रविवारची सकाळ …प्रसन्न सकाळ म्हणू हवे तर. अदल्या दिवशी संध्याकाळीच बऱ्याच दिवसांनी जुना ग्रुप भेटल्यामुळे मूडही तसा आपसूकच छान बनलेला होता. पेंडिंग कामे संपवावीत म्हणून सिटीत जायचा प्लान ठरलेला, लेकीचा जर्मनचा क्लास ही होताच तिला तिथे सोडून कामे संपवावी आणि परत येताना तिला घेऊन परत यावे हा उद्देश.
सगळी कामे मनाजोगी झटपट होत गेली, वेळेच्या थोडी आधीच तिच्या क्लास मध्ये पोहचले. गाडी पे and पार्क मध्ये लावलेली असल्याने ती थोडी लांब, मग दोन्ही हाती सामानाचे ओझे. लेकीशी आधी ठरल्याप्रमाणे ती ज्यांच्या कडे जर्मन शिकायला जाते, त्यांना क्लास सुटण्याच्या वेळी भेटायला जायचे होते. तिने आधीच सांगितले होते की त्यांचे घर तिसऱ्या मजल्यावर आहे आणि लिफ्ट नाहीये. अरे देवा !
ठरल्या वेळी तिथे पोहचले, हाश हुश करत … एका व्यक्तीने दार उघडले, त्यांना सांगितले मला "मिसेस … " यांना भेटायचे आहे, त्याने आत जाऊन सांगितले असावे, त्या बाहेर आल्या. त्यांना ओळख सांगितली. त्यांनी आत येउन बसा, माझा क्लास संपायला थोडा वेळ लागेल असे सांगितले. तो पर्यंत त्यांनी पाणी दिले आणि आरामात पेपर वाचत इथे बसा असे म्हणून त्या ही आत निघून गेल्या. पाण्याचा ग्लास रिकामा करून मी थोडी स्थिरावले, सकाळीच निवांत पेपर वाचून झाल्याने त्यात मला फारसा रस नव्हता तरीही तो हाती घेऊन मी त्या दिवाणखान्याचे निरीक्षण करू लागले. अगदी राहते वाटावे असे घर. मला अशी जिती जागती घरे आवडतात. नीट नेटकी पण इतकीही नव्हेत की इथे कोणाचा वावर आहे की नाही हा प्रश्न पडावा. घर म्हणजे कसे की थोडे अस्ताव्यस्त पण त्यातल्या माणसांचे प्रतिबिंब वाटावे असे. पहिल्याच नजरेत माणसांची न पाहताही चित्रे नजरेसमोर उभी रहावीत असे घर! हे नक्कीच तसे होते.
भाषा विषयक पुस्तके टी पॉय वर, खाली होती, तिथेच ज्योतिषा वरील पुस्तके, समोर wall युनीट वर दोन तीन गाड्यांची मिनिएचर्स. तिथे एक म्युझिक सिस्टीम, अनेक सी डी त्याच्या आस पास. खाली एक जणू आताच वाजवताना कोणी उठले आहे असे वाटायला लावणारी एक तबला -डग्ग्याची जोडी. सारे घरदारच घरातल्याच्या संगीताच्या आवडीची साक्ष देणारे. अगदी पहिल्याच नजरेत मला हे घर आवडून गेले.
यात पाच दहा मिनिटे गेली. तेव्हद्यात बाहेरून किल्लीने दार उघडून कोणी आत येत असावे असे वाटून मी त्या दिशेस पाहू लागले. एक व्यक्ती हातात एक दोन सामानाच्या पिशव्या घेऊन आत शिरली. वय फार वाटणार नाही असे व्यक्तीमत्व, म्हणजे नसेलही तिशीच्या आसपास.हसरा चेहरा. आपसूकच मी हे ते मि. ……. हे ओळखले. त्यांनी ही या कोण आपल्या घरात आहेत असे मनातले भाव चेहऱ्यावर येवू न देत, एक हलकेसे स्मित करत हातातील समान आत नेवून ठेवले. दुसऱ्या खोलीमध्ये जिथे क्लास चालू होता तिथे नजर टाकून ते पुन्हा बाहेर आले. मला म्हणाले, " ……. चा क्लास चालू आहे, थोडा वेळ लागेल तिला" मी बर ठीक आहे म्हणाले. मनात विचार, "ज्या अर्थी कोणीतरी मला घरात घेतलं आहे त्या अर्थी त्या व्यक्ती ने मला हे सांगितले असेल न रे बाबा"
पुन्हा ते आत गेले, पाण्याचा ग्लास घेवून बाहेर. मी त्यांना धन्यवाद देत माझे पाणी आताच पिऊन झाले आहे, मी आले तेंव्हा मिसेस ……. यांच्याशी बोलले होते, infact मी त्यांच्याशीच काही बोलायला आले आहे, आणि त्यांना थोडा वेळ लागेल याची कल्पना त्यांनी दिलेली आहे हे सांगितले. ते ही बर बर म्हणत म्युझिक सिस्टम कडे वळले. आता काय सुरु होणार या उत्सुकतेने मी हातातल्या बळेच घेतलेल्या पेपर मध्ये डोके आणि कान सारे तिकडे. त्यातली एक आधी कदाचित चालू असलेली सी डी चालू करून ते आत किचन मध्ये वळले.
