Saturday, June 9, 2012

मागे वळून पाहताना .......


परवा एका मित्राशी फोनवर बोलताना तो म्हणाला " बरेच दिवस काही लिहिलं नाहीयेस, एकपण नवीन पोस्ट नाही ब्लॉगवर तुझी". आणि एकदम चमकून मी विचारलं, "तू इतक्या नियमित माझा ब्लॉग वाचतोस?" माझ्या लक्षातच आलं नव्हतं की असे किती जण आपला ब्लॉग वाचत असतील, जरी त्यांनी काही प्रतिक्रिया नाही दिल्या तरी. तसा हा ब्लॉग मी सुरु करून बरीच वर्षे झाली आहेत पण खऱ्या अर्थाने मी मनातलं यावर उतरवायला सुरुवात केली ती मागच्यावर्षी. जूनच्या दुसऱ्या शनिवारी झालेल्या एका परीक्षेनंतरचा निवांत वीकेंड....आणि मी लिहिती झाले. अनेकदा मी म्हणते तसे हे शब्दांचे खेळ. छोट्याशा मनोगताला भलीमोठी शब्दांची आरास. उद्या जूनचा दुसरा शनिवार, माझ्या टीममधील एकीची उद्या तीच परीक्षा आहे, तिला शुभेच्छा दिल्या आणि मला आठवले की खऱ्या अर्थाने येत्या रविवारी आपला ब्लॉग ही एक वर्षाचा होईल.
या एक वर्षात, या ब्लॉगने मला व्यक्त व्हायला मदत केली. मी नेहमी म्हणते की आजूबाजूला अनेक जण, अनेक नातेवाईक, मित्र मंडळी जरी असली तरी प्रत्येक वेळी ते सर्व "माझिया जातीचा" या सदरात मोडतातच असे नाही, त्यामुळे तो शोध तसा कायमच असतो. पण हा ब्लॉग माझी मनातलं काही सहज मांडायची गरज पूर्ण करतो. तशा अर्थाने ही माझी डायरीच.......कोणालाही वाचायची परवानगी असलेली. त्यामुळे सुरुवातीला तो कोणी वाचतो की नाही याची मी फारशी दखल घेत नसे. पण नंतर लक्षात आले की माझ्या ओळखीतले अनेक जण तो वाचतात. प्रतिक्रिया पण देतात. कधी प्रत्यक्ष भेटीत, किंवा फोनवर आवर्जून तसं सांगतात ही.  अशा प्रतिक्रिया तुमचा उत्साह वाढवतात हे मात्र खरं. असा हा,  माझे, मला" असलेल्या ब्लॉगने संवादाचा ही सेतू बांधायला सुरुवात केली. 
संवाद संपला की नाती संपतात, म्हणूनच मला जापायचा आहे हा सेतू, हे नातं. संवाद संपला की सारे जगणेच रुक्ष कोरडे होवून जाते. म्हणूनच "आपुला हा संवाद आपणाशी" असाच चालू राहो.

Saturday, May 19, 2012

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा.......

कुमार गंधर्वांचा गाणं ऐकणं ही एक आनंददायी गोष्ट. अनेकदा त्यांनी लावलेला "सा" अंगावर काटा आणतो, रोमांचित करतो. एखादी पावसाळी संध्याकाळ. त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम, अगदी कमी उपस्थिती, पण तुमच्या सुदैवाने ते मात्र कार्यक्रम स्थळी वेळेवर पोहचले आहेत. त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे कितीही कमी लोक असले तरी  ते गाणं सुरु करणारच. बाहेर कोसळणारा वरुण आणि आत ही बरसात. अगदी स्वरात चिंब भिजवून टाकणारी. आपोआप डोळे मिटून घेता यावेत, आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचा भान निघून जावं. कानापर्यंत पोहोचणारा प्रत्येक सूर, कानात, मनात साठवता यावा. आता कुमार गंधर्व नाहीत, त्यांना प्रत्यक्ष समोर बसून गाताना ऐकण्या इतकी मी नशीबवान नव्हते. तरीही......


