Showing posts with label खुपते काहीतरी. Show all posts
Showing posts with label खुपते काहीतरी. Show all posts

Wednesday, May 29, 2013

स्वच्छतेचे धडे … कोण शिकणार कोण शिकवणार?


फ्रेशरूम मधील डस्टबीन जे नेहमी  पायाने उघडले जाते, त्याच्यात बिघाड आहे, आता ते पायाने उघडत नाही, तर तुम्ही त्यात वापरलेले  टिश्यू पेपर कसे टाकाल?  उत्तरे - 
-हाताने डस्ट बीन चे झाकण हाताने उघडून 
-डस्टबीन च्या बाहेर कुठेही 
-आता डस्टबीन उघडतच नाही पायाने, तर टाकून देऊ  वाशबेसिन मध्ये 
-फ्रेश रूम स्वछ ठेवणे ही आपली जबाबदारी नाही, त्यामुळे काहीही करा 

हा न एका अभ्यासक्रमातला प्रश्न असायला हवा, आणि हा एकच प्रश्न नाही तर यासारखे असे अनेक …. आणि बालभारती किंवा सामान्य विज्ञान हे विषय शिकावायच्याही आधी हा विषय सर्व लहान मुला मुलींकडून घोटून घ्यावयास हवा. वर वर्णन केलेले उदाहरण गेले काही दिवस मी रोज पाहते आहे. शेवटी परवा एका मुलीला जी असेच टिश्यू पेपर जमिनीवर टाकून चालली होती तिला मी टोकले, पण मला माहित आहे असे वागणारी ती एकटी नाही. आसपास नुसते साक्षर भरलेत, सुशिक्षित कमीच. 

पाण्याचा वाहता नळ व्यवस्थित बंद करण्याचे कष्ट न घेणे, वाटेल तसे आणि वाटेल तितके टिश्यू पेपर वापरणे, अनेकींच्या पर्स मध्ये रुमाल वगैरे काहीच नसावे? बेसिन जवळ उभे राहून, केस सारखे करतांना, गळलेले केस तसेच सोडून जावे …. अशा एक न दोन अनेक गोष्टी. एका वाक्यात सांगायचे झाले तर "Toilet Etiquettes" शिकवलेलेच नाहीत यांना कोणी. बर पूर्वी कोणी शिकवले नाहीत तर आता समाजात वावरताना काही बघून, समजून घेवून काही चार चांगल्या गोष्टी शिकाल की नाही? अनेकदा मला या लोकांना एक प्रश्न विचारावा वाटतो "तुम्ही तुमच्या घरी असेच वागता का?" या प्रश्नांचे उत्तर जर हो असे असेल तर मग मात्र कठीण आहे. मग मात्र वयाच्या ३/४ वर्षीच एका अशा सक्तीच्या अभ्यासक्रमाची गरज आहे, जो पूर्ण केल्याखेरीज कोणत्याही शाळेत प्रवेश मिळणार नाही. 

मध्ये एक दिवस रात्री उशिरापर्यंत ऑफिस मधे होते, फ्रेश रूम मध्ये शिरले आणि तशीच उलट्या पावली परत फिरले कारण कोणाच्या तरी उलटी ने भरलेले वाशबेसीन तसेच होते. एवढेच नव्हे तर त्याचा दर्प तेथे भरून राहिला होता, अजून २ सेकंदभर तेथे असते तर मलाच मळ्मळायला लागले असते. हे लिहिताना सुद्धा मला इतकी किळस वाटते आहे, तर जिला कोणाला हे साफ करावे लागले तिचे काय? ते बेसिन तसेच सोडून जाताना त्या मुलीला/स्त्रीला काहीच कसे वाटले नाही? पण हे कोणी लक्षातच घेत नाही. 

