात काकांना नेहमी पाहिलेय ते कामात बुडून गेलेले, आणि बाकी वेळ मित्रांसोबत. घराला घरपण होतं ते फक्त मेघना मावशीमूळेच. रोहित आणि वीणा ही दोन मुले आणि मावशी यांचे एक वेगळेच जग होते. काका त्यात जराही कुठे नसत. काकांचा संबंध फक्त कदाचित पैसे कमावणे आणि घर, गाडी इतर गुंतवणूक या बद्दलचे निर्णय घेणे इतकाच, काव्याने त्यांना घरात सगळ्यांशी हसत खेळत गप्पा मारताना कधी पहिलेच नव्हते. मुलांची शिक्षणे, त्यांची आजारपणे, नातेवाईक, लग्न कार्य या साऱ्या साऱ्या मावशीने सांभाळलेल्या गोष्टी. 

तिची आई मावशीला नेहमी म्हणे, "मेघना असे कसे चालते तुला? काहीच कसं सतीशराव लक्ष घालत नाहीत घरात, मुलांत, हे सारे काय तुझ्या एकटीचे आहे का? कधीतरी तू बोलायला हवेस ना"
अशा वेळी मेघना मावशी नुसतीच हसून, "अगं, चालायचंच नसते एकेकाला आवड" असे म्हणत तो विषय संपवत असे. 

पण तिने अक्षरश: एकटीने नुसते मुलांनाच नाही तर अनेक गोष्टीना जपले. नाती जपली, आपल्या मैत्रिणींचा ग्रुप जपला. रोहित आणि वीणा यांना अनेक गोष्टींची गोडी लावली, त्यांचा सर्वार्थाने विकास घडवण्यात तीच तर झिजली. ते दोघे शिकले, पुढच्या शिक्षणासाठी परदेशी गेले, यथावकाश अनुरूप जोडीदार मिळून त्यांची लग्नेही झाली. त्याच सुमारास काव्याही लग्न करून दुबईला गेली आणि तिथलीच झाली. मावशी कॅन्सरने गेल्यावरही तिला येता आलेच नव्हते. फोनवरच ती रोहित आणि वीणाशी बोलली होती. 

काव्या अशी आठवणीत गढून गेली असताच काका ट्रे मध्ये दोन ग्लास पन्ह्याचे घेवून आले. 

त्यातला एक तिच्या हाती देत म्हणाले, " काव्या तुला आश्चर्य वाटणं सहाजिकच आहे ग, मला असे घरात काही काम करताना पाहून, आणि ते ही तुझी मावशी नसताना"

"हो काका, कारण तुम्हाला फारसे कधी आम्ही घरीच पाहिलेले नाही, घरातली काही कामे तुम्हाला करताना पाहणे मी कधी कल्पनेत पण नव्हता विचार केला" 

"खरं सांगू  …… मला घर संसार, नातेवाईक या  गोष्टींची मुळात कधी आवड नव्हतीच, त्यातून त्याकाळी आई वडिलांनी पसंत केलेल्या मुलीशी लग्न करावे लागले याचा राग होताच. त्या काळी बायका शिकत पण नोकरी वगैरे फारशा नसत करत. पण ना मला वाटे बायको नोकरी करणारी असावी, पण मेघनाची कधी नोकरी वगैरे करण्याची कधी इच्छाच नव्हती. एकंदरीतच माझ्यासाठी हे एक लादलेले लग्न होते. मग मी त्या रागापोटी घराकडे कधी लक्षच दिले नाही. ऑफिसमधल्या परीक्षा देत पुढे जात राहिलो, उरला सुरला वेळ मित्र मंडळ होतेच, सिंहगड, पर्वती किंवा बुद्धिबळाचे डाव मांडून बसायला. जेवा, झोपायला फक्त घरी असाच त्याकाळी माझा दिनक्रम होता. मेघनाने हळूहळू घराचा ताबा घेतलाच होता, यथावकाश मुले झाली, त्यांच्या मोठं होण्यातही माझा विशेष काही वाटा नव्हताच. तिने कधी या गोष्टीची तक्रार केली नाही, एकटीवर सारे पडते म्हणत कधी त्रागा नाही केला ना कधी आमचे भांडण झाले. संवादच नसेल तर विसंवाद तरी कुठून येणार होता म्हणा.  मेघनाने घर छान ठेवले, मुलांना शिकवले, संस्कार दिले त्यांना, नातेवाईक जपले. पुढे रोहित, वीणा शिकायला परदेशी गेले तेंव्हा कुठे पहिल्यांदा मला जाणवले हे सारे मेघनाचे कर्तुत्त्व आहे, त्या दोघांच्या मोठे होण्यात आपला पैसे देण्याखेरीज काही वाटा नाही. दोघांनीही तिथेच शिकत असताना आपापले जोडीदार निवडले ते ही असेच उच्चशिक्षित, सालस. मेघनाचा गाढ विश्वास होता तिच्या संस्कारांवर. तिचा पाठिंबा होताच, सारे कसे छान सुरळीत चालू होते. पण मी त्यात कुठेच नव्हतो."