छानशी सुट्टी असावी. सर्व सुट्टी स्पेशल कामे बाजूला सारून हाती असलेला वेळ मनासारखा घालवता येण्याची मुभा असावी. घरात नि:शब्द शांतता  असावी. बाहेर ही कुंद अशी हवा असावी. कधी कधी अशी हवा मला खूप आल्हाददायक वाटते. दुपारी मनाजोगे जेवण, नंतर एक छानशी डुलकी व्हावी. उठल्यानंतर, फ्रेश होवून टि.व्ही. समोर जावून बसावे. सगळे पडदे सारून सुंदरसा सिनेमा पाहण्याकरिता मनाजोगी वातावरण निर्मिती व्हावी.   आणि एखादा आवडता, सिनेमा शांतपणे बघता यावा. कोणत्याही जाहिरातीशिवाय, कोणतही व्यत्यय न येता. कोणताही फोन, मोबाईल, घराची बेल  काही काही वाजू नये या वेळी. एखादी  हिंदी किंवा इंग्लिश सांगीतिक प्रेमकहाणी. रोमन हॉलिडे किंवा चोरी चोरी सारखे, राजकपूर किंवा देव आनंद चा एखादा हळूवार. हाणामारी, गुन्हेगारी, किंवा आर्ट फिल्म्सच्या नावाखाली दाखवले  जाणारे नको इतके वास्तव यातली कोणतीच गोष्ट मला आवडत नाही. हळू हळू मी सोफ्यावरून खाली जमिनीवर उतरते, आणि माझ्या सोबत सोफ्यावरचे लोड, तक्के ही. मधेच काही क्षण थांबून एखादा कप कॉफी बनवून घेवून तिचा आस्वाद घेत पुन्हा सुरुवात. हळू हळू मग संध्याकाळ होवू लागते, घरात साठवलेला हलकासा अंधार थोडा गडद होवू लागतो. त्या नायिकेच्या जागी मी आता स्वत:ला पाहू लागते. एक हलकीशी धुंदी मनावर पसरलेली असते. खरतर खूप खास नाही यात तरीही....माझ्यासाठी असं सर्व घडणं हाच एक कपिला-षष्ठी चा योग येण्याजोगी गोष्ट आहे.

Saturday, May 12, 2012

असेच काही उदासवाणे

ऑफिसला जाताना रस्त्यात एक सिग्नल लागतो, तिथे हमखास दोनतीन गरीब मुले-मुली तुमच्या गाडीपाशी येतात. हातात एक फडकं असतं, काही न बोलता गाडीची समोरची काच पुसू लागतात, जो पर्यंत तुम्ही पर्समधून पैसे काढत नाही तोपर्यंतच मात्र ...अर्थात सिग्नल ही काही सेकंदाचाच असतो. मी दर वेळी २ रु. हाती ठेवते, विचार करते किमान काम करून पैसे मिळवावेत एवढं समजलं आहे हे ही नसे थोडके. या वर माझी चेष्टा करणारी माणसे माझ्या आसपास असतातच. 

ज्या समाज व्यवस्थेचा आपण भाग आहोत तेथे इतक्या मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आहे की ते कोणी एका दोघांच्याने दूर होणे शक्य नाही. पण मी पण या समाजाचाच जर एक भाग असेल तर मी कोणत्यातरी स्वरूपात माझा सहभाग त्याच्या निर्मूलनासाठी द्यायलाच हवा. अनेकदा मी चितळ्यांच्या दुकानात जाते, घरी विशेष अशा गोष्टी खाणारं कोणी नसतं तरी काही ना काही मिठाई, फरसाण घेवून येते, असू दे कोणी घरी अचानक आलं तर असावं म्हणून. त्या दुकानाच्या बाहेर अनेक लहान मुले भीक मागत असतात. त्या दुकानातून बाहेर पडताना मला इतका अपराधी वाटतं की नुसते एक दोन रु. हातात ठेवून काही फारसं साध्य होणार नाही. मग मी बाजूला एक दोन खाऊ ची दुकाने आहेत तिथून काहीतरी सामोसा, इडली वगैरे विकत घेवून त्यांना देते. तिथेच बाजूला इतर फुटकळ विक्रेते असतात जसे की लिंबे, गजरे, डाळिंबे विकणारे. परवा असंच काही एका मुलीला घेवून दिल्यावर बाजूला उभा असलेल्या गजरेवाल्याने ते तिच्या हातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. ते पाहून मी त्याला ओरडले, की तिला खावू दे. पण आपण तरी असे किती पुरे पडणार. अनेकदा नको असतानाही मी सिग्नलला गजरेवाल्यांकडून गजरे घेते. काही उपयोग नसतो  मला त्यांचा. थोडा वेळ गाडीत छान सुवास दरवळतो इतकेच. 

