Showing posts with label जडणघडण. Show all posts
Showing posts with label जडणघडण. Show all posts

Tuesday, December 8, 2015

तो...... मी....... आणि समाज


मुळात माझे आणि त्याचे नाते हे कोणत्याही रूढी, परंपरा, नियम यात बांधलेले नाही. त्याचे आणि माझे नाते इतके वैयक्तिक आणि घट्ट आहे कि सहजासहजी कोणी त्यास धक्का लावू शकणार नाही. कारण मुळात हे नाते एका श्रद्धेचे आहे. तो देव म्हणून माझी त्यावर श्रद्धा आहे एवढेच खरेतर पुरेसे. पण कदाचित मग अशीच श्रद्धा त्याचीही माझ्याबाबत एक व्यक्ती  म्हणून असेल आणि म्हणून कदाचित आमचं इतकं घट्ट नातं टिकून असेल.

कोणतेही देवस्थान, कोणतेही गाव, कोणतेही देऊळ, कोणतीही मूर्ती, कोणत्याही पादुका, कोणत्याही देवळाचा कळस, कोणतीही पायरी या साऱ्यात मी त्याला पहात नाही. कोणतेही संत, कोणतेही साधू हे म्हणजे तो नव्हे. माझी तयाप्रती असणारी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी मला या साऱ्यांची गरज असतेच असे नाही. म्हणजे अशी ठिकाणे मला वर्ज्य आहेत का तर तसे नाही  पण तिथे गेल्यानेच माझ्या श्रद्धेचा अविष्कार घडतो का? तर तसे मुळीच नाही. उद्या जगातल्या सर्व अशा ठिकाणांमध्ये एक स्त्री आहे म्हणून प्रवेश मिळणार नाही अशी स्थिती निर्माण जरी झाली तरी मला  काडीचाही फरक पडणार नाही.  खरेतर मुळात अशी श्रद्धा आहे हे हे व्यक्त करण्याचीच मला गरज नाही.

तो म्हणजे घरात असलेल्या किंवा नसलेल्या मूर्ती नाहीत, कोण्या एका स्थानात, कोण्या एकाच दगडात तो वसतो असेही नाही. तो  तुमच्या  माझ्या सारखा माणूस नाही त्यामुळे माणसाची जात करते ते देवाण घेवाणीचे नियम तिथे लागत नाहीत. माणसांसारखी  लाच घेत  जसे की पेढे, नारळ, फुले, दक्षिणा, देणगी  अजून काय काय  घेत इच्छा पुऱ्या करणारा तो "देव" नव्हे. किंवा यातले मी काहीच केले नाही म्हणून माझ्यावर डूख धरून माझे वाईट करतो, असाही तो ही "देव" नव्हे. माझ्या अथक प्रयत्नांना जिथे मर्यादा येतात आणि तरीही गोष्टी घडतात ते घडवणारी शक्ती म्हणजे देव. तरीही माझे जे काही चांगले वाईट घडण्यास तो जबाबदार नाही  माणसाच्या आकलनापल्याड असंख्य गोष्टी घडतात चांगल्या/वाईट, माणूस किंवा कोणताही प्राणी सोडून, ते घडविणारा  तो जो कोणी कर्ता, जी शक्ती तो देव. त्याला देव म्हणूनच संबोधले पाहिजे असे नाही.  त्याला पुजलेच पाहिजे असेही  नाही.

हो… आणि मी एक स्त्री आहे. स्त्री म्हणून जन्म किंवा त्यासोबत मिळालेल्या कोणत्याही गोष्टी ह्या माझ्या अस्तित्त्वाचाच भाग आहेत. त्यामुळे त्या गोष्टींमुळे मी स्वतःला कमी लेखत नाही. वयात येणे, स्त्री म्हणून फुलण्याची सुरुवात होणे , शरीराने प्रजजनासाठी तयार होणे यास अतिशय नैसर्गिक प्रक्रिया मी मानते. मग या गोष्टी माझ्या दैनंदिन आचरणातील अडथळा बनत नाहीत. या कोणत्याही गोष्टीचे अवडंबर मी माजवत नाही, त्यासाठी कधी कोणत्या सवलतीची अपेक्षाही मला नाही.  या बाबत समाज, इतर लोकं काय विचार करतात, म्हणतात हे सारे माझ्यासाठी गौण आहे. मी जशी आहे तशी मला स्विकारणारा तो माझा "देव" आहे. माझ्या कोणत्याही शारीरिक स्थितीचा त्यास विटाळ होत नाही. कारण मुळात आमचे नाते त्यावर अवलंबून नाही. त्याचे आणि माझे नाते हा एक धागा आहे माझे मन आणि त्याची शक्ती यास जोडणारा.

अशी श्रद्धा जिथे असेल तिथे काय फरक पडतो कोणते  मंदिर, कोणती पायरी, कोणता चौथरा मला मी स्त्री आहे म्हणून वर्ज्य असेल तर? फरक पडतो… नक्कीच जोवर एक स्त्री  या साऱ्याला  महत्त्व देते तोवरच …… साऱ्या स्त्रिया एकदाच हा का विचार करत नाहीत की अशा भेदाभेद करणाऱ्या कोण्या देवाची मलाच गरज नाही? त्यासाठी कोणा व्यक्तीशी , संस्थेशी, कोणत्या समाजाशी माझे कोणते भांडण नको कोणताही विद्रोह नको …. कारण गरजच नाहीये त्याची. असे नियम कोणीतरी बनवले, आपण ते मानले म्हणून त्याविरुद्ध लढा देणे आले आणि मग पुढचे सारे सुरु झाले ना?

एक स्त्री म्हणून मी स्वत:ला कमी लेखत नाही, त्याचबरोबर एक स्त्री म्हणून मी कोणापेक्षा वरचढ ठरत नाही. मग मी स्त्री म्हणून कोणाकडून कोणत्याही फेवर ची अपेक्षा ठेवत नाही. मी स्वत:ला नाजूक समजत नाही कोणत्याही प्रकारे. माझे खंबीर असणेही जगावेगळे नाही. जसे हळवेपणा हे माझे शस्त्र नाही, तसेच शरीर, मनाचा कणखरपणा हे देखील नाही. माझी समाजाच्या कोणत्याही स्तराशी स्पर्धा नाही, असेल तर फक्त स्वत:शीच. एक माणूस म्हणून जगणे जास्त प्रिय आहे मला. समाजाचा दुसरा भाग म्हणजे पुरुष …. कोणीतरी सुपर पॉवर म्हणून त्यांच्याकडे पाहत नाही मी. मला न मिळणाऱ्या गोष्टींसाठी पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाने शिमगाही मी करत नाही. त्यांनीही माणूस म्हणून जगावे आणि जगू द्यावे इतकी साधी सोपी अपेक्षा आहे माझी. कोणत्याही बाबतीत त्यांच्याशी बरोबरी करावी असे मला कधी वाटत नाही. कारण मी स्वत:ला कमी लेखत नाही . स्त्री म्हणून कोणता फायदा करून घेणे आणि दुसरीकडे स्त्री म्हणून अन्य्याय होतो अशी ओरड करणे ह्या दोन्ही गोष्टी मला वर्ज्य आहेत. या जगाकडे मी पुरुषांनी, त्यांच्या नियमांनी बनलेले जंगल म्हणून पहात नाही. जे नियम मी मानतच नाही ते कोणी बनवले, किंवा ते कसे दांभिकतेकडे झुकणारे आहेत किंवा माझ्यावर कसे अन्य्याय करतात हा प्रश्नच उद्भवत नाही, पर्यायाने मी त्यास सहन करणे, त्या विरुद्ध विद्रोह करणे हे देखील नाही. देव धर्म त्याचे आचरण हे माझे, खरेतर प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे त्याचे  कोणी अवडंबर माजवत असेल तर ते मी मानत नाही. म्हणजेच पर्यायाने मी सहन काही करत नाही. किंवा तसे करण्याची वेळ स्वत:वर येऊ देत नाही.

Friday, July 5, 2013

अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे !

काही गाणी आपण अनेकदा ऐकत असतो, पहात असतो किंवा कधीतरी आधी ते कवितेच्या रूपात वाचलेले असते. प्रत्येक वेळी ते मनाला जाऊन भिडतेच असे नाही. प्रत्येक गोष्ट मनात जाऊन घट्ट रुजण्याचे सुद्धा काही खास क्षण असतात. शब्द प्रधान गाणी ऐकतच मोठी झालेली मी. पण त्या त्या वयात, ती गाणी भावप्रधान होत गेली, आपलीशी झाली. "त्या तिथे पलीकडे तिकडे, माझिया प्रियेचे झोपडे", "हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता" किंवा "ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा" म्हणत हरवून जाण्याच्या वयातच ती गाणी खऱ्या अर्थाने माझ्यापर्यंत पोहचली होती.


पूर्वी एकदा आजारी असताना अचनाक "एक वार पंखावरूनी" हेच गाणे अचानक ओठी आले, मनात त्या क्षणी आलेले विचार आईला सांगू नाही शकले, तिला "आई, मला झोपायचं आहे, थोपटतेस का थोडा वेळ? असे म्हणून त्या गाण्याची, त्या भावाची घेतलेली अनुभूती शब्दात नाही सांगता येणार.


