Saturday, December 22, 2012

या वळणावर ......


कातरवेळा.... आदित्य अस्वस्थ. तरीही बाहेर पडलेला,उंचापुरा आदित्य, स्मार्ट, बारीक काड्यांचा चष्मा डोळ्यांवर, अंगात जीन्स आणि पांढरा  शर्ट. रस्ता फुटेल तसं चालत राहावं, बरोबर फक्त मोबाईल घेतलेला. गाणी ऐकत चालत राहावे हरवलेले काहीतरी पुन्हा परत मिळते का ते बघत. मोबाईलच्या कॉर्डचे एक टोक कानात, दुसरे मोबाईलशी जोडलेले आणि मधे हा सारा गुंता.  तो मनात म्हणतो "अगदी आपल्या दोघांची अशीच अवस्था आहे बघ.  दोन टोकांना आपण दोघे, आणि मध्ये हे सारे आपल्या प्रेमाचे, आठवणींचे, सुख-दु:खाचे हे सारे गुंते."
 
एकंदरीतच हा गुंता सोडवणे अवघड आहे. असा विचार करून  तो  गाणे सुरु करतो.........."रंजिश ही सही....दिल ही दुखानेके लिये आ...." का माझ्या प्ले-लिस्ट वर हीच गझल सर्वात पहिली लागते? पहिल्यांदा ऐकताच या गाण्याच्या प्रेमातच का पडायला झालं होतं? जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेंव्हा आपली भेट झाली नव्हती. म्हणजे तुझ्या भेटीपूर्वीच मी या गाण्याच्या प्रेमात होतो.  पण "दिल ही दुखाने के लिये आ" हे मागणे मी कधी मागितले नाही, तरी हेच का?" 
 
मनात आलेली गोष्ट मिळाली नाही असे कधी होते हेच त्याला  जिथे माहित नव्हते, तिथे इतक्या खोलवर पोहोचणाऱ्या दु:खाची कल्पना केवळ अशक्य. पण हे गाणे कुठेतरी खोलवर जाऊन रुतलेले. अशा अचानक भेटलेल्या, अचानक गवसलेल्या गोष्टी तुमचे आयुष्य बघता बघता बदलून टाकतात नाही? या गाण्यानंतर तो  मेहंदी हस्सन, बेगम अख्तर, गुलाम अली, जगजीत-चित्रा यांचा दिवाना होत गेला.  दु:ख वेड  लावते म्हणतात ते कसे ते त्याला तेंव्हा कळू लागले.
 
रेडीमेड असे करिअर समोर होते, एका दिवसाच्या नोटिशीवर तो  घरचेच ऑफिस जॉईन करू शकणार होता, नव्हे करणारच होता. एकदा का इथून इंजिनिअर झाला  कि दोन अडीच वर्षे अमेरिकेत पूढील शिक्षणासाठी आणि तिथून थेट घरच्याच कंपनीत ....सिनिअर पोस्टवर. सारे कसे अगदी आखीव रेखीव. तेंव्हाच त्याची  भेट झाली उल्काशी, कॉलेजमधल्या एका सोशल अवेअरनेस च्या एका मीटिंग मध्ये. झोपडपट्टीतल्या एका शाळेत महिन्यातून दोन रविवारी ती  शिकवायला जायची. या साऱ्या गोष्टी तेंव्हा मैलोनमैल दूर होत्या त्याच्यापासून. ती  बोलत होती,  वर्गातल्या मुलांना आवाहन करत होती थोडा वेळ या कामासाठी देण्यासाठी. आदित्य ऐकत होता  कि नव्हता  ठाऊक नाही पण भारावून गेला होता.. पुढच्या रविवारी उल्का बरोबर जायचे त्याने कबूल केले आणि चक्क सकाळी ९ वाजता त्या शाळेत पोहोचला  देखील!
 
मग अनेक रविवार तो  उत्साहाने तिथे जातच राहिला. अक्षरा नावाची एन.जी.ओ. होती जी झोपडपट्टी, तसेच बांधकामावरील मजुरांच्या मुलांसाठी या शहरात शाळा चालवत होती. उल्काची आई त्या एन.जी.ओ. शी संबंधित होती ओघाने उल्का अधून मधून तिथे शिकवायला जाताच होती.  दोन्ही कारणे होती आदित्यसाठी तिथे जाण्याची.  तिच्या सोबत राहणे तर होतेच पण या मुलांना शिकवणेही  इतके आनंददायी होते कि बाकी त्याच्या नित्याच्या अनेक एषो आरामाच्या गोष्टी तितक्या त्याला  महत्त्वाच्या वाटेनाशा होत गेल्या. सवयी बदलत गेल्या. अनेक तडजोडी तो  सहजगत्या करू लागला. त्यांचे शेवटचे वर्ष होते ते. त्यामुळे प्रोजेक्ट सबमिट करण्याचे कामही होतेच. त्यामुळे रात्र रात्र जागून प्रोजेक्टचे मित्रांसोबत बसून केलेले काम. उल्का त्याच्या पेक्षा २ वर्षे मागे होती. तसे फार दिवस आदित्यचे  इथे राहिले नव्हतेच. एकदा शेवटचे सेम संपले कि मला लगेचच पुढच्या तयारीला लागायचे होते. ही गोष्ट आतापर्यंत इतकी साधी सरळ होती कि काही त्यावर विचार करायचे काही कारणच नव्हते.
 
पण त्याच्या  मनात मात्र काही वेगळेच विचार सुरु झाले होते. इथे राहून हे काम करण्यात मोठी मजा वाटू लागली होती. समाज बदलवण्यात आपला सहभाग त्याला आनंददायी वाटत होता. आयुष्यात प्रथमच समाजात तो इतका मिसळून गेला होता. अक्षरात येण्यापूर्वीचे आणि त्या नंतरचे त्याचे जगच निराळे होते. अक्षराने त्याचे विचार, राहणीमान, सवयी, आवडी-निवडी बऱ्याच बदलून टाकल्या होत्या. शिवाय उल्काच्या सहवासाची ओढ होतीच. एकीकडे हळूहळू त्यांच्या गाठीभेटी वाढू लागल्या होत्या. तशी उल्का एक हुशार, पण थोडी लाडावलेली मुलगी होती. आईने समाज कार्यात स्वत:ला झोकून दिलेले होते, घरी पैशाला काही कमी नव्हती. मजा म्हणून ती हे शाळेत शिकवण्याचे काम रविवारी करत होती. इंजिनीअर का व्हायचे होते याचे पण कोणते कारण तिच्याकडे नव्हते. बाबा म्हणाले म्हणून ती इथे आली होती.  थोडक्यात अभ्यासात हुशार, दिसायला गोड अशी, लाडावलेली, श्रीमंत घरातली, पण करीअर वगैरे गोष्टींचा फारसा विचार न केलेली, आयुष्याबद्दल फार मोठी स्वप्ने नसलेली.
 
एके  दिवशी सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर सहजच त्याने हा विषय काढला.
 
"बाबा, मी आता असे केले कि पुढच्या शिक्षणासाठी  एखाद दोन वर्षे मधे जाऊ देवू का? "
"का रे आदित्य? काय विचार आहे पुढे तुझा?"
"हि सेम संपल्यावर सरळ आपली कंपनी जॉईन करतो, आणि नंतर २ वर्षांनी जाऊन पुढचे शिकेन, शेवटी बाबा अनुभव महत्वाचा असे तुम्हीच नेहमी म्हणता ना?"
"अरे, हो ते आहेच. पण आता तुला जे काही शिकायचे ते शिकून घे. मी कंपनी सांभाळायला समर्थ आहे. परत आलास कि मग तुलाच सांभाळायचे आहे सारे कामकाज. थकलो आता मी."
"असे काय बोलता बाबा?"
"आता मी जात नाही, नंतर पाहू."
"बरं, तुला जसे ठीक वाटेल तसे. माझे काही म्हणणे नाही"
 
हेच हवे होते त्याला. मग मात्र त्याने अक्षराच्या कामात अगदी झोकून दिले स्वत:ला. सोबत मधून मधून घराच्या कंपनीत जाणे चालूच होते. जात्याच हुशार आणि लहानपणापासून घरात बिझनेसचे बाळकडू मिळालेले असल्याने त्याला ते फारसे जड गेले नाहीच. उल्काची आणि त्याची मैत्री दिवसेंदिवस गहरी होत चालली होती. निदान असे त्याला वाटत होते. अक्षराच्या कामात ती थोडा वेळ  त्याच्या सोबत असे. बाकीचा वेळ तिचा कॉलेज आणि  मौजमजा करण्यात जात असे. पण संध्याकाळी कॉफी शॉप, कधी ट्रेक तर कधी सिनेमा असे छान दिवस चालले होते. पण उघडपणे या नात्याबद्दल बोलावे असे कोणालाच वाटत नव्हते. अक्षराच्या आता अशा ३ ठिकाणी पूर्णवेळ शाळा सुरु झाल्या होत्या. आणि त्याचे बरेचसे श्रेय आदित्यला जात होते. त्यामुळे उल्काची आईपण आदित्यवर खूष होती.

(क्रमश:)

Wednesday, November 28, 2012

कांदा मुळा भाजी.......