अशा ठिकाणी स्वच्छतेसाठी अनेक स्त्रिया काम करत असतात, पण त्याही माणूसच आहेत ना? का नाही आपण माणसांना माणसांप्रमाणे योग्य त्या मानाने वागवू शकत? का असे सर्वत्र पडलेले टिश्यू, केस त्या स्त्रियांनी गोळा करून डस्टबीन मध्ये टाकायचे? का अशा रितीने खराब केलेले बेसिन कोणी दुसरीने स्वछ करायचे? मला बाकी इंडस्ट्री जसे की मन्युफ़्रक्चरिङ्ग किंवा बँकिंग या बद्दल फार माहित नाही, पण माझ्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्या जणी किमान कॉम्प्युटर ग्राज्युएट किंवा  इंजिनीअर असतात ना? मग तरीही असे ? पुस्तकी शिक्षण आपल्याला योग्य तऱ्हेने जर जगायला शिकवणार नसेल तर मग काय उपयोग? अनेकदा आपण समाजाच्या निम्न स्तरातील अस्वच्छता या बद्दल तावातावाने बोलतो, अशा लोकांमुळे आपले शहर किती बकाल होत चालले आहे यावर बऱ्याचदा आपले एकमत असते, पण आपल्यातल्याच या लोकांचे काय करायचे?

एक स्त्री म्हणून मी या गोष्टी वारंवार पहाते, म्हणून त्याच सांगू शकते, पण याचा अर्थ बाकी सर्वत्र सर्व ठीक आहे असे नाही … कारण तसे असते तर अनेक वर्षांपूर्वी Infosys च्या एका induction मध्ये तेंव्हाचा FLM राहुल देव ला, नवीन joinees ना "don't spit out chewing gums in urinals, as it gets sticked there and a person cleaning it, needs to remove it with his hands, please try to respect those people who keep this World class campus beautiful"  असे सांगावे लागले होते यातच सर्व काही आले नाही?

Saturday, August 18, 2012

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे .......पण लक्षात कोण घेतो?

Technology चा प्रसार थोड्या धीम्या गतीने झाला असता तर किती बरं झालं असतं,  असे अनेकदा माझ्या मनात येते. या विचार रुजला एक दोन वर्षापूर्वी. तेंव्हा मी सकाळी लवकर ऑफिसला जात असे. इन्फिची बस घराजवळच काही अंतरावरून मी पकडत असे. रोज रस्त्यात एका दुकानाबाहेर एक स्त्री बसलेली दिसे. तशी टापटीप असे, जरा बरी साडी, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या, पायात पैजण, चेहराही बरा नटवलेला आणि हातात कानाशी धरलेला मोबाईल. एक दिवस असा गेला नाही की मी तिला तिथे बसून फोनवर बोलताना पहिले नाही. अनेकदा मनात प्रश्न पडे ही बाई अशी का इथे बसून फोनवर बोलते? तिला जावून विचारावं असंही मनात अनेकदा आला. पण मीच इतकी घाईत असे. एक दिवस चुकून लवकर घराबाहेर पडले, आणि सावकाश चालत राहिले. दुरूनच ती दिसली. लांबवरून तिचे निरीक्षण मी सुरु केले. तिचा फोन कानाला लावून बोलणे चालूच होते. मग माझे लक्ष तिच्या बाजूला असलेल्या खराट्या कडे गेले. आणि लक्षात आले, ही कॉलनीत झाडू मारते. पहिला विचार आला " सारा वेळ  रोज इथे बसून बोलते, तर काम कधी करते? दुसरा की या कामात कमावते किती आणि गमावते किती फोनवर बोलण्यात?" त्याच वेळी माझी कंपनी  दरमहिन्याला ७५० रु. पर्यंतचे  माझे मोबाईल बिल भरत असे. ऑफिसचे आणि पर्सनल असे दोन्ही फोनचे माझे बिल 3०० पेक्षा जास्त कधी होत नसे. म्हणजे बघा एकीला परवडू शकते, पण ती या गोष्टींवर पैसा खर्च करत नाहीये, किंवा त्यासाठी तिच्याकडे वेळच नाहीय,  दुसरीची कदाचित खायची प्यायची चिंता मिटत नसेल, पण असे खर्च चालूच.  मला तिला खूप मनापासून असं सांगण्याची इच्छा होती " बाई, आजचा वेळ आणि पैसा असा वाया घालवू नको, पोटापुरत  कमवत जरी असलीस, तरी, गाठीशी थोडा वेळ असेल तर  थोडं  अजून  शिक काही, ज्याचा काही उपयोग होईल. कशाला इथे बसून अशा गप्पा मारत, मोबाईल कंपन्याची धन करतेस?"  पण धीर नाही झाला. न जाणो त्या न वापरत्या खराट्याचा वापर केलान असता!

