Wednesday, November 28, 2012

कांदा मुळा भाजी.......


लहानपणापासून मंडईत जाणे हि माझ्या आवडीची गोष्ट! तेंव्हा घरी फ्रीज नसल्याने २/२ दिवसांची भाजी घरी येत असे. भाज्यांचे नीट रचून ठेवलेले ढीग. सर्वत्र जाणवणारा ताजेपणा, रसरशीतपणा इतका मोहवणारा असतो की .....नंतर कॉलेजला जावू लागले तो पर्यंत घरी फ्रीज चे आगमन झाले होते, त्यामुळे मी खूप आनंदाने रविवारी भाजी घेऊन येत असे, नुसती भाजीच नव्हे तर फळे, देवपूजेसाठी आठवडभर पुरतील इतकी फुले असं सारं घेऊन आले कि मग मला खूप छान वाटत असे. नंतर त्या घरी नेलेल्या भाजीची निवडा निवडी करण्यासाठी आईला काय कष्ट पडतात याची तेंव्हा कल्पनाच नव्हती. ढीगभर भाजी घरी घेऊन येण्यात, तिच्या ताजा वास श्वासात भरून ठेवणेच इतके आनंददायी असते की हा त्रासाचा विचार ठेव्हा मनात कधी येतच नसे.
अजूनही ही गोष्ट तितकीच आवडीची आहे. भाजी मंडईत जावे, ताज्या ताज्या भाज्या बघितल्या की काय घेऊ अन काय नको असे होऊन जाते. दिवसाचे १०/१२ तास ऑफिसमध्ये जिचे जातात तिला रोज जाता येता भाजी घेणे शक्यच नाही. त्यामूळे आठवड्याची भाजी एकदमच हा शिरस्ता गेली अनेक वर्षे आमच्याकडे आहे. अशारितीने भाजी आणणे, निवडून वेगवेगळ्या प्लास्टिक मध्ये ठेवणे म्हणजे आठवडाभर आज काय भाजी करावी ही चिन्ता मिटते. मात्र वीकेंड मधल्या कोणत्या दिवशी भाजी आणायची, किती आणायची, तिची उस्तवार करायला कशी जमणार आहे याचा आधी विचार करावा लागतो, पण म्हणून काही  त्यातली मजा कमी होत नाही. त्यातून हा ऋतुच आनंदाचा ठेवा असावा असा ताजा तवाना. 
रविवारी सकाळीच मंडईत शिरावे. कोणत्या नव्या भाज्यांचे आगमन झाले आहे याचा अंदाज घ्यावा. तुरीच्या शेंगा, गाजर, मटार आणि मेथीच्या ताज्यातवान्या गड्ड्या दिसू लागणे ही माझ्या मंडईत जाण्याच्या आनंदाची परिसीमा असते. उंधियो, मेथीचे विविध प्रकार जसे की ठेपले, भरपूर लसूण  घालून केलेली सुकी भाजी, मेथी गोटे, गाजर हलवा, मटार करंजी, मिक्स भाज्यांचे सूप, लोणचे असे विविध प्रकार मनात डोकावू लागतात. त्यामुळे भाज्या घेत घेतच माझा आठवडाभराचा मेन्यू मनातल्या मनात तयार होतो. आत शिरल्याबरोबर मिरची, आले लसूण याचा गाळा असतो. थंडी पडू लागलीये, थोडे आले जास्त घेवूया म्हणजे वड्या करता येतील. लसूण ही घ्यायला हवा, थोडी सुकी चटणी करून ठेवायला हवी. मग पुढचा गाळा असतो रसरशीत टोमाटोचा. रविवारी पुलाव आणि सार करावे का? कोणी पाहुणे येणार आहेत का, कोणता सण आहे का, एखादा खास पदार्थ बरेच दिवसात झाला नाही अशी घरच्या दोन थोर व्यक्तींकडून तक्रार येण्याची शक्यता आहे का  या आठवड्यात हे एकदा आठवून पाहावे आणि त्या नुसार भाज्या घेत जावे. किती पालेभाज्या आपल्याचाने निवडून होतील याचा अंदाज घेत त्यांना ही पिशवीत जागा करून द्यावी. मग स्वीट कॉर्न मला न्या म्हणत मागे लागतो, म्हणून त्यास घ्यावेच लागते. आजकाल लाडावलेल्या मुलासारखा तो झाला आहे. उपासाचे दिवस असतील तर मग रताळी कुठे दिसतात का ते पाहावे लागते, म्हणजे एकादशीची सोय होईल, रताळ्याच्या गोड काचऱ्या, तिखट कीस, हे पदार्थ साबुदाण्याचे  वडे किंवा थालीपीठ  सोबत तांबड्या भोपळ्याचे भरीत, ओल्या नारळाची चटणी  असले की उपासाचे ताट कसे भरल्यासारखे वाटते नाही?  
तुरीच्या शेंगा दिसल्या की उन्दियोच्या इतर भाज्या जसे की कंद, सुरती पापडी, कच्ची केळी  आल्यात का हे पहावे, सगळ्या पाव पाव किलो घेत घरी जावून उंधियो बनवावा आणि पुढचे २/३ दिवस मनसोक्त त्यावर ताव मारावा  नाहीतर तुरीच्या शेंगाना घरी नेवून मीठ हळद घालून उकडून टेबलवर ठेवून द्याव्यात, बघता बघता संपून जातात. भाद्रपदात मिळणाऱ्या मावळी काकड्या दिसल्या की मग हळदीची पाने कुठे मिळतील ते पाहावे म्हणजे गोड पानग्या करता येतील. भरपूर कोथिंबीर आली की मग एकदा वड्या झाल्याच पाहिजेत. छान केशरी दळदार भोपळा आहे, तो  घारगे बरेच दिवसात झाले नाहीत अशी आठवण करून दिल्याखेरीज राहात नाहीत. मटार चांगला आला आहे, भरपूर घरी न्यावा, एकदा मटार उसळ आणि पाव हा बेत, कधी मटार भात तर कधी मटार करंजीचा बेत करावा. फेब्रुवारी संपता संपता फणसाच्या कुयऱ्या दिसतात का याचा शोध घ्यावा किंवा आसपासच्या कोणत्या घरी फणसाचे झाड आहे ते लक्षात ठेवून त्यांना सांगून ठेवावे. आजकाल मला वर्षभर ओले काजू सुकवून ठेवता येण्याची पध्दत कळली आहे, त्यामुळे फणस आणि ओले काजू याची भाजी, त्याला वरून लाल मिरचीची फोडणी म्हणजे सुख! तसा नोव्हेंबर ते जानेवारी हा काळ म्हणजे या सुखाचा परमावधी. इतक्या प्रकारच्या भाज्या या दरम्यान उपलब्ध असतात की काय घेऊ आणि काय नको असे मला होऊन जाते. घरी नेलेल्या भाज्यांची उस्तवार करता यावी आणि विविध चवींचे खास पदार्थ बनवता यावेत म्हणून न या कालावधीत वीकेंड २ नाही तर ३/४ दिवसांचा असावा अशी फार इच्छा आहे.... :) 

