Showing posts with label खादाडी. Show all posts
Showing posts with label खादाडी. Show all posts

Wednesday, June 5, 2013

एक दिवस खाता खाता, बनवणाऱ्याचे हात घ्यावेत ….….

कोणी प्रेमाने एखादा पदार्थ तुमच्यासाठी बनवला तर त्यात आनंद काही औरच असतो ना? यापूर्वी आई, आजी, मामी, आत्या, साबा  यांनी त्यांच्या हातचे मला आवडणारे पदार्थ खूपदा बनवले आहेत. यांच्या प्रत्येकीच्या अशा काही हातखंडा रेसिपीज आहेत. आई च्या हातचे दडपे पोहे, मसालेभात, ओल्या साल पापड्या, रवा नारळाचे खवा घातलेले लाडू, आत्याच्या हातची पुरणपोळी, सुरळीवडी, उपमा, मक्याची नारळाच्या दुधातील करी, साबांच्या हातची भरली वांगी, काजूची उसळ, गुळाची पोळी, तिळाचे लाडू, लसूण कुरकुरीत तळून घातलेला पातळ पोह्याचा चिवडा, मामी च्या हातच्या पाकातल्या पुऱ्या आणि साखरभात अशी यादी बरीच मोठी आहे आणि या साऱ्याजणी वेळोवेळी आमचे हे हट्ट पुरवत असतात देखील.
नवऱ्याच्या हातचा वीकेंडला सकाळचा चहा. जेंव्हा तो "तू झोप थोडा वेळ, मी चहा तयार झाला की तुला हाक मारतो" असे म्हणतो तेंव्हा  अजून जास्तीची अर्धा तास झोप मिळाल्यावर  आणि वर आयता चहाचा कप हाती आल्यावर अजूनच छान लागतो. या चहाशिवाय तो नियमित पणे फक्त रात्रीचा वरणभाताचा कुकर लावतो. तसा त्याचा स्वयंपाक घरातील वावर बराच असतो. सर्वात मोठे काम म्हणजे "सूचना". मीच काय पण त्याची आई, बहिण, सासू, मेव्हणी, माझ्या चुलत जावा, नणंदासुद्धा यातून सुटत नाहीत. इतर काही पदार्थ तो आवडीने बनवतो पण मी नॉन-व्हेज खात नसल्याने ते माझ्या काही कामाचे नसतात. पण तरी देखील, जेंव्हा घरात डोसे, पावभाजी, थालीपीठे असा कोणता तरी बेत असतो तेंव्हा बाकीच्यांचे जेवण आटोपून जेंव्हा मी एकदाच स्वत:चे पान वाढून घ्यायचा विचार करत असते, तेंव्हा मला गरम गरम खायला आवडते हे लक्षात ठेवून तो जेंव्हा "पहिला डोसा घेवून तो सुरुवात कर जेवायला, नंतरचा मी करून वाढतो" असे जेंव्हा म्हणतो तेंव्हा दोन घास नक्कीच जास्त जातात. 

सध्या तिसऱ्या व्यक्तीची लुडबुड या प्रांतात वाढत चालली आहे. माझ्या लेकीची संस्कृतीची! सुरुवातीला चहा, कॉफी, maggi, पास्ता किंवा आमच्या दोघांपैकी कोणीच घरी नसू आणि जेवायला येणार असू तर मग कुकर. मग मागच्या सुट्टीत फुलके करता येऊ लागले, त्याखेरीज कांदे पोहे, दही पोहे कधी मधी घरी संध्याकाळी बनू लागले. पण ह्याचा प्रसार फक्त बाबापुर्ताच होता. बाबाच सर्वात मोठा परीक्षक आणि कौतुकाने खाणारा असल्याने अनेकदा यातल्या अनेक गोष्टी माझ्यापर्यंत पोहचतच नसत. तशीही मी रात्रीच्या जेवणाच्या वेळेपर्यंत कशीबशी घरी पोहचते. 

मागच्या वर्षी पहिल्यांदा माझ्या वाढदिवसाला खास माझ्यासाठी एक सुंदर पदार्थ बनला. जे माझ्यासाठी सरप्राईज होते. मारी ची बिस्किटे, साखर, पाणी आणि कॉफी च्या मिश्रणात एक सेकंद बुडवून नंतर कोकोच्या पेस्ट चे आवरण त्यावर देऊन पुन्हा होती तशी रोल बनवून ठेवली, अल्युमिनीयम च्या फोईल  मध्ये गुंडाळून ३/४ तास फ्रीज मध्ये ठेवून बनवलेला एक सुंदर पदार्थ होता तो. 