मधे घरी येणाऱ्या केर-फरशी करणाऱ्या बाई सकाळी लवकर माझ्या वेळात घरी आल्या. काम माझ्याकडे असे होते की त्यांना ३००० रु हवे होते. त्या गेली जवळपास १० वर्षे माझ्याकडे काम करतात, त्यामुळे मी देणार नाही असा प्रश्न नव्हता. पण मी कारण विचारलेच. उत्तर आले " लेकाला नवा मोबाईल हवा आहे, रोज तो डोकं खातो माझं, आज तोच येणार होतात, पण मीच म्हटलं " तू नको येवू, मी विचारते ताईना" माझा पुढचा प्रश्न " काय करतो तो आता, आजकाल पेपर टाकायला येत नाही तो?" उत्तर " ते काम आवडत नाही त्यास, सकाळी फार लवकर उठावं लागतं ना, मग आता जातो एका दुकानात कामाला" 
"३००० चा मोबाईल हवाय त्याला ? एखादा साधा घेवून नाही का काम भागणार? तुम्ही सकाळी १० ते रात्री आठ घरोघरी जावून कामे करता ते काय अशा गोष्टींवर उडवण्यासाठी?"
"ताई, तो ५००० मागत होता, पण मी म्हटलं ३००० पेक्षा जास्त देणार नाही" 
त्यांना माझा फोन दाखवला आणि म्हटलं " हा ४५०० रु चा आहे, आणि गेली ४ वर्षे मी तो वापरतीये. "माहित होतं मला पुत्र प्रेमापोटी बाकी काही त्यांच्या डोक्यात शिरणार नव्हते ते. दिले पैसे. 

गेली दोनवर्षे  मी माझा असा फोन वापरतीये जो एकदा गाडी चालवताना मांडीवर ठेवला होता, मधेच तो खाली पडला, थांबल्यावर उचलू म्हणून मी लक्ष दिले नाही, तो जरा जास्तच पुढे पडला, आणि ब्रेक खाली आला. पण फोनला काही झाले नाही, एक चीर जाऊनही तो चालतो आहे, मी पण तो अजून तसाच वापरते आहे. कसं ना या गोष्टी इतक्या स्वस्त झाल्या नसत्या, आणि नको त्या वर्गाने त्यावर अनाठायी पैसे उडवले नसते. घरी धड खायला नसे ना का, की राहायला धड घर, पण घरात, टी. व्ही. केबल, हातात मोबाईल, चालवायला बाईक.....पण डोक्यात प्रकाश पडेल तर ? 

मी कॉलेज मधे असताना एक सौ. संध्या वर्तक नावाच्या प्रोफेसर उत्तम  इकॉनॉमिक्स, बँकिंग आणि फायनान्स शिकवायच्या, त्या " How rich become richer and poor poorer" हे स्पष्ट करून सांगताना नेहमी  एक उदाहरण द्यायच्या, तेंव्हा त्या म्हणायच्या " मध्यम वर्गात नेहमी एक प्रकारची इर्षा जागृत असते, दुसरयाचे अनुकरण, किंबहुना आपल्यापेक्षा वरच्या वर्गाचे अनुकरण करण्यात त्यास धन्यता वाटते. आपला शेजारी कोणती दुचाकी वापरतो, शेजारीण कशा साड्या, कसे दागिने वापरते या गोष्टींकडे त्याचे लक्ष असते.  त्यामुळे त्यांचे जास्तीत जास्त रेसोर्सेस अशा रीतीने खर्ची पडतात.  तोच एखादा उद्योजक असेल तर त्याला अशा गोष्टीनी काही फरक पडत नाही. त्याला सर्वात महत्वाचे असते ते योग्य प्रकारे पैसा आपल्या धंद्यात गुंतणे. पुढे त्या असे म्हणत,"उगीच नाही कंपन्या आपल्या उत्पादनांच्या जाहिराती "neighbor's envy, owner's pride " या शब्दात करत. हीच गोष्ट हेरलीये, बँकांनी, तुम्ही कार घ्यायला कर्ज मागा, तुमच्या घरी येवून देतील, पण एखाद्या उद्योगासाठी कर्ज मागायला जा, १०० खेटे मारायला लावतील." बघा हे १७ वर्षान पूर्वीचे उदाहरण आज ही लागू पडते, फक्त त्यातले वर्ग बदलले आहेत कदाचित. 