आवळे घरी न्यावेत, किसून सुपारी, थोडा मोरावळा करून ठेवावा. थोडे लोणचे करावे त्यात थोडी आंबे हळद जी ओली मिळते या काळात, ती घालावी. लिम्बांचे गोड लोणचे बनवून ठेवावे, उन्हाळ्याची बेगमी म्हणून सरबताची सोय करून ठेवावी. पालक वर्षभर मिळतो, पण या काळात तो जास्तच ताजा टवटवीत वाटतो, त्याच्या पुऱ्या कराव्यात. भरली वांगी किंवा खानदेशी वांग्यांचे भरीत करावे, सोबत गरमागरम भाकरी आणि ताजे लोणी. किंवा भरपूर लसूण आणि तेल घालून केलेली आंबाडीची भाजी .... आहाहाहा..... एरवी जास्त न आवडणारे पावटे पण या काळात कधीतरी उसळ करून चविष्ट लागतात. नवरात्रात कधी काकडीसारखी लांबसडक जांभळी वांगी मिळतात, त्यांचे काप करावेत, डाळीचे पीठ, मीठ तिखट लावून थोड्या तेलावर भाजले की किती खातो हेच कळत  नाही, तीच गत सुरणाच्या कापांची.

थोडी शोधाशोध केली तर लसणीची पात मिळते कधी...थोडी कधी आमटीत टाकावी नाहीतर कधी छानशी चटणी करावी. इतर कोणत्याही सिझन मध्ये मिळणारा मुळा या ऋतूत मला नेहमीच चविष्ट वाटत आलाय. जवळपास चक्का वाटावा इतकं घट्ट दही घ्यावे, त्यात ओला नारळ, कोथिंबीर, एखादी हिरवी मिरची मिठाबरोबर वाटून,सोबत चिमुटभर साखर...सही लागते ही कोशिंबीर!
याच काळात फळे ही भरपूर येतात यामुळे चिकू शेक, स्ट्राबेरी किंवा सफरचंद शेक, फ्रुट सलाड हे ओघाने आलेच. (दूध आणि फळे एकत्र करून खावू नये या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून) नुकती नुकतीच दिसू लागलेली द्राक्षे, स्ट्राबेरी संत्री यांचा घरी वावर वाढतो तो थेट आंब्यांचे घरी आगमन होई पर्यंत. फळांची रेलचेल मग कधी इतकी होते की मग कोबीच्या कोशिम्बीरीत द्राक्षे दिसू लागतात, काकडीसोबत घट्ट दह्यात मीठ मिरची लावून डाळिंबाचे दाणे जावून बसतात तर कधी सफरचंद, डाळिंब, काकडी, अननस आणि थोडे अक्रोड चुरून घातले की थोड्या मीठ मिरपुडीने सुरेख सलाड तयार होते. कधी सफरचंदाचा कधी अननस घालून केलेला शिरा जेवणाची  लज्जत वाढवतो. तर कधी क्रीम मध्ये थोडी साखर घालून फेटले आणि भरपूर स्ट्राबेरी त्यात घातल्या की एक सुंदर डेझर्ट तय्यार!
बघता बघता हा हिरवागार सीझन संपू लागतो, हळू हळू मंडई रुक्ष भासू लागते. त्याच त्या ४/५ भाज्या दर आठवड्याला घरी नेतोय की काय असे वाटू लागते. थोडा पाराही चढा होवू लागतो. जेवण तितके आनंददायी वाटेनासे होते. मग फळांचा राजा पुन्हा अवतरतो आणि सारा रुक्ष नीरसपणा दूर करतो. पानात रोज सकाळ संध्याकाळ आमरस असला गरमागरम पोळी किंवा भातासोबत की मग कोणती भाजी आहे किंवा नाही याने काही फरक पडेनासा होतो. आंबा, फणस, जांभळे, करवंदे, चेरी, खरबूज, कलिंगड ही फळे मात्र दिवस रसदार करतात आणि उन्हाळा थोडा सुखाचा जातो. याच उन्हाळ्यात थोडी पावसाळ्याची बेगमी म्हणून थोडे सांडगे, भरल्या मिरच्या, थोड्या कुरडया (भाजी साठी) करून ठेवाव्यात. पावसाळ्यात मंडईत जाणेच नकोसे होते. कसेबसे ते दिवस ढकलून मी मनापासून वाट पाहत राहते या हिरव्यागार, ताज्या टवटवीत दिवसांची!


