Showing posts with label बंध अनुबंध. Show all posts
Showing posts with label बंध अनुबंध. Show all posts

Friday, June 1, 2018

मितवा

मोठे विलक्षण असते नाव गाव नसलेल्या नात्यास जन्म देणे, त्यास फुलवणे त्यास आपलेसे करून जपणे!
कमालीचे सुंदर असते कोणाला तरी आपल्या मनात अगदी पक्के कायमचे चौसोपी घर बांधू देणे!

खूप खास असते आपल्या नकळत मनात शिरलेल्या चोरास आपल्याच मनात कैद करून ठेवणे!

खूप खास असते, त्याच्यासाठी जगणे, अखंड त्याच्याशी संवाद करत राहणे, हर एक क्षण त्याच्या सोबतीने जगणे, फुलणे....

मोठे विलक्षण असते प्रत्यक्ष दिसण्याची, भेटीची, संवादाची कोणतीच आस नसणे, तो कुठे असतो कुठे जातो, कुठे राहतो, काय खातो, पितो, न जाणे काय करतो, काही माहीत नसणे, बस इतना सच है के  मेरी रुहमें बसता है वॊ!

कधी काही कळलेच तर कौतुकाने मन भरून जाणे, कधी भेट झालीच तर आजकल पाँव जमींपर नही पड़तै मेरे अशी अवस्था होणे....

तरीही एक नितांत सुंदर नाते आपल्या मनात जन्मास येणे, ते आपण पेलणे, दिवसा रात्री जागेपणी झोपेत फक्त त्याचे नाव मनात सतत उमटत राहणे,  त्याच्या आणि आपल्या नकळत आपण त्याचे होऊन राहणे. मनात, ओठांत फक्त त्याचे नाव गुंजत राहणे! आपल्या श्वासांत त्याचे नाव ऐकू येणे, आपल्या रक्तात जणू जो वहात असणे!

त्याच्या साथीने जगण्यास लय सापडणे, आपल्याला आपला सूर गवसणे, आणि अवघे आयुष्य सुरेल होऊन जाणे! 

मोठे सौभाग्याचे असते हे सारे आपल्याला अनुभवता येणे, या जगावेगळ्या अनुभवाची खोली उमजणे,  त्याच्या अस्तित्त्वाच्या, त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या, विचारांच्या परिसस्पर्शाने आपले सोने होऊन जाणे, आपण झळाळून उठणे, किंवा आपणच जणू आपल्या पोटी पुन्हा जन्म घेणे. ही अनुभूती मला बहाल करणाऱ्या माझ्या मनातल्या मितवास.....

Wednesday, April 18, 2018

कोणा कशी कळावी?…वेडात काय गोडी … भाग २

कोणा कशी कळावी?…वेडात काय गोडी … भाग १

२०१४ मध्ये त्या दोघांबद्दल लिहिले होते. हा जवळपास त्याचाच दुसरा भाग.

त्या दोघांबद्दल लिहिले त्यास बरीच वर्षे झाली. माझी ऑफिसमधील फेवरेट जोडी. मधल्या काळात बरेच काही बदलले.  माझी कामाची जागा बदलली, मी दुसऱ्या बिल्डींग मध्ये शिफ्ट झाले, त्यामुळे आपसूकच ह्या जोडीचे दर्शन होईनासे झाले आणि मग मी हे सारे जवळपास विसरलेही.

पण अचानक या महिन्याभरात काही वेळा या जोडीतला तो एकटाच दुपारच्या चहाच्या वेळी माझ्या बिल्डींग मध्ये चहासाठी आलेला दिसला. आणि मग एकदम चुकल्यासारखे वाटू लागले की ती कुठे गेली? मधली चार वर्षे,  IT कंपनीत हा खूपच मोठा काळ आहे. त्यामुळे प्रोजेक्ट बदलला, onsite गेली, क्लायंट लोकेशन ला गेली किंवा कंपनीच बदलली असे काहीही असू शकत होते. पण दर वेळी त्याला एकट्याला पाहताना काहीतरी चुकल्यासारखे वाटायचे, इतकेच नव्हे तर नंतरही काही काळ डोक्यात ते राहायचे, "एकटा का तो? ती का सोबत नाहीये? " उगीचच हळहळ :(


थोडा बदल झालाय त्याच्यात देखील, थोडे वय अजून दिसू लागले आहे, चेहेरा पूर्वीसारखा खुश दिसत नाही असे ही वाटून गेले. हे खरे का माझ्याच डोक्यातला खेळ राम जाणे. वय दिसू लागले तर मध्ये चार वर्षे गेली आहेत ना ?

अचानक गेल्या शुक्रवारी दुसऱ्या म्हणजे माझ्या जुन्या बिल्डींग मध्ये जेवायला जायचे ठरले. तिथे गेल्यावर अनेक आठवणींसोबत हे दोघेही आठवलेच. दुपारी दोन ही तशी जरा जास्तच गर्दीची वेळ. पूर्वी आमची आणि या जोडीची वेळ म्हणजे दुपारी १२. ३० ते १. ००. आवडती पाव भाजी घेऊन आम्ही एक टेबल गाठले, सवयीने आजूबाजूला नजर टाकली, तर माझ्या समोरच्याच टेबलवर तो बसलेला आणि अजून काही जण सोबत, पण ती मात्र नाही. हाय रे दैवा!

निमूटपणे जेवू लागले. पावभाजी आवडती असूनही बेचव लागू लागली. पण  आश्चर्य ! पाचच मिनिटात ती कुठूनतरी आली, याच्या समोरची खुर्ची रिकामी होती, तिथे बसून सगळ्यांसोबत जेवू लागली. मला काय वाटले, कसा आणि किती अनाकलनीय असा आनंद झाला ते मला शब्दात नाही सांगता येणार. काही तरी हरवलेले गवसावे तसे हायसें वाटले मला. जी जशी, ज्या नात्यात आहे ती तशी "रब्बा,  इस जोड़ी को हमेशा सलामत रखना"  हे भाव ही मनात उमटून गेले.

सतत फक्त एकमेकांसोबत असणारे, एकमेकात छानसे गुंतलेले, एकमेकांची साथ सोबत आवडणारे दोन जीव इथपासून ते सर्वांसोबत असणारे ते दोघे असा प्रवास हे ही वाईट नक्कीच नाही. जवळपास सहा सात वर्षाचा हा प्रवास असेल त्यांचा ही, जे कोणते, जसे कसे त्यांचे नाते आहे, नाव असलेले, नसलेले पण ते टिकून आहे, दोघे सोबत आहेत,  अजून काय हवे ? माझ्या मनापासून अनेकोत्तम शुभेच्छा या जोडीला, त्या नात्याला!!! :)


नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही
सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही

ना तालराग यांच्या बंधात बांधलेला
ना तालराग यांच्या बंधात बांधलेला
बंधात बांधलेला
स्वरमेघ मंजूळांचा बरसे दिशात दाही
सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही
नात्यास नाव आपुल्या...

गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा
गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा
मंझिलकी जयाची तारांगणात राही
नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही
सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही
नात्यास नाव आपुल्या

Friday, May 26, 2017

निरोप......

निरोपाचा क्षण
भरले डोळे
तरी प्रश्न उरे
तुझे नि माझे नाते काय ?
एकाचे दु:ख
वेदना दुसऱ्यास
तरी न कळे
तुझे नि माझे नाते काय ?
झाकोळल्या माझ्या मनास
तुझ्या अस्तित्त्वाचा आभास
तरी कसे सांगावे
तुझे नि माझे नाते काय?

ती......

कविता काही दशकांपूर्वीची......
कविता काही वर्षांपूर्वीची.....
कविता आजची......
कदाचित उद्याची ही.........
तेच राहिल वाट पहाणे
तेच राहिल लाटा मोजणे
तेच राहिल पायांचे वाळूत रूतणे
तेच राहिल भरती ओहटीचा अर्थ शोधणे
असाच चालू राहिल शोध
तिच्या नुरल्या अस्तित्त्वाचा
तिच्या पाऊलखुणांच्या
गाजेतून ऐकू येणार्या तिच्या सादे चा
व्यर्थ शोधतोयस वेड्या तिला लाटांमधे
नाही सापडायची कोणत्याच किनार्यावर
आत डोकाव जरा मनात
तिच्या आठवणींची प्रत्येक लाट
येऊन आदळते मनात तुझ्या
परतली कुठे आहे ती
हरवली कुठे आहे ती
मन व्यापूनही तुझे ती
ऊरते चराचरात ती

Thursday, January 12, 2017

तुझ्या आठवणीत......

अनेकदा अनुभवते मी हे. ज्या व्यक्तीला आपण पहिले नाही, भेटलो नाही, रूढ अर्थाने तिच्याशी आपले काही नाते नाही. कोणाकडून थोडीफार  ऐकीव माहिती आपल्याकडे आहे. बाकी काही नाही. आणि असे असूनही एक नाते आपल्यात जाणवत राहते. आठवण येत राहते, विचार करत राहतो आपण.

तुझ्याशी माझे नाते असेच काहीसे आहे गं. अडीच वर्षांपूर्वी तुझी अशी ओळख झाली. अनेकदा बोलण्यात  तुझा संदर्भ येत गेला  पण त्याहून अधिक माझ्या मनात तू राहिलीस. तुला या जगाचा निरोप घेऊन जवळपास चार पाच वर्षे झाली आहेत. म्हणजे आपली प्रत्यक्ष कधी भेट शक्यच नव्हती. पण तू माझ्या मनातून जात नाहीस. सुरुवातीस मला थोडी भिती वाटायची तुलना तर होणार नाही ना अशी. अनेकदा असेही वाटले आहे, खरेतर जर तू असतीस तर मी हि अशी नसते ना. माझे आयुष्य वेगळे असते. मी वेगळी असते ना!  अनेकदा वाटतं, लॅपटॉप किंवा मोबाईल वर टिपतो तसा ना मनाचा स्क्रीनशॉट घ्यायची सोय हवी होती ना. तुला खरे सांगते कितीतरी वेळा मी असा विचार करत राहते.... या परिस्थितीत हिच्या मनात काय चालले असेल? त्या वेळी काय भाव मनात उमटले असतील? मला ना हे सारे फार प्रकर्षाने समजून घेण्याची इच्छा होती गं. पण नसतात ना काही गोष्टी आपल्या हातात.