गेल्या शुक्रवारी असाच अजून एक पदार्थ बनला होता. आधी मला विचारून झालं "घरात कॉर्नफ्लोर" आहे न? म्हणून. संध्याकाळी आले तर चीझ बॉल्स तयार होते. चीझ किसून त्यात आलं, लसूण, मिरचीची पेस्ट मिसळली होती, ते हलक्या हाताने वळून कॉर्नफ्लोर च्या पेस्ट मध्ये बुडवून घेतले आणि नंतर  ब्रेडक्रम्स वर घोळवून तळले होते.  इतके मस्त लागत होते ते! पण पहिला खाऊनच लक्षात आले एकंदरीतच हा पदार्थ खूप हेवी आहे. मग मला कळले कि ४ अमूल च्या चीझ क्युब्स चे फक्त ८ बॉल्स बनले आणि तरी माझ्या साठी चक्क ३ कसे  उरले होते ते. पण खायची आणि करून खिलवायची आवड निर्माण होते आहे हीच माझ्या साठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

(हे पदार्थ तिने बनवल्याचा आनंदात मी नेहमीप्रमाणे कॅमेरा हाती घ्यायला विसरलेच)

Wednesday, November 28, 2012

कांदा मुळा भाजी.......


लहानपणापासून मंडईत जाणे हि माझ्या आवडीची गोष्ट! तेंव्हा घरी फ्रीज नसल्याने २/२ दिवसांची भाजी घरी येत असे. भाज्यांचे नीट रचून ठेवलेले ढीग. सर्वत्र जाणवणारा ताजेपणा, रसरशीतपणा इतका मोहवणारा असतो की .....नंतर कॉलेजला जावू लागले तो पर्यंत घरी फ्रीज चे आगमन झाले होते, त्यामुळे मी खूप आनंदाने रविवारी भाजी घेऊन येत असे, नुसती भाजीच नव्हे तर फळे, देवपूजेसाठी आठवडभर पुरतील इतकी फुले असं सारं घेऊन आले कि मग मला खूप छान वाटत असे. नंतर त्या घरी नेलेल्या भाजीची निवडा निवडी करण्यासाठी आईला काय कष्ट पडतात याची तेंव्हा कल्पनाच नव्हती. ढीगभर भाजी घरी घेऊन येण्यात, तिच्या ताजा वास श्वासात भरून ठेवणेच इतके आनंददायी असते की हा त्रासाचा विचार ठेव्हा मनात कधी येतच नसे.
अजूनही ही गोष्ट तितकीच आवडीची आहे. भाजी मंडईत जावे, ताज्या ताज्या भाज्या बघितल्या की काय घेऊ अन काय नको असे होऊन जाते. दिवसाचे १०/१२ तास ऑफिसमध्ये जिचे जातात तिला रोज जाता येता भाजी घेणे शक्यच नाही. त्यामूळे आठवड्याची भाजी एकदमच हा शिरस्ता गेली अनेक वर्षे आमच्याकडे आहे. अशारितीने भाजी आणणे, निवडून वेगवेगळ्या प्लास्टिक मध्ये ठेवणे म्हणजे आठवडाभर आज काय भाजी करावी ही चिन्ता मिटते. मात्र वीकेंड मधल्या कोणत्या दिवशी भाजी आणायची, किती आणायची, तिची उस्तवार करायला कशी जमणार आहे याचा आधी विचार करावा लागतो, पण म्हणून काही  त्यातली मजा कमी होत नाही. त्यातून हा ऋतुच आनंदाचा ठेवा असावा असा ताजा तवाना. 
रविवारी सकाळीच मंडईत शिरावे. कोणत्या नव्या भाज्यांचे आगमन झाले आहे याचा अंदाज घ्यावा. तुरीच्या शेंगा, गाजर, मटार आणि मेथीच्या ताज्यातवान्या गड्ड्या दिसू लागणे ही माझ्या मंडईत जाण्याच्या आनंदाची परिसीमा असते. उंधियो, मेथीचे विविध प्रकार जसे की ठेपले, भरपूर लसूण  घालून केलेली सुकी भाजी, मेथी गोटे, गाजर हलवा, मटार करंजी, मिक्स भाज्यांचे सूप, लोणचे असे विविध प्रकार मनात डोकावू लागतात. त्यामुळे भाज्या घेत घेतच माझा आठवडाभराचा मेन्यू मनातल्या मनात तयार होतो. आत शिरल्याबरोबर मिरची, आले लसूण याचा गाळा असतो. थंडी पडू लागलीये, थोडे आले जास्त घेवूया म्हणजे वड्या करता येतील. लसूण ही घ्यायला हवा, थोडी सुकी चटणी करून ठेवायला हवी. मग पुढचा गाळा असतो रसरशीत टोमाटोचा. रविवारी पुलाव आणि