(त्याचं काय आहे की एखादा पदार्थ बनवताना किंवा खाताना मी त्यात इतकी गुंतलेली असते की त्यांचे फोटो काढणे वगैरे माझ्या लक्षात येणे केवळ अशक्य...त्यामुळे सर्व फोटो आंतरजालावरून साभार.)

Tuesday, November 20, 2012

शतकानिमित्त संवाद.....


हे मात्र अगदी ठरवूनच होते. १००वी पोस्ट कशी असावी याचा विचार साधारण ९६/९७ वी पोस्ट ब्लॉगवर टाकतानाच सुरु झाला होता. आवडीच्या विषयावरच असावी हे नक्की झालं होतं. लिहिताना आवडीचा विषय म्हणजे खादाडी. तसंही "इस बात पे सेलिब्रेशन तो बनता है" :) पण झालं काय की मधल्या २/३ पोस्ट साठी काही लिहिणेच होईना. हे म्हणजे कसं की "९६ वर असताना १०० वी रन कशी घ्यायची हे नक्की करायचे, पण मधल्या ३ धावा घेतानाच इतके चाचपडत खेळायचे की कधीही आउट होईल" असे झाले.

तसा मी ब्लॉग सुरु केला तो २००९ मध्ये. काय आणि कसं लिहायच याचा फारसा अंदाज आणि आराखडा नव्हताच. नंतर मी माझ्या कामात आणि अभ्यासात इतकी व्यस्त होऊन गेले की या गोष्टी जवळपास विसरूनच गेले. त्यामुळे आरंभशूरपणा या गटात हा ब्लॉगही लगेचच सामील झाला. याचे दुसरे कारण म्हणजे इन्फी बीबी आणि इन्फी ब्लॉग ज्यामुळे व्यक्त होण्यासाठी इतर कशाची गरजच नाही उरली.

त्यामुळे खऱ्या अर्थाने मी या ब्लॉगवर कधी लिहू लागले तर ते २०११च्या एप्रिल-मे महिन्यात. तो कोण वाचतय, नाही वाचत आहे, याकडे सुरुवातीला फारसे माझे लक्षही नव्हते. फेसबुकवर पण मी त्याचसुमारास अवतरले त्यामुळे तशा दोन्ही गोष्टी अपरिचितच...... मग परिचय होण्याचा सुरुवातीच्या काळात असतो तसा बुजरेपणा आणि एक प्रकारचे अवघडलेपण तेंव्हाही होतेच. नावाप्रमाणेच हा ब्लॉग माझे मला असाच होता. थोडा लोकांपासून अलिप्त असा. अनेक दिवस काही न लिहिता जात, ज्याचे फार काही वाटतही नसे. नंतर कधीतरी मराठी-ब्लॉग विश्वावर हा जोडला आणि खऱ्या अर्थाने ह्या जगाशी माझी ओळख झाली. तत्पूर्वी काही ब्लॉगर मित्र मैत्रिणी होत्या जसे की श्रीयुत धोंडोपंतांचा ब्लॉग त्यांचाच दुसरा सांजवेळ, अजून एक मित्र आनंदचा ब्लॉग आणि अजून काही निवडक.