Monday, July 16, 2012

आता कुठून रे बाबा, यांना add करू?

अनेकदा तुमच्या ओळखीची, शेजारची, नात्यातली सगळीच मंडळी काही तुमच्या फेसबुकात फ्रेंड्स-लिस्ट मध्ये नसतात. कधी कधी तुम्हाला कल्पना पण नसते ही व्यक्ती फेस बुकवर आहे ते. सध्या काही दिवस मी अनुभवलेली गोष्ट- अशांपैकीच एखाद्या व्यक्तीचे निधन होते. मध्ये बरेच दिवस जातात. आणि काही दिवसांनी थोपू तुम्हाला "People You may Know - add friend " असं म्हणत त्यांचा प्रोफाईल दाखवत राहते. मी मनात म्हणते " आता कुठून रे बाबा,  यांना  add करू? नाही रे माझी रिक्वेस्ट त्यांच्या पर्यंत पोहोचणार, आता फार उशीर झालाय"

माझ्या लांबच्या नात्यातल्या एका हुशार काकांनी वर्षभरापूर्वी या जगाला कायमचं अलविदा म्हटलं. ते फेस-बुकवर असू शकतील असे मला कधी वाटलेच नाही. मुळात मी स्वत: फेस- बुक वर जेमतेम १०/११ महिन्यांपूर्वी दाखल झाले. आणि आता थोपू मला सतत यांचा असा रेफरन्स देत राहते. 
माझ्या एका कॉलेज मधल्या मैत्रिणीचा नवरा नुकताच एका भीषण अपघातात बळी गेला, ते ही प्रोफाईल मला अशाच रीतीने दाखवले जाते आहे. त्याच्या प्रोफाईल वरील त्या कुटुंबाचा हसरा एकत्र फोटो, आता मात्र मनाला वेदना देतो.

प्रत्येक वेळी खूप वाईट वाटते. जवळपास १०० पैकी ९९ केसेस मध्ये त्यांच्या जवळच्या कोणापाशी त्यांचे अकौंट डीटेल्स असण्याची शक्यता नसते. काय करता येईल? काही तरी यावर उपाय शोधावा लागेल......

Tuesday, June 12, 2012

सोनार की चोर????

सोन्याचांदीचे व्यापारी म्हणजे पक्के चोर अशी माझी ठाम समजूत आजकाल व्हायला लागली आहे. एका सोनाराकाडील सोने दुसऱ्याच्या दृष्टीने कधीच चोख सोने नसते. जुना दागिना घेवून नवीन काही घडवायला जावे तर जे काही अनुभव येतात की विचारू नका. असाच एक नुकताच घडलेला किस्सा-



रोज वापरायचे एक मंगळसूत्र. दोनतीन वेळा त्याची तार तुटली म्हणून दुरुस्त करून वापरत होते. परवा पुन्हा एकदा तार तुटली, मग विचार आला आता नवीनच करूया. आधीचं मंगळसूत्र पुण्यातल्याच "रांका ज्वेलर्स" कडून घेतलं होता, पण आजकाल चिंचवड मध्ये गाडगीळांच्या दुकानातूनच खरेदी होते. म्हणून आधी तिथे गेले. त्यांनी सांगितला "२०% घट जाईल" मी त्यांना विचारलं " काय जगात फक्त तुम्हीच शुद्ध सोने विकता का?" अर्थात असे प्रश्न ऐकून त्यांना काही फरक पडत नाही हे माहित होतेच. म्हणजे पुन्हा रांका कडे जाणे आले. तिथे गेले. लहान मंगळसूत्र घ्यायचं आहे, पण माझ्या कडे माझं आधीचं आहे ते मोडून, असे सांगितले. "आमच्याकडचाच दागिना आहे, म्हणजे काही घट जाणार नाही" असे त्यांनी सांगितले. लगेच त्यांनी वजन करून काळे मणी त्यातले काढून, उरलेले सोने तापवून सोन्याची किंमत सांगितली, जी तशी योग्य होती. मी नवीन पसंत केले, जे आधीच्या पेक्षा वजनाला जास्त होते, मी किती रक्कम द्यायची ते विचारले. आजकाल सर्वत्र डेबिट/क्रेडीट कार्ड घेतले जाते, पण सोनाराच्या दुकानातले आधीचे अनुभव लक्षात घेता, मी विचारले "कार्ड पेमेंट चालेल ना?" उत्तर आले " हो, पण आम्ही त्यावर १.५% जास्त घेतो. पण तुम्ही कॅशिअर ला विचारा." " अहो ते गाडगीळ सुद्धा कार्ड पेमेंट्चे चार्जेस घेत नाहीत, तुम्ही काय घेता" त्यावर उत्तर आले " ते नसतील घेत, पण आम्ही घेतो"(पुण्याला नावे ठेवायला मला आवडत नाहीत तरी..."किती हा पुणेरीपणा?") मी म्हटलं " जर हा तुमचा नियम असेल तर मी कशाला जावून विचारू, माझ्याजवळ इतकी रोख रक्कम नाहीये" पण त्या सेल्समन ने आग्रह केला म्हणून गेले. तिथेही तेच उत्तर मिळाले. मी सांगितलं "मला, काही घ्यायचं नाही जास्तीचे १.५% देवून, माझ्या जुन्या सोन्याच्या किमतीची वेढणी द्या मला" असं चार लोकांसमोर कॅश काऊनटर वर म्हंटल्यावर त्याने सेल्समन ला बोलावून विचारले " किती पेमेंट आहे यांचे? " त्यावर १.५% आकारू नका."