लहानपणापासून मंडईत जाणे हि माझ्या आवडीची गोष्ट! तेंव्हा घरी फ्रीज नसल्याने २/२ दिवसांची भाजी घरी येत असे. भाज्यांचे नीट रचून ठेवलेले ढीग. सर्वत्र जाणवणारा ताजेपणा, रसरशीतपणा इतका मोहवणारा असतो की .....नंतर कॉलेजला जावू लागले तो पर्यंत घरी फ्रीज चे आगमन झाले होते, त्यामुळे मी खूप आनंदाने रविवारी भाजी घेऊन येत असे, नुसती भाजीच नव्हे तर फळे, देवपूजेसाठी आठवडभर पुरतील इतकी फुले असं सारं घेऊन आले कि मग मला खूप छान वाटत असे. नंतर त्या घरी नेलेल्या भाजीची निवडा निवडी करण्यासाठी आईला काय कष्ट पडतात याची तेंव्हा कल्पनाच नव्हती. ढीगभर भाजी घरी घेऊन येण्यात, तिच्या ताजा वास श्वासात भरून ठेवणेच इतके आनंददायी असते की हा त्रासाचा विचार ठेव्हा मनात कधी येतच नसे.
अजूनही ही गोष्ट तितकीच आवडीची आहे. भाजी मंडईत जावे, ताज्या ताज्या भाज्या बघितल्या की काय घेऊ अन काय नको असे होऊन जाते. दिवसाचे १०/१२ तास ऑफिसमध्ये जिचे जातात तिला रोज जाता येता भाजी घेणे शक्यच नाही. त्यामूळे आठवड्याची भाजी एकदमच हा शिरस्ता गेली अनेक वर्षे आमच्याकडे आहे. अशारितीने भाजी आणणे, निवडून वेगवेगळ्या प्लास्टिक मध्ये ठेवणे म्हणजे आठवडाभर आज काय भाजी करावी ही चिन्ता मिटते. मात्र वीकेंड मधल्या कोणत्या दिवशी भाजी आणायची, किती आणायची, तिची उस्तवार करायला कशी जमणार आहे याचा आधी विचार करावा लागतो, पण म्हणून काही  त्यातली मजा कमी होत नाही. त्यातून हा ऋतुच आनंदाचा ठेवा असावा असा ताजा तवाना. 
रविवारी सकाळीच मंडईत शिरावे. कोणत्या नव्या भाज्यांचे आगमन झाले आहे याचा अंदाज घ्यावा. तुरीच्या शेंगा, गाजर, मटार आणि मेथीच्या ताज्यातवान्या गड्ड्या दिसू लागणे ही माझ्या मंडईत जाण्याच्या आनंदाची परिसीमा असते. उंधियो, मेथीचे विविध प्रकार जसे की ठेपले, भरपूर लसूण  घालून केलेली सुकी भाजी, मेथी गोटे, गाजर हलवा, मटार करंजी, मिक्स भाज्यांचे सूप, लोणचे असे विविध प्रकार मनात डोकावू लागतात. त्यामुळे भाज्या घेत घेतच माझा आठवडाभराचा मेन्यू मनातल्या मनात तयार होतो. आत शिरल्याबरोबर मिरची, आले लसूण याचा गाळा असतो. थंडी पडू लागलीये, थोडे आले जास्त घेवूया म्हणजे वड्या करता येतील. लसूण ही घ्यायला हवा, थोडी सुकी चटणी करून ठेवायला हवी. मग पुढचा गाळा असतो रसरशीत टोमाटोचा. रविवारी पुलाव आणि सार करावे का? कोणी पाहुणे येणार आहेत का, कोणता सण आहे का, एखादा खास पदार्थ बरेच दिवसात झाला नाही अशी घरच्या दोन थोर व्यक्तींकडून तक्रार येण्याची शक्यता आहे का  या आठवड्यात हे एकदा आठवून पाहावे आणि त्या नुसार भाज्या घेत जावे. किती पालेभाज्या आपल्याचाने निवडून होतील याचा अंदाज घेत त्यांना ही पिशवीत जागा करून द्यावी. मग स्वीट कॉर्न मला न्या म्हणत मागे लागतो, म्हणून त्यास घ्यावेच लागते. आजकाल लाडावलेल्या मुलासारखा तो झाला आहे. उपासाचे दिवस असतील तर मग रताळी कुठे दिसतात का ते पाहावे लागते, म्हणजे एकादशीची सोय होईल, रताळ्याच्या गोड काचऱ्या, तिखट कीस, हे पदार्थ साबुदाण्याचे  वडे किंवा थालीपीठ  सोबत तांबड्या भोपळ्याचे भरीत, ओल्या नारळाची चटणी  असले की उपासाचे ताट कसे भरल्यासारखे वाटते नाही?  
तुरीच्या शेंगा दिसल्या की उन्दियोच्या इतर भाज्या जसे की कंद, सुरती पापडी, कच्ची केळी  आल्यात का हे पहावे, सगळ्या पाव पाव किलो घेत घरी जावून उंधियो बनवावा आणि पुढचे २/३ दिवस मनसोक्त त्यावर ताव मारावा  नाहीतर तुरीच्या शेंगाना घरी नेवून मीठ हळद घालून उकडून टेबलवर ठेवून द्याव्यात, बघता बघता संपून जातात. भाद्रपदात मिळणाऱ्या मावळी काकड्या दिसल्या की मग हळदीची पाने कुठे मिळतील ते पाहावे म्हणजे गोड पानग्या करता येतील. भरपूर कोथिंबीर आली की मग एकदा वड्या झाल्याच पाहिजेत. छान केशरी दळदार भोपळा आहे, तो  घारगे बरेच दिवसात झाले नाहीत अशी आठवण करून दिल्याखेरीज राहात नाहीत. मटार चांगला आला आहे, भरपूर घरी न्यावा, एकदा मटार उसळ आणि पाव हा बेत, कधी मटार भात तर कधी मटार करंजीचा बेत करावा. फेब्रुवारी संपता संपता फणसाच्या कुयऱ्या दिसतात का याचा शोध घ्यावा किंवा आसपासच्या कोणत्या घरी फणसाचे झाड आहे ते लक्षात ठेवून त्यांना सांगून ठेवावे. आजकाल मला वर्षभर ओले काजू सुकवून ठेवता येण्याची पध्दत कळली आहे, त्यामुळे फणस आणि ओले काजू याची भाजी, त्याला वरून लाल मिरचीची फोडणी म्हणजे सुख! तसा नोव्हेंबर ते जानेवारी हा काळ म्हणजे या सुखाचा परमावधी. इतक्या प्रकारच्या भाज्या या दरम्यान उपलब्ध असतात की काय घेऊ आणि काय नको असे मला होऊन जाते. घरी नेलेल्या भाज्यांची उस्तवार करता यावी आणि विविध चवींचे खास पदार्थ बनवता यावेत म्हणून न या कालावधीत वीकेंड २ नाही तर ३/४ दिवसांचा असावा अशी फार इच्छा आहे.... :) 

आवळे घरी न्यावेत, किसून सुपारी, थोडा मोरावळा करून ठेवावा. थोडे लोणचे करावे त्यात थोडी आंबे हळद जी ओली मिळते या काळात, ती घालावी. लिम्बांचे गोड लोणचे बनवून ठेवावे, उन्हाळ्याची बेगमी म्हणून सरबताची सोय करून ठेवावी. पालक वर्षभर मिळतो, पण या काळात तो जास्तच ताजा टवटवीत वाटतो, त्याच्या पुऱ्या कराव्यात. भरली वांगी किंवा खानदेशी वांग्यांचे भरीत करावे, सोबत गरमागरम भाकरी आणि ताजे लोणी. किंवा भरपूर लसूण आणि तेल घालून केलेली आंबाडीची भाजी .... आहाहाहा..... एरवी जास्त न आवडणारे पावटे पण या काळात कधीतरी उसळ करून चविष्ट लागतात. नवरात्रात कधी काकडीसारखी लांबसडक जांभळी वांगी मिळतात, त्यांचे काप करावेत, डाळीचे पीठ, मीठ तिखट लावून थोड्या तेलावर भाजले की किती खातो हेच कळत  नाही, तीच गत सुरणाच्या कापांची.

थोडी शोधाशोध केली तर लसणीची पात मिळते कधी...थोडी कधी आमटीत टाकावी नाहीतर कधी छानशी चटणी करावी. इतर कोणत्याही सिझन मध्ये मिळणारा मुळा या ऋतूत मला नेहमीच चविष्ट वाटत आलाय. जवळपास चक्का वाटावा इतकं घट्ट दही घ्यावे, त्यात ओला नारळ, कोथिंबीर, एखादी हिरवी मिरची मिठाबरोबर वाटून,सोबत चिमुटभर साखर...सही लागते ही कोशिंबीर!
याच काळात फळे ही भरपूर येतात यामुळे चिकू शेक, स्ट्राबेरी किंवा सफरचंद शेक, फ्रुट सलाड हे ओघाने आलेच. (दूध आणि फळे एकत्र करून खावू नये या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून) नुकती नुकतीच दिसू लागलेली द्राक्षे, स्ट्राबेरी संत्री यांचा घरी वावर वाढतो तो थेट आंब्यांचे घरी आगमन होई पर्यंत. फळांची रेलचेल मग कधी इतकी होते की मग कोबीच्या कोशिम्बीरीत द्राक्षे दिसू लागतात, काकडीसोबत घट्ट दह्यात मीठ मिरची लावून डाळिंबाचे दाणे जावून बसतात तर कधी सफरचंद, डाळिंब, काकडी, अननस आणि थोडे अक्रोड चुरून घातले की थोड्या मीठ मिरपुडीने सुरेख सलाड तयार होते. कधी सफरचंदाचा कधी अननस घालून केलेला शिरा जेवणाची  लज्जत वाढवतो. तर कधी क्रीम मध्ये थोडी साखर घालून फेटले आणि भरपूर स्ट्राबेरी त्यात घातल्या की एक सुंदर डेझर्ट तय्यार!
बघता बघता हा हिरवागार सीझन संपू लागतो, हळू हळू मंडई रुक्ष भासू लागते. त्याच त्या ४/५ भाज्या दर आठवड्याला घरी नेतोय की काय असे वाटू लागते. थोडा पाराही चढा होवू लागतो. जेवण तितके आनंददायी वाटेनासे होते. मग फळांचा राजा पुन्हा अवतरतो आणि सारा रुक्ष नीरसपणा दूर करतो. पानात रोज सकाळ संध्याकाळ आमरस असला गरमागरम पोळी किंवा भातासोबत की मग कोणती भाजी आहे किंवा नाही याने काही फरक पडेनासा होतो. आंबा, फणस, जांभळे, करवंदे, चेरी, खरबूज, कलिंगड ही फळे मात्र दिवस रसदार करतात आणि उन्हाळा थोडा सुखाचा जातो. याच उन्हाळ्यात थोडी पावसाळ्याची बेगमी म्हणून थोडे सांडगे, भरल्या मिरच्या, थोड्या कुरडया (भाजी साठी) करून ठेवाव्यात. पावसाळ्यात मंडईत जाणेच नकोसे होते. कसेबसे ते दिवस ढकलून मी मनापासून वाट पाहत राहते या हिरव्यागार, ताज्या टवटवीत दिवसांची!