मुळात मी आळशी जमातीतली. नेटाने एखादी गोष्ट करण्यासाठी तितकंच मोठं कारण हवे. यावेळी ते कारण माझे मीच होते त्यामुळे हा प्रवास किती चालू राहील याबद्दल साशंक होते. तरीही मी खऱ्या अर्थाने लिहिती झाले. कोणी वाचतंय किंवा नाही, हे न पाहता व्यक्त होण्यातला आनंद घेवू लागले. खरतर हे अशा प्रकारे व्यक्त होणे याला मर्यादा आहेत, याची जाणीव असूनही हा प्रवास १००व्या पोस्ट पर्यंत चालू राहिला. याचे श्रेय आपणा सर्वाना. सहज,उस्फूर्त असे जेवढे लिहिणे जमेल तेवढेच लिहायला आजतरी मला आवडते आहे. त्यामुळे ठरवून काही लिहिणे थोडे अवघडच जाते. मग  ती कविता असो, किंवा इतर लिखाण असो अगदी कोणावर टीका असो, नाहीतर आठवणीना उजाळा. याच ब्लॉगने काही नवीन मित्र-मंडळही मिळवून दिले. त्यांच्या या ब्लॉगवर किंवा मेल, फेसबुकवर मिळणाऱ्या प्रतिक्रिया मला लिहिते ठेवत गेल्या, आणि मी लिहित गेले. या साऱ्यांचे मन:पूर्वक आभार!

१०० व्या पोस्टनंतर आता असे वाटते की स्वत:च्या जगापलीकडे जाऊन आता लिहिता आले पाहिजे. म्हणजे अट्टाहास नाही पण तरी देखील. नाव जरी मी....माझे.....मला असले तरी त्यापलीकडचे पण एक विशाल असे जग जे आहे त्याला या ब्लॉगवर माझ्या नजरेतून वाचता यायला हवे. "मी"ला वगळून लिहिता यायला हवे. खादाडीवर लिहायला हवे. पण सध्यातरी रेसिपी शेअर करणे हा हेतू नाहीये. त्याकरिता अनेक उत्तम असे ब्लॉग्स, उत्तम अशी पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. मी त्यापेक्षा वेगळं काय लिहू शकते? सर्वसाधारण नाही तरीदेखील किमान "अनघास्पेशल" अशातरी रेसिपी या ब्लॉग वरून शेअर व्हायला हव्यात, स्वयंपाक या कलेविषयी लिहायला हवे, विविध प्रदेशातील खाद्य परंपरा, त्यांची वैशिष्ट्ये या बद्दल लिहायला नक्कीच आवडेल. मुळातच भारतीय खाद्य परंपरा मला खूप भावते कारण त्यामागे केलेला विचार, त्यातील वैविध्य मला मोहून टाकते. पण अजून अंदाज येत नाहीये की हे लिहिणे कसे आणि किती दूरपर्यंत पेलवेल?

तरीही हा ब्लॉग माझ्यासाठी एक सेतू बनला "virtual" जगाशी जोडले जाण्याचा. जितके आनंददायी आहे स्वत:कडून सशक्त असे काही लिखाण घडणे, तितकेच आनंददायी आहे ते इतरांचे असेच ब्लॉग वाचणे. अनेकजण इतके सुंदर आणि सकस लिहितात की, त्यांच्या नवीन लिखाणाची मी वाट बघत असते. वेळ मिळेल तसे वाचूनही काढते. दिवसातून एकदातरी, त्यांच्यापैकी कोणी काही नविन लिहिले कि नाही ते पाहते. धोंडोपंत, महेंद्रकाका, वटवट सत्यवान हेरंब, तन्वीचा सहजच, अनघाचा ब्लॉग, जागेची टंचाई असण्याच्या काळात शब्दांना अब्द अब्द जागा करून देण्याऱ्या साविताताई, अपर्णाची माझिया मना म्हणत घातलेली साद, आनंदचा White lily, संवादिनी, अजूनही फळ्यावर लिहिणारे विसुभाऊ (गुरुजी होते का हे पूर्वी?), भानस, चकली प्रमाणेच मस्त असा वैदेहीचा ब्लॉग असे अनेक. यांच्यापैकी अनेकांशी माझा प्रत्यक्ष परिचय नाही. पण अनेक वर्षांचा परिचय असावा अशी ओळख त्यांच्या ब्लॉगमुळे वाटते. मी मागे म्हंटल्या प्रमाणे "संवाद संपला की नाती संपतात, म्हणूनच मला जपायचा आहे हा सेतू, हे नातं. संवाद संपला की सारे जगणेच रुक्ष कोरडे होवून जाते. म्हणूनच "आपुला हा संवाद आपणाशी" असाच चालू राहो."

Monday, November 12, 2012

ते ३ शब्द.....त्या साऱ्या आठवणी

मेल बॉक्स उघडल्यावर  नवीन येऊन पडलेल्या मेल्सवर आधी एक नजर टाकली. एका मेल कडे लक्ष गेले अन सब्जेक्टलाईन मधल्या त्या ३ शब्दांनीच पौर्णिमेच्या चंद्रासारखे हसू माझ्या चेहऱ्यावर पसरले. अगदी आतून आलले खरेखुरे! मन अलगद कापसाप्रमाणे उडत मागे गेले. अनेक आठवणी पहाटे उमलणाऱ्या प्राजक्तासारख्या दरवळू लागल्या. 