तो पर्यंत लक्षात आले की आधीचे मंगळसूत्र २३ कॅरेट चे होते पण त्यातल्या वाट्या-मणी २२ कॅरेटचे, पण किंमत करताना २२ कॅरेट नेच केली आहे. तसं मी म्हंटल्यावर त्याने पुन्हा हिशोब करून रक्कम सांगितली, ज्यामुळे जवळजवळ ६०० रु.चा फरक पडला. मला खात्री आहे जर ह्या दोन गोष्टी माझ्या लक्षात नसत्या आल्या तर या खरेदीत माझे किमान १२०० रु.चे नुकसान झाले असते. प्रश्न पैशांचा नाही तर सोनारांकडून होणाऱ्या लुटीचा आहे

Saturday, May 12, 2012

असेच काही उदासवाणे

ऑफिसला जाताना रस्त्यात एक सिग्नल लागतो, तिथे हमखास दोनतीन गरीब मुले-मुली तुमच्या गाडीपाशी येतात. हातात एक फडकं असतं, काही न बोलता गाडीची समोरची काच पुसू लागतात, जो पर्यंत तुम्ही पर्समधून पैसे काढत नाही तोपर्यंतच मात्र ...अर्थात सिग्नल ही काही सेकंदाचाच असतो. मी दर वेळी २ रु. हाती ठेवते, विचार करते किमान काम करून पैसे मिळवावेत एवढं समजलं आहे हे ही नसे थोडके. या वर माझी चेष्टा करणारी माणसे माझ्या आसपास असतातच. 

ज्या समाज व्यवस्थेचा आपण भाग आहोत तेथे इतक्या मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आहे की ते कोणी एका दोघांच्याने दूर होणे शक्य नाही. पण मी पण या समाजाचाच जर एक भाग असेल तर मी कोणत्यातरी स्वरूपात माझा सहभाग त्याच्या निर्मूलनासाठी द्यायलाच हवा. अनेकदा मी चितळ्यांच्या दुकानात जाते, घरी विशेष अशा गोष्टी खाणारं कोणी नसतं तरी काही ना काही मिठाई, फरसाण घेवून येते, असू दे कोणी घरी अचानक आलं तर असावं म्हणून. त्या दुकानाच्या बाहेर अनेक लहान मुले भीक मागत असतात. त्या दुकानातून बाहेर पडताना मला इतका अपराधी वाटतं की नुसते एक दोन रु. हातात ठेवून काही फारसं साध्य होणार नाही. मग मी बाजूला एक दोन खाऊ ची दुकाने आहेत तिथून काहीतरी सामोसा, इडली वगैरे विकत घेवून त्यांना देते. तिथेच बाजूला इतर फुटकळ विक्रेते असतात जसे की लिंबे, गजरे, डाळिंबे विकणारे. परवा असंच काही एका मुलीला घेवून दिल्यावर बाजूला उभा असलेल्या गजरेवाल्याने ते तिच्या हातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. ते पाहून मी त्याला ओरडले, की तिला खावू दे. पण आपण तरी असे किती पुरे पडणार. अनेकदा नको असतानाही मी सिग्नलला गजरेवाल्यांकडून गजरे घेते. काही उपयोग नसतो  मला त्यांचा. थोडा वेळ गाडीत छान सुवास दरवळतो इतकेच. 