"पण मी रिटायर झालो, आणि काही काळ तरी दिवसभराचा मला घरात घालवावा लागू लागला. म्हणजे तसे पर्वती, सिंहगड, बुद्धिबळाचा अड्डा हे होते पण तरीही.  नकळत का होईना मेघना दिवसभर घरासाठी काय काय करते ते लक्षात येऊ लागले. मी साठीत पोहोचलो म्हणजे ती ही पंचावन्न ची होतीच की. सकाळी उठून योगासने, चहा नाश्ता, मग पेपर वाचन, थोडे बागकाम, देवपूजा, रांगोळी मग स्वैपाक, इतर आवाराआवर, मग दुपारी अंध शाळेत ती जात असे, तिथे लहान मुलांना गोष्टी सांग, लहान सहान गोष्टी करायला शिकवायला, तिथून परत आली की मग संध्याकाळचे चहापाणी मग एखादी मैत्रीणींबरोबर चक्कर, घरी येवून पुन्हा स्वैपाक, रात्री टी. व्ही पाहून झोप. पण या तिच्या दिनक्रमात मी स्वत:ला कुठे आणि कसे बसवावे हेच मला कळत नसे. जो काही संवाद आमच्यात होता तो फारच कामापुरता असे."

"तेव्हाच नेमका मी एकदा सकाळी पर्वतीहून येत असताना स्कूटरला एका गाडीने ठोकले आणि पाय फ़्रक्चर होऊन सलग चार महिने घरी बसून राहायची माझ्यावर वेळ आली.तेंव्हा माझे करणे हे अजून एक वाढीव काम तिच्यासाठी होऊन बसले. हे सारे करत असताना काय त्रास आहे हि तिची भावना कधीच नव्हती. तिच्यावर सारा भार पडत होता हे नक्की. मुलांचा फोन येत असे, माझ्यापाशीच कॉर्डलेस ठेवलेला असे पण तो उचलताच तिकडून "बाबा कसे आहात, पाय बारा आहे का आता असे विचारून लगेचच "जरा आईला फोन देता?" असे विचारत, तिच्याकडे फोन गेल्यावर मात्र पुढचा कित्येक वेळ त्यांच्या गप्पा चालत. कुठेतरी दुखावला जात असे मी. पण त्या काळात झाले असे की सक्तीच्या विश्रांतीने मी या घराकडे, मेघनाकडे एकंदरीतच तिच्या घर आणि मुले यांच्यातील गुंतवणुकीकडे पाहू लागलो.  हळू हळू लक्षात येवू लागले की घर उत्तम रितीने सांभाळत तिने आपले एक वेगळेच विश्व निर्माण केले आहे. ज्यात तिचे पुस्तक भिशीचे ग्रुप्स आहेत, अंध मुलांची शाळा आहे. मी पुरता नास्तिक - कळता झाल्यापासून कधी मी देवाला हात जोडले नव्हते, पण मेघनामुळे घरात देव होते, त्यांची रोज पूजा होत असे, घराच्या बागेतली फुले त्यांच्यासाठी असत, दारात आमच्या रांगोळी असे, सांजवात कधी चुकत नसे. दिवसेंदिवस मला तिच्या या सगळ्या गोष्टी इतक्या जीव लावून करणाऱ्या स्वभावाचेच कौतुक वाटू लागले, आणि कुठेतरी खंत देखील, की हे विश्व आपले होते आणि आपण आपल्या हेकटपणाने या सगळ्या गोष्टींपासून दूर राहिलो."