नाही नाही .... जास्त उत्सुकता मी ताणत नाही. "ते ३ शब्द" असे  म्हणता, जे पहिले स्वाभाविक पर्याय येतील हे ते नव्हते. :) नवीन काळे लिहित असलेल्या "सॉंग ऑफ द डे" या ब्लॉग वर add झालेल्या नवीन पोस्ट ची ती मेल होती आणि "ते ३ शब्द" होते "दिन ढल जाये ....." खरं सांगू का या शब्दांच्या जागी इतर कोणतेही  शब्द जसे की "आज फिर जीनेकी तमन्ना", "पिया तोसें नैना लागे", "गाता राहे मेरा दिल" "सैया बेईमान" "तेरे मेरे सपने" किंवा "वहा कौन हे तेरा" असते ना तरी मी इतकीच खुश झाले असते. बाकी सगळ्या मेल्स बाजूला ठेवून, त्या ब्लॉगवर जाऊन हि पोस्ट वाचायला घेतली. तसंही नवीन काळे जेंव्हा एखाद्या गाण्या बद्दल लिहितात ना तेंव्हा त्याचे इतरही अनेक संदर्भ, त्या गाण्यासंबंधी किस्से सांगत जणू तो सगळा काळ तुमच्या समोर उभा करतात. फ्रेम बाय फ्रेम गाणे तुमच्या नजरेसमोर जिवंत करण्याचे कसब त्यांच्या लेखणीत आहेच. आणि जेंव्हा ते गाणे "दिन ढल जाये" सारखे असते तेंव्हा तर बात काही और असते.

अति परिचयात अवज्ञा ते हेच का? खरं तर या पूर्वीच मी याबद्दल लिहायला पाहिजे होतं. पण कसं ते माहित नाही पण कायम राहूनच जाते.  "गाईड" या सिनेमा बद्दल मी पूर्वीच काही लिहा बोलायला हवे होते इतका तो माझ्या काळजाच्या जवळचा आहे. किती वेळा मी तो पहिला असेल माहित नाही. पण असंख्य वेळा पाहूनही मन भरणार नाही असे जे मोजकेच चित्रपट आपल्याकडे बनतात त्यापैकी तो एक.  अगदी लहान असताना असे कुठेतरी बर्याच ठिकाणी लिहिलेले वाचले होते, "मिलीये राजू गाईडसे".....पण तरी म्हणजे काय ते अनेक दिवस कळलेच नव्हते. अंधुकसे आठवते ते म्हणजे जेंव्हा लहानपणी सर्वात पहिल्यांदा तो दूरदर्शनवर लागणार होता तेंव्हा आजी म्हणाली "लहान मुलांनी पहावा असा तो नाहीये"(म्हणजे तेंव्हाच्या प्रचलित कल्पना आणि संस्कारांप्रमाणे, आजचे मापदंड यास लागू होणार नाहीत.) तरी मी तो पहिलाच.(नेहमी असेच घडते न? मोठ्यांनी विरोध करावा आणि लहानांनी ती गोष्ट हमखास करावीच). त्या नंतर अनेकदा बघतच गेले. पण नुसताच बघितला आणि विसरून गेले असे नाही झाले.....प्रेमात पडले...या गाण्यांच्या,सचिनदांच्या, वहिदा रेहमानच्या जिच्या मुळे सौदर्याचे मापदंड खूप वर गेले..... आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच सिनेमाने माझ्या  स्वप्नातल्या राजकुमाराची प्रतिमा रेखाटली. जी आयुष्याचा खराखुरा साथीदार मिळाल्यानंतरही मनात कायम राहिली. हळुवार, प्रेमळ देखणा "तेरे मेरे सपने अब एक रंग .....तेरे दु:ख अब मेरे, मेरे सुख अब मेरे" म्हणणारा..... जी सिनेमातले काही खरे नसते माहित असतानाही मी कित्येक वर्षे जपली.

पुढे अनेकदा हे असे हिंदी सिनेमाच्या सुवर्ण युगातले अगदी मैलाचे दगड नाहीत पण त्यांना बाजूला करून तो इतिहास पूराच नाही होवू शकणार असे सिनेमे पाहताच गेले. गोडी अशी लागत गेली जी आजही कायम आहे. जसे की देव आनंदचे हम दोनो, मुनीमजी, सी. आय डी. नौ दो ग्यारह, प्रेम पुजारी, ज्वेल थीफ, काला पानी, काला बाजार, जब प्यार किसीसे, तेरे घर के सामने, बंबई का बाबू, .... गुरुदत्त यांचे प्यासा, साहिब बीबी, आर पार  चौदावी का चांद ....अशी भली मोठी यादी आहे. आजही सर्वात छान माझी सुट्टीची कल्पना हीच आहे की " शांत निवांतपणे हे सगळे सिनेमे" पाहता यावेत अशीच आहे. 