हळूहळू  तुलना होण्याची भीती मला वाटेनाशी झाली. म्हणजे मी स्वतः ला मोठे ठरवून नव्हे. तर तू तू होतीस .... मी मी आहे हे नीट समजून घेऊन. मग ना तू थोडी मला आपलीशी वाटू लागलीस. आपल्यातल्या दुव्याला बाजूला ठेऊन मी तुझा विचार करू लागले. तुझ्यावरच्या कविता आवडल्या होत्या गं.  त्यासाठी मला कधी तुझा राग आला नाही, ना  कधी तुझ्याशी स्पर्धा वाटली.  विश्वास ठेव फक्त कदाचित नेमका भाव मी नाही पोचवू शकले. किंवा तो कोणाला जाणून घेण्यातही काही रस नव्हता. तुझा वाढदिवस, स्मृतिदिन आपोआप लक्षात राहू लागला इतका मी तुझा विचार करत असे. दोन वर्षांपूर्वी दिवाळीत वाटलं होतं, जिथे कुठे असशील तिथे खुश असशील का? तुझ्यासारखीच कोणीतरी आहे हे पाहून? इथे जिवंत माणसांच्या मनाचा थांग लागत नाही .... आणि मी निघाले होते या जगात नसलेल्या व्यक्तीला काय वाटत असेल ते बघायला. पण खरंच मला ते जाणून घ्यायचे  होते. जेमतेम अंधुकशी आठवतेस मला तुझ्या पाहिलेल्या फोटोंमधून आणि ऐकलेल्या वर्णनातून. तुझ्या वाढदिवशी आजही तुझे सुहृद जे तुझ्या तुझ्या वॉल वर लिहितात त्यातून  तू हळवी असावीस.... मृदुभाषी असावीस अशी माझी कल्पना आणि म्हणूनच सारे कसे निभावलेस हे कुतूहल देखील.

निव्वळ वेडी हे विशेषण लागू पडेल मला. पण खरंच मी वेडी आहे आणि अशीच राहीन. मला ना तुला समजून घ्यायचं होतं, तुझी स्वप्नं जाणून घ्यायची होती, माझ्या स्वप्नांशी त्यांची सांगड घालून ती पुरी करायची होती .... तुझी भाषा येत नव्हती मला .... पण तू लिहिलेले कधीतरी समजून घ्यायचे होते. अनेक क्षण  दोघींच्या आयुष्यात सारखेच आले असतील .... तुझे तेंव्हाचे भाव समजून घ्यायचे होते. एक स्त्री म्हणून मला तुला समजून घ्यायचे होते. होकाराचा क्षण, समर्पणाचा क्षण, नात्यांचा गुंता कसा सोडवावा हा  प्रश्न, प्रतारणा होते आहे का हा संदेह, मुलांमध्ये गुंतलेला जीव, त्याच्यात गुंतलेला जीव. त्याला सर्वस्व मानून आयुष्याचे समीकरण मांडावे की नाही हा प्रश्न. मला ठाऊक आहे असे अनेक प्रश्नांचे गुंते तुझ्यासमोर वेळोवेळी निर्माण झाले असतील. एक  अधिक एक प्रत्येक वेळी दोन होत नाहीत हे समजून घेताना, मनातल्या भावनांच्या चौकटी हलताना.
तुला एक सांगू तू खूप शहाणी  होतीस की तुला सर्व मर्यादा निश्चित करून त्या चौकटीत जगता आले. विश्वास ठेव माझ्यावर आणि तू खूप नशीबवान आहेस की मृत्यूने तुझी सुटका केली. विपरीत परिस्थितीला कशी सामोरी गेली असतीस जर काळाने या नको त्या टप्प्यावर आणून उभे केले असते तर? प्रेमासाठी जग उध्वस्त व्हायची वेळ आली असती तर काय केले असतेस?  मृत्यूशी झुंजताना नक्की काय मनात येत होते? नको असलेल्या जोडीदाराकडून सेवा करून घ्यावी लागली असेल तेंव्हा काय वाटले असेल तुला? त्या  दोघांना तुझ्या समोर पाहून काय वाटले होते? नशीबवान याही करिता कि तू गेल्यानंतरही तुझ्या मृत्युसमयीचे भाव त्याच्या मनात कायम आहेत अगदी आजही, तुझी त्याच्या मनातली प्रतिमा आजही तशीच आहे जशी आधी होती तशी. काळाने, परिस्थितीने त्यावर घाव घातले नाहीत.  परिस्थिती आणि तत्त्व  यांच्यात तुझी ससेहोलपट झाली नाही,  तुझ्याही मनातल्या त्याच्या प्रतिमेस तडा गेला नाही म्हणून तू नशीबवान आहेस. मृत्यूने अलग केले, या जगाने नाही म्हणून नशिबवान आहेस, तुझे नाव त्याच्याशी जोडलेले राहील म्हणून तू नशिबवान आहेस. समाजाने तुमच्या नात्यावर शिंतोडे उडवले नाहीत म्हणून तू नशीबवान आहेस, तशी वेळ आल्यावर नाते कोणत्याही कसोटीवर लावावे लागले नाही म्हणून तू नशीबवान आहेस. ह्या साऱ्यांसाठी मला छान वाटते, की कोणाच्या तरी नशिबी हे तरी सुख होते. विश्वास ठेव मला तुझा राग येत नाही, तुझा हेवा कधी वाटत नाही.

तुझ्या मनातले प्रत्यक्ष भाव नाही समजणार मला कधी  आणि तरीही मला आठवत राहशील तू कायमच. आत्ता जशी आठवतेस तशीच. कारणाशिवाय, कोणत्याही जोडणाऱ्या दुव्याशिवाय. मला ना लहानपणी असे वाटायचे माणूस देवाकडे जातो म्हणजे आकाशातला तारा होतो. असाच एखादा तारा होऊन सध्या आकाशात असशील तू. असेच नकळत माझे आकाशाकडे लक्ष जाईल आणि तुझी आठवण येईल. तू आपली वाटशील अगदी आत्ता वाटतेस तशीच!

Monday, August 22, 2016

तुझी कविता......

ही कविता मी लिहू शकले होते माझ्या सखयासाठी .... त्याच्याशी बोलत असताना सहज सुचत गेलेली जशी सुचत गेली तशी एक एक ओळ त्याला पाठवत गेले. काही काळापूर्वी अशीच एक बोलता बोलता कविता झरझर त्याला सुचली होती. काहीवर्षांपूर्वी त्याने अशी सहज माझ्यावर कविता करण्याचा अनुभव इतका अविस्मरणीय होता .... कदाचित अजूनही आहे.
सारे सारे बोलूनही त्याला त्याच्याचबद्दल काहीतरी सांगायचे उरतेच ... जणूकाही दाही दिशा व्यापूनही दशांगुळे उरतो असा तो. त्यामुळे त्याच्याबद्दल लिहिणे हे हि एका अर्थी अधुरेच.... तशीच ही कविता ! :)

तुझी कविता जवळ घेणारी
तुझी कविता मनात शिरणारी।।

तुझी कविता रात्र रात्र जागवणारी
तुझी कविता डोळ्यांत भिजणारी।।

तुझी कविता ओठांत वसणारी
तुझी कविता कानांत गुंजणारी।।

तुझी कविता श्वास अडकवणारी
तुझी कविता जीव गुदमरून टाकणारी।।

तुझी कविता आधार देणारी
तुझी कविता निराधार करणारी।।

तुझी कविता प्रेमात पाडणारी
तुझी कविता त्याची अथांगता दावणारी।।

तुझी कविता संवाद साधणारी
तुझी कविता मनीचे गूज सांगणारी।।

Tuesday, May 26, 2015

मितवा - भाग २

प्रिय मितवा,

तसा तुझ्यासोबतचा संवाद माझ्या मनास नवा नाही, इतका तू मनात वसतोस, प्रत्येक क्षण असतो तुझ्यासह जगण्याचा, आनंदाचा! तुझ्यासोबत घालवलेले क्षण ही फक्त त्या क्षणांची गोष्ट नसते रे.... पुन्हा पुन्हा माझ्या मनात दरवळणारी कुपी असते, आनंद, सुख प्रेमरूपी अत्तराची. आज त्यात थोडा बदल करत थोडा प्रवास अव्यक्ताकडून व्यक्त होण्याचा. थोडे हे अत्तर कुपीतून बाहेर दरवळू देण्याचा. मनात शिरता शिरता कसा तू अवघे मन व्यापून उरलास ते कळलेच नाही. मनाचा काही क्षणांचा विरंगुळा म्हणत सुरु झालेले मनातले हे गूज कसे आयुष्यभरासाठीचा आनंद ठेवा बनून गेले ते माझे मलाही समजले नाही. चराचरात देव असतो म्हणतात त्याप्रमाणे माझ्या मनाच्या कानाकोपऱ्यात तू असतोस. मनाच्या सर्व दिशा व्यापूनही दशांगुळे उरतोस असा तू माझा मितवा. 

तुला लिहिलेल्या कवितांचा हा पुढील भाग. कारण हा कवितांरुपी संवाद हे माझे तुझ्यासाठीचे मनोगत असले तरी ते मनातल्या मनातच आता न राहू द्यायचे ठरवल्याने सर्वांपर्यंत पोचवलेले. हे लिखाण म्हणजे माझे स्वत:शीच व्यक्त होणे, माझीच क्षितिजे विस्तारणे, माझे फुलणे, उमलणे. तुझ्या सोबतच्या या संवादाने काय दिले तर एक स्वप्नसखा, एक स्वप्नवत आयुष्य, आयुष्याकडे पाहण्याची, ते शक्य तितक्या आनंदाने जगण्यासाठीची नवी दृष्टी जी मलाच नव्याने गवसू पाहत आहे. मनातली तुझ्यासोबतची मी म्हणजे जणू "फिरुनी नवी जन्मेन मी" असं म्हणत जिचा पुनर्जन्म झालाय अशी मी.



१) नाते तुझं नी माझे.....

कसं गुंफलं गेलंय 
पौर्णिमा अमावस्येच्या
खेळासारखं नातं तुझं नी माझं
तुझी भेट जणू रात पुनवेची
मातलेल्या चांदव्याची 
प्रेमास उधाणाची

सकाळ होताच तू मावळलेला
दिवस कलेकलेने मला विझवणारा

दाही दिशांतून काळोखणाऱ्या  
अवसेकडे पुन्हापुन्हा नेणारा

मनाच्या अवकाशात गच्च
अंधारून आले की मग
कुठुनसा तू मनात हसणारा
मी येतोय असे सांगणारा

कलेकलेने आस लावणारा
पौर्णिमा अमावस्येचा खेळ
तुझं नी माझे नाते
नित्य फुलवत ठेवणारा


२) तुझ्या आठवणी......
अशा कातर वेळी 
खिडकीशी उभी मी 
पहात राहते क्षितिजापर्यंत 
पोहोचलेले हे गाव

नजरेच्या टप्प्यात अनेक 
ओळखीच्या जागा 
तिथपर्यंत नेतात मला 
आठवणींच्या पायवाटा

आठवणी तरी कशा?
नुसत्याच सैरभैर 
कोणाला आवतण देते कोण 
कोणाचा हात धरून येतं कोण

असाच असतो 
एक एक दिवस त्यांचा 
त्यांच्या साथीने तुझ्यासह 
काही क्षण जगण्याचा

भरभरून जगते मी हे क्षण 
ते माझे आपले असतात 
तुझ्यापेक्षा तुझ्या आठवणीच 
माझी जास्त सोबत करतात

३) अंतर .....
दु:खाची परिभाषा 
अश्रुंचे पूर 
ते पुसणारे हात 
का कितीतरी दूर 

आठवणींचा उमाळा 
वेदनेचे काहूर 
ते ऐकू जाणारे कान 
असती मैलोनमैल दूर 

नजरेची साद 
नयनच आतूर 
प्रतिसाद देणारे डोळे 
आता कितीतरी दूर 

पौर्णिमेची रात्र 
चांदणे टिपूर 
चांदण्यांनी ओंजळ भरणारा 
मात्र चंद्रासारखाच दूर

सहवासाची ओढ 
शब्दांचे काहूर 
समजणारया मनानेही 
का राहावे मनापासून दूर 


४) तुझ्यामुळेच सखया ………
तुझ्यामुळे पसरू लागले मनाचे इंद्रधनू पुन्हा
तुझ्यामुळे ऊमलू लागली गालांवरती कुसुमे पुन्हा