एक कविता होती पाचवीच्या बालभारतीच्या पुस्तकात,

घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात

मग तेंव्हा ती अनेकदा वाचली असेल, पाठ केली असेल, त्याच्या वरची प्रश्नोत्तरे लिहिली असतील, त्यात पैकी च्या पैकी मार्क्स मिळवले असतील, पण खरच ती कविता तेंव्हा कळली होती का? खरं तर नाहीच …… ते वय नव्हतंही खरं यातल्या गाभ्यापर्यंत पोहचण्याचे. मग कधी पोहचली ती माझ्यापर्यंत? खरं तर लग्न होऊन बरेच दिवस झाले होते, बऱ्यापैकी मी माझ्या खरी रुळले होते. तशी हळवी मी फार एका घरातून दुसऱ्या घरात रुजताना झालेही नव्हते. पण एक दिवस घरी मी एकटीच, एकीकडे गाणी ऐकत, स्वैपाक करत, संध्याकाळची कातर वेळ. ही वेळ पण ना… …. अशी असते की कोणत्याही लहानसहान गोष्टींनी डोळे नकळत भरून यावेत. आणि हे गाणे सुरु झाले. अन असे मनाला जाऊन भिडले. आपली मायेची माणसे, घर दार, सोडून आलेल्या तिला, तिथल्या प्रत्येक गोष्टीत तिचा जीव गुंतलाय, घरातील माणसांचीच नव्हे तर दारचा प्राजक्त, गोठ्यातील कपिला तिची नंदा… साऱ्या साऱ्यांची आठवण मन व्याकूळ करतीये. म्हणजे इथे या सासर घरी ती काही दु:खात नाहीये पण अजून हे सारे तितकेसे आपलेसे झालेले नाहीये. मायेचा, हक्काचा वावर असण्याचे अजून तरी ते घर हेच एक ठिकाण आहे. त्यामुळे वाऱ्याला जा म्हणताना ती स्वत:च अनेकदा तिथे जाऊन पोहचते आहे. परकरी पोर होऊन प्राजक्त वेचते, गुरावासरात रमते आहे, इथे बसून पुन्हा पुन्हा आईची माया आठवते आहे. त्यामुळे ह्या साऱ्या आठवणी आणि फिरून फिरून भरून येणारे डोळे हे चालूच आहे.

आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला !


लहानपणी सहकुटुंब एखादा चित्रपट ( बहुदा मराठीच ) पाहण्याचा एखादा कार्यक्रम असे, तसाच जाऊन पाहिलेला एक होता तो म्हणजे "अष्टविनायक" . ज्या कोणाला पंडित वसंतराव देशपांडे यांना त्यातील गाण्यांसाठीच नव्हे तर यातील वडील म्हणून चित्रपटात घेण्याचे सुचले असेल…. त्यांच्या स्वरस्पर्षाने गाण्यांचे सोने झले. त्यातील गणपतीची गाणी तर दर वर्षी ऐकतच होते. "दाटून कंठ येतो……. " हे मात्र खऱ्या अर्थाने उमजायला आईपण अनुभवावं लागलं. आईपणाची चाहूल लागली असताना ऐकलेल्या या गाण्याने आयुष्यात कधी नव्हे ते इतके हळवे बनवले की इतके लग्न करून सासरी जातानाही नव्हते. हे गाणे ऐकता ऐकताच एकीकडे आपल्या बाबांची आठवण तर दुसरीकडे आपल्या घरी ही एक  परी यावी हा विचार पक्का झाला. मी तिला फक्त जन्म देऊन, मी आई होणार असले तरी आई म्हणून मला ती घडवणार आहे. तिच्या बोटाला धरून अक्षरे गिरवताना ती शिकेलच पण शिकवण्याची कला मीही शिकेन, नाही तर त्यात रमेनही.


हातात बाळपोथी ओठांत बाळ भाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा
वळवून अक्षरांना केले तुला शहाणे
जातो सुखावुनी मी त्या गोड आठवाने 

बोलात बोबडीच्या संगीत जगवायचे, लय, ताल सूर यांची जाणीव करून द्यायची, लय ताल सूर हे फक्त गाण्याचेच नाहीत तर आयुष्यातही जमवून आणावे लागतात, याची ती जाणीव. आणि हे सारे करून कृथार्थ मनाने तिला परक्याच्या हाती सोपवायची.


बोलांत बोबडीच्या संगीत जागवीले
लयतालसूरलेणे सहजीच लेववीले
एकेक सूर यावा नाहून अमृताने
अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे 


घेऊ कसा निरोप .... तुटतात आत धागे
हा देह दूर जाता मन राहणार मागे 
धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे
परक्यापरी अता मी येथे फिरून येणे

हे गाणे ऐकतानाच आपला स्वत:चाच पुढचा काळ असा डोळ्यासमोरून तरळून गेला, एका गाण्याने आईपणाच्या संकल्पना इतक्या स्पष्ट नजरेसमोर साकारल्या की आजही मी त्यान्चाच आधार घेत आईपण पेलतीये. एका गाण्यातून लेकीला घडवून, मोठी, शहाणी करून, तिला चांगल्या घरी, सुयोग्य साथीदाराच्या हाती देताना, निरोपाचे हे कोमल क्षण वेचणाऱ्या शांताबाई, हे क्षण आपल्या गळ्यातून, आपल्या अभिनयातून इतक्या प्रभावीपणे पोहचविणारे वसंतराव यांना सलाम!
आता आयुष्याचा पूर्वार्ध संपत आलाय, एकीकडे उत्तरार्ध त्याच उत्साहाने, आनंदाने कसा जाईल याचे विचार मनात डोकावत असतानाच, मधूनच भैरवी का बरे आठवते? नुसतीच आठवत नाही तर व्याकूळ करते .

जन्म-मरण नको आता, नको येरझार
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार

का या ओळी किंवा "संधीप्रकाशात अजून जो सोने" या बा. भ. बोरकरांच्या ओळींतले निरोपाचे क्षण उदास करतात?

Saturday, February 16, 2013

समवेदना


"समवेदना"

ते २००३ साल होते. एका अस्वस्थ काळातून मी जात होते. पहिल्यांदाच आयुष्यात मला कोणत्या तरी अशा आधाराची गरज वाटत होती, कि जी नुसतीच मला त्यातून बाहेर काढेल नव्हे तर माझे मनोबल टिकवून देखील ठेवेल. सर्वकाही कोणावर तरी सोपवावे आणि त्याने आपल्याला सावरावे असे कोणीतरी.  त्या वेळी देवावर नेहमीपेक्षा जास्त (कारण मुळात मी सश्रद्ध आहे )विश्वास ठेवावा असे कुठेतरी वाटू लागले होते. आणि त्यानुसार मी, सोळा सोमवारचे उपास सुरु करून त्या भोळ्या सांबावर  सारा माझा भार सोपवून निर्धास्त झाले. जसजसे दिवस सरत होते तसतसे माझे मनोबलही वाढत होते. उपास तर केले आहेत, मग आता बाकी सर्वजण करतात तशीच आपणही याची सांगता करावी की आपल्या मनाचे ऐकावे हा विचार वारंवार मनात डोकावत होता. शेवटी कौल मनाचाच लागला. कारण माझ्यासारख्याच खावून पिऊन सुखी कुटुंबातील अनेकदा नात्यागोत्याच्याच १६/१७ जोडप्यांना बोलवायचे, गोडधोड जेवू घालायचे,दक्षिणा द्यायची......पण हे का करायचे? लोकांना मी नक्की कशाचे प्रदर्शन करायचे, मी किती उत्तम स्वयंपाक करू शकते, किती खर्च करू शकते, किती भारी वस्तू, साड्या मी दक्षिणा म्हणून देवू शकते, याचे????????  त्याने काय होते? माझ्या जवळच्या व्यक्तीना तर सारे माहीतच आहे आणि बाकीच्यांना हे नाही कळले तर काय बिघडते???

त्यापेक्षा व्रताची सांगता करायच्या दिवशी मी नेहमीसारखी मनापासून पूजा करेन, एखादे असे मेहूण ज्यांना माझ्याबद्दल आत्मीयता वाटते, मी ज्या अवघड काळातून गेले होते त्याची त्यांना कल्पना आहे अशा कोणालातरी बोलावेन आणि बाकी सारी रक्कम मी एखाद्या योग्य अशा संस्थेला देईन. याने देव पावला तर ठीक नाहीतर त्याची मर्जी. मुळात माझ्या दृष्टीने "देवाणघेवाणीचे" हिशोब ठेवतो तो "देव" कसा????

असे विचार मनात घोळत असतानाच "साप्ताहिक सकाळ" मध्ये समवेदना च्या नुकत्याच सुरु झालेल्या कामाबद्दल माहिती आली होती. डॉ. चारुदत्त आपटे यांचे नाव मी पूर्वी ऐकून होते.पुण्यात लहानाची मोठी झालेली असल्यामुळे "त्यांच्या वडिलांच्या "विद्यार्थी सहाय्यक समिती" बद्दल ही माहिती होतीच. माझी काकू सौ.केतकर हि त्यांची पेशंट होती. त्यानंतर एकदा माझ्या भावाला त्यांच्याकडे न्यावे लागले होते. तेंव्हा मी नाही पण माझा नवरा त्याला त्यांच्याकडे घेऊन गेला होता. नंतर  परत आल्यावर जे वर्णन त्याने केले, ज्या पद्धतीने त्यांनी माझ्या भावाला अश्वस्त केले होते त्यावरून एक चांगली प्रतिमा त्यांची माझ्या डोक्यात होतीच. त्यामुळे हीच संस्था नक्की झाली. त्यावेळी "समवेदना" नुकतेच लावलेले लहानसे रोपटे होते. हर्डीकर हॉस्पिटलच्या एका मजल्यावर एका लहानशा खोलीत तिचा कारभार चाले. ठरवल्याप्रमाणे एकदा त्या रकमेचा चेक देऊन आल्यावर माझे काम संपले होते. 

काही महिन्यांनंतर माझ्या नावे  एक टपाल आले समवेदना कडून....काय असेल असा विचार करत ते उघडून पाहते तो आत एका पेशंटच्या डिस्चार्ज पेपरची प्रत आणि सोबत  त्याच पेशंटला का मदत केली गेली याची माहिती आणि त्याच्यावर केल्या गेलेल्या एकूण खर्चाचा भर कोणी आणि किती उचलला त्याचीही माहिती. त्या मोठ्या खर्चात माझी रक्कम खरतर फार लहानशी होती आणि तरीही त्यांनी मला हि सर्व माहिती पाठवणे उचित समजले होते. इतक्या पारदर्शक कारभाराची मी अपेक्षाच नव्हती केली. समवेदनच्या या कृतीने मीच भारावून गेले होते. "आपटे" या नावावर टाकलेला विश्वास नक्कीच खूप सार्थ होता याची खात्री पटली. याच ओघात मी अजून एक लहानशी रक्कम "समवेदना" च्या कार्यालयात पोचती करून आले. ही अशी लहानशी मदत दरवर्षी करावीच असे काही ठरले नव्हते. पण नंतरच्या प्रत्येक वर्षी श्री. सुनील हिंगणे दरवर्षी आठवणीने साधारण जानेवारी महिन्यात आधी फोन करून येऊ लागले, त्यांच्या येण्यापुर्वीच मागील वर्षातील दिलेल्या रकमेचा विनियोग कसा केला याची संपूर्ण माहिती पोस्टाने घरी आलेली असेच. श्री. हिंगणे सोबत वार्षिक अहवाल घेवून येत असत...नंतर नंतर प्रीती दामले यांच्याशी संपर्क वाढू  लागला. मधेच कधीतरी समवेदनाच्या कार्यालयातून शरयूचा दर महिन्याच्या एका गुरुवारी होणाऱ्या मीटिंगला येऊ शकाल का असा फोन येऊ लागला.त्यामुळे समवेदनच्या कामाची व्याप्ती कशी वाढते आहे याचा अंदाज येऊ लागला होता. नुसतीच गरजू रुग्णांना मदत नव्हे तर आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातील स्त्रीयांसाठी कर्करोग तसेच स्त्रीरोग तपासणी उपक्रम, आणि आता पुण्यातील पहिली "त्वचा पेढी".