(त्याचं काय आहे की एखादा पदार्थ बनवताना किंवा खाताना मी त्यात इतकी गुंतलेली असते की त्यांचे फोटो काढणे वगैरे माझ्या लक्षात येणे केवळ अशक्य...त्यामुळे सर्व फोटो आंतरजालावरून साभार.)

Tuesday, November 20, 2012

शतकानिमित्त संवाद.....


हे मात्र अगदी ठरवूनच होते. १००वी पोस्ट कशी असावी याचा विचार साधारण ९६/९७ वी पोस्ट ब्लॉगवर टाकतानाच सुरु झाला होता. आवडीच्या विषयावरच असावी हे नक्की झालं होतं. लिहिताना आवडीचा विषय म्हणजे खादाडी. तसंही "इस बात पे सेलिब्रेशन तो बनता है" :) पण झालं काय की मधल्या २/३ पोस्ट साठी काही लिहिणेच होईना. हे म्हणजे कसं की "९६ वर असताना १०० वी रन कशी घ्यायची हे नक्की करायचे, पण मधल्या ३ धावा घेतानाच इतके चाचपडत खेळायचे की कधीही आउट होईल" असे झाले.

तसा मी ब्लॉग सुरु केला तो २००९ मध्ये. काय आणि कसं लिहायच याचा फारसा अंदाज आणि आराखडा नव्हताच. नंतर मी माझ्या कामात आणि अभ्यासात इतकी व्यस्त होऊन गेले की या गोष्टी जवळपास विसरूनच गेले. त्यामुळे आरंभशूरपणा या गटात हा ब्लॉगही लगेचच सामील झाला. याचे दुसरे कारण म्हणजे इन्फी बीबी आणि इन्फी ब्लॉग ज्यामुळे व्यक्त होण्यासाठी इतर कशाची गरजच नाही उरली.

त्यामुळे खऱ्या अर्थाने मी या ब्लॉगवर कधी लिहू लागले तर ते २०११च्या एप्रिल-मे महिन्यात. तो कोण वाचतय, नाही वाचत आहे, याकडे सुरुवातीला फारसे माझे लक्षही नव्हते. फेसबुकवर पण मी त्याचसुमारास अवतरले त्यामुळे तशा दोन्ही गोष्टी अपरिचितच...... मग परिचय होण्याचा सुरुवातीच्या काळात असतो तसा बुजरेपणा आणि एक प्रकारचे अवघडलेपण तेंव्हाही होतेच. नावाप्रमाणेच हा ब्लॉग माझे मला असाच होता. थोडा लोकांपासून अलिप्त असा. अनेक दिवस काही न लिहिता जात, ज्याचे फार काही वाटतही नसे. नंतर कधीतरी मराठी-ब्लॉग विश्वावर हा जोडला आणि खऱ्या अर्थाने ह्या जगाशी माझी ओळख झाली. तत्पूर्वी काही ब्लॉगर मित्र मैत्रिणी होत्या जसे की श्रीयुत धोंडोपंतांचा ब्लॉग त्यांचाच दुसरा सांजवेळ, अजून एक मित्र आनंदचा ब्लॉग आणि अजून काही निवडक.

मुळात मी आळशी जमातीतली. नेटाने एखादी गोष्ट करण्यासाठी तितकंच मोठं कारण हवे. यावेळी ते कारण माझे मीच होते त्यामुळे हा प्रवास किती चालू राहील याबद्दल साशंक होते. तरीही मी खऱ्या अर्थाने लिहिती झाले. कोणी वाचतंय किंवा नाही, हे न पाहता व्यक्त होण्यातला आनंद घेवू लागले. खरतर हे अशा प्रकारे व्यक्त होणे याला मर्यादा आहेत, याची जाणीव असूनही हा प्रवास १००व्या पोस्ट पर्यंत चालू राहिला. याचे श्रेय आपणा सर्वाना. सहज,उस्फूर्त असे जेवढे लिहिणे जमेल तेवढेच लिहायला आजतरी मला आवडते आहे. त्यामुळे ठरवून काही लिहिणे थोडे अवघडच जाते. मग  ती कविता असो, किंवा इतर लिखाण असो अगदी कोणावर टीका असो, नाहीतर आठवणीना उजाळा. याच ब्लॉगने काही नवीन मित्र-मंडळही मिळवून दिले. त्यांच्या या ब्लॉगवर किंवा मेल, फेसबुकवर मिळणाऱ्या प्रतिक्रिया मला लिहिते ठेवत गेल्या, आणि मी लिहित गेले. या साऱ्यांचे मन:पूर्वक आभार!

१०० व्या पोस्टनंतर आता असे वाटते की स्वत:च्या जगापलीकडे जाऊन आता लिहिता आले पाहिजे. म्हणजे अट्टाहास नाही पण तरी देखील. नाव जरी मी....माझे.....मला असले तरी त्यापलीकडचे पण एक विशाल असे जग जे आहे त्याला या ब्लॉगवर माझ्या नजरेतून वाचता यायला हवे. "मी"ला वगळून लिहिता यायला हवे. खादाडीवर लिहायला हवे. पण सध्यातरी रेसिपी शेअर करणे हा हेतू नाहीये. त्याकरिता अनेक उत्तम असे ब्लॉग्स, उत्तम अशी पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. मी त्यापेक्षा वेगळं काय लिहू शकते? सर्वसाधारण नाही तरीदेखील किमान "अनघास्पेशल" अशातरी रेसिपी या ब्लॉग वरून शेअर व्हायला हव्यात, स्वयंपाक या कलेविषयी लिहायला हवे, विविध प्रदेशातील खाद्य परंपरा, त्यांची वैशिष्ट्ये या बद्दल लिहायला नक्कीच आवडेल. मुळातच भारतीय खाद्य परंपरा मला खूप भावते कारण त्यामागे केलेला विचार, त्यातील वैविध्य मला मोहून टाकते. पण अजून अंदाज येत नाहीये की हे लिहिणे कसे आणि किती दूरपर्यंत पेलवेल?

तरीही हा ब्लॉग माझ्यासाठी एक सेतू बनला "virtual" जगाशी जोडले जाण्याचा. जितके आनंददायी आहे स्वत:कडून सशक्त असे काही लिखाण घडणे, तितकेच आनंददायी आहे ते इतरांचे असेच ब्लॉग वाचणे. अनेकजण इतके सुंदर आणि सकस लिहितात की, त्यांच्या नवीन लिखाणाची मी वाट बघत असते. वेळ मिळेल तसे वाचूनही काढते. दिवसातून एकदातरी, त्यांच्यापैकी कोणी काही नविन लिहिले कि नाही ते पाहते. धोंडोपंत, महेंद्रकाका, वटवट सत्यवान हेरंब, तन्वीचा सहजच, अनघाचा ब्लॉग, जागेची टंचाई असण्याच्या काळात शब्दांना अब्द अब्द जागा करून देण्याऱ्या साविताताई, अपर्णाची माझिया मना म्हणत घातलेली साद, आनंदचा White lily, संवादिनी, अजूनही फळ्यावर लिहिणारे विसुभाऊ (गुरुजी होते का हे पूर्वी?), भानस, चकली प्रमाणेच मस्त असा वैदेहीचा ब्लॉग असे अनेक. यांच्यापैकी अनेकांशी माझा प्रत्यक्ष परिचय नाही. पण अनेक वर्षांचा परिचय असावा अशी ओळख त्यांच्या ब्लॉगमुळे वाटते. मी मागे म्हंटल्या प्रमाणे "संवाद संपला की नाती संपतात, म्हणूनच मला जपायचा आहे हा सेतू, हे नातं. संवाद संपला की सारे जगणेच रुक्ष कोरडे होवून जाते. म्हणूनच "आपुला हा संवाद आपणाशी" असाच चालू राहो."

Monday, November 12, 2012

ते ३ शब्द.....त्या साऱ्या आठवणी

मेल बॉक्स उघडल्यावर  नवीन येऊन पडलेल्या मेल्सवर आधी एक नजर टाकली. एका मेल कडे लक्ष गेले अन सब्जेक्टलाईन मधल्या त्या ३ शब्दांनीच पौर्णिमेच्या चंद्रासारखे हसू माझ्या चेहऱ्यावर पसरले. अगदी आतून आलले खरेखुरे! मन अलगद कापसाप्रमाणे उडत मागे गेले. अनेक आठवणी पहाटे उमलणाऱ्या प्राजक्तासारख्या दरवळू लागल्या. 

नाही नाही .... जास्त उत्सुकता मी ताणत नाही. "ते ३ शब्द" असे  म्हणता, जे पहिले स्वाभाविक पर्याय येतील हे ते नव्हते. :) नवीन काळे लिहित असलेल्या "सॉंग ऑफ द डे" या ब्लॉग वर add झालेल्या नवीन पोस्ट ची ती मेल होती आणि "ते ३ शब्द" होते "दिन ढल जाये ....." खरं सांगू का या शब्दांच्या जागी इतर कोणतेही  शब्द जसे की "आज फिर जीनेकी तमन्ना", "पिया तोसें नैना लागे", "गाता राहे मेरा दिल" "सैया बेईमान" "तेरे मेरे सपने" किंवा "वहा कौन हे तेरा" असते ना तरी मी इतकीच खुश झाले असते. बाकी सगळ्या मेल्स बाजूला ठेवून, त्या ब्लॉगवर जाऊन हि पोस्ट वाचायला घेतली. तसंही नवीन काळे जेंव्हा एखाद्या गाण्या बद्दल लिहितात ना तेंव्हा त्याचे इतरही अनेक संदर्भ, त्या गाण्यासंबंधी किस्से सांगत जणू तो सगळा काळ तुमच्या समोर उभा करतात. फ्रेम बाय फ्रेम गाणे तुमच्या नजरेसमोर जिवंत करण्याचे कसब त्यांच्या लेखणीत आहेच. आणि जेंव्हा ते गाणे "दिन ढल जाये" सारखे असते तेंव्हा तर बात काही और असते.

