Tuesday, April 11, 2017

असा सुगंध, असे तुझे फुलणे...वेड लागेल नाहीतर काय.......

काही वृक्ष सदोदित तुमची सोबत करतात ... तुम्ही कुठेही जा ते सोबत असतातच. हे फक्त तुम्हाला माहित असायला हवे.   प्रत्येक नव्या ठिकाणी त्यांना शोधणे तुम्हाला जमायला हवे. माझ्याबाबतीत कदंब, पिंपळ, गुलमोहर, सोनचाफा, सप्तपर्णी आणि बहावा हे असे काही वृक्ष. कुठूनतरी आसपास मला ते सापडतातच. येता जाता ध्यास लागल्यासारखे माझे या साऱ्या झाडांबद्दल होते. नव्या ठिकाणी मी त्यांचा मनोमन शोध घेत राहते.

सप्तपर्णी किंवा रामप्यारी .... दिवाळीच्या सुमारास हलकेसे थंडीचे आगमन होता होता सप्तपर्णीने गंधाळून टाकावे आणि त्यास भुलल्यासारखे मी हे झाड़ आसपास कुठे आहे त्याचा शोध घ्यावा. हलकी थंडी, आणि वेखंडासारखा थोडा उग्र, उष्ण आणि तरीही हवाहवासा गंध. प्रत्येक संध्याकाळ ही सुगंधयात्रा  होऊन जावी.  प्रथम ओळख झाली तेंव्हा फेसबुक च्या माध्यमातून माहिती मिळवली. अभिनव फडके यांनी याचे मी केलेल्या वर्णनावरून याचे नाव सांगितले. मग या रामप्यारीचे वेड ही दरवर्षीची गोष्ट झाली.  यावर्षी सप्तपर्णीचा शोध घ्यावा नाही लागणार कारण ते झाड माझ्या आणि शेजारच्या इमारतीतच सापडले आहे. ते दिसल्यावर एखादा ठेवा आपल्या जवळ असल्याचा भास झाला मला.






पिंपळ .....  सर्वसाधारण हा आपल्या आसपास असतोच ना . मोहात काय पाडते तर यांच्या पालवी पासून पूर्ण मोठे पान होईपर्यंत दिसणाऱ्या असंख्य रंगछटा. कोवळी असतानाची तांबूस छटा घेऊन आलेली आणि नंतर पोपटी हिरव्याच्या काही छटा घेत मग पूर्ण पानात रूपांतर होणारे हे झाड. याची सळसळ नजरेला आणि कानांना सुखावणारी. याची पानाची बनणारी जाळी विलक्षण देखणी. तुमच्या आमच्यासाठी हा पिंपळ .... अगदी १२ पिंपळावरचा मुंजा अशी कोणाला उपाधी मिळवून देणारा ... पण तोच पिंपळ गौतम बुद्ध त्याखाली बसून ज्ञानप्राप्त करून घेताच बोधिवृक्ष ठरतो.

कदंब.......  तो कसा असतो, कसा दिसतो, कोणते वैभव घेऊन तो लगडतो ह्याची मला काहीच कल्पनाच नव्हती. म्हणे प्रत्येकाच्या पत्रिकेत एक आराध्य वृक्ष लिहिलेला असतो ... माझ्यासाठी तो कदंब लिहिलेला होता आणि मला त्याबद्दल माहिती नव्हती. "कदंब तरूला बांधून झोके" अशा गाण्याच्या ओळी ऐकल्या होत्या. भगवान श्रीकृष्णाला प्रिय असे हे झाड शोधावे कुठे हा प्रश्न! पाच वर्षांपूर्वी सध्याच्या ऑफिस मध्ये आले साधारण सप्टेंबरमध्ये तेंव्हा चहूकडे थोडी लांब रुंद पाने असलेल्या मोठ्याशा झाडांवर हे चेंडू लटकलेले पहिले, आणि गूगल वर  शोध घेतला तर हा कदंब हे कळले. ऑफिसमध्ये आणि ऑफिस च्या रस्त्यावर दुतर्फा ही झाडे आहेत. तसा हा सदाहरीत वृक्ष पण साधारण जुलै ऑगस्ट मध्ये हे बहरलेले झाड इतके देखणे दिसते की पहाताच राहावे. एकदा त्याची ओळख झाली, वाढली  की मग पुन्हा पुन्हा भेट होणे हे ओघाने आलेच नाही का? मग पुढे आमची भेट एका पेट्रोल पंपाच्या बाहेर होऊ लागली आणि मग ते अजून एक आमच्या भेटीचे ठिकाण झाले. गाडीत पेट्रोल भरण्यासाठी हाच पंप हे आपोआपच ठरून!