आज सिग्नलला उभी असता नेहमीप्रमाणे एका मुलगी गाडी जवळ आली, काच पुसू लागली, पैसे देवू केल्यावर, माझ्या बाजूच्या खिडकीतून  समोर ठेवलेले चुईंग गम सारख्या दिसणाऱ्या पाकिटाकडे बोट दाखवून ते मागू लागली, पण तिच्या दुर्दैवाने ते चुईंग गम नव्हतं, मी हातात पैसे ठेवून, ते देणार नाही सांगितला. सिग्नल संपून गाडी सुरु करेपर्यंत ती गाडी सोडेचना. आता जरी ते चुईंग गम असतं तर त्याने का तिचे पोट भरणार होते? इतकं उदास, इतकं हतबल वाटू लागलं नंतर मला की पुढे जावून मला गाडी  चालवयालाच  सुचेना, शेवटी मग गाडी बाजूला घेवून, थांबले, पाणी पिऊन, पाच मिनिटे तशीच शांत बसून राहिले मग पुढे गेले. पण प्रश्न हा की असा हे किती दिवस चालणार?

Thursday, May 3, 2012

जडतो तो जीव, लागते ती आस

माझी लेक लहान होती तेंव्हा पासून तिला घरात कुत्रा हवा आहे. आणि flat मध्ये तो पाळायला माझा सक्त विरोध. आपण दिवसांचे कित्येक तास घराबाहेर राहायचे आणि मुक्या प्राण्यांना कोंडून ठेवून त्यांचे हाल करायचे हेच मुळी मला मान्य नाही. शेवटी तडजोड होवून घरात छोटे पक्षी आले. ते घरात गेली ६ वर्षे आहेत. ते त्यांच्याच विश्वात खरंतर जगत असतात, त्यांना वेळच्या वेळी खायला प्यायला द्या बाकी त्यांचे तुमच्याकडे लक्ष ही नसते. तुम्ही घरी या, बाहेर जा त्यांच्या जवळ जा ते दखल पण घेत नाहीत. त्यातले काही एकमेकांशी रक्तबंबाळ होईपर्यंत भांडतात, आणि म्हणून जर त्यांना वेगवेगळ्या पिंजऱ्यात ठेवले तर एकमेकाशी तिथून सतत बोलत राहतात. एक पक्षी त्याच्या जोडीदाराचे खूप लाड करत असे, ती पक्षीण खूप आळशी होती, तरीही त्याचा तिच्यावर खूप जीव होता. दोघे भांडत ही खूप असत ते पाहणे हा एक छान विरंगुळा असे. 


छोटी पिल्ले संस्कृती बाहेर काढत असे, त्यांना हातात घेवून बसत असे. एका रात्री स्वप्न पडलं की एक पिल्लू उडालं म्हणून, सकाळी काही कोणाला त्याबद्दल बोलले नाही. ( अशी स्वप्ने तुलाच कशी पडतात असा कोणी उगाच म्हणू नये म्हणून) आणि खरंच दुसऱ्या दिवशी एक पिल्लू संस्कृतीच्या हातून सुटलं आणि उघड्या खिडकीतून उडून गेलं नंतरचा सारा वेळ संस्कृती रडत राहिली. नंतरचे दोन दिवस त्याच्या साठी टेरेसमध्ये खाणं ठेवून त्याच्या परत येण्याची वाट बघत राहिलो. 