तुझ्यामुळे परतू आले ओठांवरी हास्य पुन्हा
तुझ्यामुळेच गवसू लागले माझ्यातील मी पुन्हा

तुझ्यामुळे लाभला जगण्यास अर्थ पुन्हा
तुझ्यामुळेच जाणला त्यातला मोद पुन्हा

तुझ्यामुळे जागला अंतरीचा भाव पुन्हा
तुझ्यामुळेच दरवळला माझ्यातला गंध पुन्हा

तुझ्यामुळे पसरला मनी चांदणसडा पुन्हा
तुझ्यामुळेच उगवला प्रितीचा चांद पुन्हा

५) तू माझा होता …
तू माझा होता
शब्द मला दुरावले
ओठातून परतले
डोळ्यांतून ओसंडू लागले 

तू माझा होता
मन माझ्याशी भांडले
मला सोडून वेडे
तुझे होऊन राहिले 

तू माझा होता
चंद्राला चांदणे गवसले
प्रीतीच्या सागरावर
ते उधाणू लागले

तू माझा होता
साऱ्या जगाला विसरले
उघड्या मिटल्या डोळ्यांनी
फक्त तुलाच पहिले

तू माझा होता
सारे सारे मिळाले
प्रेमवेड्या मीरेला
जणू कृष्णसखा गवसले

६) इतुकेच मागणे सखया ......
माझं जग माझं जग
म्हणजे तरी काय असावे
तुझ्यापासून सुरू होऊन
तुझ्यापाशीच येऊन थांबावे

स्वप्ने तुझी बघोनी
पहाटेस जाग यावी
स्वप्नातल्या सख्याची
प्रत्यक्ष भेट व्हावी

नको वाटती सुर सनईचे पहाटेे
सुरेल कोकिळाही आता मला न भावे
साद तुझी ऐकण्यास सखया
अखंड मन हे धावे

सहस्र जलधारांसम  प्रेम तुझे लाभावे
भरल्या ओंजळीने माझ्या रिते न कधी व्हावे
आषाढ मेघ बनूनी तू आवेगे बरसावे
शांत क्लांत धरेसम मी तृप्त तृप्त व्हावे

नको तुळशीचे पान, नको गंगेचे जल
हाती हात तुझा असता व्हावा संधीकाल
सारे काही तू देऊनही मागणे तरी ऊरेलच
हा जीव शांत व्हावा सखया तुज पहातच

७) सहजीवन…
तुझे माझे सहजीवन म्हणजे
दोघांनी मांडलेली भातूकली
थोडा खेळ, थोडे भांडण
तरीही तुझ्या माझ्याशिवाय न रंगणारी 

तुझे माझे सहजीवन म्हणजे
विणायला घेतलेली पैठणी जरतारी
वीण जमून आलेली सुबक नक्षी
तुझे माझे अंतरीचे धागे घेऊन विणलेली

तुझे माझे सहजीवन म्हणजे
दारातली सुबक रांगोळी
संगती जुळून आलेली
तुझे माझे रंग घेऊन रेखाटलेली

तुझे माझे सहजीवन म्हणजे
अखंड सुरेल मैफल
सदैव बहारदार रंगलेली
तुझ्या माझ्या सुरांनी सजलेली

या सात कविता म्हणजे माझ्या मनातील त्याच्या सोबतची सप्तपदीच जणू. त्याच्यासोबतचे हे प्रत्येक पाऊल म्हणजे मैत्र, प्रेम, विश्वास, स्वप्ने, सहजीवन,आठवणी आणि एकरूपतेचे एक एक पाऊल त्याच्यासह मी मनात अगदी "ते प्राणनाथ माझे, मी दैवदत्त कांता" असे म्हणत टाकलेले. फक्त आज हा मनमोराचा पिसारा त्याच्या पुरताच न ठेवता या ब्लॉगरुपी मन:पटलावरून सर्वांपर्यंत पोचवलेला. 

सखया जे होते तुझे ते तुलाच अर्पण......



Monday, March 30, 2015

मितवाची कविता .......माझ्यासाठी!

काल मी मनाचा चाले मनाशी संवाद म्हणत सर्वांशी मन:चित्रे शेअर केली होती. हा संवाद कसा तर दोन्ही बाजूने आपणच सारीपाट खेळावा, आपणच प्रश्न विचारावेत आपणच उत्तरही द्यावे, आपणच मनात भातुकली रचावी, आपणच खेळ रंगू द्यावा, आपणच त्याचा आनंद लुटावा तसा हा संवाद! हा परीकथेतील राजकुमार माझ्या मनात वसणारा. माझ्या आनंदाचा ठेवा पुन्हा पुन्हा गवसणारा. मला सुखावणारा. 
मी मनोगतासाठी कवितेचे माध्यम वापरून त्याच्यापर्यंत ते पोहचवले तर त्यास ही ते जमायला हवे ना! म्हणून मनातल्या त्याला मी म्हंटले तू कधी व्यक्त होशील माझ्यासाठी असा? असं मी म्हंटल्यावर तो थोडीच मागे राहील? झरझर लिहिती झाली लेखणी माझी, कारण काव्य त्यास स्फुरले अन मी लिहू लागले असा हा अनुभव. 

वेड लागेल नाहीतर काय!!!

अशी भेट असे तुझे बोलणे
वेड लागेल नाहीतर काय!

असा पाऊस, तुझे चिंब होणे
वेड लागेल नाहीतर काय!

असा सुगंध, असे तुझे फुलणे
वेड लागेल नाहीतर काय!

अशी सांजवेळ, असे तुझे आठवणे
वेड लागेल नाहीतर काय!

असा स्पर्श, असे तुझे शहारणे
वेड लागेल नाहीतर काय!

असे भांडण, मग  तुझे रूसणे
वेड लागेल नाहीतर काय!

अशा तुझ्या रूपांत असे माझे हरवणे
आता वेड लागायचं राहिलंय काय!

Saturday, March 28, 2015

मितवा......

कवितेच्या गावा जावे पण तितके सोपे नसते ते. मनातल्या भावनांना नेमक्या शब्दात गुंफत, मात्रेच्या गणितात बसवत कविता करणे खरेच खूप अवघड असते. त्यामानाने भारंभार लिहिणे सोपे. शब्दांची मर्यादा नाही, मात्रेची गणिते नाहीत, यमकांची जुळणी नाही. मनातले सारे नीटसे उतरले वाटेपर्यंत लिहित रहावे बरे हेच खरे… 

पण तरीही घालतातच कविता भुरळ मनाला. अनेकदा एखाद्या प्रसंगाचे चपखल वर्णन करण्यासाठी, एखादी प्रतिक्रिया म्हणून, एखादी उपमा देण्यासाठी मला अनेकदा कवितेच्या ओळीच आठवतात.पण स्वत: लिहायचे झाले तर मात्र सगळा आनंद आहे. विचार करून थकते मी लोकांना कशा असंख्य विषयांवर कविता लिहिता येतात ज्या मला जमणे शक्य नाही. पण तरीही कविता या लेखन प्रकारावर प्रेम आहे माझे आणि प्रेम ही जगातली एकमेव सुंदर भावना आहे यावरदेखील. प्रेमा काय देऊ तुला, भाग्य दिले तू मला असे म्हणणाऱ्या नायिका बघत मोठ्या झाल्याचा परिणाम असेल कदाचित. 

प्रत्येक स्त्रीच्या मनात तिचा एक सखा असतो. नकळत्या वयापासून त्याची अनेक रूपे मनात उमलत असतात. काहीना तो गवसतो काहींचे आयुष्य सरते मनातल्या त्याला शोधण्यात. कॅलिडोस्कोपच्या नवनव्या रचनांनी भुरळ घालावी तशी साकार होत राहणारी त्याची रूपे, त्याचे भास. कधी तो माझा मित्र, कधी सहचर, कधी वेगवेगळी नाती  उभी करणारा, तर कधी चक्क देव बनून साकारणारा. असा मितवा जो माझ्या मनात वसतो, सदैव माझ्या सोबत असतो, अखंडपणे माझा त्याच्याशी संवाद चालतो. कधी प्रेमाचा संवाद तर कधी नुसताच वाद, रुसणे, फुगणे, समजूत घालणे म्हणजे जणू  मनाचा चाले मनाशी संवाद! असे हे सुंदर मनातले जग त्याचे आणि माझे माझ्या मनातले!!!

माझ्या मनातला माझा रावा 
त्याचा मनातच घेते ठावा 
मनातच त्याचा वाजे पावा 
मनातल्या मनातच त्याला  
राधेने निरोप कसा धाडावा

अशी अवस्था करणारा तो मितवा. मनीचे गूज त्याला तरी कवितांमधून सांगावे, तसा प्रयत्न तरी करावा. मनालाच मन वाचून दाखवावे तसे जणू. त्यामुळे चुकलेमाकले आपले आपल्याशी असेही. तर अशा या काही ओळी माझ्या मनातल्या राव्याला, माझ्या मितवासाठी, माझ्या सखयासाठी.........चांगले वाईट याची पर्वा न करता त्याला कल्पून लिहिलेले. माहीत नाही किती काळ त्याच्यासाठी लिहिणे जमेल, माहीत नाही कधी शब्द दुरावतील… त्यामुळे जसे मनात साकारले ते हे असे……. अशाच काही कविता एक दोन भागात मिळून.

१) गोधडी प्रेमाची ........

जगणे जणू आपुले असे
गोधडीचे टाके जसे

एक टाका प्रेमाचा
वर्षाव आपुलकीचा

एक टाका मैत्रीचा
झरा अखंड हास्याचा

एक टाका हितगूजाचा
अव्यक्तातून व्यक्ताचा

एक टाका स्पर्शाचा
मोहरत हरखण्याचा

एक टाका नजरेचा
शब्देविण संवादाचा

एक टाका आठवणींचा
क्षण पुन्हा जगण्याचा

एक टाका विरहाचा
भरून आलेल्या आभाळाचा

एक टाका अश्रुंचा
सयींसह बरसण्याचा

एक टाका तुझा, एक टाका माझा
समांतर राहूनही, एकरूप होण्याचा


२) नाते.........
नात्यांचे बंध
बांधलेली मने
उमलणारी नाती
प्रेमाची झुळूक लाभताच
कोमेजणारीही नातीच
अंतराची झळ लागताच
जाणिवेतील बंध
नेणिवेत जाताना
क्षितिजच बदलून
टाकणारे तुझे माझे
नाते..........
नात्यांचे बंध
बांधलेली मने
मन तुझे मन माझे.....