अति परिचयात अवज्ञा ते हेच का? खरं तर या पूर्वीच मी याबद्दल लिहायला पाहिजे होतं. पण कसं ते माहित नाही पण कायम राहूनच जाते.  "गाईड" या सिनेमा बद्दल मी पूर्वीच काही लिहा बोलायला हवे होते इतका तो माझ्या काळजाच्या जवळचा आहे. किती वेळा मी तो पहिला असेल माहित नाही. पण असंख्य वेळा पाहूनही मन भरणार नाही असे जे मोजकेच चित्रपट आपल्याकडे बनतात त्यापैकी तो एक.  अगदी लहान असताना असे कुठेतरी बर्याच ठिकाणी लिहिलेले वाचले होते, "मिलीये राजू गाईडसे".....पण तरी म्हणजे काय ते अनेक दिवस कळलेच नव्हते. अंधुकसे आठवते ते म्हणजे जेंव्हा लहानपणी सर्वात पहिल्यांदा तो दूरदर्शनवर लागणार होता तेंव्हा आजी म्हणाली "लहान मुलांनी पहावा असा तो नाहीये"(म्हणजे तेंव्हाच्या प्रचलित कल्पना आणि संस्कारांप्रमाणे, आजचे मापदंड यास लागू होणार नाहीत.) तरी मी तो पहिलाच.(नेहमी असेच घडते न? मोठ्यांनी विरोध करावा आणि लहानांनी ती गोष्ट हमखास करावीच). त्या नंतर अनेकदा बघतच गेले. पण नुसताच बघितला आणि विसरून गेले असे नाही झाले.....प्रेमात पडले...या गाण्यांच्या,सचिनदांच्या, वहिदा रेहमानच्या जिच्या मुळे सौदर्याचे मापदंड खूप वर गेले..... आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच सिनेमाने माझ्या  स्वप्नातल्या राजकुमाराची प्रतिमा रेखाटली. जी आयुष्याचा खराखुरा साथीदार मिळाल्यानंतरही मनात कायम राहिली. हळुवार, प्रेमळ देखणा "तेरे मेरे सपने अब एक रंग .....तेरे दु:ख अब मेरे, मेरे सुख अब मेरे" म्हणणारा..... जी सिनेमातले काही खरे नसते माहित असतानाही मी कित्येक वर्षे जपली.

पुढे अनेकदा हे असे हिंदी सिनेमाच्या सुवर्ण युगातले अगदी मैलाचे दगड नाहीत पण त्यांना बाजूला करून तो इतिहास पूराच नाही होवू शकणार असे सिनेमे पाहताच गेले. गोडी अशी लागत गेली जी आजही कायम आहे. जसे की देव आनंदचे हम दोनो, मुनीमजी, सी. आय डी. नौ दो ग्यारह, प्रेम पुजारी, ज्वेल थीफ, काला पानी, काला बाजार, जब प्यार किसीसे, तेरे घर के सामने, बंबई का बाबू, .... गुरुदत्त यांचे प्यासा, साहिब बीबी, आर पार  चौदावी का चांद ....अशी भली मोठी यादी आहे. आजही सर्वात छान माझी सुट्टीची कल्पना हीच आहे की " शांत निवांतपणे हे सगळे सिनेमे" पाहता यावेत अशीच आहे. 

गाईड हा सिनेमा ज्यातले प्रत्येक गाणे इतके सुंदर की मला कधी यातले सर्वात आवडते कोणते हे आजतोवर कधी ठरवता नाही आले. जर कधी सर्वात आवडणारी १० गाणी निवडावी लागली तर गाईड आणि प्यासा या दोन सर्वात सुंदर सिनेमातील नक्की कोणती १० हे ठरवताना माझी दमछाक होईल. प्रत्येक गाणे त्या कथेमध्ये असे बेमालूम गुंफलेले की त्या गाण्यानेच कथा पुढे न्यावी.या गाण्यांशिवाय ह्या सिनेमांची मी कल्पनाही करू शकत नाही, इतका ती गाणी प्राण आहेत या सिनेमांचा....नव्हे तर या युगातील अनेक अशा सिनेमांचा. या गाण्यांनी मला घडवलंय .....आज फिर जीनेकी तमन्ना है म्हणत पुढे सारे विसरून पुढे जगायला शिकवलंय, युं ही काहोगे तुम सदा के दिल अभी नाही भरा ...म्हणत संयम शिकवलाय, तेरे मेरे सपने म्हणत आयुष्यभराची साथ द्यायला, दिल ढल जाये..... ने विरहाची जाणीव करून दिलीये, चांद फिर निकाला...म्हणत कोणाचीतरी वाट पाहायला,  ये दुनिया अगर मिलभी जाये तो क्या ही....ने भीषण वास्तवाची जाणीव करून दिलीये...आणि तरीही सर जो तेरा चकाराये तो ....चा उपाय ही या गाण्यानीच सांगितलाय. या गाण्यांनी माझे भावजीवन समृध्द बनवले. खरे तर हे सिनेमे माझ्या पिढीच्या जन्माच्याही बरेच आधीचे.....पण आमच्या पूर्वीच्या आणि नंतरच्या अनेक पिढ्यांवर या गाण्यांनी राज्य केलंय .... माझ्या प्रत्येक भावनेला चपखल शब्दात बांधणाऱ्या या साऱ्या गाण्यांना सलाम! 

Monday, November 5, 2012

आली माझ्या घरी ही दिवाळी.....

(खरतर ह्याला मागच्या दिवाळीची पार्श्वभूमी आहे....नवीन नवीन ब्लॉग लिहायला मागच्या वर्षी सुरुवात केली होती....त्यामुळे तेंव्हा लिहिलेली पोस्ट मनासारखी झाली नव्हती, तिचीच ही सुधारित आवृत्ती.)


दिपावली ४ दिवसांवर येऊन पोहचली, अजून मी घरात एकही फराळाचा पदार्थ बनवला नाही, आकाशकंदील लावले नाहीत, पणत्या शोधून ठेवल्या नाहीत. काल रात्री उशिरा घरी पोहचले, बिल्डिंग मधे शिरताना सहज वर लक्ष गेलं, एका घरी आकाशकंदील लागला होता, विचार आला अरे बापरे! अजुन आपण याचा विचारच केला नाहीये. दिवाळीचे वेध आजकाल लवकर लागतच नाहीत. पण असं म्हणावं तर नवरात्री पासूनच लक्ष्मी रोडवर पाय ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती असते. आता या सार्‍या गोष्टींसाठी वीकेंडची वाट पाहावी लागणार, किती कामे ठेवली आहेत त्या दोन दिवसांसाठी!

घरात शिरले समोर लक्ष गेलं, आणि चकित झाले, घर उजळून गेलं होतं, टेरेसभर चांदण्या उजळल्या होत्या. लेकीने आणि नवऱ्याने मिळून दिव्यांच्या माळा आणि आकाशकंदील लावले होते.छोट्या छोट्या गोष्टी किती आनंद देऊन जातात नाही? मग आठवत राहिली लहानपण ची दिवाळी. किती आधीपासून त्याचे वेध लागायचे. कारण घरात फराळाची तयारी सुरू होत असे, पणत्या शोधून ठेवल्या जात, आकाशकंदील नवा बनवला जात असे, मला किल्ला करायला खूप आवडत असे. आम्ही जिथे राहत होतो तिथे मी एकमेव मुलगी होते जिला किल्ला करण्यात इंटरेस्ट होता. मोठे दगड जमा करायचे, माती आणायची, दगड रचून त्यावर ओबडधोबड चिखल लिंपून किल्ला बनवायचा. त्यावर अळीव पेरायचे, सकाळ संध्याकाळ पाणी मारायचे त्यावर आणि कधी उगवतात याची वाट पहायची. किल्ल्याच्या खाली शेते, तळी, कारंजी बनवायची. बाबांच्या मागे लागून फटाक्यांबरोबर मातीची चित्रेही दरवर्षी आणायची. ती चित्रे कोणी पळवून नेऊ नये म्हणून काळजी घ्यायची. आणि शेवटच्या दिवशी किल्ल्याच्या गुहेत सुतळी बॉम्ब लावून तो फोडायचा. खूप मजा वाटायची त्यात मला. ती सवय आजही टिकून आहे .....आता किल्ले बांधले जातात मनातल्या मनात!


फराळाची तयारी बरीच आधी सुरु होत असे, जसे की अनारशांसाठी पीठ तयार करणे, भाजणी बनवणे, करंजाचे सारण बनवणे, एवढेच काय त्याकाळी पिठीसाखर देखील गिरणीतून दळून आणली जात असे. आईने लाडूसाठी पाकात टाकलेला रवा, खवा वाटीत घेऊन खायला खूप आवडायचं मला....पण मिळायचं नाही कारण नैवेद्य दाखवायचा असायचा. चकली, शंकरपाळे करताना मदत करायची असायची. आज फराळाचे बनवले तर उद्या सकाळी सुद्धा घरात तो सुवास दरवळत असे. सलग चार दिवस घरी फक्त फराळाचे बनत असे. जसे की चकली, शेव आणि चिवडा एका दिवशी, लाडूचा रवा सकाळीच भाजून पाकात टाकायचा, आणि मग करंज्या, चिरोटे करून घ्यायचे, मग शेवटी लाडू वळायचे. एक आख्खा दिवस शंकरपाळी आणि थोडे अनारसे. लक्ष्मीपूजनासाठी म्हणून मग थोडे बेसनाचे लाडू. सगळे मोठे डबे  आधीच घासून पुसून ठेवलेले असत, मग सगळे पदार्थ त्यात भरून ठेवायचे.