आपल्या ऑफिस मधून होणाऱ्या "CSR" मध्ये तर आपण अनेकदा सामील होतच असतो. पण तेवढेच या देशात, आपल्या समाजासाठी पुरेसे आहे असे मला वाटत नाही. प्रत्येक सुजाण नागरिकाने, आपला चिमुकला हिस्सा वैयक्तिक स्तरावर उचलून कोणत्या न कोणत्या स्वरूपाचे योगदान दिले तर खूप मोठे बदल इथे दिसून येतील हे नक्की. आपल्यापैकी प्रत्येकाला खूप मनापासून विनंती की "समवेदना" ची खालील माहिती एकदातरी जरूर वाचा.

समवेदना- 
  • गरीब व गरजू रुग्णांना उपचारांसाठी आर्थिक मदत. 
  • सह्याद्री हॉस्पिटलच्या सर्व शाखांमधून सेवा उपलब्ध.
  • सह्याद्री हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांची सेवा याकरिता पूर्णपणे विनामुल्य.
  • सह्याद्री हॉस्पिटलकडून उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात सवलत.
  • देणगीदारांना त्याच्या निधीच्या विनियोगाची तपशीलवार माहिती पाठवली जाते.
  • सोबतच अशा रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देण्याचे कामही ही संस्था करत असते, त्याकरिता कोणतेही मानधन आकारले जात नाही. 
  • निम्न आर्थिक स्तरातील महिलांसाठी मोफत कर्करोग पूर्वनिदान तपासणी उपक्रम, व  गरज पडल्यास उपचारदेखील.
  • ग्रामीण भागातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीरे.
  • गेल्या वर्षी समवेदनेने १२५ गरजू रुग्णांसाठी जवळपास १ कोटीच्या मदतीचा टप्पा गाठला.
  • फेब्रुवारी २०१२ मध्ये पुण्यातील पहिल्या "त्वचा बँक" या उपक्रमास सुरुवात झाली. मृत्युपश्चात "त्वचादान" या सर्वसामान्यपणे माहित नसलेल्या संकल्पनेचा प्रसार आणि प्रचार करण्याची जबाबदारी या संस्थेने घेतली आहे.

आपल्यापैकी कोणासही या कार्यास आपला हातभार लावावा असे वाटल्यास, समवेदनामध्ये आपले स्वागत आहे. देणगी स्वरूपात मदतीची आपल्याला जर इच्छा असेल तर त्यासाठीचा तपशील खालीलप्रमाणे.
Union Bank of india, karve road branch,
S/b Account No. 37000201090 2648 for indian passport holders 
Account No. 37000201090 0967 for foreign passport holders.
IFSC Code UBIN0537004


दरवर्षीच्या एका लहानशा रकमेच्या धाग्याने माझ्यात आणि या संस्थेत एक घट्ट धागा विणला गेला. असा धागा की पुढे मागे जर नोकरी सोडून मी एखाद्या सामाजिक कार्यास वाहून घ्यायचे ठरवले तर हीच ती संस्था असेल.....असे मनोमन ठरवले जाण्याइतका. "एकही गरीब व गरजू रुग्ण निव्वळ आर्थिक पाठबळ नाही म्हणून परत जाऊ नये" हे ध्येय समोर ठेऊन अखंडपणे गेली १० वर्षे "समवेदना" ज्या रीतीने कार्यरत आहे, त्या कळकळ, त्या प्रेरणेला मनापासून सलाम!

Saturday, February 9, 2013

एक धडा.............


दिवसाकाठी अनेक गोष्टी घडत असतात, त्या अनुभवतानाच या शब्दबद्ध कशा रीतीने करायच्या याचाही मनात विचार सुरू असतो. त्याप्रमाणे अनेकदा रात्री घरी आल्यावर मी लॅपटॉप उघडून बसते देखील, पण त्याच वेळी मनात लिहावे-नलिहावे याचे द्वंद्व सुरू असते. सद्ध्या तरी रोज "न लिहावे" याच बाजूने निकाल लागतोय. काय म्हणावे यास...आपल्याच कोषात जाणे? किती दिवस चालणार हे असे? डिसेंबर मधे मी एक गोष्ट लिहायचा प्रयत्न केला, त्याचे पुढचे २ भागही एका दमात तेंव्हा लिहिले गेले होते, पण  ते पोस्ट करण्याची इच्छाच जणू मरून गेली. अनेक दिवसांत मी माझ्या स्वत:च्या "मी....माझे....मला" कडे बघितलेदेखील नाहीये. माझ्या बाकी सार्‍या ब्लॉग मित्र मैत्रीणींच्या ब्लॉगवर मी अधून मधून डोकवते देखील ... पण लिहीत मात्र नाहीये.

तशा मी रोजच्या रुटीनच्या बाकी सगळ्या गोष्टी करते, घराकडे लक्ष देते, नवरा लेकीशी गप्पा होतात, ऑफीसला जाते, जिमला जाते, चांगली गाणी ऐकते, गप्पा मारते, सभोवताली घडणार्‍या गोष्टींवर बोलते ही, मान्य की चांगल्यापेक्षा वाईट गोष्टींचं प्रमाण जास्त असते. रात्री घरी येऊन ठराविक कार्यक्रम टी.व्ही. वर पाहते, स्वत:बरोबर अनेक कडवट घटना नेहमीप्रमाणेच "जाऊ दे ना" म्हणत मागे टाकते. पण लिहीत मात्र नाहीये.

आज मी एक धडा शिकले. तो मात्र मी लिहिलाच पाहिजे. आपण नेहमी म्हणतो "गोष्टी वेळच्या वेळी कराव्यात" ....याच बाबतीतला एक धडा मी आज शिकलीय... आणि सकाळपासून तो माझ्या मनात घर करून आहे. आज मी गेले होते सकाळी एका गाण्याच्या वर्गाच्या एका कार्यक्रमाला. माझी लेक या क्लासला जाते. गेले काही दिवस त्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती.

कॉलेजला असताना माझ्या एका मैत्रीणीची बहीण होती, जी तेंव्हा संगीत घेऊन बी.ए. करत होती. अधूनमधून आम्ही भेटत असू, तिचं गाणं ही कधीतरी ऐकत असू. नंतर ती गाण्याचे कार्यक्रम करू लागली. अशाच कार्यक्रमांचे निवेदन उत्तम रीतीने करणार्‍या एका उमद्या तरुणाशी ओळख आणि नंतर प्रेमविवाह ही झाला. मधली काही वर्षे मी इथे नव्हते, काही वर्षांनी जेंव्हा परत आले, तेंव्हा या जोडीचे या शहरात चांगलेच नाव झालेले होते, एक दोन वेळा आमची भेट झाली देखील. संस्कृती लहान असताना जेंव्हा तिला गाणे शिकवायचा विचार आला तेंव्हा हिचेच नाव समोर आले, आणि त्याप्रमाणे संस्कृती तिच्याकडे गाणे शिकू लागली. त्या निमित्ताने आम्ही अधून मधून भेटू लागलो. पण पुन्हा काही कारणानी संस्कृतीचे गाणे थांबले, आणि आमच्या भेटीही.

सात आठ वर्षे मधे अशीच गेली. अजून एका मैत्रीणीच्या बोलण्यातून हिची खुशाली कळे. गेल्यावर्षी एप्रिलमधे एकदा दुपारी मैत्रीणीचा फोन आला "अनघा, "XXX"च्या मिस्टारांचा अपघात झालाय, आय.सी.यू.मधे आहेत ते" हे ऐकून थोडे सुन्न व्हायला झाले. नंतर थोड्याच वेळात भावाचा फोन आला, हीच बातमी सांगणारा. नंतरचे ३/४ दिवस या बद्दल मैत्रीण आणि भावाकडून त्यांच्या खालावत जाणार्‍या तब्येती बाबत. एक दिवस त्यांच्या जाण्याची बातमी आलीच. मैत्रीण आणि माझा भाऊ तिथेच होते. माझा आणि तिचा भाऊ हे गेली अनेक वर्ष चांगले मित्र आहेत. एकदा मनात विचार आला होता, तिला भेटायला जाण्याचा. पण का कोण जाणे तो मी टाळला, बरेच वर्ष काही संपर्क नसताना अशा प्रसंगी जाऊन काय बोलायचे. कोणाच्या शब्दांनी हलके व्हावे इतके लहानसे दु:ख नव्हते तिचे. चाळिशीत जोडीदार अचानक सोडून जातो, मागे त्याचे आई वडील, आपण आणि आपला मुलगा ठेवून ....तेंव्हा ते दु:ख काय असते हे मी माझ्या लहानपणी अनुभवलय. त्या नंतर काही दिवसांनी तिने गाण्याचे वर्ग पुन्हा सुरू केलेले पण मैत्रीणी कडून कळले. वाटले "बरे झाले, आता सावरेल थोडी." नंतर एकदा संस्कृतीने पुन्हा गाण्याचा विषय काढला आणि मी तिला फोन केला. तिच्याशी बोलले. दर्शनी तरी आता गाडी सावरलीये असे वाटून गेले. मध्यंतरी एकदा संस्कृतीला  मी मला गाणे शिकायचेय असे सांगितले, तिने तिच्या या ताईला सांगितले, निरोप आला "आईला म्हणावे, ये शनिवारी" मी म्हणाले "एवढे एक सर्टीफिकेशन आणि त्याची परीक्षा झाली की मग जायला लागेन"

आज सकाळी कार्यक्रमाच्या जागी पोहचले. आत शिरताच ती पुढे आली, आम्ही बोलू लागलो, आणि नकळत मला भरून येऊ लागले. स्वत:ला बर्‍यापैकी सावरत मी तिच्याशी बोलले. नंतर खुर्चीत जाऊन बसले आणि मग मात्र मी स्वत:ला थांबवू शकले नाही. तिच्या जोडीदाराच्या जाण्यानंतर तिने आयोजित केलेला हा पहिलाच मोठा कार्यक्रम होता. त्याना श्रद्धांजली वाहिली गेली. कार्यक्रमाला सुरूवात झाली, आणि निवेदन करणार होता तिचा ११/१२ वर्षांचा सुपुत्र. थोडाफार त्यांच्याच स्टाईलने त्याने काहीकाळ निवेदनाची धूरा छानपैकी सांभाळली. पण माझे मात्र डोळे सुरुवातीचा थोडावेळ भरून वहात राहीले.