सार करावे का? कोणी पाहुणे येणार आहेत का, कोणता सण आहे का, एखादा खास पदार्थ बरेच दिवसात झाला नाही अशी घरच्या दोन थोर व्यक्तींकडून तक्रार येण्याची शक्यता आहे का  या आठवड्यात हे एकदा आठवून पाहावे आणि त्या नुसार भाज्या घेत जावे. किती पालेभाज्या आपल्याचाने निवडून होतील याचा अंदाज घेत त्यांना ही पिशवीत जागा करून द्यावी. मग स्वीट कॉर्न मला न्या म्हणत मागे लागतो, म्हणून त्यास घ्यावेच लागते. आजकाल लाडावलेल्या मुलासारखा तो झाला आहे. उपासाचे दिवस असतील तर मग रताळी कुठे दिसतात का ते पाहावे लागते, म्हणजे एकादशीची सोय होईल, रताळ्याच्या गोड काचऱ्या, तिखट कीस, हे पदार्थ साबुदाण्याचे  वडे किंवा थालीपीठ  सोबत तांबड्या भोपळ्याचे भरीत, ओल्या नारळाची चटणी  असले की उपासाचे ताट कसे भरल्यासारखे वाटते नाही?  
तुरीच्या शेंगा दिसल्या की उन्दियोच्या इतर भाज्या जसे की कंद, सुरती पापडी, कच्ची केळी  आल्यात का हे पहावे, सगळ्या पाव पाव किलो घेत घरी जावून उंधियो बनवावा आणि पुढचे २/३ दिवस मनसोक्त त्यावर ताव मारावा  नाहीतर तुरीच्या शेंगाना घरी नेवून मीठ हळद घालून उकडून टेबलवर ठेवून द्याव्यात, बघता बघता संपून जातात. भाद्रपदात मिळणाऱ्या मावळी काकड्या दिसल्या की मग हळदीची पाने कुठे मिळतील ते पाहावे म्हणजे गोड पानग्या करता येतील. भरपूर कोथिंबीर आली की मग एकदा वड्या झाल्याच पाहिजेत. छान केशरी दळदार भोपळा आहे, तो  घारगे बरेच दिवसात झाले नाहीत अशी आठवण करून दिल्याखेरीज राहात नाहीत. मटार चांगला आला आहे, भरपूर घरी न्यावा, एकदा मटार उसळ आणि पाव हा बेत, कधी मटार भात तर कधी मटार करंजीचा बेत करावा. फेब्रुवारी संपता संपता फणसाच्या कुयऱ्या दिसतात का याचा शोध घ्यावा किंवा आसपासच्या कोणत्या घरी फणसाचे झाड आहे ते लक्षात ठेवून त्यांना सांगून ठेवावे. आजकाल मला वर्षभर ओले काजू सुकवून ठेवता येण्याची पध्दत कळली आहे, त्यामुळे फणस आणि ओले काजू याची भाजी, त्याला वरून लाल मिरचीची फोडणी म्हणजे सुख! तसा नोव्हेंबर ते जानेवारी हा काळ म्हणजे या सुखाचा परमावधी. इतक्या प्रकारच्या भाज्या या दरम्यान उपलब्ध असतात की काय घेऊ आणि काय नको असे मला होऊन जाते. घरी नेलेल्या भाज्यांची उस्तवार करता यावी आणि विविध चवींचे खास पदार्थ बनवता यावेत म्हणून न या कालावधीत वीकेंड २ नाही तर ३/४ दिवसांचा असावा अशी फार इच्छा आहे.... :) 

आवळे घरी न्यावेत, किसून सुपारी, थोडा मोरावळा करून ठेवावा. थोडे लोणचे करावे त्यात थोडी आंबे हळद जी ओली मिळते या काळात, ती घालावी. लिम्बांचे गोड लोणचे बनवून ठेवावे, उन्हाळ्याची बेगमी म्हणून सरबताची सोय करून ठेवावी. पालक वर्षभर मिळतो, पण या काळात तो जास्तच ताजा टवटवीत वाटतो, त्याच्या पुऱ्या कराव्यात. भरली वांगी किंवा खानदेशी वांग्यांचे भरीत करावे, सोबत गरमागरम भाकरी आणि ताजे लोणी. किंवा भरपूर लसूण आणि तेल घालून केलेली आंबाडीची भाजी .... आहाहाहा..... एरवी जास्त न आवडणारे पावटे पण या काळात कधीतरी उसळ करून चविष्ट लागतात. नवरात्रात कधी काकडीसारखी लांबसडक जांभळी वांगी मिळतात, त्यांचे काप करावेत, डाळीचे पीठ, मीठ तिखट लावून थोड्या तेलावर भाजले की किती खातो हेच कळत  नाही, तीच गत सुरणाच्या कापांची.