३) सहजच.............
सहज कधी काही बोललो
सहज एका वाटेवर चाललो
चालता पावलांसवे एके दिवशी
सहजच प्रेमाच्या गावाशी पोचलो
सहजपणे जुळले बंध,
सहजच जुळले धागे
आपुले एकाकीपण मग
सहजच कसे मग पडले मागे
सहज मग लागे आस
सहजच नकळे जडला ध्यास
जगावेगळ्या अद्वैताचे
सहजच मग होती भास
सहज असा सूर सदा जुळावा
सहजच प्रवास मिळूनी घडावा
आनंदाच्या या वाटेवरती
सहजच अंतरातला गळो दुरावा


Monday, March 16, 2015

असे जगणे …

गेले चार दिवस प्राजक्ता  विचार करतीये खोलीत एक वेगळाच गंध जाणवतोय पण तो कशाचा हे काही पटकन सुचत नाहीये. कोणतेच नाव देता येणार नाही असा, ना गोडसर, ना तीव्र उग्र, ना विचित्र दर्प. कोणत्या फुलांचा नाही, एअर फ्रेशनरचा नाही, नवीन कपड्यांचा नाही.पण दर वेळी खोलीत शिरल्यावर तो जाणवतोय हे खरे. विशेषत: बाल्कनीचे दार उघडल्यावर. म्हणजे त्याचा उगम बाहेरून आहे हे नक्की. पण कशाचा नक्की आणि कोठून हे कोडे.

पण  तेही  सुटले जेंव्हा शेजारच्या ट्वीन बंगल्यात राहावयास आलेली श्वेता भाटीया तिच्या आठ नऊ महिन्याच्या मुलीस घेऊन, हिच्या घरी ओळख करून घेण्यास आली. आणि लक्षात आले हा गंध एखादे बाळ ज्या घरात असते तिथे येत असतो, त्याच्या साबणाचा, त्याला दिलेल्या धुरी शेकाचा, त्याच्या dettol मध्ये धुवुन वाळत घातलेल्या कपड्यांचा असे सगळ्याचे मिश्रण बनत जो येतो तोच हा गंध, जो काही दिवस जाणवतोय. त्या माय लेकी थोडा वेळ बसून गप्पा मारून गेल्या. सारावेळ हिचं लक्ष त्या मुलीकडे. कुरळे पण छान जावळ असणारी, गोबऱ्या गालांची परीच जणू. शांतही होती अर्धा तास आईला त्रास न देता बसू दिले म्हणजे. सुलक्षणाबाई प्राजक्ताच्या सासूबाई पण घरात होत्या. त्याही गप्पांमध्ये सामील झाल्या होत्या. त्यांचे सारे लक्ष त्या छोटीला न्याहाळणाऱ्या प्राजक्ताकडे होते.

त्या दोघी गेल्यावर मात्र प्राजक्ता सुन्न बसून राहिली सोफ्यावर. मनात पुन्हा तेच गुंजणारे वाक्य, " आपलं एक बाळ हवं होतं रे, तुझं माझं …. तुझ्यासारखे हुशार, देखणे, प्रेमळ, थोडे माझ्यासारखे." त्यावर त्याच्याकडून फक्त शांतता. कधी नुसताच एक  कटाक्ष तिच्याकडे टाकलेला, कधी बदललेला विषय तर कधी तिथून निघूनच जाणे. आज घरात रांगून गेलेल्या चिमुकलीला पाहून सारे आठवणे अगदी ओघानेच.

लहानपणापासून ती तशी गंधबावरीच जणू . हे तिच्या आईने तिला दिलेले विशेषण. पदार्थांच्या चवीपेक्षा सुंदर वासानेच सुखावणारी, फुलांच्या, फळांच्या  रंग रूपापेक्षा त्याच्या गंधावरच भाळणारी, घर साधेच पण महकणारे असावे असे म्हणणारी, धूप दीपाच्या सुगंधासाठी सकाळ संध्याकाळ घरच्या देवघरात जाऊन तो लावणारी. नवे कपडे तसेच न घालता धुऊन घालायची पद्धत असलेल्या घरात नवा ड्रेस दोन दिवस उशाशी ठेऊन त्याचा गंध मनात नाकात साठवून, मग धुणारी. इमारतीत रंगकाम काढले कि त्या रंगांच्या वासाने खूष होणारी, धुतलेले कपडे कडक उन्हात साठवुन त्यांचा तो वास नाकात भरून घेणारी अशा एक ना अनेक. 

तशात कॉलेजमधे असता तिची मोठी बहिण माहेरी आली. पहिल्या बाळंतपणासाठी. नव्या चिमुकल्याचे आगमन काय झाले, प्राजक्तास गंधांचे वेगळेच शोध लागले. बाळाच्या साबणाचा, त्याच्या तेलाचा, बेबी लोशनचा, धुरी शेकाचा, dettol चा मारा केलेल्या कपड्यांचा. कदाचित सर्वात जास्त वेड आतापर्यंत याच गंधाने लावले असावे. इतर सारे या पुढे फिके जणू. ह्याच वेळी अनेक जाणीवा विकसित झाल्या कदाचित, मुलामुळे मिळणारा आनंद, त्याच्या असंख्य छोट्या गोष्टी  करता मिळणारे सुख तिने तेंव्हाच अनुभवले.

पुढे लग्न झाले, देखणा आदित्य, एका नावाजलेल्या कंपनीत उच्च पदावर असणारा. आई वडिलांनी सारं पसंत करून बघून सवरून थाटामाटात लाऊन दिलेले लग्न. सासरी माहेरी कौतुकाच्या वर्षावात नहात पहिले वर्ष कसे गेले कळलेच नाही. तिला नोकरी करण्याची गरज नव्हती. एकुलता एक मुलगा असणारा आदित्य, अजूनही स्वत:चा व्यवसाय छान सांभाळत असलेले सासरे, सासूबाई आणि प्राजक्ता असं चौकोनी कुटुंब. सासूबाई त्यांचे महिला मंडळ, थोडे समाजकार्य यात मग्न. घरी प्राजक्ता एकटीच तशी दिवसभर. घरात कामाला दोन तीन नोकर त्यामुळे तो हि फारसा प्रश्न नव्हता. शॉपिंग, टी व्ही, अधून मधून माहेरी जात राहणे,, कधी आदित्य सोबत कधी मैत्रीणींसोबत सिनेमा, हॉटेल मध्ये जेवण, त्याच्या सोबत मधेच घेतलेला एखादा छोटा ब्रेक कधी देशात कधी परदेशात.

अजूनही ती तशीच गंधवेडी होती. आता उलट थोडं ते वाढतच चालले होते. देशी विदेशी उत्तम परफ्युम्स, घराभोवती नीट नेटकी ठेवलेली बाग ज्यात नानाविध फुले नित्य फुललेली. वासानेच भूक चाळवतील असे  विविध देशातील पदार्थांची रेलचेल कधी घरी, हवे तेंव्हा बाहेर. सारं कसं दृष्ट लागण्याजोगे. हिच्या आगमनानंतर घरच सुगंधाने दरवळू लागलं. दिवाणखान्यात, बेडरूम्स मध्ये फुले दिसू लागली. हिच्या खोलीत नित्य नियमाने निशिगंधाचा दरवळ असू लागला. सोनचाफा घरात वावरू लागला. आदित्यला खूप वेळ नसला ह्या साऱ्यात, तरी त्याची काही हरकतही नव्हती.

दोन वर्ष कशी सरली कळलंच नाही या साऱ्यात. लग्नाचा दुसरा वाढदिवस दोघांनी घरी सर्वांबरोबर साजरा करून दुसऱ्याच दिवशी आठवड्यासाठी केरळला प्रयाण केले. अधूनमधून आजकाल प्राजक्ताच्या मनात मुलाचे विचार येऊ लागले होते. पण आदित्यपाशी हे कधी आणि कसे बोलावे हे मात्र कळत नव्हते. केरळला जाऊन आल्यावर त्याच्याशी बोलायला हवे असे ती मनात घोकत राहिली. आई, सासूबाई यांनी अडून सुचवून झाले होते. तिलाही तसे वाटत होतेच. हवे तर अजून एखाद वर्षाने पण हवे नक्की होते. आपण लग्न करताना आदित्यशी या बद्दल कधी काही बोललोच नव्हतो, त्यानेही कधी हा विषय काढला नव्हता हे आजकाल तिच्या लक्षात येऊ लागलं होतं.
एकदिवस त्याला असलेला संध्याकाळचा निवांत वेळ पाहून तिने विषय काढला.

"आदित्य, आजकाल मला घरात एकटं वाटतं…… "
"कशात जीव रमव, काही नवे शिकायचे तर शिक, होम सायन्स मध्ये मास्टर्स केलेली तू, गरजेखातर नाही, हौसेखातर नोकरी केलीस तर माझी काही हरकत नाही"
"पण मी पण घराबाहेर जाऊ लागले तर घर कोण सांभाळेल?"
"तू नव्हतीस, तेंव्हा कोण सांभाळत होते, तसेच चालेल आताही ते, तू काळजी नको करूस"
"तसं नाही आदित्य, मी आज नोकरी करू लागणार आणि काही महिन्यांनी किंवा वर्षाने ती सोडणार मग कशाला?"
"का? का सोडणार तू नोकरी? कर की मजेत"
"परवा आई कडे गेले होते, ती म्हणाली वेळेत सारे होणे ठीक असते, दोन वर्ष झालीत आता तुमच्या लग्नाला, आता किमान विचार सुरु करा"
"स्पष्ट बोल…… कसला विचार, काय वेळेत व्हायला हवे आहे, घर दार, गाडी, भरपूर बँक शिल्लक सारे काही आहे आपल्याकडे. हे सारे मिळवण्यात लोकांची आयुष्य खर्ची पडतात"
"ते नव्हे रे…. आदित्य तुला नाही का वाटत, आपण आपल्या एका बाळाचा विचार करायला हवा. म्हणजे लगेच असे नव्हे पण काहीतरी यावर आपण बोलायला हवे, ठरवायला हवे"
" बोलू यावर आपण नंतर कधीतरी, जेवण तयार आहे का? भूक लागलीये"

यानंतरही तिने त्याला याबद्दल बोलते करायचे अयशस्वी प्रयत्न केले. वेळेस त्याने विषय टाळला, बदलला. प्राजक्ता ला नक्की काय चुकतंय तेच समजेना. कोणाशी बोलावे तरी कसे. गेली दोन अडीच वर्षे जीवाभावाचा ज्याला समजत होतो, आयुष्यभर एकत्र रहायची स्वप्न बघत होतो तो हाच आदित्य होता का? आयुष्यातील इतक्या महत्त्वाच्या निर्णयावर बोलायचं तो टाळू कसा शकतो? हा त्याचा किंवा माझा एकटीच निर्णय कसा असू शकेल? जे काही ते बोलून ठरवायला हवे ना? 