एकीकडे ती ज्या पद्धतीने या प्रसंगातून धीराने बाहेर येते आहे, स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाला सावरते आहे, संभाळते आहे, लेकाला त्याच्या बाबांच्या मार्गावरून पुढे नेते आहे, कदाचित त्याच्या बाबांचेपण हेच स्वप्न असेल, हे बघून मला तिचे खूप कौतुक वाटत राहीले. त्या बरोबरच एकटीने हे सारे करण्याची वेळ नियतीने तिच्यावर आणली याचे वाईटही.
आणि धडा हा की "गोष्टी वेळच्या वेळी कराव्यात". त्या क्षणी तिला सावरण्यास अनेक हात तिच्यापाशी होते, माझ्या तिला भेटायला जाण्याने तिला काही फरक पडला असता, नसता, माहीत नाही. मला मात्र नक्कीच पडला असता. माझ्या भावनांचा योग्यवेळी निचरा झाला असता, आमच्या ओळखीतून जे बंध निर्माण झाले होते त्यासाठी तरी मी तिला भेटायला जायला हवे होते. ती तिची नाही तरी गरज माझी होती. ती जर मी वेळीच ओळखली असती असे अवेळीच डोळे भरून येण्याची वेळ माझ्यावर आली नसती.

Friday, July 13, 2012

वृक्ष वल्ली .....


या शनिवारी सर्वात महत्वाचं काम करायचं आहे.  खालच्या बागेत जाऊन झाडांना पाणी घालायचं आहे म्हणजे तरी पुण्यात  पाऊस पडेल. आता तुम्ही म्हणाल या दोन गोष्टींचा एकमेकींशी काय संबंध? कारण अनेक वर्षांच्या अनुभवातून माझ्या असं लक्षात आलंय की "देव हा आळशी लोकांनाच मदत करतो"  जर आळशी लोकांवर एखादे काम येऊन पडले तर तो तत्काळ त्यांची त्यातून सुटका करतो. तत्पूर्वी असे संवाद आमच्या घरी घडतात. " अनघा, नुसता बागेत झाडे लावण्याचा उत्साह दाखवतेस, पाणी कोण घालणार जाऊन त्यांना? नुसता आरंभशूरपणा!" इति........माझा नवरा (त्याच्याशिवाय माझी इतकी स्तुती कोण करू  शकतं?)  मग मी एक दिवस वेळात वेळ काढून बिल्डींग मध्ये तळमजल्यावर असलेल्या आमच्या बागेत जाते, झाडांना भरपूर पाणी घालते, थोडी छाटणी करते, नवीन काय लावता येईल याचा विचार करते, आणि बागकाम केल्याचं समाधान बाळगत घरी येते, मोजून १०/१२ तासात असा धोधो पाऊस पडतो की पुढचे काही दिवस तरी जाऊन पाणी घालण्याची गरज पडत नाही मग. आता यावर्षी पाऊस कुठेतरी गडप झालाय, आता बघते या उपायाने तरी तो परत येतोय का ते! 
वाशीत राहात असताना झाडे वगैरे लावावीत असं कधी वाटलं नाही अर्थात जागाही नव्हतीच, जेंव्हा चिंचवड मधल्या या घरी राहायला यायचं नक्की केलं तेंव्हाच ठरवलं की खूप मस्त बाग फुलवायची. बिल्डींगच्या तळमजल्यावरची  बाजूची एक ४० बाय ८ ची एक पट्टी मला बागेसाठी मिळाली होती शिवाय घराची टेरेस होतीच. त्यावेळी संस्कृती लहान होती आणि मी पण नोकरी करत नव्हते. मग या गोष्टींसाठी भरपूर वेळ हाताशी होता. पहिल्या वर्षी अनेक शोभेची झाडे, तुळस, पुदिना, गवती चहा येऊन टेरेस मध्ये विराजमान झाली.  पुदिना आणि गवती चहा तर इतके  उदंड वाढले की त्याचं काय करायचं हा प्रश्न पडला. प्रश्नांना उत्तरे मिळतातच. गवती चहा कापून सावलीत सुकवून त्याची पावडर चहात मिसळून टाकू लागले. पुदिना पण सुकवून पहिला, पण लक्षात आलं यात काही मजा नाही, तो रंग, स्वाद काही मी टिकवून ठेवू शकत नाही. मग बिल्डींगमधील शेजाऱ्यांना  सांगितले कोणाला कधी पुदिना हवा असेल तर माझ्या घरचा न्या. हळू हळू लक्षात आलं की या टेरेस मध्ये ऊन येतच नाहीये फारसं, वर्षाचे जवळपास ८ महिने. आणि उन्हाळ्यात इतकं ऊन की सकाळी १० वाजता पाय टाकवत नाही. २/४ दिवस बाहेरगावी गेलो तर झाडांची पार वाट लागणार आणि झालं ही तसंच. मग कुंड्या सुन्या सुन्या वाटू लागल्या, शेवटी त्या ही तिथून खाली हलवल्या. मग एकाच मोठी कुंडी उरली, जिच्यात ब्रह्मकमळ होते, फक्त पावसाळ्यात, फुले येणारे हे झाड, फुलाचं आयुष्य तरी किती एका रात्रीचं फक्त. कळी दिसू लागल्यापासून फूल उमलेपर्यंत वाट पाहणे. एका वर्षी २०/२२ फुले दोनवेळा आली आणि हे झाड सगळ्यांच्या कौतुकाचा विषय ठरले.

खालच्या बागेत सुरुवातीला तगर, जास्वंदीचे काही प्रकार मोगरा, गुलाब लावले. म्हटलं चला देवपूजेची सोय झाली. रोज बागेत जावून संध्याकाळी तिला पाणी देण्यात तिला मजा वाटू लागली. सर्वात मजा तेंव्हा आली जेंव्हा अबोलीच्या सुकलेल्या बियांवर पाणी पडलं आणि टपटप काही तरी उडू लागलं, संस्कृती घाबरली  आणि सुरुवातीस काही वेळ  हे काय याचा आम्हा दोघींना पत्ताच लागला नाही. बागेला फूल-चोरांपासून  वाचवणे हे किती कठीण असते याचा प्रत्यय याच  काळात  येऊ  लागला. कुठून पत्ता लागतो इतरांना तुमच्या बागेत अशी झाडे आहेत याचा?  माझी बाग तर बिल्डींगच्या मागील बाजूस आहे, तरी.......... मी सकाळी सहा वाजता जाऊन फुले काढणार तर त्यापूर्वीच झाडावरून फुले पसार होवू लागली. मग थोडे दिवस मी वेळा बदलून पहिल्या, आदल्या दिवशी संध्याकाळीच जाऊन कळ्या काढून घेवून येवू लागले. एक एक नस्ती काळजी लावून घ्यायला नको असं मी स्वत:लाच सांगत राहिले. हळूहळू मलाच कंटाळा येवू लागला या पोलीसगिरीचा. शेवटी विचार केला, जावू दे कोणाला न्यायची ते  घेऊन जावोत ती फुले, आपण दर आठवड्यात, फुलबाजारातून देवासाठी फुले आणून ठेवूया. उगीच चीडचीडच  नको. या बागेत एक गुलाबी आणि एक पांढरी जास्वंद होती. दोन्हीला भरभरून फुले येत, आणि एक दिवस तर पांढऱ्या जास्वंदीला फुले आली  ज्यांच्या २ पाकळ्या गुलाबी आणि बाकी पांढऱ्या, काय ही निसर्गाची किमया!  एक केशरी रंगाची, तर एक डबल जास्वंद लालभडक. दापोलीहून एक कुंदाच  रोप आणलं, खाली लावलं आणि दोराच्या आधाराने त्याला घराच्या बाल्कनी पर्यंत चढवलं. रात्री चांदण्याच उतरू आल्यात असं वाटावं, इतकं सुंदर दृश्य दिसत असे. पण मग डासांना त्यात नवीन घर मिळाले. तो वेळ छाटून टाकण्याशिवाय मग पर्याय उरला नाही. तेंव्हा पासून तो माझ्यावर जो रुसलाय, तो आजतागायत. खाली बागेत कुंद आहे, पण तेंव्हा पासून त्यास एकही फूल आले नाहीये. पण म्हणून त्याला काढून टाकण्याचा विचारही कधी मनात आलेला नाही. कारण जेंव्हा येत होती तेंव्हा त्याच्या फुलांनी इतका आनंद दिलाय.......... 

एकदा सोन-केळी लावली. तिच्या फुटव्यांच काय करायचं हा प्रश्न पडला. मग पलीकडच्या बंगल्यात राहणाऱ्या एक काकू म्हणाल्या  मी घेऊन जाते, आणि आमच्या शेतात लावते. असं करत  करत त्यांच्या शेतात १०० सोन केळीची झाडे  लागली. आता त्यांच्याकडे केळ्यांचे घड उतरवून आणले की त्या मला फोन करतात " अनघा, शेतातून सोनकेळी आली आहेत, ४०  रु. डझन, तुला हवी आहेत का? आपल्या लोकांसाठी स्वस्तात देते आहे." हसूच येतं मला अशावेळी. एकदा पालक लावला, छान आला, फक्त किती लावायचा याचा अंदाज नाही आला नि मोजून त्याची ५/६ रोपे आली.....एक मैत्रीण म्हणाली, एक पालकाची गड्डी आण, त्यात हा पालक घाल आणि सगळ्यांना खाऊ घाल.....घरच्या पालकाची भाजी म्हणून.....असं काही करणं जमलं नाही, एकदा पराठ्यात तो पालक मी वापरून टाकला. ५ वर्षांपूर्वी लावलेला एक फणस अजून मोठा व्हायलाच नकार देतोय. दापोली कृषी विद्यापीठातून आणलेला "all spice " इतका मोठा झालाय की घराच्या खिडकीतून आत डोकावतोय. तसाच शेजारच्या बंगल्यातला आंबा कायम  माझ्या खोलीच्या खिडकीतून "मला आत घ्या" असा हट्ट धरून असतो.  