गाईड हा सिनेमा ज्यातले प्रत्येक गाणे इतके सुंदर की मला कधी यातले सर्वात आवडते कोणते हे आजतोवर कधी ठरवता नाही आले. जर कधी सर्वात आवडणारी १० गाणी निवडावी लागली तर गाईड आणि प्यासा या दोन सर्वात सुंदर सिनेमातील नक्की कोणती १० हे ठरवताना माझी दमछाक होईल. प्रत्येक गाणे त्या कथेमध्ये असे बेमालूम गुंफलेले की त्या गाण्यानेच कथा पुढे न्यावी.या गाण्यांशिवाय ह्या सिनेमांची मी कल्पनाही करू शकत नाही, इतका ती गाणी प्राण आहेत या सिनेमांचा....नव्हे तर या युगातील अनेक अशा सिनेमांचा. या गाण्यांनी मला घडवलंय .....आज फिर जीनेकी तमन्ना है म्हणत पुढे सारे विसरून पुढे जगायला शिकवलंय, युं ही काहोगे तुम सदा के दिल अभी नाही भरा ...म्हणत संयम शिकवलाय, तेरे मेरे सपने म्हणत आयुष्यभराची साथ द्यायला, दिल ढल जाये..... ने विरहाची जाणीव करून दिलीये, चांद फिर निकाला...म्हणत कोणाचीतरी वाट पाहायला,  ये दुनिया अगर मिलभी जाये तो क्या ही....ने भीषण वास्तवाची जाणीव करून दिलीये...आणि तरीही सर जो तेरा चकाराये तो ....चा उपाय ही या गाण्यानीच सांगितलाय. या गाण्यांनी माझे भावजीवन समृध्द बनवले. खरे तर हे सिनेमे माझ्या पिढीच्या जन्माच्याही बरेच आधीचे.....पण आमच्या पूर्वीच्या आणि नंतरच्या अनेक पिढ्यांवर या गाण्यांनी राज्य केलंय .... माझ्या प्रत्येक भावनेला चपखल शब्दात बांधणाऱ्या या साऱ्या गाण्यांना सलाम! 

Monday, November 5, 2012

आली माझ्या घरी ही दिवाळी.....

(खरतर ह्याला मागच्या दिवाळीची पार्श्वभूमी आहे....नवीन नवीन ब्लॉग लिहायला मागच्या वर्षी सुरुवात केली होती....त्यामुळे तेंव्हा लिहिलेली पोस्ट मनासारखी झाली नव्हती, तिचीच ही सुधारित आवृत्ती.)


दिपावली ४ दिवसांवर येऊन पोहचली, अजून मी घरात एकही फराळाचा पदार्थ बनवला नाही, आकाशकंदील लावले नाहीत, पणत्या शोधून ठेवल्या नाहीत. काल रात्री उशिरा घरी पोहचले, बिल्डिंग मधे शिरताना सहज वर लक्ष गेलं, एका घरी आकाशकंदील लागला होता, विचार आला अरे बापरे! अजुन आपण याचा विचारच केला नाहीये. दिवाळीचे वेध आजकाल लवकर लागतच नाहीत. पण असं म्हणावं तर नवरात्री पासूनच लक्ष्मी रोडवर पाय ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती असते. आता या सार्‍या गोष्टींसाठी वीकेंडची वाट पाहावी लागणार, किती कामे ठेवली आहेत त्या दोन दिवसांसाठी!

घरात शिरले समोर लक्ष गेलं, आणि चकित झाले, घर उजळून गेलं होतं, टेरेसभर चांदण्या उजळल्या होत्या. लेकीने आणि नवऱ्याने मिळून दिव्यांच्या माळा आणि आकाशकंदील लावले होते.छोट्या छोट्या गोष्टी किती आनंद देऊन जातात नाही? मग आठवत राहिली लहानपण ची दिवाळी. किती आधीपासून त्याचे वेध लागायचे. कारण घरात फराळाची तयारी सुरू होत असे, पणत्या शोधून ठेवल्या जात, आकाशकंदील नवा बनवला जात असे, मला किल्ला करायला खूप आवडत असे. आम्ही जिथे राहत होतो तिथे मी एकमेव मुलगी होते जिला किल्ला करण्यात इंटरेस्ट होता. मोठे दगड जमा करायचे, माती आणायची, दगड रचून त्यावर ओबडधोबड चिखल लिंपून किल्ला बनवायचा. त्यावर अळीव पेरायचे, सकाळ संध्याकाळ पाणी मारायचे त्यावर आणि कधी उगवतात याची वाट पहायची. किल्ल्याच्या खाली शेते, तळी, कारंजी बनवायची. बाबांच्या मागे लागून फटाक्यांबरोबर मातीची चित्रेही दरवर्षी आणायची. ती चित्रे कोणी पळवून नेऊ नये म्हणून काळजी घ्यायची. आणि शेवटच्या दिवशी किल्ल्याच्या गुहेत सुतळी बॉम्ब लावून तो फोडायचा. खूप मजा वाटायची त्यात मला. ती सवय आजही टिकून आहे .....आता किल्ले बांधले जातात मनातल्या मनात!