"आदित्य, आपण एकदा नीट बोलायला हवे ना?"
"कशावर ? तोच तुझा नेहमीचा हट्ट आहे का?
"हो, पण …. "
"मला हे मुल वगैरे नको आहे, एक जबाबदारी आयुष्यभरासाठी नको आहे. जे जसं आपलं आयुष्य आहे ते तसंच असायला हवे आहे मला, कोणासाठी तरी अडकून पडणे मला जमणार नाही. तू जशी आहेस तशीच हवी आहेस मला, एक मुल झाल्यानंतर तूच नाहीस तर सारे आयुष्यच बदलून जाईल आपलं, जे घडायला नको आहे मला. मिळालं उत्तर? चर्चा नाही करायचीये मला"
"अरे पण … असं नसतं रे, आपल्या आई वडिलांनी नाही का घेतली होती आपली जबाबदारी, ते तुझ्यासारखं म्हंटले असते तर? जगभर आई वडील हे सारे करतात ना आपल्या मुलांसाठी?"
" तर मग आपण ही चर्चा करत नसतो प्राजक्ता"
"तू नीट बोलायचं म्हणालीस म्हणून मी काय ते तुला सांगितलं, यावर अजून काही मला पटविण्याचा प्रयत्न्न करू नकोस"

असं म्हणून तो तिथून निघून गेला. नित्याचे आयुष्य वरकरणी तरी तसेच चालू दिसत होते, आत मात्र प्राजक्ता खोलवर दुखावली गेली होती. त्यानंतर दोघांच्यातील उत्कट क्षणांनंतर एक दोन वेळा तिने "आदि …. मला आपलं एक बाळ हवंय रे …. अगदी तुझ्यासारखं " असे म्हंटल्यावर त्याने तिला दूर सारले आणि तिच्याकडे पाठ करून झोपून गेला. 

एके दिवशी ती आणि सासूबाई दोघीच  घरात असताना तिने विषय काढला.
" आई, आदि पहिल्यापासून असाच आहे का? "
"असाच म्हणजे कसा प्राजक्ता? काय केले त्याने? भांडण वगैरे झाले आहे का तुमचे? गेले काही दिवस नेहमीसारखी प्रसन्न दिसत नाहीस, लक्षात येत होतं, पण तू काही सांगितल्याशिवाय मी आपणहून बोलणार नव्हते"
" नाही आई, भांडण नाही, वेगळाच मुद्दा आहे. तुमच्या कधी  पूर्वी लक्षात आले होते त्याला लहान मुले विशेष आवडत नाहीत ते? किंवा मुले हे त्याला लोढणे, जबाबदारी वाटते ते?"
"नाही … मुळात तो एकुलता एक, आणि दोन्हीकडच्या नात्यांत तोच शेंडेफळ. बाकी ती जबाबदारी म्हणशील तर तो विषय कधी निघालाच नाही, पण का गं, असं का विचारते आहेस? आता तुमचं आलं की घराचं गोकुळ होऊन जाईल, तुमचा विचार आहे ना?
प्राजक्ता हमसून रडू लागली. सुलक्षणा बाईंना काय झाले तेच कळेना.
" अगं, प्राजक्ता, आत्ता नको तर हरकत नाही तुमच्या मर्जीने काय ते होऊ दे" 
"आई, अनेकदा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न्न केलाय मी, त्याने परवा साफ सांगितले आहे, की त्याला मुल नको आहे, त्याला मुलाची जबाबदारी नको आहे, आहे त्या आयुष्यात, माझ्यात, त्याच्यात कोणते बदल नको आहेत"
"अगं, आत्ता नको असं म्हणाला असेल, तुझा काही गैरसमज झालाय का? नीट बोला एकदा दोघं"
"मी गेले चार महिने आदित्यला बोलतं करायचा प्रयत्न्न करते आहे, आम्ही केरळहून परत आल्यापासून, पण तो विषय टाळत होता, परवा त्याने हे सांगितले, मला कळत नाहीये  हे सारे असे का? लग्नापूर्वीच या विषयावर आम्ही बोलायला हवे होते का, जे नाही झाले पण…… "
"प्राजक्ता, तुला पश्चाताप होतोय का, आदित्यशी लग्न केल्याचा, आतापर्यंत तर दृष्ट लागण्याजोगा संसार होता तुमचा"
"तसं नाही पण हा मुल नको असा निर्णय त्याचा एकट्याचा होतोय, इतका महत्त्वाचा निर्णय त्याच्या एकट्याचा नाही असू शकत, पण मी ही माझे म्हणणे लादू नाही शकणार त्याच्यावर, इतका ठाम असेल तो तर काय करू शकते मी, काहीच नाही"
"पण मनापासून मला वाटते के आमचे एक असे मुल मला हवे आहे. आदित्यवर नाही फार जबाबदारी येऊ देणार मी, देव दयेने आपल्याला काही कमी नाही, मला नोकरी करण्याची गरज नाही, सगळी जबाबदारी मी पेलेन त्या मुलाची, त्याच्यावर कोणताही अजून भार पडणार नाही, हवं तर मी माझे चार खर्च कमी करेन, त्याला बाळाचे काही करायला सांगणार नाही"
"मला वाद, भांडण नको आहे, कारण त्यानंतर मनावरचे ओरखडे काही जात नाहीत, नात्यात दरी येतेच, विशेषत: अशा मुद्द्यांवर भांडून, पण मी काय करू कोणी मला सांगेल का? हे सारं आज तुमच्याशी बोलते आहे कारण तुम्ही दोघं त्याच्याशी काही बोलू शकाल तर, अजून हे सारे मी माझ्या आई-बाबांपर्यंत नेले नव्हते हा विचार करून की तुम्ही बोलून काही सुरळीत होणार असेल तर घरच्या गोष्टी बाहेर नकोत जायला."
"मी घालते यांच्या कानावर, बघतो, एकदा बोलून प्रयत्न्न करतो, वाटत नाही काही विशेष करू शकू असे, आदित्यने एखादी गोष्ट एकदा ठरवली की मग त्यापासून तो मागे फिरत नाही, अगदी लहानपणापासून. आत्तापर्यंत आम्हाला त्याचे याबद्दल कौतुक होते…… कदाचित आज त्यापायी निराश होण्याची वेळ येणार, तू खचून जाऊ नकोस, थोडा धीर धर"
"हम्म्म … ठीक आहे"

काही दिवसांनी सुलक्षणा बाई आणि विश्वासराव आदित्यशी बोलले, अर्थात ज्यातून काहीच साधले नाही. आदित्य त्याच्या मुल नको या निर्णयावर ठाम होता. हा आपलाच मुलगा आहे का जो इतर वेळी सरळ, सालस होता, पण याच एका महत्त्वाच्या विषयावर तो इतका आडमुठा कसा? आणि हे त्याचे विचार पूर्वी कधीच कसे लक्षात आले नाहीत या विचारांनी दोघं हैराण झाले.

ते दोघं त्याच्याशी बोलले ते प्राजक्ता समोरच, त्यामुळे वेगळे तिला काही सांगावे लागले नाहीच. पण ती अजून कोलमडली, हतबल झाली. काही दिवस मध्ये असेच जात राहिले. घरातला आनंद नाहीसा झाला, चार मुकी माणसे राहत आहेत असे घर होऊन  गेले. प्राजक्ता आदित्यमध्ये कोणताच संवाद उरला नाही.

आज त्यातच आलेली श्वेता आणि तिच्या मुलीमुळे घर थोडसं  हसलं. पण काही काळापुरतेच. नंतर एक प्रचंड उदासी घरात भरून राहिली. ज्यात जगणे दिवसेंदिवस प्राजक्तासाठी मुश्कील होत होते.आता पर्यंत हे सारे तिच्या आई-बाबांना हे कळले होते.  त्यांचाही  सूर "थोडे दिवस जाऊ देत, होईल सारे ठीक" असा होता, परंतु प्राजक्ता जे काही ठरवेल त्यात ते तिच्या पाठीशी असतील हे नक्की, हे तिला माहित होते.

असेच दोन महिने अजून गेले. गोष्टी तशाच होत्या, ज्यात बदलाची काही चिन्हे दिसत नव्हती. प्राजक्ताचे डोके विचार करून फुटायची वेळ आली होती. शेवटी एक दिवस तिने सकाळी चहा घेत असताना आदित्यला आणि त्याच्या बाबांना ते कधी येणार आहेत हे विचारून घेतले. रात्रीच्या जेवणानंतर मला तुम्हा तिघांशी बोलायचे आहे हे सांगितले. 

गेले काही दिवस विचारात एक सुसूत्रता आणायचा ती प्रयत्न्न करत होती. सोपे नव्हते या निर्णयापर्यंत येणे.  दहा वाजता चौघे तिच्या सासू सासऱ्यांच्या खोलीत जमले. तिने सुरुवात केली.
"आई - बाबा आणि आदित्य, गेले काही दिवस आपल्या घरात आपल्यात संवाद नाही, हसते खेळते घर कसं उदास होऊन गेलंय, मी गेले दोन महिने साऱ्याचा खूप विचार करतीये, की मी आता काय करायला हवे? आदित्यचा जो निर्णय आहे त्यावर माझी प्रतिक्रिया काय आणि कशी असायला हवीये? मी त्याने निर्णय बदलण्याची वाट पहायला हवी कि हा त्याचा अंतिम निर्णय आहे हे मान्य करून तो स्विकारायला हवा?"
"काही ठरवणे सोपे नक्कीच नव्हते माझ्यासाठी! पण अशी इतका मोठा निर्णय तो एकटा घेत असताना त्याच्या हो ला हो म्हणणे मला शक्य नाही."
" आदित्य, तुझा हा अंतिम निर्णय आहे हे समजून मी पुढचं बोलतीये."
आदित्यचा चेहरा निर्विकार, आईबाबांचा व्याकूळ.

"आयुष्यातील सर्वात  फुलपंखी दिवस मी आदित्य सोबत घालवले आहेत, या घरात घालवले आहेत, फुलपंखी असल्यामुळेच कदाचित त्यांचे आयुष्यही फार थोडे असावे. अगदी चारचौघींची असावीत अशी माझी स्वप्ने होती, प्रेमळ माणसे, कर्तुत्ववान नवरा, एखादे मुल आणि सुखी आयुष्य. अनेक गोष्टींमध्ये मला अपेक्षेपेक्षा खूप अधिक काही मिळाले."

"आता लग्नाला जवळपास तीन वर्षे होत येत आहेत तेंव्हा आदित्यच्या "मूल नको" या एका निर्णयामुळे मात्र आज सारी स्वप्ने उध्वस्त होणार आहेत, मला ती सारी अर्ध्यावरच सोडून जावे लागणार आहे. आता हे सारे सोडून मी वेगळ्या वाटेवर चालू इच्छिते. अनेकदा मनात आले होते, की आदित्यावरील प्रेमापोटी त्याचा हा निर्णय मी मान्य करून पूर्वीसारखे आयुष्य जगले तर त्याच्या आणि तुम्हा दोघांच्या दृष्टीने ते ठीक राहील. पण मला हे शक्य होणार नाहीये, मला माफ करा."