"पण याच जाणीवेने आमच्या दोघातला संवाद कुठेतरी पुन्हा जुळून येऊ लागला. मेघनानेही हा माझ्यातला बदल लक्षात घेत मनापासून साथ दिली आणि साठीला पोहोचता आमचे खऱ्या अर्थाने सहजीवन सुरु झाले. मेघना सोबतचे दिवस खरंच माझ्या आयुष्यातला एक अमुल्य ठेवा  आहे, ज्याने मला खूप समृद्ध केले. सकाळी पहिला चहा बनव, बागकाम कर, देव पूजेसाठी फुले ठेव, घराबाहेर पडताना आवर्जून बाहेरून काही आणायचे आहे का ते विचारून घेऊन ये, दर रविवारी आठवड्याची भाजी आण अशी अनेक छोटी छोटी कामे करण्यात मी रस घेऊ लागलो. तिच्यासाठी महत्त्व मी ती कामे करण्याचे नव्हतेच तर एकमेकांसोबत, एकमेकांसाठी ही कामे करण्याचे होते."

"अर्थात हे फार काळ नशिबी नव्हतेच, कारण त्यानंतर जेमतेम ३ वर्षांनी तुझ्या मावशीला कॅन्सर झाला. जिने इतक्या कष्टाने हे घर, ही माणसे घडवली तिच्या अखेरच्या काळात तिला थोडेतरी आनंदाचे क्षण वाट्यास आले आणि ते मी देऊ शकलो हेच फार झाले." 

"आज ती नाहीये पण ती करत असलेली प्रत्येक गोष्ट तशाच पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न करत असतो. तिच्या इतक्या चांगल्या नसतील जमत मला पण तरीही…. जसे तिने ठेवले होते तसे घर, जी जी कामे ती या घरासाठी तन्मयतेने करे ते प्रत्येक काम करण्याचा मी प्रयत्न करतो, आता कळले मावशी नसतानाही घरी बनवलेले कैरीचे पन्हे तुला इथे कसे मिळाले ते ?" 

"काका मी समजू शकते आता तुम्हाला नक्की काय वाटते ते. आता सोडून द्या पूर्वी काय घडले ते कटू विचार. तिच्या आयुष्यातील शेवटची काही वर्षे तुमच्या साथीने आनंदात गेली हाच आनंद तिच्यासाठी खूप असणार. मी निघू आता? काळजी घ्या"

असं म्हणून काव्या पाणावलेल्या डोळ्यांनी बाहेर पडली खरी, पण बाहेर पूर्वीसारखीच फुललेली  टवटवीत बाग पाहताच चेहऱ्यावर पसरलेले एक हसू घेऊनच. 

Monday, April 28, 2014

कोणा कशी कळावी?…वेडात काय गोडी …

ऑफिसचा पहिला दिवस… म्हणजे  induction day. त्या दिवशी भेटलेली सगळीच माणसे काही लक्षात रहात नाहीत. तर त्या दिवशी एक खूप सुंदर मुलगी नवीन आलेल्यांच्या ग्रुपमध्ये असते. त्यामुळेच कदाचित लक्षातही राहते. थोडे दिवस जातात हळू हळू सगळ्या गोष्टी सेट होत जातात या नवीन ऑफिसमध्ये देखील. टीम सोबत चहा, जेवण एकत्र होऊ लागते. बऱ्याचदा फूड कोर्ट मध्ये ती पण दिसू लागते. तिच्यासोबत तिची टीम कधीच दिसत नाही. ती आणि तिचा एक कलीग…. म्हणजे हे ही माहित नाही की ते दोघे एका टीम मध्ये आहेत आहेत की नाहीत, कदाचित तो तिचा manager पण असू शकतो. फक्त तिला पहातीये त्या दिवसापासून एक मात्र नक्की की तो तिचा नवरा नाहीये. 