थोडी शोधाशोध केली तर लसणीची पात मिळते कधी...थोडी कधी आमटीत टाकावी नाहीतर कधी छानशी चटणी करावी. इतर कोणत्याही सिझन मध्ये मिळणारा मुळा या ऋतूत मला नेहमीच चविष्ट वाटत आलाय. जवळपास चक्का वाटावा इतकं घट्ट दही घ्यावे, त्यात ओला नारळ, कोथिंबीर, एखादी हिरवी मिरची मिठाबरोबर वाटून,सोबत चिमुटभर साखर...सही लागते ही कोशिंबीर!
याच काळात फळे ही भरपूर येतात यामुळे चिकू शेक, स्ट्राबेरी किंवा सफरचंद शेक, फ्रुट सलाड हे ओघाने आलेच. (दूध आणि फळे एकत्र करून खावू नये या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून) नुकती नुकतीच दिसू लागलेली द्राक्षे, स्ट्राबेरी संत्री यांचा घरी वावर वाढतो तो थेट आंब्यांचे घरी आगमन होई पर्यंत. फळांची रेलचेल मग कधी इतकी होते की मग कोबीच्या कोशिम्बीरीत द्राक्षे दिसू लागतात, काकडीसोबत घट्ट दह्यात मीठ मिरची लावून डाळिंबाचे दाणे जावून बसतात तर कधी सफरचंद, डाळिंब, काकडी, अननस आणि थोडे अक्रोड चुरून घातले की थोड्या मीठ मिरपुडीने सुरेख सलाड तयार होते. कधी सफरचंदाचा कधी अननस घालून केलेला शिरा जेवणाची  लज्जत वाढवतो. तर कधी क्रीम मध्ये थोडी साखर घालून फेटले आणि भरपूर स्ट्राबेरी त्यात घातल्या की एक सुंदर डेझर्ट तय्यार!
बघता बघता हा हिरवागार सीझन संपू लागतो, हळू हळू मंडई रुक्ष भासू लागते. त्याच त्या ४/५ भाज्या दर आठवड्याला घरी नेतोय की काय असे वाटू लागते. थोडा पाराही चढा होवू लागतो. जेवण तितके आनंददायी वाटेनासे होते. मग फळांचा राजा पुन्हा अवतरतो आणि सारा रुक्ष नीरसपणा दूर करतो. पानात रोज सकाळ संध्याकाळ आमरस असला गरमागरम पोळी किंवा भातासोबत की मग कोणती भाजी आहे किंवा नाही याने काही फरक पडेनासा होतो. आंबा, फणस, जांभळे, करवंदे, चेरी, खरबूज, कलिंगड ही फळे मात्र दिवस रसदार करतात आणि उन्हाळा थोडा सुखाचा जातो. याच उन्हाळ्यात थोडी पावसाळ्याची बेगमी म्हणून थोडे सांडगे, भरल्या मिरच्या, थोड्या कुरडया (भाजी साठी) करून ठेवाव्यात. पावसाळ्यात मंडईत जाणेच नकोसे होते. कसेबसे ते दिवस ढकलून मी मनापासून वाट पाहत राहते या हिरव्यागार, ताज्या टवटवीत दिवसांची!


(त्याचं काय आहे की एखादा पदार्थ बनवताना किंवा खाताना मी त्यात इतकी गुंतलेली असते की त्यांचे फोटो काढणे वगैरे माझ्या लक्षात येणे केवळ अशक्य...त्यामुळे सर्व फोटो आंतरजालावरून साभार.)

Friday, August 24, 2012

घडलंय....बिघडलंय.....


"ह्याला निव्वळ माज म्हणतात" माझी एक कलीग खूप चिडून म्हणाली. 
"माज काय त्यात? तू खाऊन तर बघ." मी
"नाही खाणार, इथे लोकांना यावर्षी आंबे मिळत नाहीत, आणि तू आंब्याची कढी बनवून आणलीस, अजिबात खाणार नाही"
"अगं,  आता मला ही रेसिपी संजीव कपूरच्या पुस्तकात मिळाली, आणि घरात आंबे ही होते, मग म्हटलं पाहू बनवून, माज वगैरे म्हणत नाहीत हं याला"- मी

हा संवाद या उन्हाळ्यातल्या दुपारी जेवणाच्या टेबलवर घडला. पहिल्या घासाबरोबर लक्षात आले, या रेसिपीत काही मजा नाही म्हणून. पण बनवली होती मोठ्या उत्साहाने, खाणे भाग होते. मनातल्या मनात मी त्या पुस्तकातला "आंब्याच्या कढीचा" सुंदरसा फोटो आठवत कशीबशी संपवली ती. कलीगचा राग ही नवीन गोष्ट होती पण असे पदार्थ बिघडण्याची काही ही पहिली वेळ नव्हती.