माझं सोनचाफ्यावरील प्रेम माहित असल्याने,  एकदा नवरा एक सोनचाफ्याचं रोप घेऊन आला आणि म्हणाला " हे टेरेस मध्ये लावूयात, म्हणजे तुझ्या नजरेसमोर हा कायम फुललेला राहील"  मी नेहमीप्रमाणे त्याला चिडवलं " श्रीकृष्णानंतर, तूच  रे, त्याने बायकोसाठी पारिजात लावला, तू सोनचाफा लाव,  बहरला सोनचाफा  दारी, फूले का पडती शेजारी असं म्हण्याची वेळ माझ्यावर न येवो म्हणजे झालं."  पण या फुलासाठी खरोखरच मी खूप वेडी आहे इतकी की कोणी माझ्यासमोर ओंजळभर सोनचाफा धरला तर एका फुलाने भागत नाही, शक्य असल्यास ती सारी ओंजळभर फुले माझीच व्हावीत अशीच माझी इच्छा असते. आसपासच्या घरी कोणाकडे सोनचाफा आहे ते मला माहित असते, जाता येता त्या झाडावर फुले आहेत का हे पाहण्यास  एकदा तरी नजर जातेच. मध्यंतरी एक छंदच जडला मनाला, ऑफिसला जाताना रस्त्यातल्या एका सोनचाफयावर नजर टाकायची, एकतरी फूल दृष्टीस पडायलाच हवे, तरच दिवस छान जाणार, नाहीतर नाही. 

थोडे दिवसांनी बागकाम करायला एक माळी ठेवला. थोडी बागेच्या तब्येतीत सुधारणा झाली, रोपांभोवती छानशी आळी तयार झाली, बाग साजिरी  दिसू लागली......पण थोडेच दिवस. माळीबाबा दांड्याच जास्त मारू लागले, थोडे दिवसात काहीकाही बागकामाची हत्यारे पण गायब होऊ लागली, एकदा बायको खूप आजारी आहे या कारणांसाठी माळीबाबा जे १००० रुपये घेऊन गायब झालेत ते आजतागायत. थोडक्यात माझे बागकाम ही "charity " च  जास्त होऊ लागली. तशी ती मी अनेकदा अनेक प्रकारे करत असतेच......जिम  लावून, एकही  वर्तमानपत्र वाचायला वेळ नसताना रोज सगळी वर्तमानपत्रे पेपरवाल्याला टाकायला सांगून, स्वत:साठी साड्या विकत घेऊन, बागकाम करून.  या वेगवेगळ्या लोकांचे  मी मागच्या जन्मीचे काही देणे लागत असावे, म्हणून अधून मधून मला हे उद्योग सुचतात. 
परवा एका कलीगशी घरातली बाग यावर बोलणं चालू होतं. दोघं आपापले बागकामाचे अनुभव शेअर करत होतो, आणि वाटलं......चला पुन्हा एकदा बाग फुलावूया. स्वप्ने पाहायचे काम मन अगदी तत्परतेने करते ना!  शनिवारी जाऊन आणावीत  थोडी रोपे, थोड्या कुंड्या, थोडे सेंद्रिय खत. गवती चहा, कोथिंबीर, पुदिना, मिरच्या, ओव्याची पाने,  कढीपत्ता आणि बनेल एक मस्त हिरवेगार किचन गार्डन............

Monday, July 2, 2012

क्षितिजे विस्तारताना......

घरून जेंव्हा ऑफिसचे काम करत नसे, त्याकाळी, कोणी जर म्हणाले, की घरून काम करते तर, मला वाटे, काय मजा आहे हिची. ऑफिसला जाण्यासाठी तयार नको व्हायला, वेळेत या म्हणून पोळीवाल्या काकू, इतर कामे करणाऱ्या बाईंच्या मागे नको लागायला, गाडी नको चालवायला, पेट्रोल नको जाळायला, ट्राफिकवर वैतागायला नको आणि घरी येताना त्यामुळे होणारी चिडचिड नको. कल्पनेप्रमाणे कितीतरी वेळ या एका गोष्टीमुळे वाचतो असे वाटत असे. आणि हे सगळे फायदेच फायदे बघून खरच त्या व्यक्तीचा मनोमन हेवा वाटत असे.

एक डिमांड पूरी झाली की मन लागोपाठ दुसऱ्याची तयारी सुरु करतं. जसं की फक्त रविवार सुट्टीचा असे तेंव्हा शनिवार-रविवार सुट्टी हवी होती. बस ने जाताना वाटे आपली गाडी कधी येणार. गाडी आली तेंव्हा ती चालवणे त्रासदायक वाटू लागले आणि ऑफिसनेच जाण्या-येण्याची सोय करावी ही इच्छा प्रकट झाली. शनिवार-रविवार सुट्टी मिळू लागली तेंव्हा वाटू लागले की शुक्रवारी सकाळी लवकर ऑफिसला जाता आले आणि दुपारी ४ नंतर घरी जाता आले तर किती बरं होईल. ते पण शक्य होवू लागले तेंव्हा घरूनच रोज काम करता आले तर किती बरं होईल! खरंच नेव्हर एन्डिंग स्टोरी!!!!

जेंव्हा एखादी गोष्ट मिळावी असं वाटत असते तेंव्हा ती मिळवताना आपण काय गमावणार आहोत याचा पत्ताच नसतो अनेकदा. मधे काही दिवस खरोखरच घरून काम करू लागले आणि लक्षात आले की काय काय हरवतंय रोजच्या आयुष्यातून ते. तत्पूर्वी एक आठवडा मस्त वाटत होतं. येण्याजाण्याचा वेळ वाचेल त्याचं काय काय करायचं याचे ही प्लान्स झाले. किमान सकाळी चालायला जाणे, संध्याकाळी गरम गरम जेवण. पहिले काही दिवस छान गेले. नंतर हळू हळू लक्षात आलं, ठरवलेला एकही प्लान प्रत्यक्षात येवू नाही शकला. इतर वेळी सगळी कामे आटपून सकाळी ११ वाजेपर्यंत ऑफिसला पोहते, तर जेमतेम तोपर्यंत बाकी घरची कामे आटपून मी लॉग-इन करू शकत असे. बर बाकी लोकांच्या दृष्टीने काय " तू तर घरीच आहेस सध्या असाच सूर असे. इतर वेळी घरातले दोघे जी कामे करत ती त्यांच्या दृष्टीने करण्याची गरज उरली नाही कारण मी काय घरी होते ना.

एकंदरच असे काम करणे नंतर कंटाळवाणे वाटू लागले. आजूबाजूस असणारी माणसे, कामासंबंधीच्या गप्पा, त्याशिवाय च्या गप्पा, एकमेकांवर होणारे विनोद किंवा होणारे थोडे वाद विवाद, गॉसिप्स, निरनिराळ्या कारणांनी होणाऱ्या पार्ट्या, एकत्र चहा, जेवण या सगळ्यात एक आनंद असतो. अगदी सर्वच माणसांशी आपली मैत्री असते असं नाही पण तरीही. लक्षात आले, घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. ५ दिवस ऑफिसमध्ये जावून काम केलं तरच शनिवार-रविवार घरी राहण्यात मजा आहे.एक आपलं असं दुसरं जग असणं, त्यातून होणारं शेअरिंग, नकळत सहकार्यांबद्दल वाटणारी आपुलकी. साऱ्या गोष्टी तुमच्या नकळत तुमच्या सवयीच्या होवून जातात. अगदी माझ्यासारख्या एकटेपण आवड्णारीच्या सुद्धा! प्रत्येक गोष्टीचा आनंद तिची किंमत मोजल्या नंतरच खऱ्या अर्थाने मिळतो. न जाणो उद्या या घर- ऑफिस पलीकडच देखील एक माझं जग बनेल, परवा अजून एखादं! क्षितिजे विस्तारत जातील आणि या साऱ्या पसारयात मी कुठेतरी हरवून जाईन आणि मग माझी मलाच मी नव्याने भेटत राहीन.


Friday, June 22, 2012

समवेदना - समं वेदयेमहि| निरामया: वर्तेमहि ॥



बराच काळ लोटला आहे तसा, जेंव्हा प्रथम मी समवेदनाबद्दल सर्वप्रथम साप्ताहिक सकाळ मध्ये वाचले होते. म्हणजे जवळपास ९ वर्ष झाली. या संस्थेच्या सुरुवातीच्या दिवसांपासून मी तिच्याशी जोडलेली आहे. एखादे मोठे कार्य कसे उभे राहते हे ही मला यामुळे पाहता आले. डॉ. चारुदत्त अच्युत आपटे हे पुण्यातील प्रख्यात मेंदू रोग तज्ञ आहेत. घरात परंपरेने चालत आलेला समाजकार्याचा वसा त्यांनीही पुढे नेणेच पसंत केले व यातूनच "समवेदना" जन्मास आली. सुरुवातीस फक्त या रोगांनी पिडीत आर्थिक दृष्ट्या (खरोखर) गरजू रुग्णांवर उपचार "समवेदना" मार्फत केले जात असत. ज्याचा पसारा आता वाढून आता तो त्वचा बँक, कर्करोग या पर्यंत पोहचला आहे.
आज सकाळ मध्ये याबद्दल पुन्हा एकदा माहिती लिहून आलेली पहिली आणि सहजच वाटून गेले की ही माहिती आपल्यासारख्या काही लोकांपर्यंत पहोचवावी. खरोखर या बातमीत लिहिल्याप्रमाणे दरवर्षी मला माझ्या निधीचा विनियोग कसा केला हे विस्तृत माहितीसह एका पत्राद्वारे कळवले जाते. खरंतर एकदा मी माझा  ठराविक निधी त्यांना दिला की नंतर इतक्या विस्तृत माहितीची अपेक्षा नसते. मुळातच योग्य हाती निधी सोपवला आहे याची खातरजमा यापूर्वीच झालेली आहे. माझ्यासारखा विचार करणारे अनेक जण असतील. पण म्हणून "समवेदना" आपला पारदर्शी कारभार सोडत नाही. त्यांच्या वार्षिक अहवालावर नजर टाकली तर सहज हे लक्षात येते. 
खरंतर मला इच्छा आहे, निधी शिवायही काही मदत "समवेदना" स करण्याची. पुढे मागे जर मी नोकरी सोडून एखाद्या समाजकार्यास वाहून घायचे ठरवले तर "समवेदनाचे " नाव अगदी वर असेल.  पण सध्यातरी ते वेळेअभावी ते शक्य होत  नाही. पण मी मलाच समजावते की समाजकार्य फक्त वाहून घेतलेल्या लोकांमुळेच फक्त साध्य होत नाही, तर भक्कम आर्थिक पाठबळ ही तितकेच गरजेचे!!! खूप मनापासून मला आपणा सर्वांना आवाहन करण्याची इच्छा आहे, की जर आपण अशा एखाद्या संस्थेच्या पाठी उभे राहू इच्छित असाल व आपला खारीचा वाटा उचलू इच्छित असाल  तर या संस्थेचा जरूर विचार करावा. 
For E-transfers-
Union Bank of india, karve road branch, S/b Account No.- 37000201090 2648 for indian passport holders & Account No.- 37000201090 0967 for foreign passport holders.
IFSC Code- UBIN0537004 In case you are making E-transfers please send a mail to samavedana@gmail.com