मागच्या वर्षी एकदा पक्षीण मलूल दिसली. आम्ही दोघे ते पाहून अस्वस्थ झालो, कसे बसे तिला मीठ-साखरेचे पाणी पाजून, सतत लक्ष देवून वाचवले तेंव्हा कुठे बरे वाटले. परवा बडोद्याला गेले तेंव्हा पक्षांच्या आवाजाने दुपारी झोपेतून दचकून जागी झाले, वाटले की आमचेच पक्षी ओरडत आहेत, पण नंतर लक्षात आले की ते त्या घराच्या बागेतले होते. गेले २/४ दिवस घरात नव्हतो आणि काय झाले कळलेच नाही, आज सकाळी पाहतो तर तो पक्षी खूप ओरडत होता आणि पक्षीण निपचित पडून होती, तिला वाचवायची कोणतीही संधी न देता....... संस्कृती सकाळ पासून उदास आहे, आम्हा दोघींचेही डोळे सारखे भरून येत आहेत. काही न बोलता संस्कृतीने तो पक्षाला दुसर्या पिंजऱ्यात हलवले, तो पिंजरा साफ केला. कोणत्याही संवादाविनाही किती जीव लागतो याचं हे उदाहरण.

Friday, April 27, 2012

माझी मी ......


अनेकदा मी माझ्याच पाऊलखुणा पुन्हा पुन्हा शोधत राहते
त्याच जुन्या वळणांवर आठवणी नव्याने जागवू पाहते ||
अनेकदा मी मलाच विसरू पाहते
अन श्वासांची गणिते मांडत राहते ||
अनेकदा मी साधं सरळ सोपं जगायचं नाकारू जाते 
अन याच जन्मी पुन्हा नव्याने रुजू पाहते ||
मला कधी कधी गम्मत वाटते हिंदू धर्माची, एखादा धर्म इतका सहिष्णू, इतका सर्वसमावेशक, इतका उदार मतवादी कसा असू शकतो. हा एकमेव जगातला धर्म असेल की या धर्माचे असून, त्याचे पालन करणे तुमच्यावर बंधनकारक नाही, देवाचे अस्तित्व तुम्ही नाकारू शकता, रूढी, परंपरांचे पालन न करताही तुम्ही जगू शकता, इतकेच नव्हे तर उघड उघड त्याला नावे ही ठेवू शकता आणि कागदोपत्री तरीही त्याचे नाव लावता....काय म्हणावं यास?

Thursday, March 8, 2012

पराधीन आहे जगती

परवा ती गेली. ती म्हणजे खरंतर नाव ही लक्षात नाहीये तिचं. बऱ्याचदा तिचा उल्लेख xxx ची बायको, xxx न्ची सून असाच होत असे. एकदाच भेटलो होतो आम्ही. पण तिचं जाणं चटका लावून गेलंय. दोन रात्री पाठ टेकली की तीच आठवते आणि डोळे भरून यायचे थांबतच नाहीत. या आधी गेल्या आठवड्यात एकदा तिने झोपेतून मध्यरात्री जागं केलं होतं. त्याचं असं झालं, की जेंव्हा आम्ही भेटलो होतो, घरी आली होती ती, मुलाच्या मुंजीचं आमंत्रण करायला. सर्वसाधारण IT वाल्या लोकाना गळ्यात ID सोबत किल्ल्या आणि RSA टोकन अडकवायची सवय असते. पण हिच्या हातात किल्ल्यांचा जुडगा होता ज्यात टोकन होतं. गेल्या आठवड्यात स्वप्नात तोच जुडगा पहिला. किल्ल्या कमी झाल्या होत्या आणि RSA टोकन नव्हतंच. जाग आली आणि तीच आठवली. काहीही स्वप्न पडतात असं म्हणत झोपी गेले पुन्हा, पण टोकन नव्हे तीच हरवून जाईल असं नव्हतं वाटलं. तिच्या आजारपणाची पण कल्पना नव्हती. आजारपण तरी कसलं... कर्करोग झालाय आणि ७/८ महिन्यात सर्व खेळ खतम. माझ्या नात्यात एक जण आहेत ज्यांना ४० वर्षांपूर्वी कर्करोग झाला होतं आणि आजही त्या निरामय आयुष्य जगत आहेत.