लग्नानंतरचे  अगदी सुरुवातीचे दिवस, साबा आणि नवरा ऑफिसला जाऊ लागले होते, पण माझे सासरे मात्र घरी होते, त्यांची सुट्टी अजून शिल्लक होती. सकाळी नाश्त्यानंतर दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागले. फ्रीज मधून सिमला मिरची ओट्यावर काढून ठेवली होती. ते सहज आत डोकावले. मिरच्यांकडे पाहून म्हणाले " नारळ किंवा पीठ पेरून सुकी भाजी करू नकोस, रसदार भाजी कर". अरे बापरे, झाली का पंचाईत, सिमला मिरचीची रसदार भाजी कशी करायची ते मला माहित नव्हतं. विचारून कोणी सांगेल असं कोणी शेजारी पण नव्हते, आणि माझी ओळखही नव्हती. त्यांच्या समोर आई, काकू, आत्या यांना फोन करून विचारायचे धाडसही नव्हते. मुंबई-पुणे STD करावा लागायचे दिवस होते ते. नारळाचे वाटण करून रसभाजी बनवावी असा विचार केला. पण चांगली होईल अशी खात्री वाटत नव्हती. चेहऱ्यावर माझ्या अनेक प्रश्न होते. पुन्हा काही कारणांनी ते आत डोकावले. वाशीत अगदीच छोटंसं घर होतं आमचं. त्यांना माझा चेहरा वाचता आला असावा. सहज बोलल्यासारखे म्हणाले " काही नाही चिंच-गुळ, गोडा मसाला आणि दाण्याचे कूट, मस्त होईल भाजी, कर तू आपण खाऊ" भीतभीत बनवली आणि मस्त झाली भाजी. जीव भांड्यात पडला.

मग काही दिवसातच मी ही नोकरी करू लागले. साबा अनेकदा सकाळी ६ लाच घर सोडत, आणि आम्ही बाकी तिचे ८ ते ९ च्या दरम्यान एका पाठोपाठ. आपोआपच सकाळी आम्हा तिघांचे डबे मला बनवावे लागत. चुकत माकत बनवलेले पदार्थ असायचे डब्यात. छान झालेल्या पदार्थाची ते घरी येऊन लगेच तारीफ करत, पण बिघडलेल्या एखाद्या भाजी बद्दल एक शब्द ही कधी त्यांनी त्या सुरुवातीच्या दिवसात काढला नाही. ते सरकारी ऑफिसर होते, अनेक वर्षांची ऑफिसमधील मित्र मंडळी त्यांच्या सोबत लंचला असत, कसे त्यांनी ते असे पदार्थ त्यांच्याबरोबर शेअर केले असतील ह्या विचाराने मला खूप अपराधी वाटत असे. 

मग मी हळू हळू या कलेची पुस्तके जमवत गेले. निरीक्षण वाढवत गेले. कोणाच्या घरी गेल्यावर, निरीक्षण करू लागले तिथल्या स्वयंपाक  घराचे  आणि त्या अन्नपूर्णेचे. चाखत असलेला पदार्थ कसा बनवला असेल याचा विचार करू लागले. थोडा स्वत;च्या मेंदूला ताण देत प्रयोग करू लागले. अशाच  प्रयोगातून पहिल्या दिवाळीत "पुलाव" इतका सुंदर झाला. आधी साधीच रूपरेखा त्या पदार्थाची तयार होती डोक्यात. जस जशी तयारी करत गेले, तसतश्या एक एक वाढीव गोष्टी सुचत गेल्या, जसा की पाण्या ऐवजी दूध त्यात थोडे केशर, कांदा, बटाटा, काजू तळून, फरसबी, गाजर, मटार उकळत्या पाण्यातून काढून, फ्लॉवर थोड्या हळदीच्या पाण्यातून शिजवून. इतर मसाल्याबरोबर कोथिंबीर आणि पुदिनाही घातला. त्यात घालायला पनीर आणून ठेवले होते. खावा ही होता घरात. दोन्ही किसून घेतले. त्यात थोडी हिरवी मिरची, आले, लसूण वाटून घातले, मीठ आणि थोडे कॉर्न-फ्लोर. लहान गोळे बनवून ते तळले. असे हे सोनेरी गोळे शेवटी तयार पुलाववर पसरले. अहाहा काय स्वाद होता त्यात!