Thursday, June 14, 2012

नमनाला घडाभर तेल .......

मला लहानपणी शाळेतली प्रयोगशाळा खूप आवडत असे. विशेषत: chemistry ची lab . नशिबाने तिथे सदैव राहणे जमले नाही. तरीही मी नेहमी म्हणते, माझं किचन ना ते किचन नाही ती माझी प्रयोगशाळा आहे. जिथे मी रमते आणि मनापासून माझे प्रयोग चालू असतात. पदवीधर झाल्या झाल्या लग्न केलं तेंव्हा ना धड गोल पोळ्या सुद्धा लाटता येत नसत मला. पण स्वत:चा असं एक किचन मिळालं आणि माझा तेथे मुक्त वावर सुरु झाला. इतके म्हणून मी येथे प्रयोग केलेत ......अनेक यशस्वी, अनेक अयशस्वी, पण माझ्यासाठी ते फक्त प्रयोग नसतात. ते माझं घडणं असतं.

या ब्लॉगमधून मी शेअर करणार आहे हाच माझा प्रवास. स्वैपाकघरात काहीही फारसं न येण्यापासून आता स्वघोषित "बेस्ट कूक" पर्यंतचा.
माझं किचन हे म्हणजे माझं एक स्वत:चं राज्य आहे, जिथे फक्त माझाच अंमल चालतो, जिथे इतर कुणाला फारशी लुडबूड करायला फारसा वाव कधी मिळत नाही. अनेक किस्से घडतात येथे, अनेक कौतुकाचे क्षण अनुभवलेत मी माझ्या या चिमुकल्या विश्वात, अनेक फसलेल्या प्रयोगातून मी काही तरी नवीन घडवलंय, कधी तरी एखाद्या रुसलेल्या पाककृतीने मला रडवलं देखील आहे. माझ्या करीअर इतकीच दुसरी समाधान देणारी दुसरी कोणती गोष्ट असेल तर ते माझं किचन. या विषयी बोलत राहीनच यापुढे...........

Friday, December 30, 2011

वारसा

आजकाल कोणी असं भेटलं की वडिलांचा मोठा बिझनेस आहे, पण मुलांपैकी कोणालाच त्यात इँटेरेस्ट नसतो. हळहळ वाटते अशा वेळी. आवड वगैरे सर्व गोष्टी मान्य करूनही असं म्हणावं वाटतं की असं असू नये. वारसा चालवणारं कोणीतरी पुढच्या पिढीत देखील तयार व्हायला हवं. इतकच नव्हे तर तो जोपासून समृद्ध करणारं ही कोणीतरी हवं. नुसतं "सांगे वडिलांची किर्ती" असे नको तर ती वाढवणारं आणि त्यांची किर्ती ताजी-तावानि राखणारं ही कोणीतरी हवं. कदाचित मागील पिढीनेच प्रयत्नपूर्वक ते घडवून आणायला हवं.


इतिहास हा शाळेत काही-जणांचा नावडता विषय असतो, तरी गोष्टिरुपात ऐकताना तितका कंटाळवाणा नक्कीच वाटत नाही. असं आपल्या मागच्या काही पिढ्यांबद्दल आपण ऐकलेले असते आणि काही गोष्टी ऐकताना खूप छान वाटलेलेही असते. मी लहान असताना आमच्या घरी माझे पणजोबा राहत असत. माझी पणजी  अतिशय देखणी होती. नावही किती छान श्रीधर आणि सौ.पद्मावती. उंचेपूरे पणजोबा आणि सुंदर अशी पणजी काय दिसत असेल तो जोडा. त्याकाळच्या फोटो मधे सुद्धा जाणवतं हे. ते त्यांच्या काळी मेकॅनिकल इंजिनीयर झालेले. आजीच्या लहानपणी त्यांची एक फॅक्टरी होती. काही जण नोकरी करत असत तिथे. दिवाळीत प्रत्येक कामगाराला सोन्याचे लक्ष्मीचे नाणे भेट म्हणून मिळत असे. मला तर हे ऐकून पेशवाईचीच आठवण आली.

पण मी त्याना पहिलं तेंव्हा यातलं काहीचं नव्हतं. तोपर्यंत त्यांचं वय खूप झालं होतं पण बुद्धिमत्ता तशीच होती तसेच स्मरण शक्तीही. वयाच्या ९५ व्या वर्षी हा गृहस्थ निसर्गोपचार केन्द्र चालवत असे, पुण्यात मध्य वस्तीमधे. रोज सकाळी १० नंतर काही पेशंट येत असत त्यांच्या कडे. फक्त उपाय सांगण्यासाठी ते त्या काळी म्हणजे जवळपास २५/३० वर्षांपूर्वी ४० रुपये घेत असत. त्याकाळी ही रक्कम नक्कीच मोठी होती. पण ज्या अर्थी लोक ते देत असत त्या अर्थी त्यात काही दम असला पाहिजे. मोडी लिपीत सतत काही लेखन चालू असे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांसारख्या लोकांशी त्यांचा संवाद असे. सकाळी सकाळी उठून वेगवेगळी स्तोत्रे, अभंग म्हणत असत. सगळी वर्तमानपत्रे वाचत असत. अतिशय कमी आहार असे तसेच हालचालही. त्यानी बनवलेली काही उपकरणे इतकी मस्त होती की तशी त्या नंतर कुठेच पहिली नाहीत. लाकडी टी-पोआय, नारळ खवण्याचे यंत्र, दाण्याचं कूट करण्याचं अशा अनेक गोष्टी त्यानी घरी बनवलेल्या होत्या आणि त्या तशा दुसरीकडे कुठेच नव्हत्या.

पण म्हणतात ना दिव्या खाली अंधार. असा वारसा काही कारणानी मागे पडतो, यातलं काहीच तुमच्या पर्यंत झिरपत नाही. तुम्ही पाहिलेले वास्तव काही वेगळेच असते. प्रश्न असा की वारसा जपला का जात नाही? का त्यांच्या वाटेवर पुढची पिढी नाही चालत? आमच्या त्या घरात ना दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर लोक जगत होते. एक ते असे आणि दुसरे माझे आई-बाबा आणि आम्ही भावंडे. आमची जगण्याची लढाईच वेगळी होती. पणजोबांची बुद्धिमत्ता, कर्तुत्त्व त्याकाळी आमच्या पर्यंत पोहचतच नव्हती. आज मागे वळून पाहाताना जाणवतं की किती मोठा वारसा होता तो. पण त्या काळी त्याचं महत्व जाणवलं नव्हतं कदाचित. आज उरली आहे ती एक खंत.....हळहळ वाटून घेण्याशिवाय, त्यांच्या बद्दल अभिमान बाळगण्याशिवाय दुसरे काही त्या समृद्ध वारशासाठी करू नाही शकत याची.

Monday, December 19, 2011

देवाचिये द्वारी

तशी मी धार्मिक कधी नव्हते. लग्न होईपर्यंत घरी कोणते धार्मिक कृत्य असेल तर नमस्कार करुन गोड-धोड जेवणावर ताव मारणे इतकाच माझा त्याच्याशी संबंध असे. अभ्यास आहे हे कारण ही खूप उपयोगी होते त्याकाळी, पण परीक्षेसाठी मात्र आवर्जून देवाला नमस्कार असे. पण त्याकाळी ही मला माहीत होते की माझयासारखे असे अनेकजण असतात म्हणून. नंतर सारे बदलत गेले. घरची नवी सून म्हणून काही गोष्टी करणे क्रमप्राप्त होते. त्याकाळी माझा माझयाशीच वाद असे. अनेक गोष्टी माझयावर लादल्या जात आहेत असे वाटत असे.


नंतर मीच बदलत गेले. गरजे साठी धार्मिक राहणे मनाला पटेना. पूर्णत: नास्तिक होणे ही जमले नसते मला. वाईट दिवसांत कोणाचा तरी आपण वापर करतोय हे न पटणारी गोष्ट होती मग तो देव असो, कोणी माणूस असो वा कोणी शक्ती म्हणू. मग मी विचारपूर्वक सश्रद्ध बनले. जे काही ते मनापासून करू लागले.

माझी साधी सोपी प्रार्थना असते. "माझी तुझयावर श्रद्धा आहे. माझा तुझयावर विश्वास आहे. माझयासाठी तू एक शक्ती आहेस, या विश्वाचा पालक आहेस. खूप काही मी तुझयाकडे मागून तू ते देण्यापेक्षा जे मला मिळवायचं आहे ते मिळवता येण्याची शक्ती तू मला दे. जर एखद्या क्षणी माझी परीक्षा पाहायची असेल तर समर्थपणे ती परिस्थिती पेलण्याची ताकद दे. यशासोबत पाय जमिनीवर राहतील अशी विचारधारा दे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझयापेक्षा दीन दुबळ्यांसाठीची कणव माझया मनात तेवती ठेव."