लहानपणी दिवाळी सुरूच मुळी होत असे ती वसुबारसेपासून. संध्याकाळी जवळच्या गाय असणाऱ्या ठिकाणी जायचे, तिला फराळाचा नैवेद्य दाखवायचा, त्या मालकाला दक्षिणा द्यायची आणि परत. मग धनोत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज. अशी किमान ६ दिवसांची दिवाळी असे मधे एखादा भाकड दिवस आला तर तो बोनस. आजकाल सारखं नाही, जेवढे दिवस ऑफिसला सुट्टी तितकीच दिवाळी. प्रत्येक दिवशी काहीतरी खास असे. दिवसभराच्या घडामोडीत आणि जेवणातही. जसे कि पाडव्याला हमखास बासुंदी बनत असे, आई ओवाळणीत काय मिळणार याची उत्सुकतेने वाट पहात असे, दुसऱ्या दिवशी मामा येणार किंवा नाही यावर बेत ठरत असे. बाबा आत्याकडे जात आणि मामा आमच्याकडे.

कपडे खरेदी हा एक आवडता उद्द्योग....तसा तो आज ही आहे..... पण तेंव्हा वर्षातून एक दोनवेळाच ते मिळत त्यामुळे त्याचे जरा जास्तच कौतुक वाटे. ..... माझे बाबा खूप सारे फटाके घेऊन यायचे, त्याची तिघात वाटणी होत असे. एकमेकांचे फटके चोरणे आणि मग त्यात शेवटी भांडभांडी होत असे. सर्वात जास्त फटाके मी उडवत असे. दोन वेळा फटाक्यांमुळे भाजल्यावर देखील. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहिली माळ कोण लावणार अशी चुरस असे. खरच इतक्या पहाटे उठत असू की सकाळी ७ पर्यंत तेल, आंघोळ, फटाके, फराळ सगळं होत असे..... रेडीओवर पहाटे दिवाळीचे खास असे कीर्तन, ते वातावरण निर्मिती करत असे. मग पर्वती चढायला जाण्याचा कार्यक्रम. इतकी मजा यायची. ११ वाजेपर्यंत घरी परत. दहीभात खावून, चांदोबा, किशोर हे दिवाळी अंक वाचत मस्त झोप काढायची. संध्याकाळी पुन्हा फटाके, दारात रांगोळी.


 दिवाळीनंतर लगेच आजीकड़े जात असू. उरलेले फटाके तिथे घेवून जात असू. मामाची मुले आणि आम्ही तिघे भावंडे. आजोबांच्या घरी शेती होती, ज्यात तांदूळ पिकत असे, त्यामुळे त्याची काढणी आणि धान्य घरी येण्याचे अनेकदा तेच दिवस असत. तिथल्या देवळात पहाटे उठून काकड आरतीला जाणे. कुडकुडत जावे लागते म्हणून तिला काकड आरती म्हणत असे मला लहानपणी वाटे. अगदी शाळा सुरु व्हायच्या आदल्या दिवशीपर्यंत तिथे मुक्काम करूनच घरी परत येत असू. आजकाल बोलावल्याशिवाय सख्खे नातेवाईकही एकमेकांकड़े जात नाहीत. आता सगळं बदललं. सार्‍या गोष्टी पैशाने उपलब्ध झाल्या, वेळ दुर्मिळ झाला.आता पर्यावरणाच्या नावाखाली फटाके बंद झाले. फराळाचे पदार्थ सतत घरात दिसू लागले, काही मजा राहिली नाही.......

अहो......आठवणीत रमलेल्या काकू! काहीतरीच काय? म्हणे काही मजा राहिली नाही. किती मजा असते.....


किमान एक महिना आधीपासून चितळे, वृंदावन त्यांच्या मेल्स येवून पडतात, त्या पाहून किमान दोन- तीन आठवडे त्यांना जावून किंवा ऑन लाईन फराळाची ऑर्डर द्यावी लागते. कोणाकडे काय चांगले मिळते हे लक्षात ठेवावे लागते म्हणजे तो पदार्थ आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना खिलवून आपल्याला थोडा भाव खाता येतो. सगळेच पदार्थ स्वत: बनवणे शक्य नसले तरी, एखादा आपला असा खास पदार्थ घरी बनवायचा असतो. खरेदीसाठी कोणता वीकेंड यावर घरी जोरदार चर्चा घडवून आणावी लागते, एखाद्या वीकेंड वर एकमत झाले तर त्या दिवशी सहकुटुंब लक्ष्मी रोडवर सकाळीच पोहोचावे लागते, दुकाने उघडतील भले १० वाजता, पण त्यावेळी पार्किंगला जागाच मिळणार नाही. थोडा उशीर झाला तर मग दुकानातही उभे राहायला जागा मिळणार नाही. अशी "Shop till you drop" खरेदी झाली की मग पुन्हा कोणत्यातरी खास,गर्दी असणाऱ्या वैशाली, दुर्वांकुर नाहीतर श्रेयस मध्ये गर्दीत जेऊन घरी परत. हुश्श!!! पण सगळ्यांनी एकत्र जावून अशी खरेदी करण्यातही आनंद मिळतो ना!


दिवाळी पूर्वी करायचे अजून एक महत्वाचे काम म्हणजे एखाद्या लहानमुलांच्या आश्रमास दिवाळीच्या काही वस्तू पाठवून द्यायच्या. कोणाच्या तरी चेहऱ्यावर आपल्या या लहानशा कृतीमुळे हसू फुलत असेल तर त्या इतकी दुसरी चांगली गोष्ट आहे का?

घर अजून देखणे कसे दिसेल हे पहायचे असते. ठेवणीतले गालीचे, सजावटीचे समान बाहेर काढावे लागते. मायेचा हात घरातील वस्तूंवरही फिरवायचा असतो. दारात रांगोळ्या काढायच्या असतात, तोरणे बांधायची असतात. रांगोळी काढणे हा आज देखील माझ्या दिवाळीचा एक मोठ्ठा भाग असतो. येते काढता येते मला फक्त टिपक्यांचीच रांगोळी. दिवाळीच्या आदल्यादिवशी, रात्री उशिरा घरी पोहचले तरी सुद्धा रांगोळी काढायचीच असते, सोबतीला लेक असते आणि सूचना द्यायला तिचा बाबा! गप्पा मारत २/३ तासात एक रांगोळी पूर्ण होते तेंव्हा जवळजवळ रात्रीचे बारा एक वाजलेले असतात. पण अशी रांगोळी काढल्याशिवाय मला दिवाळी वाटतच नाही. पहाटे नटून थटून "दिवाळी पहाट" च्या एकद्या सुश्राव्य गाण्याच्या कार्यक्रमास हजेरी लावायची असते. एक दिवस सासरचे, एक दिवस माहेरचे, एक दिवस लेकीच्या मैत्रिणी, यांना घरी जेवायला बोलवायचे असते. सगळ्यांपेक्षा वेगळा आणि तरीही रुचकर, सुग्रास बेत करायचा असतो. त्या निमित्ताने चार दिवस आपल्या माणसांसोबत हसत खेळत घालवता येतात. हे ४ दिवस कसे उडून जातात ते कळतही नाही. पर्यावरणाचा विचार करून फटाके घरी आणून उडवणे केंव्हाच बंद झालंय....पण एखादा फायर वायर शो बघायला मजा येतेच ना? पाडव्याला सुग्रास जेवण जेवून सुस्तावलेल्या नवऱ्याला बाहेर न्यायला पटवावे लागते, तेंव्हा कुठे जाऊन पाडव्याची काही खास ओवाळणी पदरी पडते. मग आग्रह करून करून काहीतरी छानशी वस्तू त्याच्यासाठी घ्यायला भाग पडावे लागते. भाऊबीजेला अजून एकदा वसुली केली कि मग दिवाळी संपते. इतक्या दमल्या भागलेल्या जीवाला मग विश्रांती हवी असते, मग जोडून सुट्टी घेवून कुठे तरी ट्रीपला जावे, आपलाच खिसा थोडा हलका करून यावे लागते.

तर काकू......सगळ्या जुन्या आठवणीत रमणे छानच असते हो पण जुन्या आठवणींमध्ये जगत आजचा आनंद हरवू द्यायचा नसतो हो..........पण आताच्या काळातल्या सगळ्याच गोष्टी, प्रथा टाकावू नसतात ना?


(सर्व छाया चित्रे आंतरजालावरून साभार)




Wednesday, October 17, 2012

पुन्हा एकदा मला

पुन्हा एकदा मला दिवाळीत किल्ला बनवायचाय

माखल्या हातांनी स्वयंपाक घरात जावून डोकवायचंय

पेरलेले धान्य कधी उगवतं याची वाट पहायचीय

तिथे पहारा देत शिवाजीसह मावळ्यांचे रक्षण करायचय


पुन्हा एकदा भल्या पहाटे उठून पर्वती सर करायचीय

थकून भागून परत येताच फराळाचे ताट फस्त करायचेय

भरल्यापोटी चांदोबा किशोरच्या साथीने परीराज्यात जायचेय

गोष्टी सांगणाऱ्या वेताळाला एकदातरी पकडून ठेवायचंय


पुन्हा एकदा मला आजोळी जायचंय

बस मधून उतरतानाच मामा दिसतो का ते पहायचय

पहाटे चुलीपाशी बसून आजीशी गप्पा मारायच्यात

रात्री जागून अंधारात घाबरले तरी भुतांच्या गप्पा ऐकायच्यात


पुन्हा एकदा मला दफ्तर घेऊन शाळेत जायचय

न येणारी समीकरणे आता सोडवता येतात का पहायचय

चित्रकलेच्या तासाला सुबक चित्रे काढायची आहेत

डब्यातला खाऊ खाण्यासाठी मधल्या सुट्टीची वाट पहायची आहे


येईल का जाता आता बालपणात पुन्हा?

येईल का होता अल्लड आता मला पुन्हा?