पहिल्या लग्नाचे उलटे पडलेले फासे, त्यानंतर आता कुठे सारं सुरळीत होतंय असं वाटत होतं आणि तीच निघून जावी? का ग आयुष्याची लढाई इतक्या पटकन हरलीस? का नाही त्या लेकरात जीव अडकला? त्याच्या नशिबी आई-बाप जवळ असण्याचं सुख नाहीच का? आणि तो तुझा सखा ज्याने प्रवाहा विरुद्ध जावून तुला साथ दिली? त्याची साथ कशी ग सोडावीशी वाटली? तुझी स्वप्न? अगं आता कुठे जगायला सुरुवात केली होतीस ना? इतक्यात कंटाळलीस?


फारशी ओळख पाळख नसतानाही तिचं असं जाणं अस्वस्थ करून गेलंय. गेल्या काही दिवसात असं अजून एकीने अस्वस्थ केलं होतं. पण तेंव्हा त्यात mix भावना होत्या. तिने आत्महत्या केली होती त्यामुळे एकीकडे वाईट वाटत होतं पण राग ही आला होतं तिचं. शेवटी रागाने मात केली आणि वाईट वाटणं थोडं कमी झालं. पण हिच्या बाबतीत असं नाहीये. हिची प्रतिमा एक लढाऊ व्यक्ती अशी होती. कदाचित वयाने थोडी लहानच होती. तिचं जाणं मला जागं करून गेलं. पुन्हा एकदा आयुष्याच्या क्षणभंगूरतेची जाणीव करून देणारं. वाटलं काय मी पुढच्या ३/४ दशकांचां नियोजन करत आहे? इथे तर क्षणाचा भरवसा नाही. अस्वथता घेरून टाकतीये. अनेकदा जवळची नात्याच्या माणसांचं जाणं ही इतका अस्वथ करत नाही.

Status update

व्यक्त होणं तशी प्रत्येकाची गरज. कधी एखाद्या खास व्यक्तीपाशीच वा कधी फक्त आपल्या मनातलं बोलता येणं. कोणी ते ऐकताय, वाचतंय, प्रतिसाद देतंय याच्याशी फारसं देणं-घेणं नसलेलं. हे असं व्यक्त होणं खूप तात्कालिक असतं, जरुरी नाही काही दीर्घकालीन असं काही त्यातून गवसेल. पण किमान स्वत:च्याच विचाराकृतींचे विविधरंगी आकृतीबंध पुढे जावून जे कदाचित हास्यास्पद वाटतील, कदाचित मोहक वाटतील. पण ती काळाची गरज असते.




जोपर्यंत मी एका सर्वोत्तम IT कंपनीचा भाग होते तोपर्यंत तेथील BB किंवा blog माझी ही दुसऱ्या प्रकारची गरज तरी पूर्ण करत असे.. जेंव्हा बदलाची चाहूल लागली तेंव्हा मी फेसबुक चा विचार सूरू केला. तोपर्यंत मला कधी त्याची गरज वाटलीच नव्हती. आता ६ महिन्यांपेक्षा जास्त दिवस झालेत पण काहीतरी मिसिंग आहे. सावरीची वाळकी शेंग उघडली जावी आणि त्यातला कापूस (लहान मुलांच्या भाषेत "म्हाताऱ्या") हवेत भिरभिरत राहावा तसं काहीतरी दिवसरात्र डोक्यात भिरभिरत असतं. पण कित्येक दिवस झालेत, त्यांची एकसंध गुंफण मी करू नाही शकलेली. ही देखील एक प्रकारे घूसमटच. अनेकदा असं वाटून जातं की ही डोक्यातली सारी चक्रे थांबवीत. एका शांत झोपेतून फ्रेश जाग यावी आणि सारे विचार, ताण हलके होवून जावेत. पण असं घडत नाही. आजकाल जेंव्हा जेंव्हा मी फेसबुक ला लॉग-इन होते तेंव्हा बऱ्याचदा इथल्या चर्चा, status updates माझ्या अस्वस्थतेत भर घालतात. खरंतर या अवस्थेस माझी मीच कारणीभूत असेन, तरीहि असं वाटतंय की थोडे दिवस यापासून दूर राहून पाहावं. स्वत:च स्वत:शी संवाद साधावा. थोडे म्हणजे किती माहित नाही. असं नाही घडलं तर काय माहित नाही. असं ठरवून आखीव रेखीव असं आयुष्य थोडंच असतं?