" मी या घरात आणि आदित्य सोबत न राहण्याचे ठरवले आहे. आयुष्यातील सर्वात मोठ्या निर्णयावर मन मारून मी इथे नाही राहू शकणार. माझा आत्मसन्मान गमावला असे वाटत राहील मला सतत. कारण मला मुल हवे होते. ते इथे न राहून मला मिळणार आहे का? असाही प्रश्न येईल तर नाही मिळणार पण दुसरा मार्ग तर निघू शकेल."
"आई -बाबा, आदित्य मी हे घर सोडून जायचे ठरवले आहे. आदित्य आणि माझे नाते सोडून बाकी सर्व नात्यात माझ्याकडून काही बदल होणार नाहीत. मला घटस्फोटही नको आहे, कारण दुसरे लग्न वगैरे गोष्टी माझ्या डोक्यात नाहीत. आपला आनंद दुसऱ्याच्या इच्छेने मिळावा हेच मला आता नकोय. पण उद्या आदित्यला तो हवा असल्यास तो या बंधनातून कधीही  मोकळा होऊ  शकतो. मी त्यात मध्ये येणार नाही. मला त्याच्याकडून किंवा या घरातून काही म्हणजे काही नकोय. मी माझ्या आई बाबांकडेही न जाण्याचे ठरवले आहे. वाईट त्यानाही वाटेल आपल्या मुलीचे असे आयुष्य पाहून तेंव्हा किमान त्यांच्या समोर राहून मी त्यात भर घालू नये असे मला वाटते."

"आदित्य, इतर कोणतेही कारण असते, वैद्यकीयदृष्ट्या शक्य नसते तर मी ते स्विकारले असते. किमान योग्य चर्चेने आपण कोणतातरी निर्णय घेतला असता तर कदाचित मी याप्रत आले नसते. मी आता तुला दोष देण्यात काहीच अर्थ नाही कारण मनाने मी आपल्या नात्यातून तेंव्हाच मोकळी झाले ज्याक्षणी तू तुझा निर्णय ऐकवलास आणि यावर अजून चर्चा नाही असे सांगितलेस. माझी मते तुझ्यावर लादायची नाहीत, तू ते केलेस म्हणून मी ही तेच करण्याने आपण सुखी नव्हतो होणार. म्हणजे आज माझ्या या निर्णयाने आपण सुखी होणार ह्याची ही काही खात्री नाहीये. परंतु मनाविरुद्ध तुझा इतका मोठा निर्णय स्वीकारणे मला शक्य नाहीये आणि मग मी इथे असे राहण्यात ही कोणाचेच भले नाहीये. बाकी इतर कोणतेही छोटे मोठे मतभेद मी स्वीकारले असते पण हा नक्कीच नाही"

" मी या घराबाहेर पडून नोकरी करून एकटीने जगायचे ठरवले आहे. जिथे जगणे माझ्या मनासारखे असेल, माझा आत्मसन्मान जपला जाईल. नशिबाने स्वत:च्या पायावर पुन्हा उभी राहू शकण्याइतकी मी सक्षम आहे, थोडा त्रास नक्कीच होईल, सोपे नसेल कोणाच्याही आधाराशिवाय आयुष्य पुन्हा घडवणे याची कल्पना आहे मला. जर अगदी तशीच वेळ आली तर तुम्ही दोन्ही आई-बाबा आधाराचा हात पुढे कराल याची खात्री आहे. तेच माझे बळ असेल. पण मला प्रयत्त्न करू दे."

"आदित्य, इतका सालस, समजूतदार, एक कोणत्याही स्त्रीस हेवा वाटेल असा नवरा, तू या एकाच गोष्टीवर का असा अडून रहावास हे कोडे माझ्याच्याने सुटत नाही आहे, विचार करून मी थकले की तुझे कोणते रूप खरे, आधीचे प्रेमळ नवऱ्याचे की या तुझ्या या निर्णयानंतर बदलून गेलेल्या नवऱ्याचे, इतका कोरडा झालास तू मला तुझा हा निर्णय ऐकवल्यानंतर. आपला संवाद पूर्ण विझला. आपण एक सुखी संसार गेली अडीच वर्ष केला होता यावर विश्वास बसणार नाही इतका तू बदललास, ज्याने माझे बदलून जाणे हे ओघानेच. आजही  यावर अजून चर्चा करत, बदलण्याची संधी देणे यावर माझा विश्वास नाही. जे झाले ते झाले, तू तुझ्यासारखा वागणार असलास तर ती संधी मलाही मिळायला हवी, मलाही माझ्या मनासारखे जगता यायला हवे. इथून बाहेर पडून कदाचित लग्न न करता स्वत:चे एक मुल माझे  असणार नाही, कारण मला ते पटणार नाही. पण एखादे मुल मी दत्तक नक्कीच  घेऊ  शकेन. आई म्हणून एका जीवाचे आयुष्य घडवण्याची, त्यास आकार देण्याची क्षमता माझ्यात नक्कीच आहे. त्यातून मिळणारा आनंद नक्कीच हवा आहे मला, त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी आहे माझी. दोघांनी मिळून ते करणे जास्त आवडले असते मला पण तुला ते नको आहे म्हणून मी त्यावर पाणी सोडावे असे  नाही. पण हे सारे मी बोलतीये म्हणजे तू विचार बदलावास म्हणून नव्हे. हे फक्त मनातले एकदा बोलून मोकळे होणे आहे."

"आदित्य, तुझ्या माझ्या नात्यास मात्र इथेच पूर्णविराम देऊया, स्वल्पविराम देत नंतर पुढे चालू अशी संधी निर्माण व्हायला मला नको आहे. ते मला पटणार नाही, जे चांगले जगलो ते जपेन मी, जे झाले ते विसरणे मला शक्य नाही, कटुता नाही, दोष देत नाही तुला, जे नशिबात होते ते घडले हे खरेच. कागदोपत्री नाते आहे त्याचे काय करायचे हा निर्णयही सर्वस्वी तुझा. तसेही वेगळे होणे हवे असेल तर ते घडण्यास ही माझी ना नाही. फक्त शक्य असेल तर कोणते दोषारोप न करता सामोपचाराने घडले तर मला बरे वाटेल. तुलाही त्याची गरज वाटत नसेल तरी पुढे एक खात्री बाळग, घटस्फोट घेतला नाही म्हणून मी किंवा माझे दत्तक मुल हे नाव, हे घर दार किंवा तुझ्या कोणत्याही संपत्तीवर कोणताही अधिकार सांगणार नाही."

"मला ठाऊक आहे या माझ्या निर्णयाचा आदित्यसह तुम्हा सर्वाना थोडा त्रास होईल. पण कदाचित हे होतंय हे सारे योग्य वेळेत होतंय. प्रत्येकास आपल्या मनासारखे जगण्याची संधी मिळायला हवी. अजून काही काळाने ते न जाणो शक्य झाले असते नसते. आत्ताच जीव इतका लागला होता कि काही ठरवणे अवघड होते. आमच्या दोघांमुळे तुम्हां दोघांना या वयात ही शिक्षा नको मिळायला हे हि मान्य आहे मला, पण परिस्थितीपुढे हतबल आहोत आपण सारे. तेंव्हा  नंतर कुतरओढ होण्यापेक्षा हे बरे असा म्हणून सर्वचजण पुढे जाऊया"

"आई मी माझ्या खोलीतल्या कपाटात साऱ्या महागड्या साड्या, तुम्हां सर्वांकडून मिळालेल्या उंची भेटवस्तू, ठेवल्या आहेत. या साऱ्याची आता मला गरज नाही. जे सर्वात मौल्यवान होतं ते नाते मागे सोडून जाताना या गोष्टीत जीव का अडकावा? जे माझे दागिने तुम्ही दिलेले होते ते तुम्हाला परत करत आहे, जे आई बाबांनी घातले होते लग्नात, ते त्यांना तसेच परत करणार आहे. स्त्रीधन म्हणून हे तुम्ही ठेऊन घे असे म्हणाल पण तसे नको. प्रयत्न्न करेन मी सारी कटुता विसरत सुरुवातीच्या दोन वर्षातील आनंदक्षण फक्त सोबत घेऊन जाण्याचा. माझ्या नोकरीचे काम झाले आहे. आता राहायची सोय पुढच्या काही दिवसात बघेन. उद्या सकाळी मी इथून जाईन. घराची सोय होईपर्यंत एखादा आठवडा आई - बाबांकडे राहीन. एकदा माझ्या घरी गेले कि पत्ता कळवेन, तुम्ही कधीही हक्काने येऊ शकाल आणि याल अशी खात्री बाळगते. नमस्कार करते"

Tuesday, March 10, 2015

संधिप्रकाशात अजून जो सोने....... तो माझी लोचने मिटो यावी....

एक  आजोबा… वय सत्तरीच्या आसपास, काही वर्ष गादीला खिळून, नंतर नंतर  तर कोणालाच न ओळखू शकणारे. आजी आजोबा दोघंही व्यवसायाने वैद्यकीय  क्षेत्राशी संबंधित. अनेक वर्ष मदतीला एखादी नर्स ठेवून आजी  देखभाल करत. म्हणजे घरात मुलगा, सून, नाती असा परिवार होता . ते लोकही आपल्या परीने काळजी घेत होतेच. सर्वांना वाटत असणारी शक्यता अशी की ते आजोबा आधी जातील, कारण आजी  तशा ठणठणीत होत्या. मग आजींच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण होऊ  शकेल कारण इतकं त्यांनी आजोबांच्या देखरेखीत गुंतवून घेतलं होतं  स्वतःला.

पण झाले उलटेच …… एक दिवस आजी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक गेल्या. आजोबा काही कळण्याच्या मनस्थितीत नव्हतेच, त्यांना काही सांगण्याचाही प्रश्न नव्हताच. पण सेवा करणारी प्रेमाची व्यक्ती आसपास नाहीये हे त्या जीवास कळत असावे का? स्पर्शाच्या, अस्तित्त्वाच्या जाणिवा टिकून होत्या का? मनाचे मनाशी असे घट्ट नाते तसेच टिकून असेल? कारण आजी गेल्यावर पाचव्या दिवशी आजोबाही गेले. मेंदूचा कल याला योगायोग मानण्याकडे झुकू शकतो. म्हणजे ते नक्कीच चुकीचे नाही कारण  तसं असू शकते. पण मग वर व्यक्त केलेली शक्यताही असू शकतेच की!

अजून एक आजी आजोबा  एकमेकांशी कधीही न पटणारे. आजी कर्तृत्त्ववान. आजोबा त्यामानाने कमी. आजी मोठ्या करारी, थोड्या हेकट सुद्धा म्हणाव्या अशा. आजोबा तितके नाहीत. एका शाळेची उभारणी करून, ती नावारूपास आणून, आपण थकल्या नंतर एका तितक्याच मोठ्या आणि तत्त्वनिष्ठ  शैक्षणिक संस्थेला ती सुपूर्त करण्याचे मोठे काम या दोघांनी मिळून केलेले.  दोघांनीही वयाची ऐंशी पार केलेली. पण आजी फारच थकल्या, दोघांनाही काही आजार नाही. म्हातारपण हेच आजारपण. पण आजी पार आडव्याच झालेल्या, त्यामानाने आजोबा हिंडून फिरून, घरात २/३ नोकर, स्वत: वयाची साठी पार केलेली त्यांची लेक तिच्या लेक सुनेसह घरात दिमतीला. आजींनी अशा अवस्थेतही सगळ्यांची आपल्या हट्टी हेकेखोर स्वभावाने त्रेधा तिरपीट केलेली. आपल्या तापट स्वभावाने सर्वाना नको नको करून सोडलेले.