येईल का दारी भोलानाथ आता पुन्हा?

मिळेल का सुट्टी तळे साचून आता पुन्हा?

Tuesday, October 16, 2012

ऐलोमा पैलोमा गणेश देवा.

परवा गाडीत माझी आई, आणि माझा अडीच वर्षाचा भाचा होता. बरोबरचे भरपूर समान बाजूच्या सीटवर ठेवून त्या दोघांना मागे बसू दिले. थोड्या वेळाने गडी गाऊ लागला. आधी शाळेत शिकवलेल्या "पोएम्स" झाल्या. मग गाडी घसरली "शिवाजी अमुचा राणा" वर . हे ऐकून मी चकित. पूर्ण गाणे त्याला म्हणता येत होते. मधेच अडले तर शेजारी आजी होतीच. त्याला विचारले "कोणी शिकवले तुला हे?"

"माज्या आईला येतं हे गाणं, तिला खूप खूप गाणी येतात."

"हुशारच आहे तुझी आई. अजून काय शिकवले तुझ्या आईने?"

"जिलेबीचे गाणे, कारल्याचे गाणे, लाडूचे गाणे आणि शिवाजीचे" (आम्ही सारे खवय्ये! गाणी पण सारी खाण्याच्या पदार्थांचीच?)

"पण तुला तर गुमामाम (गुलाबजाम) आणि सिंघम आवडतात ना? मग तुला आईने गाणे जिलबीचे आणि शिवाजीचे का शिकवले?"

"तिला तेच येत मणून"

नातवाच्या तोंडी ही गाणी ऐकून आजीपण खुश. या संवादाने माझ्या आठवणी ताज्या झाल्या. पितृ पंधरवडा संपत येतो तसे नवरात्राचे वेध लागतात. कसे ते ९/१० दिवस संपतात काही कळत नाही. तसे ते लहानपणी पण लागत. तेंव्हा कारण मात्र वेगळे असे. कारण नवरात्रीचे अप्रूप बाकी इतर कारणांसाठी नव्हे तर त्यातल्या "भोंडल्या" साठी असे. तेंव्हा "गरबा" नामक प्रकार बोकाळला नव्हता इतका. अगदीच तुरळक शक्यतो गुजराथी लोकानी आयोजित केलेला एखादा पारंपारिक गरबा असे. त्याचे फार कौतुक काही वाटत नसे. पण भोंडला महत्वाचा. भल्या मोठ्या अंगणात रोज एक किंवा दोघींचा भोंडला. सगळ्या मैत्रिणी, मैत्रिणींच्या मैत्रिणी जमा होत असत. आमंत्रणाची तशी गरज नसे. आणि आताच्या आयांसारख्या तेंव्हाच्या आयाही नव्हत्या. म्हणजे तेंव्हा शिस्त नव्हती का तर कदाचित आतापेक्षा थोडी जास्तच होती, आई-बाप मुलांचे फाजील लाड अजिबात करत नसत. आमच्याकडे तर म्हंटलेच जायचे "खायचे प्यायचे लाड, नसते लाड नाहीत". सहामाही परीक्षा तेंव्हाही असतंच पण त्या कधी या भोंडल्याच्या आड आल्या नाहीत. तेंव्हा या भोंडल्याला जायला आम्हाला पूर्ण परवानगी असे, अर्थात सातच्या आत घरात हा नियम पाळूनच.


भोंडल्याच्या आधीपासून आईच्या मागे "सांग ना आपल्याकडे तू काय बनवणार?" ही भूणभूण सुरु असे. संध्याकाळी शाळेतून परत आल्यावर मग भोंडला असे. पाटावर हत्ती रेखाटण्यासाठी कोणालातरी पकडावे लागे.(इतकी ग्रेट चित्रकला होती माझी :) ) मग हत्ती काढून झाला की खाली टीपके काढायचे, जितके टीपके तितकी गाणी म्हणायची. जिचा भोंडला आहे, तिने पटावरच्या हत्तीची पूजा करायची मग त्या हत्ती भोवती फेर धरला की भोंडल्याची अशी खास गाणी गात तो सुरु. ऐलोमा पैलोमा ने सुरुवात होवून मग शिवाजीचे,कारल्याचे, कोथिम्बीरीचे, जिलेबीचे, एक लिंबू झेलू बाई अशी गाणी सुरूच राहत. तशी सगळ्या मुली आणि त्यांच्या आयांना ही सारी गाणी येतंच असत. कोणी कोणाला शिकवलेली नसत, जशा लहानपणी गणपतीत कशा ना सगळ्या आरत्या कोणी न शिकवताच पाठ होत तशी. जवळपास तासभर हा गाण्यांचा कार्यक्रम चाले. एकदा का "आड बाई आडोणी" वर गाडी पोहचली की शेवट. मग बाकी मुलीनी खिरापत ओळखायची. अनेकदा एक मुख्य खिरापत आणि सोबत अनेक छोटे छोटे पदार्थ असत. जसे की इडली-चटणी सोबत, घरी तळलेले वेफर्स, साबुदाण्याच्या पापड्या, कोणती तरी वडी किंवा लाडू,......अगदी काकडीचे काप, श्रीखंडाच्या गोळ्या इतक्या साध्या गोष्टींपर्यंत. जिचा भोंडला आहे तिचीच नव्हे तर शेजारच्या काकू, मावशी पण तिच्या भोंडल्यासाठी काहीतरी खिरापत बनवून देत असत. काय दिले ते महत्त्वाचे नसे तर त्यामागचे प्रेम. कोणालाच ओळखता येणार नाही अशी खिरापत आपल्या आईने बनवावी अशी फार इच्छा असे. शिरा, वाटलीडाळ, ढोकळा, आप्पे, घरी केलेला कुकर मधला केक, साटोरी, भाजणीचे वडे असे अनेक पदार्थ असत. एकदा का सर्व खिरापती आलेल्या मुलीनी ओळखल्या की मग सगळ्यांना अंगणात सतरंजीवर बसायला सांगून घरातून खिरापतीच्या प्लेटस आणायच्या, हसत खिदळत त्या फस्त करायच्या. असे सर्व होईतोवर सात साडेसात होत, दुसऱ्या दिवशी कोणाकडे ते पक्के करून सगळ्या पसार होत, पुन्हा दुसऱ्यादिवशी न चुकता भेटण्यासाठी.

संस्कृती जेव्हा लहान होती तेंव्हा हौसेने २/३ वर्षे मी तिचा हा भोंडला केला पण होता. पण आता ती मजा येत नव्हती, न तिला न मला. सर्वात मोठे कारण म्हणजे, तोच शाळेच्या परीक्षा असण्याचा काळ असतो. आणि आता स्पर्धेच्या युगात आई वडीलांना लहान मुलींच्या छोट्या छोट्या परीक्षांचाही खूप मोठा बाऊ वाटतो आणि मग या काळात या गोष्टींमध्ये २/३ तास त्यांना भोंडल्या सारख्या गोष्टींमध्ये घालवू देणे आता कदाचित कोणालाच शक्य नाही. करमणुकीची जेव्हा असंख्य साधने उपलब्ध आहेत तेंव्हा इतके कष्ट घेताय कोण मुलीना २/३ तास रमवण्यासाठी? दुसरा भाग असा ही असेल की नित्य नवीन चवी चाखणाऱ्या या पुढच्या पिढीला, भोंडला त्यातल्या खिरापती याचे विशेष अप्रूप उरले नसावे. मग जेमतेम २/३ लहान मुली, आणि त्यांच्या आया, संस्कृती आणि मी. काय मजा वाटणार?






पण पूर्वीच्या संदर्भात पहिले तर या एका गोष्टीतून अनेक गोष्टी साध्य होत असाव्यात. जसे कि मुलींसाठी एक करमणूक, त्यातली जास्तीत जास्त गाणी ही सासर-माहेर या गोष्टींवर बेतलेली आहेत. कदाचित अशा गाण्यांमधून त्यांची मानसिक तयारी करून घेणे हा एक उद्देश पण असेल. त्यातली काही गाणी तर इतकी मजेशीर आहेत जसं की वेड्याचं गाणं भोन्डल्यात कधी एकदा हे गाणे म्हणतोय आणि त्यातल्या प्रत्येक ओळीवर कधी खिदळतोय असे लहानपणी आम्हाला झालेले असे. ... कारल्याच्या वेलाच गाणं घ्या वेल लावण्यापासून त्याला कारली लागेपर्यंत, आणि ती लागल्यावर त्याची भाजी करून वर आपलं उष्टं काढून मग मुलीची वेणी-फणी करून मग तिला माहेरी धाडणार. म्हणजे इतकी वाट बघावी लागणार तेंव्हा कुठे माहेरी जायला मिळणार. मनात आलं आणि आणि लगेच गेली
असे घडत नाही. शेजारीच माहेर असणाऱ्या मला कदाचित त्याची एवढी किंमत वाटणार नाही, किंवा ऑफिसमधून परस्पर संध्याकाळी आईकडे जाऊन येणाऱ्या मुलींना पण नाही याचे फार अप्रूप वाटणार, पण माझ्या परदेशात असणाऱ्या मैत्रिणींना आजही हे भावेल, कदाचित अगदी सासरच्या लोकांनी जाऊ देण्याचा किंवा न देण्याचा  संदर्भ नसेल तरीही...

अगदी या भोंडल्याची सुरुवात ज्या गाण्याने होते हे गाणेच इतके मोहक आहे. त्यातल्या अनेक शब्दांचा अर्थ मला आजही कळला नाहीये तरी एवढं नक्की ही एक प्रार्थना, एक साकडंच आहे. माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा....अनेकदा वाटून जातं मला कि हा खेळ म्हणजे भातुकलीचा नव्हे तर खऱ्याखुऱ्या संसाराचा आहे. आयुष्याचे रंग त्यात ठळक दिसतात, त्यात आयुष्याचे मागणे मागितलेय,त्यात येता जाता पडणाऱ्या पावसाचे वर्णन आहेत, परतीचा पाऊस कसे कणसात धान्य धरायला मदत करतो याचे वर्णन आहे एवढेच नव्हे तर अंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा वर्षे असे ही वर्णन आहे. कदाचित सातव्या आठव्या वर्षी लग्न झालेल्या मुलींचाही १६ वर्षापर्यंत भोंडला करत असतील त्याकाळी. त्याकाळच्या अनेक गोष्टी ज्या अशा आखीव असत त्याचे आजही कुतूहल वाटल्याशिवाय राहत नाही.