पुस्तकेही या बाबतीत कधी कधी चकवतात. अनेकदा लिहिल्याबर हुकुम पदार्थ बनवला तर बिघडू शकतो, जसे की हलके सोनेरी गुलाबजाम तळून घ्या किंवा कांदा गुलाबी होई पर्यंत तळून घ्या - जर शब्दश: तसे केले तर कच्चेच राहतील. तर काही जसे लिहिले तसेच बनवावे लागतात, आपली अक्कल चालवून त्यात काही बदल केले तर हमखास बिघडतात. जसे  मी एकदा "आंब्याचे मूस" बनवताना चालवले होते. लग्नाच्या वाढदिवसासाठी आदल्या दिवशी सेट करायला ठेवलेले "मूस" त्या नंतर चार पाच दिवसांनी सुद्धा सेट झाले नव्हते. 

बिघडणार्या पदार्थांना कसे वाचवायचे याचे कोडे हळू हळू सुटत गेले. गोड पदार्थांसाठी घरात पिठीसाखर, दुध पावडर, किंवा काजू बदामची पावडर असे हाताशी असले, आणि त्यावर थोडी मेहनत करायची तयारी असली की मग झालं. बिघडू पाहणाऱ्या तिखट पदार्थांसाठी उकडलेला बटाटा, ब्रेंड, मैदा असे पदार्थ उपयोगी पडू लागले. कधी कधी बिघडत जाणाऱ्यावर केलेला प्रयोग, ओरिजिनलपेक्षा सरस ठरला, आणि नंतर दर वेळी तसाच बनू लागला. जसे की एक वर्षी गणपतीच्या नैवेद्यासाठी मोदक बनवत होते. काही केल्या ते घट्ट व्हायलाच तयार नाहीत. अर्धी वाटी काजू आणि पिस्त्याची पूड त्यात घातली. चांगले न लागायला काय झालंय? दुसऱ्या दिवशी, गणपतीच्या सकाळच्या  आरती नंतर प्रसाद वाटून झाल्यावर बहिण आणि जावेला "कसे झालेत" असे विचारले. "Don't tell me! ये आपने घरपे खुद बनाये है?" - इति माझी अमराठी जाऊ. "तू केलेत ना, मग उत्तमच असणार, काही लोकांनी काहीही बनवलं तरी ते by default चांगलेच बनते"- इति बहिण.

काळासोबत मी  वेगळा आणि उत्तम पदार्थ सहजगत्या बनवू लागले. या बाबतीत मी माझीच स्पर्धक झाले. हळू हळू कोणी मला एखाद्या पदार्थाची रेसिपी कशी विचारू लागले मलाच कळले नाही. मुळातच या विषयावर बोलायला आवडत असल्यामुळे मी ही शक्य तितक्या डीटेलमध्ये ती रेसिपी शेअर करते. हातचं काहीही राखून न ठेवता! माझ्या हाताची जी चव आहे ती दुसऱ्या कोणाच्या हाताला कशी येईल ? कदाचित माझ्यापेक्षा ही उत्तम बनवेल. तरी हरकत नाही. 

माझ्या किचनरुपी प्रयोगशाळेत असे प्रयोग गेली अनेक वर्षे कधी घडले, कधी बिघडले. पदार्थ घडले किंवा बिघडले असं म्हणण्यापेक्षा त्यांनी मला घडवलं. चांगला स्वयंपाक बनवता येण्यासाठी एक नजर दिली. बिघडलेल्या पदार्थांनी त्यातूनच काहीतरी नवीन घडवायची दिशा दाखवली, बिघडलेल्या पदार्थाने अश्रू गिळायला शिकवलं, जमून आलेल्याने कौतुकात सुखावून जायला शिकवलं.....

माझ्या घरी, नात्यात, मित्र मंडळीत असे काही जण आहेत की ज्यांना माझ्या हाताचे जेवण विशेष आवडत नाही, तर दुसऱ्या बाजूस खूप मनापासून दाद  देवून खाणारे ही काही कमी नाहीत. पुन्हा एकदा सणासुदीचे दिवस येऊ घातलेत, वेळ नाही म्हणत म्हणत मी काही प्रयोगांसाठी वेळ काढेनच. नवरा एक दोन सूचना करत पदार्थ छान झालाय म्हणेल, कन्यकेच्या चेहऱ्यावरूनच कळेल, दादा म्हणजे माझे सासरे "उत्तम झालाय " अशी दिलखुलास दाद देतील  तर साबा त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने "चांगला झालाय" असे दुसर्यांना कौतुकाने सांगतील. माझी एक लहानशी मैत्रीण जी मला "मॉम" म्हणते ती तिरकसपणे "वॉव, क्या खाना बनाती ही तेरे घर की रोटी बननेवाली ऑन्टी. मी लग्न झाले की तिला तुझ्या घरून घेवून जाणार" असे म्हणेल.  आजचे हे लिखाण त्या सर्वांसाठी!