पण जेंव्हा जेंव्हा ती दिसते तेंव्हा तेंव्हा ते दोघं बरोबरच असतात. ती दिसायला खूपच सुंदर, वय असेल २४/२५ च्या आसपास, उंच आणि छान चाफेकळी नाकेली. तो पण उंच, गोरा, पूर्वी छान दिसत असेल कदाचित पण आता डोक्यावरचे छप्पर उडून चाललेले, थोडे पोट सुटलेले असा, वय असेल ३६/ ३८ असे काही. गेल्या अडीच वर्षात मीच काय इतर कोणीही एकदाही त्या दोघांना ऑफिसमध्ये एकटे पाहिलेले नसेल किंवा दुसऱ्या कोणाबरोबरही. मग माझ्यासारख्या काही लोकांना सतत प्रश्न पडतात जसे की या जोडीतला एकजण ऑफिसला येणार नसेल तर दुसराही येतच नाही का? एकाला बरं वाटत नसेल म्हणून किंवा खूप काम आहे, किंवा महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून जेवायला किंवा चहाला एकजण जाणार नसेल तर दुसराही उपाशीच राहतो का? हे दोघे जर एखाद्या मोठ्या टीमचा हिस्सा असतील तर बाकीचे लोक यांना बळेच कधी त्यांच्या बरोबर येण्याचा आग्रह कधी करतच नसतील का? असे एक ना अनेक!

न जाणे कसे पण आज इतक्या दिवसानंतरही आमच्या जेवायच्या, चहाच्या वेळा साधारण सारख्याच असतात. त्यामुळे आसपासच्याच टेबलवर ही जोडी दिसणे हे ओघानेच. त्यांचे हे असे एकत्र असणे गेली दोन अडीच वर्ष पाहताना, त्यांच्या नात्यात झालेला बदलही सहज टिपण्याजोगाच. नवीन ओळख असतानाचा अवघडलेपणा केंव्हाच निघून गेलाय. एका छानशा comfort zone मध्ये असलेले ते दोघं आता अजूनच छान वाटू लागतात.   आजकाल मात्र त्यांच्याकडे पहिले की  एकमेकांत गुंतलेले दोन जीव असावेत तसे ते दोघे दिसतात. एक एक कप कॉफी घेऊन तास अन तास गप्पा मारत बसलेले. एकमेकांची साथ मनापासून आवडते ते त्यांच्या चेहेऱ्यावर वाचताही येते, त्यांची देहबोली पण तशीच प्रकटते. म्हणजे ऑफिसमध्ये वागू नये असं काहीही ते वागत नाहीत पण तरीही! सुरुवातीला त्या दोघांकडे पाहताना त्यांच्या वयातला जाणवणारा फरक मला फारच खुपायचा (???? खुपायचा ????? काय संबंध???????? उगाच काहीपण :)) मधल्या काळात हिचं लग्न झालं असेल का नाही, त्याचं? जर असं असेल तर मग त्या नात्याचं काय, किंवा दोघे live- इन मधे असतील …. खरतर काहीही असू शकेल.  असे सगळे विचार येतानाच शेवटी मी स्वत:लाच एकदा बजावलं, " ते दोघे एकमेकांचा करत नसतील एवढा विचार तू त्या दोघांचा करतीयेस…. stop here". पण तसं घडत नाही. हा खरंच त्यांच्यातला बदल आहे की माझ्या नजरेतला ते ही माहित नाही. पण तरीही त्यांचे असे हे सोबत असणे, पाहताना तरी काहीसे सुखावणारे आहे. 

मुळात प्रत्येक नात्याला समाजाच्या रूढ नात्यांच्या चौकटीतच बसवलं जायला हवं का की काळानुरूप समाजानेच आपल्या नात्यांच्या चौकटी विस्तारायला हव्यात? बदलत्या काळानुसार माणसांच्या, त्यांच्या विस्तारणाऱ्या क्षितीजांसह बदलणाऱ्या मैत्री च्या, जोडीदाराच्या संकल्पना समाजाने पण त्याच्या चौकटीत सामावून घ्यायला हव्यात ना?