काही क्षणातच माझी सर्वात आवडती गझल ……मेहंदी हसन यांची …रंजिश ही सही …… आणि त्याची सुरावट कानी पडताच आता काय आपले कान तृप्त करणार आहेत या जाणीवेने माझ्या आधीच गोल असलेल्या चेहऱ्यावर अजून पसरलेले हसू. आता थोडा अजूनच वेळ लागू दे हा क्लास संपायला असा चमकून गेलेला विचार! एखाद्या सुंदर सकाळी यापेक्षा अजून काही मी नाही मागणार! खरच त्यासाठी त्या रसिकाचे मनापासून आभार!
ही गझल संपूर्ण ऐकणे, समजून घेत ऐकणे हा इतका सुंदर अनुभव असतो न. प्रेमात पडणे म्हणजेच एका हव्याहव्याशा दु:खाला जवळ करणे. तर मग दुरावलेल्या सख्याला साद घालताना तर त्या दु;खाच्या अभिव्यक्तीची परिसीमाच व्हावी. पण असे असतानाही इथे असे होत नाही. हे एकमेकांना आता आपण संपूर्णपणे दुरवलोच आहोत, तुझ्या परत येण्याने सर्व काही परत पुन्हा पहिल्या सारखे होण्यासाठी नाहीच तर पुन्हा मला सोडून जाण्यासाठीच तू ये अशी ही साद! माझ्या आयुष्यातून तुझे असे वजा होत जाणे, मला पुन्हा ते दु:ख देखील खूप हवे हवेसे वाटू लागले आहे कारण ते तूझ्यामुळे मिळालेले आहे.
अशी काव्ये त्यांचा अर्थ लावत आणि सांगत बसूच नये, इतका जिवंतपणा, अर्थाने इतकं हृदयात खोलवर रुजण्याची भाषाशैली हे काव्य. अहमद फराज ह्या माणसाकडे प्रत्येक भावनेच्या अभिव्यक्तीसाठी इतके चपखल शब्द कसे होते हे कोडे मला कधीच उलगडत नाही. शब्दांची निवड, त्यांची जागा, त्यांचे वजन याची इतकी सुंदररित्या गुंफण केलेली असते की अनेकदा तुम्ही एखाद्या शब्दाला पर्यायी शब्द शोधू पाहाल तर शक्यच नाही. त्यातून काही शब्द जसे की "दिल-ए-ख़ुश’फ़हम, पिन्दार-ए-मुहब्बत किंवा "ऐ राहत-ए-जाँ" हाच अर्थ पोचवणारे, इतकेच शब्द सौंदर्य असणारे शब्द कुठून उसने आणाल?
एक खानदानी आब असणारी उर्दू भाषा! क्या कहने!
जे आता कधी घडणार नाही, जे प्रेम आता माझ्या कधी वाट्याला येणार नाही, तू कधी मागे वळून पाहणार नाहीस पण मी तुला साद घालणे कशी सोडू? विरहाशिवाय आणि त्याच्या दु:खाशिवाय दुसरे काही पदरी पडणार याची खात्री असताना मागितलेले हे दान ! जे मनपासून घडावेसे वाटते ते घडणार नाही, पण त्या खेरीज इतर काही माझे मागणे नाही….काही मिळणारच असेल तर फक्त तू आणि तूच परत ये …
तशा अनेक गझल्स ज्या फराज यांच्या मनात अगदी खोलवर रुजलेल्या आहेत, पण हिची बरोबरी कोणी करू शकत नाही.कानाने ऐकत राहावी, हृदयात साठवत राहावी, पहिल्यांदाच ऐकताना ती वेदना तुम्हाला आतून हलवून सोडते, हळू हळू तुम्ही त्या वेदनेच्या हुंकारांशी जोडले जाऊ लागता अन कणाकणाने तुम्ही ते क्षण जगू लागता!
....................................................................................................................
रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिये आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिये आ
पहले से मरासिम ना सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रह-ए-दुनिया ही निभाने के लिये आ
किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से ख़फ़ा है तो ज़माने के लिए आ
अब तक दिल-ए-ख़ुश’फ़हम को तुझ से हैं उम्मीदें
ये आख़िरी शम्में भी बुझाने के लिए आ
इक उम्र से हूँ लज़्ज़त-ए-गिरिया से भी महरूम
ऐ राहत-ए-जाँ मुझको रुलाने के लिये आ
कुछ तो मेरे पिंदार-ए-मुहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझको मनाने के लिये आ
एक उम्र से हूँ लज़्ज़त-ए-गिरिया से भी महरूम
ऐ राहत-ए-जाँ मुझ को रुलाने के लिए आ
-अहमद फ़राज़
mastach...
ReplyDeleteThank you Anand :)
ReplyDelete