ते दागिन्यांचे गाणे. म्हणजे त्यातूनही मोठी शिकवण आहे. कोणीही दिलेल्या दागीन्यापेक्षा नवऱ्याने दिलेला दागिना सर्वात महत्वाचा. आजच्या संदर्भात असे म्हणू हवे तर नवऱ्याने किंवा स्वत: घेतलेला. पण रुसून माहेरी आलेल्या मुलीने सासू, सासरे, नणंद, जाऊ हे सारे तिला परत न्यायला आले तर काय करावे की सगळे दरवाजे लावून घ्यावेत, त्यांनी दिलेले दागिने पण न घेता (अरे रे :(  सोनं किती महागलंय, असं नाही करायचं......)  झिपऱ्या कुत्र्याला सोडून द्यावे? संस्कार म्हणून पटत नाहीत पण कदाचित गमतीचा भाग असेल तो,  पण स्व-कमाईच्या वस्तूंची बात काही और असते हे लहानपणापासून याच गाण्याने ठसवलं.

पण एकंदरीतच ज्याकाळात ही गाणी बनली त्याकाळचे किमान मुली, स्त्रिया यांचे जगणे यातून प्रगट होत राहते. म्हणजे पहा एखाद्या लहानवयात लग्न लागलेली मुलगी, आपल्या वेडसर नवऱ्याचे वर्णन कसे करेल? "अस्से कसे झाले, माझ्या नशिबी आले?" असेच ना? माहेर सासर यामध्ये मुलीना वाटणारा फरक कसा जसा च्या तसा त्या गाण्यांमधून उतरतो. सासरची प्रत्येक गोष्ट कशी वाईट, माहेरची कशी चांगली, ते अंगण असो, तिथला वैद्य असो. मुलीना वाटणारी माहेरची कमालीची ओढ प्रत्यक गाण्यात दिसतेच. त्यातूनच हे शिकवले जात असेल कि "बाई ग असं असून देखील तुला तिथेच राहायचे आहे, तिथेच एकरूप होवून जायचे आहे. निसर्गाशी जवळीक अनेकदा गाण्यांमधून दर्शवतेच. म्हणजे कोथिम्बिरीच्याच गाण्याचं पहा कि आता मिळत असलेली म्हणजे अश्विन महिन्यापर्यंत असणारी कोथिंबीर हळुहळू मार्केट मधून गायब होईल, मग परत कधी मिळू लागेल तर चैत्रात. आजकाल १२ महिने सर्व भाज्या फळे मिळणाऱ्या आम्हाला नाही यात काही विशेष वाटणार. पण त्या काळी ते महत्त्वाचे असेल ना? 

कोणतही यातलं गाणं घ्या, काहीतरी शिकवण आहेच त्यात. जिलबी बिघडली हे त्याचे उत्तम उदाहरण. अनेक वर्षे "जिलबी बिघडली" हे माझ्या तोंडी वाक्य येतंच हमखास, जेंव्हा माझा एखादा पदार्थ हातून बिघडतो तेंव्हा. हीच शिकवण घेवून पुढे गेलेल्या मला मग त्या बिघडलेल्यातून काहीतरी घडवताही येतेच. यात याहीपेक्षा काही महत्त्वाचे काय तर काहीतरी बिघडत असतानाही सगळं कसं निभाऊन न्यायचे याचे शिक्षण. आजच्या आपल्या जगात या गोष्टी आता बदलून गेल्या आहेत, म्हणून त्या मागे पडल्या. इतकीच शिकवण पुरणार नाही, पण म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही. या गोष्टीना करमणुकीचे साधन म्हणून विशेष आता महत्त्व नाही, पण त्या काळी या गोष्टीतून सणवार म्हणून, प्रथा म्हणून केल्या गेलेल्या या भोंडल्या मधून करमणूक, शिक्षण अशा कितीतरी गोष्टी साध्य होत असतील नाही? तर अशी ही विस्मृतीत गेलेली गोष्ट. माझ्या लहानपणी तरी आम्हा मुलींच्या दृष्टीने भोंडला ही अतिशय आवडती गोष्ट होती. याची आठवण झाल्याबरोबर मी जवळपास सगळी गाणी म्हणून पहिली. अजूनही सगळी पाठ होती. भोंडला करून नाही तर निदान त्या काळात एक फेरफटका मारून येवून् मला ते क्षण पुन्हा एकदा जगता आले हे काय कमी आहे?



Wednesday, October 10, 2012

सांग सखया.........

चालताना तू थोडा थबकलास

नुसताच थबकलास का

दूरवर सोबत करण्याचा

विचार तुझा बदललास?


हाक मारताना तू अडखळलास

नुसताच अडखळलास की

ओठात माझेच नाव असण्याचा

तुझा रिवाज तू बदललास?


बोलताना तू जरासा थांबलास

नुसताच थांबलास की

माझ्यापाशीच मन मोकळे करण्याचा

तुझा हक्कच तू विसरलास?


निरोपाच्या क्षणी तू आवंढा गिळलास

नुसताच आवंढा गिळलास की

आयुष्यातून मला वजा करताना

स्वत:लाच भागून मोकळा झालास?


खरं सांग, सारे काही विसरलास? सारे काही संपले?

खरच संपलय कि

आजही प्रीतीचे नाव घेता

तुझे जग सारे माझ्याशीच येऊन थांबलंय

Saturday, October 6, 2012

क्षणभर विश्रांती ...

१५ दिवसांपूर्वी मी हातात "हिंदू - जगण्याची एकसमृद्ध अडगळ " वाचायला  घेतली. मुळात हे पुस्तक माझ्याकडे कसे आले हीच एक स्टोरी आहे. इतकी वर्षे पुस्तके कधी "buy " कधी "borrow " करत वाचली जात होती. मागच्या वर्षी ठरवले की आता फक्त "buy". नवऱ्याला म्हटलं की एखादा दागिना किंवा भारी साडी कमी घेतली गेली तरी चालेल...पण घरात माझी अशी स्वत:ची लायब्ररी असायला हवी. त्याची हरकत असायचं पण कारण नव्हते. त्या पूर्वी पण पुस्तके अनेकदा विकत घेतली जात असत, पण त्यामागे हा विचार नसे. मग गेल्या दिवाळीत अनेक पुस्तके माझ्या घरी दाखल झाली. जेव्हा ती घ्यायला अक्षरधारा मध्ये गेलो, तेंव्हा आम्ही दोघे ही आपापल्या आवडीची पुस्तके बघत होतो मी एक मोठा गठ्ठा घेवून बिलासाठी घेवून आले तेंव्हा नवरा हे पुस्तक घेवून आला. तरी मी त्याला विचारले " तू वाचणार आहेस का हे?" तर म्हणे "हो" मग मनात विचार आला कधी नव्हे तो बाबा स्वत: पुस्तक वाचेन म्हणतो तर असू देत. जेमतेम ५/१० पाने वाचून ते ठेवून दिले ते आजतोवर त्यास हात लावला नाही. वर्षभरात माझी बाकीची सर्व पुस्तके वाचून झाली. एकसलग वाचले तर दिवसाला किमान ३०० पाने वाचतेच.(घरात बाकी कामे मग कोण करतं, हा प्रश्न कोणी प्लीज विचारू नये), यातली अनेक पुस्तके मी पूर्वीच वाचलेली असल्याने, पुन:प्रत्ययाचा आनंद घेत मी ती वाचली. काही नव्यानेच वाचली. गेल्या महिन्यात काही ना काही कारणाने माझे अक्षरधारा, किंवा अप्पा बळवंत चौकात जाणे होत नाहीये. त्यामुळे वाचण्यासाठी हे एकच पुस्तक आता शिल्लक राहिले होते. वाचायला घेतले, १००/१२० पाने वाचून झालीत, पण रोज घर, ऑफिस, घर  आणि नंतर वेळ मिळेल त्यात फेसबुक, ब्लॉग यात माझा इतका वेळ खर्ची पडतोय की हे पुस्तक नुसतेच डोक्याशी पडून आहे. तर आता हे पुस्तक पूर्ण वाचून झाले की मगच फेसबुक, ब्लॉग. मधेच एकदा "English Vinglish" पण बघायचा आहेच :)

Thursday, October 4, 2012

६५ वी कला

वर्तमानपत्रात आजकाल अनेकदा पहिले पानभर जाहिरात असते, अशी दिसली की प्रचंड राग येतो. पण मला जाहिराती आवडतात, कोणतेही माध्यम असो. वृत्तपत्रीय जाहिराती पाहताना तर मी उजव्या कोपऱ्यातील जाहिरात कंपनीचे नावही आवर्जून पाहते. हळूहळू असे होऊ लागले की आधी मी ते नाव कोणते आहे ते पाहू लागले आणि मग जाहिराती वाचू लागले. पुण्यात एक प्रथितयश बांधकाम व्यावसायिक आहेत. लहानपणापासून मी त्यांच्या प्रोजेक्ट्स च्या जाहिराती पहात आले. त्यापैकी कित्येक आजही मनात घर करून आहेत. मराठी माणसाची अचूक नस पकडणाऱ्या जाहिराती हे यांच्या यशाचे एक सूत्र होते, असे नेहमी वाटत आले. आणि त्यांच्या या यशाचा "सेतू" बांधणारी जाहिरात एजेन्सी फार महत्वाची होती. त्यांनी त्यांच्या एका प्रोजेक्ट च्या हस्तांतरणाची जाहिरात अशी केली होती " सासुरयास चालली शकुंतला, लाडकी शकुंतला......चालतो तिच्यासवे तिच्यात जीव गुंतला"..... अगदी याच भावना मनात ठेवून *** चं हस्तांतरण आज मी करत आहे" किंवा आज घर बुक करा आणि उद्या स्वत:च भूमिपूजनास बसा.....नक्कीच कुठेतरी आत जाऊन पोहचतात त्या जाहिराती. कदाचित माझ्या घरी पण हाच बिझिनेस आहे म्हणून या साऱ्या गोष्टी माझ्यापर्यंत खोलवर जाऊन पोहचतात. एखादी बिल्डींग बांधताना आणि नंतर तिचे हस्तांतरण करताना ना अगदी मुलीला सासरी पाठवतानाच्याच भावना मनात असतात. नंतर त्या कंपनीने जाहिरात एजेन्सी बदलली हे कोणी न सांगताच बदलेल्या जाहिरातींच्या स्वरूपावरूनच लक्षात आले. मग मात्र ते म्हणजे घराण्याचे नाव रोशन करणाऱ्या गायकाने कुठलीही गाणी गावीत तसे वाटू लागले.