Tuesday, April 22, 2014

रंगूनी रंगात सारया रंग माझा ......……

कितीतरी दिवसांनी आजकाल  थोडा निवांत वेळ असतो माझ्याकडे! अर्थात हे फार काळ टिकणार नाहीच म्हणा. निवांत वेळ आहे या  कल्पनेनेच कसेनुसे वाटू  लागेल आणि कशातरी मी  स्वत:लाच गुंतवून घेईन . तसंही नव्याने करायच्या, नव्याने शिकायच्या गोष्टींची यादी मुळातच इतकी मोठी आहे आणि सातत्याने त्यात भर पडतच राहते. या वर्षी, घर आणि ऑफिस या व्यतिरिक्त  ज्योतिष शिकायला सिरीअसली सुरुवात करायची आहे, अर्थशास्त्र पुन्हा नव्याने शिकायचे आहे, म्हणजे खरंतर अर्थशास्त्रात मास्टर्स करायला यावर्षी admission घ्यायची आहे, एकदा ते केले की रिकामा किंवा निवांत वेळ हा उरणारच नाही. तरी पण याच वर्षी  ओरिगामीची सुरुवात तर केली आहे त्यातले सातत्य टिकवून ठेवायचे आहे, टेरेस आणि खाली असलेली बाग या वर्षी अजून चांगल्या प्रकारे फुलवायची आहे,  संस्कृत स्तोत्रे विष्णू-सह्स्रानामापर्यंत शिकून मधेच सोडून दिली होती आता रुद्र आणि सप्तशती एकदा शिकायची आहे. परवाच,  एके दिवशी दुपारी ऑफिसमधून लवकर घरी  गेले, माझ्या दोन मैत्रिणी जिन्यात भेटल्या, आता इथे कशा असे त्यांना विचारले तर म्हणे " तुझ्या चुलत सासूबाई सध्या गीता शिकवत आहेत, तो क्लास आताच संपला आता घरी चाललोय" ह्याला म्हणतात दिव्याखाली अंधार! पण असो. 

सदा सर्वकाळ सगळ्याच वेड लावणाऱ्या गोष्टी तुमच्या  बरोबर राहतात  असंही नाही, काही काही सोबत करतात, काही चुकारपणे मधेच रस्त्यात तुमचा हात सोडून देतात. पण हरकत नाही, त्या काळापुरत्या तरी त्या आनंददायी असतात हे  नक्की! त्या थोड्याशा सोबतीने देखील त्या  तुम्हाला अधिकाधिक समृद्ध करत असतात. प्रत्येक वेळी त्याच माझा हात सोडतात असेही  नाही, तर माझ्यातही एक लहान मूल दडलेले आहेच ना, त्यामुळे ते ही दरवेळी नवीन खेळाच्या शोधात असतेच, कुतूहल संपले की दिला नाद सोडून असेही  वागत असते. पण  मग अशावेळी माझ्यातल्या त्या लहान मुलाला, माझ्यातली जी एक आई आहे न ती कधी त्या गोष्टींकडे पुन्हा पुन्हा वळवू पाहते किंवा त्याचे  ते "मूलपण" समजून घेत "असे चालायचेच" म्हणत सोडून देते. मूळातच फार आखीव  रेखीव आयुष्याच्या कल्पनांशी मी स्वत:ला बांधून ठेवले नाहीये ते एका परिने  बरेच आहे. घर आणि करिअर ही एकच  मध्यवर्ती आयुष्य रेखा ठरवून, त्या सभोती मग आपल्या आवडी, इच्छा, आकांक्षा यांची हवी तशी सजावट करावी. पण जर घर किंवा करिअरच धोक्यात येणार असेल तर मात्र ती माझी सर्वात मोठी हार असेल, म्हणूनच या जीवन रेखेस  डिस्टर्ब न करताही स्वत: मुक्त आयुष्य कसे जगायचे हे चुकत माकत शिकण्याचा हा प्रयत्न! 