बहावा .... सोनालू असे बंगाली भाषेतले गोड नाव असणारा आणि अमलताश असे हिंदी मधील भारदस्त नाव असणारा हा वृक्ष! मराठीतच असे रुक्ष नाव त्याला कोणी का बरे दिले असावे? "बहकवा" पण चालले असते ना कदाचित! त्यापेक्षा नेपाळी भाषेत राजवृक्ष असे उचित नाव आहे याचे.  गेली अनेक वर्षे माझ्या घराजवळच्या इमारतीत फुलत असे. जाता येता त्यास पाहणे हा नितांत सुंदर अनुभव असे. पहिला फुलांचा घोस लगडल्या पासून ते त्याचे अंगोपांगी बहरून येणे. हलकेच वाऱ्याने त्याचे फुलांचे लोलक झुलत राहणे, सकाळ संध्याकाळच्या प्रकाशात या झाडातून पाझरणारा विलक्षण देखणा सोनेरी प्रकाश ... मनभर आनंद भरून राहणारा. हळूहळू  रोज त्याचा पडणारा सडा पाकळ्यांसोबत त्याच्या बिखरून सर्वत्र पडलेल्या बिंदल्या.
असे म्हणतात बहावा फुलल्यानंतर साधारण ४५ दिवसांनी पहिला पाऊस येतो, दरवर्षी ठरवते हे खरे आहे का तपासून बघायचे. पण दरवर्षी काही कारणाने एक दोन चार  दिवस बहाव्याकडे लक्ष जात नाही .... आणि जेव्हा जाते तेंव्हा तो इतका फुलून गेलेला असतो कि मी हळहळते. पहिला अंकुर, पहिले कळीचे अस्तित्त्व, देठातून उमलू पाहणारे कोवळ्या पानाची चाहूल हे सारे बघणे विलोभनीय असते नुकत्याच जन्मलेल्या बाळाइतके. तसा निष्पर्ण बहाव्याला लगडलेला पहिला सोन्याचा घोस! निसर्गातले वैभव असेच केवळ त्याचे वर्णन होऊ शकते. यावर्षी ऑफिस मध्ये बहावा फुलला आहे .... पण घराजवळ त्याचे दर्शन घडेना. अजून नव्या परिसराशी म्हणावी तितकी ओळख झालेली नाहीये. दर वीकांतास नव्या वाटा धुंडाळणे चालू आहे. परवा अचानक एक नवा रस्ता चालण्यासाठी घेतला एका इमारतीच्या आत हा फुललेला दिसला. खालून अर्धा पिवळ्याधम्मक घोसांनी लगडलेला आणि वर पालवीचा कोवळा हिरवा मुकुट ल्यालेला. आपला आनंदठेवा असा आपल्यापासून दूर नाही जाऊ शकत याची मनोमन खात्री पटवून देणारा क्षण तो हाच.



गुलमोहर ..... शाळेत लाल रंगाचा गुलमोहर होता. खूप मोठा डेरेदार. त्याच्या कडेने बांधलेला दगडी पार आणि दोन्ही बाजूस असणारा लांबच लांब कट्टा. एकदा फुलला की पडणारा लाल सडा. पाकळ्यांची एक विशिष्ट रचना, कधी त्यात दिसणाऱ्या छटा , थोडे जाड देठ. शाळेत दोन मुलींचे प्रकार असावेत या झाडामुळे पडलेले. एक फुले वेचणाऱ्या नाजुका आणि नंतर त्याच्या शेंगांच्या रूपात तलवारी जवळ करणाऱ्या झाशीच्या राण्या!शाळा संपायला एक दोन वर्षे शिल्लक असताना अजून एक इमारत बांधण्यासाठी हा गुलमोहर तोडला. तेंव्हा वाईट वाटले असेल त्याहून अधिक वाईट आता तो तोडला याचे वाटत राहते. याच्याच जातकुळीतला अजून एक वृक्ष म्हणजे नीलमोहर... सहज सापडत नाही पण जर दिसतो तेंव्हा मोहवतो हे नक्की. पण गुलमोहर तो गुलमोहरच !