तरीही खूप या गोष्टींचे अवडंबर माजवणे मला पटत नाही. मी हे केले की देव मला ते देतो आणि नाही केले तर शिक्षा होते मला अशी विचारधारा मी जपत नाही. माणसासारखा विचार करणार्‍याला "देव" कसं म्हणावं? धार्मिक महत्त्व असणार्‍या दिवशी देवळात जाणं मी टाळतेच. किंवा सतत देव-दर्शन करणार्‍या लोकांना "आता कधी तरी त्या देवाला मोकळं सोडा, सारखा कोणकोणा कडे तो बघेल बिचारा " किंवा " तुमचं आणि देवाचं काय 3 -जी कनेक्शन आहे का की नुसतं मनात यायचा आवकाश की तुम्ही त्याच्या दर्शनासाठी पोहचताच" असं ही विचारते.


तरीही अधून मधून काही ठराविक देवळात जाण्याची मला इच्छा होतेच. मग अनेक दिवस जायचं असं घोकत मी कधीतरी पोहचते. देवाचं दर्शन हा निव्वळ हेतू मनात ठेवून. त्यामुळे देवासमोर ठेवण्यासाठी खूप काही घेऊन जावं असं माझया मनात फारसं कधी येत नाही. पण तिथे देणगी स्वरूपात किंवा अभिषेक म्हणून काही तरी देणे मी पसंत करते. (असा संगितलेला अभिषेक ते लोकं खरच करतात या बद्दल मला शंका आहे.) पण देवस्थानला इतर काही चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता निधीची गरज असते या विचाराने.


पण तरीही काही तरी देवाच्या दारी जाउनही मला खटकते. ते म्हणजे तिथले पूजारी आणि त्यांची वागणूक. तुम्ही काय देवासमोर ठेवता त्याप्रमाणे ते तुमच्या हाती प्रसाद म्हणून काय ठेवायचे ते ठरवतात. म्हणजे तुम्ही काहीतरी मोठं देवाच्या समोर ठेवा, ते तुम्हाला नारळ, पेढे, देवाला वाहिलेली फुले, हार किंवा देवाचं वस्त्र असं काही तरी प्रसादाच्या रूपात देतात. नुसते जा हात जोडुन डोळे मिटून प्रार्थना करा तेंव्हा ते तुमच्या हातावर साधे साखर फुटाणे देखील ठेवत नाहीत. मी कधी या गटात नाही तर कधी दुसर्या गटात असते. पण दोन्ही वेळा मनात विचार येतो की किमान देवाच्या दारी अशी विषमता असू नये.

Wednesday, December 14, 2011

जडणघडण

गेल्याच आठवड्यात एक सर्टिफिकेशनसाठी परीक्षा झाल्यानंतर, मी १०/१२ वी च्या परीक्षे नंतर सुट्टी जो आनंद असायचा तोच अनुभवत आहे. आणि त्याकाळात ही जो माझा आवडता छंद की मनसोक्त वाचन त्याकडेच वळले. नशीबवान मी की माझया लहानपणी आमच्या घरी माझे पणजोबा राहत असत आणि त्याच्याकरिता घरी सारी वर्तमानपत्रे येत आणि कोणी न सांगता ही रोज घरी येणारी सारी वर्तमानपत्रे मी वाचून काढत असे. ती सवय आजही कायम आहे. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे, मी पुण्यात राहत असताना घरातून दोन उड्या मारल्या की पुणे मराठी ग्रंथालयात पोहचत असे. रोज संध्याकाळी उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथे एका हॉल मधे अनेक पुस्तके ठेवलेली असत आणि कोणीही तिथे जाऊन पुस्तके वाचू शकत असे. अशा रीतीने प्रत्येक सुट्टीत माझे पुस्तक-प्रेम वाढतच गेले. बर्‍याचदा एकदा हाती घेतले की ते पुस्तक वाचूनच संपवायचे. अगदी जेवताना, रात्री झोपताना, तरीही शिल्लक राहीले तर सकाळी लवकर उठुनही. अनेकदा आईची बोलणी खाऊनही.

बर्‍याचदा एक पुस्तक मला दोनदा वाचायला आवडते. पहिलं वाचन रंजक गोष्टींमधे गुंतवून ठेवते, दुसर्यांदा हाती घेतले की या गोष्टी मागे पडतात, आणि पुस्तकाच्या गाभ्यापर्यंत पोचता येते आणि ते वाचन पहिल्या इतकेच गुंतवून ठेवते.

पुर्वी अनेकदा मी लायब्ररीतून पुस्तके आणून वाचत असे पण आजकाल स्वत:चा एक संग्रह बनविण्यातला माझा रस वाढला आहे. त्यामुळे आजकाल अक्षरधारा, एबीसी इथल्या माझया चकरा खूप वाढल्या आहेत. यावर्षी दिवाळीची खरेदी मी भरपूर पुस्तकांच्या रूपाने केली आणि जेंव्हा घरी भिंतीवर एका काचेच्या रॅक वर मांडून ठेवली तेंव्हा हरखून मी पाहताच राहीले माझया या संग्राहाकडे.

खूप वर्षांपूर्वी मी मीना प्रभू यांची "माझे लंडन" आणि "दक्षिणरंग" वाचली होती. खूप आवडली होती मला ती दोन्ही. विशेषतः दक्षिणरंग. खरोखर एक उत्तम प्रवासवर्णन! कदाचित प्रवासाच्या आधी लेखन हा उद्देश मनात नसावा. एकूणच पुस्तकाची भट्टी इतकी मस्त जमली होती की आपण एकटे प्रवास करणार असू तर एक उत्तम गाइड म्हणून ते पुस्तक उपयोगी पडावे आणि तरीही वाचनाकरिता रंजक असावे. हाच धागा मनात ठेवून त्यांची बाकी सारी पुस्तके जशी की " रोमराज्य, ग्रीकायन, तुर्क-नामा, इजिप्तायन, गाथा इराणी" मी विकत घेऊन आले. पण पदरी निराशा आली कारण ही सारी पुस्तके लिखाण हा हेतू मनात ठेवून केल्यासारखी वाटली. बराचसा एकटीने केलेला प्रवास, उस्फूर्तता हरवून बसलेली पुस्तके वाटली मला ती.

मग मी मागे एकदा वाचलेली "पानिपत" हाती घेतली आणि पुन्हा त्याचप्रकारे वाचून काढली. रात्री उशिरा घरी पोहचल्यावर, सकाळी उठल्यावर, ऑफीस ला जाण्यापुर्वी. असं पुस्तक जे हाती घ्यावं आणि तहान-भूक विसरून वाचतच जावे. डोळे उघडणारा मराठ्यांचा इतिहास. लढवय्येपणाची परिसीमा, त्याचप्रमाणे त्याकाळचे शासन, लढाया, राज्यविस्तार सार्‍या गोष्टी इतक्या सुंदर रित्या मांडल्या गेल्या आहेत. अनेकदा डोळे पाणावतात, अनेकदा मराठी असल्याचा अभिमान वाटतो, तर अनेकदा आजच्या सारखेच गळेकापू राजकारण त्याही काळी होते, ज्याने अनेक मोहरे गमावले याचा तिरस्कार वाटतो. आज २५० वर्षानंतरही जसाच्या तसा इतिहास जिवंत करणार्‍या या पुस्तकाला शतश्: प्रणाम.


Monday, October 24, 2011

वाढदिवस

खरं तर प्रत्येकासाठी हा एक आनंद दिन असतो अशी माझी कल्पना आहे. मी अनेकदा अनेकांचे वाढदिवस विसरले आहे. अगदी काल रात्री पर्यंत लक्षात होता पण आज मात्र साफ विसरून गेले असं अनेकदा घडलं आहे. आणि अनेकांच्या रोषाची मी धनी झाले आहे. पण कोणी आपलाच वाढदिवस विसरतो, यावर मात्र माझा अजिबात विश्वास नाही.


मी देखील खूप आतूर असे या दिवसासाठी. पण आजकाल काहीतरी बिनसलय...मला तो दिवस जसा जवळ येऊ लागतो तसं एक अनामिक भीती वाटू लागते. काही लोकांच्या शुभेच्छा, फोनची मी एकीकडे वाट बघत असते, आणि दूसरीकडे अशावेळी काय बोलावे अशी भीती वाटत असते. त्यामुळे त्यानी तो विसरावा अशी मनोमन प्रार्थना करत असते. फोन आणि प्रत्यक्ष भेटणार्‍या व्यक्तींशी त्या दिवशी बोलताना मी खूप अवघडलेली असते. घरी दुसर्‍या कोणी स्पेशल जेवण मॅझयासाठी त्यादिवशी बनवायच्या भानगडीत पडलं तर माझा ठाम विरोध असतो, आणि मी स्वत:पण त्या दिवशी काही स्पेशल बनवायच्या विचारात नसते. बाकी घरातील सगळयांचे वाढदिवस मी प्लान करते, काहीतरी सरप्राइज़ असतं, काहीतरी त्यांच्या आवडीचे जेवण बनवते. इतर कोणाचा वाढदिवस असेल तर(लक्षात असेल तर) फोन करते गप्पा होतात. पण माझा वाढदिवस असेल तर मात्र यातलं काहीच मला नकोसं होतं. गप्प बसून असावे, फारसं काही बोलू नये, एखादं आवडीचं पुस्तक हाती असावं, आवडीचं संगीत हळूवार गुंजत असावं, साधसं काही जेवण असावं बस...अजून काही नको.

काही वर्षांपूर्वी मी माझी सोशल नेटवर्किंग प्रोफाइल डेलीट केले होते. त्यामुळे या दिवशी येणार्‍या फोन मधे निम्म्याने घट झाली, आणि मला हुश्श झाले. बाकी इतर वेळी मी इतकी गप्पिष्ट आहे पण या दिवसाच्या अवघडलेपणा मी काही कमी करू शकले नाहीये. तो एक दिवस कॅलेंडर वरून डिलीट व्हावा.