सगळ्यांना वाटत असे आजी गेल्या कि आजोबा ज्यांची तब्येत तितकीशी वाईट नाही, विशेष कोणता आजार नाही ते थोडा मोकळा श्वास घेऊ शकतील. मोकळं आयुष्य काही काळ जगतील. अपेक्षेनुसार आजी गेल्या. पण आजोबांनी तेंव्हा ही त्यांची साथ सोडायची नाही असे ठरवले असावे कारण मोजून तिसऱ्या दिवशी आजोबांनी झोपेतच राम म्हंटले.

या दुसऱ्या घटनेने मात्र विचारांची आवर्तने निर्माण केली. एकापरीने त्या आजींच्या सोबत राहणे हा कोणालाही जाच वाटला असता, मग त्यातून सुटका मिळण्याचा आनंद ही खऱ्या अर्थाने मिळू नये? पण तसेही नसेल कदाचित. त्या साऱ्याची इतकी सवय असेल की त्याशिवाय आयुष्यात एक भली मोठी पोकळीच निर्माण झाली असेल की तिचा सामना करणे अशक्य झाले असेल. किंवा कोणता असा एकमेकांना बांधून ठेवणारा घट्ट धागा असतो जो वर वर पाहता कोणालाच दिसत नाही कोणालाही तो जाणवत नाही कदाचित त्या दोघांना ही तो जाणवलेला नसावा. वरकरणी मतभेद इतके तीव्र असले तरी, आत एकमेकांना घट्ट बांधून ठेवणारा ………

हिंदी चित्रपटात घासून गुळगुळीत झालेले "मै तुम्हारे बिना जिंदा नही रह सकता/ती" असे संवाद यांच्यात कधी घडले नसतील. असा विचारसुद्धा कधी दोघांपैकी कोणाच्या मनात आला नसेल,  एकंदरीत त्यांची असलेली घडण आणि विचारांची बैठक लक्षात घेता, हा अर्थात अंदाजच………… कदाचित याच्या अगदी विरुद्ध असू शकेल की मनात कुठेतरी हि स्पंदने असतील, ते विचारतरंग कधी बाहेर उमटले नसतीलही. पण मनाला मन उमजले असावे. तशीही मनाची ताकद खूप मोठी असते.

अशा साऱ्या विचारांतूनच बर्फी चित्रपटाचा शेवट योग्य वाटतो. त्याचा मृत्यू झालाय, याची कदाचित जाणीव सुद्धा नसलेली ती त्याच्या जवळ जाते, थोडा त्यास सरकवून स्वत:साठी जागा करत त्या पलंगावर  आडवी होते, नेहमीप्रमाणे त्याच्या करंगळीत आपली करंगळी अडकवते आणि कायमसाठी त्याच्यासारखीच निद्राधीन होते.  मृत्यूचे हे अनपेक्षित रूप मात्र विचारात पडणारे. अशा जोडीदारापाठी जगूच न शकणाऱ्या व्यक्तींच्या रूपात घडणारे.  म्हणजे माहित असतं कि  हे असे घडणे आपल्या हाती नाही, जोडीदाराच्या नंतर मागे उरण्याची कल्पना कितीही त्रासदायक वाटली, नकोशी वाटली, कितीही इच्छा व्यक्त केली की तुझ्याशिवाय हे जगणे नको तरीही…अशी अनेक शक्य-अशक्यते वर आधारित असल्यामुळेच असे मृत्यूचे येणे ही कल्पना तशी मोहात पडणारी!

पण दुसऱ्या बाजूस असंख्य जोडप्यांमधील कोणी तरी एक मागे राहतो, गेलेल्याच्या आठवणीत जगतो, आपली कर्तव्ये पुरी करतो, जगणे सुसह्य व्हावे यासाठी शक्य ते सारे प्रयत्त्न करतो. पण जाणाऱ्या व्यक्तीसोबत आपला काही हिस्सा गेलेला असतो. दोघांमधील तो बंध गेलेला असतो. असंख्य गोष्टी दोघांनी एकत्र बोललेल्या, पाहिलेल्या, जाणीवेत उमटलेल्या ज्या फक्त त्या दोघांमधील असतात त्या आता एकाच्या मनाच्या कप्य्याचा हिस्सा बनून जातात आणि त्याच्यासवे त्याही जातात. पण म्हणजेच यातली कोणतीच गोष्ट आपल्या हाती नाही. काही म्हणता काही आपला त्यावर कंट्रोल नाही.असं आपल्यातून काहीतरी जाणे, नाहीसे होणे हा देखील मृत्यूच ना? 

मन:पटलावर कधी कधी असंख्य तरंग उमटतात, आतून इतकं काही बाहेर येऊ पाहते की त्या  सारयास सावरताना, समेटताना माझी दमछाक होते. तरीही अनेकदा काही हाती  लागतंच नाही. विचारांचा वेग इतका जबरदस्त असतो आणि एकातून दुसऱ्यात जाण्याची गती………… की काही करू शकत नाही मी. हातातून वाळू सुटत राहावी तसे….  कशालाच धरून ठेवता येत नाही. एक येतो जातो, पाठोपाठ दुसरा…. तिसरा …… हे चालूच एकाच्या अस्तित्त्वाचा अंत…. दुसऱ्याच्या …. तिसऱ्याच्या … हे नाट्य लागोपाठ माझ्याच मन:पटलावर घडणारे… असे जोडी जोडीचे मृत्यू अनुभवणारी…. हतबल, निराश…. माझाच काही हिस्सा हरवताना पाहणारी अन तरीही काही
करू न  शकणारी मी .
अनेकदा एखादा विचार, एखादा धागा जोडीदार गेलेल्याच्या मागे उरावा तसा एकटाच मनात उरणारा, अधून मधून त्याच्या अस्तित्वाची जाणिव करून देणारा, जणू त्याचे ते कर्तव्य असावे असा. त्याला मनातच राहू देणारी , पण त्यास घडविण्यास, फुलविण्यास काहीच न करणारी मी. नकळत माझ्या मनात एकटेपणाचे, खुरटलेले जगणे नशिबी घेऊन मग मृत्यू पावणारा तो.

असे दिवसागणिक मनात विचारांच्या मृत्यूचे थैमान कधी कधी चालू असताही, खऱ्या मृत्युच्या विचारांना सतत दूर लोटणारी किंवा फक्त स्वत:चाच एकतर्फी विचार करत जोडीदाराच्या मनाचे काय होत असेल हा विचार न करता,
नको तुळशीचे पान, नको गंगाजल
हात तुझा हाती असता व्हावा संधिकाल
असे म्हणणारी मी.

अनेक रूपात भेटणारा तो ,
आणि तरीही त्याच्या बद्दलचे
कुतूहल कधीही न शमणारे .
कधी चोर पावलाने येऊन
मागून कवेत घेणारा
कधी येतोय येतोय म्हणत
चकवा देत राहणारा
कधी परतीचे तिकीट
न मागताच हाती ठेवणारा
दोन बाजूस दोन रस्ते
खुणावत असतानाच
डेढ एंडचा फलक हाती
घेऊन सामोरा येणारा
चिंतेतून दर्शन घडवणारा
कधी चितेवरही विश्वास
न बसू देणारा
कधी शांत सात्त्विकतेने
कधी थैमान घालत
मनातल्या विचारांचा
फुटणाऱ्या लाटेचा
अंधार दाटून येताना
हातातून निसटून
जाणाऱ्या वाळूचा
संपणाऱ्या नात्यांचा, बंधांचा
मृत्यू ……………

Sunday, December 14, 2014

फिर आपके नसीबमें ये बात हो ना हो …

रात्रीची वेळ. घरपरतीची वेळ अनेकांची कधीच होऊन गेलेली. आपापल्या घरट्यांत पक्षीच नव्हे, तर माणसेही जाऊन विसावलेली. आपल्या माणसांत रमलेली, हास्यविनोदात, जेवण, मनोरंजन यात रंगून गेलेली. अशावेळी आँफीसमधून बाहेर पडणारी मी. अनेकदा गाडीत एकटी. मुळात ही वेळच हळवी, कातर! मुसमुसायला, डोळ्यांच्या कडांना ओलसर व्हायला काहीही कारण यावेळी पुरतं. म्हणजे असंच घडतं असंही नाही आनंदाचे क्षणही असतात, आनंद मनात मावेना अशी अवस्थाही अशीच, किती सांगू मी सांगू माझे मलाच अशी. कधी काय घडेल काही सांगता येऊ नये अशी. दिवसभरातली एखादी कडवट घटना आठवावी, कोणाच्या आठवणीने उदास वाटावे, कधी कोणा दुसरयाच्या दु:खाने,   दुःखद प्रसंगाने आपल्यालाच घेरून टाकावे, कधी विनाकारण उदासीने मनावर राज्य करावे तर कधी अगदी काही नाही तर एखाद्या गाण्यानेच अस्वस्थ करावे.  

एखादे गाणे पुर्वी असंख्य वेळा ऐकले असावे, तेंव्हा न रूतलेला काटा नेमका आत्ता, अशावेळीच रूतावा आणि मन घायाळ होऊन जावे. यापूर्वी न जाणवलेले कंगोरे आता जाणवू लागावेत, न उमजलेले अर्थ समोर यावेत, असंख्य वेळा ऐकलेल्या त्याच त्या शब्दातून नवाच विचार गवसावा. किती वेळा ऐकलं असेल हे गाणं, अगदी नकळत्या वयापासून, शब्दांचे अर्थ कळू लागल्यापासून एकच अर्थ जो सर्व सामान्यपणे घेतला जाऊ शकतो … तोच मी ही घेतला होता आजवर याचा. बरं, हे घडतं तेंव्हा सांगणारी मीच, ऐकणारीही  मीच, आपुला संवाद हा आपणाशी. तशी ही अवस्था ही नेहमीच! कालही असंच थोडं झालं. आधी या गाण्याने दिवसभर घेरून टाकलं, उदास केलं. आपण आपल्या जीवलगांसह नसू या विचाराने डोळे भरून वाहू दिले. काही वेळा असे आपले मनाने घट्ट असणेही कमी येत नाही. थोडे स्वत:ला शांत होऊ दिल्यावर हा मनात डोकावलेला विचार…. "का, मीच कोणाला हे सांगावं"

फिर आपके नसीबमें ये बात हो ना हो …
शायद फिर इस जनममें मुलाकात हो न हो ……. 

का नाही मी हे स्वत:लाच सांगावे आणि का नाही ते मनात ठेऊन त्याप्रमाणे वागावे? कधी काही प्रसंगातून जात असताना आपण आपल्यालाच हा प्रश्न विचारतो का?  "के फिर अपने नसीबमें ये बात हो न हो …. ", तो विचार मनात ठेवुन त्या व्यक्तीचा, त्या क्षणांचा आदर करतो? काळाचे आभार मानतो? आनंददायी, आयुष्यातील महत्त्वाचे धडे देणारे, जगणे समृद्ध करणारे असे असंख्य क्षण....... का नाही त्यांच्या ऋणात राहू?