Wednesday, July 4, 2012

कुछ मीठा हो जाये ....



पूर्वी कधीतरी म्हंटल्याप्रमाणे खाणे आणि करून खाऊ घालणे या दोन्ही गोष्टी मी अगदी मनापासून करते, अगदी "दिलसे" ! त्याच प्रमाणे अजून एक त्यासंबंधी गोष्ट आवडते ते म्हणजे खाण्यावर बोलणे. माझ्या यापूर्वीच्या ऑफिस मध्ये एक मैत्रीण होती जी माझं हे खाण्यावरच बोलणं आनंदाने ऐकत असे आणि नंतर म्हणे " चल, फूड-कोर्ट मध्ये जाऊ, तुला भूक लागलीये". अजून एका मैत्रीणीला मला चिडवायला खूप आवडत असे, मग दर वेळी माझ्या डब्यातले खाताना, "तुझ्या स्वैपाकाच्या बाईंना सांग " पदार्थ छान झाला होता" असे म्हणून मला चिडवत असे आणि मग मी पण हो त्यांनीच केलाय असा तिला सांगत असे. एखादा आवडता पदार्थ म्हणजे मी त्याच्या रंग, रूप, स्वाद, सुवास याने वेडी होऊन जाते. या साऱ्या गोष्टी मग खूप वेळ मनात घर करून राहतात. कधी काही पदार्थांची मला आठवण होऊ लागते आणि जणू ते पदार्थ समोर आहेत, किंवा त्यांचा सुवास घरभर पसरला आहे असं वाटायला लागतं, असं घडायला लागलं की मग तो पदार्थ बनवावाच लागतो. अशा पदार्थांची माझी लिस्ट ही खूप मोठी आहे. उदा. गव्हाचा चीक, कणसाचा उपमा, गार्लिक ब्रेंड, किंवा पिझ्झा, व्हेज ऑग्रटीन, हळदीच्या पानावर केलेले काकडीच्या रसातले पानगे, नारळ, खवा घालून केलेले रव्याचे लाडू, उकडीचे मोदक करताना शेवटी बनवलेल्या निवगऱ्या, नारळाच्या दुधासोबत फणसाची सांदणे, पाकातल्या पुऱ्या, तांदळाच्या ओल्या फेण्या, फणसाची भाजी, ओल्या काजूची उसळ किंवा त्याची गरम मसाल्याची आमटी, दुधी हलवा, खरवस असे एक ना दोन .......


काही पदार्थांची काही खास कनेक्शन्स असतात, की एक पदार्थ समोर दिसला की हमखास दुसऱ्याची आठवण होतेच. जसे की, लोणी कढवायला ठेवले, आणि तूप होत आले, की त्या तुपाचाच नव्हे तर तव्यावरच्या पुरणपोळीचा दरवळ मला जाणवायला लागतो, आणि तेंव्हाच नाही फक्त तर नंतर चे २/३ दिवस जेंव्हा जेंव्हा त्या साजूक तुपाचा डबा उघडते, तेंव्हा तीच आठवण होते. पुरणपोळी ही कशी तर, एक बाजू भाजून उलटली, की मग भाजलेल्या बाजूवर लिंबाचा रस पसरवायचा, त्यावर एक पिठीसाखरेचा थर द्यायचा, आणि नंतर त्यावर तुपाची धार! तो पर्यंत दुसरी बाजू ही भाजून झालेलीच असते. पोळी तव्यावरून ताटात अलगदपणे, अगदी उलथने वगैरे सुद्धा लावायचे नाही तिला आणि अशी मऊसूत की प्रत्येक घास जणू विरघळत गेला पाहिजे! आहा हा .....सुख सुख म्हणतात ते यापेक्षा वेगळं असू नाही शकत.