तर या निवांत वेळाचं मी काय करतीये?  सध्या तर फक्त पुस्तके आणि मी!  एक पुस्तक उशाशी ठेवलेले असते, एक सोफ्यावर, आलटून पालटून मी दोन्ही वाचतीये. दुसरीकडे  मला कविताही आवडतात मात्र त्या  वृत्त, मात्रा, छंद यांचे साज लेलेल्याच! आणि कदाचित  म्हणूनच शांताबाई, इंदिरा संत, रॉय  किणीकर, महानोर, आरती प्रभू किंवा बोरकर यांच्या कविता जास्त भावतात. नव्या कवींमध्ये  संदीप खरे किंवा वैभव जोशी जे लिहितात ते आवडते. दुसरे म्हणजे न कवितेचे स्वत:चे एक प्रसन्न व्यक्तीमत्त्व  असायला हवे, अगदी दु:खाची, विरहाची, वेदनेची कविता वाचताना, ऐकताना ते दु:ख, ती वेदना आपल्या पर्यंत पोहचली पाहिजे जरूर पण तिने आपला ताबा घ्यायचा नाही, ते दु:ख, वेदनेचे मळभ आपल्या मनावर सोडून जायचे नाही, आणि अशाच कविता फक्त मला गुंतवून ठेऊ शकतात. आजकाल कवितांनी थोडे वेड लावलेच आहे तर पुरतेच त्यात रंगून जावे म्हणत परवा "उत्तररात्र" वाचून काढली. त्यातूनच रोज एक मला आवडलेली कविता किंवा  ओळी  स्वत:च्याच ब्लॉगवर पोस्ट करायची कल्पना सुचली आणि ताबडतोब ती मी अमलात पण आणली. अनेकदा कवितेची सुरुवात आठवत असते किंवा काही ओळी, पण संपूर्ण कविताकाही आठवत नसते किंवा तोंडपाठही नसते. पण मग होते काय की किमान ब्लॉगवर ठेवण्यासाठी तरी मी त्या कवितेचा  थोडा शोध घेते, मला हव्या असतात त्यातल्या चार ओळीच पण  त्यामुळे पुन्हा एकदा ती कविता मात्र पूर्ण वाचून होते. 

हे ही वेड टिकेल वा मागे पडेल, पण त्यातून मला जो आनंद गवसेल त्याची तुलना दुसऱ्या कशाशीच नाही ना होऊ शकणार! म्हणूनच "रंगुनी रंगात साऱ्या" म्हणत मी हे सारे आनंदाने करतीये. 

Monday, April 21, 2014

नाते तिचे अन माझे

आपल्यात इतके गहिरे नाते नव्हतेच कधी 
तरीही  सुखी होतो आपापल्या जगात आपण दोघी 
ओळख होती फार पूर्वी पासूनची तुझी 
मलाच कधी इतकी ओढ वाटली मात्र नव्हती  

तुझ्या  नावासरशी समोर येतात अनेक दिग्गज नावे  
यांच्याशी नाते जोडल्यावर तू दुसऱ्या कोणाकडे का पाहावे?
आवडले नव्हते मला कधीच तुझे  मुक्त जगणे 
मुक्त कसले केविलवाणी धडपड ती 
रोजच्या जगण्याला दिवसाच्या चोवीस मात्रात बसवण्याची 

तुला अशी दूर ठेवता ठेवता,
नकळता डोकावू लागली आहेस मनात 
रुजत चालली आहेस कुठेतरी खोलवर काळजात 
आजकाल दिवसरात्र सोबत असतेस,
माझे क्षण माझ्या ऐवजी तूच जगतेस 
उघड्या डोळ्यांनी पाहते मी सारी धडपड तुझी 
माझ्या प्रत्येक क्षणाला स्वत:शीच बांधून टाकण्याची 
अशीच व्यापून मन माझे  राहशील 
एक दिवस माझी स्वप्नेही तुझीच होऊन जातील

तुझ्या साथीने छोट्या आनंदाचीही व्हावीत चांदणफुले 
आणि हलक्या दु:खानेही उरावे रितेपण कोवळे 
का ग करतेस असे? 
जगू दे ना काही क्षण मला माझ्यासवे 
तुझ्याशिवायही घेता येवू दे 
आयुष्याला मला माझ्या कवेत

Wednesday, April 16, 2014

आहे त्याचे लागलेले खूळ मला फक्त ....................


