Tuesday, April 22, 2014

रंगूनी रंगात सारया रंग माझा ......……

कितीतरी दिवसांनी आजकाल  थोडा निवांत वेळ असतो माझ्याकडे! अर्थात हे फार काळ टिकणार नाहीच म्हणा. निवांत वेळ आहे या  कल्पनेनेच कसेनुसे वाटू  लागेल आणि कशातरी मी  स्वत:लाच गुंतवून घेईन . तसंही नव्याने करायच्या, नव्याने शिकायच्या गोष्टींची यादी मुळातच इतकी मोठी आहे आणि सातत्याने त्यात भर पडतच राहते. या वर्षी, घर आणि ऑफिस या व्यतिरिक्त  ज्योतिष शिकायला सिरीअसली सुरुवात करायची आहे, अर्थशास्त्र पुन्हा नव्याने शिकायचे आहे, म्हणजे खरंतर अर्थशास्त्रात मास्टर्स करायला यावर्षी admission घ्यायची आहे, एकदा ते केले की रिकामा किंवा निवांत वेळ हा उरणारच नाही. तरी पण याच वर्षी  ओरिगामीची सुरुवात तर केली आहे त्यातले सातत्य टिकवून ठेवायचे आहे, टेरेस आणि खाली असलेली बाग या वर्षी अजून चांगल्या प्रकारे फुलवायची आहे,  संस्कृत स्तोत्रे विष्णू-सह्स्रानामापर्यंत शिकून मधेच सोडून दिली होती आता रुद्र आणि सप्तशती एकदा शिकायची आहे. परवाच,  एके दिवशी दुपारी ऑफिसमधून लवकर घरी  गेले, माझ्या दोन मैत्रिणी जिन्यात भेटल्या, आता इथे कशा असे त्यांना विचारले तर म्हणे " तुझ्या चुलत सासूबाई सध्या गीता शिकवत आहेत, तो क्लास आताच संपला आता घरी चाललोय" ह्याला म्हणतात दिव्याखाली अंधार! पण असो. 

सदा सर्वकाळ सगळ्याच वेड लावणाऱ्या गोष्टी तुमच्या  बरोबर राहतात  असंही नाही, काही काही सोबत करतात, काही चुकारपणे मधेच रस्त्यात तुमचा हात सोडून देतात. पण हरकत नाही, त्या काळापुरत्या तरी त्या आनंददायी असतात हे  नक्की! त्या थोड्याशा सोबतीने देखील त्या  तुम्हाला अधिकाधिक समृद्ध करत असतात. प्रत्येक वेळी त्याच माझा हात सोडतात असेही  नाही, तर माझ्यातही एक लहान मूल दडलेले आहेच ना, त्यामुळे ते ही दरवेळी नवीन खेळाच्या शोधात असतेच, कुतूहल संपले की दिला नाद सोडून असेही  वागत असते. पण  मग अशावेळी माझ्यातल्या त्या लहान मुलाला, माझ्यातली जी एक आई आहे न ती कधी त्या गोष्टींकडे पुन्हा पुन्हा वळवू पाहते किंवा त्याचे  ते "मूलपण" समजून घेत "असे चालायचेच" म्हणत सोडून देते. मूळातच फार आखीव  रेखीव आयुष्याच्या कल्पनांशी मी स्वत:ला बांधून ठेवले नाहीये ते एका परिने  बरेच आहे. घर आणि करिअर ही एकच  मध्यवर्ती आयुष्य रेखा ठरवून, त्या सभोती मग आपल्या आवडी, इच्छा, आकांक्षा यांची हवी तशी सजावट करावी. पण जर घर किंवा करिअरच धोक्यात येणार असेल तर मात्र ती माझी सर्वात मोठी हार असेल, म्हणूनच या जीवन रेखेस  डिस्टर्ब न करताही स्वत: मुक्त आयुष्य कसे जगायचे हे चुकत माकत शिकण्याचा हा प्रयत्न! 

तर या निवांत वेळाचं मी काय करतीये?  सध्या तर फक्त पुस्तके आणि मी!  एक पुस्तक उशाशी ठेवलेले असते, एक सोफ्यावर, आलटून पालटून मी दोन्ही वाचतीये. दुसरीकडे  मला कविताही आवडतात मात्र त्या  वृत्त, मात्रा, छंद यांचे साज लेलेल्याच! आणि कदाचित  म्हणूनच शांताबाई, इंदिरा संत, रॉय  किणीकर, महानोर, आरती प्रभू किंवा बोरकर यांच्या कविता जास्त भावतात. नव्या कवींमध्ये  संदीप खरे किंवा वैभव जोशी जे लिहितात ते आवडते. दुसरे म्हणजे न कवितेचे स्वत:चे एक प्रसन्न व्यक्तीमत्त्व  असायला हवे, अगदी दु:खाची, विरहाची, वेदनेची कविता वाचताना, ऐकताना ते दु:ख, ती वेदना आपल्या पर्यंत पोहचली पाहिजे जरूर पण तिने आपला ताबा घ्यायचा नाही, ते दु:ख, वेदनेचे मळभ आपल्या मनावर सोडून जायचे नाही, आणि अशाच कविता फक्त मला गुंतवून ठेऊ शकतात. आजकाल कवितांनी थोडे वेड लावलेच आहे तर पुरतेच त्यात रंगून जावे म्हणत परवा "उत्तररात्र" वाचून काढली. त्यातूनच रोज एक मला आवडलेली कविता किंवा  ओळी  स्वत:च्याच ब्लॉगवर पोस्ट करायची कल्पना सुचली आणि ताबडतोब ती मी अमलात पण आणली. अनेकदा कवितेची सुरुवात आठवत असते किंवा काही ओळी, पण संपूर्ण कविताकाही आठवत नसते किंवा तोंडपाठही नसते. पण मग होते काय की किमान ब्लॉगवर ठेवण्यासाठी तरी मी त्या कवितेचा  थोडा शोध घेते, मला हव्या असतात त्यातल्या चार ओळीच पण  त्यामुळे पुन्हा एकदा ती कविता मात्र पूर्ण वाचून होते. 

हे ही वेड टिकेल वा मागे पडेल, पण त्यातून मला जो आनंद गवसेल त्याची तुलना दुसऱ्या कशाशीच नाही ना होऊ शकणार! म्हणूनच "रंगुनी रंगात साऱ्या" म्हणत मी हे सारे आनंदाने करतीये. 

No comments:

Post a Comment

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!