आज सिग्नलला उभी असता नेहमीप्रमाणे एका मुलगी गाडी जवळ आली, काच पुसू लागली, पैसे देवू केल्यावर, माझ्या बाजूच्या खिडकीतून  समोर ठेवलेले चुईंग गम सारख्या दिसणाऱ्या पाकिटाकडे बोट दाखवून ते मागू लागली, पण तिच्या दुर्दैवाने ते चुईंग गम नव्हतं, मी हातात पैसे ठेवून, ते देणार नाही सांगितला. सिग्नल संपून गाडी सुरु करेपर्यंत ती गाडी सोडेचना. आता जरी ते चुईंग गम असतं तर त्याने का तिचे पोट भरणार होते? इतकं उदास, इतकं हतबल वाटू लागलं नंतर मला की पुढे जावून मला गाडी  चालवयालाच  सुचेना, शेवटी मग गाडी बाजूला घेवून, थांबले, पाणी पिऊन, पाच मिनिटे तशीच शांत बसून राहिले मग पुढे गेले. पण प्रश्न हा की असा हे किती दिवस चालणार?

Friday, July 29, 2011

शिक्षणाच्या नावाने......

आपण नेहमी असं ऐकतो "आजकालच्या शिक्षणाचा दर्जा खूप घसरला आहे." खरं तर शिक्षकांचा दर्जा कमी झालाआहेकारणं काहीही असोतपण ते खरं आहेआजकाल माझया कुटुंबात शाळेत जाणारी वेगवेगळ्या वयाची काहीमुलं आहेतत्यांचे अनेक किस्से कायमच करमणूक करतात.
माझी भाची नेहावय वर्ष १०वडील शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मधे कॅप्टनत्यामुळे आख्खं जग फिरून झालेआहेशाळेत बाई भूगोलाच्या तासाला शहरांच्या नावाच्या भेंड्या हा खेळ घेत होत्याहिच्यावर  पासून शहरसांगायची वेळ आलीतिने सांगितले " रॉटरडॅम". बाई म्हणाल्या "शहराचे नाव सांग नेहाधरणाचे नको". चिडूनघरी आली आणि हे ऐकून आम्ही खूप हसलो.
शशांकने शाळेत एकदा विचारले "ट्यूब ला मराठीत काय म्हणतात?" सर म्हणाले ट्यूब म्हणजे मलमहा घरीयेऊन म्हणतो भिंतीवरच्या ट्यूबमधे कोणते मलम आहेखूप वेळाने माझी ट्यूब पेटली हा घोटाळा लक्षात यायला.
संस्कृतीला संस्कृत शिकवायला नवीन बाई आल्या आणि म्हणाल्या " काव्य शास्त्र विनोद मधील उतारा म्हनहीघरी येऊन विचारते "ह्या उत्तम संस्कृत संस्कृतीला कसं शिकवतील?" या प्रश्नाचं काही उत्तर मझयाकडे नाही.
पुत्यांच्या चितळे मास्तरांचं वर्णन करता थकत नाहीत आणि आजकाल मुलांना मागच्या वर्षीच्या शिक्षकांचंनाव आठवत नाहीकाय करावंआजही कित्येक लोकं आपली शिक्षण पद्धती खूप उजवी मानतातमाझया एकमित्र यूएसहून परत आला का तर त्याला त्याच्या मुलाला भारतात शिकवायचं आहे.
आपण त्यात काही बदल करत नाहीआणि आपलं महान सरकार दर दिवशी नवीन प्रयोग करतं आपल्या मुलांवर.आज काय परीक्षा नाहीतमग काय तर फक्त मूल्य मापनगुणवत्ता यादी नाहीतर कधी बेस्ट ऑफ फाइवमगमार्कांचा पाऊस !
पण यात नवल ते कायआपल्यापैकी प्रत्येकालाच डॉक्टरइंजिनियरवकील व्हायचं असतंकोणालाच शिक्षकव्हायचं नाहीमग ज्याना काहीच दुसरं करता येत नाहीते जाऊन बी-एडडी-एड करतातपैसे देऊन शिक्षण सेवकबनतातमग पुन्हा तेच रडगाणेशिक्षणाचा दर्जा खालवलाय म्हणजे नक्की काय बदल झालायपायथागोरसचासिद्धांत बदललाय काकी + होतात आजकालनाही ना...... म्हणजे शिक्षकांचा दर्जा खालवलाय. .या सगळ्याला आपण जबाबदार आहोतकधी कधी वाटतं सारं सोडून एखादी शाळाजॉइन करावीथोड्या मुलांचं तरी भलं होईल.