अनेक प्रकारे माझ्या पुस्तकांच्या "विश- लिस्ट" मध्ये भर पडत असते. कधी सहज म्हणून अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा बुकगंगा वर नवीन काय याचा शोध घेताना, कधी एखाद्या पुस्तकाची प्रकाशनपूर्व प्रसिद्धी फार उत्तम झालेली असते म्हणून, कधी कधी कोणीतरी एखादे पुस्तक "हे नक्की वाच" असे सुचवले म्हणून. 

त्यामुळे माझी ही विश लिस्ट रिती झालीये असं कधीच होत नाही. ऑनलाईन पुस्तके खरेदी करण्याइतकी सहज सोपी गोष्ट नाही. हवे ते पुस्तक वरीलपैकी एखाद्या वेब साईट वर शोधायचे, LOOK INSIDE म्हणत त्या पुस्तकात थोडं डोकवायचं, आवडलं तर लगेच "Add To Cart" म्हणत कार्ड पेमेंट केले की  हवी असलेल्या पुस्तकांची खरेदी पूर्ण. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पुस्तके घरी हजर!

पण मग त्यात स्वत: दुकानात जाऊन तास अन तास पुस्तके चाळत, खरेदी केल्याचा आनंद मिळत नाही. कोऱ्या पुस्तकांना आधी डोळे भरून न्याहाळावे, त्याचा गंध आपल्यात भरून घ्यावा आणि मग स्वत: ठरवलेली पुस्तके, न ठरवलेली पण तिथे गेल्यावर दृष्टीस पडली आणि वाचावीत अशी वाटली म्हणून घेतलेली पुस्तके, अशा सगळ्या प्रकारची पुस्तके घरी घेऊन येताना मला जेवढा आनंद होतो तेवढा कदाचित एखादा दागिना घेऊन येताना देखील होत नाही. 

तर मग जिच्याकडे अशी विश लिस्ट कायमच तयार असते, तिला तिची ही आवड ओळखून कोणीतरी म्हणावं, " आज हवी ती पुस्तके घे" मग ना तिचा आनंद वर्णनातीत असतो. असंच परवा काहीसं झालं होतं माझ्या बाबतीत, मग माझ्या सोबत अनेक मंडळी घरी आली अक्षरधारा मधून. जशा की माझ्या लाडक्या सुनीताबाई आल्या त्यांच्या शेवटच्या काही आठवणी घेऊन, गौरी देशपांडे आणि सानिया आल्या, गिरीष कुबेर आले अधर्म युद्धाचा पट समोर ठेवत, झेन गार्डन मधून मिलिंद बोकील आले, अर्थात मुसाफिरी करत यापूर्वीच अच्युत गोडबोले घरी मुक्कामी होतेच, आता "गणिती" च्या रुपात ही त्यांना का न न्यावे असे म्हणताच, ते ही लगेच बास्केट मध्ये जाऊन बसले, सोबत भाचे मंडळीन साठी "त्तोतोचान. बाटलीतले भूत" अशी पुस्तके मला घरी न्या म्हणून मागे लागली, मग मला काही त्यांचे मन मोडवेना, म्हटलं "चला रे बाबांनो तुम्हीपण"

तरी पण या वेळेस लिस्ट वर असलेली दोन तीन पुस्तके जी अक्षरधारा मध्ये नव्हती. त्यांनी सांगितले २/३ दिवसांत मागवून देऊ शकू म्हणून, पण म्हटलं आता पुन्हा मी कोणत्या वीक एंडला तिथे पोहोचणार आणि कधी पुस्तके त्यांच्याकडून घेवून जाणार. त्यापेक्षा आता राहूच देत या तीन पुस्तकांना लिस्ट मधेच. 