गेल्या काही दिवसात काही नव्या जुन्या ads पहिल्या ऐकल्या आणि यावर लिहावे असे तीव्रतेने वाटू लागले. जसे बर्फी बघताना त्यातला मर्फी , त्यातल्या एका दृश्यात ऐकू येणारा जुन्या प्रेस्टीज च्या जाहिरातीचा आवाज. लगेचच नंतरच्या वीकेंड ला T -२० पाहताना बघितलेल्या काही ads . आजकाल जाहिरातींवर मी प्रचंड कमेंट्स करते. शंका येऊ लागली की आपले वय व्हायला लागले काय? ज्या त्या जाहिरातीवर कसे आपले काही वेगळेच म्हणणे आहे? कला आहे ना ती? हा ज्याच्या त्याच्या अभिव्यक्तीचा भाग आहे ना, मग?

६५ वी कला जिला म्हंटले जाते तिने आपले आयुष्य इतके व्यापले आहे, की वर्तमानपत्र, आकाशवाणी, FM , टी. व्ही., रस्त्यावरचे होर्डींग्स, बस, ट्रेन्स मधील जाहिराती, इतकेच काय फेसबूकावरील जाहिराती. कुठेतरी प्रत्येक जाहिरातीची मनात नोंद होतेच. मार्केट ड्रिव्हन इकॉनोमीचा तो अविभाज्य भाग आहे. सेकंदास लाखो रुपये मोजून तुमच्या आमच्या पर्यंत पोचणाऱ्या त्या साऱ्या खरंच तितका परिणाम आपल्यावर आणि पर्यायाने त्या कंपनीच्या नफ्यात वाढ होण्यावर करतात का? नाही म्हणजे तशी नफ्यात वाढ अनेक रीतीने दाखवता येते. ते तितके महत्त्वाचे नाही, पण आपले काय विकत घ्यायचे आणि काय नाही यावर त्या नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात परिणाम घडवतात.

लहानपणी माझा भाऊ जाहिराती चालू असे पर्यंतच टी.व्ही पहात असे, त्या संपल्याकी हा उठून जाई. आजही माझ्या माहितीत अनेक लहान मुले अशी आहेत की जाहिराती ती फार आवडीने पाहतात, जसे की "तुम्हारा साबून स्लो है क्या" किंवा गाडी पार्क करतानाची "लगा क्या?", आय. पी. एल च्या वेळच्या झू, झू च्या जाहिराती, टमी की सुनू या ममी की म्हणत केलेली नॉर सूपची किंवा पिअर्स ची मासूम पिअर्स म्हणत केलेली.
सगळ्यात लाडकी माझी जाहिरात म्हणजे "अमूल बटरची" ची. एखाद्या प्रोडक्टची दर आठवड्याला वेगळी जाहिरात बनते, आणि चालू घटनांचा आधार घेत ती तुमच्या चेहऱ्यावर एक हलकेच हसू आणते ते पण गेली कित्येक वर्षे. कमाल आहे. अनेक जिंगल्स माझ्या फोनची ट्यून बनून माझ्या सोबत असतात. जसं की एअर-टेल ची ज्यात "जाये बसो किन देस पियाजी" हे गाणे वापरले होते. अनेकदा त्या जिंगल्स मुळेच त्या जाहिराती आवडत्या होतात....जसे की जब घर की रौनक बढानी हो, अमूलची जरासी हसी प्यार जरासा,किंवा पूर्वी लागणारी बजाज ची "ज़ब मै छोटा बच्चा था बड़ी शरारत करता था", जुनी डेअरी मिल्क ची त्या मुलीची किंवा सिनेमा पहायला गेल्यावर लागणारी विको ची पूर्ण जाहिरात आठवते? काही जाहिराती जशी की धारा- जलेबी, हमारा बजाज, उस्ताद झाकीर हुसैन यांची वाह ताज, होर्लीक्सची ये है बढता बच्चा कपडा छोटा होता जाये, फ्रेश n juicy असणारी फ्रुटी, गोदरेज ची खुशियोन्के आंगन में पहला कदम........ही लिस्ट थांबतच नाही.

माझ्या मते चांगली जाहिरात(visual media) ती की जी एखाद्या आपण बघत असलेल्या कार्यक्रमाच्या मध्ये व्यत्यय वाटत नाही, बरोबर बसलेल्या कोणाबरोबरही ती बघताना अवघडलेपण येत नाही, हलकेच एक हसू तुमच्या चेहऱ्यावर येते, आणि सहजगत्या नंतर तुम्ही आधी पाहत असलेल्या कार्यक्रमात पोहचता. जर एकंदर जेवढा वेळ मी टी. व्ही. समोर असते त्यापैकी निम्मा वेळ जर जाहिराती बघितल्या जाणार असतील तर, मनोरंजनाचेच निकष त्याला ही लावायला नकोत का? खरंच ती वस्तू विकत घ्यायची की नाही घ्यायची हा नंतरचा विचार.
जो माझा प्रांत नाही, पण मला त्यांच्या जाहिराती मात्र आवडतात, अशा काही त्यांच्या जिंगल्स मुळे किंवा अशीच जाहिरात म्हणून आवडतात. जशी सध्या लागणारी segram ची लिफ्ट मधली "प्यार की राह में चलना सीख ,. इश्क की चाह में जलना सीख. हवासे भी कर बातें लेकिन,. राज चुप्पी का उलझना सीख" किंवा दुसऱ्या दिवशी काहीच न आठवणारा किंवा तसं दाखवणारा सुमीत राघवन. bacardi ची ad ही तशीच त्याच्या जिंगल मुळे आवडणारी. ज्यातल्या काही अजिबात आवडत नाहीत जशा धर्मेंद्र, त्याचा तो सनी यांच्या जाहिराती मात्र .......जाऊ दे अजून काही बोलूया नकोत. खरं तर ज्या गोष्टीना मी सपोर्ट करत नाही त्यांच्या बद्दल काही बोलतही नाही. या काही मात्र त्यास अपवाद.

पण या जाहिराती फक्त पूर्वीच चांगल्या बनत असत असे काही नाही. आजही अनेक उत्तम जाहिराती बनतात जसे की रेड लेबल, डेअरी मिल्क, एअर टेल, आईडिया, एशिअन पेंट्स, रेमंड्स, टाटा nano ची एका लहान मुलीची. जशा ना एअर टेल च्या दोन्ही जाहिराती एक वर उल्लेख केलेली, किंवा दुसरी आर्मीतल्या मुलाची...वोडाफोन पपीची जो त्या मुलीला शाळेच्या बस मागे पळत तिने विसरलेली वस्तू नेऊन देतो, डेअरी मिल्क ची "करेलावाली" मात्र खासच. पूर्वी थोडेच दिवस एक अमिताभ करत असे ती डेअरी मिल्क ची "मिस पालनपुर" ची म्हशीची...ती पाहताच मी उद्गारले की " आता हिला पण सून करून घेणार का?" :D

समाजाचं बऱ्याचदा खरं प्रतिबिंब जाहिरातींमधून उतरतं, त्यामुळेच जर असे घडत असेल की या क्षेत्रातून काही अभिनव, मनमोकळे हसवणारे, किंवा दर्जेदार असे काही येत नसेल तर कदाचित एकंदरीत समाजाचीच अभिरुची बदलत चालली आहे. पण अनेकदा जाहिराती अशा का बनवलेल्या असतात असा प्रश्न सुटत नाही जसे की सध्या दिसणाऱ्या सगळ्या डीओ किंवा परफ्युम्सच्या ....मारा डीओ लागतील मुली/मुले मागे....अरे कोणीतरी जावून सांगा यांना "अरे बाबांनो, असे काही घडत नाही" कोणताही आणि कुठूनही आणलेला परफ्युम असो. तसं पहिला जावे तर तसा थोडा जमानाच "तमीझ" नसण्याचा आहे त्यामुळे सध्या T 20 मध्ये असणाऱ्या पेप्सीच्या जाहिराती, किंवा कोणत्या तरी एका फोन ची ज्यात ती मुलगी आपल्या बापाच्या वयाच्या माणसाला अंकल म्हणत चिडवते आणि हसते. किंवा जेवणाच्या टेबल वर स्वत: न जेवता, फक्त कॅडबरी खाणारी आणि ती बाकी कोणाला न देणारी मुलगी मला आवडली नाही. तशी सध्या एक कोका -कोलाची लिंटास ने बनवलेली "तापमान ४२ डिग्री वाली ...त्यातला सुरुवातीचा सगळा भाग छान वाटतो, अगदी "इस जमीन की सच्ची ख़ुशी है" पर्यंत पण अशा स्थितीत सचिनने येऊन स्वत: कोला पीत "खेलते रहो, खुश रहो" सांगणे हे पटत नाही. त्यापेक्षा नंतर फक्त "कोका-कोला" एवढेच आले असते तरी चाललं असतं ना? असो. पण चांगल्या वाईट गोष्टीनीच तर अनेक गोष्टी अर्थपूर्ण बनतात ना?