Wednesday, July 13, 2011

पुन्हा एकदा मुंबईत बॉम्बस्फोट :(

पुन्हा एकदा मुंबईत बॉम्बस्फोट...... कधी थांबणार आहे हे सारे? एका वर्ल्ड ट्रेड नंतर अमेरिकेवर पुन्हा कोणी हल्ला चढवलेला नाही..मात्र आपण रोज मृत्यूच्या छायेत वावरतो आहोत? वर्ल्ड ट्रेड सेंटर वरचा हल्ला अमेरिकेच्या जिव्हारी लागतो आणि ते त्याचा पुरेपूर बदला ही घेतात. अगदी आपल्या मित्रदेशात जाऊन त्याना कल्पना न देता कारवाई करतत. अमेरिकेचं एक बरं आहे, त्याच्यासाठी त्यांच्या हितापेक्षा बाकी काही महत्वाचं नाही. आपलं तसं नाही ना?....आपल्याला आपली सॉफ्ट टार्गेट ही प्रतिमा जपायची आहे, आपल्या राजकारण्यांचं हित आपल्याला जपायचं आहे.


कोणत्याच हल्ल्यानंतर आपण पेटून उठत नाही, ताज हॉटेलवरील नाही, रेलवेतले बॉम्बस्फोट नाहीत, अगदी संसद भावनावरील हल्लादेखील नाही. डी-गँगशी असलेले संबंध ना राजकारण्यांच्या आड येतात ना तथाकथित सेलेब्रेटिजच्या. या सार्यांची बंधिलकी फक्त स्वार्थ आणि पैसा या दोनच गोष्टींशी. देशप्रेम हा १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला भाषणं देण्याचा विषय उरलाय फक्त. तो आपलं जीवनमुल्य असावा असं कोणालाच वाटत नाही. ज्याना तसा वाटतं त्यांच्या मताला काही किंमत नाही. आपली सहन करण्याची क्षमता तरी किती? रोजच्या जीवनात आरे ला कारे असा आपला समाज अशा वेळी मात्र सहानशीलतेच्या कळस गाठतो. का? कशासाठी? कितीक दिवस? याची उत्तरे द्यायला संसदेत बसणारे आपले महान नेते बांधील समजत नाहीत. देशविक्रीच्या मोठ्या कामात ते सारे व्यस्त आहेत. किती दिवस आपण त्याच्यावर विसंबून राहणार यासाठी.


क्रांतीची गरज आहे या देशाला.....पण सर्वात आधी पेटून उठणार्‍या रक्ताची गरज आहे. ना की मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढण्याची. लोकपाल, भ्रष्टाचार याविरुद्ध सरकार विरुद्ध लढण्यापेक्षाही महत्वाचं आहे, सरकारला जागं करणं, दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी, दहशतवादाविरुद्ध एक पाऊल असं उचललं गेलं पाहिजे की पुन्हा आपल्याकडे बघण्याची कोणाची हिंमत न व्हावी. काय फायदा आहे आपण सॉफ्ट राहण्याचा? कोणाचं हित साधतो आहोत आपण यातून? पुढे याचा जेंव्हा इतिहास सांगितला जाईल; तेंव्हा आपली पुढची पिढी आपल्याला विचारेल "की इतकं सारं होत असताना तुम्ही काय करत होतात?" काही उत्तर नसेल आपल्याकडे तेंव्हा....आत्ताच एक अपडेट पहिलं मी-