पण आज सकाळीच परवा आणलेल्या पुस्तकांना फेस बुकावर थोडे मिरवून झाले न झाले तोवर "फ्लिप कार्ट" ची मेल येऊन पडली, "World Book Day offer" मनात म्हटलं हा पण एक शकुनच आहे. ऑफिसला पोहोचल्या बरोबर त्या वेब साईट वर लॉग इन झाले आणि  हवी असलेली तीनही पुस्तके तिथे आहेत याची खात्री केली. मधेच एक मीटिंग होती ती आटोपली, तशी लगेचच या पुस्तकांची ऑर्डर देऊन मोकळी झाले. संध्याकाळी पुस्तके गाडीत बसून माझ्या घरी येण्यासाठी रवाना सुद्धा झालीत ! ती आहेत "द  जर्मन जिनिअस, द अल्केमिस्ट- इनसाईड द वर्ल्ड ऑफ सेन्ट्रल बँकर्स आणि रघुराम यांचे फ़ौल्ट लाईन्स"  याला म्हणतात "आवडीने वाचणार त्याला फ्लिप कार्ट  देणार!" (साखरेचे खाणार …त्याला देव देणार या म्हणी सारखे वाचावे). 

घरात आजच सीझनच्या पहिल्या हापूसचं आगमन झालंय, म्हणजे आता किचनमध्ये फार वेळ जाणार नाही. याच आठवड्यात "हि निवडणूक व्हावी ही तर काकांची इच्छा"(काकांच्या जागी आपल्या आवडीप्रमाणे कोणाचेही नाव घालून वाचावे, जसे की मोदी, रागा, झाडूवाला, ताई-दादा, अम्मा, दीदी कोणाचे ते महत्त्वाचे नाही) असल्यामुळे गुरुवारी ऑफिसला सुट्टी आहे. कधी नव्हे ते ह्या वीक एंडचा अजून तरी काही प्लान नाही त्यामुळे या पुस्तकांमधे गढून जाण्यास कोणताही अडसर दृष्टीपथात नाही. दिवस रात्र, खाता पीता हातात एकच एक. 

आजकाल एकच गोष्ट सगळ्या गोष्टीत मधे मधे करते ते म्हणजे "झुकी बाबाने सोडून दिलेली मांजर", आपण कामात असताना पाळलेली मनी सतत पायात घोटाळावी ना तसं हे फेस बुक कधी मोबाईल मधून कधी laptop मधून सतत मधे मधे येत असते. हे फेस बुक म्हणजे न तसा गावातला गप्पांचा पार, कोणी तुमची इथे वाट पाहत नसते, आलात, या, चार क्षण शिळोप्याच्या गप्पा मारा आणि जा. पण आजकाल आपली या संवादाची भूक  इतकी मोठी आहे त्यामुळे  एकदा तिथे डोकावले की मग लवकर तिथून सुटका नाहीच. हे म्हणजे कसं ना व्यसन आहे, सुटायला पाहिजे म्हणत अजून त्यात  बुडून जावे तसे. त्यामुळे असे व्यसन सुटायला, त्यापेक्षा एखादे सुटू न शकणारे व्यसन लावून घ्यायला हवे. आणि पुस्तकांपेक्षा मोठे व्यसन ते काय असू शकते? हे व्यसन काही मला नवे नाही त्यामुळे इथे मात्र क्षणभर विश्रांती!!!!

आहे त्याचे लागलेले खूळ मला फक्त 
शून्याहूनही निळे तरी हासता आरक्त 
- आरती प्रभू 

Monday, April 14, 2014

पुन्हा एकदा नव्याने....................

आज पुन्हा एकदा नव्याने 
अलवार जाग आली 
रातीची बरसात तुझी चाहूल देऊन गेली 

आज पुन्हा एकदा नव्याने 
मी न्याहाळले मलाच 
एकटक तुझी नजर माझे काळीज छेदून गेली 

आज पुन्हा एकदा नव्याने 
माळला मी गजरा 
फुले मोगऱ्याची गंध तुझाच पसरवून गेली 

आज पुन्हा एकदा नव्याने 
तुझ्या सयीत  रमले
ती चांदणभूलच माझी ओंजळ रिती करून गेली 
आज पुन्हा एकदा नव्याने 
मी काही क्षण जगले 
लागलेली तुझी आस सखया मग मलाच मिटवून गेली