Saturday, January 21, 2012

माझिया जातीचा मज कोणी भेटो..........

सध्या अनेक मराठी पुस्तकं वाचतीये...म्हणजे सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी एक, घरी आल्यावर एक, वीकेंड चा तिसरंच...मजा वाटत आहे. सर्वात वेड लावलंय ते "सुनीताबाई देशपांड्यांच्या - प्रिय जी. ए." या पुस्तकाने. "माझिया जातीचा मज कोणी भेटो" ही प्रत्येक माणसाला निरंतर वाटणारी ओढ असते. जी. ए. आणि सुनीताबाई मधील हा पत्र-संवाद ही काहीसा असाच. हा एकतर्फी संवाद इतका वेड लावतो तर दुतर्फी पत्रोत्तर वाचणे म्हणजे तर जणू एका सुंदर नात्याचे मूक साक्षीदार होण्याचे भाग्यच .... 


खरंतर यापूर्वी पण त्यांनी मला भारावून टाकलं होतं, जेंव्हा "मी आहे मनोहर तरी" वाचलं होतं. तेंव्हा कॉलेजमध्ये होते मी आणि ते पुस्तकं नुकतंच प्रकाशित झालं होतं , आणि त्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती, तेंव्हा मी कॉलेज च्या एका वार्षिक अंकात " आत्मवृत्तावर अशी झोड उठवणं कसं चुकीचं आहे" हे ठसवणारा लेख लिहिला होता. 

आत्ता पर्यंत अनेक व्यक्ती "बाप माणूस" वाटल्या, अनेक खूप आवडल्या पण कोणाचं अनुकरण करावं असा कधी वाटलं नव्हतं, ही पहिली व्यक्ती जिच्या पाऊल खुणा धुंडाळत आपण चालावं असं वाटून गेलं.

Thursday, January 12, 2012

याचसाठी केला होता अट्टाहास.

एखादी महफिल असते. कधी कान इतके तृप्त होतात, वाटतं बस हेच ते, याचसाठी केला होता अट्टाहास. तर कधी सूर लागतात कधी लागत नाहीत, कधी तानपुरे जुळतात कधी जुळत नाहीत, कधी कधी सर्वोत्तम गायकाला मनाजोगी साथ मिळत नाही, कधी सर्व काही उत्तम जमून येते तरीही रसहीन होते महफिल. तरीही रसिक सवाई गंधर्वला जाणे सोडत नाहीत. एखाद दिवशी एखाद्या महान गायकाचं गाणं रंगलं नाही म्हणून त्याला ऐकणं कोणी सोडत नाही. त्याचं महत्त्व काही कमी होत नाही.
आयुष्य म्हणजे वर्ल्ड कप फायनल नसते की आज नाही जिंकलो तर संपले सारे. जिंकणे हरणे काही क्षणांची बात.
आयुष्य म्हणजे अशीच रोज नव्याने जमणारी मैफील असते. सतत कलाकार बदलत असतात प्रत्येकाची तऱ्हा निराळी, हर एकजण आपल्या गळ्यातून काय हरकती काढेल माहीत नाही. कोणी मनात मावणार नाही इतका आनंद देवून जाईल तर कोणी निराशा करेल. दर दिवशीचे वेगवेगळे राग निराळे, आपण कधी कलाकार तर कधी रसिकजन. मैफिलीला रोज उपस्थिती लावणे हे आपले काम.