सौदा यही पे होता है हिन्दोस्तान का.... संसद भवन में आग लगा देनी चाहिए, सौदा यही पे होता है हिन्दोस्तान का

Monday, July 11, 2011


मागच्या महिन्यात माझा भाचा शाळेत जाऊ लागला. सुरुवातीचे दिवस माझी बहीण त्याच्या बरोबर शाळेत जात होती. एक दिवस फोनवर बोलताना ती म्हणाली "मल्हारच्या वर्गात वीस मुले आणि पाच मुली आहेत" मी विचारलं " मग तर काय? त्यात काय विशेष?"तिचं उत्तर होतं "अगं, जेंव्हा त्याच्या लग्नाची वेळ येईल त्यावेळी लाखो रुपये हुंडा देऊन मुलगी आणावी लागेल घरी , जर असाच मुला-मुलींचा रेशियो राहिला तर.....मी मनात विचार केला, ज्याना मुली आहेत त्याची दु:खं अजून वेगळी.


तेंव्हा मी हसले नंतर वाटलं खरच तर आहे तिचं म्हणणं. मग कोणीतरी एक सिग्नेचर लाइन टाकलेली पाहिली. "Save Girl Child, we can save Tigers later". मग सोनोग्राफी सेंटरवर टाकलेल्या धाडी. सर्वत्र स्त्री-भ्रूण हत्येविरुद्ध मोहिमा. परवाच सुबोध भावेचा एक लेख वाचला, २०२२ मधे जाऊन लिहिलेला.छान होता असं सुद्धा लिहिवत नाही. 


एकीकडे या सार्‍या गोष्टी ठळक छापल्या, बोलल्या जात असताना, पेपर मधील बलात्काराच्या बातम्यांकडे आपण दुर्लक्ष करतोय का? कोणत्या आईला आपली मुलगी या देशात सुरक्षित वाटते? प्रत्येक आई मनातून  धास्तावलेली असते. बोलूनही दाखवता येत नाही आणि सहनही होत नाही अशी ही भीती. समाजातील कोणत्याही स्तरातील,कितीही शिकलेली आई असो, प्रत्येक आईच्या बाबत ही भीती खरी आहे. स्त्रीमुक्ती, स्त्री-पुरूष समानता वगैरे नाही हो.....साधं माणूस म्हणून सुखाने जगता यावं  इतकीही अपेक्षा नाही का बाळगू शकत या देशात? अनेक देव्यांच्या नावाने मंदिरे बांधणार्‍या आपल्या समाजात स्त्रीचीच का इतकी वाईट परिस्थिती? परवाच्या बातमीने तर कहरच केला. प्रत्यक्ष आईही आपल्या दोन्ही विवाहित पोरीना वाचवू शकली नाही.


प्रश्न इतकाच आहे की एक समाज म्हणून आपण मृतवत होत चाललो आहोत का? विश्वचषक जिंकणे, सेन्सेक्सची कोटीच्या कोटी उड्डाण, लाखो रुपयांची मिळणारी पॅकेज, बाजारात नवीन येणारं सेदन मॉडेल, आय-पॉड ४,ऐश्वर्या राय आई होणार, शाहरूखचा नवीन सिनेमा यापेक्षाही काहीतरी महत्वाचे आहे, जे आपण गमावत चाललोय आणि ती म्हणजे मूल्ये. जी कोणत्या बाजारात विकत मिळत नाहीत, कोणत्या शाळेत  शिकवत नाहीत, बर्‍याचशा प्रमाणात आपण ती जन्माला येताना बरोबरच घेऊन आलेले असतो, थोडीफार जडणघडण समाज करतो.


कायदा सुव्यवस्था नावाची कोणतीच गोष्ट या देशात नाही यावर हळूहळू शिक्कामोर्तब होत चाललय अनेक अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये, यात आता कुठेतरी बदल व्हायला हवाय. यासारख्या गुन्ह्यांसाठी इतकी कडक शिक्षा आणि ती ही इतकी तत्काळ असायला हवी की गुन्हा करताना ही माणूस हजारदा विचार करेल. स्त्रीचा आत्मसन्मान कधी जपायला शिकणार आहोत आपण? दहा निरपराध लोकाना शिक्षा झाली तरी चालेल पण एक गुन्हेगार सुटता कामा नये अशी भूमिका का घेत नाही आपण?