सोनचाफा ....  प्रेम आहे माझं..... फिदा आहे मी.... या फुलांवर. त्याच्या रूपावर गंधावर! आधी अनेकदा ते विविध रूपात व्यक्त ही करून झालंय. पण म्हणून प्रेम कमी थोडीच होतं? उलट वाढतं  ... माझ्या घरी होता, माझ्या घराच्या रस्त्यावर कोणकोणत्या घरासमोर आहे हे मला ठाऊक होते. त्या त्या रस्त्यावरून जाताना झाडावर एक तरी फुल दिसले तर पुढे दिवस छान जाणार अशी अंधश्रद्धा सुद्धा अनेक वर्ष मनात होती. कोणी ओंजळभर फुले समोर धरली तर मी कोणाला काय वाटेल याचा विचार न करता ती सारी फुले स्वतःच्या ओंजळीत घेईन हे नक्की. "लालच बुरी चीज हैं .... "असे मनातही नाही येणार माझ्या.
माझा एक मित्र ज्याला बागकाम करायला वेळ आणि जागा हे दोन्ही सध्या उपलब्ध आहे तो त्याच्या घरी आलेल्या फुलांचे फोटो पाठवून पाठवून मला माझ्या घरी काय नाहीये याची जाणिव करून देत राहतो. येईल पुन्हा या पावसाळ्यात सोनचाफा माझ्याही घरी येईल. तूर्तास तरी याचे दर्शन दुर्मिळ झालंय मला. विरहाने प्रेम वाढते म्हणतात ना? तसेच काहीसे घडेल सोनचाफ्याबाबत आता !




बकुळ.... पूर्वी शनिवारवाड्यात आणि संभाजी उद्यानात बकुळीची अनेक झाडे होती. लहानपणी पुण्यात सुट्टीत सकाळी शनिवारवाड्यापर्यंत जायचे आणि खूप सारी फुले गोळा करून त्याचे सर करायचे हा उद्योग असे. नाजूक पण देखणे पण थोडा उग्र गंध असणारे हे फुल. कागडा , मोगरा याप्रमाणे बकुळीचेही गजरे त्याकाळी विकत मिळत. आजकाल स्त्रियांनी गजरे केसात माळणे हेच लग्नकार्यापुरते मर्यादित होऊन बसले... आपल्या प्रियेसाठी गजरा आणणारा हा कथा कादंबऱ्या नाहीतरी सिनेमातूनच दिसू लागला.
मधली अनेक वर्ष हा बकुळ जणू विस्मृतीचा भाग झाला होता. एका अनवट वाटेवर अचानक त्याच्याशी भेट झाली आणि जणू तो बकुळीच्या फुलांचा सडा माझ्या मनाच्या अंगणात पडला ...  त्या बकुळीच्या सड्याने मला जन्मभराचा सुखाचा ठेवा बहाल केला.


अजून एक कणाकणातून फुललेला वृक्ष जो बेंगलोर मध्ये भेटला होता. गुलाबी रंगाची एक सुंदरशी फुलांची छटा. टिश्यू पेपर प्रमाणे पोत असलेले, वॅनिलाच्या जवळ जाणारा गंध होता त्याचा. नोव्हेंबर महिन्यात जागोजागी ही झाडे बहरली होती. इतका देखणं रूपडे होते त्याचे की पुढे अनेक महिने मी त्यास फेसबुकवर मिरवले होते. आजही माझ्या लॅपटॉपवर तोच आहे. अतिशय देखणी व्यक्ती दिसावी पण ओळखच होऊ नये आणि मधूनच कधीतरी ती आठवण वर यावी अशी काहीशी ही गोष्ट!

                                         असा सुगंध, असे तुझे फुलणे...वेड लागेल नाहीतर काय.......

तशी काही झाडे नित्याने तुमच्या आसपास सभोवती आढळतात... केळी, नारळ, लिंबू, जास्वंद अबोली गुलाब, प्राजक्त, कुंद, तुळस .... पण ती मोह घालत नाहीत मला, कुठूनतरी मला साद घालत नाहीत. त्याचे सभोवती  नसणे याचा मला फारसा फरक पडत नाही, असली दिसली तर छान वाटते हे खरे.  पण ही काही झाडे जिथेजिथे मी असते तिथे तिथे असतातच, दिसली नाहीत तर मी त्यांचा शोध घेते तेंव्हा कुठे शांत होते. ही झाडे माझ्या सोबत असतातच, माझे सखे सोबती आहेत हे सारे !