शेवटच्या काही दिवसात मी मोठी व्हायची स्वप्ने बघणारे माझे बाबा ती जेंव्हा बोलून दाखवत होते त्या क्षणी हे सत्य उमजायला हवे होते की हे सारे पुन्हा नशिबात असेल नसेल. स्वप्न बघणारे बाबा असण्याचे सुख देणाऱ्या काळाचे मी आभार मानू  शकते पण हे त्यांच्या पर्यंत ना तेंव्हा पोचवले आणि ना आता पोचवू शकते. 
यथा काष्ठम च काष्ठम …. या उक्ती नुसार अनेक व्यक्ती कारणांनी भेटतात, त्या छोट्याशा काळात तुम्हाला समृद्ध करतात आणि ते कारण संपल्यावर स्वाभाविकपणे दुरावतात देखील. तेंव्हा कधी हे मनात येतं? "बाळे, अजूनही ओठ पिळले तर दूध निघेल इतकी लहान आहेस, म्हणून तुझी काळजी वाटते" असं मला सांगत ज्यांनी माया लावली ते  मुकुंद कासट, शब्दातून व्यक्त न होत माया लावणारे मुकुंद रानडेआबा आणि सुधा आत्या, आरती काकू अशा अनेकांसोबत असताना मनात हे यायला हवे होते. जेंव्हा एकदा साक्षात समोर, मोजून काही पावलांवर जोत्स्नाबाईंच्या तोंडून "क्षण आला भाग्याचा" ऐकले होते तेंव्हा  हे मनात यायला हवे होते. तेंव्हा त्या त्या व्यक्तींपर्यंत त्यांनी काय दिले मला हे मी पोचवायला हवं होतं. असे एक न दोन अनेक क्षण, अनेक व्यक्ती, अनेक घटना. 

अनेकदा अनेक भावना, परिस्थिती कायम राहील ही आपली समजूत इतकी ठाम असते की त्यापलीकडे आपण काही पाहायला तयारच नसतो. मग आपण आपल्या माणसांना, इतर साथ सोबत असणाऱ्यांना, परिस्थितीला, काळाला इतकं गृहीत धरतो की मग आपल्याला हे विचार शिवतच नाहीत. असे अनेक मैत्रीचे धागे, असे अनेक मायेचे हात, मदतीचे हात, पाठीवरची कौतुकाची थाप…. प्रत्येक क्षणी मनात कुठेतरी डोकावायला हवा माझ्या हा विचार …न जाणो हे सारे पुन्हा नशिबात असेल नसेल. 
आता मागे वळून पाहताना मला तेंव्हा हा विचार मनात येऊन तो मनात ठेऊन त्या त्या क्षणांना दिलेले प्रतिसाद अधिक समर्पक ठरले असते. आता अर्ध्याहून अधिक डाव संपला असताना का होईना हे मनास उमजलय हे काय कमी आहे. कारण "हमको मिली है आज ये घड़िया नसीबसे" हे ही तितकंच खरं!

Tuesday, June 24, 2014

मनाचिये गुंती ………भाग २

मनाचिये गुंती चा हा पुढील भाग पण त्यातील संदर्भांशिवायही वाचणे कठीण जाऊ नये. 

सकाळचे सात वाजलेत. शनिवारचा दिवस आहे, टेबलपाशी आजची वर्तमानपत्रे आणि सकाळ पासूनचा दुसरा कॉफीचा मग हाती घेऊन गायत्री बसून आहे. वर्तमानपत्राच्या पानांवरून नजर फिरतीये, वाचले काहीच जात नाहीये. आज सुट्टीचा दिवस. तसा काही विशेष सुट्टीचा प्लान नाही. तशीही सकाळी सात ही सारंगसाठी उठण्याची वेळच नव्हे. आजकाल गेली काही वर्षे तीही त्यास उठवण्याच्या फंदात नाही पडली कधी. 

"आठवावे लागेल शेवटचे सकाळी प्रेमाने त्याला, " उठ रे, उठ ना रे सारंग, बघ किती वाजलेत" म्हणत उठवले होते ते" 

"सगळ्या जोडप्यांचे पुढे असेच होते का? सहजीवनाची, एकमेकांच्या सोबतीची, त्यातून मिळणाऱ्या आनंदाची परिभाषा काळानुरूप बदलायला हवी. पण आपल्यासह अनेकांच्या बाबत असे घडताना दिसत का नाही? सध्या आपल्या आसपास जास्त अशाच गोष्टी का पाहायला मिळाव्यात? आज लग्नानंतर जवळपास चाळीस वर्षे होत आली आई-आप्पांच्या लग्नाला पण आजही त्याचे नाते कसे टवटवीत वाटते. म्हणजे ते तसे आहे की ते तसं दाखवतात? त्यांची लेक असून आपल्याला हा प्रश्न जर पडत असेल तर मग मात्र  ……"

" आसपास सगळी तकलादू नाती पाहिली कि कशाचाच भरवसा वाटू नये तसं झालंय आपलं." 

मधल्या काळात सखीचा रोहनशी घटस्फोटाचा निर्णय पक्का झाला, तिने तसा तो त्याला आणि दोघांच्या घरच्यांना सांगितला. बऱ्यापैकी घट्ट मनाने तिने हा निर्णय घेतला होता, ज्यावर ती तेवढीच ठाम ही होती, आहे. रोहन साठी हा धक्का होता, पण यास्थितीस तो ही कारणीभूत होताच,  सखीची बाजू इतकी पटण्याजोगी होती की रोहनची मैत्रीण असलेली गायत्री त्याच्याशी बोलण्याच्या किंवा दोघांत मध्यस्थी करण्याच्या मनस्थितीत नव्हतीच. 

इथे सारंग आकंठ कामात बुडालेला आहे. कधी कधी घरी पहाटे तीन चार वाजता येऊन सकाळी नऊ वाजता पुन्हा ऑफिसला जातो. कधी लवकर घरी आलाच तर, काम, ड्रिंक्स आणि तो हेच त्याचे जग झालेय. तो पुढच्या महिन्यात यु एस ला जाणार हे आता नक्की झालंय. किमान दोन वर्षांसाठी. त्याला हवी असणारी गोष्ट शेवटी तो मिळवणारच हे नक्की.  

या उलट गायत्रीची परिस्थिती आहे. तिचं आयुष्य काहीसं संथ पाण्यासारखं झालंय. घर आणि करिअर चांगल्यापैकी स्थिरावलेले. नवीन काही, का?, किती? आणि कोणासाठी?मिळवावे हा प्रश्न सतत छळतोय. लग्नाला दहा वर्षे होतील आता. सर्व शक्य होते ते प्रयत्न करून झाले, पण काही उपयोग झाला नाही. आता तर तिचीच इच्छा नाहीये. गेल्या काही वर्षातील तिच्यातील आणि सारंग मधील कोणत्याच कारणाशिवायचा वाढता दुरावा आणि आजूबाजूस असलेल्या इतर जोडप्यांमधील कुरबुरी पाहता कशासाठी अजून एका जीवाचे हाल असा प्रश्न पडू लागलाय. मूल नसल्याने दुरावा वाढतोय कि हा वाढता दुरावाच ते न होण्याचे कारण आहे? उत्तरेच नसणारे प्रश्न तरी का पडावेत? आणि हेच कारण होतं गायत्रीने यावेळी सारंग बरोबर सद्ध्या तरी जायचे नाही असे ठरवले त्याचे. त्यानेही विशेष आग्रह केला नाहीच म्हणा. 

"सद्ध्या त्याच्या अनेक विचारांत, निर्णयात आपण नसतोच तसे यातही नव्हतोच. अपेक्षितच होता का त्याला आपला हा त्यासोबत न जाण्याचा निर्णय, की त्यालाही थोडी स्पेस हवीच आहे? हे थोडे अंतर गोष्टी थोड्या सरळ करतील का की अजूनच बिघडवतील. पण  काय बिनसलंय हे न कळताच आपण गोष्टी सुधारण्याची अपेक्षा का करतोय? वर वर तर सारे छान चालू आहे, इतर कोणाला पुसटशी शंकाही यायची नाही. सारंग जाण्यापूर्वी त्याच्याशी एकदा बोलायला हवे आहे का? मुळात तो आपल्यात सारे काही ठीक नाहीये हे तरी मान्य करेल की हे सारे तुझ्या मनाचे खेळ आहेत म्हणत आपले म्हणणे ऐकूनच घेणार नाही?"

"मध्यंतरी विराजने जो सल्ला दिला…… हळूहळू त्याने डोके पोखरून टाकले आहे "रिलेशन्स जप" असे म्हणाला होता तो. म्हणजे मी नक्की काय करू? नक्की कोणत्या नात्यांविषयी, कि सगळ्याच? म्हणजे मी आणि सारंग, मी आणि त्याचे आई वडील आणि इतर नातेवाईक, कि प्रोफेशनल रिलेशन्स? तशीही सर्वच नाती प्रवाही असतात, त्यामुळे रोज थोडी थोडी बदलतातच. ती थांबली कि मगच संपण्याकडे वाटचाल करू लागतात. पण मग अशा वाहत्या पाण्यास जपायचे आहे मी म्हणजे नक्की काय करायचे आहे? 

बरं,ती जपण्यासाठी मीच एकटी का प्रयत्न करू? प्रयत्न करू म्हणजे तरी नक्की काय करू? सदैव मी पडती बाजू घेऊ, की कोणत्याही परिस्थितीत मी शांत राहू? पण हे करण्यासाठी तरी काहीतरी घडावे लागेल. नक्की करू तरी काय? कशाने काय बिघडणार आहे हे कळले तर कोणी काही उपाय तरी करेल ना, इथे आता सगळेच हवेत.काही न घडताच गोष्टी बिघडत चाललेल्या. 

"अनेकदा फोन हाती घेतला होता त्याला फोन करून त्याच्याशी यावर अधिक बोलण्यासाठी. पण धीर झाला नाही. एकतर मुळात तो सारंगचा मित्र आहे.तर मग त्याने जरी सारंगने सांगितले म्हणून आपली पत्रिका पहिली असेल तरी आपल्याशी बोलायला नको होते यावर. दुसरीकडे आपला यावर विश्वास कधी नव्हता. आजवर आयुष्यातली कोणतीही महत्त्वाची गोष्ट करण्यापूर्वी आपण ज्योतिष, कुंडली हे पहिले नव्हते. अगदी अजून मूल नाही यासाठी सुद्धा नाही. तर मग आज का वळावे आपण या साऱ्याकडे? त्याच्या या सल्ल्याने आपण का त्रास करून घेतोय. त्यालाही चांगलेच माहित आहे आपला या गोष्टींवर विश्वास नाही ते"

आई आप्पांशी यावर बोलावे का एकदा? पण त्यांना ह्या गुंत्यांचा तरी त्रास आता या वयात नको द्यायला. मुळात आपल्याच कल्पना इतक्या धुसर आहेत कि त्यांच्यापर्यंत हे सारे पोहोचवावे तरी कसे. त्या दोघांनी दिलेले समतोल विचारांचं बाळकडू विसरत चाललोय का आपण? त्यातून आप्पांच्या सडेतोड प्रश्नांची उत्तरे देणे जमणार नाही आपल्याला. खरे तर त्यांच्याशीच एकदा मनमोकळा संवाद घडायला हवाय, कदाचित एखादी नवी दिशा त्यातूनच सापडेल आणि त्यावाटेवर चालता सारे कसे स्वछ आणि निरभ्र होऊन जाईल………