फराळाची तयारी बरीच आधी सुरु होत असे, जसे की अनारशांसाठी पीठ तयार करणे, भाजणी बनवणे, करंजाचे सारण बनवणे, एवढेच काय त्याकाळी पिठीसाखर देखील गिरणीतून दळून आणली जात असे. आईने लाडूसाठी पाकात टाकलेला रवा, खवा वाटीत घेऊन खायला खूप आवडायचं मला....पण मिळायचं नाही कारण नैवेद्य दाखवायचा असायचा. चकली, शंकरपाळे करताना मदत करायची असायची. आज फराळाचे बनवले तर उद्या सकाळी सुद्धा घरात तो सुवास दरवळत असे. सलग चार दिवस घरी फक्त फराळाचे बनत असे. जसे की चकली, शेव आणि चिवडा एका दिवशी, लाडूचा रवा सकाळीच भाजून पाकात टाकायचा, आणि मग करंज्या, चिरोटे करून घ्यायचे, मग शेवटी लाडू वळायचे. एक आख्खा दिवस शंकरपाळी आणि थोडे अनारसे. लक्ष्मीपूजनासाठी म्हणून मग थोडे बेसनाचे लाडू. सगळे मोठे डबे  आधीच घासून पुसून ठेवलेले असत, मग सगळे पदार्थ त्यात भरून ठेवायचे.

लहानपणी दिवाळी सुरूच मुळी होत असे ती वसुबारसेपासून. संध्याकाळी जवळच्या गाय असणाऱ्या ठिकाणी जायचे, तिला फराळाचा नैवेद्य दाखवायचा, त्या मालकाला दक्षिणा द्यायची आणि परत. मग धनोत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज. अशी किमान ६ दिवसांची दिवाळी असे मधे एखादा भाकड दिवस आला तर तो बोनस. आजकाल सारखं नाही, जेवढे दिवस ऑफिसला सुट्टी तितकीच दिवाळी. प्रत्येक दिवशी काहीतरी खास असे. दिवसभराच्या घडामोडीत आणि जेवणातही. जसे कि पाडव्याला हमखास बासुंदी बनत असे, आई ओवाळणीत काय मिळणार याची उत्सुकतेने वाट पहात असे, दुसऱ्या दिवशी मामा येणार किंवा नाही यावर बेत ठरत असे. बाबा आत्याकडे जात आणि मामा आमच्याकडे.

कपडे खरेदी हा एक आवडता उद्द्योग....तसा तो आज ही आहे..... पण तेंव्हा वर्षातून एक दोनवेळाच ते मिळत त्यामुळे त्याचे जरा जास्तच कौतुक वाटे. ..... माझे बाबा खूप सारे फटाके घेऊन यायचे, त्याची तिघात वाटणी होत असे. एकमेकांचे फटके चोरणे आणि मग त्यात शेवटी भांडभांडी होत असे. सर्वात जास्त फटाके मी उडवत असे. दोन वेळा फटाक्यांमुळे भाजल्यावर देखील. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहिली माळ कोण लावणार अशी चुरस असे. खरच इतक्या पहाटे उठत असू की सकाळी ७ पर्यंत तेल, आंघोळ, फटाके, फराळ सगळं होत असे..... रेडीओवर पहाटे दिवाळीचे खास असे कीर्तन, ते वातावरण निर्मिती करत असे. मग पर्वती चढायला जाण्याचा कार्यक्रम. इतकी मजा यायची. ११ वाजेपर्यंत घरी परत. दहीभात खावून, चांदोबा, किशोर हे दिवाळी अंक वाचत मस्त झोप काढायची. संध्याकाळी पुन्हा फटाके, दारात रांगोळी.


 दिवाळीनंतर लगेच आजीकड़े जात असू. उरलेले फटाके तिथे घेवून जात असू. मामाची मुले आणि आम्ही तिघे भावंडे. आजोबांच्या घरी शेती होती, ज्यात तांदूळ पिकत असे, त्यामुळे त्याची काढणी आणि धान्य घरी येण्याचे अनेकदा तेच दिवस असत. तिथल्या देवळात पहाटे उठून काकड आरतीला जाणे. कुडकुडत जावे लागते म्हणून तिला काकड आरती म्हणत असे मला लहानपणी वाटे. अगदी शाळा सुरु व्हायच्या आदल्या दिवशीपर्यंत तिथे मुक्काम करूनच घरी परत येत असू. आजकाल बोलावल्याशिवाय सख्खे नातेवाईकही एकमेकांकड़े जात नाहीत. आता सगळं बदललं. सार्‍या गोष्टी पैशाने उपलब्ध झाल्या, वेळ दुर्मिळ झाला.आता पर्यावरणाच्या नावाखाली फटाके बंद झाले. फराळाचे पदार्थ सतत घरात दिसू लागले, काही मजा राहिली नाही.......