Tuesday, October 18, 2011

सुनीताबाईं

आठवतं ते अनेक वर्षांपूर्वी जेंव्हा सुनीताबाईंचं " आहे मनोहर तरी" पुस्तक नुकतच प्रकाशित झालं होतं, कॉलेज च्या मासिकात त्यावर मी एक लेख लिहिलेला होता...तो आता नीट आठवत नाही. पण तेंव्हापासून त्या मझयासाठी मॉडेल बनल्या मॅझयाही नकळत. आज पुन्हा एकदा ते पुस्तक पुन:प्रत्यायचा आनंद तर देतच पण अनेक त्यांच्या आचार-विचारांच्या पाऊलखूणा मी मझयात पाहू शकते अगदी त्यांच्या आईच्या देखील.



"आहे मनोहर तरी गमते उदास" अशी मनाची स्थिती अनेकदा होते, अनेकदा माझी मी नसतेच अशी अवस्था, कोणी आसपास असू नये, कोणी बोलू नये, डिस्टर्ब करू नये, फक्त स्वत:चाच स्वत:शी संवाद चालू राहावा...वेगवेगळे आठवणींचे पक्षी सतत मनात पिंगा घालत असतात, कधी हवेसे, तर कधी नकोशा आठवणी. जगापासून तुटक राहायला मनापासून कधी कधी आवडत्न मला. तसाच जीवन मूल्य जपायला. याच धारेत मी जगापासून दुरावते...पण त्याचीही खंत फारशी वाटत नाही मला.

नाती निभावणे तसं सोपं कधीच नसतं आणि त्या व्यक्तींसाठी ज्या सूक्ष्म विचार करून प्रत्येक गोष्ट करतात त्यांच्याकरिता तर ती एक तारेवरची कसरत बनून राहते. पु. ल. सारख्या व्यक्तीची सहचरि बनणं हे तर नक्कीच साधा सुधं काम नव्हतं.अनेक रोष पत्करून त्यानी ते निभावलं. आपल्याच जवळच्या व्यक्तींकडे इतकं तटस्थपणे पाहणं, त्यांच्या गुण-दोषांसह त्याना स्वीकारणं आणि असं करताना आपल्यातलं वेगळेपण तरीही जपणे. अजून एक गोष्ट त्या काळातच परिणाम करून गेलेली होती ती म्हणजे आयुष्यावर ठसा उमटवणार्यांच्या बद्दल ऋण व्यक्त करण्याची त्यांची सवय.... नेमक्या व्यक्त केलेल्या त्यांच्या भावना, उगीच कोणताही खोटा मुलामा न चढवता......बोरकर, जी. ए., आई, आप्पा, सासूबाई, अगदी भाई सुद्धा सुटले नाहीत यातून. सोप्या नसतात या गोष्टी. ह्या खूप भावतात मला. आयुष्यात भेटलेल्या आणि न भेटलेल्या अनेक व्यक्ती कळतनकळत तुम्हाला घडवतात. सुनीताबाईंचा वाटा त्यात थोडा जास्तच.



"संधिप्रकाशात अजून हे सोने, तो माझी लोचने मिटो यावी" ही सुनीताबाईंच्या आवडत्या बोरकरांची कविता तर पु. लं च्या ओठी नसेल ना?

Tuesday, August 30, 2011

उगाच काय ग छोट्या-मोठ्या गोष्टींवरून इतके वाद?


संदीप खरे माझा अजून एक खूप आवडता कवी. त्याचा माझयाकडून असा एकेरीत उल्लेख ऐकला की माझा एक मित्र मला चिडवतो "संदीप अगदी आपल्या घरचाच आहे नाही?" साध्या सोप्या शब्दात तुमच्या भावना तुमच्या पर्यंत तोच पोहचावतो. तुम्ही जगलेले क्षण तो तुमच्यासमोर असे काही उभे करतो आणि तुम्ही विचार करत राहता "अरे, हे तर माझेच अनुभव, अगदी अचूक कसे याने शब्दात पकडलेले?" खरच बाप माणूस आहे तो.


मला कधीतरी कविता जन्माला येते ती कशी हे खूप जवळून अनुभवायचं आहे. माझया विश-लिस्ट वर एक गमतीशीर गोष्ट आहे. देवा पुढचा जन्म माणसाचा असेल तर या माणसा सोबत तो असू देत...कोणत्याही नात्याने चालेल...........त्याची सर्वात जवळची मैत्रीण असो, त्याची बायको म्हणून असो, बहीण म्हणून असो अगदी त्याची मुलगी म्हणून सुद्धा चालेल. त्याच्या कविता त्याच्याच शब्दात ऐकणे हा तर एक सुरेख अनुभव असतो. असं वाटतं की लय या कवितेतच आहे, संगीतकाराला फारसे कष्ट त्यावर घ्यावे लागत नसतील.


मी मला खूप नशीबवान समजते की अशा मातीत मी जन्माला आले.....की जिथे कला, साहित्य. संस्कृती यांचा उत्तम संगम आहे. खूप मोठा वारसा आपल्यापाशी आहे. किशोरी ताइंचं, जसराजांचं गाणं, गुरुदत्त वहिदा यांचा अभिनय, रेहमान, पंचम, सलील चौधरी असे एक से एक सरस संगीतकार, गुलजार ते तर चिरतरुण आहेत. बा. भ. बोरकर,शांताबाई, कुसुमाग्रज,सुरेश भट असे अनेक कविवर्य, लता,आशा, रफी यांचे गुंजणारे सूर, कुमार गंधर्वांचे निर्गुनि भजन गाताना लागलेला सूर..........प्रत्येक गोष्टीने भारून गेलीये मी. या पैकी अनेकाना मी कधी प्रत्यक्ष पहिलं किंवा प्रत्यक्ष ऐकलेले नाही तरीही....


तोच वसा मला माझया पिढीत काहीजण चालवताना दिसतात जसं की राहुल देशपांडे, संजीव अभ्यंकर, संजीव चिमलगी, वैभव जोशी, सलील कुलकर्णी आणि संदीप. त्याचीच एक अत्यंत अर्थवाही आणि प्रवाही देखील कविता...................


उगाच काय ग छोट्या-मोठ्या गोष्टींवरून इतके वाद?
उगाच काय माझ्यासकट जगण्याचाही सोडतेस नाद?


मी, तू, जगणे, पृथ्वी कुणीच इतके वाईट नाही
अधीरपणावाचून इथे दुसरे कोणी घाईत नाही


अगं विरस व्हावा इतके काही उडाले नाहीत इथले रंग
स्पेशल इफेक्टशिवायसुद्धा शहारून येऊ शकते अंग


अजून आहे आकाश निळे, अजून गुलाब नाजूक आहेत
अजून तरी दाही दिशा आपल्या आपल्या जागी आहेत


पैसे भरल्यावाचून अजून डोळा तारे दिसत आहेत
झाडांच्याही सावल्या अजून विनामूल्य पडत आहेत


अजूनतरी कर नाही आपले आपण गाण्यावर
सा अजून सा च आहे , रे तसाच रिषभावर


अजून देठी तुटले फूल खाली पडते जमिनीवर
छाया पडता पायाखाली, सूर्य असतो डोईवर


स्पॉन्सर केल्यावाचून अजून चंद्र घाली चांदडभूल
अजून कुठल्या वचनाशिवाय कळी उमलून होते फूल


सागर अजून गणती वाचून लाटेमागून सोडी लाट
अजून तरी कुठलीच जकात घेत नाही पाउलवाट


थंडी अजून थंडी आहे, ऊन आहे अजून ऊन
पाउस पडता अजूनसुद्धा माती हसते आनंदून


काही काही बदलत नाही…. त्वेषाने वा प्रेमाने
जन्मानंतर अजून तसेच मरण येते इमाने


आकाशाचे देणे काही आज उद्यात फिटत नाही
आणि इतक्या लवकर होईल प्रलय असे काही वाटत नाही

Friday, June 24, 2011

I wish to say thank you to my friend

अनेकदा आपल्या आयुष्यात माणसं का आणि कशी येतात आणि आपण त्यांच्या रंगात कधी आणि कसं रंगून जातो तेच कळत नाहीवेगवेगळ्या व्यक्ती त्यांच्या परीनेआपले आयुष्य घडवत असतातअनेकदा मी विचार करते की कितीतरी लोकांचा असा ठसा माझया आयुष्यावर आहे.अनेक नात्यांशीवाय मी अपूर्ण आहेअनेकव्यक्तींशीवाय माझया आयुष्याला काही अर्थ नाही.    

तरीही नात्यांची गुंतागुंत ही होतेचएक अधिक एक दोन असं नेहमीच घडत नाहीकाही असच घडलं होतं माझयाबाबतीतहरवून बसले होते मी नात्यांचे अर्थ . अनेकगोष्टी अकारण वाटू लागल्या होत्या मला. "लाइफ ईज़ ब्यूटिफुलहे स्वत:चे वाक्य मी विसरले होतेआयुष्यातून रस हरवणे म्हणजे या पेक्षा वेगळं काही नाही.

आजकाल कोणतीही नवीन ओळख होताना मला पहिला प्रश्न पडत होता तो "काकशालानकोच ना पुन्हा सारं तेच". जवळपास मी टाळतच होते नवीन माणसं आणिनवीन ओळखी

तरीही तू अवचित येणार्या पावसासारखा आलास.... तुझया मैत्रीच्या वर्षावाने चिंब भिजून पुन्हा बहरून आलेतू पुन्हा एकदा मला हसायला शिकवलेसपुन्हा एकदानात्यांचे अर्थ नव्याने तपासून पाहायला लावलेसपुन्हा एकदा आयुष्याकडे पाहण्याची नवीन दृष्टी दिलीस.... कदाचित हे सारं तुझया नकळत घडलं असेल.

मैत्री वेगळी काय असते...एकमेकांच्या साथीने एकमेकाना समृद्ध करणं हीच तर मैत्रीआयुष्यातली सर्वात सुंदर गोष्टकदाचित प्रेमाचा बहर उतरत असेल काही काळानंतरप्रेमाचे रंग बदलत असतीलकदाचित फिकेही होत असतील.......पण मैत्रीचं तसं नाहीएकमेकान सोबत नसताही आपण सोबतच असतोअनेकदा शब्दांविनाही मनं ओळखता येतातकोणीतरी आपलं ही भावनाचं मोठी सुखवणारी असते अन् तरीही प्रेमातली बंधिलकी नसतेआज पुन्हा एकदा नव्याने आयुष्याकडेवेगळ्या नजरेने पुन्हा पाहता येताय मला ते फक्त तुझयामुळे!!!