आपल्यात इतके गहिरे नाते नव्हतेच कधी 
तरीही  सुखी होतो आपापल्या जगात आपण दोघी 
ओळख होती फार पूर्वी पासूनची तुझी 
मलाच कधी इतकी ओढ वाटली मात्र नव्हती  
तुझ्या  नावासरशी समोर येतात अनेक दिग्गज नावे  
यांच्याशी नाते जोडल्यावर तू दुसऱ्या कोणाकडे का पाहावे?
आवडले नव्हते मला कधीच तुझे  मुक्त जगणे 
मुक्त कसले केविलवाणी धडपड ती 
रोजच्या जगण्याला दिवसाच्या चोवीस मात्रात बसवण्याची 
तुला अशी दूर ठेवता ठेवता,
नकळता डोकावू लागली आहेस मनात 
रुजत चालली आहेस कुठेतरी खोलवर काळजात 
आजकाल दिवसरात्र सोबत असतेस,
माझे क्षण माझ्या ऐवजी तूच जगतेस 
उघड्या डोळ्यांनी पाहते मी सारी धडपड तुझी 
माझ्या प्रत्येक क्षणाला स्वत:शीच बांधून टाकण्याची 
अशीच व्यापून मन माझे  राहशील 
एक दिवस माझी स्वप्नेही तुझीच होऊन जातील
तुझ्या साथीने छोट्या आनंदाचीही व्हावीत चांदणफुले 
आणि हलक्या दु:खानेही उरावे रितेपण कोवळे 
का ग करतेस असे? 
जगू दे ना काही क्षण मला माझ्यासवे 
तुझ्याशिवायही घेता येवू दे 
आयुष्याला मला माझ्या कवेत
 
 
अप्रतिम... खूप सुंदर !!!
ReplyDeleteखूप खूप आभार गं स्वाती आणि या ब्लॉगवर स्वागत!
ReplyDeletesorry तुझी हि पोस्ट - कविता उशिरा पाहिल्याबद्दल - पण पुणे सोडले तेंव्हा पासून वेळच मिळत नाहीये. सुंदर कविता - आगे बढो. गेल्या आठवड्यात माझी कविता नव्याने मांडून दाखविली तेंव्हाच जाणवले होते कि हे हि मध्यम तुझे आहे. आधी केल्या असल्यास त्यापण ब्लॉगवर ठेव. अर्थात तुझा ब्लॉग वाचण्याचा माझा अनुशेष खूपच मोठा आहे. पुन्हा कविता मनापासून आवडली.
ReplyDeleteमनापासून धन्यवाद रविदा! पण विचार करतीये स्वत: उत्तम आणि आशयघन कविता कितीतरी पूर्वीपासून करणाऱ्या तुम्हाला या कविता इतक्या का बरे आवडाव्यात? मला मात्र हे शब्दांचे खेळ वाटतात निव्वळ!
Delete