अहो......आठवणीत रमलेल्या काकू! काहीतरीच काय? म्हणे काही मजा राहिली नाही. किती मजा असते.....


किमान एक महिना आधीपासून चितळे, वृंदावन त्यांच्या मेल्स येवून पडतात, त्या पाहून किमान दोन- तीन आठवडे त्यांना जावून किंवा ऑन लाईन फराळाची ऑर्डर द्यावी लागते. कोणाकडे काय चांगले मिळते हे लक्षात ठेवावे लागते म्हणजे तो पदार्थ आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना खिलवून आपल्याला थोडा भाव खाता येतो. सगळेच पदार्थ स्वत: बनवणे शक्य नसले तरी, एखादा आपला असा खास पदार्थ घरी बनवायचा असतो. खरेदीसाठी कोणता वीकेंड यावर घरी जोरदार चर्चा घडवून आणावी लागते, एखाद्या वीकेंड वर एकमत झाले तर त्या दिवशी सहकुटुंब लक्ष्मी रोडवर सकाळीच पोहोचावे लागते, दुकाने उघडतील भले १० वाजता, पण त्यावेळी पार्किंगला जागाच मिळणार नाही. थोडा उशीर झाला तर मग दुकानातही उभे राहायला जागा मिळणार नाही. अशी "Shop till you drop" खरेदी झाली की मग पुन्हा कोणत्यातरी खास,गर्दी असणाऱ्या वैशाली, दुर्वांकुर नाहीतर श्रेयस मध्ये गर्दीत जेऊन घरी परत. हुश्श!!! पण सगळ्यांनी एकत्र जावून अशी खरेदी करण्यातही आनंद मिळतो ना!


दिवाळी पूर्वी करायचे अजून एक महत्वाचे काम म्हणजे एखाद्या लहानमुलांच्या आश्रमास दिवाळीच्या काही वस्तू पाठवून द्यायच्या. कोणाच्या तरी चेहऱ्यावर आपल्या या लहानशा कृतीमुळे हसू फुलत असेल तर त्या इतकी दुसरी चांगली गोष्ट आहे का?

घर अजून देखणे कसे दिसेल हे पहायचे असते. ठेवणीतले गालीचे, सजावटीचे समान बाहेर काढावे लागते. मायेचा हात घरातील वस्तूंवरही फिरवायचा असतो. दारात रांगोळ्या काढायच्या असतात, तोरणे बांधायची असतात. रांगोळी काढणे हा आज देखील माझ्या दिवाळीचा एक मोठ्ठा भाग असतो. येते काढता येते मला फक्त टिपक्यांचीच रांगोळी. दिवाळीच्या आदल्यादिवशी, रात्री उशिरा घरी पोहचले तरी सुद्धा रांगोळी काढायचीच असते, सोबतीला लेक असते आणि सूचना द्यायला तिचा बाबा! गप्पा मारत २/३ तासात एक रांगोळी पूर्ण होते तेंव्हा जवळजवळ रात्रीचे बारा एक वाजलेले असतात. पण अशी रांगोळी काढल्याशिवाय मला दिवाळी वाटतच नाही. पहाटे नटून थटून "दिवाळी पहाट" च्या एकद्या सुश्राव्य गाण्याच्या कार्यक्रमास हजेरी लावायची असते. एक दिवस सासरचे, एक दिवस माहेरचे, एक दिवस लेकीच्या मैत्रिणी, यांना घरी जेवायला बोलवायचे असते. सगळ्यांपेक्षा वेगळा आणि तरीही रुचकर, सुग्रास बेत करायचा असतो. त्या निमित्ताने चार दिवस आपल्या माणसांसोबत हसत खेळत घालवता येतात. हे ४ दिवस कसे उडून जातात ते कळतही नाही. पर्यावरणाचा विचार करून फटाके घरी आणून उडवणे केंव्हाच बंद झालंय....पण एखादा फायर वायर शो बघायला मजा येतेच ना? पाडव्याला सुग्रास जेवण जेवून सुस्तावलेल्या नवऱ्याला बाहेर न्यायला पटवावे लागते, तेंव्हा कुठे जाऊन पाडव्याची काही खास ओवाळणी पदरी पडते. मग आग्रह करून करून काहीतरी छानशी वस्तू त्याच्यासाठी घ्यायला भाग पडावे लागते. भाऊबीजेला अजून एकदा वसुली केली कि मग दिवाळी संपते. इतक्या दमल्या भागलेल्या जीवाला मग विश्रांती हवी असते, मग जोडून सुट्टी घेवून कुठे तरी ट्रीपला जावे, आपलाच खिसा थोडा हलका करून यावे लागते.

तर काकू......सगळ्या जुन्या आठवणीत रमणे छानच असते हो पण जुन्या आठवणींमध्ये जगत आजचा आनंद हरवू द्यायचा नसतो हो..........पण आताच्या काळातल्या सगळ्याच गोष्टी, प्रथा टाकावू नसतात ना?


(सर्व छाया चित्रे आंतरजालावरून साभार)