आंब्याचा सीझन आला की नुसती आमरस पोळी/पुरी खाण्यात मजा नाही. एकदा तरी पुरणपोळी तेंव्हा बनली पाहिजे घरी, हापूसचा रस आणि गरम तव्यावरची पुरणपोळी!!! या सीझन मध्ये एखाद्या सुट्टीच्या दिवशी सकाळीच आंब्याचा रस काढून त्यात मिरपूड, मीठ घालून फ्रीज मध्ये गार करत ठेवायचा. जेवणात गरम फुलके, आमरस, बटाट्याची भाजी आणि सर्वात कळस म्हणजे गरम वाफाळता भात त्यावर तूप आणि वरण/आमटीच्या ऐवजी फक्त आमरस!!! सुट्टीच्या दिवशी यापेक्षा सुंदर जेवण नाही असू शकत!

धो धो कोसळत्या पावसाचा आणि आपल्या सुट्टीचा दिवस. सकाळी आरामात उठावे, लागोपाठ २/३ कप आले, गवती चहा घालून बनवलेला चहा पीत घरी येणारे सगळे पेपर त्यांच्या पुरवण्यांसह आरामात वाचून संपवायचे. नाश्त्याला मस्त पैकी बटाटेवडे, लसणाच्या चटणीसह, आणि अगदी सत्यनारायणाच्या प्रसादाला बनवतो तसा मस्त शिरा. असा नाश्ता झाला की मग बाकी काही करू नाही शकत आपण. दुलई घ्यायची, एखादं आवडेल असं पुस्तक आणि आपण बस्स..... एखाद्या संध्याकाळी, साधं पण छान जेवायचा मूड असेल तर मग पुलाव, मक्याच्या कणसांची नारळाच्या दुधात बनवलेली करी आणि बटाट्याचा पापड!

लक्षात येतंय का तुमच्या किती बोलतीये मी खाण्याबद्दल! खरंच खूप भूक लागलीये......काहीतरी खाऊन येते तोपर्यंत तुम्ही आज वरील पैकी काय बनवायचे ते  ठरवा  बरं.

Friday, June 15, 2012

फसलेला............नाही, नाही. जमलेला प्रयोग!

स्वयंपाक करू लागण्याचे नवीन दिवस होते ते. एका सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी घरचे बाकी ३ मेम्बर्स बाहेर आणि मी एकटी घरी. आपोआप रात्रीच्या जेवणाची जबाबदारी माझी. नेहमीचा स्वयंपाक विशेष येत नव्हता तरी, छोले-पुरी, पावभाजी, आलूपराठे, रगडापुरी, चाट, इडली, डोसे असे पदार्थ मला करता येत असत. पण तेच तेच किती वेळा करून खावू घालणार ना? म्हणून नेहमीचा स्वयंपाक करण्याचे ठरविले. भात, फुलके, भाजी आणि कोशिंबीर. यात फार काही प्रॉब्लेम नव्हता. प्रश्न होता तो आमटीचा. घरात बाकी तिघाना चिंच-गुळ घालून केलेली कांद्याची आमटी खूप आवडते. ("आमटी कशी अमृततुल्य चवीची हवी!"  :P). पण मला तशी आमटी अजिबात आवडत नाही. काहीतरी प्रयोग करणे भाग होते.

शेवटी डाळ भाताचा कुकर लावला आणि फ्रीज उघडला. मिरची, कोथिंबीर, ओला नारळ होताच. लक्ष गेला दरवाज्याच्या कप्प्यात असलेल्या मसाल्यांच्या डब्यांकडे. म्हटलं करू काहीतरी. डाळीची कांदा, चिंच गुळ, थोडी धनाजीरा पावडर घालून आमटी करून घेतली, उकळी आल्यावर त्यात थोडा थोडा मसाला घालत गेले. पावभाजीचा, छोल्यांचा, राजवाडी,बिर्याणीचा. नारळ कोथिंबीर घालून आमटी तयार!! इतका मस्त वास दरवळत होता घरात! तरीही डोक्यातले, यात अजून काय करता येईल याचे विचार थांबले नव्हते.

नवरा बाहेरून आल्या आल्या त्याने विचारले " काय बेत आहे? मस्त वास येत आहेत किचन मधून?" म्हटलं थांब आणि बघ. जेवायची पाने घेता घेता, छोट्या कढल्यात साजूक तूप गरम करत ठेवले, त्यात, पुन्हा जिरे, कढीपत्ता आणि २/३ लाल मिरच्या घालून फोडणी केली आणि आमटी वर ओतली. आहा...काही तरी मस्त रेसिपी जमून आली आहे याची खात्री पटली. जेवताना सगळ्यांनाच ती खूप आवडली. काय विशेष/ वेगळे केले आहे असं विचारल्यावर सांगून टाकलं कोणकोणते मसाले घातले ते. त्यावर माझे सासरे म्हणाले " नशीब! तो चहाचा मसाला तुझ्या तावडीतून सुटला!"............आणि यावर एकाच हास्यकल्लोळ झाला.